डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

मुस्लिम समाजात प्रबोधनाचा विचार,  चिकित्सेचा मुद्दा मुस्लिमांनी घेऊन जायला हवा.  यासाठी समाजातील लोकांनी ‘आपले घर’  दुरुस्त  करण्याच्या भूमिकेतून संघटना उभारावी असा  विषय मांडला गेला. मग समविचारी  कार्यकर्त्यांची बैठक ‘साधना’  कार्यालयात  घेण्यात आली. दि.22 मार्च 1970 रोजी  झालेल्या त्या ऐतिहासिक बैठकीत डॉ. बाबा  आढाव यांनी या संघटनेला ‘मुस्लिम सत्यशोधक  मंडळ’ हे नाव सुचवले. सर्वानुमते त्यास संमती  मिळाली. मंडळाच्या स्थापनादिनी बाबा आढाव  बैठकीस मिरवणुकीने गाजावाजा करीत आले  होते. यदुनाथ थत्ते,  ग. प्र. प्रधान,  ना. ग. गोरे,  एस. एम. जोशी आणि या काळातील समाजवादी, समतावादी मंडळींनी मुस्लिम सत्यशोधकचे  स्वागत व समर्थन केले. मुस्लिम सत्यशोधकच्या  आरंभीच्या काळात ए. जे. शेख यांनी काही काळ  मंडळाचे अध्यक्ष म्हणून साथ दिली. मंडळाच्या  स्थापनेच्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी  वाचून स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले हे  श्रीगोंदा येथून बैठकीला आले होते.     

भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनकाळात आधुनिक  विचारांचा प्रसार होत राहिला. या विचारांना मिळणारा  प्रतिसाद मात्र संमिश्र राहिला. एका बाजूला परकीयांबरोबर  संघर्ष करीत असतानाच धर्मवर्चस्ववादी विचारमानसिकता  डोके वर काढीत होती. यातूनच हिंदू महासभा,  मुस्लिम  लीग,  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,  जमाते इस्लामी यांसारख्या  संघटनांनी जनसामान्यांवर आपल्या विचारांची छाप पाडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या विभाजनवादी विचाराला  प्रतिबंध घालून,  सर्वसमावेशक धोरण आखून नवसमाज  निर्मितीसाठी राष्ट्र सेवादलासारख्या समतावादी संघटना  उभ्या राहिल्या. हमीद दलवार्इंवर बालवयात राष्ट्र सेवादलाने  राष्ट्रप्रेम,  समता आणि सुधारणेचे संस्कार केले. 
       
देशाला  स्वातंत्र्य मिळाले ते देशाच्या विभाजनाची किंमत मोजून,  मात्र नंतरही धर्मवादी संघटना आणि जमातवादी मानसिकता  खदखदत राहिली.  मुस्लिम समाजातील धर्मवादी नेतृत्वाने आधुनिकतेकडे  घेऊन जाणाऱ्या विचाराला त्या काळात कडाडून आणि  आक्रमकपणे विरोध केला. सर सय्यद अहमद खान आणि त्यांच्या धर्तीवर धर्मसुधारणा करणाऱ्यांचीही अवहेलना  केली. उलट,  हिंदू समाजात राजा राममोहन रॉय, महात्मा  फुले यांच्या परंपरेला विरोध होत राहिला तरी सुधारणावादी  विचार रुजत गेला. महात्मा गांधी आणि त्यांच्या समर्थकांनी  हिंदुत्ववाद व हिंदू जमातवाद परतवून लावला. परिणामी,  आधुनिक राष्ट्र घडवणारे भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब  आंबेडकरांच्या नेतृत्वात निर्माण झाले. मौलाना आझाद, डॉ. झाकीर हुसेन,  बद्रुद्दीन तय्यबजी आदी मंडळींना मुस्लिम  जमातवादी मानसिकता रोखता आली नाही. 
          
अश्रफी- उच्चवर्णीयांनी पाकिस्तानची वाट धरली;  मात्र या मातीशी  एकरूप झालेला गरीब,  बलुतेदार, श्रमिकवर्ग भारतात  राहिला. या सामान्य मुस्लिम समाजाला आधुनिकतेची  दिशा देण्याऐवजी त्यांचे मागासपण आणि धर्मवादी  मानसिकता कायम ठेवणारे नेतृत्व वरचढ झाले. या  काळातील मुस्लिम समाजाचे चित्रण हमीद दलवाई वयाच्या  अठराव्या वर्षापासून साहित्यरूपात मांडत राहिले.  दलवार्इंनी ‘इंधन’ या कादंबरीतून आणि जवळपास पन्नास  कथांतून खऱ्या अर्थाने मुस्लिम मराठी साहित्याला जन्मास  घातले. मुस्लिम समाज त्यांच्या निरक्षरतेमुळे आणि मराठी  भाषेच्या पूर्वग्रहदूषित वर्तनामुळे दलवार्इंच्या साहित्याला  प्रतिसाद देऊ शकला नाही. मात्र मराठीतील पत्रकारिता,  हिंदू समाजातील प्रबोधनाचे प्रयत्न दलवार्इंना प्रभावित  करीत होते. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीला शंभर  वर्षे होऊ घातली होती.
             
हिंदू समाजातील जुनाट धर्मनिष्ठा  बदलण्याचा प्रयत्न होत होता आणि मुस्लिम समाज मात्र कालविसंगत अशा परंपरांना हात न लावण्याचा आटापिटा  करीत होता. हिंदू समाजात आधुनिक मानवी राष्ट्रवादाचे,  धर्मनिरपेक्षतेचे,  समतेचे आणि आधुनिक मानवी मूल्यांचे  प्रवाह बळकट होत होते. या पार्श्वभूमीवर भारतीय  समाजप्रबोधनाच्या चळवळीत मुस्लिम समाज मागे  राहिला,  तर या समाजात अनेक समस्या निर्माण होतील  आणि या प्रबोधनाचे समतोल उद्देश साध्य करण्यात अपयश  येईल,  ही जाणीव दलवार्इंना अस्वस्थ करीत होती.  जगातील समाजप्रबोधनाच्या चळवळीचा प्रारंभ हा  स्त्रीदास्यमुक्तीच्या मूल्यापासून सुरू होतो. हा धागा विचारात  घेऊन दलवार्इंनी मुस्लिम महिलांच्या मानवी हक्कांचा मुद्दा सर्वप्रथम हाती घेतला. 
               
दि. 18 एप्रिल 1966 रोजी आपली  पत्नी,  बहीण आणि इतर पाच महिला- अशा सात मुस्लिम महिलांचा मोर्चा काढून मुस्लिम महिलांच्या तोंडी तलाक,  बहुपत्नीत्व,  हलाला,  मूल दत्तक घेण्यास असणारा मज्जाव  या विषम-अन्यायी तरतुदींविरोधात इस्लामच्या  इतिहासातील पहिला आवाज उठवला आणि समान नागरी  कायद्याची मागणी करणारे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री  वसंतराव नाईक यांना दिले. महिलांनी संघटितपणे आपल्या  हक्कांची लढाई पुढे घेऊन जावी,  यासाठी त्यांनी ‘सदा-ए-  निसवाँ’ (महिलांची हाक) ही संघटना उभारणीचा प्रयत्न  केला?  मात्र तिला हवा तसा प्रतिसाद मिळू शकला नाही.  त्यानंतर त्यांनी मुस्लिम जमातवादाची चिकित्सा केली.  जमातवादी मानसिकता आधुनिक राष्ट्रवादाच्या  उभारणीतील पहिली अडचण आहे,  असा त्यांचा विश्वास  होता.  या निमित्ताने त्यांनी भारतातील विचारवंत आणि  मुस्लिम बुध्दीजीवींशी चर्चा केली. देशाच्या सीमांलगतच्या  भागात दौरा केला. ‘इस्लामचे भारतीय चित्र’  मराठा दैनिकातून रेखाटले. मुस्लिम बुध्दीजीवी,  तथाकथित  राष्ट्रवादी मुस्लिम आणि मुस्लिम नेतृत्वाशी केलेल्या चर्चेतून  त्यांना ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप- कारणे व उपाय’  याचा  शोध लागला. 
        
साधना प्रकाशनाने हे विचार पुस्तकरूपाने  प्रकाशित केले. या पुस्तकात भर घालून,  दिलीप चित्रे यांनी  दलवार्इंची मुलाखत घेतली आणि भारतभर गाजलेले इंग्रजी  अनुवादित पुस्तक ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’  हे 1968 मध्ये प्रथम नचिकेत प्रकाशन,  मुंबई यांनी प्रकाशित  केले. त्याच वर्षी प्रा. अ. भि. शहा,  हमीद दलवाई आणि इतर  सेक्युलॅरिस्ट मंडळींनी ‘इंडियन सेक्युलर सोसायटी’ची  स्थापना केली. प्रा. अ. भि. शहा हे अध्यक्ष होते आणि  दलवाई या सोसायटीचे उपाध्यक्ष होते. या सोसायटीमार्फत ‘द सेक्युलॅरिस्ट’ प्रकाशित होत होते. लेखांतून आणि  व्याख्यानांतून विज्ञाननिष्ठ सेक्युलॅरिझम मांडण्यात येत होता.  समता,  बंधुता,  सामाजिक न्याय आणि वैज्ञानिक  मनोभूमिकेवर आधारलेला हा सेक्युलॅरिझम भारतीय  समाजात रुजावा,  ही भूमिका घेऊन त्यांनी केलेले प्रयत्न हे  सेक्युलॅरिझमसाठी मोठे योगदान आहे. पण दलवार्इंना  अपेक्षित असणारी सेक्युलॅरिझमची परिभाषा मुस्लिमांना  सोडा- आधुनिकतेचे वारे लागलेल्या हिंदू समाजालाही  परवडत नव्हती. 
          
सन 1966 ते 70 हा काळ मुस्लिम सत्यशोधक  मंडळाच्या खऱ्या अर्थाने गरोदरपणाचा काळ म्हटला  पाहिजे. मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवरील पहिला मोर्चा,  अभ्यासदौरा,  संवाद अभियान,  वैचारिक पुस्तकांचे लेखन,  लेखमाला,  इंडियन सेक्युलर सोसायटी- हे सर्व बुध्दीजीवी  वर्गात मर्यादित राहत होते. पण ज्या समाजातील प्रबोधनाची  दरी भरून काढायची होती तो समाज उदासीन,  जैसे थे  आणि प्रभावहीन होता. म्हणून दलवार्इंना मुस्लिम  समाजकेंद्रित संघटना उभारणे जास्त महत्त्वाचे वाटले. मग  ही चळवळ ‘क्लास’मध्ये अडकून न पडता ‘मास’मध्ये  जायला हवी,  या तळमळीतून त्यांनी समविचारी मित्रांशी  संवाद केला. या कामी भाई वैद्य,  बाबा आढाव यांच्यासह  साधना आणि समाजवादी परिवारातील विचारवंत  कार्यकर्त्यांनी साथ दिली. भार्इंच्या घरात अनेक बैठका  झाल्या. त्या काळात राष्ट्र सेवादलाच्या संपर्कात असलेल्या  उदारमतवादी मुस्लिम कार्यकर्त्यांची ओळख भार्इंनी करून  दिली. मुस्लिम समाजात प्रबोधनाचा विचार, चिकित्सेचा  मुद्दा मुस्लिमांनी घेऊन जायला हवा. यासाठी समाजातील  लोकांनी ‘आपले घर’ दुरुस्त करण्याच्या भूमिकेतून संघटना  उभारावी असा विषय मांडला गेला. मग समविचारी  कार्यकर्त्यांची बैठक ‘साधना’  कार्यालयात घेण्यात आली.  दि.22 मार्च 1970 रोजी झालेल्या त्या ऐतिहासिक बैठकीत डॉ. बाबा आढाव यांनी या संघटनेला ‘मुस्लिम  सत्यशोधक मंडळ’ हे नाव सुचवले. सर्वानुमते त्यास संमती  मिळाली. 
     
मंडळाच्या स्थापनादिनी बाबा आढाव बैठकीस  मिरवणुकीने गाजावाजा करीत आले होते. यदुनाथ थत्ते,  ग. प्र. प्रधान,  ना. ग. गोरे,  एस. एम. जोशी आणि या  काळातील समाजवादी-समतावादी मंडळींनी मुस्लिम  सत्यशोधकचे स्वागत व समर्थन केले.  मुस्लिम सत्यशोधकच्या आरंभीच्या काळात ए. जे. शेख यांनी काही काळ मंडळाचे अध्यक्ष म्हणून साथ दिली.  मंडळाच्या स्थापनेच्या दिवशी वर्तमानपत्रातील बातमी  वाचून स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले हे श्रीगोंदा येथून  बैठकीला आले होते. नि:स्पृह, धार्मिक आणि सात्त्विक  विचाराच्या बाबूमियाँनी मंडळाचे अध्यक्ष व्हावे,  अशी  इच्छा दलवार्इंनी व्यक्त केली. बाबूमियांनी ही जबाबदारी  आनंदाने घेतली. साधना ट्रस्टने हमीदभार्इंचे व्याख्यान 1968 मध्ये आयोजित केले होते. या वेळीच सय्यदभाई- दलवाई यांचा परिचय झाला होता. त्यांनीही चळवळीत  सक्रिय व्हायची भूमिका घेतली. दलवार्इंशी कोल्हापूरहून  पत्रव्यवहार करणारे हुसेन जमादार मंडळाशी जोडले गेले. अमरावतीचे वजीर पटेल यांनी ‘यंग मुस्लिम असोसिएशन’ या नावाची संस्था काढून मुस्लिम विकासाचे काम सुरू केले  होते. त्यांनी दलवार्इंच्या कार्यात वाहून घेतले;  शिवाय  मरियम रफाई, पत्रकार सय्यद मुनीर,  हुसेन दलवाई,  अब्दुल  कादर मुकादम, अन्वर शेख,  महंमद नगारजी,  बशीर शेख,  अमीर शेख, ॲड. नजमा,  रशिद शेख,  फजल शेख,  मुमताज  रहिमतपुरे,  मुमताज मोमिन,  डॉ. शमीम आत्तार,  मुंबईचे महंमद दलवाई,  ॲड. मुलाणी,  लतीफ खाटिक,  राजसाब  मुलाणी,  कोल्हापुरातील महंमद सोलापुरे, नसरुद्दीन बारगीर,  खदिजा बागवान,  गणी फरास,  अहमदनगर येथील निसार  बाटलीवाला,  मेहबूब बँडवाले,  पठाण टेलर,  चिपळूणचे  दादाभाई पटेल,  जोहरा भाटकर,  फलटण-सातारा  जिल्ह्यातील इलाही मोमिन,  करीम खान,  प्रा. ए. डी. आत्तार,  डॉ. बाबालाल मणेर,  प्रा. विलायत शेख,  महमूदमियाँ  दारूवाले व इतर,  अमरावतीचे अजीज बारी,  सोलापुरातील  प्रा. फक्रुद्दीन बेन्नूर,  सय्यद मुजीर,  महमंद हनीफ, बालम शेख  आणि मंडळी दलवाई हयात असताना जोडली गेली आणि  मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे दूत होऊन कामाला लागली.  
      
हमीदभार्इंच्या निधनानंतर अन्वर राजन,  शमसुद्दीन  तांबोळी, चाँदसाब,  रजिया सुलताना,  समद खान,  बानू  शेख,  समीर मणियार,  मुसा मुलाणी,  बशीर तांबोळी,  प्रा. मोदी, प्रा.तसनीम पटेल,  प्रा. ऐनुल आत्तार,  प्रा. आशा  अपराद,  बाबासाहेब काझी,  शबनम सोमजाळ अशा अनेक  कार्यकर्त्यांनी सत्यशोधक चळवळीस बळ दिले.  हमीदभार्इंच्या निधनानंतर मेहरुन्निसा दलवाई यांनी मंडळात  सक्रिय होऊन मंडळाचे नेतृत्व केले. मंडळाच्या पहिल्या  दशकातील कार्यकर्त्यांची यादी बरीच मोठी आहे, ती  जवळपास तीनशेच्या आसपास होती. दलवार्इंच्या  सत्यशोधकी भूमिकेला साथ देणारी ही फक्त महाराष्ट्रातील  कार्यकर्त्यांची यादी आहे. दलवाई यांच्या मुस्लिम समाजप्रबोधनाला पाठिंबा देणाऱ्यांत प्रा. कुलसुम पारेख,  प्रा. मुनीर  शाकीर, ॲड. अब्दुल शेख,  प्रा. असफ फैजी,  एम. आर. ए. बेग या बुध्दीजीवी व्यक्तींचा समावेश आहे.  मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पहिल्या दशकास  सुवर्णकाळ असे म्हणण्याचे कारण हा दलवाई यांच्या  हयातीतील झंझावाती कार्यक्रमांचा काळ आहे. इस्लामच्या  जगतातील ही अव्दितीय चळवळ पहिल्या दशकातच एका उंचीवर गेली होती.
           
या चळवळीचे क्रांतिकारकत्व त्याच्या  दीड-दोन पानांच्या जाहीरनाम्यात दिसून येते. या जाहीरनाम्यातील मध्यवर्ती मजकूर असा आहे- ‘मुस्लिम  समाजप्रबोधनाच्या आरंभीच्या काळातील प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी पडली. सर सय्यद अहमद  खानांचा सुधारणेचा गाडा विभक्ततावादाच्या दलदलीत  रुतून बसला. हिंदू समाजात पुरोगामित्वाचे प्रयत्न होत  असताना,  मुस्लिम समाज मात्र कालसुसंगत बदलांविरूध्द  आटापिटा करीत होता. बहुसंख्य हिंदू परिवर्तनवादी  मंडळीही कळत-नकळत या प्रक्रियेला हातभार लावत  होती. बदललेल्या परिस्थितीचे भान आणि आव्हान समाज  स्वीकारू शकला नाही. प्रजासत्ताक भारतात मुस्लिम समाज  एक सन्माननीय घटक म्हणून नांदण्यासाठी लोकशाही, धर्मनिरपेक्ष,  समतावादी मूल्य स्वीकारले नाही तर  संविधानाचा पाया कमकुवत राहील;  हे कार्य व्हावे म्हणून  मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे.  मंडळाचे हे नाव महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची  जाणीव म्हणून या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे.  स्वातंत्र्यानंतरच्या काळात अशी सुधारणावादी चळवळ  विशिष्ट धर्मगटासाठी नको होती,  परंतु मुस्लिम समाजाच्या प्रबोधनावर भर देण्यासाठी मंडळाचे कार्यक्षेत्र या  समाजापुरते मर्यादित ठेवण्यात आले आहे. 
         
सामाजिक  बदलाची दरी नष्ट झाल्यास हे मंडळ मुस्लिम समाजापुरते  काम करणार नाही- मंडळाच्या वेगळ्या अस्तित्वाची  आवश्यकता उरणार नाही,  अशी अवस्था यावी म्हणून हे  मंडळ कार्य करीत राहील.’  हा सारांश मंडळाची ध्येय- धोरणे आणि वैचारिक अधिष्ठानाचा आत्मा आहे.  मुस्लिम सत्यशोधक मंडळाने आरंभीच्या काळात  घेतलेले कार्यक्रम हे मुस्लिम महिलांना पुरुषप्रधान  मानसिकतेतून मुक्त करून त्यांना समानतेचा संविधानात्मक  हक्क मिळवून देणे,  धर्मनिरपेक्षता व लोकशाही मूल्यांशी बांधिलकी म्हणून समान नागरी कायद्याची मागणी,  जमातवादी-विघटनवादी मानसिकतेविरुध्द संघर्ष करून,  मुस्लिम चिकित्सा करून समाजाला आधुनिकतेकडे घेऊन  जाण्यासाठी कार्यक्रम घेणे,  मुस्लिम समाजाच्या ऐहिक विकासासाठी आधुनिक शिक्षण,  प्रादेशिक भाषेचा सन्मान  व स्वीकार आणि कुटुंबनियोजनासाठी लोकाधार मिळवून  देणे यास प्राधान्य देण्यात आले. राष्ट्रवाद आणि धर्मनिरपेक्ष एकात्म समाजाच्या प्रस्थापनेबरोबरच मुस्लिम समाजप्रबोधनासाठी पहिल्या दशकात मंडळाच्या स्थापनेनंतर  आयोजित केलेले कार्यक्रम असे आहेत.  8 एप्रिल 1970- मंडळाच्या स्थापनेनंतरच्या  पहिल्या पंधरवड्यात मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि  इंडियन सेक्युलर सोसायटीतर्फे 500 मुस्लिम स्त्रीपुरुषांच्या सह्याचे निवेदन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव  नाईक यांना देण्यात आले. यात ‘समान नागरी कायद्याची’  मागणी करण्यात आली होती.  
        
31 मे 1970- मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या  कोल्हापूर शाखेचे उद्‌घाटन वि.  स. खांडेकर यांच्या हस्ते  आणि माधवराव बागल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  मुस्लिम सत्यशोधक मंडळासाठी कोल्हापूर भागात  अनेकांनी सहकार्य केले.   16 ते 18 जून 1970 - या वर्षात मुस्लिम  सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सामान्य मुस्लिमांशी  त्यांच्या मोहल्ल्यात जाऊन संवाद करण्याची मोहीम  आखली. पुण्यातील मोमिनपुरा भागात हमीद दलवाई यांनी  संवाद करण्यासाठी कार्यक्रम आखला. तेव्हा गैरसमजाने  पछाडलेल्या मुस्लिमांनी त्यांच्यावर हल्ला केला होता.  यानिमित्त महाराष्ट्रातील अग्रणी वर्तमानपत्रांत अग्रलेख  छापून आले. दलवार्इंना पोलीस तक्रार नोंदवण्याचा सल्ला  देण्यात येत होता,  मात्र त्यांनी मुस्लिमांविरुध्द तक्रार न  नोंदवण्याचा निर्धार केला. तशी भूमिका घेतली.  3 ऑगस्ट 1970- मंडळाच्या वतीने परमवीर  अब्दुल हमीद व्याख्यानमालेची सुरुवात करण्यात आली. 
        
पुण्यातील अहिल्या आश्रमात स्वातंत्र्यवीर मोहन रानडे  आणि कायदेतज्ज्ञ ए. ए. ए. फैजी यांचे व्याख्यान झाले.  18, 19 सप्टेंबर 1971 रोजी गणेश मंगल  कार्यालय,  कोल्हापूर येथे पहिले कार्यकर्ता शिबिर  आयोजित करण्यात आले. यात हमीद दलवाई,  प्रा. अ. भि. शहा या मान्यवरांनी मार्गदर्शन केले.  4 नोव्हेंबर 1971- इस्लामचा आधुनिक दृष्टिकोन  या विषयावर प्रा. असफ ए. फैजी यांचे कोल्हापूर येथे व्याख्यान झाले.  28 नोव्हेंबर 1971- पुणे येथे नेहरू मेमोरियल  हॉलमध्ये महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनी मंडळातर्फे  अखिल महाराष्ट्र मुस्लिम परिषद आयोजित करण्यात  आली. याच महिन्यात गांधी भवन पुणे येथे कार्यकर्त्यांचे  अभ्यास शिबिर घेण्यात आले. या शिबिरात शहा- दलवार्इंबरोबरच यदुनाथ थत्ते,  अनिल अवचट यांनी  मार्गदर्शन केले.  3-4 डिसेंबर 1971-  महाराष्ट्रात सुरू झालेली  सत्यशोधक चळवळ राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्याचा  प्रयत्न मंडळाच्या स्थापनेनंतर दीड वर्षात करण्यात आला.  
       
देशातील पुरोगामी विचारवंतांना एकत्र करून दिल्ली येथे ‘ऑल इंडिया कॉन्फरन्स फॉर फॉरवर्ड लुकिंग मुस्लिम’  परिषद आयोजित करण्यात आली. भारत-पाक युध्दाच्या  काळात झालेल्या या परिषदेसाठी लखनौ,  अलिगढ अशा  मुस्लिमबहुल भागांतून प्रतिनिधी आले होते.  27-28 नोव्हेंबर 1971- पुणे येथे मुस्लिम महिला  परिषद आयोजित करण्यात आली. यात सुमारे दोनशे  महिला उपस्थित होत्या. महाराष्ट्राच्या विविध  जिल्ह्यांबरोबरच अहमदाबाद,  कलकत्ता,  दिल्ली येथून अनेक  महिला प्रतिनिधी उपस्थित होत्या. तलाकपीडित महिलांनी  आपल्या व्यथा मांडल्या. फकर बेगम- दिल्ली,  जहाँआरा  बेगम- कलकत्ता यांनी मुस्लिम महिलांना गुलामगिरीतून  मुक्त करण्याची मागणी केली.  1971 मध्ये मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तत्कालीन  राज्यपाल श्री. अलियावर जंग यांची भेट घेऊन समान नागरी  कायद्यासाठी निवेदन दिले.   1971 - मध्ये दिल्ली,  बुलंद शहर,  तंजावर,  बंगलोर,  हैदराबाद,  लखनौ,  मुंबई,  पुणे, कोल्हापूर येथील सुमारे  500 मुस्लिम महिलांची त्यांच्या समस्या समजून  घेण्यासाठी पाहणी केली. यामध्ये 150 महिला  तलाकपीडित असल्याचे लक्षात आले. 
      
1971 - हे वर्ष मंडळासाठी कार्यक्रमांच्या धूमधडाक्याचे म्हणावे लागेल. कोल्हापूरप्रमाणेच या वर्षात  अहमदनगर (श्रीगोंदा), सोलापूर,  पंढरपूर येथे मंडळाच्या  शाखा स्थापन झाल्या. मंडळाच्या सुधारणावादी विचाराचा  परिणाम म्हणून धर्मवाद्यांनी ‘मुस्लिम पर्सनल लॉ प्रोटेक्शन  कमिटी’ स्थापन केली,  ती नंतर ‘ऑल इंडिया मुस्लिम  पर्सनल लॉ बोर्ड’  म्हणून कार्यरत राहिली.   8 जुलै 1972 - मुस्लिम सत्यशोधक मंडळाने  वेळोवेळी दिलेली निवेदने,  आयोजित केलेले कार्यक्रम  विचारात घेऊन महाराष्ट्राचे तत्कालीन कायदामंत्री बॅ. अंतुले  यांनी महाराष्ट्र विधानसभेत मुस्लिमांसाठी व्दिभार्या प्रतिबंधक  कायदा अस्तित्वात आणण्याचे आश्वासन दिले.  महाराष्ट्रातर्फे केंद्र सरकारकडे असा कायदा आणण्यासाठी  पाठपुरावा करू,  असे बॅ. अंतुले म्हणाले होते.   23-24 सप्टेंबर 1972 - आंतरभारती हायस्कूल- कोल्हापूर येथे अभ्यास आणि स्नेहमीलन शिबिराचे  आयोजन करण्यात आले. यात हमीद दलवाई,  बाबूमियॉं  बँडवाले, आण्णासाहेब सहस्रबुध्दे  अ. का. मुकादम,  हुसेन  जमादार,  बानूबी पठाण यांनी मार्गदर्शन केले. 
         
शिबिराचे  उद्‌घाटन प्रा. अ. भि. शहा यांनी केले.  जानेवारी 1973 - मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे मुखपत्र ‘मुस्लिम सत्यशोधक पत्रिका’,  कोल्हापूर येथून सुरू  करण्यात आली. अंकाच्या संपादनाची जबाबदारी हुसेन  जमादार यांनी घेतली. सुरेश शिपूरकरांच्या भारती  मुद्रणालयातून ते छापण्यात येई. पत्रिकेचे काही अंक  प्रकाशित झाले,  नंतर 1974 पासून पुण्यातून पत्रिका  काढण्याचा निर्णय झाला. पत्रकार सय्यद मुनीर यांनी  संपादनाची जबाबदारी स्वीकारली.  फेब्रुवारी 1973 - देशप्रेम,  राष्ट्रभक्ती ही धर्मातीत असते. मुस्लिम जमातवाद्यांकडून ‘वंदे मातरम्‌’ला केला  जाणारा विरोध अनाठायी असल्याची भूमिका घेऊन  मंडळामार्फत वंदे मातरम्‌च्या पहिल्या दोन कडव्यांच्या  गायनासाठी अभियान सुरू केले. हमीद दलवाई यांनी  व्याख्याने आणि लेखांतून लोकशिक्षण केले.   11 मार्च 1973 -  मराठा मंदिर मुंबई- येथे ‘महाराष्ट्र  मुस्लिम सामाजिक परिषद’  आयोजित करण्यात आली.  समता,  शिक्षण,  कायदा या विषयांवर चर्चा करण्यात  आली. यात कुलसुम पारेख,  दलवाई,  फैजी,  अ. भि. शहा,  डॉ. मोईन शाकीर यांची भाषणे झाली. 
               
11-12 ऑगस्ट 1973 - कोल्हापूर येथे 200  कार्यकर्त्यांसाठी शैक्षणिक शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये दलवाई,  भाई वैद्य,  अ. भि. शहा,  बँडवाले  आदींनी मार्गदर्शन केले.   1973 - सनातनी मुस्लिम बांधवांनी समान नागरी  कायद्यास विरोध करण्यासाठी ऑल  इंडिया मुस्लिम पर्सनल  लॉ बोर्डाची स्थापना करण्यासाठी मुंबईत परिषद घेतली.  त्या परिषदेला सुमारे 10,000 प्रतिनिधी होते. या  परिषदेच्या ठिकाणी हमीद दलवार्इंसह कार्यकर्त्यांनी  निषेधाची निदर्शने केली.   30-31 डिसेंबर 1973 -  कोल्हापूर येथे मुस्लिम शिक्षण परिषद आयोजित करण्यात आली. महाराष्ट्राच्या  विविध भागांतून सुमारे 800 प्रतिनिधी उपस्थित होते.  आधुनिक शिक्षण,  प्रादेशिक भाषेचा स्वीकार,  मदरशाचे  आधुनिकीकरण या विषयांवर चर्चा झाली. अनेक ठराव   मांडण्यात आले. शिक्षणक्षेत्रातील अनेकांनी उपस्थिती  लावली.   9 जून 1974 - चिपळूण येथे मुस्लिम महिलांचा  मेळावा आयोजित केला होता. या वेळी सनातनी मंडळींनी  निदर्शने केली. रस्ते अडविले, धमक्या दिल्या. आदल्या  दिवशी मिरजोळी येथील दलवार्इंच्या घरी मध्यरात्री दोन ट्रक  आणि जीप्समधून मोठ्या संख्येने विरोधक दंगा करीत होते.  अशा परिस्थितीत डॉ. शमीम आत्तार यांनी मेळाव्याचे  उद्‌घाटन केले. 
                
अध्यक्षस्थानी मेहरुन्निसा दलवाई होत्या.   1974 - लोकसंख्यावाढ  नियंत्रणात ठेवली नाही,  तर भारतीय समाज समृध्द व सदृढ होणार नाही. मुस्लिम  समाजात कुटुंबनियोजनाचे प्रमाण वाढवले पाहिजे, त्यांचे  गैरसमज दूर केले पाहिजेत याकामी अमरावतीचे वजीर  पटेल यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी  स्त्री-पुरुषांची शिबिरे आयोजित करून कुटुंबनियोजन  घडवून आणले. हमीद दलवाई हयात असेपर्यंत त्यांनी दर  वर्षी कुटुंबनियोजनाचा उपक्रम धाडसाने आणि जीव  धोक्यात घालून राबविला. ‘बागबान’  नावाचे उर्दू साप्ताहिक  चालवून त्यांनी समाजजागृती केली.  2 नोव्हेंबर 1975 - खादी ग्रामोद्योग केंद्र- कोल्हापूर  येथे तलाकपीडित महिलांची विभागीय परिषद आयोजित  करण्यात आली. कोल्हापुरात मोफत कायदा सल्ला केंद्र सुरू  करण्यात आले.   15 नोव्हेंबर 1975 - तलाकपीडित महिलांच्या  शिष्टमंडळाने सांगलीला मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तोंडी  तलाक रध्द करण्यासाठी निवेदन दिले.  23 नोव्हेंबर 1975 - पुणे येथे ‘जिहाद-ए-तलाक’  या राज्यव्यापी सामाजिक परिषदेचे आयोजन करण्यात  आले. यात सुमारे 500 महिला उपस्थित होत्या.  सय्यदभार्इंच्या पुढाकारातून भरवलेल्या त्या परिषदेत  प्रा. कुलसुम पारेख,  ॲड. नजमा शेख आणि अन्य महिला  प्रतिनिधींनी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर विचार मांडले.  
        
1976 - हमीदभाई यांचे मूत्रपिंडाचे आजार वाढतच  होते. या आजारातून बरे वाटत असताना... 1976 मध्ये  अमेरिकन स्वातंत्र्याच्या व्दिशताब्दीनिमित्त फिलाडेल्फिया  येथे ते उपस्थित राहिले. या वेळी अमेरिका,  जर्मनी,  इंग्लंड  असा दौरा त्यांनी केला. कार्यकर्त्यांशी चर्चा, विविध  शाखांना भेटी चालूच होत्या. आजारपणात  मा. शरद पवार,  अ. भि. शहा,  वसंत नगरकर,  गोविंदराव तळवलकर आणि इतरांनी दलवार्इंना सहकार्य केले. शंकरराव चव्हाण यांनी  मुख्यमंत्री निधीतून 50,000 रुपये दलवार्इंच्या आजारपणासाठी दिले.  3 मे 1977 - हमीद दलवाई यांचे निधन झाले.  त्यांच्या निरीश्वरवादी,  निधर्मी भूमिकेप्रमाणे त्यांनी मृत्युपत्र  तयार केले होते. कोणतेही धार्मिक विधी न करता  चंदनवाडीतील विद्युत दाहिनीत शरीरदहन केले. हे दु:खाचे  सावट असतानाही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या  प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन करून दलवार्इंना अभिवादन  केले. साधना साप्ताहिकाने 14 मे 1977 रोजी हमीद दलवाई स्मृतिविशेषांक काढून मान्यवरांचे लेख प्रकाशित  केले.  22 मे ते 2 जून 1977 - कोल्हापूर येथील जिल्हा  ग्रामोद्योग संघात मुस्लिम महिलांचे दहा दिवसांचे शिबिर  आयोजित केले. महिलांना कौशल्य-प्रशिक्षणाबरोबरच  समानता,  एकात्मता,  शिक्षण यांवर बौध्दिक देण्यात आले.  यात कुलसुम पारेख, कमल पाध्ये,  नरहर कुरुंदकर,  यदुनाथ  थत्ते,  दत्ता शिंदे,  बापूसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.   23 ऑक्टोबर 1977 - अहमदनगर येथे तलाकपीडित  मुस्लिम महिला मेळावा आयोजित केला. यामध्ये 100  महिलांनी भाग घेतला .  26 डिसेंबर 1977 - अमरावती येथे विदर्भातील  सुमारे 700 महिलांची ‘जिहाद-ए-तलाक’  परिषद घेण्यात  आली. 
      
नरहर कुरुंदकर,  मेहरुन्निसा दलवाई,  मुमताज  रहिमतपुरे,  श्रीमती बारी,  वजीर पटेल आदींनी मार्गदर्शन केले. या परिषदेत तलाकपीडित महिला इतक्या प्रमाणात  उपस्थित होत्या की,  पुरुषांना महिलांसाठी सभागृह रिकामे  करून द्यावे लागले. मंडळाच्या इतिहासातील ही सर्वांत  मोठी परिषद वजीर पटेल यांनी आयोजित केली.  मुस्लिम सत्यशोधक विश्वस्त निधी,  मुस्लिम  सत्यशोधक मंडळाचे कार्य पुढे चालले पाहिजे. भारतीय  संविधानात म्हटल्याप्रमाणे जात,  धर्म,  वंश,  प्रदेश,  स्त्रीपुरुष  भेदरहित अखिल भारतीय नागरिकत्व विकसित व्हावे.  दलवाई यांचे सत्यशोधकी विचारकार्य कार्यरत राहावे,  म्हणून साधनाचे संपादक यदुनाथ थत्ते यांनी पुढाकार घेऊन  मेहरुन्निसा दलवाई,  बाबूमियाँ बँडवाले,  बाबा आढाव आणि यदुनाथ थत्ते आदींचे विश्वस्त मंडळ स्थापन  करण्यात येणार असल्याचे घोषित करून आर्थिक साह्याचे  आवाहन केले. साधनाच्या शनिवार पेठ,  पुणे या पत्त्यावर  धनादेश मागवण्यात आले. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचा  विशेषांक काढण्यात आला.   3 मे 1978 - दलवाई यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त  पुणे-कोल्हापूर आणि त्या-त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी  जिल्हाधिकाऱ्यांना भेटून मंडळाच्या मागण्यांबाबत निवेदने  दिली. 
       
मुंबई शाखेने पत्रक काढून वितरित केले.  6 मे 1978 - सातारा येथे ‘जिहाद-ए-तलाक’  परिषद घेण्यात आली. त्यात महिला प्रतिनिधींबरोबरच  डॉ. नरेंद्र दाभोलकरांनी मार्गदर्शन केले.  3 मे 1979 - दलवार्इंच्या  द्वितीय स्मृतिदिनी पुणे- कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कचेरीवर विविध  मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले.   मे 1979 - नेरळ येथे मुस्लिम तरुणांचे अभ्यास  शिबिर आयोजित केले. दहा दिवसांच्या या शिबिरकाळात  न्या. पटवर्धन,  न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी,  नरहर कुरुंदकर,  कुलसुम पारेख यांनी अभ्यासवर्ग घेतले.  मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वैचारिक भूमिकेचा  सर्वसामान्य वाचकांना परिचय व्हावा,  या हेतूने इंडियन  सेक्युलर सोसायटीने ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ - उद्देश व  भूमिका’ हे पुस्तक प्रकाशित करून मंडळास सहकार्य केले.  मंडळाचे कार्यकर्ते अन्वर शेख यांनी पुस्तिकेच्या लेखनात मोठे योगदान दिले. दि. 26 जानेवारी 1979 रोजी  प्रकाशित केलेल्या या पुस्तकास मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष बाबूमियाँ बँडवाले यांनी प्रस्तावना लिहिली आहे.  या पुस्तकाची सुधारित आवृत्ती मंडळाने 47 व्या वर्धापनदिनी पुन्हा प्रकाशित केली.  मंडळाचा हा कार्यकाळ जसा भरगच्च कार्यक्रम,  आंदोलन, लोकशिक्षणासाठी केलेल्या विविध उपक्रमांनी  भरला आहे;  तसाच विचारवंतांच्या विचारमंथनातून  वैचारिक अधिष्ठानाची प्रतिष्ठापना करणारा आहे. म्हणूनच हे  दशक मंडळाचे सुवर्णदशक आहे.

Tags: जमाते इस्लामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुस्लिम लीग हिंदू महासभा हमीद दलवाई डॉ. नरेंद्र दाभोलकर बाबूमियाँ बँडवाले मुस्लिम सत्यशोधक Jamate Islami Rashtriy swayansewk sangh Muslim lig Hindu mahasabha Hamid dalwai Dr. Naredra dabholkar Babumiya byandwale Muslim satyshodhak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमशुद्दिन तांबोळी,  पुणे, महाराष्ट्र
tambolimm@rediffmail.com

प्राध्यापक, अध्यक्ष- मुस्लिम सत्यशोधक मंडळ 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात