डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आव्हानांना सामोरे जाण्याचा काळ... (मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे तिसरे दशक)

मंडळाच्या पुढाकारातून 1993 मध्ये ‘मंदिर- मस्जिद सुलाह कमिटी’ची स्थापना करण्यात आली. मुस्लिम समाजाने बहुसंख्य हिंदूंच्या भावना विचारात घेऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी मुस्लिमांनी वादग्रस्त जागेवरील आपला हक्क सोडावा आणि हिंदुत्ववाद्यांनी यानंतर धार्मिक स्थळांच्या जागेवरून वाद निर्माण करू नये, संसदेने 1991 मध्ये धार्मिक स्थळांची 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेली स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी केलेल्या कायद्याचा सन्मान राखावा, हे मुद्दे घेऊन दोन्ही समाजांतील धर्मवादी संघटनांशी संवाद करण्याचे ठरवण्यात आले. कालांतराने ही कमिटी शांत झाली. मग काही महिन्यांनी सय्यदभाई आणि हिंदुत्ववादी विचारवंत स. ह. देशपांडे यांनी व्यक्तिगत पत्रक काढून या विषयावर आवाहन केले. मात्र मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते व पुरोगामी कार्यकर्ते या पत्रकातील आवाहनांवर नाराज झाले. 

‘इस्लामच्या इतिहासातील अव्दितीय संघटना’ असे संबोधले जाणाऱ्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना समाजाला धर्मापलीकडची दृष्टी देण्याच्या कार्यक्रमातून झाली. जागतिक पातळीवर लोकशाही विचारांचे स्वागत होत असताना मुस्लिम समाज मात्र स्वरचित कोषाबाहेर येऊन खुलेपणाने विचार करण्यासाठी धजावत नव्हता. परिणामी, धार्मिक मूलतत्त्ववाद, दहशतवाद, अल्पसंख्याकपणाची गंड भावना आणि अस्मितेचे प्रश्न सातत्याने पटलावर दिसत राहिले, त्यामुळे या समाजातील जातिव्यवस्था, दारिद्य्राचा प्रश्न, शिक्षण आणि इतर प्रश्न हाताळण्यात मुस्लिम नेत्यांना स्वारस्य वाटले नाही. हमीद दलवाईंना भारतातील धर्मवादी राजकारणाबद्दल सतत चिंता वाटत होती. ते म्हणत, ‘‘हा देश समर्थ व्हावा, जगातील शक्तिमान राष्ट्रांच्या पंक्तीला बसावा; त्यासाठी या देशातील समाज शास्त्रीय आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनावर आधारलेला, भौतिक श्रध्दा बाळगणारा व चैतन्यशील बनला पाहिजे. समाजाला आधुनिक आणि प्रगतीशील बनविण्याच्या आड ज्या धर्मश्रध्दा येतात, त्या दूर सारण्याची प्रक्रिया पुढे चालविणे म्हणजेच आपण धर्मनिरपेक्षतेकडे वाटचाल करणे आहे.’’

शाहबानो प्रकरणातून देशातील धर्मनिरपेक्षतेचे आव्हान कोणत्या स्वरूपाचे आहे, हे समाज अनुभवत होता. या प्रकरणात विचलित झालेल्या राजीव गांधी सरकारने, 1950 पासून अयोध्येतील रामलल्ला मूर्तीच्या जागी लावलेले कुलूप 1987 मध्ये उघडले आणि हिंदुत्ववाद्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या निमित्ताने अनुभवलेला घटनाक्रम पाहिल्यास भारतातील राजकारण कोणत्या दिशेने जाणार, हे भाकीत करण्यासाठी कोणा भविष्यकर्त्याची गरज नव्हती. धर्मवादी राजकारण आणि त्याचे देशाच्याएकात्मतेवर होणाऱ्या परिणामांना सामोरे जाणे अपरिहार्य होते. देशासमोर नवे आव्हान उभे राहिले आणि धार्मिक ध्रुवीकरणातून सामाजिक-धार्मिक वातावरण दूषित झाले, जागतिक आणि देशांतर्गत दहशतवादाला अनुकूलता लाभली; ज्याची किंमत धर्मनिरपेक्ष एकात्म समाज निर्माण करण्याच्या प्रक्रियेला मोजावी लागली.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या जन्मकाळापासून त्याची बांधिलकी ही समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही उदारमतवादी विचारांशी राहिली. इंडियन सेक्युलर सोसायटी, राष्ट्र सेवादल, युवक क्रांती दल, महात्मा फुले समता प्रतिष्ठान, साधना परिवार, आंतरभारती, समाजवादी महिला सभा यांच्यासारख्या त्या काळातील समतावादी संस्था-संघटनांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळास समर्थनाची आणि सहकार्याची भूमिका घेऊन मंडळाच्या उपक्रमात सहभाग नोंदवला. मंडळाचे मनोबल वाढवले. मंडळाचे वैचारिक आणि परिवर्तनाचे कार्य कोणत्या दिशेने जात होते, हे समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी लक्षात घेणे आवश्यक वाटते. मंडळाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दशकासंदर्भात दिलेल्या माहितीमध्ये काही मान्यवर व्यक्तींचा नामोल्लेख राहिला आहे. मंडळाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त प्रकाशित होणाऱ्या या मागोव्यात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा.मे.पु.रेगे, वसंतराव नगरकर, डॉ.सत्यरंजन साठे, डॉ.देवदत्त दाभोळकर, पु.ल. देशपांडे, दिलीप चित्रे, गं.बा. सरदार, स.मा. गर्गे, विद्या बाळ, वसुधा धगमवार, कॉ.रा. प. नेने, कुमार सप्तर्षी, मधु लिमये, व्ही.एन. राव, पन्नालाल सुराणा आणि अनेकांच्या मदतीचा व मार्गदर्शनाचा उल्लेख न करणे ही कृतघ्नता ठरेल.

मुस्लिम समाज-प्रबोधनाच्या कार्याची निकड आणि हमीद दलवाई यांच्यासारख्या निखळ मानवतावादी सुधारकाच्या अडचणी लक्षात घेऊन या मंडळींनी मंडळास सतत प्रोत्साहन दिलेले आहे. ही सर्व मंडळी उजव्यांच्या विरोधात स्पष्टपणे व्यक्त होणारी होती. असे असतानाही हमीदभाई आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अपहरण करण्याचा प्रयत्न हिंदू समाजातील उजवे करीत होते. मंडळाचे निवडक विचार व उपक्रम मुस्लिम- विरोधासाठी वापरण्यात आले, तेही विपर्यस्त करून. त्यामुळे ही चळवळ मुस्लिम समाजात प्रसारित होताना मर्यादा आल्या. मंडळाविरोधातील मुस्लिम नेत्यांनी या उजव्यांचा संदर्भ घेऊन मंडळास बदनाम करण्याचे आणि विरोध करण्याचे प्रयत्न केले. मुस्लिम नेत्यांकडून होणारा विरोध परतवून लावण्यात मंडळ काही प्रमाणात यशस्वी झाले असले, तरी संघटनात्मक पातळीवर मुस्लिमविरोधाचा मुद्दा विचारात घेऊन काही प्रमुख कार्यकर्त्यांनी दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळाने नाव बदलून काम करावे, त्यामुळे मुस्लिम समाजाचा विरोध होणार नाही.’ अशी भूमिका घेतली.

मंडळाने पुण्यातील हमाल भवनमध्ये कार्यकरिणी बैठकीत असा ठराव केली की, मुस्लिम सत्यशोधक मंडळास काही जातीयवादी शक्तींकडून होणारा विरोध मंडळाच्या नावाला नसून, मंडळाच्या भूमिकेला व कामाला आहे. नाव बदलल्यामुळे विरोध संपणार नाही, म्हणून मंडळाचे नाव न बदलता कार्य करण्यात यावे. हा विषय येथे मांडण्याचे कारण असे की, या ठरावामुळे विषय येथे संपला नव्हता, तर हाच विषय व विचार मंडळाच्या तिसऱ्या आणि चौथ्या दशकांत मध्यवर्ती राहिला. संघटनात्मक बांधणीवर त्याचा परिणाम होत राहिला. हमीदभाईंनी आपल्या हयातीत स्वतःची एक उंची गाठली, मंडळामार्फत विविध कार्यक्रम राबवले; त्यामुळे मंडळास प्रतिष्ठा मिळाली, पण हमीदभाईंना संघटनात्मक बांधणी करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही. आपल्यानंतर ही चळवळ कशी चालेल, याची काळजी त्यांना आजारपणात वाटत होती.

हुसेन दलवाई आणि हुसेन जमादार यांना मानधन देऊन त्यांनी पूर्ण वेळ कार्यकर्तें केले होते. मंडळाच्या जन्मानंतरच्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धातच आणखी एक महत्त्त्त्वपूर्ण बाब म्हणजे, प्रमुख कार्यकर्त्यांनी समांतर-स्वतंत्र संस्था-संघटना स्थापन करण्याचा मार्ग आरंभला. मंडळाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते असणारे हुसेन दलवाई यांनी ‘मुस्लिम समाजातील पुरोगाम्यांचे एखादे व्यासपीठ असावे’ या हेतूने ‘अंजुन तरस्की पसंद मुस्लिमीन’ स्थापन केले. या अंजुनच्या वतीने 15, 16 फेबु्रवारी 1986 रोजी मुस्लिम कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यात डॉ. इम्तियाज अहमद, डॉ. मोईन शाकीर, डॉ. राही मासू तसेच एस. एम. जोशी, डॉ.य.दि.फडके, प्रा.राम बापट, डॉ.बाबा आढाव, पन्नालाल सुराणा व इतर मान्यवरांना निमंत्रित केले होते.

या संघटनेच्या स्थापनेनंतर हुसेन दलवाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाकडे पाठ फिरवली. मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते हुसेन जमादार यांनी कोल्हापूर भागात मंडळाचे कार्य जोमाने केले. हे कार्य करीत असतानाच त्यांनी स्वतःचे ‘पुरोगामी मुस्लिम’ हे मासिक पत्र सुरू केले. मुस्लिम समाज प्रबोधन व शिक्षण संस्था स्थापन केली. तलाकपीडित महिलांचा भाजी-भाकर केंद्र उद्योग याच संस्थांतर्गत चालवला, तलाकपीडितांच्या मुलांचे वसतिगृह चालवण्याचा प्रयत्न केला. हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने चालवण्याऐवजी स्वतंत्रपणे चालवण्याचा विचार त्यांनी केला. फलटण येथे प्रा.वि.अ. शेख, प्रा.मोदी आणि इतर कार्यकर्ते होते. त्यांनी फलटण तालुका मुस्लिम समाज उन्नती प्रतिष्ठानची स्थापना 1988 मध्ये केली.

पुण्यात सय्यदभाईंनी मुस्लिम सत्यशोधक मंडळ चालवत असताना मंडळाच्या पुढाकारातून ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्समार्फत कार्य सुरू केले. राष्ट्रीय पातळीवरचे एक स्वतंत्र व्यासपीठ असावे, ही त्यामागची भूमिका होती. नंतर त्याची ‘प्रोग्रेसिव्ह मुस्लिम फोरम’ नावाने नोंदणी करण्यात आली. मेहरुन्निसा दलवाई यांनी ‘हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट’ स्थापन केली. ही संस्था मंडळाच्याच पुढाकारातून स्थापन झाली असली, तरी तिचे मंडळापासून वेगळे अस्तित्व टिकवण्यात आले. याची जन्मकथा स्वतंत्र आहे. एका अर्थाने हे प्रयोग म्हणजे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा विस्तार असे म्हणता येईल किंवा थोडा वेगळा विचार केला, तर मुस्लिम सत्यशोधकच्या प्रमुख आणि आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी हे प्रयोग केले, असेही म्हणता येईल.

तिसरा एक अर्थ काढता येऊ शकतो, तो म्हणजे- मंडळास एकत्रित व सामुदायिक नेतृत्व करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे असे घडले. असे असतानाही तिसऱ्या दशकात मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले. संघटनात्मक व सामाजिक आव्हाने आणि धर्मवादी राजकारणातून उभे राहिलेली आव्हाने पेलत असताना केलेला संघर्ष हा महत्त्वाचा टप्पा म्हणून पाहिला पाहिजे. मंडळामार्फत मुस्लिम समाजातील लेखक, कार्यकर्ते, कलाकार यांना हमीद दलवाईंच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचे निश्चित केले होते. त्याप्रमाणे मंडळाच्या तिसऱ्या दशकात साहित्यिक प्रा.फ.म. शहाजिंदे, न्या.ख्वाजा एहतेशाम देशमुख, संस्कृत पंडित गुलाम दस्तगीर बिरासदार, दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांसारख्या मान्यवरांना पुरस्कार देण्यात आला.

या पुरस्कार प्रदान कार्यक्रमात यदुनाथ थत्ते, नानासाहेब गोरे, डॉ.बाबा आढाव, भाई वैद्य, डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, कॉ.गोविंदराव पानसरे, विनायकराव कुलकर्णी आदी उपस्थित वक्ते म्हणून होते. 1995 नंतर काही वर्षे पुरस्कार हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वतीने देण्यात आला. पुण्यात दि. 4, 5 ऑगस्ट 1990 रोजी मंडळाच्या कार्यकर्त्यांसाठी हमाल भवन येथे बौध्दिक शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन डॉ. बाबा आढाव आणि विनायकराव कुलकर्णी यांनी केले. आंतरराष्ट्रीय मुस्लिम महिला संघटना, समान नागरी कायदा, पंजाब- काश्मीर समस्या, स्वातंत्र्य आंदोलनातील मुस्लिम सहभाग, जातीयवादाचे स्वरूप व समस्या या विषयांवर अनुक्रमे रझिया पटेल, डॉ.सत्यरंजन साठे, रा.प. नेने, ग.प्र. प्रधान, डॉ.रावसाहेब कसबे आणि भाई वैद्य यांनी मार्गदर्शन केले. 

मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या वतीने 1990 या वर्षांत ‘राष्ट्रीय एकात्मता सामाजिक सलोखा’ या विषयावर अनेक कार्यक्रम आयोजित केले. या काळात काश्मीरमध्ये विभाजनवादी प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात कार्यरत होत्या. भारतातील सर्वसामान्य मुसलमानांच्या दृष्टीने ही बाब चिंताजनक होती. पाकिस्तान या प्रवृत्तींना चिथावणी देत होता. धर्माच्या नावाने होत असलेल्या या कारवाया देश आणि समाजहितविरोधी असल्याने मंडळाने यासंदर्भात मेळावे व परिसंवाद आयोजित केले. शिवजयंती साजरी करून शिवरायांचा खरा इतिहास जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला. गंज पेठेत शिवजयंती, ईद मीलन कार्यक्रम घेतला. यामध्ये तत्कालीन महापौर अंकुश काकडे, मोहन धारिया, एस.ए. रहेान, बाबा आढाव, पुण्याचे पोलीस आयुक्त आणि मान्यवरांचा समावेश होता. टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे ‘राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर परिसंवाद आयोजित केला. यामध्ये निळू फुले, जब्बार पटेल, दिग्दर्शक सईद मिर्झा, विजय तेंडुलकर आदींनी भाग घेतला. याबरोबरच पुण्याच्या भारत इतिहास संशोधन मंडळाच्या सभागृहात ‘काश्मीर आणि राष्ट्रीय एकात्मता’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले, यामध्ये असगर अली इंजिनिअर, प्रा.सत्यरंजन साठे यांनी कलम 370 विषयी सखोल माहिती दिली. भारतातील धर्मवादी मुस्लिमांनी शाहबानो व सलमान रश्दी प्रकरणी ज्याप्रकारे शक्तिप्र्रदर्शन केले; तसे काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, तेथील पाकिस्तान पुरस्कृत कारवायांचा निषेध नोंदवण्यासाठी पुढे यावे, अशी भूमिका मंडळाने घेतली. या विषयावर डॉ.श्रीकांत परांजपे, राजेंद्र व्होरा, सुहास पळशीकर, डॉ.शांतीश्री पंडित, माधवराव गोडबोले आदींची व्याख्याने मंडळाने आयोजित केली.

मुस्लिम समाजाच्या प्रबोधनाचे प्रश्न जसे आहेत, तसे या समाजातील उन्नतीच्या मार्गात अडथळे आणणारे इतरही अनेक प्रश्न आहेत. व्यसनाधीनता हा सर्व समाजाला लागलेला शाप आहे. मुस्लिम समाज याला कसा अपवाद असणार? इस्लामला ‘नशा’ हराम आहे, पण अशा अनेक ‘हराम’ गोष्टी करण्यात हा समाज मागे राहत नाही. मंडळाची एक शाखा दांडेकर पूल येथे कार्यरत होती. लोकशाहीर गफूर शेख हे या शाखेचे काम पाहत. त्यांनी दांडेकर पुलाच्या वस्तीतील दारूच्या आहारी गेलेल्या बांधवांची नशामुक्ती केली. अशा व्यसनमुक्तांचा सत्कार मंडळाच्या तेविसाव्या वर्धापनदिनी आयोजित केला. सेवादलाच्या नाथ पै सभागृहात यावेळी नानासाहेब गोरे, डॉ.अनिल अवचट आणि मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनी म्हणजे दि. 3 मे 1992 रोजी मंडळाने शिवजयंती उत्सव साजरा केला. शिवचरित्रावर श्री.ना. कुलकर्णी यांचे ‘पिंपळ पानावरचे शिवचरित्र प्रदर्शन’ आयोजित केले. त्याचे उद्‌घाटन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी मा.अजितकुमार जैन यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी न्या.ख्वाजा एहतेशाम देशमुख होते. हा कार्यक्रम करवीरनगर वाचन मंदिर, कोल्हापूर येथे झाला. याच दिवशी रात्री नऊ वाजता राष्ट्रीय एकात्मतेवर कवीसंमेलन झाले. शाहू स्मारकातील या संमेलनाचे उद्‌घाटन दै. केसरीचे त्या वेळचे संपादक वासुदेव कुलकर्णी यांनी केले होते. दि. 25 ऑक्टोबर 1992 रोजी पुण्याच्या विद्यार्थी सहायक समितीत कार्यकर्त्यांसाठी राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन ज्येष्ठ गांधीवादी नेते आणि राष्ट्रीय एकात्मता समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांच्या हस्ते झाले.

शिबिरात धर्माच्या आधारे भारतातील मुस्लिमांना भडकावण्याचा प्रयत्न पाकिस्तान करीत असलेल्या गोष्टी निदर्शनास आणून, पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशातील भाजप सरकारचाही निषेध करण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांनी ‘महात्मा गांधींना आपण राष्ट्रपिता मानत नाही,’ असे वक्तव्य केले होते. तसेच ताजमहाल हे शिवमंदिर असल्याचे तेथील पाठ्यपुस्तकात म्हटले होते. अलाहाबाद-फैजाबाद या शहरांची नावे बदलण्याचा निर्णय घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न या सरकारमार्फत केला जात होता. या शिबिरात तेव्हाच्या राज्य महिला आयोगाच्या निमंत्रक नीलमताई गोऱ्हे तसेच मेहरुन्निसा दलवाई, सय्यदभाई, हुसेन जमादार, प्रा.बेग, नाईक प्रा. तांबोळी, इचलकरंजीच्या नगरसेविका मुताज मुल्ला, गाझिउद्दीन सलाती, रझिया पटेल, रशिद शेख यांनी विचार मांडले. शिबिराचा समारोप यदुनाथ थत्ते यांनी केला.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्य राष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरस’च्या वतीने दि. 30- 31 मे 1992 रोजी पुण्यात भारत इंग्लिश स्कूल येथे पाचवी राष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली. या परिषदेचे उद्‌घाटन तमिळनाडू येथील विचारवंत प्रा.आय. नाझनीन यांनी शाहबानोच्या प्रतिमेस हार घालून केले. या परिषदेस दिल्लीहून डॉ. के.एस. दुराणी, मदुराईच्या ॲड. हाफिजा, गुजरातचे अब्दुलभाई वकाणी, मुताज बेगम, शाहीद कमाल उपस्थित होते. बाबा आढाव, शांतिलाल मुथा, भाई वैद्य, सत्यरंजन साठे, विद्या बाळ यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी महिला प्रश्न, अयोध्या विवाद, राष्ट्रीय एकात्मता, मुस्लिम समाजाचे शैक्षणिक-आर्थिक प्रश्न यांवर विचार मांडले. 

भारतीय समाजात राम मंदिर-बाबरी मस्जिद विषयाला धरून मोठ्या प्रमाणात धार्मिक व्देष आणि ध्रुवीकरणाचे कार्यक्रम आखले जात होते. हा वाद न्यायप्रविष्ट असतानाही भाजप, विश्व हिंदू परिषद, शिवसेना, बजरंग दल व इतर संघटनांनी हा प्रश्न हिंदूंच्या अस्मितेचा बनवला. लालकृष्ण आडवाणींनी 1990 मध्ये सोनाथपासून रथयात्रा काढली होती- या यात्रेतील घोषणा होती ‘अयोध्या एक झाँकी है, काशी- मथुरा बाकी है!’ यावेळी म्हणजे 1991 मध्ये संसदेने एक कायदा केला; ज्यात विविध धर्मांच्या प्रार्थनास्थळांची स्थिती 15 ऑगस्ट 1947 रोजी जशी होती, तशीच जपली जातील. मात्र हिंदुत्ववादी मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी म्हणजे 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत मोठ्या संख्येने जमून बाबरी मशीद उध्वस्त केली. देश व परदेशातून यावर तीव्र संताप, खेद, रोष व्यक्त करण्यात आला. देशात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले. या सर्व परिस्थितीत धार्मिक वातावरण पुन्हा तापले. धार्मिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता या गोष्टी धर्मवाद्यांनी वेठीस धरल्या. मंडळाच्या दृष्टीने हे मोठे आव्हान होते.

समाज प्रबोधनाचा विषय मागे पडत होता- धार्मिक अस्मितेच्या राजकारणाने देश हिंसकपणा व अशांतता अनुभवत होता. भीती आणि असुरक्षिततेच्या वातावरणात धर्मनिरपेक्षतावादी संभ्रात पडले. यावर उपाय शोधणे आवश्यक होते. दि. 16 जानेवारी 1993 रोजी मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने पुण्यात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ‘राष्ट्रापुढील आव्हाने’ या विषयावर कायदेतज्ज्ञ डॉ. सत्यरंजन साठे यांचे बीजभाषण झाले. सर्वसामान्य मुस्लिम समाज आणि मुस्लिम नेते यात फरक आहे, हे नमूद करून देशाच्या एकात्मतेला, राष्ट्रीयत्वाच्या कल्पनेला व राज्यघटनेलाच कशा प्रकारे धोके आहेत, हे या सत्रात मांडण्यात आले.

प्रा.एच.एम. शेख, फादर बेर्टी, महापौर शांतिलाल सुरतवाला यांनी तसेच मंडळाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी यात भाग घेतला. मुस्लिम महिलांचे प्रश्न, धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादासमोरील आव्हाने आणि मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाचे विषय ऐरणीवर असताना राजकीय पातळीवरील हतबलता स्पष्टपणे दिसत होती. मुस्लिम सत्यशोधक मंडळ, मुस्लिम समाज शिक्षण व प्रबोधन संस्था, प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स हे महाराष्ट्राच्या विविध भागांत मेळावे, निवेदने, चर्चासत्रांचे आणि अभ्यास शिबिराचे उपक्रम राबवून लोकशिक्षणाचे कार्य करीत होते. या प्रयत्नात राम मंदिराचा मुद्दा घेऊन हिंदुत्ववादी शक्ती आक्रमक होऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावर तोडगा काढण्यासाठी मंडळाच्या पुढाकारातून 1993 मध्ये ‘मंदिर-मस्जिद सुलाह कमिटी’ची स्थापना करण्यात आली.

मुस्लिम समाजाने बहुसंख्य हिंदूंच्या भावना विचारात घेऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी मुस्लिमांनी वादग्रस्त जागेवरील आपला हक्क सोडावा आणि हिंदुत्ववाद्यांनी यानंतर धार्मिक स्थळांच्या जागेवरून वाद निर्माण करू नये, संसदेने 1991 मध्ये धार्मिक स्थळांची 15 ऑगस्ट 1947 रोजी असलेली स्थिती ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी केलेल्या कायद्याचा सन्मान राखावा, धार्मिक गटांत सद्‌भाव निर्माण करून देशाची एकात्मता जपावी- हे मुद्दे घेऊन दोन्ही समाजांतील धर्मवादी संघटनांशी संवाद करण्याचे ठरवण्यात आले. यासाठी राष्ट्रीय पातळीवरील परिषद घेण्याचे ठरविले. या परिषदेत बॅ.वि.म. तारकुंडे, ॲड.सी.आर. दळवी, देवदत्त दाभोलकर, निळू फुले, रा.प. नेने, ताहेर पूनावाला, प्रा.कुलसु पारेख, मा.आय. नाझनीन, मोहम्मद मुस्तफा (कालिकत), अब्दुल लतीफ आझमी हे सदस्य होते; तर सय्यदभाई- अध्यक्ष श्रीराम लागू- उपाध्यक्ष आणि हुसेन जमादार हे सचिव म्हणून कार्य करणार होते.

या समितीमार्फत काही बैठका झाल्या. हिंदुत्ववादी गटांशी चर्चा झाली. मात्र कोणतेही ठोस आश्वासन मिळाले नाही. कालांतराने ही कमिटी शांत झाली. काही महिन्यांनी सय्यदभाई आणि हिंदुत्ववादी विचारवंत स.ह. देशपांडे यांनी व्यक्तिगत पत्रक काढून या विषयावर आवाहन केले. मात्र मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते व पुरोगामी कार्यकर्ते या पत्रकातील तर्कविसंगत आवाहनांवर नाराज झाले. अशा प्रकारे मंदिर- मस्जिद वाद मिटवणे हे मंडळाच्या शक्तीबाहेर होते. त्याला अनेक मर्यादा होत्या. सुलाह कमिटीतील सदस्यांनाही हा आवाक्याबाहेरचा विषय हाताळता येणार नाही, याचा साक्षात्कार झाला. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांध्ये एक प्रकारची असहायता निर्माण झाली होती. मंडळाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दि. 21 मार्च 1993 रोजी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा आणि कार्यकारिणीची बैठक मेहरुन्निसा दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली वि.स. खांडेकर प्रशाला- कोल्हापूर येथे आयोजित केली. यात मंडळाने प्राप्त परिस्थितीत कोणती भूमिका घ्यावी, याबद्दल चर्चा झाली.

हमीद दलवाई स्मृतिदिनानिमित्त देण्यात येणारा हमीद दलवाई पुरस्कार महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे शब्बीरभाई शेख यांना मुंबईत प्रा.मे.पु. रेगे यांच्या हस्ते देण्यात आला. या कार्यक्रमात न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी प्रमुख पाहुणे होते. दि. 16 ऑगस्ट 1993 रोजी मंडळ आणि सर्वोदय मंडळाच्या वतीने राज्यस्तरीय सांप्रदायिक सद्‌भावना परिषदेचे आयोजन कोल्हापूर येथे करण्यात आले. दि. 26, 27 फेबु्रवारी 1994 रोजी कोल्हापूर येथे शाहू स्मारक भवनात मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे भावी ध्येय- धोरण या विषयावर वैचारिक सेंलन आयोजित केले. मेहरुन्निसा दलवाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या संमेलनात मंडळाचे प्रा. आय. एन. बेग, एम. ए. नाईक, प्रा.बी.टी. काझी, प्रा. शमसुद्दीन तांबोळी, अन्वर राजन, प्रा.वि. अ. शेख यांनी भूमिका मांडल्या.

दि.3 मे 1994 रोजी हमीद दलवाई पुरस्कार साहित्यिक प्रा.फ.म. शहाजिंदे यांना देण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे होते निखिल वागळे. अध्यक्षस्थानी दया पवार असलेला हा कार्यक्रम मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात झाला. दि. 4 मे 1994 रोजी मेहरुन्निसा दलवाई यांच्या नित्यानंदनगर, अंधेरी येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांसाठी एक दिवसाचे चर्चासत्र आयोजित केले. दि. 26,27 मार्च 1994 रोजी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठीकीत प्रा.बी.टी. काझी यांनी संघटनात्मक कार्यपध्दतीवर भाष्य केले होते. हीच चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशाने हे चर्चासत्र होते. यात विचारवंत वसंत पळशीकरांनी मार्गदर्शन केले.

दि. 21 ऑगस्ट 1994 ला मेहरुन्निसा दलवाई यांच्या निवासस्थानी, पुलगेट येथे कार्याध्यक्ष दलवाईभाभी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यात मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षातील कार्यक्रम, राष्ट्रवाद या विषयावर मंडळाची भूमिका, आर्थिक प्रश्नावर चर्चा करण्यात आली. दि.10-11 सप्टेंबर 1994 रोजी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट येथे ऑल इंडिया प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्सच्या वतीने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यात असगरअली इंजिनिअर यांचे बीजभाषण झाले. न्या. दाऊद, प्रा.शहाजिंदे, प्रा. इम्तियाज अहमद, जावेद आनंद, प्रा. कुलसुम पारेख आणि समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित उपस्थित होते. 

दि. 6 ऑक्टोबर 1994 रोजी प्रा.बाबासाहेब काझी यांनी कोल्हापूर विद्यापीठात पीएच.डी.साठी मुस्लिम सत्यशोधक मंडळावर प्रबंध सादर केला होता. प्रबंधास मान्यता देण्यासाठी समाजशास्त्र विभागात मुलाखत होती. यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. प्रबंधात मंडळाची कार्यध्दती व वैचारिक अधिष्ठानावरील मर्यादा दाखवण्यात आल्यानंतर झालेल्या कार्यकारिणी बैठकीत कार्यक्रम ठरवण्यात आले. अध्यक्षस्थानी मेहरुन्निसा दलवाई होत्या. या बैठकीत ठरवण्यात आले की, दि.24, 25 डिसेंबर 1994 रोजी पुण्यात तलाकपीडित महिला परिषद, 23 फेबु्रवारी 1995 ला मुस्लिम सामाजिक परिषद मुंबईत, तर दि.22 मार्च 1995 ला हमीद दलवाई संशोधन संस्था स्थापन करणे. दि.3 व 4 मे 1995 रोजी कोल्हापूर येथे शिक्षण परिषद घेणे. मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वरीलप्रमाणे कार्यक्रम आयोजित केले. याच दशकात हुसेन जमादार यांचे ‘जिहाद’ आणि दलवाई भाभींचे ‘मी भरून पावले आहे’ हे आत्मकथन प्रकाशित झाले. हमीदभाईंच्या मृत्युपत्रात त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली होती की- इस्लामचा सर्वांगीण दृष्टीने अभ्यास करता यावा, जगातील इस्लामच्या घडामोडींवर संशोधन व्हावे, एक सुसज्ज ग्रंथालय असावे; यासाठी एक संशोधन संस्था उभाण्यात यावी. मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात या संस्थेचे बीजारोपण झाले.

दि.22 मार्च 1995 रोजी हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूटची स्थापना प्रा.फ.म. शहाजिंदे यांच्या हस्ते आणि मे.पुं. रेगे, प्रा.कुलसु पारेख यांच्या उपस्थितीत झाली. याप्रसंगी विनायकराव कुलकर्णी, ग.प्र.प्रधान यांनी मनोगत व्यक्त केले. प्रधानसरांनी आपल्या बहिणीच्या स्मृतिप्रीत्यर्थ दोन हजार रुपयांची देणगी दिली. तसेच मंदाकिनी किर्लोस्कर, विजूभाई देसाई यांनीही प्रत्येकी एक हजार रुपयांची देणगी दिली. मुस्लिम समाजात प्रबोधन व्हावे, त्यांची उन्नती व्हावी, दलवाईंच्या कामात हातभार लागावा, अशी इच्छा बाळगणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. साहित्यिक दिलीप पु.चित्रे, भाई वैद्य यांनी या संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहिले. संस्थेार्फत महाराष्ट्रातील विविध भागांत चर्चासत्रे, व्याख्याने, स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले. नंतरच्या काळात हमीद दलवाई स्मृतिपुरस्कार इन्स्टिट्यूटमार्फत देण्यात आले.

आज या संस्थेनेही रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. मेहरुन्निसा दलवाई यांनी पुण्यातील कृष्णकुंज सोसायटी, पुलगेट येथील घराची जागा संस्थेच्या वापरासाठी दिली. काश्मीरमधील पाकपुरस्कृत अवैध कारवाया आणि भारतातील आक्रमक हिंदुत्ववाद ऐरणीवर असताना दि.11 मे 1995 रोजी काश्मीरमधील प्रसिध्द ‘चरार-ए-शरीफ दर्गा’ बेचिराख करण्यात आला. हिंदू-मुस्लिम बंधुभावाचे दर्शन घडवणाऱ्या दर्गासंस्कृतीवर आघात करून देशातील सलोखा बिघडवणाऱ्या या घटना मंडळासाठी अस्वस्थ करणाऱ्या होत्या. मंडळाने 1995-96 या वर्षात दहशतवादविरोधी भूमिका घेऊन देशातील एकात्मता आणि सुसंवाद अबाधित राहावा, म्हणून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. मंडळाच्या 27 व्या वर्धापनदिनी म्हणजे 22 मार्च 1997 रोजी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार स.मा. गर्गे यांनी मुस्लिम राष्ट्रांमधील प्रगत कायद्याचा आढावा घेऊन भारतातील मुस्लिम समाजप्रबोधनाच्या मंदगतीवर भाष्य केले. यात प्रा.विलास चाफेकर, प्रा.तेज निवळीकर, निर्मलाताई पुरंदरे तसेच मुस्लिम कार्यकर्ते आणि समुपदेशकांनी सहभाग घेतला.

मंडळाच्या आरंभीच्या काळापासून अध्यक्ष असणारे बाबूमियाँ बँडवाले यांचा 15 ऑगस्ट 1997 रोजी स्वातंत्र्याच्या सुवर्णहोत्सवानिमित्त शासनातर्फे सत्कार करण्यात आला. तत्कालीन तहसीलदारांनी त्यांच्या श्रीगोंदा येथील घरी जाऊन हा सत्कार केला. वृध्दापकाळामुळे बाबूमियाँची तब्येत नाजूक होती. मंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी जवळपास वीस वर्षे सांभाळली. दि.8 डिसेंबर 1997 रोजी बाबूमियाँ बँडवाले यांचे निधन झाले. चारित्र्यसंपन्न, गांधीवादी आणि नि:स्वार्थ बँडवाले यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात ऐतिहासिक भूमिका बजावली. आपल्या व्यक्तिगत व सामाजिक जीवनात प्रागतिक वर्तनाची अनेक उदाहरणे त्यांनी घालून दिली होती. मंडळाचे तिसरे दशक अनेक आव्हानांनी भरलेले, मंडळाची वाढ व विकासात योगदान देणारे, तसेच चळवळीतील नेत्यांनी व्यक्तिकेंद्रित होऊन मुस्लिम समाज शिक्षण व प्रबोधन संस्था, प्रोग्रेसिव्ह मुस्लिम कॉन्फरन्स, हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च इन्स्टिट्यूट अशा संस्थांमार्फत कार्यक्रम चालवले. मंडळाच्या ध्येय-धोरणास अनुरूप अशा या संस्था मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून कार्यरत झाल्या. मुस्लिम आणि हिंदू समाजातील जमातवादी, दहशतवादी कारवायांचा निषेध करीत, त्यावर प्रतिक्रिया देण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करीत, जमेल त्या पध्दतीने समाजप्रबोधनाचा विषय हाताळत मंडळाने तिसरे दशक पूर्ण केले.

हेही वाचा :

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी यांनी मंडळाच्या अर्धशतकी वाटचालीचा घेतलेला मागोवा 

Tags: शमसुद्दीन तांबोळी एमएस एम मुस्लीम सत्यशोधक मंडळ हमीद दलवाई shamsuddin tamboli hamid dalwai msm muslim satyashodhak mandal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शमसुद्दीन तांबोळी,  पुणे
tambolimm@rediffmail.com

अध्यक्ष, मुस्लिम सत्यशोधक मंडळ
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके