डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

दलवाईंनी पेटवलेली मशाल विझली नाही... (मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे दुसरे दशक)

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या दुसऱ्या दशकात कार्याचा आलेख चढता राहिला. पुण्यात सय्यदभाई, अन्वर राजन, अन्वर शेख, शमसुद्दीन तांबोळी, रशिद शेख यांनी कार्यविस्तार केला. मुंबईत मेहरुन्निसा दलवाई आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह कार्य करीत होत्या. हुसेन जमादार यांनी मोहम्मद गौस नाईक, प्रा. आय. एन. बेग, गाझीउद्दीन सलाती व इतरांसोबत मंडळाचे कार्य केले; तसेच स्वतंत्र अशा मुस्लिम समाजप्रबोधन संस्थेची स्थापना करून त्यामार्फत विधायक कार्य करण्यास प्रारंभ केला. दशकाच्या उत्तरार्धात सामूहिक कार्यापेक्षा स्वतंत्रपणे कार्य होत राहिले. काही प्रमाणात संघटना व्यक्तिकेंद्रित व्हायला सुरुवात झाली. काही मतभेदांवर चर्चा होऊ लागली, ज्याचे परिणाम मंडळाच्या तिसऱ्या दशकात जाणवू लागले.  

हमीद दलवाईंनी पेटवलेली सत्यशोधकी मशाल त्यांच्या मृत्यूनंतर विझेल आणि त्यात सत्यशोधकी विचार व मंडळ उरणार नाही, असा भ्रम मुस्लिम सत्यशोधकच्या विरोधकांनी बाळगला होता; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला. हमीदभाईंनी आपल्या हयातीत इतर आनुषंगिक विषयांबरोबरच दोन महत्त्वपूर्ण बाबींवर सर्वाधिक लक्ष दिले. त्यातील पहिली गोष्ट- धर्मनिरपेक्ष एकात्मिक समाजासाठी धर्मवादी राजकारणावर आणि धर्मांधतेवरचा घाला. दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट अशी- आधुनिक, समतावादी समाजासाठी समान नागरी कायद्याची मागणी. दलवाई म्हणत, ‘‘समान नागरी कायद्याशिवाय समान नागरिकत्वाची भावना लोकमानसात रुजणार नाही, याबाबत लोकशिक्षण झाले पाहिजे. लोकानुनयाला मर्यादा असली पाहिजे. मागासलेल्या देशातील लोकांची मनेही मागासलेली असतात. केवळ लोकानुनय करीत राहिले, तर असे देश कायमचे मागासलेले राहतील. अभिक्रमशील राजकारणात केवळ लोकानुनय पुरेसा नसतो. समान नागरिकत्वाच्या पायावरच राष्ट्रीय एकात्मतेची इमारत उभी राहील.’’ संघ परिवाराने समान नागरी कायद्याचा विषय आपल्या अजेंड्यावर घेतला असला; तरी त्याचा पाया हा समान नागरिकत्वाच्या, समतेच्या व आधुनिकतेच्या विचारावर आधारित नव्हता. इंडियन सेक्युलर सोसायटी आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळ या दोन्ही संस्था धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर अपेक्षित समान नागरी कायद्यासाठी मोर्चे, निवेदने, परिषदा यांचे आयोजन करीत राहिल्या. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या बाराव्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभेवर ‘समान नागरी कायद्या’च्या मागणीसाठी मोर्चा काढला आणि हा मोर्चा संस्मरणीय ठरला. 1981 मध्ये दलवाईंच्या पुण्यतिथीनिमित्त प्रा.अ.भि. शहा यांचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर येथे ‘इस्लाम आणि संस्कृती’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अ. भि. शहा यांचा मुस्लिम सत्यशोधक मंडळाला मोठा आधार होता, परंतु 11 ऑक्टोबर 1981 रोजी त्यांचे हृदयविकाराने आकस्मिक निधन झाले. मंडळाचे खंदे पाठीराखे असणाऱ्या शहांच्या निधनामुळे मंडळावर मोठा आघात झाला. याबरोबरच कायदा व धर्मशास्त्राचे अभ्यासक असणारे आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेऊन मार्गदर्शन करणारे प्रा. असफ ए. फौजी यांचेही निधन झाले. सय्यद मुनीर आणि फजल शेख यांनी वैयक्तिक कारणातून मंडळाचा राजीनामा दिला. या सर्व घटनांमुळे मनोबलावर परिणाम झाला तरी मंडळाने माघार घेतली नाही, ही मोठी जमेची बाजू होती. पुणे, मुंबई, कोल्हापूर, नगर, अमरावती भागात अनुक्रमे सय्यदभाई, मेहरुन्निसा दलवाई, हुसेन जमादार, बाबूमियाँ बँडवाले, वजीर पटेल यांच्या नेतृत्वात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी उद्दिष्टांना अनुसरून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा प्रचार व्हावा, कार्यकर्ते मिळावेत, यासाठी नोव्हेंबर 1981 मध्ये सातारा, कराड, वाई, लोणावळा, खंडाळा, खोपोली, सासवड, बारामती, फलटण अशा भागात जाऊन स्थानिक मुस्लिम नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. दि. 13 जून 1982 रोजी पुण्यात विद्यार्थी सहायक समितीच्या वसतिगृहात मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. मुस्लिम महिलांना विविध प्रकारच्या कौटुंबिक कलहांना सामोरे जावे लागते, त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना मार्गदर्शन करणारे कोणतेही मंच नाहीत. तोंडी तलाक, अंधश्रध्दा दुसरे लग्न आणि इतर कारणांमुळे हतबल- असहाय महिलांना मदत व मार्गदर्शन करता यावे, म्हणून पुण्यात मुस्लिम महिला मदत केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मुस्लिम मोहल्ल्यात समाजवादी सेवा दल परिवारातील डॉ. श्री. न. देशपांडे हे दवाखाना चालवत. त्यांनी रास्ता पेठेमधील कादरभाई चौकात दवाखान्याची जागा उपलब्ध करून दिली. या केंद्रात सय्यदभाई, अन्वर राजन, रशिद शेख, मी आणि इतर युवक-युवती नित्य नेाने सायंकाळी जमत असू. काही वकील मंडळींनी याकामी महिलांना कायदेशीर सल्ला देण्याची जबाबदारी स्वीकारली. महिलांना हक्काची जागा मिळाली. ते मंडळाशी जोडले जाऊ लागले. या केंद्रात मग कुटुंबनियोजन, अंधश्रध्दा, कायदा, अशा अनेक विषयांवर चर्चा, व्याख्याने आयोजित केली जात. 

दि. 11 एप्रिल 1983 रोजी पुणे येथे महर्षीनगरमध्ये एक लग्न रोखण्यासाठी कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. लग्न लावणाऱ्या काझीला मंडळाची भूमिका योग्य वाटली. त्यांनी लग्न/निकाह लावण्यास नकार दिला. परंतु पोलिसांनी या नवरदेवाच्या पहिल्या पत्नीसह मंडळाच्या सव्वीस कार्यकर्त्यांना अटक करून या लग्नाची वाट मोकळी केली. दि. 4, 5 जून 1983 रोजी पुण्यातील हमाल भवनात महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे अभ्यास शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात अमरावतीचे वजीर पटेल आणि बाबूमियाँ बँडवाले यांचा सत्कार करण्यात आला. मंडळाचा कार्यक्रम चालू असताना विरोधकांनी मंडळाविषयी खोटा प्रचार करून निदर्शने केली, परंतु याचा उलटा परिणाम विरोधकांनाच भोगावा लागला. दि. 30 आणि 31 जुलै 1983 रोजी पुण्यात मुस्लिम तरुणांचा ओघ वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी माझ्यासह इतर तरुणांनी घेतली. डॉ. एस. एम. शेख, बशीर शेख, मुताज इनामदार, ॲड. नजमा शेख आणि इतर अनेक कार्यकर्ते नियमित कामकाजात लक्ष घालत होते. दि. 26 जाने. 1983 रोजी तलाकपीडित महिलांची परिषद सय्यदभाईंच्या नेतृत्वात पुणे येथे पार पडली. मेहरुन्निसा दलवाई, अ. का. मुकादम, मुसा मुलाणी, महंमद दलवाई आणि कार्यकर्ते मुंबई शाखेत कार्यरत होते. 

दि. 12 मे 1983 रोजी मंडळ आणि इंडियन सेक्युलर सोसायटीच्या वतीने अलिगड मुस्लिम विद्यापीठसंदर्भात एक चर्चासत्र रुईया महाविद्यालयात आयोजित केले. मुंबई केंद्राने विधायक कामातून प्रबोधनाकडे जाण्याची दिशा ठरवली त्याप्रमाणे अंधेरीतील गरजू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटण्याचा कार्यक्रम घेतला. आंतरराष्ट्रीय बालक वर्षानिमित्त 160 मुस्लिम मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. मेहरुन्निसा भाभींनी पवनार, लातूर, ठाणे व इतर ठिकाणी मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर व्याख्याने दिली. मंडळाच्या वर्धापनदिनी श्रीमती शाहजादी हकीम यांचे, तर दलवाई पुण्यतिथी रोजी डॉ. अल दस्तूर यांचे ‘इस्लामिक फंडामेंटलिझम ॲन्ड इंडियन मुस्लिम’ या विषयावर व्याख्याने आयोजित करण्यात आली. मेहरुन्निसाभाभी राज्यातील विविध भागांत जाऊन मुस्लिम प्रश्नांवर मांडणी करीत. मुस्लिम महिलांना कायदेशीर मदत करण्याव्यतिरिक्त शिलाईचे व इतर कौशल्य-प्रशिक्षण देऊन काम मिळवून देण्यात येई. हमीद दलवाई यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त म्हणजे 1982 मध्ये डॉ.आ.ह. सांळुखे आणि डॉ. असगर अली इंजिनिअर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. मेहरुन्निसाभाभींनी मध्य प्रदेशातील इंदौर येथे, गुजरातमधील अहमदाबाद येथे व्याख्याने दिली. तसेच मंडळाचे कार्य त्या त्या ठिकाणी सुरू व्हावे यासाठी प्रयत्न केले. भाभींच्या या कार्यात हुंडाविरोधी चळवळ, बुध्दिप्रामाण्यवादी मंच, शीव भगिनी समाज, बॉम्बे सोशल रिफ़ॉर्म असोसिएशन यांनी सहकार्य केले. संयुक्तपणे कार्यक्रम आयोजित केले. कोल्हापूर शाखेच्या वतीने हुसेन जमादार, प्रा. मुताज रहिमतपुरे, मोहंमद गौरव नाईक, प्रा. आय. एन. बेग, आशा अपराध, ऐनुल आचार यांनी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले. 

जून 1982 मध्ये मुस्लिम प्रबोधन संवाद हे नियकालिक सुरू केले. गाझाउद्दिन सलानी यांनी इचलकरंजी येथे जवळपास शंभर कार्यकर्त्यांसाठी अभ्यास शिबिरांचे आयोजन केले. हुसेन जमादार यांनी 26 जानेवारी 1983 रोजी तलाकपीडित महिलांच्या मुलांसाठी एक वसतिगृह सुरू केले. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, बेळगाव या भागात मंडळाचे कार्य पोहोचवण्यासाठी जमादार आणि सहकारी कार्यकर्त्यांनी काम केले. स्थानिक पातळीवर विविध उपक्रमांचे आयोजन केले. कोल्हापूर येथील वि. स. खांडेकर हायस्कूलमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेण्यात आले. सामाजिक सद्‌भाव वाढवणारे कार्यक्रम घेण्यात आले. अमरावती भागात वजीर पटेलांनी कुटुंबनियोजनाच्या कामाला प्राधान्य दिले. जातीयवादी मुस्लिमांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला; पण त्यामुळे विचलित न होता, न डगमगता जिद्दीने काम पुढे नेले. लोकसंख्यावाढ हा विषय देश आणि समाजासाठी महत्त्वाचा आहे. 

इस्लाम हा कुटुंब- नियोजनाच्या विरोधात नाही, हे निदर्शनास आणून देत शेकडो मुस्लिम महिलांसाठी एक उद्योग प्रशिक्षण व उत्पादन केंद्र चालवले. निराश झालेल्या महिलांच्या जीवनात आशेचा दीप लावला. इस्लामचा अभ्यास-व्यासंग चांगला असल्यामुळे हिंदू पुरुष जमातवाद्यांशी ते प्रतिवाद करीत. श्रीगोंदा येथे बाबूमियाँ बँडवाले, मेहबूब सय्यद, समीर मणियार आपापल्या पध्दतीने कार्यक्रमांचे आयोजन करीत बाबूमियाँ बँडवाले यांची जीवनातील तपश्चर्या मंडळाच्या वाढविस्तारात उपयोगी पडली. फलटण येथील प्रा. वि. अ. शेखर, प्रा. मोदी, बशीर तांबोळी यांनी मंडळासाठी कार्य केले. हमीदभाईंच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त ‘इस्लामचे भारतीय चित्र’ हे पुस्तक पुण्यातील वसंत व्याख्यानमालेत प्रकाशित करण्यात आले. ‘मुस्लिम जातीयतेचे स्वरूप- कारणे व उपाय’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या प्रस्तावनेसह प्रकाशित झाली. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अशा पध्दतीने विस्ताराचे कार्य साधारणपणे 1983-84 पर्यंत सामुदायिक नेतृत्वातून पुढे जात होते. 

मंडळाच्या नेतृत्वपातळीवर 1984 नंतर मतभेद दिसून येत होते. परिणामी, सामुदायिकपणे होणारे कार्य वेगळ्या संघटनात्मक पातळीवरील अडचणींना सामोरे जात होते. वैयक्तिक पातळीवरील मतभेद कायम ठेवून महत्त्वाच्या कार्यक्रमात एकत्र येऊन काही कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यात आले. भारतातील तलाकपीडित, परित्यक्त्या महिलांच्या पोटगीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात गाजत होता. सर्वोच्च न्यायालयात शाहबानो यांच्या याचिकेनिमित्त सुनावणी करण्यात येत होती. भारतातील धर्मनिरपेक्षता, संविधानाने दिलेल्या समता- समान संधी या मूल्यांची कसोटी होती. शेवटी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांनी शाहबानो प्रकरणात 23 एप्रिल 1985 रोजी ‘तलाकपीडित मुस्लिम महिलांना 125 कलमाप्रमाणे पोटगी मिळवण्याचा हक्क देणारा, आहे, असा ऐतिहासिक निर्णय दिला. धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांशी बांधिलकी दाखवणारा, सर्व महिलांप्रमाणेच मुस्लिम महिलांना समान अधिकार देणारा हा निवाडा महिलांसाठी दिलासा देणारा होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळासह अनेक पुरोगामी संघटनांनी त्याचे स्वागत केले. सय्यदभाईंच्या नेतृत्वात या निमित्ताने अभियान राबवण्याचा निश्चय मंडळाने केला. दि.1 आणि 2 मे 1985 रोजी ‘या प्रकारचे तलाक निषेधार्ह आहेत,’ म्हणून कोल्हापुरात उपोषण करण्यात आले. 

शाहबानोचा लढा हा मुस्लिम महिलांच्या आत्म- सन्मानाचा लढा होता. मुस्लिम सत्यशोधक मंडळाने शाहबानोचे समर्थन केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे स्वागतही केले होते. तसेच शाहबानोचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना पुण्यात निमंत्रित करून 1985 मध्ये टिळक स्मारक मंदिरात सत्कार करण्यात आला. या निमित्ताने मंडळ पुन्हा चर्चेत आले. मंडळाने हाच धागा पकडून महिलांच्या प्रश्नांवरील आंदोलन आक्रमक पध्दतीने चालवण्याचा निर्णय घेतला. दि. 17 ऑगस्ट 1985 रोजी मेहरुन्निसा दलवाई यांच्या नेतृत्वात मुंबई येथे पोटगी बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले. हुसेन जमादार यांच्या नेतृत्वात कोल्हापूर येथे महाराष्ट्रव्यापी कार्यक्रमाचे नियोजन होत होते. या शाखेतर्फे 3 ते 18 नोव्हेंबर 1985 या काळात कोल्हापूर ते नागपूर अशा पंधरा जिल्ह्यांत तलाकमुक्ती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जमादार यांच्यासह मेहरुन्निसा दलवाई, बाबूमियाँ बँडवाले यांनी नेतृत्व केले. अनेक ठिकाणी लाखोंच्या मोर्चावर दगडफेक करण्यात आली, काही जिल्ह्यांत प्रवेशबंदी केली. यावेळी जाळीबंद अशी एसटी बस मोर्चासाठी घेण्यात आली होती. या निमित्ताने मंडळ पुन्हा महाराष्ट्रात चर्चेत आले. मात्र मंडळाच्या विरोधकांनी सामान्य मुस्लिमांची दिशाभूल केली. पोटगीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा रद्द करण्यात यावा, यासाठी धर्मवादी जमाव रस्त्यावर येत होता. आमच्या प्रेतांचे कुतुबमीनार एवढे ढीग पडले तरी चालेल, पण हा निवाडा आम्हाला मान्य नाही. ‘इस्लाम खतरें में है’, शरियतमध्ये हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही, अशा अविवेकी घोषणांचा पाऊस पडत होता. मंडळासमोर एक मोठे आव्हान उभे राहिले होते. तसेच राजीव गांधी सरकारच्या धर्मनिरपेक्षतेच्या धोरणांची अग्निपरिक्षाच होती. खासदार शहाबुद्दीन व इतर जमातवादी नेते आक्रमक झाले होते. न्यायालयाचा निवाडा फिरवून नवे विधेयक संसदेत मांडण्याची तयारी चालली होती. प्रमिलाताई दंडवते यांच्या सहकार्याने मंडळाने पंतप्रधान व राष्ट्रपतींना भेटून निवेदन द्यायचा निर्णय घेतला. तलाकपीडित महिलांचा मोर्चा घेऊन मंडळाच्या शिष्टमंडळाने दि. 21-22 फेबु्रवारी 1986 ला येऊ घातलेल्या विधेयकास विरोध करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी, राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, कायदामंत्री अशोक सेन, नजमा हेपतुल्ला आणि संसदेतील सभासदांना निवेदन देऊन पत्रकार परिषदेचे आयोजन केले.

एप्रिल 1986 मध्ये मुस्लिम महिला विधेयकास विरोध करण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. त्यात मंडळाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. शेवटी संसदेत घटस्फोटित मुस्लिम महिला संरक्षण विधेयक मांडण्यात आले. राजीव गांधी सरकारचे बहुत असल्याने हे विधेयक संसदेत पास झाले. तेव्हा केंद्रीय मंत्रिपदी असणारे आरिफ मोहम्मद खान यांनी विधेयकाच्या निषेधार्थ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळाने लाक्षणिक उपोषण करून निषेध नोंदवला. यात मंडळाच्या कार्यकर्त्यांसमवेत समाजवादी नेते नानासाहेब गोरे, भाई वैद्य, विनायकराव कुलकर्णी, डॉ. बाबा आढाव, ताहेरभाई पूनावाला व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 16 जानेवारी 1986 रोजी तलाकमुक्ती मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी नागपूर विधानसभेवर धरणे धरले आणि तत्कालीन मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवरील निवेदन दिले होते. मुस्लिम महिलांना संविधानात्मक हक्कांपासून वंचित ठेवले जात असल्यामुळे देशातील विविध राज्यांत मुस्लिम विचारवंत, लेखक आणि कार्यकर्त्यांमधून एक प्रकारचा असंतोष व्यक्त करण्यात येत होता. राजीव गांधींनी मांडलेले व संसदेत पारित करण्यात आलेले घटस्फोटित मुस्लिम महिला विधेयक 1986 च्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या. धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाला काळिमा फासल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा फिरवल्यामुळे स्यूडो सेक्युलॅरिस्ट म्हणून सरकारला हिणवले जात होते. एकूणच देशाच्या राजकारणाला वेगळे वळण देणारे, धर्मवादी राजकारणाला खतपाणी घालणारे वातावरण निर्माण झाले होते. 

आज निर्माण झालेल्या धर्मवादी राजकारणास शाहबानो प्रकरण मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरले आहे. या निमित्ताने मुस्लिम सत्यशोधक मंडळ राष्ट्रीय पातळीवर प्रकाशात आले. विविध राज्यांतील पुरोगामी मुस्लिमांनी मंडळाच्या भूमिकेचे स्वागत केले होते. अशा विखुरलेल्या समर्थकांची मोट बांधून राष्ट्रीय पातळीवर संघटना उभारण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले होते. या पार्श्वभूमीचा विचार करून सर्व समर्थकांना एका व्यासपीठावर आणण्यासाठी 26-27 सप्टेंबर 1987 रोजी एका परिषदेचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले. ही परिषद यशस्वी झाली आणि त्यातून ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स स्थापन करण्यात आली. या परिषदेत कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गोवा, दिल्ली, बिहार या प्रांतातील आणि महाराष्ट्रातील प्रतिनिधी उपस्थित होते. या प्रतिनिधींच्या सहकार्यातून विविध राज्यांत महिला, शिक्षण, समाज या विषयांवर परिषदांचे आयोजन करण्यात आले. 

दि. 31 जुलै 1988 ला गुजरातमधील अहमदाबाद येथे तलाकपीडित महिला परिषदेचे आयोजन केले. यानंतर कर्नाटक, बंगलोर, मदुराई, तमिळनाडू येथे परिषदा घेण्यात आल्या. पुढे पुण्यातही अशा परिषदांचे आयोजन करण्यात आले. या परिषदांच्या आयोजनाचे फलित असे की, नंतरच्या काळात मुस्लिम महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणाऱ्या अनेक महिला संघटना स्थापन झाल्या. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या पुढाकारातून किंवा प्रेरणेतून निर्माण झालेल्या कार्यपध्दतीत व भूमिकेत काही प्रमाणात फरक असणाऱ्या पन्नासहून अधिक संघटना जन्माला येणे म्हणजे हमीदभाईंच्या ‘सदा-ए-निसवाँ’चे बीज उगवण्यासारखे आहे. महाराष्ट्रात विविध भागांत मुस्लिम समाजप्रबोधन, राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सलोखा, महिलांच्या समस्या, शिक्षण, साहित्यक्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि संघटना कार्यरत असल्याचे लक्षात आले. अशा प्रकारचे प्रयत्न म्हणजे दलवाई आणि मंडळाच्या कार्यास समांतर योगदान देणारेच असल्याने अशा व्यक्तींना प्रोत्साहन देऊन प्रकाशात आणले पाहिजे, या भूमिकेतून ‘हमीद दलवाई पुरस्कार’ देण्याचे मंडळाने ठरवले. मंडळाच्या आरंभ- काळापासून मंडळाचे समर्थक व आधारस्तंभ भाई वैद्य यांना पुरस्काराबद्दल माहिती देण्यात आली, तेव्हा 1989 मध्ये भाईंया पुरस्कारासाठी दहा हजार रुपयांची देणगी दिली. मंडळाच्या वतीने पहिला पुरस्कार हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी म्हणजे 3 मे 1989 रोजी मंडळाच्या कार्यकर्त्या प्रा. मुताज रहिमतपुरे यांना मरणोत्तर देण्यात आला. 

मंडळाच्या आरंभीच्या काळात या चळवळीशी रहिमतपुरे जोडल्या गेल्या होत्या. मुंबईतील ‘पोटगी बचाव परिषदे’चे (1985) उद्‌घाटन त्यांनी केले होते. शाहबानो प्रकरणाच्या वेळी नजमा हेपतुल्ला यांच्या खोचक-उपरोधिक प्रश्नांना सडेतोड प्रत्युत्तर देऊन त्यांचा हशा केला होता. मंडळाच्या कार्याध्यक्ष म्हणून त्यांनी काही काळ धुरा सांभाळली. दि. 3 ऑक्टोबर 1986 रोजी रहिमतपुरे यांचे अपघाती निधन झाले. प्रा. मुताज यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य करून धर्मविरोधी कृत्ये केली, असा आरोप ठेवून धर्मांध मुस्लिमांनी त्यांच्या दफनास कोल्हापूर येथे विरोध केला होता. मंडळाच्या व स्थानिक नेत्यांच्या हस्तक्षेपाने या तणावाचे शमन करण्यात आले. पुढे 1988 मध्ये मंडळाचे एक कार्यकर्ते ॲड. अब्दुल शेख यांचे संगमनेर येथे निधन झाले, तेव्हाही धर्मांध बांधवांनी अशीच भूमिका घेऊन त्यांच्या दफनविधीस विरोध केला. औरंगाबाद येथील दलवाईसमर्थक डॉ. मोईन शाकीर यांच्या निधनानंतरही असाच प्रकार घडला. मंडळाच्या कार्यास होणारा विरोध कोणत्या पातळीवरचा होता, याची कल्पना या घटनांधून येईलच. असे असतानाही मंडळामार्फत चर्चासत्रे, परिसंवाद, अभ्यासशिबिरे, मोर्चे, शिष्टमंडळाच्या भेटी, शैक्षणिक साहित्य वाटप, महिला प्रशिक्षण असे कार्यक्रम होत राहिले. मुस्लिम सत्यशोधक पत्रिकेचे प्रकाशन होत राहिले. अन्वर राजन, समीर मणियार यांनी ही जबाबदारी स्वीकारली होती. फलटण, इचलकरंजी येथे कार्यक्रम आयोजित केले.

फेब्रुवारी 1990 मध्ये हुसेन जमादार यांनी मंडळाची भगिनी संस्था म्हणून तलाकपीडित महिला उद्योगाची स्थापना केली आणि मंडळाचे कार्य पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न झाला. दि. 3 मे 1990 रोजी हमीद दलवाई पुरस्कार बुध्दिप्रामाण्यवादी कार्यकर्ते, बोहरा समाजातील अन्याय-अत्याचाराविरुध्द बंड करणारे ताहेरभाई पूनावाला यांना देण्यात आला. हा कार्यक्रम मंडळाचे अध्यक्ष स्वातंत्र्यसैनिक बाबूमियाँ बँडवाले यांच्या कर्मभूमीत म्हणजे श्रीगोंदा येथे झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब गोरे, बाबा आढाव उपस्थित होते. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या दुसऱ्या दशकात कार्याचा आलेख चढता राहिला. पुण्यात सय्यदभाई, अन्वर राजन, अन्वर शेख, शमसुद्दीन तांबोळी, रशिद शेख यांनी कार्यविस्तार केला. मुंबईत मेहरुन्निसा दलवाई आपल्या निवडक कार्यकर्त्यांसह कार्य करीत होत्या. हुसेन जमादार यांनी मोहम्मद गौस नाईक, प्रा. आय. एन. बेग, गाझीउद्दीन सलाती व इतरांसोबत मंडळाचे कार्य केले; तसेच स्वतंत्र अशा मुस्लिम समाजप्रबोधन संस्थेची स्थापना करून त्यामार्फत विधायक कार्य करण्यास प्रारंभ केला. दशकाच्या उत्तरार्धात सामूहिक कार्यापेक्षा स्वतंत्रपणे कार्य होत राहिले. काही प्रमाणात संघटना व्यक्तिकेंद्रित व्हायला सुरुवात झाली. काही मतभेदांवर चर्चा होऊ लागली, ज्याचे परिणाम मंडळाच्या तिसऱ्या दशकात जाणवू लागले. मंडळाचे समर्थक असणाऱ्या आणि दलवाईंचे चाहते म्हणून मंडळाचे कार्यकर्ते असणाऱ्यांनी अनेकांनी साथ सोडली. वजीर पटेल यांनी मुस्लिम समाजाची तोबानामा (माफी मागून) देऊन मंडळ सोडले. प्रा. फकु्रद्दीन बेन्नूर हे मंडळाच्या कार्यपध्दतीवर नाराज झाले. अ. का. मुकादम, विचाराने असगर अली इंजिनिअर यांच्याजवळ गेले. फजल शेख, ॲड. नजमा शेख, सय्यद मुनीर, मकबुल तांबोळी यांच्या कार्यकर्त्यांनी काही कारणे देत लांब राहणे पसंत केले. यामुळे मंडळाच्या कामाची गती मंदावली, पण कार्य थंडावले नाही! 

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा 

Tags: हमीद दलवाई मुस्लिम सत्यशोधक मंडळ शमसुद्दीन तांबोळी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके