डिजिटल अर्काईव्ह

अरुंधती रॉयची जातिविरोधी प्रेमाची शाश्वत कादंबरी

भारतीय समाज ब्रिटिश अमदानीपासून जात-वर्गीय व्हायला सुरुवात झालेली असली, तरी तो अजून मूलभूतपणे जातीयच राहिला आहे. म्हणून जातीय विरोध वरचढ राहतात. रॉय जेव्हा पॅरेडाईझ पीपल्स च्या कामगारांचे वेलूथा या अस्पृश्य परवनूबद्दलचे वैमनस्य दाखवतात.

अरुंधती रॉयच्या 'द गॉड ऑफ स्मॉल विंग्जस्' (1997) या शाश्वत कांदबरीचे परीक्षण मी दोन कारणांसाठी लिहीत आहे. पहिले कारण म्हणजे, भारतीय कम्युनिस्टांनी विशेषतः केरळमधल्या, वैमनस्यभावी प्रतिक्रिया यासाठी दिली आहे की ती कम्युनिस्ट चळवळी, तिच्या नेत्यांचे व कार्यकर्त्यांचे विकृत चित्रण करते. दुसरे कारण म्हणजे, कम्युनिस्टेतर परीक्षकांच्या या कादंबरीचे खरे महत्त्व लक्षातच आले नाही.

उलटा सूड

मी जातिविरोधी असलो, तरी कम्युनिस्टच आहे. मला या कादंबरीत कम्युनिस्टविरोधी काहीच आढळले नाही. केरळीय हे कॉ.ई.एम.एस. नंबुद्रीपादांना भारताचे माओ म्हणत असल्याचे रॉय अनेकदा म्हणतात, पण उपहासाविना, नंबुद्रिपादांनी 'नक्षलवाद्यांना पक्षातून काढून टाकले आणि (लोकांचा) राग संसदीय उद्दिष्टाला जुंपायचे काम पुढे चालवले (पा.61), हे रॉयचे भाष्य वास्तवतेला सोडून नाही. कॉ.के.एन.एम,पिल्ले हे इतर सर्व कम्युनिस्ट व मार्क्सवाद्यांप्रमाणे जातीचे वर्गाशी समीकरण करतात आणि ओबीसी म्हणून अस्पृश्यता पाळतात. हे खुद्द केरळच्याही वस्तुस्थितीविरोधी नाही.

कॉ.बी.टी.रणदिवे हे साठीमध्ये माझ्या जिल्ह्यातील साक्री तालुक्यात अभ्यासशिबीर घ्यायला आले तेव्हा ते मला म्हणाले, की उत्तर प्रदेशचा राज्य सेक्रेटरी अस्पृश्य पक्षकार्यकर्त्यांना घरात येऊ न देता त्यांची अंगणातूनच बोळवण करतो. आदल्या दिवशी मी महाराष्ट्रातील सत्यशोधक व ब्राह्मणेतर चळवळीचे विवरण केले हे मी त्यांच्या चौकशीला उत्तर देताना सांगितल्यावर त्यांनी वरील उद्गार काढले, हे येथे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी माझे अभिनंदन केले आणि ते म्हणाले की पक्षाच्या अभ्यासशिबिरात हा विषय पहिल्यानेच घेतला जात आहे. त्यांच्या मृत्युपूर्वी झालेल्या सिटू परिषदेपुढील अध्यक्षीय भाषणात त्यांनी सिटू पुढाऱ्यांना इशारा दिला, की त्यांनी चतुर्थ श्रेणीच्या कामगारांच्या... जे दलित, आदिवासी व धार्मिक अल्पसंख्याक आहेत- प्रश्नांना अग्रहक्क दिला नाही, तर डाव्या ट्रेड युनियन चळवळीची मूत्युघंटा वाजेल. त्यांचे हे भाषण 'पीपल्स डेमॉक्रसी' या त्यांच्या पक्षाच्या मुखपत्रात वर्षभरानंतर प्रसिद्ध झाले. त्यांचा हा इशारा केरळीय सिटू पुढाऱ्यांना तेवढाच लागू आहे. तो अजून दुर्लक्षित आहे आणि भारतीय कामगारवर्गाची आर्थिक सर्वहारा(सवर्ण) व सामाजिक सर्वहारा (अवर्ण) अशी फाळणी व्हायला हे दुर्लक्ष कारणीभूत झालेले आहे. 'जगातील कामगारांनी एक व्हा ही महाघोषणा भारतात अशा प्रकारे अंमलात आली आहे.

भारतीय समाज ब्रिटिश अमदानीपासून जात-वर्गीय व्हायला सुरुवात झालेली असली, तरी तो अजून मूलभूतपणे जातीयच राहिला आहे. म्हणून जातीय विरोध वरचढ राहतात. रॉय जेव्हा पॅरेडाईझ पीपल्स च्या कामगारांचे वेलूथा या अस्पृश्य परवनूबद्दलचे वैमनस्य दाखवतात.(पा.97). आणि केरळीय जनतेचा जातीय पिंड चित्रित करतात, तेव्हा ते केरळीय कम्युनिस्ट व जनता यांचा उपमर्द करण्यासाठी नसते. शोषणपीडनाच्या ज्या सनातन व्यवस्थेविरुद्ध कम्युनिस्टांचा वर्गीय कर्मठपणा त्यांना लढू देत नाही, ती त्यांचे व्यक्तिगत वर्तन विकृत करणारच. ही ती भूमी आहे जिच्यातून परवन् ख्रिश्चन वेलूथा या सीरियन ख्रिश्चन अम्मू यांची महाशोकांतिका अटळपणे आकार घेते. ते दोघे, विशेषतः कॉ. वेलूथा, या शोकांतिकेचे बळी आहेत हा तो उलटा सूड आहे, जी भारतीय कम्युनिस्ट चळवळीला झपाटत आहे.

सौंदर्यशास्त्रीय अनित्यतावाद

आज भारतीय चित्रात वर्ग हा जाणिवेत आहे तर जात ही नेणिवेत. याला आंबेडकरवादीही अपवाद नाहीत. कारण त्यांनी जात्यांतावर पाठ फिरविली आहे.

बौद्ध महाभिक्षू दार्शनिक वसुबंधु (चौथ्या शतकाचा पूर्वार्ध) याने जगात सर्वप्रथम मानवी चित्राच्या या अनित्यात्मक एकजुटीची व्याख्या केली आणि त्यांचे नामकरण चित्त- संप्रयुक्त (जाणीव) व चित्तवप्रयुक्त असे केले. टॉईनवी 'चूज लाईफ'(1976) मध्ये सांगतो नेणीव ही निःसंदिग्धपणे काव्य व धार्मिक अंतर्ज्ञान यांचा स्रोत आहे. (पा,26). पण, नेणीव ही जाणिवेशिवाय स्वतःला अभिव्यक्त करू शकत नाही; म्हणून, नेणिवेला जाणिवेपासून असे वेगळे काढणे चुकीचे आहे. वसुबंधूंचा महाशिष्य दिग्गज (चौथ्या शतकाचा उत्तरार्ध) हा पुन्हा जगात पहिला होता, की ज्याने विचाराच्या सर्व महान अपत्यांची जननी असलेली प्रतिमा म्हणजे नेणीव व जाणीव यांचा फलदायी संघर्ष अशी व्याख्या केली. म्हणून नेणिवेच्या भूमिकेकडे कोणत्याही प्रकारे दुर्लक्ष केले. की त्याचा परिणाम खुद्द सृजनशीलतेवर होतो. अशा प्रकारे दिग्नागप्रेरित सौंदर्यशास्त्र हे कलाकृतीच्या केवळ ठावग्राही आस्वादा- करताच उपयुक्त नाही, तर सृजनशीलतेची उच्यतमता गाठण्यासाठीही उपयुक्त आहे. भारतीय दारिद्र्य वर्गमूलक नसून जातिमूलक असल्याच्या भारतीय अर्थशास्त्राच्या मूलभूत नियमाची रॉयना जाणीव नाही. तरीही त्या अरबी मध्य आशियात न मेलेल्या अस्पृश्यांच्या विदारक दारिद्र्याचे वर्णन करतात. (पा.207,इ.)

ख्रिश्चन धर्मांतराने अस्पृश्यांच्या जातीय दुरवस्थेत काहीही फरक पडलेला नाही याचे त्या साक्षात चित्र उभे करतात. (पा.74). सीरियन ख्रिश्चन आंग्लगंडाने पछाडलेले असल्याचे त्या दाखवतात (पा.36. 42, 52), अम्मूचे कुटुंब अभिमानाने शेक्सपिअरच्या नाटकांची उद्धरणे देते. पण, अथेल्लोला मात्र वगळलेला आहे. साम्राज्यवादी 'टेम्पेस्ट (वादळ) त्याला कारणीभूत झालेले असावे. शेक्सपिअरने आथेल्लो व देस्देमोना यांचे प्रेम वंशभेदाच्या विरोधाविषयी पूर्ण बेखबर राहून पुरुषसत्ताक पद्धतीने रंगवले आहे. गोरी पंट्रिशिअन देस्देमोना तिचा कृष्णवर्णीय मूर पती आथेल्लो याच्या हातून मृत्यूकडे मूक अजापुत्रासारखी जाते. रॉयनी अम्मू व वेलूथा यांचे प्रेम असेच जातविरोधातीतपणे रंगवले आहे. रॉयवर प्रभाव 'चेम्मीन मधील मोपला पुरुष व हिंदू कोळीण यांच्या शोकान्त रोमान्सचा पडलेला आहे हे उघड आहे.(पू.218), पण, हे प्रेम पूर्व अस्पृश्य मुसलमान व हीनजातीय हिंदू कोळीण यांच्यातले असल्याचे दृष्टीआड करता येत नाही. ब्राह्मणपूर्वज असलेली अम्मू व अस्पृश्य परवन् वेलूथा हे प्रेमात पडल्याबरोबर शत्रुभावी जातिविरोध पूर्ण अदृश्य होतो. ते केवळ एक स्त्री व एक पुरुष, दोन शरीरशास्त्रीय व्यक्ती बनतात. प्रेम कितीही मोठे असो, ते शत्रुभावी विरोधाला नामशेष करीत नाही, तर त्याचे विधायक नकारकरण करते. आणि मग कलात्मक कारागिरीवरही परिणाम होतो. शेवटचे, 21 वे प्रकरण उपरे ठरते.

केरळने त्याच्या सामाजिक सर्वहाराचा मोक्याचा खंड अरब देशांत पाठवून त्याचा जात्यंतक क्रांतिकारी संघर्ष लांबणीवर टाकला आहे आणि त्याची पोकळी निराळ्या वर्गसंघर्षाने भरून काढली आहे, जो संसदीयवादाच्या चिखलात रुतून पडणे अपरिहार्य होते. बदनाम करून परित्याग केलेल्या जात्यन्तक संघर्षाने उलटा सूड घेत नायर नायनार व एळुआ अच्युतानंदन् गटांची पक्षांतर्गत जातीय यादवी विकोपाला नेली आहे. पण देशभरची जातिव्यवस्था आसन्नमरण झाली आहे. रॉयच्या कादंबरीचे अनन्य महत्त्व हे की तिने या शोकान्त प्रेमकथेतून वर्तमान केरळीय समाजाच्या पार्श्वभूमीवर शत्रुभावी जातिविरोधाची विनाशक परिनिष्यत्ती प्रभावीपणे चित्रित केली आहे. अशा प्रकारे ती भारतीय साहित्यात एका नव्या युगाचे उद्घाटन करते,

केरळ ही प्राचीन स्त्रीसत्तेची व प्रचलित मातृवंशकतेची अभिजात भूमी आहे. अरुंधती ही वसिष्ठाची चांडाल देवपत्नी होती. तिचे दुसरे नाव अक्ष-माता. अक्ष व चौपट हे प्राचीन स्त्रीसत्तेचे निऋतीने शोधून काढलेले गणभूमीच्या समान वाटपाचे साधन होते. तिच्यापासून महान अब्राह्मणी तंत्रपरंपरा जन्माला आली आणि योगिनी व सिद्धांनी ती आधुनिक काळापर्यंत आणली. 'कनिष्ठ वस्तूंचा देव' या महान समता परंपरेचे सूत्र पुढे चालवतो. 

Tags: शरद पाटील sharad patil अरुंधती रॉयची जातिविरोधी प्रेमाची शाश्वत कादंबरी  arundahti roychi jativirodhi premachi shashvat Kadambari साहित्य परिचय साहित्य विशेष sahitya parichay sahitya vishesh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक




साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी