डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाई : समाजवादाचे ध्यासपर्व

डाॅनियल बेल यांच्या ‘एंड ऑफ आयडिऑलॉजी’ या मुद्द्याचा फोलपणा एका चर्चेत भाईंनी ‘होकायंत्र व सुकाणू’ यांचे उदाहरण देऊन फार छान स्पष्ट केले होते. समुद्रात प्रवास करताना दिशा कळत नाहीत, म्हणनू प्रवासाची दिशा निश्चित करण्यासाठी खलाशाला ‘होकायंत्र’ उपयोगी पडते आणि प्रत्यक्ष प्रवास करण्यासाठी ‘सुकाणू’ असते. समाज विकासात ‘विचारधारा’ हे ‘होकायंत्र’ आहे व ‘तंत्रज्ञान’ हे ‘सुकाणू’ आहे. होकायंत्र न घेता जहाजाने प्रवास सुरू केला, तर सुकाणूच्या साह्याने जहाज समुद्रात भरकटल्याशिवाय राहणार नाही. समाजात प्रगती कोणाची व कशी करायची याचे उत्तर विचारधारा देते, साध्य निश्चित करते व तंत्रज्ञान हे प्रगतीचे साधन आाहे. साधनाचा वापर विवेकपूर्ण करण्याचे भान विचारधारा देते.
 

आदरणीय एस. एम. अण्णांनी जी ‘फूल मॅड’ माणसे महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीत पेरली, त्यात भाई वैद्य हे एक डेरेदार चंदनाचे झाड होते. समाजवादी चळवळीच्या अग्निकुंडात अखेरच्या श्वासापर्यंत, स्वत:च्या कृतिशील आयुष्याची आहुती देणारे भाई, हे एक समिधा होते! एस. एम. अण्णांच्या अपेक्षेप्रमाणे भाई हे ‘समाजवादी शीला’चे आदर्श उदाहरण आहे.

भाईंचा जन्म 22 जून 1928 रोजी दापोडे, ता. वेल्हे, जिल्हा पुणे येथे झाला. 1942-43 मध्ये ते सेवा दलात दाखल झाले व पुढील पंचाहत्तर वर्षांचे आयुष्य हे त्यांचे समाजवादाचे ध्यासपर्व आहे. राष्ट्र सेवा दलाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते, स्वातंत्र्य चळवळ, गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, अनेक मोर्चे व सत्याग्रह यांत सहभाग. नगरसेवक, महापौर, आणीबाणीतील अठरा महिने तुरुंगवास, आमदार, मंत्रिपद, जनता पक्षाचे सरचिटणीस, भारतयात्रा व अखेरच्या टप्प्यावर स्थापन केलेली अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा व सोशॅलिस्ट पार्टी! अशा वळणावळणाने भाईंचा समाजवादी चळवळीचा आलेख वर वर चढत गेला आहे. अगदी अलीकडे वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी भाई एन्रॉन, सेझविरोधी तसेच शिक्षण-हक्कांसाठी रस्त्यावर उतरून ‘जेल भरो’ आंदोलनात सामील झाले होते. समजावादावर अविचल निष्ठा व त्यासाठी समर्पणाची भावना हे भाईंच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते!

भारतात ‘जनता पक्षा’च्या स्थापनेपर्यंत म्हणजे 1977-78 पर्यंत समाजवादी चळवळ जोरात होती. समाजवादी चळवळीचा नैतिक व राजकीय दबदबा होता, पण जनता पक्षाच्या फाटाफुटीत अनेक कारणांमुळे  ‘समाजवादी’ बदनाम झाले. विसाव्या शतकाची शेवटची दोन दशके जागतिक पातळीवर प्रचंड उलथापालथीमध्ये गेली. रशियात साम्यवादी राजवट कोसळली. चीननेसुद्धा अर्थकारणात नवे प्रयोग केले. ‘स्टॉक एक्स्चेंज’ व बहुराष्ट्रीय कंपन्यांना चीनमध्ये प्रवेश दिला. आंतरराष्ट्रीय व्यापार कराराची चर्चा जगभर सुरू झाली होती व त्याच वेळेला ‘संगणक युग’ अवतरले होते! यातून जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाची आर्थिक नीती पुढे आली. याच काळात ‘एंड ऑफ आयडिऑलॉजी’, ‘एंड ऑफ हिस्ट्री’, ‘थर्ड वेव्ह’ या कल्पना विचारविश्वात पुढे आल्या. या गदारोळातून ‘समाजवाद संपला’, ‘विचारधारांचा आता शेवट झाला आहे’, ‘हा इतिहासाचा शेवट आहे’, ‘भांडवलशाही अमर आहे’, ‘तंत्रज्ञान सर्व प्रश्न सोडवणार आहे’ असे निष्कर्ष अनेक विचारवंतांनी काढले होते!

1990 मध्ये भारतात आर्थिक उदारीकरणाची धोरणे मोठ्या प्रमाणात डॉ. मनमोहन सिंग यांनी आणली. यामुळे भारतीय बाजारपेठा ‘व्हाइट गुड’ने भरून गेल्या, मध्यमवर्गीय व उच्च मध्यमवर्गीय जागतिकीकरणाच्या प्रेमातच पडले. त्यामुळे समाजवादी असणे म्हणजे मागासलेपणाचे लक्षण मानण्याचा तो कालखंड होता.

नव्वदच्या दशकात ‘समाजवादी विचारा’साठी राजकीय, आर्थिक व सामाजिक वातावरण प्रचंड प्रतिकूल झाले होते. अनेकांनी ‘समाजवाद’ या शब्दासाठी ‘समतावाद’ असा प्रतिशब्द वापरायला सुरुवात केली होती. नवीन आर्थिक धोरणांमुळे ‘वृद्धी’ होईल व या वृद्धीचा फायदा आपोआप खाली झिरपत जाईल, असा ‘आपोआपवाद’ जोरजोरात तेव्हा प्रसारमाध्यमांतून मांडला जात होता. या लाटेत समाजवादी 'बचावात्मक’ मोडमध्ये गेले होते.

या जागतिकीकरणाच्या वादळात भाई मात्र दीपस्तंभासारखे उभे होते व ते एकटे सांगत होते, ‘‘होय, मी समाजवादी आहे.’’ जागतिकीकरणामुळे रोजगार घटेल, आर्थिक विषमता वाढेल, दारिद्र्य वाढेल, माहिती तंत्रज्ञानाच्या झगमगाटात शेतीक्षेत्राची होणारी उपेक्षा दीर्घ मुदतीत फार धोकादायक ठरेल; शिक्षण, आरोग्य, समाजकल्याण आदी क्षेत्रांतील सरकारचा काढता पाय पुढे महागात पडेल, याला उपाय लोकशाही समाजवाद हाच आहे! या काळात भाईंची प्रचंड उपेक्षा झाली. पण 2010 मध्ये यातील अनेक मुद्दे अर्थशास्त्राचे नोबेल पुरस्कारप्राप्त जोसेफ स्टिगलिट्‌झ यांनी ‘ऑक्युपाय वॉल स्ट्रीट’ व ‘आम्ही 99 टक्के’ या चळवळीत मांडले आहेत.

जागतिकीकरणाच्या पस्तीस वर्षांनंतर सिंहावलोकन केले, तर जागतिक पातळीवर हेच दिसते की, भाई जे म्हणत होते तसेच घडले आहे.

भारतात अडीच लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आर्थिक वृद्धीचा दर वाढला, पण रोजगार घटला, आर्थिक विषमतेचे वास्तव ‘ऑक्सफाम’चे अहवाल दाखवत आहेत. मानव विकास निर्देशांक, भूक निर्देशांक आदींमध्ये जगात भारताची क्रमवारी शंभराच्या पुढे आहे. भाई द्रष्टे होते. नव्वदच्या दशकात जागतिकीकरणाचे समर्थन करणारे, अर्थशास्त्रज्ञ, व्यवस्थापक तज्ज्ञ हे 2010 नंतर जागतिकीकरणाच्या धोरणाचा पुनर्विचार करण्याची गरज बोलून दाखवू लागले होते. भाईंचे हे काळाच्या पुढे पाहणे होते.

विचारांचा कस हा प्रतिकूल परिस्थितीतच लागतो. अनुकूल वातावरणात अनेक हौशे-नवशे-गवशे दिंडीत सामील होतात, पण वादळात ‘हाडाचा कॅप्टन’ जहाज सोडत नाही. निर्भयपणे व आत्मविश्वासाने तो वादळाला तोंड देतो व किनारा गाठतो! भाई या प्रकारचे ‘कॅप्टन’ होते! जागतिकीकरणाच्या त्सुनामीत भाईंनी समाजवादी विचारांचे जहाज सोडले नाही व सुरक्षितपणे किनाऱ्यावर आणले आहे. कारण त्यांची समाजवादावर निष्ठा होती, पण ते पोथीनिष्ठ समाजवादी नव्हते. म्हणूनच त्यांच्या विचारांवर मार्क्स, गौतमबुद्ध, महात्मा गांधी, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांची एकत्रित छाप आहे. त्यांच्या मते, समाजवाद हा प्रवाही विचार आहे. त्यांना शेवटच्या टप्प्यावर पुरेसा वेळ मिळाला असता, तर ‘चौथी औद्योगिक क्रांती व समाजवाद’ या विषयावर त्यांनी मूलगामी भाष्य केले असते, हे नक्की आहे!

डाॅनियल बेल यांच्या ‘एंड ऑफ आयडिऑलॉजी’ या मुद्द्याचा फोलपणा एका चर्चेत भाईंनी ‘होकायंत्र व सुकाणू’ यांचे उदाहरण देऊन फार छान स्पष्ट केले होते. समुद्रात प्रवास करताना दिशा कळत नाहीत, म्हणनू प्रवासाची दिशा निश्चित करण्यासाठी खलाशाला ‘होकायंत्र’ उपयोगी पडते आणि प्रत्यक्ष प्रवास करण्यासाठी ‘सुकाणू’ असते. समाज विकासात ‘विचारधारा’ हे ‘होकायंत्र’ आहे व ‘तंत्रज्ञान’ हे ‘सुकाणू’ आहे. होकायंत्र न घेता जहाजाने प्रवास सुरू केला, तर सुकाणूच्या साह्याने जहाज समुद्रात भरकटल्याशिवाय राहणार नाही.

समाजात प्रगती कोणाची व कशी करायची याचे उत्तर विचारधारा देते, साध्य निश्चित करते व तंत्रज्ञान हे प्रगतीचे साधन आाहे. साधनाचा वापर विवेकपूर्ण करण्याचे भान विचारधारा देते. सध्याच्या पर्यावरणाचा प्रश्न हा तंत्रज्ञानाच्या विवेकहीन वापरामुळे निर्माण झाला आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.

पर्यावरणाच्या ऱ्हासाचे उत्तर गौतम बुद्धांच्या ‘तृष्णा’ या तत्त्वज्ञानात आहे व महात्मा गांधींच्या विचारांत आहे! विचारधारा सोडून देणे म्हणजे, भर समुद्रात होकायंत्र फेकून देण्याचा प्रकार होईल, असा इशारा भाईंनी दिला होता.

समाजवाद किंवा कल्याणकारी राज्यव्यवस्था याबद्दल भाई जागतिकीकरणाच्या प्रारंभापासून बोलत होते. आता तेच विचार अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी 29 एप्रिल 2021च्या अमेरिकन काँग्रेस समोरच्या पहिल्या भाषणात मांडले आहेत. हेच भाईंचे काळाच्या पुढे पाहणे आहे!

भारतातील ‘भांडवलशाही व संप्रदायवाद’ यांच्या विरोधात ‘पँथर ते नक्षलवादी’ यांनी एकत्र येण्याची गरज भाईंनी फार पूर्वी बोलून दाखवली होती. हा विचार अनेकांनी हसण्यावारी नेला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व मोदी यांचे प्रस्थ वाढण्याचे प्रमुख कारण पुरोगामी चळवळीतील फाटाफूट हेच आहे, हे परत परत सिद्ध होत आहे. सध्याच्या वाढत्या ‘फॅसिस्ट’ वातावरणात ‘भारतीय संविधान’ वाचविण्यासाठी ‘लोकशाही समाजवादी’ विचारांच्या सर्व छटांच्या लोकांनी किमान समान कार्यक्रमासाठी एकत्र येण्यापलीकडे पर्याय नाही, हेच सध्या दिसून येत आहे. बऱ्याच वेळेला असे म्हटले जाते की, ‘संघर्ष हा चूक आणि बरोबर यात जास्त नसतो; तर दोन बरोबरमध्ये जास्त होतो’. हेच आपण भारतात आज अनुभवत आहोत!

महात्मा गांधी व डॉ. आंबेडकर यांच्यातील द्वंद्व हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक स्वतंत्र प्रकरण आहे. याची चर्चा पूर्वी फारशी होत नव्हती. गं. बा. सरदारांनी या विषयावर सन 1985 च्या सुमारास तीन भाषणे दिली होती. भाईंनी गांधी-आंबेडकर विवाद आवश्यक आहे का, असा प्रश्न उपस्थित करून समन्वयाची भूमिका अधोरेखित केली आहे. डॉ. रावसाहेब कसबे यांनी हीच चर्चा पुढे नेली आहे. भविष्यात गांधी व आंबेडकर विचारांचे ‘सिंथेसिस’च भारताला मार्गदर्शक ठरेल, हा मुद्दा भाईंनी आग्रहाने मांडला आहे.

फुले-शाहू-आंबेडकरी विचारांचे पाईक असल्यामुळे भाईंना सामाजिक विषमता, सामाजिक न्याय या विषयाबद्दल आत्मीयता होती. हमीद दलवाईंच्या मुस्लीम सत्यशोधक मंडळाची स्थापना भाईंच्या घरी झाली होती. भाई मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे आधारवड शेवटपर्यंत राहिले होते. मंडल आयोग लागू झाल्याबरोबर इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाची गरज, आकडेवारीच्या साह्याने विशद करणारी सोपी पुस्तिका मराठीत भाईंनी प्रसिद्ध करून, मंडल आयोगाला जाहीर पाठिंबा दिला होता. या पुस्तिकेच्या लाखभर प्रती महाराष्ट्रात विकल्या गेल्या आहेत! भटक्या विमुक्तांच्या चळवळीला भाई ‘आपले’च वाटतात, तर आंबेडकरी चळवळीला भाई ‘हक्काचे’च होते!

भाईंनी आपल्या आयुष्याची शेवटची वीस वर्षे शिक्षण चळवळीसाठी खर्च केली आहेत. शिक्षणाचा प्रश्न कितीही महत्त्वाचा असला, तरी राजकीय पर्यावरणात तो विषय ‘उपेक्षित’च असतो. भाईंनी शिक्षण विषयात लक्ष घातल्यामुळे तो विषय चळवळीच्या अग्रभागी आला, हे त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे. भारतात शिक्षण चळवळ म्हणजे ‘शिक्षकांची पगारवाढीची चळवळ’ असे स्वरूप आले होते. 1990 च्या जागतिकीकरणामुळे भारतातील शिक्षण व्यवस्था उद्‌ध्वस्त होत होती. शैक्षणिक विषमता, प्रचंड महाग  शिक्षण, शिक्षणाचे बाजारीकरण, कंपनीकरण, नफेखोरी, सरकारचा शिक्षणातून काढता पाय, शिक्षण उद्योजक व शिक्षण माफीया यांचा उदय व सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेची उपेक्षा, गुणवत्तेचा ऱ्हास आदींमुळे शिक्षण व्यवस्था विकृत होत होती! याचा परिणाम म्हणून बहुजन समाज शिक्षणातून बाहेर फेकला जात होता.

शिक्षक चळवळीला या प्रश्नाचे तेव्हा भान येत नव्हते. पण भाई हे पहिले होत. त्यांनी जागतिकीकरणाच्या परिप्रेक्ष्यात शिक्षण धोरणाचे विश्लेषण केले व शिक्षण व्यवस्थेतल्या विकृतीचे प्रमुख कारण जागतिकीकरणाचे नवे आर्थिक धोरण आहे. हे राजकीय, आर्थिक व सामाजिक अंगाने मांडत, जागतिकीकरणाचे धोरण बदलल्याशिवाय शिक्षणातील विकृती नष्ट होणार नाही, याची जाणीव सर्वांना करून दिली. त्यांनी ‘बहुजन सामाजाचा शिक्षण हक्क’ हा मुद्दा चळवळीच्या केंद्रस्थानी आणला, हे क्रांतिकारक कार्य आहे! महात्मा गांधींनी मिठाचा संबंध भारताच्या स्वातंत्र्याशी जोडला होता, तर भाईंनी बहुजनांच्या शिक्षण हक्काचा मुद्दा जागतिकीकरण विरोधी चळवळीशी जोडला आहे.

भाईंनी भारतातल्या शिक्षण चळवळीला तीन उद्दिष्टे दिली आहेत. एक, के.जी. ते पी.जी. मोफत, समान व गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क प्रत्येक बालकाला मिळाला पाहिजे. दोन, विना अनुदान धोरण रद्द झाले पाहिजे. तीन, राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान सहा टक्के गुंतवणूक शिक्षणासाठी झाली पाहिजे. नेहमीप्रमाणे या मागण्या अव्यवहार्य आहेत, अशी टीका भाईंवर सन 2000 मध्ये केली गेली. पण भाई इथेही काळाच्या पुढे होते. शिक्षण व्यवस्थेचा आंतरराष्ट्रीय आढावा घेतला, तर जगात अनेक देशांत, अगदी भारतापेक्षा मागास देशांत मोफत शिक्षण दिले जाते. दिल्लीमधील आपच्या सरकारचा शैक्षणिक प्रयोग हेच दाखवतो, की मुद्दा निधीच्या अभावाचा नाही तर राजकीय इच्छाशक्तीचा आहे. लोकशाहीत अहिंसक मार्गाने बदल घडवून आणण्यासाठी जनआंदोलन हाच मार्ग असतो, म्हणून भाईंनी ‘अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभे’ची स्थापना केली. अध्यापक सभेच्या माध्यमातून त्यांनी वयाच्या पंचाऐंशीव्या वर्षी बहुजनांच्या शिक्षण हक्कासाठी तीन सत्याग्रह केले. भारताच्या इतिहासात पगारवाढीसाठी सत्याग्रह झाले आहेत, पण मुलांच्या शिक्षण हक्कासाठी झालेले हे पहिले सत्याग्रही आहेत! भाईंनी शिक्षण चळवळीला नवी दृष्टी व नवी दिशा दिलेली आहे. त्यांचा हा शैक्षणिक समाजवादाचा ध्यास होता.

भारतासारख्या देशात ‘समाजवादी पक्ष’ नसणे याबद्दल भाईंना सतत खंत वाटत असे. म्हणून समाजवादी जनपरिषदेचा प्रयत्न त्यांनी केला, तो फारसा यशस्वी झाला नाही. तरीही शेवटची तीन-चार वर्षे त्यांनी परत ‘सोशालिस्ट पार्टी’ स्थापन करून त्याच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. समाजवादावरची निष्ठा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

भाईंची ही धडपड अनेकांनी हसण्यावारी नेली असली, तरी समाजवादी जनआंदोलनाला लोकसभेत व विधानसभेत स्वत:चे प्रतिनिधी नाहीत, स्वत:चा आवाज नाही, हे वास्तव आहे, या मर्यादेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

भाईंचे वाचन हे फार अद्ययावत असायचे. त्यामुळे त्यांचे प्रत्येक भाषण वेगवेगळे असायचे. प्रत्येक भाषणात नवे, ताजे संदर्भ असायचे. निधनाआधी आठ दिवस त्यांनी How Will Capitalism End?  हे पुस्तक वाचायची सूचना केली होती. भाईंच्या ‘चाइल्ड लाइक’ स्वभावाचे दर्शन त्यांच्या बरोबरच्या अनौपचारिक चर्चेत नेहमी व्हायचे. त्यांनी एस. एम. ना गुरू मानले होते. अण्णांसारखेच भाईही कणखर व मृदूही होते. त्यामुळे समाजातल्या सर्व विचारांच्या व सर्व वयांच्या लोकांबरोबर त्यांचे आपुलकीचे संबंध होते. भाईंचे भक्त न होता, त्यांचे अनुयायी होणे, हीच काळाजी गरज आहे.

(भाई वैद्य यांच्या शैक्षणिक भाषणांचे संकलन असलेले पुस्तक ‘समाजवादी शिक्षणासाठी लढा’ या नावाने येत्या 22 जूनला भाईंच्या 93 व्या जयंतीदिनी प्रकाशित होत आहे. अ.भा. शिक्षणहक्क सभा यांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे संपादन डॉ.शरद जावडेकर, प्राचार्य रमेश पाटील व सुरेखा खरे यांनी केले आहे.)

Tags: नवे पुस्तक भाषण समाजवादी चळवळ सुरेखा खरे प्राचार्य रमेश पाटील डॉ.शरद जावडेकर अ.भा. शिक्षणहक्क सभा भाई वैद्य समाजवाद bhai vaidya weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शरद जावडेकर
sharadjavadekar@gmail.com

संघटक, अखिल भारतीय समाजवादी शिक्षणहक्क सभा


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके