डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नांगरांचा हंगाम ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर. बाकीचे सात महिने कारखान्याला काय काय द्यायचे? त्यासाठी बिडाचे नक्षीदार कठडे, आराम बाक, खलबत्ते, लोखंडी खाटा असा विविध प्रकारचा माल करायचा व जाहिरात द्यायची. गंमत अशी की, अशा जाहिरातींमुळे जवळच्याच नव्हे, तर दूरदूरच्या भागातून ऑर्डरी मिळायच्या. बिडाच्या पायाचे ‘आराम बाक’ ही अशी काय मोठीशी वस्तू! पण असल्या बाकासाठी कराचीहून ऑर्डरी आल्या. याचा अर्थ इतकाच की, लोकांजवळ पैसा असतो; त्यांना तुमचा माल हवासा वाटेल असे करा म्हणजे झाले. मग तुमचा धंदा कसा चालेल ही काळजी नको. हा विषय निघाला म्हणजे काकांच्या तोंडून त्यांचे एक आवडते वाक्य ऐकायला मिळे. ते म्हणत, ‘‘ओरडणाऱ्याची बोरे खपतात, पण न ओरडणाऱ्याचे आंबेही खपत नाहीत.’’ किती खरा आहे हा सिद्धांत!

दर मंगळवारच्या केसरीत आमच्या नांगराची जी जाहिरात द्यायची ती नवी असली पाहिजे हा काकांचा (लक्ष्मणरावांचा) कटाक्ष.त्यांच्या आडाख्यांपैकी हा एक आडाखा होता. पण आमचे हे तत्त्व ‘केसरी’च्या संपादकांना मानवायचे नाही. आमची जाहिरात ते परत करीत. शेवटी तात्यासाहेब केळकरांपर्यंत तक्रार नेल्यावर ती एकदाची पूर झाली.

ते सर्व ठीक झाले तरी दर आठवड्याला जाहिराती करिता नव्या कल्पना काढायच्या, हे काय वाटते तितके सोपे नाही.तेवढ्यासाठी त्याचे तंत्र अवगत करून घ्यावे लागले. जाहिरात शास्त्राची एक चतु:सूत्री आहे- ॲट्रॅक्ट (लक्ष वेधा), इंटरेस्ट (मनगुंतवा), कन्‌व्हिन्स (खात्री करा), क्लिंच (चीत करा)- या चार पायऱ्या लक्षात ठेवून मी जाहिराती तयार करी. या मजकुरा बरोबर त्या जाहिरातीला साजेशी मांडणीही (ले-आऊट) करण्यात येई. या कामातील माझा मोठा मार्गदर्शक म्हणजे विलायती मासिकांतून येणाऱ्या जाहिराती. त्यांच्यावरूनही मला नव्या कल्पना सुचत.

अशा जाहिराती परिणामकारक झाल्या शिवाय कशा राहतील. त्या जाहिराती वाचून अधिक चौकशी करणारी पत्रे येत. या चौकश्यांचे प्रत्यक्ष मागण्यां मध्ये रूपांतर करणे, हे दुसरे काम. त्यासाठी देखील आधुनिक तंत्राचा आम्ही उपयोग करीत असू. ही पाठलाग पद्धती (फॉलो-अप-मेथड) पत्रव्यवहारात वापरल्याने मागण्या मिळवण्याचे काम सुलभ होई. एका पत्राने काय झाले नाहीतर दुसरे, दुसऱ्याने झाले नाही तर तिसरे‐ अशी सात-आठ पत्रे गेल्यावर, ग्राहकांच्या आळसाने बेफिकीरपणाने अथवा अविश्वासने ज्या मागण्या मिळू शकल्या नसत्या त्या सर्व हस्तगत होत. ‘फिरून यत्न करून पहा’ या धड्यातील कोळ्याप्रमाणे आमचा हा पाठलाग चाले. आणि त्यामुळे अशा प्रकारे ऑर्डरी मिळविण्याचा आनंद काही निराळाच असे!

नांगरांचा हंगाम ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर. बाकीचे सात महिने कारखान्याला काय काय द्यायचे? त्यासाठी बिडाचे नक्षीदार कठडे, आराम बाक, खलबत्ते, लोखंडी खाटा असा विविध प्रकारचा माल करायचा व जाहिरात द्यायची. गंमत अशी की, अशा जाहिरातींमुळे जवळच्याच नव्हे, तर दूरदूरच्या भागातून ऑर्डरी मिळायच्या. बिडाच्या पायाचे ‘आराम बाक’ ही अशी काय मोठीशी वस्तू! पण असल्या बाकासाठी कराचीहून ऑर्डरी आल्या. याचा अर्थ इतकाच की, लोकांजवळ पैसा असतो; त्यांना तुमचा माल हवासा वाटेल असे करा म्हणजे झाले. मग तुमचा धंदा कसा चालेल ही काळजी नको. हा विषय निघाला म्हणजे काकांच्या तोंडून त्यांचे एक आवडते वाक्य ऐकायला मिळे. ते म्हणत, ‘‘ओरडणाऱ्याची बोरे खपतात, पण न ओरडणाऱ्याचे आंबेही खपत नाहीत.’’ किती खरा आहे हा सिद्धांत!

आमच्या कारखान्याचा व मालाचा बोलबाला असा हळूहळू वाढत चालला असला तरी, त्याला ओळखण्यासाठी एखादे खास चिन्ह अथवा शिक्का त्यावर असणे जरूर होते. चांदीचा एखादा गोल तुकडा काही कमी किंमतीचा नसतो, पण त्यावर शिक्का बसलाकी त्याला सर्वमान्यता प्राप्त होते. कोणत्याही मालाला हा नियम लागू पडतो. एवढ्यासाठी आमच्या मालावर घालण्यासाठी विशिष्ट वळणाचे, सर्वपरिचित झालेले ‘किर्लोस्कर’ हे नाव हाताने इंग्रजीत काढून ते आम्ही रजिस्टर केले!

(कै. शंकरराव किर्लोस्कर यांचे ‘शंवाकीय’ हे आत्मचरित्र 1974 साली प्रसिद्ध झाले. त्यातील ‘किर्लोस्करवाडीतील प्रारंभीचे दिवस’ या प्रकरणातून...)

Tags: किर्लोस्करवाडीतील प्रारंभीचे दिवस आत्मचरित्र शंवाकीय shankarrao kiraloskar शंकरराव किर्लोस्कर jahirat prabhavi honyasathi shavankiya he atmacharitra udyog ani vyapar जाहिरात प्रभावी होण्यासाठी... उद्योग आणि व्यापार weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शंकर वासुदेव किर्लोस्कर

किर्लोस्कर मासिकाचे संस्थापक-संपादक, लेखक व व्यंगचित्रकार
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या

लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके