डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पाचवे दशक (विचार अन्‌ कार्यविस्तारास अनुकूल कालखंड)

विनम्र आवाहन

हमीद दलवाई यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना 22 मार्च 1970 रोजी केली, पुणे येथील साधना कार्यालयाच्या सभागृहातच ती सभा झाली. तेव्हा व नंतरही तत्कालीन संपादक यदुनाथ थत्ते व साधना परिवारातील अन्य अनेक धुरीण मंडळाच्या मागे खंबीरपणे उभे राहिले. याचे कारण राष्ट्रीय एकात्मतेसाठी, धर्मनिरपेक्षतेसाठी व आधुनिक भारताच्या उभारणीसाठी दलवाई व मंडळ यांची भूमिका योग्य आहे, अशी त्यांची ठाम धारणा होती. त्यांची ती धारणा बरोबरच होती असे आम्हालाही वाटते, म्हणून दलवार्इंच्या वैचारिक व कृतिशील वारशाला उजाळा देण्यासाठी मागील पाच वर्षात आम्ही शक्य तितके प्रयत्न केले आहेत. मंडळाच्या स्थापनेला 22 मार्च 2020 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष शमसुद्दिन तांबोळी यांनी लिहिलेले, मंडळाच्या पाच दशकांच्या वाटचालीवर ओझरता दृष्टिक्षेप टाकणारे पाच दीर्घ लेख क्रमशः प्रसिद्ध केले आहेत. यातून मंडळाची अनेक आघाड्यांवर काम करण्याची इच्छा व त्या मार्गातील अन्य अनेक अडचणींबरोबरच आर्थिक अडचणीही अधोरेखित झाल्या आहेत. म्हणून आम्ही वाचकांना आवाहन करतो, शक्य असेल त्या प्रकारे व शक्य असेल तेवढी मदत मुस्लिम सत्यशोधक मंडळाला करावी. त्यासाठी मंडळाच्या अध्यक्षांशी (अगदीच आवश्यक असेल तर साधनाच्या संपादकांशी) संपर्क साधावा.

- संपादक, साधना साप्ताहिक

मुस्लिम धर्मवादी व राजकीय नेत्यांनी हमीद दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाविरोधात केलेला अपप्रचार आणि काही हिंदुत्ववाद्यांनी आपल्या सोईप्रमाणे निवडक दलवाईविचार वापरल्यामुळे सामान्य मुस्लिम समाजात दलवाई यांचा मुस्लिम हिताच्या समाजप्रबोधनाच्या विचाराचा, प्रसार होऊ शकला नाही.

हमीद दलवाई यांनी मुस्लिम जमातवाद, मदरसा शिक्षण, पारंपरिक कालबाह्य श्रद्धा मुस्लिम प्रगतीच्या आड कशा येतात, हे सांगत असतानाच मुस्लिम समाजाच्या आधुनिकीकरणासाठी बहुसंख्य हिंदू समाजातील आधुनिकता कशी आवश्यक आहे, हे वेळोवेळी विशद केलेले आहे. धर्मनिरपेक्ष एकात्म समाजनिर्मितीमध्ये धर्मवाद्यांचा अडथळा असतो. तसेच शिक्षणसंस्थांतील अभ्यासक्रमातील वास्तव दाखवताना दलवाई म्हणतात, ‘धर्मनिरेपक्षतेच्या प्रवाहाविरुद्ध अनेक ठिकाणी पाठ्यपुस्तके नेमलेली असतात. काही पुस्तकांत मुसलमान परकीय आहेत, असे म्हटले आहे.

राम अथवा कृष्ण यांचे पाठ्य-पुस्तकातील उल्लेख पुराणकथांचे (मायथॉलॉजी) महापुरुष म्हणून केलेले नसून, हिंदूंचे देव म्हणूनच केले जातात आणि हिंदूंचे देव या अर्थाने बिगरहिंदू विद्यार्थ्यांनादेखील त्यांचे माहात्म्य सांगितले जाते.’ यांसारखी इतर उदाहरणे देत असतानाच आकाशवाणी केंद्रामार्फतसुद्धा उच्चवर्णीय हिंदूंचेच कार्यक्रम कशा पद्धतीने सादर केले जातात, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षण, प्रशासन आणि पोलीस यंत्रणांकडून अनुभवास येणाऱ्या पक्षपाती वर्तनाचे दाखले दलवाई दाखवतात आणि भारतातील धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाचे प्रश्न किती अवघड आहेत, असे प्रतिपादन करतात.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पाचव्या दशकाच्या आरंभी इतिहासलेखक डॉ.रामचंद्र गुहा यांच्या ‘मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’तील शेवटचे प्रकरण ‘द लास्ट मॉडर्निस्ट’ हे आधुनिक भारतातील हमीद दलवाई यांच्या योगदानावर आधारलेले आहे. या पुस्तकामुळे अनेकांना दलवार्इंच्या विचाराबद्दल आकर्षण वाढू लागले. साधना साप्ताहिकाने आरंभापासूनच दलवाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यास प्रोत्साहन दिलेच, परंतु या दशकाच्या शेवटच्या अर्ध्या काळात फार मोलाचे योगदान दिले आहे. ‘इस्लामचे भारतीय चित्र’ या आऊट ऑफ प्रिंट झालेल्या पुस्तकाला नव्या रूपात प्रकाशित केले. याबरोबरच अनुवादित, संकलित, अप्रकाशित असे ‘भारतातील मुस्लिम राजकारण’ ‘अँग्री यंग सेक्युलॅरिस्ट’, ‘कानोसा : भारतातील मुस्लिम मनाचा’, ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’, ‘मी भरून पावले’, ‘जमीला जावद आणि इतर कथा’, ‘पुनर्भेट हमीद दलवार्इंची’ हा विशेषांक, असे दलवाई यांचे साहित्यदालन उपलब्ध करून देऊन साधनाने मुस्लिम सत्यशोधक चळवळीस अनुकूल परिस्थिती निर्माण केली.

महाराष्ट्र फाउंडेशनचा (अमेरिका) मरणोत्तर ‘समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार’ दलवार्इंना देण्यात आला. पुस्तक प्रकाशन, चर्चासत्र असे सर्व आयोजित करून, पुण्याबाहेरचे चर्चासत्र, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे 13-14 डिसेंबर 2019 रोजी झालेले राष्ट्रीय चर्चासत्र तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या साप्ताहिक बैठकीसाठी साधना मीडिया सेंटरची जागा उपलब्ध करून देऊन मंडळाच्या जागेची अडचण सोडवली. लवकरच महाराष्ट्र साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे ‘समग्र हमीद दलवाई’ ग्रंथ प्रकाशित होणार आहे. या सर्व प्रयत्नात साधनाचे संपादक विनोद शिरसाठ यांची कल्पकता आणि दलवाई यांच्या कार्याबद्दलची आस्था अधोरेखित होते.

या दशकाच्या उत्तरार्धातील महत्त्वपूर्ण घटना म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी दिग्दर्शित आणि निर्मित केलेला ‘हमीद दलवाई : अनसंग ह्युमॅनिस्ट’ हा लघुपट. नसिरुद्दीन शहांच्या सहभागामुळे या लघुपटाला महत्त्व होते. लघुपटाचे ठिकठिकाणी झालेले प्रदर्शन आणि त्यानिमित्ताने झालेला संवाद मुस्लिम सत्यशोधक व दलवाईविचाराने कार्य करणाऱ्यांसाठी, चाहत्यांसाठी एक उपलब्धी होती. याच काळात महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून दलवाई यांचे साहित्य आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य भाषा इतिहास आणि समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केले आहे. अनेक विद्यार्थी या विषयावर विविध पातळ्यांवर संशोधन प्रबंध सादर करत आहेत. ही मंडळाचे विचार आणि कार्याच्या प्रसारासाठी विशेष व स्वागतार्ह बाब आहे.

या दशकात मुस्लिम सत्यशोधक मंडळाने समतावादी, समविचारी संघटनांसमवेत नियमित कार्यक्रम घेण्यास सुरुवात केली. मागील जवळपास दहा वर्षांपासून या कार्यक्रमात सातत्य आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठानच्या वतीने 3 मे हा दिवस सत्यशोधक हमीद दलवाई-दिनकरराव जवळकर स्मृतिदिन साजरा करण्यात येतो. यामध्ये व्याख्याने, युवा परिषद, परिसंवाद, महिला मेळावे, तलाकपीडित-परित्यक्त्या महिलांच्या परिषदांचा समावेश आहे. तसेच अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा आणि मंडळ दर वर्षी दि. 11 नोव्हेंबर हा मौलाना आझाद यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय शिक्षणदिन’ म्हणून साजरा करते. या वेळी प्रकाशन, परिसंवाद, व्याख्याने आयोजित केली जातात.

यामध्ये मा. भाई वैद्य, अ. का. मुकादम, डॉ.अलिम वकील, डॉ.शहाबुद्दीन शेख, प्रा. जहीर अली, डॉ.हरी नरके, प्रा. बेनझीर तांबोळी, डॉ.शरद जावडेकर, प्रा. डॉ.शुजा शाकीर, डॉ.अभिजित वैद्य, रझिया पटेल, डॉ.एस. एन. पठाण यांचा समावेश आहे. मुस्लिम समाजातील शिक्षणसमस्या, भारतीय शिक्षणव्यवस्था समस्या, लोकशाही-धर्मनिरपेक्षता या व अशा विषयांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली आहे.

गेल्या साडेतीन दशकांपासून भारतातील बहुसांस्कृतिकता, धार्मिक संवाद आणि सलोखा बिघडवणाऱ्या अनेक घटना घडत आहेत. जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर घडणाऱ्या दहशतवादी कारवाया, कपोलकल्पित अशा लव्ह जिहादच्या निमित्ताने होणारा अपप्रचार, हत्या, गोवंशहत्याबंदी कायद्यानंतर कायदा हातात घेऊन दलित-अल्पसंख्याकांवरील हल्ले-हत्या, धार्मिक विद्वेष पसरवणारी वक्तव्ये आणि याच पद्धतीने धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असताना सामान्य समाजाच्या शांततापूर्ण सहजीवनात तेढ निर्माण झाली. मुस्लिम समाजातील गरजूंना विकत किंवा भाड्याने घरेसुद्धा नाकारण्यात येत होती. मुस्लिम धर्मवादी-राजकारणी लोकांचा वंदे मातरम्‌, भारत माता की जय, सिनेमागृहातील राष्ट्रगीत, तलाकबंदी यांना विरोध, विविध प्रकारचे फतवे, या निमित्ताने केली गेलेली वक्तव्ये समाजास अस्वस्थ करणारी होती.

मदर तेरेसांवरील राग, चर्चवरील हल्ले, दलितांवरील अत्याचार अशा परिस्थितीत सामाजिक सलोखा-संवाद वाढवण्यासाठी मुस्लिम सत्यशोधक, डायोसिस ऑफ पुणे प्रांत, स्वच्छंद, पुणे, मराठवाडा मित्रमंडळ आंतरधर्मीय सुसंवाद प्रस्थापित करण्यासाठी गेली आठ-दहा वर्षे कार्यक्रमाचे नियोजन करतात. नाताळ, रमजान ईद, दीपावली सणानिमित्त, तसेच स्वातंत्र्यदिन, हुतात्मादिनांचे औचित्य साधून चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे. या अनुषंगाने बिशप डॉ.थॉमस डाबरे, प्रा. रवींद्र शाळू, प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांच्यासह डॉ.सदानंद मोरे, डॉ.दत्तात्रय तापकीर, भाऊसाहेब जाधव यांनी विशेष सहभाग नोंदवला. सर्वधर्मीय लोक एकत्र येऊन हा कार्यक्रम करीत असल्याने संवाद आणि धर्माकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न होतो. भारतीय संविधानाला अपेक्षित असणारे धर्मस्वातंत्र्य आणि व्यवहारात धर्मस्वातंत्र्याच्या नावाने चाललेला गदारोळ यातील फरक, धर्मातील उदारमतवाद, सर्वसमावेशकता आदींवर भर देण्यात येतो.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ, प्रौढ व निरंतर शिक्षण व ज्ञानविकास विभाग आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ, हमीद दलवाई स्टडी सर्कल व प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरमच्या वतीने दोन-तीन दिवसांचे चर्चासत्र, परिसंवाद, परिषदांचे अनेक वेळा आयोजन करण्यात आले. डॉ.असगर अली इंजिनिअर यांची धर्मनिरपेक्षतेवरील कार्यशाळा; प्रा. जहीर अली, डॉ.बाबा आढाव, भाई वैद्य, अ.का. मुकादम, पन्नालाल सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय एकात्मता’; डॉ.राजा दीक्षित, डॉ.यशवंत सुमंत, डॉ.शमसुद्दीन तांबोळी, राजन खान यांच्या समवेत ‘भारतीय संविधान’ या विषयावरील चर्चा झाली.

 ‘सामाजिक एकात्मतेचे विविध पैलू’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात अभिनेते अमोल पालेकर, चित्रकार संजय पवार, डॉ.लक्ष्मीकांत देशमुख, डॉ.थॉमस डाबरे, प्रा. निवळीकर, उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग, संजय नहार, राजन खान, डॉ.अभिजित वैद्य, मा. अशोक धिवरे, डॉ.विश्वंभर चौधरी यांसारख्या अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमास हजेरी लावली. अशा प्रकारचे किमान पंधरा कार्यक्रम डॉ.धनंजय लोखंडे, डॉ.सतीश शिरसाठ, प्रा.तांबोळी यांनी आयोजित केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाने समाजाला धर्मापलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन देण्यासाठी काही कार्यक्रम आखले. धार्मिक सण अधिकाधिक समाजाभिमुख होऊन या सणांनी मानवतेसाठी योगदान द्यावे, धार्मिक सणांमुळे पर्यावरण व सामाजिक वातावरण दूषित होऊ नये हा विचार बळगला. डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून अशा अनेक उपक्रमांची सुरुवात केली. या उपक्रमांतून शमसुद्दीन तांबोळी यांनी प्रेरणा घेतली आणि 2012 मध्ये बकरी ईदच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ‘प्राण्यांचे रक्त सांडण्यापेक्षा जात-धर्मापलीकडे जाणारे, मानवाशी रक्ताचे नाते जोडणारे रक्तदान करणे हीच खरी कुर्बानी आहे. त्याग आणि कुर्बानीचा खरा अर्थ समजून घ्यावा’, हा हेतू बाळगून सुरू केलेल्या या आरंभीच्या कार्यक्रमात नरेंद्र दाभोलकर आवर्जून उपस्थित राहिले होते.

मुस्लिम सत्यशोधकने हा विज्ञान-विवेकाचा उपक्रम सुरू केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला होता. मंडळाने 2013 मध्ये आयोजित केलेला रक्तदान समारंभ येण्यापूर्वीच एक महिना अगोदर दाभोलकरांची हत्या झाली. दि. 20 ऑगस्ट 2013 च्या कार्यक्रमात दाभोलकर नव्हते; पण डॉ.हमीद दाभोलकर, मुक्ता दाभोलकर आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमात स्वत: रक्तदान केले. हा कार्यक्रम नियमित सुरू आहे. सध्या या कार्यक्रमाला ‘रक्तदान सप्ताह अभियाना’चे स्वरूप आले आहे. यात आता अंनिसबरोबरच राष्ट्र सेवादल व समविचारी संघटना सहभागी होत आहेत.

मुस्लिम समाजात अशा कार्यक्रमांचे आयोजन उत्स्फूर्तपणे होत आहे. रक्तदात्यांची संख्या वाढत आहे. आता या सप्ताहात पुणे, कोल्हापूर, नागपूर, सांगली, सातारा, इचलकरंजी, विदर्भ, मराठवाड्यातील पंधरा ते वीस शहरांत कार्यक्रम होतात. या उपक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी डॉ.अशोक धिवरे, सुरेश खोपडे, लक्ष्मीकांत देशमुख, श्याम देशपांडे, विद्या बाळ, बाबा आढाव, न्या. वि. वा. शहापूरकर, विश्वंभर चौधरी, सुभाष वारे, डॉ.थॉमस डाबरे आणि अनेक मान्यवर दर वर्षी उपस्थित राहतात. हा उपक्रम यशस्वीपणे समाजात रुजत आहे. त्यामध्ये तरुण-तरुणींचा सहभाग वाढतो आहे. मुस्लिम-मुस्लिमेतर एकत्र येऊन हे मानवतेचं नातं जपत आहेत.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे चाहते, समर्थक आणि टीकाकारांचा असा एक आक्षेप राहिला आहे की, मंडळ फक्त तलाक-बहुपत्नीत्व या महिलांच्या प्रश्नांवरच कार्य करते. मंडळाने शिक्षण रोजगार आणि अशा विधायक कार्यकडेसुद्धा लक्ष दिले पाहिजे. समाजाच्या आर्थिक-सामाजिक प्रश्नांवर कार्य केले पाहिजे. ही अपेक्षा रास्त आहे. मात्र मंडळाच्या काही मर्यादा आहेत, हे विचारात घेऊन मंडळाने न्या.राजेंद्र सच्चर व न्या.रंगनाथ मिश्रा आयोगाचा आधार घेऊन त्यांनी 2007 मध्ये सादर केलेला अहवाल, त्यातील शिफारशींसंदर्भात जनजागृती करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन केले. हुसेन जमादार, महंमद महंमदगौस नाईक, प्रा.आय.एन.बेग, गाझिउद्दीन सलाती व कार्यकर्त्यांनी ‘सच्चर का सच’ ही पुस्तिका हिंदीत अनुवादित करून त्याच्या प्रचारार्थ विविध भागांत मेळावे घेतले.

ग्रामीण भागातून अनेक तरुण-तरुणी पुण्यात शिकायला येतात. एम.पी. एस.सी., यू.पी.एस.सी. व इतर स्पर्धापरीक्षांची तयारी करतात. या विद्यार्थ्यांना प्रस्थापित मार्गदर्शन केंद्रातील शुल्क भरून प्रवेश घेणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थ्यांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी हमीद दलवाई स्टडी सर्कलची स्थापना करण्यात आली. मराठवाडा मित्र मंडळाचे वाणिज्य महाविद्यालय आणि मंडळाच्या वतीने ‘हमीद दलवाई स्टडी सर्कल-स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र’ स्थापन करण्यात आले. मा. भाई वैद्य, मा.अशोक धिवरे, पोलीस अधिकारी सारंग आव्हाड, मा.विवेक सावंत, मा. भाऊसाहेब जाधव यांच्या उपस्थितीत सुरू केलेल्या या स्टडी सर्कलमध्ये आजतागायत डॉ.अभिजित वैद्य, मा. एस. एम. मुश्रीफ, मा. सतीश पाटील, अन्वर शेख, शमसुद्दीन तांबोळी, प्रा. अविनाश कोल्हे, राजन खान, डॉ.जयंत नारळीकर, डॉ.मंगलाताई नारळीकर यांच्यासह अनेकांनी मार्गदर्शन केले.

या केंद्रामार्फत कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग घेण्यात आला. यात हमीद दाभोलकर, विनोद शिरसाठ, प्रा.आफाक खान, मा. विल्यम व इतरांनी मार्गदर्शन केले. या केंद्रामार्फत प्रत्येक शनिवारी-रविवारी वर्ग घेण्यात आले. यात तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र आयोजित केले. जालना येथील रिक्षाचालकाचा मुलगा अन्सार शेख याला तो मुस्लिम असल्याने पुण्यात कॉट बेसिसवर जागा मिळत नव्हती. त्याची मराठवाडा मित्रमंडळाच्या वसतिगृहात राहण्याची व्यवस्था केली. हाच अन्सार शेख त्याच्या प्रथम प्रयत्नात परीक्षेत उत्तीर्ण झाला. आणि 2015 च्या बॅचमधील वयाच्या एकविसाव्या वर्षी आय. ए.एस. होणारा सर्वांत तरुण अधिकारी ठरला.

एक वेळ जेवून अभ्यास करणाऱ्या अन्सारला अनेक अडचणी आल्या. आर्थिक अडचण होतीच. त्याच्या या यशात मंडळ आणि स्टडी सर्कलचा वाटा आहे. असे व्यावसायिक पद्धतीने गुणवत्तापूर्व मार्गदर्शन करण्यात केंद्राला मर्यादा पडत होत्या. मंडळाने महाराष्ट्रातील गरीब-गरजू, हुशार मुलांची प्रवेश परीक्षा घेऊन, मुलाखती घेऊन अशा विद्यार्थ्यांना पुण्यातील युनिक ॲकॅडेमी, ज्ञानदीप अकादमी, ज्ञानज्योती अकादमीत प्रवेश मिळवून देण्याचे ठरवले. या केंद्रांनी ही सहकार्य केले. दर वर्षी या उपक्रमाचा विद्यार्थी लाभ घेत आहेत.

विविध आयोगांच्या-अभ्यासगटांच्या शिफारशींचा आधार घेऊन तत्कालीन महाराष्ट्र शासनाने 2014 मध्ये निवडणुकीच्या उंबरठ्यावर मुस्लिम आरक्षणाची घोषणा केली. मुस्लिम समाजातील पन्नास मागास जातींची यादी केली, अध्यादेश काढला; परंतु काही महिन्यांतच सत्तांतर झाले. मुस्लिम आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या. मुस्लिम समाजातील मागासजातींचे वास्तव, समान संधीचा अभाव विचारात घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

नोकरीत नाही, मात्र या मागासजातींना शिक्षणसंस्थांमध्ये पाच टक्के आरक्षण असावे, असा निवाडा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. परंतु भाजपप्रणीत सरकारने याकडे काणाडोळा केला. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने मुस्लिम मागास गटांना समान संधी, समान अधिकार, समान न्याय मिळावा यासाठी विविध स्तरांवर विविध माध्यमांतून प्रयत्न केले. प्रबोधनासाठी समाजात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी केलेल्या या प्रयत्नांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

मुस्लिम सत्यशोधक चळवळीत युवकांचा सहभाग वाढावा, यासाठी मुस्लिम सत्यशोधक युवामंच चालवण्यात येतो. या मंचामध्ये तरुण कार्यकर्ते विविध कार्यक्रम आयोजित करतात. प्रा. अझरुद्दीन पटेल यांनी कऱ्हाड येथे युवा परिषदेचे आयोजन केले. यात शंभरहून अधिक युवक सहभागी झाले होते. या परिषदेत मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांबरोबरच डॉ.हमीद दाभोलकर, राज काझी, डॉ.राजेंद्र कांकरिया आणि युवा कार्यकर्त्यांनी विचार मांडले. युवकांचा हा मंच मंडळाच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनात भाग घेतो, भूमिका पार पाडतो. या मंचाचे युवा-युवती आंतरधर्मीय विवाह करतात. समधर्मातील विवाह असेल तर नोंदणी पद्धतीनेच विवाह करण्याची शपथ घेण्याचा उपक्रम विविध कार्यक्रमांतून राबवला जातो.

मुस्लिम महिलांच्या विविधांगी प्रश्नांवर तसेच दैनंदिन प्रश्नांवर मंडळाने आरंभापासूनच कार्य केले आहे. रास्ता पेठेतील डॉ.श्री. न. देशपांडे यांच्या दवाखान्यात चालवले जात असलेले ‘मुस्लिम महिला मदत केंद्र’ डॉ.देशपांडे यांच्या मृत्यूनंतर रस्तारुंदीकरणाच्या निमित्ताने बंद पडले. नंतर सय्यदभाई यांच्या प्रयत्नाने मोमिनपुऱ्यात अब्दुल करीम अत्तार यांच्या जागेत सुरू केले. एक-दोन वर्षांत ते बंद पडले. मंडळाकडे मध्यवर्ती भागात जागा नव्हती. साधना मीडिया सेंटरवर काही महिने साप्ताहिक कार्य केले. मंडळाने राष्ट्र सेवादलाकडे जागेची मागणी केली.

डॉ.अभिजित वैद्य हे विश्वस्त असताना त्यांनी त्यात लक्ष घातले व मंडळासाठी तात्पुरत्या स्वरूपात का होईना, पण कार्य करण्यासाठी जागा उपलब्ध झाली. सातारच्या आगाशे ट्रस्टने मंडळास पुरस्कार व एकावन्न हजार रुपये दिले. याच कार्यक्रमाच्या वेळी डॉ.अभिजित वैद्य यांनी मंडळाच्या एकखोली कार्यालयाचे उद्‌‌घाटन केले. सध्या येथे मंडळाचे कार्य करीत आहोत. मंडळाच्या सुवर्णजयंती वर्षातसुद्धा मंडळास स्वत:ची जागा-कार्यालय नाही. अशा प्रतिकूल परिस्थितीतही मंडळाचे कार्य सुरू आहे. येथेच ‘मुस्लिम महिला मदत केंद्र’ आहे. कौटुंबिक कलहावर सल्ला, कायदेशीर मदत, समुपदेशनासाठी मुस्लिम महिला मंच कार्य करतो.

येथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की, तलाकबंदी विधेयक मंजूर झाल्यानंतर, पोलीस अटक करतील, न्यायालयात चकरा माराव्या लागतील या भीतीने जवळपास 80 टक्के प्रकरणं थांबली आहेत. अशा प्रकारचा कायदा अस्तित्वात येणे आवश्यक होतेच. अर्थात या कायद्यामुळे मुस्लिम महिलांच्या सर्व समस्या सुटल्या आहेत, असे म्हणता येणार नाही. अद्यापही अनेक तरतुदी अन्यायकारक आहेत, त्यात सुधारणा झाली पाहिजे. मुस्लिम महिलांबरोबरच सर्वधर्म समूहातील महिलांना समान कायदा, समान संधी, समान न्याय आणि सर्वधर्म समूहांना समान नागरिकत्व देणारा असा समान नागरी कायदा किंवा भारतीय कौटुंबिक कायदा अस्तित्वात यावा, यासाठीचा लढा सुरूच राहणार आहे.

याच दृष्टिकोनातून दि. 26 नोव्हेंबर 2016 रोजी संविधानदिनी ‘मुस्लिम महिला अधिकार परिषद’ आयोजित करण्यात आली. यात काशीपूर उत्तराखंडच्या सायराबानो, डॉ.नूर जहीर, भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या कार्यकर्त्या, डॉ.विद्या बाळ, भाई वैद्य, आबेदा इनामदार, रुबिना पटेल आणि युवतींनी भाग घेतला. अशा प्रकारचे मेळावे, निदर्शने, परिषदांचे आयोजन मंडळाने केले. हमीद दलवाई यांनी 18 एप्रिल 1966 रोजी सात मुस्लिम महिलांच्या काढलेल्या मोर्चाच्या स्मरणार्थ मोर्चा दि. 18 एप्रिल 2017 रोजी काढून पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे मा. मुख्यमंत्र्यांसाठी निवेदन दिले.

यानंतरच्या काळात तलाक प्रश्नावर सतत चर्चा होत राहिली. दि. 22 ऑगस्ट 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने निवाडा देऊन तलाक-ए-बिद्दतवर बंदी घातली. सरकारने कायदा करावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे 18 डिसेंबर 2017 मध्ये मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या शिष्टमंडळाने मा. पंतप्रधानांची भेट घेऊन प्रस्तावित विधेयकात काय असावे, याचा मसुदा शासनाला दिला. दिल्ली येथे पत्रकार परिषद घेतली. खासदारांना निवेदने दिली. शेवटी 2019 मध्ये राज्यसभेतही हे विधेयक पारित झाले. तलाकच्या छायेत वावरणाऱ्या महिलांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

हमीद दलवाई हयात असताना 1973 मध्ये त्रैमासिक स्वरूपात ‘मुस्लिम सत्यशोधक पत्रिका’ सुरू करण्यात आली. कोल्हापूर येथून प्रकाशित होणारी ही पत्रिका दोन-तीन वर्षांत बंद पडली. मग अधून-मधून ती पुण्यातून प्रकाशित होत असे. खंडित झालेली ही पत्रिका 2014 पासून नियमित-अखंडपणे प्रकाशित होत आहे. मंडळाचे मुखपत्र म्हणून प्रकाशित होणारी मुस्लिम सत्यशोधक पत्रिका-विशेषांक आता अधिक दर्जेदार करून, मोठ्या प्रमाणात वितरित करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी वर्गणीदार, जाहिरातदारांचा पाठींबा मिळाल्यास मंडळाचे कार्य आणि मुस्लिम जगतातील घटना मोठ्या समूहापर्यंत पोहोचवता येतील. प्रबोधनाचे एक साधन म्हणून ही पत्रिका उपयुक्त ठरत आहे. दि.22 मार्च रोजी मंडळाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त विशेषांकाचे प्रकाशन होणार आहे. यात आजच्या प्रश्नांवर प्रकाश टाकतानाचे- मंडळाच्या इतिहासातील व दलवार्इंचे उपलब्ध नसलेले लेख व इतर साहित्याचा समावेश असेल.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाने निखळ बुद्धिवादी-संविधानवादी भूमिकेतून ऐहिक प्रश्नावर लक्ष केंद्रित करणारा जाहीरनामा तयार केला होता. चार दशकांपूर्वी तयार केलेल्या या जाहीरनाम्यात सुधारणा करण्यात यावी. इस्लाममधील उदारमतवादाचा आधार ज्या ठिकाणी उपयोगी ठरेल, तो स्वीकारावा. जागतिक पातळीवरील मूलतत्त्ववादी, देशातील जमातवादी, सामान्य समाजात कट्टरतावादी इस्लाम वापरतात त्याचा प्रतिवाद करता यावा. हिंदुत्ववादी शक्ती इस्लामच्या प्रतिगामी प्रतिमेच्या आधारावर मुस्लिमांवर तोंडसुख घेतात, म्हणून इस्लामचा उदारमतवादी चेहरा आवश्यक तेथे वापरावा- अशी भूमिका घेण्यात आली. हमीद दलवाई हे स्वत: निधर्मी-निरीश्वरवादी असले, तरी ते त्यांचे विचार व्यक्तिस्वातंत्र्याचा भाग होते.

मंडळ हे निधर्मी-निरीश्वरवादी नाही. संविधानाने दिलेले धर्मस्वातंत्र्य आणि त्यावरील मर्यादा यांच्याशी अनुरूप भूमिका घ्यावी. धर्मात ज्या प्रश्नांची उत्तरे नसतील, तेव्हा संविधान समोर असावे. ‘धर्म की संविधान?’ अशा परिस्थितीत संविधानास प्राधान्य द्यावे, या आशयाचा नवा जाहीरनामा तयार करण्यात आला. मंडळाने सुरू केलेला हमीद दलवाई पुरस्कार हा हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात येत होता. मंडळाने मंडळाच्या स्थापनादिनी मुस्लिम समाजप्रबोधन पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. नव्या जाहीरनाम्याच्या पार्श्वभूमीवर हा पहिला पुरस्कार डॉ.असगर अली इंजिनिअर यांना दि. 6 मे 2012 मध्ये प्रदान करण्यात आला.

नंतर साहित्यिक राजन खान, मुमताज शेख, नूरजहाँ सफिए आदींना देण्यात आला. मंडळाचे आरंभीचे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले यांच्या नावे ‘राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ देण्याचे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे पत्रकर राज काझी आणि दिल्ली येथील ‘धनक’ या  संस्थेचे आसिफ इक्बाल व पत्नी राणू कुलश्रेष्ठ यांना त्यांच्या आंतरधर्मीय विवाहाच्या प्रचारार्थ उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार दिला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सत्यशोधक फातिमा बी शेख कार्यगौरव सन्मान पुरस्काराची घोषणा केली. त्याप्रमाणे पहिल्याच वर्षी माजी खासदार आरिफ मोहंमद खान यांच्या हस्ते विविध क्षेत्रांतील पाच महिलांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मागील वर्षी इस्लामच्या अभ्यासक डॉ.झीनत शौकत अली यांना हा पुरस्कार दिला. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे लोकशाहीर बशीर कवठेकर यांचाही सन्मान केला.

मुस्लिम समाजाच्या स्थितीवर प्रकाश टाकून ही स्थिती सुधारण्यासाठी वेळोवेळी चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले. यात राम पुनियानी, इरफान इंजिनिअर, जावेद आनंद, जहीर अली, आफाक खान आणि मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांसह समविचारी मान्यवरांनी सहभाग नोंदवला. मुस्लिम सत्यशोधक युवा मंच, हमीद दलवाई स्टडी सर्कलच्या वतीने यशदा, पुणे येथे तीन दिवसांची अशी पाच शिबिरे आयोजित केली. यात साहित्य, शिक्षण, प्रशासन, समाजिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. सुरेश खोपडे, अशोक धिवरे, अ. का. मुकादम, राजन खान, हरी नरके, विश्वंभर चौधरी, प्रकाश पवार, सुभाष वारे, रवींद्र चव्हाण, शमसुद्दीन तांबोळी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने तरुणवर्गासाठी मा. बाबूमियाँ बँडवाले यांच्या जन्मदिनी 5 सप्टेंबर रोजी वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. राज्यपातळी-वरील या स्पर्धेत साठ स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेचे उद्‌घाटन डॉ.श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले आणि पुरस्कार वितरण मुमताज शेख, मनीषा गुप्ते यांच्या हस्ते झाले. महिला मंचाच्या वतीने ‘महिला सबलीकरण- वास्तव आणि अपेक्षा’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली. दि. 8 मार्च- महिलादिनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ.आंबेडकर पुतळ्याजवळ निदर्शने करून मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.

आरोग्यदिनाचे औचित्य साधून महिलांच्या आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच महिलांना कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी कार्यशाळा आयोजित केली. युवा मंच आणि महिला मंच सातत्याने मंडळाचे उपक्रम राबवण्यात पुढाकार घेतात. ‘धार्मिक उच्छाद’ या विषयावरील परिसंवादात समीर शेख, बेनझीर तांबोळी, रुक्सार मुल्ला प्रा. लता जाधव, कलीम अजीज, अन्सार शेख, शहनाज शेख, तन्वीर इनामदार यांनी भाग घेतला. रुक्साना पाटील, मीनाज लाटकर, हलिमा कुरेशी, हिना खान, शबनम पूनावाला, सायरा मुलाणी, मुमताज इनामदार, तमन्ना इनामदार, आर्शिया बागवान, अप्सरा आगा, साजिद इनामदार, प्रा. अझरुद्दीन पटेल आणि इतर अनेक कार्यकर्ते चर्चेत सतत सहभाग नोंदवतात.

मंडळाच्या वतीने 29 सप्टेंबरला हमीद दलवाई जन्मदिवसानिमित्त कार्यक्रम घेण्यात येतात. ‘हमीद दलवाई यांच्या विचारांची प्रासंगिकता’ या विषयावरील परिसंवादात तरुणांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी विनोद शिरसाठ होते. वेळोवेळी झालेल्या कार्यक्रमांत राजा शिरगुप्पे, जहीर अली, राजा दीक्षित आदींनी मार्गदर्शन केले. दि. 29 सप्टेंबर 2019 रोजी ‘हमीद दलवाई यांचे ललित व वैचारिक साहित्य’ या विषयावर तरुणांनी अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमात डॉ.अनिल अवचट, पत्रकार सदा डुंबरे, डॉ.हमीद दाभोलकरांनी मार्गदर्शन केले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी आपले आत्मकथन प्रसिद्ध केले. तसेच या दशकात हमीद दलवाई क्रांतीकारी विचारवंत (दुसरी आवृत्ती), समान नागरी कायदा- अपेक्षा व वास्तव, मुस्लिम समाज : प्रबोधन व विकास, मुस्लिम समाज : व्यक्ती, विचार, साहित्य, शहाबानो ते शबानाबानो, आझाद कलाम ही शमसुद्दीन तांबोळी यांची पुस्तके; तसेच एक नजर - तलाकनंतर, शोध मुस्लिम महिला समस्यांचा, मुस्लिम बलुतेदार, बाईची जात ही तमन्ना इनामदार यांची; तर चंद्रकोरीच्या छायेत, दास्तान, इस्लाम ज्ञात-अज्ञात ही अ. का. मुकादम यांची पुस्तके कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध झाली आहेत.

मंडळाच्या पाचव्या दशकाच्या उत्तरार्धात मंडळाचे कार्यकर्ते हुसेन जमादार, प्रा. वि. अ. शेख, मेहरुन्निसा दलवाई, ताहेर पूनावाला, महंमद खडस, फक्रुद्दीन बेन्नूर, अमीर शेख आदींचे निधन झाले. तसेच मंडळाचे समर्थक दाभोलकर, गोविंद पानसरे यांची हत्या झाली. मंडळाचे आधारस्तंभ मा. भाई वैद्य, डॉ.श्रीराम लागू, मा. विद्या बाळ यांचेही निधन झाले. मंडळासाठी हे सर्व आघात आहेत.

मंडळाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्धापनदिनी माजी मंत्री आरिफ मोहंमद खान, अभिनेते नसिरुद्दीन शहा यांच्या हस्ते सायराबानो यांचे वकील बालाजी श्रीनिवासन यांचा विशेष सत्कार करण्यात आला. गेले एक दशक मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणाऱ्या भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या डॉ.नूरजहाँ सफिए व जाकिया सोमण यांचाही सत्कार करण्यात आला.

मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी ‘जरीना का क्या होगा?’, ‘जुल्म’ अशा लघुपटांचे सादरीकरण करून त्यावर चर्चा घेण्यात आली. डॉ.जया सागडे, वैजयंती जोशी, न्या.पी.बी. सावंत, न्या.शहापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास शिबिरांचे आयोजन करण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळ व एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या वतीने समान नागरी कायद्यावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात जमाते इस्लामीच्या शोधन साप्ताहिकाचे संपादक आक्रम खान, भाजप उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रा.जहीर अली, डॉ.जया सागडे, ॲड.सुरेखा दळवी, सय्यदभाई, सुभाष वारे आणि शमसुद्दीन तांबोळी यांनी दीर्घ चर्चा केली. न्या.पी.बी.सावंत यांनी अध्यक्षीय समारोप केला.

मंडळाच्या वतीने राबवण्यात आलेल्या एकूणच कार्यक्रमाची जंत्री तपशीलवारपणे देणे शक्य आहे, अशा कार्यक्रमांची संख्या आणि सहभागी वक्ते, प्रसंग ही यादी मंडळाचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा सविस्तर देता येईल. आता ते प्रस्तुत नाही. मंडळाच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करणारे, मदत करणारे अनेक साथी आहेत. त्यांनी लेखनमर्यादा समजून घेऊन, त्यांच्या आठवणीतील कार्यक्रम नोंदवला गेला नसेल तर क्षमा करावी. मात्र मला वैयक्तिक फोन करून कळवावे.

अलीकडच्या काळात एन.आर.सी., सी.ए.ए. आणि एन.पी. आर.च्या निमित्ताने देशभरात आंदोलन सुरू आहे. गेले दोन-तीन महिने या विषयावर देश अस्वस्थ आहे, या निमित्ताने सध्या हिंसाचार वाढत आहे. महाराष्ट्रात या विषयावर जनजागृती करण्यास डॉ.गणेश देवी यांनी सुरुवात केली. यासाठी एन.आर.सी. विरोधी परिषद 24 सप्टेंबर रोजी घेण्यात आली. कृती समिती स्थापन झाली. सध्या ‘हम भारत के लोग’ या नावाने होत असलेले आंदोलन व लोकशिक्षणात मुस्लिम सत्यशोधक मंडळ सहभागी आहेच. मुस्लिम महिला ‘शाहीन बाग’मध्ये संविधान, राष्ट्रध्वज घेऊन अन्यायाविरोधात दीर्घ काळ लढा देत आहेत.

या निमित्ताने धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत आहेत. विखारी वक्तव्ये केली जात आहेत. मात्र सरकार संवादासाठी पुढे येण्याऐवजी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. यानिमित्ताने धर्मनिरपेक्षतेसमोर धर्मांध मानसिकता पुन्हा  आव्हान उभे करीत आहे. या सर्व घडामोडींची मंडळास चिंता वाटत आहे. या निमित्ताने होणाऱ्या जखमा भरून काढण्यास वेळ लागेल. ही स्थिती लवकर सुधारावी यासाठी सर्वपक्षीय  नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे.

हमीद दलवाई यांनी दि. 22 मार्च 1970 रोजी लावलेले हे बीज आता पन्नास वर्षांचे झाले आहे. या वर्षांत अनेकांनी वेगवेगळ्या पद्धतींनी सहकार्य केले. या सर्व व्यक्ती आणि संघटनांचे बळ आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. मा. कमलताई विचारे यांनी मंडळासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली. त्यांनी अनेकांना समाजोपयोगी कार्यासाठी आणि सत्यशोधकी साहित्यासाठी अशी मदत केली आहे. आम्ही या सर्व मान्यवरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो.

यानंतरच्या काळात मंडळासाठी स्वतंत्र कार्यालय व ग्रंथालय असावे, अशी अपेक्षा आहे. मुस्लिम महिलांसाठी सत्यशोधक फातिमाबी शेख आधार केंद्र असावे, ज्यामार्फत संकटग्रस्त महिलांसाठी काही काळ निवारा देता येईल आणि त्यांना स्वाभिमान व स्वावलंबनाचे धडे-कौशल्य देता येतील. आज मंडळाकडे एकही पूर्णवेळ कार्यकर्ता नाही. किमान दोन तरी असे पूर्णवेळ कार्यकर्ते असल्यास कामाला गती देता येईल. मंडळाचे कार्य ग्रामीण भागात वाढवण्याचे एक स्वप्न तसे शिल्लक राहिले आहे. राष्ट्रीय पातळीवरसुद्धा कार्य नियोजनबद्ध पद्धतीने रुजवायचे आहे. अनेक ठिकाणच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधून समविचारी संघटनांचे जाळे तयार करण्याची हीच एक वेळ आहे.

मुस्लिम सत्यशोधक चळवळीचा वास्तववादी इतिहास लिहिण्याची आवश्यकता व्यक्त केली जात आहे. ती जबाबदारी येत्या काळात मंडळ पार पाडणार आहे. हमीद दलवाई यांचे चरित्र पुस्तकरूपाने येत्या वर्षात प्रकाशित करण्याचा मानस आहे. मंडळाने सुरू केलेले मुस्लिम समाजप्रबोधनाचे कार्य आता कुठे आकाराला येत आहे. हे कार्य अनेक दशकांचे आहे, याची जाणीव ठेवून कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते नक्कीच कटीबद्ध राहतील. साधना साप्ताहिकाने पाच दशकांचा मागोवा क्रमश: पाच भागांत प्रकाशित केला, याबद्दल धन्यवाद!

दि.22 मार्च 2020 सायंकाळी 5 ते 8 या वेळेत- निळू फुले सभागृह, साने गुरुजी स्मारक, पर्वती पायथा, पुणे 30 येथे होणाऱ्या सुवर्णजयंती वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाचे आपणा सर्वांना आमंत्रण!

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा 

Tags: साने गुरूजी निळू फुले राजन खान लक्ष्मीकांत देशमुख राजा शिरगुप्पे शुजा शाकिर श्रीपाल सबनिस मुस्लिम सत्यशोधक मंडळ समाजिक प्रशासन शिक्षण साहित्य nilu phule sane guruji rahn khan lakshmikant deshmukh raja shirguppe shuja shakir shripal sabnis satyshodhak mandal muslim samajik prashasan shikshan sahity weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके