डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

नर्मदा बचाव आंदोलनानं 1992 मध्ये नर्मदेच्या खोऱ्यात पहिली जीवनशाळा सुरू केली. चिमलखेडीला. आज, 2020 मध्ये महाराष्ट्रात 7 आणि मध्य प्रदेशात 2 जीवनशाळा आहेत. अतिशय दुर्गम भागात या शाळा आहेत. त्या सुरू करण्याचं मुख्य कारण म्हणजे, आदिवासींच्या शिक्षणाबाबतची सरकारी अनास्था. आजही गावातले लोक सांगतात की, या गावांमध्ये सरकारी शाळा फक्त कागदावर होत्या. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे- फक्त या तीन दिवशी शिक्षक गावात दिसायचे; कारण तेव्हा आपल्या स्वतंत्र, सार्वभौम भारताचा झेंडा सगळीकडे फडकवायचा असतो. भारतीय लोकशाही आणि राष्ट्रप्रेम याचं निव्वळ एक प्रतीक! ध्वजवंदन! तरीही शिक्षकांना त्यांचे संपूर्ण पगार, भत्ते वर्षानुवर्ष मिळत होते; पण शाळा सुरू का नाहीत, शिक्षक शिकवायला का जात नाहीत हे कुणीच विचारत नव्हतं. असलेली परिस्थिती यथावत्‌ ठेवली तर शासनकर्त्यांच्या ते पथ्यावर पडतं, कारण मग लोक, असेल ते स्वीकारून गप्प बसतात.

साधारण पन्नास माणसं असू आम्ही त्या बोटीत. मोटारबोटीचा खणखण आवाज, त्यात मेधाताईंची, सर्व पाहुण्यांपर्यंत शक्य तितकी माहिती पोहोचावी यासाठी सुरू असणारी धडपड. तिथल्या वातावरणाशी कुठल्याही प्रकारे संबंधित नसलेल्या बोटीच्या त्या खणखण आवाजात मेधा पाटकर मेगाफोनवरून सांगतात की, आत्ता आपण जातोय त्या पाण्याखाली निमगव्हाण हे गाव होतं. मग तिथं केलेला संघर्ष, सहन केलेला अत्याचार त्या सांगत राहतात. आपण कोण्या एका गावाच्या ‘वरून’ जातोय, ही कल्पनाच शहारे आणणारी होती. म्हणजे कोणे एके काळी इथंच कुणा-कुणाची घरं असतील, अंगण असेल, शेती असेल, गोठे असतील.... या पाण्याखाली?... या नव्यानं तयार झालेल्या विशाल जलाशयाच्या कवेत?

नर्मदेच्या खोऱ्यात जाण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. वीस वर्षांपूर्वी केलेल्या MSW च्या आधारावर मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत वेगवेगळी कामं करते आणि documentary films पण बनवते, सामाजिक विषयांवर. त्यामुळं, नर्मदा बचाव आंदोलन हे काही नवं नव्हतं. खेडी, गावं, त्यांचे प्रश्न हेदेखील खूप जवळून पाहिलेले. पण नर्मदेच्या खोऱ्यात जाणं, हे काही तरी विलक्षण होतं- तेदेखील मेधाताई स्वतः सोबत असताना. 

माझं MSW गुजरातमध्ये झालं, त्यामुळं नर्मदेच्या लढ्याबद्दल आम्हाला सकारात्मक रीतीनं कधीच सांगण्यात आलं नव्हतं. त्यामुळंदेखील असेल, पण तेव्हापासून माझं मन नर्मदेत गुंतलं होतं. आदिवासी, शिक्षण, जंगल, नदी हे आधीच जिव्हाळ्याचे विषय; त्यातदेखील मेधाताई या व्यक्तीविषयी एक कुतूहल होतंच. मनापासून चांगल्या भावनेनं प्रेम केलं की, कधी ना कधी, कुठल्या ना कुठल्या मार्गानं आपण तिथं पोचतोच- हा माझा विश्वास अजून दृढ झाला, जेव्हा नर्मदेच्या खूप जुन्या कार्यकर्त्या विजयाताई चौहान ह्यांचा निरोप आला की ‘आमच्या जीवनशाळांच्या शिक्षकांचं प्रशिक्षण घेशील का?’ खुद्द नर्मदेनं दिलेली ती पहिली हाक होती बहुधा किंवा तेव्हा मला ती पहिल्यांदा ऐकू आली होती.  

प्रशिक्षक आणि फिल्ममेकर दोन्ही असणं हे खूप कठीण काम असतं. फिल्ममेकरनं पूर्ण तटस्थ राहून जे घडतंय ते फक्त टिपून घ्यायचं आणि नंतर एडिट करून ते इतरांसमोर मांडायचं असतं, तर प्रशिक्षकानं आपलं ज्ञान आणि कौशल्य वापरून त्या-त्या भवतालाचं ज्ञान व कौशल्य वाढवायचं काम करायचं असतं. इथं मी गेले ती प्रशिक्षक म्हणून, पण परतले ती विद्यार्थी बनून! 

नर्मदेच्या खोऱ्यात निसर्गानं स्वतःला ओतलंय, त्यामुळं माझ्यातला फिल्ममेकर किडा लगेच बाहेर डोकावला. आणि प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर- तिथलं एकूण ज्ञान, खडतर आयुष्य, 35 वर्षे चाललेला लढा, आंदोलनाची गाणी, एकेका माणसाचं म्हणणं, मेधाताई, या सर्वांपुढे आपण काय प्रशिक्षण देणार, काय नवं सांगणार, हा विचार जास्त बळावला आणि मी प्रशिक्षकाची भूमिका दुय्यम पातळीवर ठेवून आधी फिल्म बनवण्याचा निर्णय घेतला. 

मणिबेली...! सरदार सरोवराच्या पाण्याखाली बुडालेलं पाहिलं गाव. त्या संघर्षाला 25 वर्षे होत होती, म्हणून देशभरातून आलेल्या समर्थकांना घेऊन मणिबेलीला जायचं आणि सभा घ्यायची, असा आंदोलनाचा कार्यक्रम होता. त्या प्रवासात मी होते, पन्नासेक माणसांसोबत. मोटारबोटीत बसून, सरदार सरोवराचं ते विशाल जलाशय चिरत आम्ही मणिबेलीकडे निघालो होतो. सगळंच इतकं विस्तीर्ण आहे की, कुठून सुरू करावं हे लगेच कळत नव्हतं. मी विचार केला- आपण आत्ता या पाण्यात उडी मारली आणि खोल-खोल आत गेलो, तर मला दिसतील का ती जुनी घरं? ते अंगण? त्यात बांधलेला झोपाळा? अगदीच तळ गाठता आला तर ती जुनी नर्मदा पण दिसेल कदाचित! तिचं खडकाळ पात्र, आजूबाजूला असलेल्या सातपुडा पर्वतरांगांचा पायथा, जिथून ती नर्मदा वाहत होती... ते शूलपाणेश्वर, हापेश्वर मंदीर- ज्याच्या पायऱ्यांवर बसून आंदोलनाच्या सुरुवातीच्या बैठका व्हायच्या... की ते सगळं विरघळून गेलं असेल एव्हाना, या एवढ्या मोठ्या जलाशयात? मला नजरेसमोर ती दृश्यं दिसू लागली की, मी पाण्याखाली आहे आणि समोरून आदिवासी घरांची मोठाली लाकडं, वासे, कुडाच्या भिंती, झोपाळे, भांडीकुंडी, मुलांची खेळणी, गोधड्या पाण्यासोबत वाहून जात आहेत. सातपुड्याचा पायथा मेणबत्तीच्या मेणासारखा वितळतो आहे आणि ती माती खाली-खाली जमा होत जातेय!

तेवढ्यात अचानक बोटीवरच्या सहप्रवासी कार्यकर्त्याच्या आवाजानं मी भानावर आले, ‘‘तिकडे घ्या बोट, तिकडे... किनाऱ्यावर घ्या.’’ बोटीतली सर्व मंडळी त्या दिशेला बघू लागली. खूप दूर, समोर दिसणाऱ्या अगदी पलीकडच्या डोंगरमाथ्यावर थोडी हालचाल दिसू लागली. नेमकं कळत नव्हतं की काय घडतंय? कागदावर पसरवलेल्या हिरव्या रंगावर जर निळी रेघ आखली तर जसं दिसेल, तसं काहीसं दिसायला लागलं. जे डोळ्यांना उमगत नाही, ते कॅमेऱ्याला कसं कळेल? हळूहळू ती निळी रेष त्या विस्तीर्ण हिरवळीवर उमटू लागली, पुढे-पुढे सरकू लागली. अजूनही नेमकं कळत नव्हतं की, आपण जे बघतोय ते काय आहे? दुरून साद आल्यासारखा अस्पष्टसा आवाज कानांवर पडू लागला. ‘‘लडाई पढाई साथ साथ...’’ अखेर आमची बोट किनाऱ्यावर थांबली. इंजिनचा खडखडाट बंद झाला आणि अगदी जवळच्या डोंगरावर, समोर जे दिसू लागलं ते अद्‌भुत होतं. निळा गणवेश घातलेली ती जीवनशाळेची मुलं होती, डनेल गावच्या जीवनशाळेची. नर्मदा बचाव आंदोलनानं सुरू केलेल्या आणि अनाहतपणे चालू ठेवलेल्या जीवनशाळेची. एका रांगेत, एकामागून एक चपळाईनं पण शांतपणानं डोंगर उतरून समोर येत होती- बोटीत बसलेल्या आम्हा कोणालाही माहिती नसलेल्या, पण खूप जुन्या काळापासून अस्तित्वात असलेल्या त्यांच्या या ‘डनेल’ नावाच्या गावात आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करायला!

आम्ही खूप खाली होतो, डोंगराच्या पायथ्याशी, आणि समोर होता उरला-सुरला डोंगर, निम्म्याच्या वर- तो सरदार सरोवराच्या पाण्याखाली गेलेला. आम्हाला मणिबेलीला जायचं होतं. डनेल हे गाव आजच्या नियोजनात नव्हतं. आम्हाला इथं उतरायचंदेखील नव्हतं. फक्त खालून वर, डोंगराच्या आडव्या कडेवर ओळीनं उभ्या असलेल्या या निळ्या पाखरांकडं आम्ही डोळे विस्फारून बघत होतो... जोरदार घोषणा देऊन झाल्या आणि आम्ही निघालो. म्हणजे? बस, इतकंच? आता? ही मुलं परत जाणार? मग आलीत कशाला?- असं थोडीच असतं? पण आम्ही निघालो. मी बोटीच्या मागच्या बाजूला जाऊन बसले आणि दूर-दूर जाणाऱ्या त्या मुलांच्या अस्फुट होत जाणाऱ्या घोषणा कानांत साठवून घेऊ लागले... पण थोड्याच वेळात ती निळी रेषा धूसर होत गेली, त्यांच्यापासूनच्या अंतरामुळं असेल किंवा डोळ्यांत तरळून आलेल्या पाण्यामुळं. 

मला अजूनही कळत नव्हतं की, आत्ता जे बघितलं- ती अचानक उमटत समोर आलेली निळी रेघ- ते स्वप्न होतं की वास्तव? असं अचानक ते माझ्या नजरेला दिसलं की मनाला? ही माझी कल्पना तर नक्कीच असू शकत नव्हती कारण इतकी सुंदर संकल्पना फक्त अज्ञातालाच जमू शकते. मी त्या अवास्तव वाटणाऱ्या स्वप्नाच्या मागं जायचं ठरवलं.  

ते सगळं स्वप्नवत्‌च आहे. इतक्या दुर्गम भागात लोक राहतात काय, पस्तीस-पस्तीस वर्षे अहिंसक लढा सुरू ठेवतात काय... मुंबईचं आपलं आयुष्य, घर, सगळं सोडून या मेधाताई आपलं संपूर्ण आयुष्य इथल्या लोकांसाठी समर्पित करून टाकतात काय! नर्मदा बचाव आंदोलन सुरू होऊन 34-35 वर्षे झालीत, तसंच मेधातार्इंनी जीवनशाळा सुरू करूनदेखील 25 वषर्य झालीत. म्हणजे संघर्षाच्या बरोबरीनं आंदोलनाचा नवनिर्माणाचा विचार तेव्हापासूनच होता म्हणायचा. शाळेच्या आवारात पाऊल टाकणारी नर्मदेच्या खोऱ्यातली आजची ही तिसरी पिढी. म्हणजे मेधाताई तिथं गेल्या तेव्हा जी पिढी होती, तिला शाळा नावाच्या गोष्टीची ओळखदेखील नव्हती. अगदी सुरुवातीला म्हशीच्या पाठीवर खडूनं लिहून तिथल्या मुलांसाठी ‘वर्ग’ भरायचे. हळूहळू शाळा म्हणून जी गोष्ट रूप घेऊ लागायची, ती लगेच सरदार सरोवराच्या पाण्याखाली जायची. मग शाळा पुन्हा नव्यानं सुरू करायची! जीवनशाळेची मुलं संघर्ष, न्याय, आंदोलन, हक्कांसाठी लढा, भ्रष्टाचाराचा विरोध या सर्वांचं बाळकडू घेऊनच मोठी होतात.  

नर्मदा बचाव आंदोलनानं 1992 मध्ये नर्मदेच्या खोऱ्यात पहिली जीवनशाळा सुरू केली. चिमलखेडीला. आज, 2020 मध्ये महाराष्ट्रात 7 आणि मध्य प्रदेशात 2 जीवनशाळा आहेत. अतिशय दुर्गम भागात या शाळा आहेत. त्या सुरू करण्याचं मुख्य कारण म्हणजे, आदिवासींच्या शिक्षणाबाबतची सरकारी अनास्था. आजही गावातले लोक सांगतात की, या गावांमध्ये सरकारी शाळा फक्त कागदावर होत्या. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे- फक्त या तीन दिवशी शिक्षक गावात दिसायचे; कारण तेव्हा आपल्या स्वतंत्र, सार्वभौम भारताचा झेंडा सगळीकडे फडकवायचा असतो. भारतीय लोकशाही आणि राष्ट्रप्रेम याचं निव्वळ एक प्रतीक! ध्वजवंदन! तरीही शिक्षकांना त्यांचे संपूर्ण पगार, भत्ते वर्षानुवर्ष मिळत होते; पण शाळा सुरू का नाहीत, शिक्षक शिकवायला का जात नाहीत हे कुणीच विचारत नव्हतं. असलेली परिस्थिती यथावत्‌ ठेवली तर शासनकर्त्यांच्या ते पथ्यावर पडतं, कारण मग लोक, असेल ते स्वीकारून गप्प बसतात. आंदोलनाला मात्र बोलणारी, मागण्या करणारी, लढवय्या असणारी, अहिंसक आंदोलनकर्त्यांची फौज तयार करायची होती. मुख्य म्हणजे, समता आणि समानतेवर आधारलेल्या आपल्या घटनेला न्याय देण्यासाठी या डोंगराळ भागातल्या भारतीय नागरिकांना आपल्या लोकशाहीच्या पटलावर आणायचं होतं. त्यासाठी शिक्षणाची कास धरणं गरजेचं होतं. त्यामुळं जीवनशाळा सुरू झाल्या. कधीही औपचारिक रीत्या न शिकलेल्या, पण अतिशय ज्ञानी असणाऱ्या आदिवासींच्या आणि या आदिवासींनी कधीही न बघितलेल्या, पण आंदोलनाची नाळ जुळल्यामुळं जणू रक्ताचं नातं असल्यासारख्या मध्य प्रदेशातल्या निमाडच्या जोरावर ह्या शाळा सुरू झाल्या. बुडत, त्यातून वाचत, नव्यानं उभं राहत हा आदिवासी समाज आपल्या पुढच्या पिढ्या घडवण्याच्या आशेवर आपली लेकरं इथं पाठवत राहिला आणि आजही पाठवत असतो.   

नऊ जीवनशाळांपैकी एकच नव्या वसाहतीत आहे. बाकीच्या आठ शाळा खूप दूर, डोंगरात, नर्मदेच्या खोऱ्यात, आत आहेत. प्रत्येकी साधारण शंभर ते दीडशे मुलं-मुली, शेजारपाजारच्या गावाहून आलेली, पहिली ते चौथीपर्यंत इथं शिकायला असतात आणि दोन ते तीन शिक्षक प्रत्येक शाळेला. या शाळा निवासी आहेत. मुलांना लागणारं अन्नधान्य आणि शिक्षकांचा अतिशय मामुली पगार देण्यासाठी आंदोलनाला खूपच धडपड करावी लागते. मध्य प्रदेशातल्या निमाडचे आणि महाराष्ट्रातले शेतकरी, शहरांत राहणारे आंदोलनाचे मित्र यांच्या भरवशावर या मुलांची रोजच्या तीन वेळच्या पोटभर जेवणाची सोय होते; पण त्यांना थोडं अजून चांगलंचुंगलं खाऊ घालावं- निदान थोडं अजून पौष्टिक- हे आंदोलनाचं स्वप्न मात्र, 25 वर्षे झालीत तरी अजून स्वप्नच आहे.

दोन ते चार खोल्यांच्या या जीवनशाळा, त्यांच्या कुडाच्या किंवा पत्र्याच्या कच्च्या भिंती, गवताचं छप्पर हे प्रत्येक वर्षी येणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यात उडून जातं. मग गावकरी आणि शिक्षक मिळून ते दर वर्षी पुन्हा बांधतात. इथं राहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची एक लहानशी लोखंडी पेटी असते. त्यात त्यांच्या आयुष्याच्या सर्व वस्तू असतात. ती पेटी त्यांना पुरते, कारण त्यांच्याकडे एक जोडी कपडे किंवा क्वचित 2 जोडी, एवढीच संपत्ती असते. 

आज 2020 मध्येदेखील नर्मदेच्या खोऱ्यात सरकारी शाळा तर नाहीतच, पण या जीवनशाळांना सरकारी मदतदेखील मिळत नाही. त्यामुळं इतर शाळांना मिळतात तशी पुस्तकं इथं नाहीत, वह्या नाहीत, बसायला व्यवस्थित सतरंज्या नाहीत, झोपायला गादी सोडा- साधी ताडपत्री पण मिळत नाही; बाकी वीज, रस्ते, नळ याबद्दल विचारणं तर हास्यास्पदच होईल. नर्मदेच्या पोटची ही पोरं, पण आज त्यांना कधी त्या अवाढव्य जलाशयाच्या गाळात बुडण्याची भीती असते, तर कधी पाण्याची पातळी वाढल्यामुळं मगरी आता त्यांच्या शाळेच्या अंगणात येतात. कमकुवत इमारतीत असूनदेखील, शिक्षणाच्या ध्यासामुळेच या जीवनशाळा नर्मदेच्या खोऱ्यात घट्ट पाय रोवून, तग धरून आजही उभ्या आहेत.  

मी गेले होते जीवननगर पुनर्वसाहतीतल्या जीवनशाळेत. शिक्षक प्रशिक्षण आणि फिल्मचं शूटिंग अशा दोन्ही मनापासून आवडणाऱ्या गोष्टी करायला. आपापली जुनी गावं, जंगल, लाकूड, वनौषधी, डुंगी, मासे, अंबाडी भाजी, नर्मदा आणि जे-जे सुखी ठेवणारं होतं ते-ते सगळं सोडून इथं, शहराच्या जवळ नव्यानं वसायला पाठवली गेलेली कुटुंबं आणि त्यांची मुलं, इथं नव्यानं वसू बघताहेत. शासनानं तयार केलेल्या वसाहतींना आपलं गाव बनवू पाहताहेत. काही निवासी मुलं- ज्यांचे पालक अजून मूळ गावात आहेत, पण तिकडं शाळा नाहीत म्हणून भविष्याच्या आशेवर आणि आंदोलनाच्या भरोशावर वयाच्या पाचव्या वर्षापासून या जीवनशाळेत राहायला आलेली. आपापल्या मोठ्या भावंडांच्या आधारावर आणि गुरुजींनी दिलेल्या प्रेमाच्या पुरचुंडीवर शाळेलाच घर मानून जगायला आलेली ही लेकरं... इथं पण ती निळी रेघ... आंदोलनाचा तो रंगच आहे. निरव, असीम आकाशाचा...

नव्या वसाहतीतल्या एका जीवनशाळेतली प्रार्थनेची वेळ. अंगणात निळ्या रेषा रेषेत उभ्या. पुन्हा एकदा मला कॅमेऱ्याची आठवण येते. असा wide angle lense असता आणि soft focus filter तर हा शॉट पाण्यासारखा दिसला असता, कदाचित बरेचसे track shots आणि मग या गच्चीवरून top angle shot! तितक्यात त्या निळ्या रेषेच्या मधून, अगदी मधून, एक उंच टिपेचा आवाज येतो. ‘‘आखी दुनिया मा, नर्मदा तारो नाम रे... ओ मारी माता...’’ अगदी स्वतः नर्मदेच्या पोटातून आल्यासारखा. खूप आर्त, खूप खोल. आणि मग ते गाऊ लागतात. मुलं-मुली रांगेत उभे राहून गाऊ लागतात. आदिवासी जितके जास्त त्यांच्या गाण्यातून व्यक्त होतात, तितकेच ते चेहऱ्याच्या भावांतून अव्यक्त असतात. गाण्याच्या शेवटी ते एकमेकांचे हात धरतात आणि नाचू लागतात. ही निर्भेळ निरागसता आपल्यातून कधी गेली? की, कधी नव्हतीच ती? माझ्याकडे तो soft focus filter नसूनदेखील त्या सर्व निळ्या रेषा एकत्र येऊन मला संपूर्ण अंगण निळं दिसू लागतं- पुन्हा एकदा डोळ्यांत तराळून आलेल्या पाण्यामुळं असेल. 

मध्ये बराच वेळ गेला. आमचं शिक्षक प्रशिक्षण सत्रही झालं. दुपार झाली. मुलांची जेवणं वगैरे आटोपली. गावात राहणारी मुलं आपापल्या घरी गेली. शाळेत राहणारी मुलं त्यांच्या या घराच्या अंगणात बागडत होती. कुणी तरी पाठवलेली chocolates मुलांना वाटण्याचं काम माझ्यावर आलं. मी ते पाकीट घेऊन ती खेळत होती तिथं गेले आणि त्यांच्यातल्या सगळ्यात लहान मुलाला जवळ बोलावलं. त्याच्या हातात पाकीट दिलं आणि म्हटलं, दे सगळ्यांना. पुढं जे घडणार होतं, ते माझ्यासाठी अनपेक्षित होतं. या छोट्या विद्यार्थ्यानं- वय असेल पाच, त्या पाकिटातून एक चॉकटेल हातात घेऊन दुसऱ्या मुलापुढं तो हात करेपर्यंत पुढच्या मुलानं हात पुढं केला नाही. या लहान्यानं हातातली गोळी पुढं करायची आणि मगच घेणाऱ्यानं आपला हात पुढं करायचा, हे तब्बल 45 वेळा तसंच्या तसं घडलं. सगळ्यांना एक एक गोळी वाटून झाल्यावर, ढीगभर उरलेल्या गोळ्यांसकट त्या मुलानं ते पाकीट मला परत केलं, स्वतःसाठी स्वतः गोळी न ठेवता! पुन्हा एकदा आठवण- वय वर्षे पाच. मी तो सभ्यपणा तोवर शिकले होते. मी पाकिटातून एक गोळी शांतपणे काढली. तोवर त्याचा हात पुढं आलेला नव्हता. मी त्याच्याकडं बघून हसले. तर लाजत, हात पुढं करून त्यानं ती गोळी घेतली. मी म्हटलं, ‘‘यात खूप उरल्यात, अजून एक एक घ्या.’’ तर त्यातली ती टिपेच्या आवाजात गाणारी मुलगी ऐश्वर्या म्हणाली, ‘‘ते उद्या बाकीचे शाळेत येतील त्यांना देऊ.’’

ही फक्त एक घटना नाहीये. ही आदिवासी समाजाची मूल्यव्यवस्था आहे, जी आपल्याला सहजासहजी नजरेला पडत नाही. ते कधीच, काहीच मागत नाहीत; दिल्याशिवाय घेत नाहीत, कशावरच तुटून पडत नाहीत. सगळ्यांमध्ये मिळून-वाटूनच घेतात. उरलेलं राखून ठेवतात, संपवून टाकत नाहीत. गोंधळ घालत नाहीत, जोरात बोलत नाहीत. सौम्य हसत असतात, कुरकुर करत नाहीत.

या घटनेनंतर साधारण एक वर्ष मला लागलं नर्मदा आंदोलनाची फिल्म, ‘लकिर के इस तरफ’ पूर्ण करायला. ती पूर्ण झाल्यावर, जिथं जिथं शूटिंग केलं, त्यातल्या शक्य असेल त्या ठिकाणी ही फिल्म दाखवू या, असा विचार होताच. जीवननगरलाच पुन्हा शिक्षक प्रशिक्षण ठेवलं होतं. त्यामुळं जीवननगरच्या रहिवाशांना संध्याकाळी फिल्म बघण्यासाठी बोलावण्यात आलं. शेतातून दमून-भागून परत येऊन, घरी जाऊन जेवण करून माणसं हळूहळू येऊ लागली. संध्याकाळी 7 वाजता यायला सांगितलं होतं, तर साडेसातपर्यंत साधारण 300 माणसं जमली होती. पडदा, प्रोजेक्टर आधीच लावण्यात आला होता. पण ध्वनियंत्रणेनं असहयोग पुकारला. फिल्मचा आवाज काही येईना. तांत्रिक अडचणी तर फिल्म शोच्या पाचवीला पुजल्या असतात. आणि अशा दूर, वसाहतींमध्ये- जिथं या माणसांनी वीज पहिल्यांदा बघितली आहे, तिथं- या अडचणी आणि त्यांचे स्रोत दोन्ही नवीनच. गावचे शक्य तितके तंत्रज्ञ शक्य तितक्या प्रकारे झटत होते. प्रोजेक्टरला माईक लावून झाला, मोबाईल फोनचा हेडफोन लावून झाला, शेजारच्या गावातल्या डीजेची सिस्टीम आणून झाली, वायरी बदलून झाल्या... काहीच होईना. माझा जीव वर-खाली होत होता. बघता बघता दीड तास गेला. तीनशे प्रौढ आणि दीडशे मुलं-मुली श्वासाचादेखील आवाज ऐकू येईल इतक्या शांततेत बसली होती. तब्बल दीड तास! अखेर सर्व तंत्रज्ञ यांनी हार मानली. एका शिक्षकांनी उठून पावरी भाषेत, शांत-सौम्य स्वरात सगळ्या जमावाला काही तरी सांगितलं. अर्थात ते हेच असणार की आज फिल्म बघणं शक्य नाही, उद्या दाखवू. शिक्षकांचं वाक्य अर्धंच झालं होतं... ते सर्व आलेले प्रेक्षक शांतपणे उभे राहून, वळून, अंधारात निघून गेले. काहीही न बोलता. विरोध नाही, चर्चा नाही, वादावादी नाही- ‘आम्ही इतके दमलोय आणि काय?’ वगैरे काहीच नाही. हेच वर्तन ही मुलं बघत असतील ना... म्हणूनच ती पण तशीच वागतात. मग आपलं कुठं कुठं आणि काय काय चुकतंय? 

डनेल गावची जीवनशाळा. दिनेशगुरुजी विद्यार्थ्यांची खोखोची प्रॅक्टीस घेत आहेत. त्यांनी शिटी वाजवली की, खेळ सुरू. न खेळणारे सर्व लहान मोठे विद्यार्थी गोलात बसून खेळणाऱ्यांचा उत्साह वाढवत, टाळ्या वाजवून ‘धाकचिके बूम बूम....आंबाडी भाजी खाऊ खाऊ...’ ही विशेष घोषणा देत आहेत. मी एका बाजूला थांबून खेळ बघायचं ठरवलं. उंच डोंगराच्या माथ्यावर शाळा, त्यातल्या सपाट केलेल्या अंगणात खेळ सुरू होता. दिनेशगुरुजींची शिट्टी सुरू होती. मी थोडं मागच्या बाजूला जाऊन, समोर डोळाभर पसरलेल्या नर्मदेच्या- आता सरदार सरोवराच्या म्हणावं लागेल- पाण्याकडे बघत होते. त्याला कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होते. अचानक लक्षात आलं की मुलाच्या घोषणा थांबल्यात, शिट्टीचा आवाज थांबलाय. परत फिरून आले तर- खेळणारी मुलं तशीच होती खोखोच्या रांगेत, गोलात बसलेली लहान मुलं पण तशीच बसून होती. या सर्व मुलांनी फिल्ममध्ये frame pause करतात तसा pause घेतला होता. साधारण दीड ते दोन मिनिटे ते संपूर्ण अवकाश तसंच्या तसं थिजलेलं होतं, संपूर्ण sound track mute करून. पूर्ण शांतता. दिनेशगुरुजी परत आले, शिट्टी वाजली आणि खेळ, घोषणा, धावणं अक्षरशः  तसंच्या तसं पुन्हा सुरू झालं!

जीवनशाळा याच मूल्यांवर उभ्या आहेत. आदिवासी समाजाची हीच ती मूल्यं. ती आपल्यापर्यंत सहजासहजी पोचत नाहीत याचं कारण पण हीच मूल्यं आहेत. आदिवासी फार बोलत नाहीत. बोलले तरी हळू आवाजात बोलतात. त्यामुळं ती मूल्यं आपल्याला कळेपर्यंत बराच उशीर झालेला असतो- दोन्ही अर्थांनी. जोवर आपल्याला ती उमगतात, तोवर आदिवासी समाजाचं अपरिवर्तनीय नुकसान तरी झालेलं असतं किंवा तोवर आपण शहरी मध्यमवर्ग, ती मूल्यं आपल्या आयुष्यात उतरवण्यापासून खूप दूर तरी गेलेले असतो. 

या जीवनशाळा खूप विशेष आहेत. नव्यानं शाळेत आलेली मुलं बावचळून जाऊ नयेत, त्यांना परकं वाटू नये आणि आपली संस्कृती टिकून राहावी, ती जोपासली जावी म्हणून विद्यार्थी तिसरीत येईपर्यंत त्यांच्या शिक्षणाची, बोलण्याची, व्यवहाराची भाषा असते फक्त त्यांची मातृभाषा- पावरी आणि भिलाली. आई-वडिलांपासून दूर राहूनदेखील घराची सर इथं येते ती याचमुळं. कुठल्याही समाजावर वर्चस्व गाजवण्याचं अजिंक्य साधन असतं भाषा. इंग्रजांनी तेच केलं. आपल्या भारतीय भाषा किती कमी दर्जाच्या आहेत आणि इंग्रजी कशी श्रेष्ठ आहे, कशी वैश्विक आहे, हे आपल्या मनावर इतकं खोल बिंबवलं की, स्वतःच्या भाषेची, मग रंगाची, मग वागण्याची, मग आई-वडिलांची आणि शेवटी देशाची लाज वाटत आपली सोन्यासारखी मुलं इतर देशांची चाकरी करण्यात आयुष्याची इतिकर्तव्यता मानू लागली; तसं या आदिवासी मुला-मुलींचं होऊ नये आणि स्वतःच्या समाजासाठी, देशासाठी, आंदोलनासाठी त्यांच्या मनात प्रेम, आदर, आपुलकी व विश्वास टिकावा यासाठी आंदोलनाची ही धडपड आहे.

अशीच थक्क करणारी आणखी एक घटना! स्वतःची मूल्यव्यवस्था आणि जीवनशैली याविषयी आतून प्रश्नचिन्ह उभं झालं माझ्या.

फिल्मचं शूटिंग आणि आंदोलनाच्या कामासाठी नर्मदा बचावचे तरुण कार्यकर्ते आणि मी पहाटे चार वाजता भादलला जायला निघालो. सरदार सरोवराच्या बुडितात येणारं मध्य प्रदेशच्या पहाडी पट्टीचं शेवटचं गाव. भादल. या प्रवासाची सुरुवात होते बडवानीहून. जीपनं, काकारानापर्यंत. मग चालत नदीपात्रातून बोटीपर्यंत. मग दीड तास बोटीतून प्रवास. मग पुन्हा एक उभा डोंगर चढून, बरंच चालत गेलो की, भादलची शाळा येते. सकाळी लवकर पोचून गाव सभा घ्यायची आणि मग दुपारपासून शिक्षक प्रशिक्षण सत्र असं आयोजन होतं. पण आंदोलनाच्या अवाढव्य पसाऱ्यात नियोजनापलीकडं अचानक समोर आलेली कामं- हे काही नवं नाही. तसाच एक महत्त्वाचा शिक्षकप्रश्न भिताडा गावाच्या शाळेत उपस्थित झाला होता. म्हणून कार्यकर्त्यांनी ठरवलं की- आपण आधी भिताडाला जाऊ, आणि उद्या भादलला येऊ. भिताडा, अजून पुढं आहे. म्हणजे बोटीचा अजून साधारण अर्धा तास प्रवास. अर्थात संपर्काचं एकमेव साधन म्हणजे प्रत्यक्षात निरोप पोचवणे. अजूनही तिथे वीज नाही, फोन नाही, रस्ते नाहीत; कोणतंही वाहन नाही. गावात पोचायचं साधन म्हणजे फक्त पाय आणि संपर्काचं फक्त साधन म्हणजे तोंड! 

बदललेल्या नियोजनानुसार आम्ही भादलला उद्या येण्याचा निरोप ठेवून भिताडाला पोचलो. शिक्षकप्रश्नाची मीटिंग, पालकसभा, जेवण- सगळं नीट झालं. रात्रीच्या चांदण्यात, सातपुड्याच्या कुशीत निवांत झोप झाली. मग सकाळी पुन्हा भादल कडे निघालो. आता मात्र मला हुरहूर लागली होती. मुख्य नियोजनानुसार पालकसभा भादलला ठेवायची होती. आणि ती फक्त पालकसभा नसते, तर पुनर्वसनाचे प्रश्न पण चर्चेत येतात. लोकांसाठी ही बैठक महत्त्वाची असते. आम्ही भादलला पोचलो. लोक जमा होत होते. सकाळी शेतात कामाला जायच्या आधीच्या वेळात ही मीटिंग घ्यायची, असं ठरलं होतं काल. तसे लोक येत होते. बरीच मंडळी जमली, तसं मला वाटलं- की- बरं झालं, यांना काल येऊ नका हा निरोप मिळालेला दिसतोय. म्हणून काल न येता आज हे सगळे आलेत. तसा महेंद्र हा आंदोलनाचा कार्यकर्ता जोरात हसला. मी तंद्री मोडून त्याच्याकडे बघितलं, तर त्यानं मला विचारलं, ‘‘ताई, आपने सुना?’’ मी म्हटलं, ‘‘ऐकलं पण काही कळलं नाही?’’ 

महेंद्र मला शाळेच्या इमारतीकडं घेऊन गेला. दोन खोल्यांची लिंपलेली, सारवलेली इमारत, स्वच्छ, बुटकी. गवताचं छत, लहान खिडक्या, वाकून जावं लागेल असं दार. आदिवासी घरं असतात तशी इमारत. महेंद्र म्हणाला, ‘‘काल आपण इथं नाही आलो, पण ही सर्व मंडळी इथं आली होती. मग आपण येत नसल्याचा निरोप त्यांना मिळाला, तर हे सगळे म्हणाले- आता आलोय तर शाळेची ही इमारत बांधून टाकू!’’ आणि त्या एका दिवसात या समाजानं ते केलं, जे आपल्या शहरी समाजाला वर्षानुवर्षे कधीच जमणार नाही. 

ज्यांचं स्वतःचं आयुष्य, घर, जमीन, अन्नधान्य, गुरं, जगणं; एवढंच नाही- मुलांचं भवितव्यदेखील पणाला लागलंय, सर्वस्व लुबाडलं जातंय. तरीही त्यांच्यात असलेली ही धडाडी, हा सकारात्मक दृष्टिकोन, ही जिद्द बघून मी शरमेनं पाणी-पाणी झाले. जर यांच्या जागी मी असते तर मान-अपमान, वेळ वाया जाणे, अयोजानातल्या चुका यावर मी किती तरी बोलले असते. पण अजून शहाणपण सतत मिळवत राहणं हीच ती मूल्य व्यवस्था, हीच टिकावी म्हणून या जीवनशाळा सुरू ठेवण्याचा आंदोलनाचा आग्रह आहे; नाही तर ही मुलं आपल्यासारखी होऊन जातील! 

या जीवनाच्या शाळांमध्ये ही मुलं निसर्गासोबत जगतात, शिकतात, मोठी होतात. भोवतालचं रान, जंगल हाच आदिवासींचा सर्वात मोठा आधार असतो. त्यांची ओळख त्या जंगलामुळेच असते. लहानशा जमिनीच्या तुकड्यात स्वतःच्या पोटापुरतं ते पीक घेतात. रानातून भाजी आणतात, औषधी पाल्याचा अभ्यास करतात, तो वापरतात. त्यांच्या प्रत्येक कृतीला गाण्याची जोड असते. हे सगळं फक्त आदिवासी समाजाबद्दल नसून, जीवनशाळेबद्दल पण आहे. म्हणूनच शाळा आणि समाज एकमेकांचा आरसा असतो, प्रतिबिंब असतं- हे या जीवनशाळा खरं करून दाखवतात. यातून जी पिढी घडते, ती उच्च दर्जाच्या मानवी मूल्य व्यवस्था पुढे नेणारी पिढी असते. ‘लडाई पढाई साथ साथ’ ही जीवनशाळेची घोषणाच आहे. आपण जेव्हा तिथं जातो, तेव्हा आंदोलनच्या घोषणा व गाणी तिथल्या निळ्या आसमंतात आणि आपल्या मनात दुमदुमत राहतात.

त्या निळ्या रेषेच्या पहिल्या दर्शनाला मी कधीच विसरणार नाही. डोंगरावर उभी असलेली जीवनशाळेची ती शंभरेक मुलं... आम्ही दूर-दूर जात होतो, तरी त्यांच्या घोषणा सुरूच होत्या. आमच्या बोटीचा बिंदू झाला असेल, तरी ती तिथंच उभी होती; कारण त्यांची संस्कृती घट्ट रोवलेली आहे. त्याची पाळं-मुळं जमिनीत रुतलेली आहेत. त्यांना घाई नाही. म्हणून ते संपणार पण नाहीत. ते असेच उभे असतील. वरच्या अनादि आकाशाचा आणि खालच्या गहिऱ्या पाण्याचा तोच निळा रंग पेलत, घट्ट उभी ही मुलं, ही संस्कृती टिकणारच; ती कोणीच संपवू शकत नाही.

आता मला आदिवासींच्या भिंती, झोपाळे, गोधड्या, झाडं त्या पाण्याखालून वाहून जाताना दिसत नव्हती. मला दिसत होते ते मेट्रोचे खांब, मोठाल्या इमारती, पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या, विमानं, मोठ-मोठाल्या मूर्ती, न मोजता येण्याइतकं प्लॅस्टिक- पण ते वाहून जात नाहीये, ते तिथल्या तिथं आहे. खोल-खोल अंधारात. बुडून, गुदमरून गेलेलं. कारण ते जड आहे, निसर्गापेक्षा जड. त्यामुळं ते बुडणारच. आदिवासी संस्कृती प्रवाही आहे, ती वाहती आणि जिवंत राहणार, या तग धरून राहिलेल्या जीवनाच्या शाळांमधून! 

(जीवनशाळांबद्दल अधिक जाणून घ्यायचे असल्यास ‘लकीर के इस तरफ’ ही फिल्म पहावी. यू-ट्यूबवर ती विनामूल्य उपलब्ध आहे.)

Tags: आदिवासी शिल्पा बल्लाळ लकीर के इस तरफ जीवनशाळा मेधा पाटकर नर्मदा बचाव आंदोलन shilpa ballal jeevanshala medha patakar narmada bachav andolan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शिल्पा बल्लाळ
shilpaballal@gmail.com

सामाजिक कार्यकर्ती, डॉक्युमेंटरी मेकर 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात