डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अ. भि. शहा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त

शहा यांनी आपले विचार अक्षर राहावेत, म्हणून लेखणी झिजवली आहे. न्यू क्वेस्टचे संपादक म्हणून संपादकीय आणि लेखन तर आहेच; शिवाय इंग्रजीत लिहिलेले सायंटिफिक मेथड, रिलिजन अँड सोसायटी, व्हॉट एल्स अवर मुस्लिम्स?, चॅलेंजेस टू सेक्युलरिझम, प्लॅनिंग फॉर डेमॉक्रसी अँड अदर एसेज, शिवाय जयप्रकाश नारायण यांनी 1975 च्या आणीबाणीत तुरुंगात लिहिलेली रोजनिशी संपादित केली. याबरोबर शिक्षण, राजकारण, संस्कृती यांसारख्या विषयावरील पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. समाजप्रबोधन संस्थेने 1970 मध्ये अनुवादित केलेले ‘भारतीय लोकशाहीला अंधश्रद्धेचे आव्हान’ या पुस्तकात शहांनी महत्त्वाच्या नियतकालिकांत आणि दैनिकांत लिहिलेल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नांवरील लेखांचा समावेश आहे.  

भारतीय समाजात सेक्युलर आणि मानवी मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी सत्तरच्या दशकात ज्या मोजक्या व्यक्ती, संस्था आणि संघटना कार्यरत होत्या- त्यात अ.भि.शहा, हमीद दलवाई आणि नरहर कुरुंदकर या त्रयींचा नामोल्लेख होतोच. प्रा.अ.भि. शहा यांची ओळख इंडियन सेक्युलर सोसायटीचे संस्थापक किंवा सोसायटीमार्फत चालवल्या गेलेल्या नियतकालिकापुरती मर्यादित नाही. सेक्युलरिस्ट, ह्युमॅनिस्ट, एज्युकेशनलिस्ट यापलीकडे जाणारी अनेक विशेषणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सामावलेली होती. सेक्युलॅरिस्टबरोबरच ‘न्यू क्वेस्ट’ आणि ‘समाज प्रबोधन पत्रिकेचे’ ते संपादक होते. ते केवळ मूलभूत विचार आणि त्या अंगाने साहित्य निर्माण करणारे विचारवंत नव्हते, तर सक्रिय कार्यकर्तेही होते. समाजाला विज्ञानवादी, आधुनिक समाजकेंद्री बनवणाऱ्या इंडियन सेक्युलर सोसायटीप्रमाणे मुस्लिम सत्यशोधक मंडळ, प्राज्ञ पाठशाळा, इंडियन असोसिएशन फॉर कल्चरल फ्रीडम, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशन अशा नामवंत संस्थांच्या कार्यक्रमांत त्यांनी सहभाग घेतला, त्यांच्या वैचारिक तत्त्वप्रणालीत योगदान दिले. धर्मनिरपेक्ष मानवतावादाच्या प्रचारार्थ योद्ध्याची भूमिका त्यांनी अथक निभावली. जवळपास 61 वर्षांचे आयुष्य लाभलेल्या शहांनी तीन दशकांहून अधिक काळ समाजप्रबोधनाच्या कार्याला दिला. त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाचा आणि योगदानाचा उल्लेख या लेखात करून देता येणार नाही, मात्र त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याचा हा अल्पप्रयत्न आहे. 

दि.2 सप्टेंबर 1920 रोजी दिगंबर-जैन कुटुंबात जन्मलेल्या शहांची धर्म आणि देवाकडे पाहण्याची सवय लहानपणापासूनच चिकित्सक होती. तर्कशुद्धता व सर्वांगीण अभ्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा महत्त्वाचा भाग होता. ते मॅट्रिकच्या परीक्षेत गुणवत्तायादीत पहिले आले होते, तेव्हाच त्यांच्या बुद्धिमत्तेची अनेकांना कल्पना आली होती. ‘ज्याला शिक्षणाचा खरा अर्थ समजतो तोच विचार करतो, प्रश्न विचारतो आणि उत्तरे शोधतो.’ या स्वतंत्रपणे विचार करण्याच्या सवयीमुळे त्यांनी धर्माला श्रद्धेचा भाग न करता चिकित्सेचा भाग केला. चिकित्सा करताना धर्माच्या मर्यादा लक्षात आल्याने लहान वयातच ते निरीश्वरवादी झाले. केवळ बुद्धिप्रामाण्यता असून चालत नाही, बुद्धीचा सकारात्मक वापर करण्यासाठी त्याला करुणा आणि विवेकवादाची जोड हवी. तशी जोड उपजत असल्यामुळे त्यांनी बुद्धिप्रामाण्यवाद आणि विवेकवाद यांच्या आधारावर प्रगत मानवतावादाचा पुरस्कार केला. 

शालेय जीवनात अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तके याव्यतिरिक्त आपण कोणती पुस्तके वाचतो, याचा परिणाम विचारांवर होतो. पाठ्यपुस्तकांमुळे आपण शालेय गुणवत्तायादीत येऊ शकतो, पण त्याव्यतिरिक्त आवडीच्या पुस्तकांच्या वाचनातून आयुष्याची गुणवत्ता वाढते. शहा यांनी 1937 मध्ये म्हणजे वयाच्या सतराव्या वर्षी हॅकेल यांचे ‘द रिडल ऑफ युनिव्हर्स’ आणि हेमन लेव्ही यांचे ‘द युनिव्हर्स ऑफ सायन्स’ वाचले. या वाचनाचा परिणाम म्हणजे- आत्मा किंवा देव या कल्पना फक्त मनात असतात; मनाबाहेरच्या जगात त्यांचे अस्तित्व नसते, हे त्यांना उमगले. विनवूड रेड यांचे ‘मार्टिडम ऑफ मॅन’ वाचल्यानंतर शहांची बौद्धिक पक्वता अधिक उत्क्रांत झाली. यासोबत ज्येष्ठ मानवतावादी विचारवंत एम.एन.रॉय यांच्या साहित्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकला. त्या प्रभावासंदर्भात शहा म्हणतात, ‘रॉय यांच्या वाचनाने विचारांना नवी दृष्टी आणि बौद्धिक स्वातंत्र्य मिळाले, ज्यामुळे नकारात्मक निरीश्वरवाद सकारात्मक नास्तिकतेकडे गेला.’ वयाच्या चोविसाव्या वर्षी त्यांनी बर्ट्रांड रसेल, मार्क्स, एंजेल्स, लेनिन वाचले होते. त्यांचा असा विश्वास होता की- माणूस हा जोपर्यंत धार्मिक गूढवाद आणि पारंपरिक धर्मश्रद्धा यांच्या मगरमिठीतून मुक्त होऊन अशा भ्रामक गोष्टींना नाकारत नाही, तोपर्यंत तो खऱ्या अर्थाने मानवी होऊ शकत नाही. 

प्रा.अ.भि.शहा यांच्या बौद्धिक पातळीची किंवा शैक्षणिक अर्हतेची माहिती यासाठी देत आहे की, समाजात आजही अनेक अभ्यासक आहेत जे शिक्षण आणि शहाणपणा पदवीशी जोडतात. शहांकडे मूलभूत अभ्यास, चिकित्सक बुद्धी आणि लौकिक अर्थाने मान्यताप्राप्त शिक्षण होते. त्यांच्या साधनेची पार्श्वभूमी समोर आल्यास त्यांचे मूल्यमापन करताना निरपेक्षता येऊ शकेल. 

समाजप्रबोधन कोणत्या अंगाने झाले पाहिजे, याची स्पष्ट कल्पना शहांकडे होती. अर्थात मानवाला धर्मांधतेच्या कचाट्यातून मुक्त करणे, हीच खरी मानवसेवा आणि समाजप्रबोधन आहे. यास्तव समविचारी लोकांशी मैत्री होऊन त्यांच्यामार्फत समाजपरिवर्तनाच्या कार्याला गती देण्याची ऊर्जा निर्माण झाली. व्यक्तिगत पातळीवर पटलेला विचार इतरांना सांगावा. हा विचार माणसाच्या कल्याणाचा असेल, तर तो रुजवण्याचा प्रयत्न करावा. या हेतूने संस्थासंघटना उभारून त्याचे प्रबोधन चळवळीत रूपांतर करणे, हे शहांनी आपल्या आयुष्याचे प्रयोजन केले. महाराष्ट्रातील सर्वपरिचित समाजप्रबोधन संस्थेची स्थापना 1950 मध्ये झाली. शहा या संस्थेच्या संस्थापक-सदस्यांपैकी एक होते. आधुनिक समाजाविषयीचे चिकित्सक विचार आणि मानवी मूल्ये सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य या संस्थेमार्फत करण्यात येत असे. प्रबोधनासाठी कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण आणि त्याच्या जोडीला प्रकाशनाची गरज असते. वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे हा प्रबोधनाचा मूलाधार असतो, हा दृष्टिकोन निर्माण व्हावा म्हणून त्यांनी ‘वैज्ञानिक पद्धती - सायंटिफिक मेथड’ हे पुस्तक लिहिले. ते या संस्थेने प्रकाशित केले. शहा धर्मचिकित्सक असल्याने धर्माच्या अभ्यासाबाबत त्यांना कुतूहल आणि आवड निर्माण झाली. या विषयावरील उपलब्ध पुस्तकांचा त्यांनी अभ्यास केला व अशा निष्कर्षाला आले की, धार्मिक लोक धर्माभिमानी असतात आणि सध्याच्या आधुनिक मूल्यांशी जोडून घेण्यास असमर्थ असतात. 

या वैचारिक पार्श्वभूमीचा आढावा घेतल्यास शहा आणि दलवाई यांच्या मैत्रीतील डीएनए लक्षात येईल. दलवाई यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व, धर्माकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि मुस्लिम राजकारणाची मीमांसा त्यांच्या ललित साहित्यातून शहांच्या लक्षात आल्यानंतर ते दलवाईंच्या जवळ गेले. दलवाईंच्या मुस्लिईंम प्रबोधन विचारांची माहिती घेतल्यानंतर शहांनी इस्लामच्या अभ्यासाला सुरुवात केली. त्यांनी हिंदू आणि जैन धर्माचा अभ्यास केलेला होता, मात्र इस्लामचा अभ्यास करण्याची आवड दलवाई यांच्या भेटीनंतर निर्माण झाली. दलवाईंवर टीका करणाऱ्यांनी शहा हे दलवार्इंच्या गुरुस्थानी होते, हे विधान तपासून पाहावे यासाठी हे विश्लेषण आहे. साधनाने प्रकाशित केलेले ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप : कारणे व उपाय’ हे पुस्तक साधनाने 1968 मध्ये प्रजासत्ताकदिनी आयोजित केलेल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नावरील परिसंवादातील दलवार्इंच्या टिपणांवर आधारित आहे. दलवाई यांचे मित्र, कवी, लेखक दिलीप चित्रे यांनी दलवार्इंची स्वतंत्र दीर्घ मुलाखत घेतली. या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद केला आणि दलवार्इंचे काही लेख असलेले ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे शहा यांच्या प्रस्तावनेसह नोव्हेंबर 1968 मध्ये सोसायटीने प्रकाशित केले. या दोन पुस्तकांत नऊ महिन्यांचे अंतर आहे. महाराष्ट्रात 1970 मध्ये धार्मिक दंगली झाल्या, तेव्हा शहांनी सेक्युलॅरिस्टमध्ये ‘हिंदू जमातवादाचे प्रणेते’ हा लेख लिहिला. त्यात त्यांनी दयानंद, सावरकर आणि गोळवलकर यांच्यावर कडाडून टीका केली. धर्मांधता माणसाच्या मनात रुजलेली असते आणि हे जमातवादी मानसिकतेशी युद्ध मानसिक पातळीवरच केले पाहिजे. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या स्थापनेत शहा आणि इंडियन सोसायटीचा मोठा वाटा आहे. या दोन संस्थांच्या वतीने अनेक कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करण्यात आले. समान नागरी कायदा, लोकसंख्यानियंत्रण, विज्ञाननिष्ठ आधुनिक शिक्षणावर मंडळाने घेतलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी भूमिकेवरील अनेक कार्यक्रम आणि या संदर्भातील लेखन इंडियन सोसायटीमार्फत प्रकाशित करण्यात आले आहे. ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ : उद्देश व भूमिका’ या पुस्तकाच्या निर्मितीतसुद्धा शहा आणि इंडियन सेक्युलर सोसायटी यांचा वाटा आहे, हे विनासंकोच सांगायला आनंद वाटतो. समान नागरी कायद्यावर मोठ्या प्रमाणात बोलबाला होत असतो, मात्र या संदर्भातील मसुदा अद्याप कोणीही तयार केलेला नाही. सर्व धर्मीयांना आवश्यक असणाऱ्या आणि संविधानाच्या मूलभूत गाभ्याशी बांधील असणाऱ्या समान नागरी कायद्याचा मसुदा विधिज्ञ सत्यरंजन साठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तयार केला. यावर मुस्लिम सत्यशोधक आणि सेक्युलर सोसायटीने चर्चासत्र आयोजित केले आणि तो मसुदाही इंडियन सेक्युलर सोसायटीमार्फत प्रकाशित करण्यात आला. 

मंडळाच्या काही कार्यक्रमांत- विशेषत: फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम कॉन्फरन्स, महिला परिषद, अभ्यास-शिबिरात ते  सहभागी असायचे. काही वेळा ते मुस्लिम वापरतात तशी फरची टोपी घालत. यातून शहा मुस्लिम असावेत, असा अनेकांचा गैरसमज व्हायचा. काही वेळा दलवाईंनाही अशी मुस्लिम ओळख शहा का दाखवतात, हे खटकायचे. ते त्यांनी बोलूनही दाखवले. दोघेही समाजप्रबोधनाचे चाहते. दलवाई जन्माने मुस्लिम असताना मुस्लिम ओळख असणारा पोषाख टाळतात आणि शहा मात्र जन्माने दिगंबर- जैनपंथी असताना मुस्लिम ओळख असणारी टोपी घालतात. नव्या लोकांचा यामुळे गोंधळ व्हायचा. दलवाई- शहांनंतर एकदा असाच प्रसंग सय्यदभाई आणि अनिल अवचट यांच्यावर आला. एका कार्यक्रमात हे दोघे पाहुणे म्हणून कार्यक्रमस्थळी एकत्र गेले. संयोजकांना दोघांची नावे माहिती होती, पण कधी पाहिले नव्हते. प्रमुख संयोजकांनी अवचटांचे मुस्लिम पद्धतीने आलिंगन देऊन स्वागत केले आणि सय्यदभार्इंना हात जोडून नमस्कार. अवचटांना दाढी होती आणि सय्यदभाईंना नव्हती. अशा अनेक गमतीजमती आहेत. 

अस्सल मानवतावादी अशी ही माणसं हसत-खेळत चर्चेत रात्र जागवीत समाजप्रबोधनाचे चिंतन करत होती. धर्मातीतता हा त्यांचा स्थायिभाव होता. खरं म्हणजे, अशा व्यक्तिमत्त्वावर निरपेक्ष चरित्रे निर्माण झाली पाहिजेत. ती न होणे हा दोन प्रकारचा अपराध ठरेल. पहिला अपराध हा की- नव्या पिढीला अस्सल पद्धतीने सेक्युलॅरिस्ट, ह्युमॅनिस्ट असणारे आणि निरीश्वरवादी असतानाही धर्मवादी समूहाच्या कल्याणासाठी आयुष्य वेचण्याचे प्रयोजन देऊन संपूर्ण आयुष्य त्याच्या सिद्धीसाठी देणे फार अलौकिक आहे. आजच्या पिढीला अशा प्रबोधकांची ओळख नीटपणे झाली पाहिजे. 

दुसरे महत्त्वाचे कारण असे की- यांच्यासोबत काम करणारे, त्यांना जवळून ओळखणारे लोक कमी आहेत. शहा-दलवाई यांच्यासोबत काम करणाऱ्यांनी काही कारणाने नकारात्मक लिहून ठेवले आणि त्याचा प्रतिवाद झालाच नाही, तर तो अमानवी अपराध होईल. मतभेद नक्की असावेत, मात्र नकारात्मक दृष्टी नसावी. त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका निर्माण करू नये. प्रा.शहा यांना वाचून त्यांची धार्मिक ओळख कदाचित होणार नाही. शहा हे आडनाव हिंदू, मुस्लिम, जैन, पारशी समाजात असते. दलवाई आणि शहा यांची मैत्री अतूट असताना काही विनोद व्हायचे. कोणी विचारले की, शहा यांच्या नावातील आद्याक्षरे ए.बी. म्हणजे काय; तर ते ‘अबु-बकर’ असे म्हणायचे. ज्यांना अबु-बकर माहिती आहे त्यांना समजलेच असेल की, मुहम्मद पैगंबर यांनी इस्लामचा पैगाम देण्यास सुरुवात केली, तेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असणारे अबु-बकर त्यांचे अनुयायी झाले; त्यांचे सोबती आणि सर्वार्थाने एकनिष्ठ. पैगंबरांच्या मृत्यूनंतरही त्यांचा वारसा चालवणारे खलिफासुद्धा झाले. येथे साम्य पाहा. दलवार्इंसोबतची मैत्री, त्यांच्यासोबत केलेले सेक्युलर ह्युमॅनिझमचे कार्य, दलवार्इंना संघटना उभारणीत केलेले सहकार्य आणि दलवाई यांच्या निधनानंतर मंडळासाठी जिवंत असेपर्यंत विचारनिष्ठ योगदान. ए. बी. आणि अबु- बकर यांच्या नावातील आणि बाकीचा सर्व काही योगायोग असल्याने एक गमतीचा विषय आहे. 

आपणासही ए.बी. म्हणजे शहा यांचे मूळ नाव समजून घ्यायला आवडेल. त्यांचे पूर्ण नाव होते अमृतलाल भिकाभाई शहा. मला आणखी एक घटना सांगायला आवडेल. कालच रात्री डॉ.राम ताकवलेसरांना फोन केला होता. व्यक्तिगत बोलणे झाल्यावर त्यांनी संघटनेची चौकशी केली. ते मूळचे राष्ट्र सेवादलाचे सैनिक आणि अमीर शेख, भाई वैद्य यांच्याशी मैत्री असल्याने त्यांना मुस्लिम सत्यशोधकबद्दल आस्था आहे. मी हे वर्ष शहा यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याचे सांगितले आणि यानिमित्ताने मासिक व्याख्यानमाला मंडळातर्फे आयोजित केल्याची कल्पना दिली. तेव्हा सरांनी पंधरा-वीस मिनिटे त्यांचे अनुभव सांगितले. शहा हे त्यांचे गुरू होते, त्यांनी ताकवलेसरांना मॅथ्स शिकवले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ एज्युकेशनमधील काही किस्से, देवदत्त दाभोलकर-शहा यांच्यातील नाते आणि इतर बरेच काही. तेव्हा ताकवलेसर म्हणाले की, शहांनी ठरवून आपला मुलगा यतिनचे लग्न मुस्लिम मुलीशी केले. प्रा.आत्तारसरांची मुलगी आणि मुमताज रहिमतपुरे यांची बहीण नादिरा हिला सून म्हणून घरी आणले. हा जगलेला अस्सल मानवतावाद आणि धर्मातीततेचा किस्सा यांच्या व्यक्तिमत्त्वातील मोठेपणा समजून घेण्यासाठी पुरेसा आहे. 

दि.30 मे 1972 रोजी युवक क्रांती दलाने मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेतला, त्याला शहा उपस्थित होते. ‘आम्ही तथाकथित अस्पृश्यांशी एकभाव दाखवण्यासाठी येथे जमलो आहोत. हिंदूधर्मीय मनुस्मृतीने अस्पृश्यांबरोबर अमानवी वर्तन करण्यास संमती दिली आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. याबरोबरच इस्लाम आणि ख्रिश्चॅनिटीमध्ये आधुनिक मूल्यांशी विसंगत अशा गोष्टी आहेत. त्या संदर्भातही बुद्धिनिष्ठ चिकित्सा झाली पाहिजे. सर्व धर्मांतील कालबाह्य व विसंगत गोष्टी आधुनिक समाज घडवण्यातील अडचणी आहेत. त्या बाजूला सारल्या पाहिजेत, ‘असे म्हणण्याचे धाडस पन्नास वर्षांपूर्वी शहा-दलवाई करीत होते. आज असे धारिष्ट्य दाखवणारे शोधावे लागतात. 

शहा यांनी आपले विचार अक्षर राहावेत, म्हणून लेखणी झिजवली आहे. न्यू क्वेस्टचे संपादक म्हणून संपादकीय आणि लेखन तर आहेच; शिवाय इंग्रजीत लिहिलेले सायंटिफिक मेथड, रिलिजन अँड सोसायटी, व्हॉट एल्स अवर मुस्लिम्स?, चॅलेंजेस टू सेक्युलरिझम, प्लॅनिंग फॉर डेमॉक्रसी अँड अदर एसेज, शिवाय जयप्रकाश नारायण यांनी 1975 च्या आणीबाणीत तुरुंगात लिहिलेली रोजनिशी संपादित केली. याबरोबर शिक्षण, राजकारण, संस्कृती यांसारख्या विषयावरील पुस्तकांचे त्यांनी संपादन केले आहे. समाजप्रबोधन संस्थेने 1970 मध्ये अनुवादित केलेले ‘भारतीय लोकशाहीला अंधश्रद्धेचे आव्हान’ या पुस्तकात शहांनी महत्त्वाच्या नियतकालिकांत आणि दैनिकांत लिहिलेल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नांवरील लेखांचा समावेश आहे. 

प्रा. शहा हे एक तत्त्ववेत्ता होते, असे त्यांचे लेखन अभ्यासल्यास प्रकर्षाने जाणवते. विज्ञान म्हणजे काय- हे समजून घेऊन वैज्ञानिक पद्धतीचा अवलंब विद्यापीठीय शिक्षणातसुद्धा अभावाने होतो. त्यामुळे वैज्ञानिक सत्य समजून घेण्याची कुवतसुद्धा निर्माण होत नाही. तंत्रज्ञानाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम महत्त्वाचा असून त्यामुळे मानवाला जागतिक नागरिक होणे शक्य झाले आहे. विज्ञान हे मानवी जीवनावर तीनपदरी परिणाम करते- प्रामुख्याने तंत्रज्ञानावर, मानवी संस्कृतीवर आणि तत्त्वज्ञानावर. विज्ञानामुळे केवळ भौतिक सुविधा उपलब्ध होत नाहीत, तर त्यामुळे सांस्कृतिक जीवन विस्तारते. मानवाच्या स्वर्ग- नरक, देव-देवता, कर्मसिद्धांत, वर्णव्यवस्था, धर्माधिष्ठित नैतिकता यासारख्या पारंपरिक श्रद्धांतील फोलपणा वैज्ञानिक पद्धतीतून स्पष्ट होतो, हा शहांनी मांडलेला विचार धर्मवादी अंधश्रद्ध राजकारण्यांच्या संसदप्रवेशपूर्व प्रशिक्षणासाठी वापरला, तर संविधानाने अपेक्षिलेला वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करता येईल; ज्यामुळे आमदार-खासदार आणि मंत्री यांना अंधश्रद्धेला उत्तेजन देणारी विखारी व अवैज्ञानिक वक्तव्ये करताना आपण काय बडबडतोय याचे भान होईल. 

दलवाई आणि शहांनी सेक्युलॅरिझमची संकल्पना आणि त्याची व्यापकता स्पष्ट केली आहे. सेक्युलॅरिझमला असणारे विविध आयाम भारतीय समाजाने कधी समजून घेतलेच नाहीत. शहांनी ‘धर्म आणि समाज’ या त्यांच्या पुस्तकात सेक्युलॅरिझम तपशिलात मांडला आहे. विविध देशांत आणि धर्मसमूहांत त्याचा लावलेला अर्थ त्या-त्या ठिकाणच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. शहा म्हणतात, ‘प्रथमदर्शनी असे म्हणता येईल की, धर्माची ऐहिक जीवनापासून फारकत म्हणजे सेक्युलॅरिझम.’ मानवी व्यवहार व्यक्तिगत व खासगी, व्यक्ती-व्यक्तीअंतर्गत आणि व्यक्ती-संस्थांतर्गत असतात. म्हणजे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि राजकीय व्यवहारात घेण्यात येणारे निर्णय किंवा भूमिका हे धर्मसिद्धांत किंवा कोणत्याही धर्मश्रद्धेशी निगडीत नसले पाहिजेत. 

एखादी व्यक्ती विशिष्ट वर्तन करीत असेल- त्याच्या श्रद्धा, खाण्या-पिण्याच्या सवयी, पोषाख वगैरे- तर तो त्याच्या वैयक्तिक पातळीवरचा विषय आहे. मात्र ‘मी वागतो तसाच तो वागला पाहिजे’ असे म्हणणे मला मान्य नाही. एखाद्या शाकाहारी माणसाने ‘तू पण शाकाहारी व्हायलाच पाहिजे’, असा हट्ट करता कामा नये. ‘माझी श्रद्धा ज्या देवावर आहे, तू पण त्याच देवावर श्रद्धा ठेवावीस’, हे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर लादणे मला मान्य नाही. अलीकडे ‘जय श्रीराम’ म्हटले नाही, तसेच जुम्माच्या नमाजला आले नाहीत म्हणून काहींना मार खावा लागला होता. मुस्लिम व्यक्तिगत कायद्यातील तलाकपद्धत किंवा ख्रिश्चनांमधील घटस्फोटाची प्रक्रिया, कुटुंबनियोजन याबद्दलचा दृष्टिकोन यासंदर्भातील धर्मशिकवण सेक्युलर मूल्यांच्या आड येते. त्यामुळे सेक्युलॅरिझम म्हणजे एखादी व्यक्ती देव वा अल्लाहला मानत असेल, तर तो त्यांच्यातील खासगी संबंधांचा भाग आहे. 

शहांनी विविध विद्वानांच्या सेक्युलॅरिझमच्या व्याख्या आणि त्यात येणाऱ्या संकल्पनांचा वापरसुद्धा केला आहे. समता व सामाजिक न्यायाची संकल्पना सेक्युलॅरिझमशी जोडलेली आहे. भारतीय संदर्भात सेक्युलॅरिझमचे विविध प्रवाह, धर्मनिरपेक्षता, धर्मातीतता, निधर्मीपणा ते सर्वधर्मसमभाव हे अद्याप लोकवर्तन प्रभावित करू शकले नाही. किमान शासनाने कोणत्याही एका धर्माला प्रोत्साहन, समर्थन देऊ नये किंवा त्यांच्यासाठी लोकशक्ती वापरू नये. 

इस्लामचा अभ्यास हे शहांचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी आधुनिक मूल्यांचा निकष लावून वैज्ञानिक पद्धतीने जसा हिंदू धर्मग्रंथांचा अभ्यास करून मांडणी केली, तशी इस्लामचा अभ्यास करताना आजच्या काळाशी असणारी  सुसंगतता आणि मर्यादांसंदर्भातही मांडणी केली आहे. जशी ‘व्हॉट एल्स अवर मुस्लिम्स’मध्ये मुस्लिम शिक्षण, मदरसा, उर्दू माध्यम आणि समाजाच्या भवितव्याबद्दल मांडणी केली आहे. शहा हे प्राध्यापक आणि शिक्षणसंस्थांशी संबंधित असल्याने त्यांचे शैक्षणिक विचार जर नव्या शैक्षणिक धोरणाचे मूल्यमापन करताना वापरले, तर या धोरणाच्या मर्यादा अधोरेखित होतील. 

‘इस्लामपुढे नव्या युगाचे आव्हान’ या लेखात इस्लामची चिकित्सा करताना ते म्हणतात की, ‘भारतातील मुस्लिमांना आधुनिकतेचे आव्हान स्वीकारावे लागत आहे, ती सर्जनशील वृत्तीने धर्माचा पुनर्विचार करण्याची मुस्लिमांना एका अर्थाने संधी प्राप्त झाली आहे. धर्माची सार्वत्रिक स्वरूपात ही शाश्वत व मूलभूत मूल्ये आहेत. ती ऐतिहासिक गरजेतून निर्माण झालेल्या धर्मस्थापनेवेळेच्या गरजेतून सांगितलेल्या कालसापेक्ष गोष्टींपासून अलग काढणे, याचाच अर्थ धर्माचा पुनर्विचार करणे असा आहे. प्रत्येक धर्मात शाश्वत व कालसापेक्ष अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टी असतात, हे अगदी उघड आहे. पोथीनिष्ठतेमुळे ज्यांची बुद्धी अंध झाली आहे, त्यांच्याशिवाय इतर कोणालाही या गोष्टींचा पुरावा देण्याची गरज पडणार नाही.’ 

शहा म्हणतात- इस्लाम किंवा कोणत्याही धर्माचा चिकित्सक प्रकारे अभ्यास करण्यासाठी निकष कसा तयार करायचा, हा त्यातील महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय घटनेतील मूलभूत हक्क किंवा संयुक्त राष्ट्राची मानवी हक्कांची सनद यावर हा निकष आधारित असावा. अलीकडचे मुस्लिम विद्वान असे आहेत की, त्यांना भारतीय घटनाच इस्लाम आणि पैगंबराच्या शिकवणुकीच्या आधारावर आहे असे वाटते. पुढे जाऊन या विद्वानांना असेही वाटते की, फ्रेंच राज्यक्रांतीत पुढे आलेली समता- बंधुता-स्वातंत्र्य ही मूल्येसुद्धा इस्लामच्या शिकवणुकीचा भाग आहेत. असे प्रतिपादन इतर धर्मीय नेतेसुद्धा करतात. अशा प्रकारची धर्मचिकित्सा किती घोटाळा करू शकते, हे लक्षात येईल. इस्लाम आणि आधुनिकता, इस्लाम आणि मानवतावाद हे सर्व विषय त्यांच्या दृष्टिकोनातून समजून घेण्यासाठी समाज प्रबोधन संस्थेने प्रकाशित केलेले ‘भारतीय लोकशाहीला अंध धर्मश्रद्धेचे आव्हान’ वाचायला हवे. तसेच इंग्रजीतील इतर लेखही शहांची धर्मचिकित्सा समजण्यासाठी वाचायला हवेत. 

दिलीप चित्रेंनी शहांच्या निधनानंतर म्हणजे 1981 मध्ये अभिरुचीच्या दिवाळी अंकात ‘अ. भि. शहा : माणसं स्थापन करणारी संस्था’ या शीर्षकाचा लेख लिहिला. त्यात शहांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला आहे. ते म्हणतात, ‘क्वचित कोरडे किंवा तुसडे वाटणारे शहा अत्यंत संवेदनक्षम होते. दलवाईंच्या आजारात शहा आतून तडफडत राहिले. आस्था, जिव्हाळा आणि त्यांचे प्रेम अनेकांनी अनुभवले आहे. विचारांवर शहांचे वर्चस्व असे, पण शहांवर निव्वळ विचारांचे कधीच वर्चस्व नव्हते. माणुसकीचा ओलावा त्यांच्या विचारांना होता. प्रगल्भ नैतिक संवेदनक्षमतेच्या पातळीला त्यांच्या भावना सहज पोहोचत होत्या.’ 

समाजाला आधुनिकतावाद समजावून सांगणारे शहा- दलवाई यांची आज पदोपदी गरज जाणवते. त्यांनी मांडलेल्या मूलभूत विचारांना कुलूपबंद केल्याची जाणीव होते. लढाऊ पिंड असणारे शहा ह्युमॅनिझमच्या लढाईतील योद्धे होते, हे त्यांच्या साहित्यातून आणि कार्यातून दिसून येते. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या योगदानाची उजळणी करताना त्यांच्या नसण्याची पोकळी जाणवते. दलवाईंचे मूत्रपिंड निकामी झाल्याचे समजले, तेव्हा ते खिन्न झाले. मूत्रपिंडरोपणाची शक्यता डॉक्टरांनी जेव्हा बोलून दाखवली, तेव्हा शहा आणि नगरकर यांनी उत्स्फूर्तपणे आपले मूत्रपिंड देण्याची तयारी दाखवली. शहा-कुरुंदकर-नगरकर अशी माणसे हमीदभाईंसाठी काय होती, याची आपणास कल्पना येते. दि.11 ऑक्टोबर हा प्रा. शहा यांचा स्मृतिदिन आहे. दलवाईंचा वारसा चालवणाऱ्या सर्वांना त्यांना यानिमित्ताने अभिवादन!

प्रा.अ.भि. शहा यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या ‘हमीद दलवाई स्टडी सर्कल’मार्फत प्रा.अ.भि.शहा स्मृतिमासिक व्याख्यानमाला आयोजित केली आहे. सप्टेंबरमध्ये शिव नादर विद्यापीठ, ग्रेटर नॉएडा येथील डॉ.अतुल मिश्रा यांचे व्याख्यान झाले. दि.11 ऑक्टो. रोजी डॉ.सुखदेव थोरात आणि 11 नोव्हें. रोजी डॉ.राम ताकवले व्याख्याने देतील. याच पद्धतीने धर्म आणि समाज, सेक्युलॅरिझम, प्रगत मानवतावाद, वैज्ञानिक पद्धती, इस्लाम आणि आधुनिकता, समान नागरी कायदा, या व अशा अन्य विषयांवर 12 व्याख्यानांसाठी राष्ट्रीय पातळीवरील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे.   

Tags: आधुनिकतावाद प्रा.अ.भि. शहा मुस्लिम सत्यशोधक मंडळ शमसुद्दीन तांबोळी समान नागरी कायदा इस्लाम आणि आधुनिकता वैज्ञानिक पद्धती प्रगत मानवतावाद सेक्युलॅरिझम धर्म आणि समाज Shamsuddin tamboli on a b shaha article on a b shaha a b shaha and hamid dalwai a b shah Muslim satyashodhak mandal. Msm. Muslim a b shaha birth century weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके