डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

त्याचा लकी बॉलपेन परत करून तो देत असलेला दुसरा बॉलपेन घेणार होतो, तोच मला काय वाटलं कुणास ठाऊक मी तो बॉलपेन उघडला आणि आत जे काय होतं ते पाहून माझे कुतूहल जागृत झालं. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याला म्हणालो, 'संजय महाशय, तुमच्या लकी बॉलपेननं माझे कुतूहल चांगलंच जागृत केलं आहे. चला जरा माझ्या ऑफिसमध्ये या. आपण तुमच्या या लकी बॉलपेनची जरा तपासणी करू या. चला…
 

स्थळ नाशिकरोड रेल्वे स्टेशन, रात्रीचे साडेबारा वाजले होते. थंडीचे दिवस, हवेत चांगलाच गारठा होता. मी नुकताच रात्रपाळीच्या ड्यूटीवर आलो होतो. टेबलावर तिकिटांचा ढीग पडलेला होता. मी तिकिटांची सॉटींग आणि नंबरिंग करून तिकीट व्यवस्थित लावले. तिकीट एन्ट्री पुस्तकात तिकिटांची एन्ट्री करायला सुरुवात करणार, तोच जनता एक्स्प्रेस येत असल्याची वार्निंग बेल वाजली. मी तिकीट एन्ट्रीचं काम तसंच सोडून उठलो. अंगात कोट चढवून गेटवर तिकीट कलेक्शनसाठी येऊन उभा राहिलो.

जनता एक्स्प्रेस प्लॅटफॉर्मवर येऊन थांबताच तिच्यातून प्रवाशांचा लोंढा बाहेर पडला. स्टेशनमधून बाहेर पडणाऱ्या प्रवाशांकडून तिकीट गोळा करण्यात मी गर्क झालो. पाच मिनिटात गर्दी कमी झाली, तरी मी गेटवरच उभा होतो.

'नमस्कार टी.सी.साहेब.' कोणीतरी मला नमस्कार केला. मी शब्द आले त्या दिशेनं वळून पाहिल- माझ्या उजव्या बाजूला बावीस-तेवीस वर्षांचा एक तरुण उभा होता. मी त्याला प्रतिनमस्कार करीत म्हणालो.

बोला, काय काम आहे?' 

'साहेब, मी विनातिकीट आलो!

'आँ!' असा आश्चर्योद्गार काढून मी त्याच्या तोंडाकडे पाहतच राहिलो. क्षणभर काय बोलावं तेच मला सुचेना. असं सहसा घडत नाही, गाडीनं आलेले आणि स्टेशनपर्यंत 'सुरक्षित' (म्हणजे गाडीतल्या तिकीट चेकींग स्टाफच्या हाती न लागलेले) विनातिकीट प्रवासी गेटवरून म्हणजे जिथे टी.सी. तिकीट कलेक्शनला उभा असतो तेथून जात नाही. असे विनातिकीट प्रवासी गाडीच्या 'ऑफ साईडला' उतरून फरार होतात, नाहीतर रेल्वे स्टेशनला असलेल्या फेन्सिंगच्या 'गॅप'मधून किंवा प्लॅटफॉर्मच्या पुढच्या अथवा मागच्या 'एन्ड'वरून पसार होतात. विनातिकीट प्रवास करून आल्यावर टी.सी.ला चुकवूनच असे विनातिकीट पळ काढीत असतात; आणि हा पठ्या तर विनातिकीट प्रवास करून शहाजोगसारखा माझ्यासमोर उभा होता. आपण विनातिकीट आल्याचं सांगत होता.

शाब्बास रे पठ्ठ्या!' मी हसत त्याला म्हणालो. 'एक तर विनातिकीट प्रवास करून आलास आणि आता शहाजोगसारखा माझ्यासमोर उभा आहेस? तुला स्टेशनबाहेर पळून जायला मार्ग मिळाला नाही का? माझ्यासमोर कशाला मरायला आलास? आता मला तुला नियमाप्रमाणे दंड लावून चार्ज करावा लागेल, चल काढ पैसे!

मी असं म्हणताच तो गप्प बसला. तसाच दगडी खांबासारखा उभा राहिला. मी आवाज चढवून त्याला दटावीत म्हणालो.

'काय रे, मुकाट्यानं चार्ज भरतोस की तुला पोलिसांच्या हवाली करू? तू जर पैसे भरले नाहीस तर तुला पोलीस कोठडीची हवा खावी लागेल. बोल काय करतोस?

'टी.सी.साहेब, असं करू नका. माझ्यावर दया करा.' तो मला हात जोडून गयावया करीत म्हणाला, 'मी एक सुशिक्षित बेकार तरुण आहे. घरची अत्यंत गरिबीची परिस्थिती आणि पुरेसे पैसे नसल्यामुळं मी तिकीट काढू शकलो नाही.'

'तुझ्याजवळ पैसे नाही म्हणतोस? पोलिसांना बोलावून तुझी झडती घेतली तर?' 

'पोलिसांना बोलावू नका साहेब, मी स्वत:च प्रामाणिकपणे सांगतो, माझ्याजवळ फक्त बहात्तर रुपये आहेत.

तू आलास कोठून?'

साहेब, मी कल्याणहून आलो.

'अरे तर मग तुला पन्नास रुपयांचे तिकीट काढता आलं असतं ना? कल्याण-नाशिक तेवढंच भाडं आहे. पुरेसे पैसे असून नाही कसं म्हणतोस?'

'साहेब, मी तिकीट काढलं असतं तर माझे खाण्याचे आणि राहण्याचे बांधे झाले असते. राहायला तर मी रेल्वेच्या थर्डक्लास वेटिंगरूममध्येसुद्धा राहिलो असतो, पण तिकीट काढलं असतं तर जेवायला पैसे उरले नसते आणि मला उपाशी राहावं लागलं असतं. म्हणून मी तिकीट काढलं नाही साहेब.

'इथं कोणाकडं आणि कशासाठी आलास?

साहेब इथं एका फॅक्टरीमध्ये नोकरीसाठी आलो. उद्या दहा वाजता माझा इंटरव्ह्यू आहे. साहेब वाटल्यास मी तुम्हाला चहापाण्याला पंचवीस रुपये देतो, ते आपण घ्या आणि मला सोडून द्या साहेब. गेल्या दोन वर्षांपासून मी नोकरीसाठी वणवण भटकतो आहे. आता येताना मी माझ्या मित्राकडून शंभर रुपये उसने घेतले होते. देवाशपथ साहेब, माझी परिस्थिती खूपच वाईट आहे. वडील लहानपणीच वारलेत. मला माझ्या आईशिवाय कोणीच नाही. तिनं मोलमजुरी करून, काबाडकष्ट करून मला कॉलेजमध्ये शिकवलं आणि मला खूप प्रयत्न करूनसुद्धा नोकरी मिळाली नाही. माझ्या आईचे कष्ट मला बघवत नाहीत. आपण आत्महत्या करावी की काय असा विचार सारखा माझ्या मनात येत असतो.'

त्याचे करुण शब्द ऐकून आता हा गळा काढून रडतोय की काय अशी मला भीती वाटली आणि त्याची दयाही आली. मी त्याला म्हणालो, 'बाबारे, आत्महत्या वगैरे काही करू नको. धीर धर, नोकरी काय आज नाही तर उद्या मिळू शकेल, ज्या आईनं काबाडकष्ट करून तुला शिकवलं तिचा विचार कर. मी तुला सोडतो, मला तुझे पंचवीस रुपये नको, तू जा. बेस्ट ऑफ लक!

'बैंक्यू साहेब! आपण फार दयाळू आहात.' असं म्हणून तो जायला निघाला तोच मी त्याला थांबवलं. त्याच्या शर्टच्या खिशाला तीन बॉलपेन होते. त्या दिवशी ड्यूटीवर येताना मी पेन विसरलो होतो.

'जरा थांब रे, ' मी म्हणालो, 'तुझं नाव काय रे?'

'माझं नाव संजय आहे साहेब.' तो नम्रपणे उत्तरला.

'संजय, तुझा हा एक बॉलपेन मला देऊन जा रे.' असं म्हणून मी त्याच्या शर्टच्या खिशाला लावलेला बॉलपेन काढून घेतला आणि माझ्या कोटाच्या खिशाला लावला. एवढ्यात मुंबईकडे जाणारी हावडा मेल प्लॅटफॉर्मवर आली. गाडीतून उतरलेल्या प्रवाशांचा लोंढा स्टेशनबाहेर पडण्यासाठी गेटच्या दिशेने येताच मी प्रवाशांच्या तिकिटांचं कलेक्शन करण्यात गर्क झालो. पाच-दहा मिनिटात प्रवाशांची गर्दी संपताच मी टी.सी. ऑफिसकडे जायला निघालो, तोच पाठीमागून हाक आली.

'आहो टी.सी.साहेब.

कोणी हाक मारली म्हणून मी वळून पाहिलं नु चकित झालो. तो विनातिकीट प्रवासी तरुण- संजय अजून तिथंच उभा होता.

काय रे संजय, तू आता कशासाठी थांबलास? मी तर तुला सोडून दिला ना? 

साहेब, मी तुम्हाला चांगला बॉलपेन देतो' तो म्हणाला. 'तुम्ही घेतलेला बॉलपेन माझा 'लकी बॉलपेन' आहे. तो कृपा करून मला परत द्या.

लकी बॉलपेन?' मला त्याच्या शब्दांचा अर्थ समजला नव्हता. मी त्याच्या जवळून घेतलेला बॉलपेन कोटाच्या खिशातून काढून हातात घेतला. निरखून पाहिला, तो एक सामान्य, आकारानं जाडजूड बॉलपेन होता. मी त्याचा खटका दाबून पाहिला. त्या बॉलपेनमध्ये रिफीलच नव्हती.

'काय रे संजय, या दीड दमडीच्या बॉलपेनमध्ये तर रिफीलच नाही आणि याला तू 'लकी बॉलपेन' आहे म्हणतोस?' 'साहेब हा दुसरा बॉलपेन घ्या, यात रिफील पण आहे. हा तुमच्या कामाचा आहे, तो तुमच्या कामाचा नाही. द्या तो इकडे आणि हा पेन घ्या. 

मी त्याचा लकी बॉलपेन परत करून तो देत असलेला दुसरा बॉलपेन घेणार होतो, तोच मला काय वाटलं कुणास ठाऊक मी तो बॉलपेन उघडला आणि आत जे काय होतं ते पाहून माझे कुतूहल जागृत झालं. मी संजयकडं पाहिलं, त्याचा चेहरा उतरला होता. तो माझी नजर चुकवीत होता. माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी त्याच्या खांद्याभोवती (मित्रानं मित्राच्या खांद्याभोवती घालावा तसा) हाताचा विळखा घातला आणि त्याला म्हणालो, 

'संजय महाशय, तुमच्या लकी बॉलपेननं माझे कुतूहल चांगलंच जागृत केलं आहे. चला जरा माझ्या ऑफिसमध्ये या. आपण तुमच्या या लकी बालपेनची जरा तपासणी करू या. चला...'

असे म्हणून मी त्याला जवळजवळ ओढतच टी.सी. ऑफिसमध्ये आणलं.

'ह, तर काय म्हणत होतास तू बाळ संजय, तू फार गरीब आहेस? तुझ्याजवळ पैसे नाहीत? तर मग तू मला सांग माझ्या राजुड्या तुझ्या या लकी बॉलपेनमध्ये दडलंय काय?

माझ्या या प्रश्नावर संजय काही बोलेना. तो जणू तोंडाला कुलूप लावून उभा होता. मी त्याच्या लकी बॉलपेनमध्ये बारकाईनं पाहिलं. आत नोटेची बारीक पुंगळी करून घातलेली होती. मी बोटांच्या चिमटीनं बॉलपेनमधली नोट बाहेर खेचण्याचा प्रयत्न केला, पण ती पुंगळी काही निघेना. शेवटी मी तो बॉलपेन टेबलावर ठेवला आणि वरून निपरचे दोन दणके देताच बॉलपेन फुटला आणि आतून एक नोटेची वरून घट्ट बारीक दोरा गुंडाळलेली पुंगळी बाहेर निघाली. ती पुंगळी हातात धरून मी संजयसमोर धरून त्याला विचारलं.

'ह, आता बोल बाळ संजू, हे किती पैसे आहेत? तू तर म्हणत होतास तू फार गरीब आहेस. तुझ्याजवळ पैसे नाहीत? तर मग तुझ्या या लकी बॉलपेनमध्ये तू हे काय दडवून ठेवलं होतंस?'

संजय हूं की चूं करेना. तो तसाच गप्प उभा होता. मी त्या नोटेच्या पुंगळीवर घट्ट गुंडाळलेला बारीक दोरा काढला. नोटेची पुंगळी उलगडली. त्या हजार रुपयाच्या दोन करकरीत नोटा म्हणजे दोन हजार रुपये होते. ते पाहून मी चक्रावलोच.

झकास!' मी ओरडलो, 'बाळ संजय एकदम झकास! मानलं बुवा तुला. तुझी ही ट्रीक भलतीच लाजवाब आहे. माझ्या राजुड्या! विनातिकीट प्रवास करताना तू ही आयडिया बऱ्याच वेळा वापरलेली दिसतेस? पण आज तुझा हा लकी बॉलपेन चुकून माझ्या हाती आला आणि तुझे हे बिंग फुटलं. तर मग आता तुझ्या या बदमाशीबद्दल तुला काय शिक्षा द्यायची?

संजयला कंठ फुटला. तो मेलेल्या आवाजात म्हणाला, 'साहेब, मी कल्याण ते नाशिक डबल चार्ज भरण्यास तयार आहे!

आता तू चार्ज भरशीलच रे माझ्या सोन्या!' मी त्याला म्हणालो, 'कारण तुझे पैसेच आता माझ्या हाती आले आहेत, पण तुला चांगली अद्दल घडावी म्हणून मी तुला कल्याणहून नव्हे तर नागपूरहून चार्ज करणार आणि तोही फर्स्टक्लासचा, काय समजलास?'

'फर्स्टक्लासचा चार्ज?' संजय कण्हला, 'साहेब प्लीज असं करू नका माझ्यावर दया करा, मला माफ करा, मी तुम्हाला हात जोडतो.'

'खामोष! बदमाश! एक शब्दही बोलू नकोस, मी तुला फर्स्टक्लासचाच चार्ज करणार!' असं म्हणून मी कोटाच्या खिशातून पावतीपुस्तकं काढलं, नागपूर ते नाशिक फर्स्टक्लासचं भाडं सातशे रुपये अधिक दंड सातशे रुपये अशी दंडात्मक पावती बनवली. पावतीवर त्याचं नाव, पत्ता लिहून पावतीवर त्याची सही घेतली. त्याला पावती दिली उरलेले सहाशे रुपये परत केले. खेटरं खाल्ल्यागत पडेल चेहऱ्यानं त्यानं पावती, पैसे घेतले आणि आपलं तोंड काळ केलं.

Tags: टी.सी. कल्याण-नाशिक विनातिकीट प्रवास शांतिलाल राठोड लकी बॉलपेन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके