डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

शाहबानो प्रकरणानंतर तलाकपीडित महिलेला कलम 125 नुसार पोटगी मिळवण्याचा आधिकार काढून घेण्यात आला होता. ग्वालियर- मध्य प्रदेशाच्या शबानाबानो यांनी त्यांना देण्यात आलेल्या तलाकनंतर ग्वालियरच्या कौटुंबिक न्यायालयात कलम 125 प्रमाणे पोटगी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. ग्वालियर कौटुंबिक न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही शबानाबानो यांची याचिका फेटाळली. म्हणून त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबर 2009 रोजी निकाल दिला. या निकालात न्या.सुदर्शन रेड्डी व न्या.दीपक वर्मा यांनी ही केस कौटुंबिक न्यायालयात असल्याने, अशा महिलांना कलम 125 नुसार पोटगीसाठी याचिका दाखल करता येते, असा निकाल दिला.

मुस्लिम समाजाला धर्मापलीकडची दृष्टी देऊन त्यांच्या ऐहिक जीवनात आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, ही भूमिका घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आरंभापासून प्रयत्न केले. मुस्लिम समाजातील बुद्धिवादी, आधुनिक दृष्टी असणाऱ्या मित्रांनी मुस्लिम सत्यशोधकला साथ दिली. आपल्या कौटुंबिक कलहाच्या समस्या घेऊन अनेक महिला मदतकेंद्रात येत; परंतु आपल्या समस्या सुटल्या की, मंडळाच्या कार्यविचाराशी त्यांचा संबंध उरत नसे. हे असे असले तरी समाजाशी संपर्क आणि संवाद टिकवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहेतच. एकूणच समाजप्रबोधनाचा विषय हा जटिल असतो. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या शब्दांत ‘ही दशकांचे नव्हे तर शतकांची लढाई असते.’ व्यक्तिगत जीवनातील वैचारिकता क्रांतिकारी असली, तरी समाजव्यवहारात, स्थानिक पातळीवर काम करताना काही तडजोडी करीत समाजप्रबोधनाचा गाडा पुढे घेऊन जावा लागतो.

मंडळास आपली उद्दिष्टे आणि भूमिकांशी प्रामाणिक राहून अशा तडजोडी कराव्या लागल्या. हा सत्यशोधकी आंदोलनाचा एक भाग होता. सामाजिक चळवळीला सामान्य माणसे बिचकत असतात, म्हणून समाजप्रबोधनाच्या लढ्यात त्यांच्या प्रत्यक्ष सहभागावर मर्यादा असतात. हमीद दलवाईंचा लढा हा तर सामान्य लोकांच्या क्षमतेबाहेरचा होता. कारण असाही मुसलमान असतो, यावर त्यांचा विश्वास बसत नाही. राजकीय आणि धर्मवाद्यांसाठी तर असे सुधारक हे शत्रूच असतात.

दलवाई यांच्या भूमिकेबद्दल, कार्याबद्दल अनेक गैरसमज आहेत. प्रा.नरहर कुरुंदकरांनी ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणत, ‘‘दलवाईंना मुस्लिम समाजात फारसा पाठिंबा कधीच नव्हता; तो असणारही नव्हता, हे उघड आहे. मुस्लिम समाजातील सर्व राजकीय नेते दलवाईंना विरोध करीत होते. दलवाईंनी अतिरेकी भूमिका घेतली होती, म्हणून मुस्लिम समाज त्यांच्यामागे गेला नाही, हे म्हणणे खरे नाही. दलवाईंनासुद्धा महान विचारवंत म्हणून कीर्ती मिळवण्याची इच्छा नव्हती. त्यांना समाजपरिवर्तनाचे आंदोलनच अधिक प्रिय होते. पैगंबर आणि कुराण यांबाबत चर्चा करून समाजाचे मन दररोज दुःखवावे आणि पुरुषार्थ मिरवावा असे त्यांनाही वाटत नव्हते. दलवाई स्वतः नास्तिक आणि अश्रद्ध झाले होते; पण मुस्लिम समाजाने तसेच व्हावे, असा त्यांचा आग्रह नव्हता. समाजाचे आमूलाग्र परिवर्तन होणे आवश्यक आहे, इतके मान्य असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरंभ म्हणून कोणताही एक छोटासा कार्यक्रम हाती घ्यावा आणि सुधारणेला समाज तयार करावा, हे दलवाईंना मान्य होते.’’

हा संदर्भ येथे देण्याचे कारण असे आहे की, मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि ऑल इंडिया मुस्लिम कॉन्फरन्स यांच्या वतीने पुण्यातील एस.एन.डी.टी. महाविद्यालय कॅम्पसमध्ये दि. 20,21 नोव्हेंबर 1999 रोजी मुस्लिम महिला अधिकार परिषद आयोजित केली होती. या परिषदेत महाराष्ट्र आणि राज्याबाहेरच्या अनेक महिला प्रतिनिधी सहभागी झाल्या होत्या. पुण्यातील मुस्लिमेतर समविचारी महिला संघटनांसह, मुस्लिम महिलांच्या प्रश्नावर काम करणाऱ्या इतर राज्यांतील संघटनांनीही उपस्थिती लावली. तमिळनाडू अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षा ॲड. बदर सईद आणि प्रा.आय.नाझनीन यांनी उद्‌घाटनाच्या सत्रात मार्गदर्शन केले. या परिषदेचे वैशिष्ट्य असे की, मंडळ आणि अखिल भारतीय पुरोगामी परिषदेने ‘शरियतच्या चौकटीत इन्साफ पसंद निकाहनामा’ याचा फॉरमॅट तयार केला होता. निकाह हा करार असतो आणि निकाहावेळी काही अटी-शर्ती घालून विवाह केला जाऊ शकतो, ही यामागची भूमिका होती. असा प्रयत्न भारतात डॉ.झीनत शौकत अली यांनी व इतर काही संघटनांनी केला होता.

‘तोंडी तलाक देणार नाही, पत्नीची परवानगी असल्याशिवाय दुसरे लग्न करणार नाही...’ वगैरे अटी या निकाहनाम्यात असतात. हा निकाहनामा समाजात प्रसारित करून महिलांच्या कौटुंबिक समस्यांवर उपाय शोधण्याचा प्रयत्न होता. समाजात शरियतवर आधारित इन्साफ पसंद निकाहनाम्याचे उदाहरण घालून देण्यासाठी काझी शेख शकील अहमद यांच्यासमोर सय्यदभाई-अख्तरन्निसा, समीर जमादार-परवीन महालवार, गाझीउद्दीन सलाती-शमशाद या विवाहित जोडप्यांचे नव्या निकाहनाम्याप्रमाणे परिषदेत निकाह लावण्यात आले. अर्थात हा प्रयोग अस्तित्वात असणाऱ्या मुस्लिम व्यक्तिगत कायद्याच्या पार्श्वभूमीवर किती टिकाव धरणार, ही शंका होती. इस्लामिक कायद्याच्या कक्षेत तयार करण्यात आलेला हा निकाहनामा- त्यावर लावण्यात आलेल्या मुस्लिम रीति-रिवाजानुसारच्या निकाह सभारंभात महिला साक्षीदार म्हणून रझिया पटेल, तर पुरुष साक्षीदार म्हणून अन्वर राजन यांनी स्वाक्षरी  केली होती.

या परिषदेच्या निमित्ताने साधना साप्ताहिकात संपादकीय लेख प्रसिद्ध झाला. साधनाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर होते आणि लेखाचे शीर्षक होते- ‘पुरोगामी पाऊल की पीछेहाट?’ कायद्याचा व धर्माचा संबंध नसावा, अशी एखादी भूमिका घेणाऱ्या पुरोगामी म्हणवणाऱ्या कार्यकर्त्यांच्या या कार्यक्रमात तडजोडवाद आहे की धर्माचे परिष्करण करण्याचा प्रयत्न आहे- अशा काही शंका या संपादकीय स्तंभातून व्यक्त झाल्या.

दि. 8,9 जुलै 2000 रोजी कोल्हापुरात शाहू स्मारक भवन येथे मंडळाची सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी मेहरुन्निसा दलवाई होत्या. मंडळाच्या जाहीरानाम्यास 30 वर्षे झाली. मुस्लिम जमातवादावर मंडळाने भर दिला आहे, मात्र हिंदू जमातवाद आक्रमक स्वरूप धारण करून पुढे येत आहे. बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्यापर्यंत मजल गेली आहे. मुस्लिम समाजाच्या अस्तित्वाचे प्रश्न चर्चेत आहेत. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहून त्यांच्याप्रति पक्षपात वाढत आहे. मुस्लिम समाजातील मागासवर्गीयांचे प्रश्न अनुत्तरित आहेत. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजावरील हल्ले वाढत आहेत. जागतिकीकरणातून काही नवे प्रश्न मुस्लिम समाजासमोर निर्माण होत आहेत. मंडळाने आपल्या उद्दिष्टांत व्यापकता आणावी, त्यावर अभ्यास करून मांडणी करावी- यासाठी प्रा.विलायत शेख, प्रा.आय.एन. बेग, हुसेन जमादार, अन्वर राजन, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, डॉ.बी.टी. काझी, प्रा.ऐनुल अत्तार यांची एक समिती करण्यात आली.

ऑगस्ट महिन्यात यासंदर्भात बैठक घेण्यात यावी, मुस्लिम सत्यशोधक पत्रिका प्रकाशित करावी आणि निकाहनामाचा प्रसार करावा, असे निर्णय झाले. या बैठकीत नवी कार्यकारिणी निवडण्यात आली. मेहरुन्निसा दलवाई यांची अध्यक्षपदी निवड झाली. तत्पूर्वी म्हणजे दि. 25,26 मार्च 2000 रोजी मंडळाच्या 30 व्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापूर येथे कार्यकर्त्यांचे शिबिर व कार्यकारिणी बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मेहरुन्निसा दलवाई होत्या.

दि.23 नोव्हेंबर 2000 रोजी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टि्यूटच्या वर्धापनदिनानिमित्त पुण्यात ‘सद्य:स्थितीत दलवाईंच्या विचाराचे महत्त्व’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. या परिसंवादात मा.दिलीप चित्रे, भाई वैद्य, सय्यदभाई, दलवाईभाभी आणि शमसुद्दीन तांबोळी यांनी भाग घेतला.

दि.3 मे 2001 रोजी हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई येथील नित्यानगर हॉल, अंधेरी येथे कार्यकर्त्यांचे अभ्यासशिबिर झाले आणि याच दिवशी सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयात नसिमा मोहम्मद आमीन हुर्जक यांना हमीद दलवाई पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात दिलीप चित्रे, भाई वैद्य आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

दि. 16,17 जून 2001 रोजी हैदराबाद येथे मुस्लिम वुमेन्स राईट नेटवर्क यांच्या वतीने मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर चर्चा आयोजित केली. या बैठकीत हुसेन जमादार उपस्थित होते. मुस्लिम महिलांच्या सक्षमीकरणावर तसेच ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांच्याशी मुस्लिम महिला प्रश्नावर चर्चा करण्याचे ठरवण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या विषयावर चर्चा करून कार्यक्रम घेण्यासाठी मेहरुन्निसा दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली कृष्णकुंज सोसायटी, पुणे येथे कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली. त्याप्रमाणे दि. 8 नोव्हेंबर 2001 रोजी कोल्हापूर येथे हुसेन जमादार यांच्या पुढाकारातून मुस्लिम महिला अधिकार परिषद घेण्यात आली. या परिषदेचे स्वागताध्यक्ष क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवाडी होते. प्रा.नाझनीन, हसीना खान व इतरांनी यात मनोगत व्यक्त केले.

दि.27 जानेवारी 2002 रोजी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट आणि पुणे विद्यापीठ बहिःशाल शिक्षण मंडळ यांच्या वतीने एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले. चर्चासत्रात ग.प्र. प्रधान, दिलीप चित्रे, भाई वैद्य, कुमार केतकर, डॉ. राम ताकवाले, अ.का. मुकादम, प्रा. तेज निवळीकर, मेहरुन्निसा दलावाई यांनी ‘राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दहशतवाद’ या विषयावर अभ्यासपूर्ण मते मांडली. प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

फेबु्रवारी-मार्च 2002 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी असताना, गोध्रा येथील भयानक दंगलीचे निमित्त होऊन गुजरात हत्याकांड घडवून आणले गेले. अहमदाबाद परिसरात झालेल्या हिंसाचारात 2500 हून अधिक मुस्लिम मारले गेले, घरांची व प्रार्थनास्थळांची जाळपोळ केली. भारतीय राज्यघटना, त्यातील धर्मनिरपेक्षता, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यांना काळिमा लावणारी देशाच्या इतिहासातील कलंकित घटना सामान्य भारतीयांना हेलावून सोडणारी होती. गुजरातमधील दंगलग्रस्त भागात जाऊन या समस्येचे मूळ शोधून, संवाद करून, सहवेदना व्यक्त करण्यासाठी मंडळाचे एक शिष्टमंडळ सुरत, अहमदाबाद, बडोदा व इतर भागात गेले. या शिष्टमंडळात हुसेन जमादार, प्रा.आय. बेग, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, प्रा.बी.टी. काझी, आयशा शेख, सांगलीचे बशीर तांबोळी यांचा सहभाग होता. या दौऱ्यानंतर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात विविध भागांत बैठका आयोजित केल्या. देशासमोरील धर्मवादाची आव्हाने व त्यांचे स्वरूप मांडण्यात आले. या काळातच सातारा जिल्ह्यातील वाई येथे हिंदू-मुस्लिम दंगल झाली.

समाजात भीतीचे व असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले. यानिमित्ताने सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्या सहकार्याने मंडळाने सद्‌भावना अभियानाचे आयोजन केले. शाळा, महाविद्यालय, समविचारी संघटना व समाजाशी संवाद करून भिन्नधर्मीय समाजात सद्‌भावना प्रस्थापित करण्याचा प्रयत्न मंडळाने केला. राष्ट्र सेवादलाने बाबरी मशीद-रामजन्मभूमी वादाच्या निमित्ताने निर्माण झालेले वातावरण व गुजरात हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मंडळाच्या सद्‌भावना यात्रेस समर्थन देऊन सेवादलाच्या सैनिकांना आपापल्या भागात सहकार्य करण्यासाठी पत्रक पाठवले. समाजातील धार्मिक विद्वेषाचे वातावरण निवळावे, मुस्लिम समाजातील असुरक्षितता कमी व्हावी, हिंदू संघटनांना विचार करण्यास भाग पाडावे; म्हणून मंदिर-मशिदीसंदर्भात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या तोडग्यास सेवादलाने समर्थन दिले. या तोडग्यात प्रामुख्याने तीन मुद्दे होते.

1. बहुसंख्याकांच्या भावनांचा आदर करीत मुस्लिम समाजाने बाबरी मशीद जागेवरील आपला हक्क बहुसंख्याकांना आपण होऊन बहाल करावा.

2. अन्य जागी मशीद उभी करण्यास बहुसंख्याकांनी मदत करावी.

3. मंदिर-मशीदसंदर्भात अन्य कुठल्याही ठिकाणाबद्दल अशा प्रकारे वाद उकरून न काढता संघ परिवाराने 1947 ची ‘जैसे थे’ स्थिती मान्य करावी.

या भूमिकेमुळे तणावग्रस्त वातावरणात सद्‌भावनेसाठी एक पाऊल पुढे जाता येईल, अशी आशा होती. या भूमिकेतून सेवादल सैनिकांनी आपली भूमिका न सोडताही मंडळाच्या सद्‌भावना यात्रेत सहभागी व्हावे असे पत्र सेवा दलाने आपल्या कार्यकर्त्यांसाठी दिले होते. या वेळी सेवादलाचे अध्यक्ष भाई वैद्य, महामंत्री प्रा.विकास देशपांडे, अन्वर राजन व इतर आणि राष्ट्रीय संघटक प्रा. सुभाष वारे होते. सय्यदभाईंनी हीच भूमिका घेतली होती. मात्र या तोडग्यावर मंडळातील आणि मंडळाबाहेरील कार्यकर्त्यांत मतभेद होते. (दि.9 नोव्हेंबर 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यात पुरावे,  सुनावणी विचारात घेऊन हाच तोडगा योेग्य असल्याचे अधोरेखित केले. फरक एवढाच की, हा निवाडा सर्वोच्च न्यायालयाचा आहे. त्याला वेगळे महत्त्व आहे. या निवाड्याबद्दल पुन्हा वाद आणि मतभेद शिल्लक राहतातच. सामान्य जनतेला या वादातून किंमत मोजावी लागली व हिंदुत्ववाद्यांना सत्ता मिळवता आणि टिकवता आली.)

हमीद दलवाई यांचे वैचारिक साहित्य हे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मुस्लिम समाज आणि एकूणच भारतीय समाजाच्या दृष्टीने दिशादर्शक आहे. तर्कशुध्द व निरपेक्षपणे केलेली जमातवादी मानसिकता, धर्मवादी राजकारण आणि भारतीय समाजाच्या धर्मनिरपेक्ष एकात्म समाजासाठी केलेले वस्तुनिष्ठ विवेचन अभ्यासपूर्ण असते. हमीदभार्इंनी त्यांच्या उमेदीच्या काळात ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ या विषयावर लेखनकार्य केले होते;  परंतु त्यांच्या आजारपणामुळे आणि अल्प आयुष्यामुळे ते प्रकाशित झाले नव्हते. मेहरुन्निसा दलवाई यांनी या हस्तलिखिताचे पुस्तक तयार व्हावे, यासाठी पाठपुरावा केला. मे.पु.रेगेंसहित अनेकांना ते हस्तलिखित दिले; परंतु याला वेळ लागला. शेवटी हे हस्तलिखित साधना प्रकाशनाकडे आले. ग.प्र. प्रधान, भाई वैद्य यांनी त्यात लक्ष घातले, वेळ दिला आणि मे 2002 मध्ये साधना प्रकाशनाने ‘राष्ट्रीय एकात्मता आणि भारतीय मुसलमान’ हे पुस्तक प्रकाशित केले. दलवाई हे मुस्लिम जमातवादावर जसे तुटून पडतात तसे हिंदुत्ववादावरसुद्धा,  हे या पुस्तकातून दिसून येते. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत भाई वैद्य यांनी हा जमातवाद आधिक उलगडून दाखवला आहे.

दि.3 मे 2003 रोजी हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी देण्यात येणारा हमीद दलवाई स्मृतिपुरस्कार साहित्यिक श्री.शफाअत अब्बास खान यांना ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांच्या हस्ते देण्यात आला. अध्यक्षस्थानी मा.दिलीप चित्रे होते. सुरेंद्र गावसकर सभागृह, मुंबई येथे हा कार्यक्रम झाला. मेहरुन्निसा दलवाई यांनी हा उपक्रम नियमितपणे चालवण्याची खबरदारी घेतली.

देशातील जमातवाद, दहशतवाद, धार्मिक दंगली या वातावरणाचा महाराष्ट्रावर परिणाम होऊ नये, सामाजिक सद्‌भावना व सामाजिक ऐक्य टिकावे; यासाठी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कोल्हापूर शाखा, महाराष्ट्र सर्वोदय मंडळ, राष्ट्र सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने एस.एम.जोशी व युसुफ मेहरअली जन्मशताब्दीनिमित्त 8 ते 30 जानेवारी 2004 च्या दरम्यान सातारा, सांगली, कोल्हापूर परिसरात सद्‌भावना अभियानदौरा आयोजित केला. आरंभ पाचगणी येथील बांधा हायस्कूल- जेथे महात्मा गांधी प्रार्थनेला बसत- या ठिकाणाहून केला. यावेळी न्या.चंद्रशेखर धर्माधिकारी, भाई वैद्य, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवाडी, सा.रे. पाटील, सुनीती सु.र. स्वातंत्र्यसेनानी भिलारेगुरुजी उपस्थित होते. अभियानाचे संघटक म्हणून हुसेन जमादार यांनी काम पाहिले. मंडळाचे प्रा.वि.अ. शेख, एम.ए. नाईक, गुलाब इनामदार, बाबासाहेब नदाफ, प्रा.आय.एन.बेग आणि पन्नालालजी सुराणा, सुभाष जोशी, जयंत मठकर व समविचारी कार्यकर्त्यांनी भाग घेतला. अभियानाचा समारोप 30 जानेवरी 2004- हुतात्मादिनी कोल्हापुरात झाला, यात बाबा आढाव, संजय म. गो. व इतर मान्यवर उपस्थित होते.

दि.11 जानेवारी 2005 रोजी पुण्यात हमाल भवन येथे ‘तीन तलाक हटाव’ परिषद झाली. यामध्ये जावेद आनंद, रझिया पटेल, सय्यदभाई आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला. ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्सचे कार्य मंदावले. याच कॉन्फरन्सची प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरम नावाने नोंदणी करण्यात आली. या फोरमच्या वतीने मुस्लिम तरुण आणि ज्यांना मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बॅनरखाली एकत्र येण्यास अडचण जाणवते, त्यांना एकत्र करण्याचा प्रयत्न आणि प्रयोग करण्यात आला. फोरमच्या वतीने राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘दहशतवाद- कारणे व उपाय’, ‘भारतातील धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादासमोरील आव्हाने’ या विषयावर तरुणांनी निबंध सादर केले. मंडळाच्या वतीने कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. यात निबंध स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना निमंत्रित करून मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण करण्यात आले. या फोरमचे अध्यक्ष सय्यदभाई आणि सरचिटणीस म्हणून शमसुद्दीन तांबोळी काम पाहत.

दि.4 ऑगस्ट 2006 रोजी मंडळाच्या पुणे शाखेतर्फे भारत, पाकिस्तान, बांगलादेश संबंध- संधी आणि अडचणी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला. यात डॉ.अरविंद गोखले, डॉ.श्रीकांत परांजपे, प्रा.राम बापट, प्रा. शमसुद्दीन तांबोळी यांनी विचार मांडले. अध्यक्षस्थानी सय्यदभाई होते. भारत-इतिहास संशोधन मंडळात हा कार्यक्रम झाला.

दि.19 मार्च 2006 रोजी मंडळाच्या 36 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने चर्चा आयोजित करण्यात आली. यामध्ये भाई वैद्य, बाबा आढाव, रा.प. नेने, ताहेरभाई पूनावाला, शांताबाई रानडे, सुरेश शिपूरकर, अरविंद बाळ, सय्यदभाई आणि शमसुद्दीन तांबोळी यांनी सहभाग घेतला. मुस्लिम समाजप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, दहशतवाद हे विषय चर्चिले गेले.

मेहरुन्निसा दलावाई यांनी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने हमीद दलवाई पुरस्कार सभारंभ, सामाजिक विषयावरील चर्चासत्रे आयोजित केली. हुसेन जमादार यांनी मुस्लिम समाजप्रबोधन व शिक्षण संस्था यांच्या वतीने एड्‌स प्रतिबंधक आणि आरोग्य क्षेत्रात काम वाढवले. रेडलाईट भागातील महिलांशी संपर्क वाढवून त्या महिलांची संघटना उभारण्याचा प्रयत्न केला.

दि. 5 ऑक्टोबर 2008 रोजी प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरम आणि मुस्लिम सत्यशोधक युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी, ‘दहशतवादाची मूळ प्रेरणा धर्मांधता आहे का?’ आणि ‘भारतातील राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने’ हे विषय ठेवण्यात आले. या स्पर्धेचे उद्‌घाटन गांधीवादी कार्यकर्त्या शोभनाताई रानडे यांच्या हस्ते झाले. उपस्थित स्पर्धकांना राजन खान, डॉ.लता जाधव, डॉ.मंदार बेडेकर, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, सय्यदभाई यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेची पारितोषिके डॉ.श्रीराम लागू यांच्या हस्ते देण्यात आली. डॉ. लागू यांनी विवेकवाद समजावून सांगितला. या प्रसंगी रा.प. नेने यांनीही विचार मांडले.

दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे दहशतवादी हल्ला झाला. महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, पोलीस आणि समान्य नागरिकांचे बळी गेले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने या घटनेचा तीव्र निषेध केला. एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन, पुणे येथे समविचारी संघटनांच्या वतीने या हल्ल्याचा तीव्र निषेध करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. कोल्हापुरात हुसेन जमादार यांनी त्या वर्षी 9 डिसेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या बकरी ईदला ‘काळी ईद’ म्हणून साजरी करण्याचे आवाहन वर्तमानपत्रातून केले. ईदगाहच्या ठिकाणी नमाज पठणानंतर मुस्लिम बोर्डिंग येथून बाहेर पडणाच्या मुस्लिमांना काळ्या फिती वाटण्यात आल्या. मुस्लिमांनी या उपक्रमाचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले आणि घटनेचा निषेध नोंदवला.

दि.29 जानेवारी 2009 रोजी प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरम आणि पुणे विद्यापीठ प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभाग यांच्या वतीने एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन केले. ‘राष्ट्रीय एकात्मता- स्वरूप आणि आव्हाने’ या विषयावरील या चर्चासत्रात डॉ.बाबा आढाव, भाई वैद्य, यशवंत सुमंत, श्रीकांत परांजपे, सय्यदभाई, प्रा.तेज निवळीकर, डॉ.सतीश शिरसाठ, डॉ.धनंजय लोखंडे, डॉ.विलास आढाव, डॉ.जॉन गायकवाड, डॉ.नवनाथ तुपे, प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी विचार मांडले.

दि. 29 फेबु्रवारी 2009 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने ‘राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने’ या विषयावर निवारा सभागृह, पुणे येथे चर्चा आयोजित केली. यामध्ये डॉ.माधवराव गोडबोले, डॉ.असगर अली इंजिनिअर, प्रा.शमसुद्दीन तांबोळी व सय्यदभाई यांनी धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकात्मतेसमोरील आव्हाने स्पष्ट केली.

दि.22 मार्च 2009 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून मंडळाच्या वतीने पुण्यातील निवारा सभागृहात ‘मुस्लिम प्रबोधनाची सद्य:स्थिती’ या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन केले. यामध्ये भाई वैद्य, रा.प. नेने, विलास वाघ, सय्यदभाई, अन्वर शेख, शमसुद्दीन तांबोळी, ताहेरभाई पूनावाला, नितीन पवार, लता जाधव, शरद जावडेकर यांनी विचार मांडले.

दि.3 मे 2009 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि महात्मा फुले समता प्रतिष्ठान- पुणे यांच्या वतीने सत्यशोधक दिनकरराव जवळकर व हमीद दलवाई स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या वर्षी शमसुद्दिन तांबोळी यांनी संपादित केलेल्या ‘हमीद दलवाई- क्रांतिकारी विचारवंत’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ.नरेद्र दाभोलकरांच्या हस्ते आणि ‘समग्र दिनकरराव जवळकर’ यांच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन भाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी डॉ. बाबा आढाव, डॉ. सदानंद मोरे, प्रा. सुभाष वारे, सय्यदभाई आणि शमसुद्दीन तांबोळी यांनी विचार मांडले.

दि.26 नोव्हेंबर 2009, रोजी 26-11 च्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी ‘व्यर्थ न हो तव बलिदान’ हा कार्यक्रम एस.एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन व समविचारी संघटनांच्या वतीने आयोजित केला. या वेळी देशभक्तिपर राष्ट्रीय एकात्मतेची गाणी, दहशतवादविरोधी आणि राष्ट्रीय ऐक्याच्या वाढीसाठी शपथ, ‘एक मेणबत्ती कृतज्ञतेची’ हा कार्यक्रम आयोजित केला. यात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने शमसुद्दीन तांबोळी यांनी भाग घेतला.

शाहबानो प्रकरणानंतर तलाकपीडित महिलेला कलम 125 नुसार पोटगी मिळवण्याचा आधिकार काढून घेण्यात आला होता. ग्वालियर- मध्य प्रदेशाच्या शबानाबानो यांनी त्यांना देण्यात आलेल्या तलाकनंतर ग्वालियरच्या कौटुंबिक न्यायालयात कलम 125 प्रमाणे पोटगी मिळवण्यासाठी याचिका दाखल केली. ग्वालियर कौटुंबिक न्यायालय आणि मध्य प्रदेश उच्च न्यायालयानेही शबानाबानो यांची याचिका फेटाळली. म्हणून त्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने 4 डिसेंबर 2009 रोजी निकाल दिला. या निकालात न्या.सुदर्शन रेड्डी व न्या.दीपक वर्मा यांनी ही केस कौटुंबिक न्यायालयात असल्याने, अशा महिलांना कलम 125 नुसार पोटगीसाठी याचिका दाखल करता येते, असा निकाल दिला.

या निकालाच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणण्यासाठी दि.10 जानेवारी 2010 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मराठवाडा मित्र मंडळाचे शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय आणि म.जोतिराव फुले समता प्रतिष्ठान यांनी मराठवाडा मित्र मंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात ‘मुस्लिम महिला आणि पोटगीचा आधिकार’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्र आयोजित केले. या चर्चासत्रात न्या.आर.व्ही. देशमुख, डॉ.जया सागडे, डॉ.वैजयंती जोशी, ॲड.जाकीर अत्तार, ॲड.शारदा वाडेकर, प्रा.शमसुद्दीन तांबोळी, अ.का. मुकादम, प्रा.नितीश नवसागरे, सय्यदभाई आणि बाबा आढाव यांनी विचार मांडले.

दि.22 मार्च 2010 रोजी मंडळाच्या चाळिसाव्या वर्धापन दिनानिमित्त मंडळाचे सरचिटणीस प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनी लिहिलेल्या ‘शाहबानो ते शबानाबानो’, ‘मुस्लिम समाजप्रबोधन आणि विकास’, ‘मुस्लिम समाज : व्यक्ती, विचार आणि साहित्य’ या तीन पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. मराठवाडा मित्रमंडळाच्या ज्ञानेश्वर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात डॉ.बाबा आढाव, भाई वैद्य, राजन खान, फ.म. शहाजिंदे, भाऊसाहेब जाधव, सय्यदभाई, शमसुद्दीन तांबोळी यांनी मनोगत व्यक्त केले. दि.6 एप्रिल 2010 रोजी पोटगीच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या शबानाबानो आणि त्यांचे वकील ॲड. एस. एम. नक्वी यांचा पुण्यातील राष्ट्र सेवादलाच्या नाथ पै सभागृहात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाबा आढाव, भाई वैद्य, लतिफ मगदूम, रशीद शेख, सय्यदभाई, नर्सिगबानो, शमसुद्दीन तांबोळी यांनी विचार मांडले.

दि.3 मे 2010 - हमीद दलवाई स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा पुरस्कार मा.रौनक अफरोज शकील अहमद, मूर्तिजापूर यांना विद्या बाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे साधना विद्यालय, हडपसर येथे झालेल्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई वैद्य होते. याप्रसंगी रामभाऊ तुपे, सुभाष वारे, मेहरुन्निसा दलवाई आदी उपस्थित होते.

दि.6 सप्टेंबर 2010- जम्मू-काश्मीरमध्ये शांतता-सुव्यवस्थेला हादरे देणाऱ्या घटना घडत आहेत. बाबरी मशीद-राम जन्मभूमीसंदर्भातील खटल्याचा निकाल घोषित होणार असल्याची पार्श्वभूमी आणि यादरम्यान मुस्लिम बांधवांची रमजान ईद, गणेशोत्सव, श्रावण महिना विचारात घेऊन संवेदनक्षम परिस्थितीत सलोखा, सद्‌भावना याला प्राधान्य दिले पाहिजे; म्हणून गणेशोत्सवादरम्यान नकारात्मक देखावे उभे करण्याऐवजी परस्परविश्वास आणि सद्‌भाव वाढवणारे देखावे उभे करावेत, असे आवाहन मंडळ आणि प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरमच्या वतीने करण्यात आले. त्यास प्रसारमाध्यमांतून चांगला प्रतिसाद मिळाला.

दि.17 ऑक्टोंबर 2010 - मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरमच्या वतीने मुस्लिम समाजातील अभ्यासक, साहित्यिक आणि कार्यकर्त्यांचे  राज्यस्तरीय चर्चासत्र आझम कॅम्पस- पुणे येथे आयोजित करण्यात आले. यात प्रा. जहीर अली, जावेद आनंद, अ.का. मुकादम, मन्नवर पीरभाय, लतिफ मगदूम, अब्दुल करीम आत्तार, सय्यदभाई, सिकंदर मुलाणी, मुकीन तांबोळी, शमसुद्दीन तांबोळी, रशीद शेख, प्रा.जमीर तांबोळी, ॲड. बागवान, हिना खान, मुश्ताक शेख, नर्गिस नायकवाडी उपस्थित होते. या चर्चासत्रात दोन ठराव मंजूर करण्यात आले. पहिला ठराव ‘काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. काश्मीरची समस्या कोणत्याही स्वरूपाच्या अलगतावादातून सोडवता येणार नाही. असा अलगतावाद भारतीय मुस्लिमांना मान्य नाही.’ काश्मीरची समस्या ही केवळ भारतीय संविधानाच्या चौकटीतूनच सोडवावी लागणार आहे. काश्मिरी लोकांशी संवाद, त्यांचा विकास आणि विश्वास प्रस्थापित करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. कलम 370 हेसुध्दा संविधानात्मक मुद्दा असल्याने या कलमासंदर्भात भूमिका देशहित विचारात घेऊन हाताळण्याचे आवाहन करण्यात आले.

ठराव क्र.2 - ‘अयोध्या येथील राम जन्मभूमी-बाबरी मशिदीविषयी अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्यातील श्रद्धेचा मुद्दा भारतीय संविधानाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांशी विसंगत आहे. याची नोेंद घेऊन भिन्न धर्मीयांच्या सद्‌भावनेला महत्त्व आणि संभाव्य समस्या विचारात घेऊन मशिदीसाठी दिलेला एक-तृतीयांश भागावरील हक्क सोडून द्यावा, जनतेशी संवाद साधून जनमत तयार करण्यासाठी आणि भविष्यात धर्म व धार्मिक स्थळे याबाबत वाद होऊ नयेत, यासाठी भिन्नधर्मीय विचारवंतांची समिती स्थापन करण्यात यावी. भारतात ऐरणीवर असणाऱ्या घटना विचारात घेऊन या लढाईकडे प्रामुख्याने फॅसिझम विरुद्ध लोकशाही, धर्मांधता विरुद्ध धर्मनिरपेक्षता, कायदा पाळणारे विरुद्ध कायदा मोडणारे या दृष्टिकोनातून पाहावे लागणार असल्याचे चर्चेत नोंदवण्यात आले.

दि.11 नोव्हेंबर हा मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्मदिवस भारत सरकारने ‘राष्ट्रीय शिक्षण दिवस’ म्हणून साजरा करण्याचे 2008 मध्ये घोषित केले. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने याचे स्वागत करून 2008 पासून राष्ट्रीय शिक्षणदिनानिमित्त कार्यक्रम 11 नोव्हेंबर 2010 रोजी आयोजित केले. नंतर मुस्लिम सत्यशोधक मंडळ व अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभेने हा कार्यक्रम संयुक्तपणे राबवण्याचे ठरवले. त्यानुसार नाथ पै सभागृह, साने गुरुजी स्मारक, पुणे येथे आझादांच्या 122 व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय शिक्षणदिन कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई वैद्य होते. अब्दुल कादर मुकादम आणि बेनझीर तांबोळी यांनी अनुक्रमे आझादांचे वैचारिक योगदान आणि आझादांचे शैक्षणिक विचार या विषयावर मांडणी केली. या कार्यक्रमाचे निमंत्रक म्हणून बारा समविचारी संघटना सहभागी होत्या. प्रा.शरद जावडेकर, प्रा.शमसुद्दीन तांबोळी यांनीही विचार मांडले.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या कार्यक्रमात समविचारी, समाजवादी कार्यकर्ते आणि संघटनांचा सहभाग वाढवण्यावर भर देण्यात आला. या दशकातील घडामोडी अधिक आव्हानात्मक होत्या. जमातवाद थोपवून सलोखा-सद्‌भावना निर्माण करणे, दहशतवादाचे परिणाम सामान्यांना सांगून एकात्मता वाढवणे, या मुद्यांवर लक्ष केंद्रित करीत असतानाच मुस्लिम महिलांच्या संविधानात्मक हक्कांचा लढा कायम ठेवणे, मुस्लिम समाजातील मागास गटांच्या समस्यांवर आवाज उठवणे; तसेच न्या.सच्चर समिती, न्या.रंगनाथ मिश्रा आयोग डॉ.मेहमूद रहमान अभ्यासगट यांच्या शिफारशींसंदर्भात लोकशिक्षण, जाणीव-जागृती करून सरकार दरबारी न्याय मागणे, जागतिक पातळीवरील मुस्लिम जमातवादी शक्तींच्या कारवाया, हिंदुत्ववाद्यांकडून होणारे धार्मिक द्वेषाचे वातावरण, उदारमतवादी इस्लामचे समर्थन आदी घटना आणि या निमित्ताने मंडळाने तयार केलेला मंडळाचा ‘नवा जाहीरनामा’, आयोजित केलेले कार्यक्रम, मंडळाचे उपक्रम या संदर्भातील मागोवा पाचव्या दशकात घेतला जाईल.

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा 

Tags: अंदश्रध्दा मेहरुन्निसा दलवाई राष्ट्रवाद बाबा आढाव हिंदूत्ववाद उदारमतवाद हमिद दलवाई समाजवादी मुस्लिम andshradhha mehrunnisa dalwai rashtrawad baba adhaw hindutwawadi udarmatwad hamid dalwai samajwadi muslim weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके