डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

मराठी कादंबरीविश्वाची उंची वाढवायची असेल, तर आत्मकथनात्मक आशयाच्या लेखनाला थोडीशी बगल देऊन मराठी माणसाच्या जगण्यातील विविध संदर्भ कवेत घेता आले पाहिजेत. त्याचे वर्तुळ वाढले पाहिजे. या दृष्टीने ‘तसनस’ ही कादंबरी पुढे गेलेली आहे. चाकोरीबद्ध लेखनाला फाटा देऊन कादंबरीचा नायकच ‘चळवळ’- ही मध्यवर्ती कल्पना ठेवून वाचकांच्या पुढे आलेल्या या कादंबरीने कमालीची उंची गाठलेली आहे. आसाराम लोमटे यांची ही पहिलीच कादंबरी असूनही पहिलेपणाचे कोणतेही लक्षण यात दिसून येत नाही, हेही तितकेच खरे आहे. उलट, त्यांच्या ‘कथा’लेखनाच्या गुणवत्तेची पुढील पायरी या कादंबरीने गाठली आहे, असे म्हणता येते.

कधी कधी एखाद्या लेखकाची एखादी उच्च दर्जाची कलाकृती नावाजल्यानंतर तितक्याच उच्च दर्जाची किंवा त्यापेक्षा एक पाऊल पुढे जाणारी लेखनकृती त्याच्याकडून जन्मास येतेच, असे नाही. उलट बहुतांश वेळी तर त्या लेखकाने पुढे कितीही लेखन केले तरी ‘त्या’ एकाच कलाकृतीने त्याला ओळखले जाते. ही मर्यादा त्याच्या अनुभवक्षेत्राच्या चौकटीमुळे उद्‌भवते. काही अपवादात्मक लेखक आपल्या विविधांगी अनुभवक्षेत्रामुळे हा शिक्का पुसून टाकतात आणि त्यांचे पुढील लेखन पूर्वीच्या लेखनाच्या तुलनेत वेगळे अनुभवविश्व घेऊन वाचकांच्या समोर येते. अशा वेळी लेखकाविषयी व लेखनकृतीविषयी वाचक, अभ्यासक, समीक्षक यांना जीवनातील नव्या अनुभव-विश्वाचे आकलन घडते. हे अनुभवविश्व प्रत्येक वेळी नव्याने मांडणारे मोजकेच लेखक मराठी साहित्यात आहेत. त्यातील नव्या पिढीतील एक दमदार नाव म्हणजे आसाराम लोमटे.

‘इडा पीडा टळो’ व ‘आलोक’ हे कथासंग्रह आणि ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह या लेखनकृतींनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले आणि साहित्यातील अत्यंत सन्मानाच्या साहित्य अकादमी या पुरस्काराने सन्मानित झालेले आसाराम लोमटे आपल्या ‘तसनस’ या नव्या कादंबरीद्वारे वाचकांच्या भेटीला आले आहेत. मुळात त्यांच्या कथाही लघुकादंबरीच्या जवळ जाणाऱ्या आहेत. एखाद्या प्रसंगाभोवती रिंगण घालणाऱ्या त्यांच्या कथा नाहीत. त्यांच्या कथा वाचताना बाबूराव बागुल यांची ‘मैदानातील माणसं’ या कथेची प्रकर्षाने आठवण येते. एकच मुख्य पात्र, एखादी मोठी घटना हा आकृतिबंध त्यांच्या लेखनाचा कधीही नव्हता. हीच परंपरा त्यांच्या कादंबरीतही घडली आहे.  या कादंबरीत एखादा मुख्य नायक किंवा नायिका नाही. प्रारंभ, मध्य व शेवट नाही. ओढून-ताणून केलेले लेखनाचे नवे प्रयोग नाहीत. भाषेची तोडमोड नाही. कल्पनेने उभे केलेला खोटा इतिहास नाही किंवा लेखकाच्या लेखनकृतीने भावना दुखावल्या म्हणून मोर्चे, निवेदन, निषेध घडून आणण्यासारखी सनसनाटी विधानेही यामध्ये नाहीत. पण जे काही आहे ते वाचकांच्या मनाला विचार करायला भाग पाडणारे, मेंदूला हलवून सोडणारे आणि काही काळासाठी कादंबरीतील पात्रांसारखे निराश व हतबल होऊन गंभीर चिंतन करणारे भावविश्व या कादंबरीत आहे.

कथानक, पात्र, वातावरण, निवेदनशैली, लेखकाचा दृष्टिकोन, आकृतिबंध... इत्यादी कसोट्या ढोबळमानाने कादंबरी या साहित्यप्रकाराचे मूल्यमापन करणाऱ्या आहेत. पण हेच मापदंड सगळ्या साहित्यकृतींना लागू पडत नाहीत. कथानक म्हटले की साधारणपणे ज्यास आपण ‘कथा’ म्हणतो, त्या पद्धतीने सुरुवात ते शेवट असा प्रसंगाचा धागा असतो, पण ही कल्पनाही या कादंबरीने बाद केली आहे. या कादंबरीत कथानक आहे, पण रूढ अर्थाने  म्हणतो तसे सलग नाही. वेगवेगळ्या क्षेत्रांतील समाजातील गंभीर प्रश्न सोडविणाऱ्या चळवळीच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांची ही कहाणी आहे. सगळे कार्यकर्ते धाडसी, शूरवीर, पराक्रमी, नीतिमान असले तरी हिंदी चित्रपटासारखे अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देऊन गोड शेवट करणाऱ्या नायकासारखे नाहीत. पण भूमिका घेऊन जगणारी, आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहणारी आणि भविष्यात हा धागा पुढे घेऊन जाणारी पिढी जन्मास येईल अशी आशा बाळगणारे नायक-नायिका आहेत. लग्न न करता शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वतःला वाहून घेतलेला नारायण माधव चिलवंत ऊर्फ नामा असेल, नामाचा मित्र व आमदाराचा नातलग असूनही त्याच्या विरोधात उभा राहणारा राम तांगडे असेल, शेती नसतानाही शेतकऱ्यांकरता आम्ही लढतो असा पुळका दाखवणारा सखाराम धानोरकर हा ढोंगी नेता असेल, शेतकरी संघर्ष समितीचा संस्थापक असलेले पण आपला वारस जाहीर न करताच ही चळवळ डोळ्यांसमोर नष्ट होतांना त्याकडे निर्विकारपणे पाहणारे भाऊसाहेब महाजन असेल...

शेतीप्रश्नासोबतच शेतमजूर-कामगारांचे प्रश्नही तितकेच महत्त्वाचे आहेत, म्हणून त्याकरता जीवाची पर्वा न करता लढणारा कॉम्रेड रुस्तुम सत्त्वधर असेल, कीर्तन-प्रवचन सोडून महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणारी त्रिवेणीबाई नंद असेल, शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे उत्तर पुरुषांच्या नसबंदीत दडलेले आहे आणि ते केले पाहिजे- असे सांगणारी अविवाहित कांचन थोरात असेल...

सत्ता-पैशामुळे कोणतेही प्रश्न सोडविता येतात आणि सत्तेची सूत्रे नेहमीच आपल्या हातात असली पाहिजेत, ही भूमिका ठेवून जगणारा आमदार बदामराव दौलतराव अस्वले असेल, शेतकरी  चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाल्यावर पैसे न घेता त्यांचे प्रश्न सोडविणारे व वेळप्रसंगी महत्त्वाचे मार्गदर्शन उपदेश करणारे क्षीरसागर वकील असेल, गावातील मंत्र्यांची सभा उधळून लावणारा भास्कर लुंगारे असेल, आपली शेती मिळविण्यासाठी दोन डोळे गमावलेला पण न घाबरता संघर्षाला तोंड देणारा नारायण धुळे असेल...

आमदाराचा चमचा बाळू शिंदे असेल, कुठलाही गुन्हा अंगावर न घेता वृत्तपत्रात आपले नाव आले पाहिजे व चळवळीत आपण काम करतो हे दाखवण्यासाठी धडपडणारा भालचंद पोखरदास असेल, शेतीप्रश्नाची जाण असलेला पण शेतीप्रश्नावर कविता लिहिणारा शशांक धानोरकर असेल...

ही सगळी पात्रे समाजजीवनातील वेगवेगळे अनुभवविश्व घेऊन वाचकासमोर उभी राहतात. यातील काही नीतिमान, तत्त्वशील भूमिका घेऊन जगणारे नायक-नायिका आहेत तर काही ढोंगी, मतलबी, कपटकारस्थान करणारे खलनायकही आहेत. चळवळीकरता जीवाची पर्वा न करता तुरुंगात जाणारी काही पात्रे आहेत, तर अंगावर साधा ओरखडा न येता समाजसुधारक म्हणून मिरवणारीही काही पात्रे आहेत. त्यामुळे आपल्या भोवताली दिसणाऱ्या वेगवेगळ्या वृत्ती-प्रवृत्तींची प्रातिनिधिक स्वरूपातली चित्रे आहेत.

नामा, राम, भास्कर, त्रिवेणीबाई व कॉम्रेड रुस्तुम ही या कादंबरीतील मुख्य पात्रे आहेत; पण प्रत्येकाचा मार्ग वेगळा आहे, प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. कादंबरीचे थोडक्यात कथानक असे आहे-

राम, नामा, भास्कर ही तरुण मित्रमंडळी शेत मालाला रास्त भाव मिळावा म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतात. वेळप्रसंगी तुरुंगात जाणे, लाठीमार खाणे, मंत्र्याच्या सभा उधळून लावणे, शेतकरी अधिवेशन भरवणे अशी कामे अतिशय निष्ठेने करतात. परंतु या शेतकरी आंदोलनात सखाराम, भागचंद, शशांक यांच्यासारख्या मतलबी व संधिसाधू माणसांनी प्रवेश केल्याने या चळवळीची दिशा बदलते. या मंडळींकडून प्रामाणिक काम करणाऱ्या शेतकरी संघर्षचे प्रदेशाध्यक्ष लक्ष्मण निरस यांनाच एका सभेत धक्काबुक्की केली जाते. या बदलत्या, निराश करणाऱ्या घटनेमुळे नामा व मित्रमंडळी या सक्रिय चळवळीतून हळूहळू बाहेर फेकली जातात. त्यांच्या चळवळीविषयी व प्रामाणिकपणाविषयी आस्था बाळगणाऱ्या समविचारी काही चळवळी-संघटना आहेत. विशेषतः त्रिवेणीबाई यांचा महिला संघ किंवा रुस्तम सत्त्त्त्वधर यांची कामगार चळवळ. या बदललेल्या व्यवस्थेविषयी त्यांनाही वाईट वाटते, तरीही नामा आशावादी आहे. कादंबरीच्या शेवटी त्याची भूमिका अशी आहे, ‘सगळं वाया गेलंय असंही वाटत नाही. वाटतं- एवढी वर्षे जे काम केलंय ते तण उपटून काढायचंच  होतं, राब भाजण्याचंच होतं. आता पेरायचं काम पुढच्यांनी करावं, त्याचीच मी वाट पाहतोय. अजून तरी माझ्यातलं कुतूहल मेलेलं नाही.’ (पृ.287) याचा अर्थ शेतकऱ्यांच्या समस्येला कारणीभूत ठरणाऱ्या ‘तणा’ला  बाहेर काढण्यासाठी आयुष्यभर चळवळ करणाऱ्या पण शेवटी वाट्याला राखरांगोळी, ‘तसनस’ आलेल्या कार्यकर्त्याची ही कहाणी आहे.

शब्द पब्लिकेशन, मुंबईने आकर्षक पुठ्ठाबांधणी रूपात प्रकाशित केलेली 287 पृष्ठांची कादंबरी पंचवीस प्रकरणांत विभागलेली आहे. या सर्व प्रकरणांचा धागा सलग नसला तरी अन्यायाच्या विरोधात लढण्याची कार्यकर्त्यांची प्रामाणिक तळमळ हीच या कादंबरीची मध्यवर्ती कल्पना आहे. या तरुणांच्या वाटा मळवाटा नाहीत. म्हणून लेखकाने ज्यांनी आयुष्यात मळवाटा नाकारल्या... अशांनाच ही कादंबरी अर्पण केलेली आहे. काही प्रकरणांच्या प्रारंभी गडद अक्षरांत सुविचार स्वरूपात केलेली मांडणी कादंबरीच्या तात्त्विक विचारसरणीची उंची वाढविणारी आहे. प्रत्यक्ष चळवळ करणारे आपला इतिहास लिहीत नाहीत आणि लिहिणारे चळवळीत येत नाहीत. या विषयाचे भाष्य सतराव्या प्रकरणाच्या प्रारंभी पुढीलप्रमाणे येते : ‘एक इतिहास असतो पुस्तकाच्या पानांत दडलेला. दुसरा इतिहास सांगितला जातो अगणित जिभांमधून पिढ्यान्‌पिढ्या... पण अशा इतिहासातले कैक श्वास विरतात हवेतच, तर कधी मिसळली जाते त्यात सांगणाऱ्याची नियत. तुम्ही इतिहास घडवता, पण लिहीत नाही. हळूहळू मग तुमची जागा घेतात तुमची जीभ लावून बोलणारे सगळे अन्‌ मग अगणित जिभांमधून सांगितला जाणारा इतिहासही होऊ लागतो त्यांच्या मालकीचा.’(पृ.174) यामुळे वाचक कादंबरी वाचणे थांबवून विचार करू लागतो. ‘प्रतीका’च्या भाषेत केलेली ही मांडणी वाचकांना आजूबाजूला डोळसपणे पाहण्यास मदत करते. कादंबरीत अनेक ठिकाणी लेखकाने प्रतिमा व प्रतीके वापरल्याने भाषिक सौंदर्यात भर पडली आहे. उदा.- मुठीतली वाळू गळताना आता मूठ रिकामी होणार असं वाटावं, तसं आयुष्यात झालंय (पृ.10), सिंदीच्या फोकासारखा कवळा पोरगा गेला.(पृ.11), घरंगळणारी शिळा खोल खड्ड्यात जाऊन स्थिर व्हावी, तसं व्हायाला त्याला जरा वेळ लागला (पृ.82), एखाद्या अनाथ लेकराचे केस वाऱ्यावर भुरूभुरू उडताना दिसावेत तसे त्या डोंगराचे माथे दिसू लागतात (पृ.91), माहेरच्या दोऱ्या तटातट तुटल्यानंतर जसं तिथलं अंगण खायला उठतं, क्षणभरही उभं रहावं वाटत नाही तसं झालं (पृ.219) ही काही प्रातिनिधिक उदाहरणे. अर्थात ही प्रतिमा व प्रतीके समजण्यासाठीही वाचकाला या गोष्टींची मूळ माहिती असायला हवी. लेखक एखाद्या पात्राचे वर्णन करताना अशी ओळख करून देतो की, ती व्यक्ती किंवा ते प्रसंग वाचकांच्या समोर दृश्य रूपात उभे राहतात. उदा.शासकीय कामात अडथळा झाल्याचा गुन्हा अंगावर न घेता झेपतील तसं, जमेल तसं- पण उसातून जायचं तर पाचटही अंगाला लागू नये, असं भागचंद यांचं एकूण चरित्र आहे. (पृ.109) यामुळे भागचंदविषयी फारसे काही सांगण्याची गरज वाचकांना लागत नाही. भागचंद कसा असेल, हे वाचक एका वाक्यातून ओळखून घेतो. सखाराम धानोरकरविषयी लेखक लिहितात, ‘सखारामजीचा कोणताच व्यवहार घाट्याचा नाही. अंग राखून अन्‌ शक्यतो प्रत्येक हालचालीचा-धडपडीचा, मोबदला वसूल करणारा असतो ना.’ यामुळे सखारामचा स्वभाव सहज लक्षात येतो. लेखक फक्त पात्राविषयीच भाष्य करून थांबत नाही; तर वर्तमान व्यवस्थेत आजचा समाज कसा आहे, मतदार कसा आहे याविषयी रामाच्या तोंडून ते लिहितात. इतकं मरमर करून लोक झ्याट विचारायला तयार नाहीत. मतदान करताना जरा तरी विचार करावा... जनता इतकी बारा पाण्यानं धुतलेलीय की, आपण तिला शहाणं करण्याची गरज नाही. तिला राममंदिर बांधायचं तर ती अयोध्याला विटा घेऊन जाती. दारू-मटणासाठी पुढाऱ्यांचे मळे-तळे रात्री-बेरात्री तुडवून जाती अन्‌ शेतीमालाला भाव पाह्यजी तर ती आपल्यासंग येती. कोणत्या वेळंला कुठं जायचं, हे लोकांना कळतं.(पृ.196) चळवळीच्या लोकांना लोक निवडून देत नाहीत, हे भीषण वास्तव लेखक सहजपणे सांगून जातो.

कादंबरीची भाषा प्रसंगानुरूप प्रमाण व बोलीभाषा असल्याने त्याची एक वेगळी गोडी निर्माण झाली आहे. उदा. ‘घटना कुठं घडली? घरी का शेतात? पोरानं फाशी घेतली होती. रुस्तुमनं सावधच विचारलं. वावरात नं, साल धरलं व्हतं. त्या मालकाच्या आखाड्यावरच राहत व्हते दोघं नवराबायकू. हे आसं घडलं तव्हा एकटाच व्हता त्यो. त्याची बायको माहेरला गेल्ती.’(पृ161). वावर, साल, व्हतं, तव्हा, गेल्ती... यांसारखी मराठवाडी बोलीभाषेतील असंख्य शब्द पानोपानी आढळतात. यासोबतच म्हणी, वाक्यप्रचार, कविता, पत्र, घोषणा, भाषण, निवेदन, बातमी.. यामुळे भाषाशैलीच्या सौंदर्यात भर पडली आहे. निवेदनात बदल म्हणून या बाबी येत नाहीत, तर सहजपणे येतात. लेखक जसा ढोंगी समाजसेवक, बदमाश राजकारणी, मतलबी मतदार यांना सोडत नाही तसा तो साहित्यिकांनाही सोडत नाही. लिहिणाऱ्या साहित्यिकाबद्दल कादंबरीतील नायक नामा म्हणतो : ‘आता आमचं कार्यकर्त्यांचं हे जग आणि लिहिणारांच्या दुनियेत दुसरंच काही तरी चालू. शेती-मातीचं लिहिणारे काही लोक अधूनमधून त्यांची पुस्तकं देतात. कसं वाटलं, विचारतात. यात जे अगदीच खपली काढील अन्‌ गदागदा हलवून सोडील, असं खूपच कमी असतं.’(पृ.124) यामुळे नवोदित लेखकांना नकळतपणे दिलेला हा इशारा आहे, असे वाचकांना सहज वाटून जाते. असे रोखठोक सांगणारा लेखक मात्र कुठे-कुठे हळवा होतो. तेव्हा ते लेखन ललित गद्याच्या जवळ जाते. उदा. ‘यंदा त्याने कमाल केलीय. आईबापावर रुसून गेलेल्या पोरासारखा नाही वागला तो. मुलूख सोडून परागंदा झाल्यासारखे केले नाही त्याने. लहरी जुगाऱ्याने भीड चेपल्यानंतर अगदीच निसवल्यासारखे वागावे, तसेही केले नाही.’ पावसाविषयी केलेले हे वर्णन वाचकाच्या मनाला भिडून जाते. कादंबरीचे दुसरे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे, निवेदनशैलीतील वैचारिक चिंतन प्रसंगानुरूप लेखक नैतिक मूल्यांचे जोरदार समर्थन करतो. अनैतिक माणसे जेव्हा चळवळीतील-संघटनेतील मोठमोठी पदे बळकावतात; तेव्हा कादंबरीतील नायक शांतपणे म्हणतो, ‘फुटकळ पदांनी  माणूस मोठा होत नाही. ज्यांची कामातून ओळख निर्माण होत नाही, अशांना पदांच्या कुबड्या लागतात. आम्ही पदावर पाणी सोडून जमाना झालाय.  पदांचे तुकडे फेकल्यानं फक्त लाचार गोळा होतात अन्‌ पदाला चिकटून राहतात. बेभान जुगाऱ्यासारखी जिंदगी उधळता आली पाहिजे. पदांच्या खरकट्या पत्रावळीचं आकर्षण ज्या दिवशी कमी होईल, तो दिवस भला म्हणायचा.’ यामुळे वाचकांच्या मनावर नैतिक मूल्यांची पेरणी नकळतपणे होते.

कादंबरीच्या बलस्थानांसोबतच काही मर्यादाही वाचकांना जाणवू लागतात. ही कादंबरी चळवळीच्या कार्यकर्त्यांची कहाणी असली तरी ती सलग नाही. वाचकांना पकडून ठेवण्याचे कसब येथे दिसत नाही. कधी कधी तर वाचकाची दमछाक होते. तो मनातल्या मनात कथानकाचा धागा जुळवत असतानाच पुढील प्रकरणात या धाग्याशी काही संबंध नसलेले उपकथानक येते. शेतकरी संघर्ष समितीची चळवळ जोरात असतानाच कामगारलढ्यासाठी लढणारा कॉम्रेड रुस्तुम मधेच येतो. त्याने उपस्थित केलेले प्रश्न अतिशय महत्त्वाचे असताना (तो नामाला पत्राद्वारे उत्तर मागतो) नामा मात्र उत्तर देण्याचे टाळतो. शेतीच्या वादातून डोळे काढलेल्या नारायण धुळे यांना  भेटण्यासाठी नामा कष्ट घेत नाही, नारायण धुळे यांची  भेट घेणे व रुस्तुमच्या चळवळीला किमान पाठिंबा देणे हे ‘नामा’ला  सहज शक्य होते, पण लेखक तसा प्रयत्न कुठेही करीत नाही. कदाचित शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणाऱ्या चळवळ्यां समाजातील अन्य प्रश्न महत्वाचे वाटले नाही. असेही लेखकाला अप्रत्यक्षपणे सुचवायचे असेल. अर्थात माणसाचं जगणं असं काही ठरवून व्यवस्थित होत नाही. पण लेखनात तरी किमान तसे करता येते, असे वाचकांना वाटू लागते. याला कादंबरीच्या मर्यादाही म्हणता येणार नाही, पण वाचकांच्या मनातील काही अपेक्षा पूर्ण होत नाहीत असे म्हणता येईल.

मराठी कादंबरीविश्वाची उंची वाढवायची असेल, तर आत्मकथनात्मक आशयाच्या लेखनाला थोडीशी बगल देऊन मराठी माणसाच्या जगण्यातील विविध संदर्भ कवेत घेता आले पाहिजेत. त्याचे वर्तुळ वाढले पाहिजे. या दृष्टीने ‘तसनस’ ही कादंबरी पुढे गेलेली आहे. चाकोरीबद्ध लेखनाला फाटा देऊन कादंबरीचा नायकच ‘चळवळ’- ही मध्यवर्ती कल्पना ठेवून वाचकांच्या पुढे आलेल्या या कादंबरीने कमालीची उंची गाठलेली आहे. आसाराम लोमटे यांची ही पहिलीच कादंबरी असूनही पहिलेपणाचे कोणतेही लक्षण यात दिसून येत नाही, हेही तितकेच खरे आहे. उलट, त्यांच्या ‘कथा’लेखनाच्या गुणवत्तेची पुढील पायरी या कादंबरीने गाठली आहे, असे म्हणता येते.

तसनस (कादंबरी)
लेखक : आसाराम लोमटे
प्रकाशक : शब्द पब्लिकेशन, मुंबई
पृष्ठे : 278 किंमत : 485 रुपये

Tags: साहित्य पुस्तक परिचय आसाराम लोमटे कादंबरी मराठी साहित्य तसनस marathi books new marathi novel aasaram lomate tasnas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके