डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘श्यामची आई’ : इंग्रजी अनुवादाच्या निमित्ताने मुलाखत

मुलांवर संस्कार करणं हे आपल्या पालकांना महत्त्वाचं वाटतं. ‘संस्कार’ हा आपल्याकडे टिकून राहिलेला शब्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये समांतर शब्द नाही. एके काळी upbringing हा शब्द होता. आता तो कोणी वापरत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीने इतर मूल्ये स्वीकारली आहेत. आपण जी होती, ती जपून ठेवली आहेत. अशा ह्या आपल्या संस्कृतीविषयी ज्या ग्रंथात कलात्मकतेने भाष्य केलेलं आहे, तो ग्रंथ लोकप्रिय होणारच. आणि काही काळाने तो पूजनीयदेखील होऊ शकतो. ‘श्यामची आई’चं तसं झालं आहे. म्हणून हे पुस्तक आपल्या घरी असावं, असं आपल्याला आवर्जून वाटतं. आपण ते वाचलंच पाहिजे, अशी भावना आपल्यात निर्माण होते. पुस्तक आपल्याकडे असणं, ते आपण वाचणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असं आपण समजतो. ‘श्यामची आई’अजरामर झालं आहे ते ह्या कारणांमुळे.

दि. 9 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या कारागृहात साने गुरुजींनी ‘श्यामची आई’ लिहायला घेतलं आणि 13 फेब्रुवारीला म्हणजे अवघ्या पाच दिवसात पूर्णदेखील केलं. फेब्रुवारी 1935 मध्ये ‘श्यामची आई’ ची पहिली आवृत्ती आली आणि 86 वर्षं झाली तरी विविध प्रकाशनांकडून आवृत्त्या येतच आहेत. आजपर्यंत ‘श्यामची आई’च्या लक्षावधी प्रती वाचकांपर्यंत पोचल्या. 1953 मध्ये आचार्य अत्रेंनी या पुस्तकावर आधारित मराठी सिनेमा आणला. राष्ट्रपतींचं पहिलं सुवर्णपदक या सिनेमाला मिळालं. एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाताना ‘श्यामची आई’ची नाट्यरूपांतरं झाली, अभिवाचनं झाली. विविध भाषांत अनुवाद झाले. त्यामध्ये हिंदी, इंग्रजी, गुजराती, आसामी, अरेबिक सिंधी, उर्दू, संस्कृत, कानडी, मल्याळी इत्यादीच नव्हे तर जापनीज भाषेचादेखील समावेश आहे. यापूर्वी पुणे विद्यार्थी गृहाकडून अदिती कुलकर्णी यांनी केलेला इंग्रजी अनुवाद आला, तर साकेत प्रकाशनकडून विजया देशपांडे यांनी केलेला इंग्रजी अनुवाददेखील आलेला आहे.

जानेवारी 2021 मध्ये ‘श्यामची आई’चा शांता गोखले यांनी केलेला इंग्रजी अनुवाद पेंग्विन प्रकाशनाकडून ‘पफिन क्लासिक’ या त्यांच्या मालिकेअंतर्गत प्रकाशित झाला. लेखक, पत्रकार, अनुवादक असलेल्या शांता गोखले हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. लक्ष्मीबाई टिळक यांचं स्मृतिचित्रे, गोडसे भटजींचं' ‘माझा प्रवास’, सतीश आळेकरांचं ‘बेगम बर्वे’ या व अन्य काही अभिजात कलाकृती त्यांनी ताकदीनं इंग्रजीमध्ये नेल्या. फक्त संहिता नव्हे तर त्या-त्या पुस्तकामधली मराठी संस्कृती इंग्रजी वाचकांपर्यंत घेऊन जाण्याचं काम त्या अनुवादातून करतात. संगीत नाटक अकादमी पुरस्कार, अनुवादासाठी बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार आणि महाराष्ट्र फौंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार त्यांना लाभलेला आहे.

अजिबात मराठी न वाचणाऱ्या पण वाचता येतं अशा मुला-मुलींनी व मोठ्यांंनीही ‘श्यामची आई’ तरी वाचावं असं अनेकांना वाटतं. कारण काही मागे पडलेले मराठी शब्द, चालीरीती, आजीच्या गोष्टीतून ऐकलेली जीवनशैली फक्त इंग्रजीच वाचणाऱ्या मुलांपर्यंत कसे पोचणार? शांता गोखले यांनी अनुवादित केलेल्या इंग्रजी ‘श्यामची आई’ मुळं हे साध्य होईल. प्रत्येक मराठी घरात ‘श्यामची आई’ पोचलेलं आहे असं म्हणतात. आता मराठी माणसं जिथं कुठं परप्रांतात, परदेशात असतील ती तिथल्या आपल्या मित्र-मैत्रिणींना, आप्तेष्टांना पफिन क्लासिकचं ‘श्यामची आई’ देऊ शकतील. ‘श्यामची आई’ला काळ, भाषा, संस्कृती इत्यादी मर्यादा नाहीत. कारण त्यातील भावना व विचार वैश्विक आहेत.

हा अनुवाद वाचताना आपण हे विसरून जातो की, आपण अनुवाद वाचतोय. साहित्य म्हणून त्याचं इंग्रजीपण इतकं पक्कं आहे. तर सलग वाचत गेल्यावर आपण मराठीच वाचतोय की काय असं वाटावं, इतकं त्यामधलं मराठीपण जपलंय. पुस्तकाची भाषा इंग्रजी करून वातावरण, संस्कृती, माणसं मात्र त्यांनी मराठी ठेवलेली आहेत. या अनुवादाच्या निमित्ताने शांता गोखले यांची घेतलेली ही मुलाखत...

प्रश्न - ‘श्यामची आई’ या पुस्तकाचा अनुवाद आपण करावा, हा विचार तुमच्या मनात कधी आला? आणि या पुस्तकाचा अनुवाद करावा, असं तुम्हाला का वाटलं?

- माझ्या एकूण अनुवादामागे माझ्या आईची प्रेरणा आहे. तिची इच्छा होती की, माझं दोन भाषांवर प्रभुत्व आहे तर, त्याचा सार्थ उपयोग मी मराठीतील उत्तम साहित्याचे अनुवाद करण्यात व्हावा. ह्या कामाची सुरुवात नाटकांचे अनुवाद करण्याने झाली. चिं.त्र्यं. खानोलकर, महेश एलकुंचवार, सतीश आळेकर, विजय तेंडुलकर, गो.पु. देशपांडे, राजीव नाईक, शफाअत खान, मकरंद साठे, परेश मोकाशी (‘संगीत देबूच्या मुली’- जे कधी मंचित झालं नाही) ह्यांच्या आणि इतरांच्या नाटकांचे मी, त्यांच्या विनंतीवरून अनुवाद केले. तसेच श्री.ना.पेंडसेच्या दोन दीर्घ कथा, दुर्गा खोटे यांचं आत्मचरित्र, प्रभाकर बर्वे यांचे लेख अशाही साहित्याचे अनुवाद केले. पण हे करत असताना मनात चार पुस्तकांची वैयक्तिक यादी होती, त्यासाठी वेळ मिळत नव्हता. तो मिळाल्याबरोबर प्रथम ‘स्मृतिचित्रे’चा अनुवाद केला. मग ‘ब्राह्मणकन्या’ करायला घेतलं. ते सुरू केलं न केलं इतक्यात पेंग्विन रँडम हाऊस पब्लिशर्सकडून विचारणा आली- आमच्यासाठी ‘श्यामची आई’चा अनुवाद कराल का? माझ्या यादीत ‘ब्राह्मणकन्या’नंतर ते पुस्तक होतंच. त्याचा क्रमांक पुढे आणला, एवढंच. यादीत त्यानंतर होते तुकारामांचे निवडक अभंग. ते करण्यासाठी धाडस लागतं, ते अलीकडेच थोडंसं आलं. 50 अभंगांचे पहिले खर्डे केले आहेत. जेरी पिंटोनेही त्याच अभंगांचे केले आहेत. म्हणजे मूळ अभंग, पिंटो यांचा अनुवाद आणि माझा अनुवाद- असं पुस्तकाचं रूप असेल. सांगायचं म्हणजे पेंग्विनची विनंती आल्यावर ‘ब्राह्मणकन्या’ बाजूला सारलं आणि ‘श्यामची आई’ हाती घेतलं. आता ते पुस्तक प्रकाशित झालं आहे, म्हणून ‘ब्राह्मणकन्या’कडे पुन्हा वळेन.     

प्रश्न - प्रत्यक्ष अनुवाद करायला घेतल्यानंतर आत्ता पुस्तक येईपर्यंतच्या प्रवासाविषयी काय सांगाल?

- हा प्रवास माझ्या बाजूने साधारण वर्षभराचा होता. प्रथम मला ह्या कथांबरोबर एकजीव होणं महत्त्वाचं होतं. लहानपणी गोष्टी म्हणून त्या वाचल्या होत्या. त्यानंतर वीसेक वर्षांपूर्वी Motherhood in Shyamchi Aai ह्या माझ्या प्रदीर्घ लेखासाठी संशोधकाच्या दृष्टिकोनातून त्यांचं वाचन केलं होतं. आता अनुवादकाच्या दृष्टिकोनातून त्या नव्याने वाचण्याची गरज होती. मग कामाला लागले. अनुवादाची माझी पद्धत अशी आहे- प्रथम शब्दास शब्द असं मी भाषांतर करते. मग मूळ पुस्तक बाजूला ठेवून भाषांतर स्वतंत्रपणे वाचते. ते शब्दश: केलेलं असल्याने वाचायला ओबडधोबड वाटतं. दुसरा खर्डा करताना भाषांतराला इंग्लिशचा बाज आणि रूप देते. मग तिसरा खर्डा. त्या वेळी भाषांतर मूळ साहित्याशी पडताळून पाहते. इंग्रजीकरण करता-करता मराठी संहितेचं जिथे भान सुटलं आहे असं वाटतं, तिथे सुधारून घेते. तिसरा खर्डा अंतिम खडर्याच्या जवळ गेलेला असतो. शेवटचा हात फिरवला की झालं.

ह्या संपूर्ण प्रक्रियेला रोज नेमाने चार-सहा तास काम करून सहा महिने लागले. वर्षभर प्रकाशकाने काँप्युटरलिखित बाजूला ठेवलं होतं. वर्षाने प्रकाशनासाठी हाती घेतलं. मग त्यांच्या बारीक-सारीक शंका-कुशंका आल्या, माझे खुलासे गेले, त्यांना हव्या तिथे तळटीपा लिहिल्या, कव्हरचे नमुने बघितले, सूचना दिल्या... करता-करता आणखी सहा महिने गेले. आणि शेवटी पुस्तक या महिन्याच्या सुरुवातीला आलं.

प्रश्न - हा अनुवाद कोणासाठी आहे? हे पुस्तक कोणी वाचायला पाहिजे, असं तुम्हाला वाटतं?  आत्ताच्या भाषेत विचारायचं झालं तर- या इंग्रजी अनुवादाचा टार्गेट audience कोण आहे?

- मी अनुवाद करते किंवा काहीही लिहिते, तेव्हा टार्गेट ऑडियन्सचा विचार करत नाही. तो केला तर कामातलं माझं स्वातंत्र्य नष्ट होईल. तुम्ही व्यावसायिक लेखक नसाल, तर तुमचं सर्व लक्ष तुम्ही लिहिण्यावर केंद्रित करत असता. तुमचं तन-मन त्यात ओतून तुम्ही काम करता. तसं करणं हेच तुमचं कर्तव्य असतं. पुस्तकाचं पुढे काय होईल, ते बाहेरच्या जगावर अवलंबून असतं. ज्यावर आपलं नियंत्रण नाही, त्याची चिंता करा कशाला? आपलं काम चोख असेल, तर त्याला वाचक मिळेल इतपत आपल्याला खात्री असते. ‘श्यामची आई’च्या प्रस्तावनेच्या शेवटी साने गुरुजी यांनीच जे म्हटलं आहे, ते मी इथे उद्‌धृत करते.

 ‘श्यामची आई माझ्या घरातून सर्वांना भेटण्यासाठी बाहेर पडत आहे. उघड्या दारांतून ती आत शिरेल. बंद दारे ती ठोठावून पाहील. पण सारी दारे बंद झाली तर? तर, ती माझ्या घरातच येऊन राहील.’

पण तसं होणार नाही ह्याची मला खात्री आहे. अनेक घरांमध्ये हे पुस्तक नक्की पोहोचेल. परदेशी राहणारी माणसं त्यांच्या मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देऊ पाहत आहेत. मुलांना आपली भाषा येत नाही, फक्त इंग्लिश येते. त्यांच्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचं ठरेल.

प्रश्न - काळ बदलला, भाषा बदलली तरी relevant वाटेल असं या पुस्तकात काय आहे? (आईवरचं प्रेम सोडून) आई या विषयावर खूप साहित्य सर्व भाषांतून झालं, पण श्यामची आई अजरामर होण्याचं कारण काय असावं?

- प्रेम हे मूल्यच मुळी अजरामर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट- हे थेट भारतीय पुस्तक आहे. भारतात काळ फार वेगाने बदलत नाही. बदलला असं आपण म्हणतो. पण जरा विचार केला की लक्षात येतं- आपल्याला डोळ्यांत भरतील असे जे बदल दिसतात, ते वरवरचे आहेत. मुळात विशेष बदल झालेले नाहीत. आपण भावुक होतो, आहोत. आपण संतांना मानत आलो आहोत, आजही मानतो. आपल्याला उपदेशात्मक बोलणं-लेखन भारावून टाकतं. आपल्याकडे बंडखोरांचं प्रमाण खूप कमी आहे. मुलांवर संस्कार करणं हे आपल्या पालकांना महत्त्वाचं वाटतं. ‘संस्कार’ हा आपल्याकडे टिकून राहिलेला शब्द आहे. त्याला इंग्लिशमध्ये समांतर शब्द नाही. एके काळी upbringing हा शब्द होता. आता तो कोणी वापरत नाही. पाश्चात्त्य संस्कृतीने इतर मूल्ये स्वीकारली आहेत. आपण जी होती, ती जपून ठेवली आहेत. अशा ह्या आपल्या संस्कृतीविषयी ज्या ग्रंथात कलात्मकतेने भाष्य केलेलं आहे, तो ग्रंथ लोकप्रिय होणारच. आणि काही काळाने तो पूजनीयदेखील होऊ शकतो. ‘श्यामची आई’चं तसं झालं आहे. म्हणून हे पुस्तक आपल्या घरी असावं, असं आपल्याला आवर्जून वाटतं. आपण ते वाचलंच पाहिजे, अशी भावना आपल्यात निर्माण होते. पुस्तक आपल्याकडे असणं, ते आपण वाचणं हा आपल्या संस्कृतीचा भाग आहे, असं आपण समजतो. ‘श्यामची आई’अजरामर झालं आहे ते ह्या कारणांमुळे. प्रश्न विचारला आहे म्हणून मला सुचलेलं उत्तर दिलं आहे. मी काही त्यातली तज्ज्ञ नाही.  

प्रश्न - अनुवाद करताना आलेल्या अडचणी. तुम्ही केलेल्या अन्य पुस्तकांच्या अनुवादापेक्षा हा अनुवाद वेगळा वाटला का? कोणत्या प्रकारे?

- अनुवाद करताना प्रत्येक पुस्तकाच्या काही खास अडचणी आपल्यासमोर येतात. कधी त्याची भाषा- उदा. उद्धव शेळके यांच्या ‘धग’ कादंबरीतील वऱ्हाडी बोली; कधी त्यातील विनोदाची जात- उदा. पुलंचं सर्वच लिखाण; कधी त्यात शब्दांवर केलेला खेळ- उदा. Em and the Big Hoom. त्याचप्रमाणे ‘श्यामची आई’मधील साने गुरुजींची वाक्यरचना ही माझी मुख्य अडचण होती. तशी वाक्यरचना इंग्लिशमध्ये करणं कठीण होतं. कधी लांब वाक्यांची लहान वाक्यं करावी लागली, तर कधी दोन लहान वाक्यं जोडून घ्यावी लागली.    

प्रश्न - तुम्ही मनोगतात म्हणाला आहात की, श्यामचं रडणं तुम्ही tone down केलंत. असं करायचं तुम्ही का ठरवलं? आणि अनुवादक म्हणून या निर्णयाचं समर्थन तुम्ही कसं कराल?

- अनुवाद करताना सतत विविध प्रकारचे निर्णय घ्यावे लागतात. ढोबळ बाबतीत त्याचं समर्थन करणं शक्य असतं. पण आपण केलेल्या बारीकसारीक निवडींचं समर्थन करणं कठीण असतं. ‘श्यामची आई’मध्ये केवळ श्याम रडतो असं नाही, इतर जणही रडतात. ह्या कथा मुळातच इतक्या करुण आहेत की, कोण आणि किती रडलं हे सांगण्याची तशी गरज नसते. एखादी व्यक्ती रडल्याचा उल्लेख झाल्यावर पुन्हा त्याच वाक्यात किंवा एकामागून एक-दोन वाक्यांत दुसरं माणूस रडल्याचा उल्लेख येतो, तेव्हा इंग्लिश भाषेला ते पेलेनासं होतं. रडण्याचा दुसरा उल्लेख टाळावा लागतो. इंग्लिश संस्कृतीला भावुकपणाचं वावडं आहे. प्रत्येक भाषेची आपली अशी संस्कृती असते. जे मराठी भाषेच्या संस्कृतीत बसतं, ते इतर एखाद्या भाषेत नैसर्गिकरीत्या बसतंच असं नाही. मूळ संहिता दुसऱ्या भाषेत शक्य होईल तितकी नैसर्गिक करावी, हे अनुवादक म्हणून माझं कर्तव्य ठरतं. इंग्लिशमध्ये वाचक जेव्हा पुस्तक वाचतो, तेव्हा त्याला कुठेही भातात खडा लागल्यासारखं वाटू नये, हा माझा उद्देश असतो. मी ज्याला tone down म्हटलं आहे, त्याचा हा आणि इतकाच अर्थ आहे.  

प्रश्न -  We do not translate words but worlds असं तुम्ही मनोगतात म्हटलं आहे. याविषयी अजून सविस्तर सांगाल का?

- ह्याविषयी थोडी सुरुवात वर केली आहे, आता अधिक खोलात जाते. कोणत्याही समाजाची भाषा कालौघात घडत गेलेली असते. ती त्या समाजाने आपल्या उपयोगासाठी घडवलेली असते. ‘पाहुणे निघाले. तिने त्यांच्या हातावर दही ठेवलं.’ ही दोन लहान आणि साधी वाक्यं आहेत. त्यांतील प्रत्येक शब्दाला इंग्लिशमध्ये पर्यायी शब्द आहे. ' The visitors were leaving. She put yogurt on their hands.' असा ह्या वाक्यांचा शब्दशः अनुवाद होतो. पण ही वाक्यं वाचून वाचकाला त्या बाईच्या कृतीचा बोध होणं शक्य नाही, उलट तो बुचकळ्यात पडेल. पाहुणे जाण्याचा आणि दह्याचा काय संबंध? ह्या प्रश्नामुळे त्यांच्या वाचनात विघ्न निर्माण होतं. हा प्रश्न त्यांना पडावा ह्याचाच अर्थ आपण शब्द पोहोचवले, पण ते ज्या जगातले आहेत ते जग पोहोचवलं नाही. आपला समाज हे आपलं जग. त्यातील चाली-रीती ही आपली संस्कृती. ती वाचकाला कळली नाही तर आपला अनुवाद कुचकामी ठरतो. असं होऊ नये म्हणून आपण शब्दांत दडलेला अर्थ अनुवादात खुबीने उकलून दाखवला, तरच तो खऱ्या अर्थाने अनुवाद झाला असं आपण म्हणू शकतो. ह्याचाच अर्थ ' We do not translate words but worlds.' त्यामुळे वरील वाक्य असे होईल... As her guest got up to leave she put a spoonful of dahi on his hand in the customary gesture that said, 'Come back soon'.

प्रश्न - पेंग्विनकडून इंग्रजी अनुवाद प्रसिद्ध होण्याला पफिन क्लासिक म्हणून प्रकाशित होण्याला काही विशेष महत्त्व आहे का?

- क्लासिक ह्या शब्दातच त्याचं महत्त्व गोवलेलं आहे. हा अनुवाद एका अभिजात पुस्तकाचा आहे आणि तो काल मर्यादित नाही. ह्याचा अर्थ की, इतर पुस्तकांचं जीवन जसं त्यांच्या विक्रीवर अवलंबून असतं तसं क्लासिक्सचं नसतं. प्रकाशकासाठी अभिजात पुस्तकाचं प्रकाशन करणं म्हणजे आत्मसन्मानाची गोष्ट असते. हेच ह्या प्रकाशनाचं विशेष महत्त्व.

प्रश्न - पेंग्विनकडून अनुवाद आलेला असल्याने जगातील अन्य अनेक देशांमध्ये जाण्याची शक्यता आहे. त्या देशांमध्ये आई व मुलगा हे नाते आणि तिथली कुटुंबसंस्था लक्षात घेता, या पुस्तकाकडे तिथला वाचक कसा पाहील, असे तुम्हाला वाटते?

- हे पेंग्विन इंडियाचे प्रकाशन आहे. त्याची विक्री इतर देशांत होणार नाही. पफिन क्लासिक्स ह्या मालिकेत खास भारतीय क्लासिक्सचा समावेश आहे. यात सत्यजित रे यांच्या गोष्टी, राजस्थानचे विजयदन देठा यांच्या लोककथा अशी प्रकाशनं आहेत.

प्रश्न - मराठी श्यामची आई न वाचलेल्या पण थेट तुम्ही केलेला इंग्रजी अनुवाद वाचून एखाद्या वाचकानं दिलेली लक्षात राहण्यासारखी प्रतिक्रिया सांगाल का?

- हे पुस्तक आताच प्रकाशित झालं आहे. अजून कोणी वाचून प्रतिक्रिया कळवलेल्या नाहीत. पण ज्यांनी माझ्या मुलाखती घेतल्या त्यांना ते खूप आवडलं आहे, असं त्या तिघींनीही सांगितलं. त्यापैकी एकीने झूमवरचं बोलणं संपल्यावर मला खासगीत अनुवादाविषयी एक प्रश्न विचारला. तो मला रुचला. ती म्हणाली, ‘‘ह्या पुस्तकात अनेक जागा अशा आहेत की, त्या मुळात इंग्लिशमध्ये लिहिल्या असतील असं वाटतं- पण आहेत मराठीतून अनुवादित केलेल्या. ते कसं काय? एक उदाहरण देते. प्लीज, पान 102 उघडा. दुसऱ्या परिच्छेदातल्या दुसऱ्या ओळीत तुम्ही लिहिलंय, 'Nights are particularly magical when you are travelling by bullock cart. Everywhere around you is silence.' ही वाक्यं मराठीत कशी आहेत, वाचून दाखवाल का?’’ मी मराठी प्रत उघडली. संबंधित वाक्यं वाचली. ‘बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते. रात्रीच्या वेळी तर फारच आनंद. शांत वेळ असते.’ ती म्हणाली, ‘‘तुम्ही तीन वाक्यांची दोन वाक्य केली आहेत. ते का?’’ मी तिला सांगितलं की- अनुवाद वाक्यांचा नसतो, सबंध परिच्छेदाचा असतो. शिवाय अनुवादात मी लयीला प्रधान्य देते, ही एक गोष्ट झाली. दुसरी म्हणजे- ‘मौज’ हा शब्द आपण ज्या अर्थाने वापरतो, त्या अर्थाचा इंग्लिश शब्द नाही. इथे हा शब्द हास्य सुचवत नाही, तर काहीसं नवल सुचवतो. म्हणून त्यासाठी मी 'magical' हा शब्द योजला. तो वापरल्यावर पुढच्या वाक्यातला ‘आनंद’ हा शब्द निष्प्रभ वाटू लागला. म्हणून त्या दोन वाक्यांचं एक वाक्य केलं. ते केल्यावर ‘शांत वेळ असते’ हे वाक्य त्रोटक आणि कमजोर वाटू लागलं. म्हणून त्याला लांब केलं. तसं केल्याने आधीच्या magical ह्या शब्दाला पुष्टी मिळाली आणि दोन वाक्यं मिळून छान लय तयार झाली. पुस्तक खूप आवडलं ह्या प्रतिसादापेक्षा, ह्या बाईने विचारलेल्या प्रश्नातला प्रतिसाद मला अधिक महत्त्वाचा वाटला.

प्रश्न - ‘श्यामची आई’चा अनुवाद याविषयी मी विचारलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त तुम्हाला काही सांगावंसं वाटतंय?

- नाही. महत्त्वाचं सगळं सांगितलंय.

(मुलाखत : मृद्‌गंधा दीक्षित)

(‘श्यामची आई’चा इंग्रजी अनुवाद यानिमित्ताने डॉ.अजय जोशी यांनी, शांता गोखले यांची एक इंग्रजी मुलाखत घेतली आहे, ती कर्तव्य साधना kartavyasadhana.in या डिजिटल पोर्टलवर ती मुलाखत वाचण्यासाठी येथे क्लिक करा) 

Tags: मृदगंधा दीक्षित शांता गोखले अनुवाद साहित्य मराठी पुस्तके पेंग्विन साने गुरुजी श्यामची आई weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शांता गोखले,  मुंबई, महाराष्ट्र
shantagokhale@gmail.com

 लेखिका, पत्रकार, अनुवादक आणि नाट्यसमीक्षक


Comments

  1. Vaishnavi mantri- 26 Feb 2021

    Very nice

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके