डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

ॲलिस मिलर यांचे 'फॉर युवर ओन गुड'

‘फॉर युवर ओन गुड’ या पुस्तकाने अशा प्रकारे मला माझ्या दुखऱ्या बालपणाला समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. भारतात अस्पृश्य जाती-जमातीत व्यसन आणि बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असते. या जमातीतील पालकांच्या आर्थिक वैफल्याचा फटका त्यांच्या कोवळ्या मुलांना नक्कीच बसत असेल. त्यांचे बालपण करपून जात असेल. या पुस्तकाच्या वाचनातून आजच्या भारतालाही मी एका नव्या परिप्रेक्ष्यातून पाहू शकले. ज्या भारतीय कुटुंबव्यवस्थेचा ‘आदर्श जीवनपद्धती’ म्हणून आपण उदो-उदो करत असतो, ती खरोखरीच तशी नसते- हे मला कळाले.  

मला प्रभावित करून गेलेले पुस्तक असा लेख जागतिक पुस्तकदिन अंकासाठी लिहून द्यावा, हा निरोप संपादकांकडून आला तेव्हा मी विचार करू लागले.... असे एखाद्या नेमक्या पुस्तकाचे नाव घेणे शक्य आहे का? कारण अनेक पुस्तके आपल्याला वेगवेगळ्या वेळी नानाविध कारणांनी आवडलेली असतात. त्या पुस्तकांचा तात्कालिक किंवा कायमस्वरूपी प्रभावही आपल्यावर पडलेला असतो. त्यातून नेमकेपणाने एखादे पुस्तक निवडणे हे अवघड काम आहे. पण त्या पत्रामध्येच पुढे लिहिले होते की- ‘असे एखादे पुस्तक आहे का; ज्यामुळे आपल्या विचारांची दिशा बदलली, आपल्याला समृद्ध केले, आपली जीवनदृष्टी बदलली?’ आणि मग माझा पटकन निश्चय झाला की, आपण ॲलिस मिलर या लेखिकेबद्दल लिहायचे. कारण या ॲलिसची पुस्तके वाचण्याआधीची मी व ते वाचल्यानंतरची मी, यात आमूलाग्र फरक आहे. या महान मानसशास्त्रज्ञ लेखिकेने मला मुक्तीचा मार्ग दाखविला.

तर मूळची पोलंडची, वंशाने ज्यू आणि नाझींच्या आक्रमणानंतर जर्मनीमधून परत पोलंड ते अखेर स्वित्झर्लंडला स्थलांतरित झालेल्या ॲलिस मिलर या विदुषीने विषारी शिक्षणशास्त्र (poisonous pedagogy) या विषयाचा अभ्यास केला. ‘पालकांनी अयोग्य पद्धतीने केलेल्या बालसंगोपनाचा मुलांच्या मानसिकतेवर जीवघेणा परिणाम होतो. प्रौढत्वात या मुलांमध्ये अनेक मानसिक आजार दिसून येतात. ही मुले चटकन व्यसनी होतात. या व्यक्ती समाजस्वास्थ्याला हानिकारक ठरतात, संपूर्ण  समाजच व्याधिग्रस्त होतो’- असा खळबळजनक सिद्धांत तिने मांडला. या सिद्धांताच्या बळकटीसाठी तिने संशोधनाचा आधार घेतला, लोकांच्या मुलाखती घेतल्या. मानसशास्त्राच्या कसोट्या वापरून काफ्का, सिल्व्हिया प्लाय यांसारख्या कलावंताच्या कलाकृतींचा आणि त्यांच्या बालपणाचा संबंध उलगडून दाखविला. या विषयावर अनेक व्याख्याने दिली. द ड्रामा ऑफ गिफ्टेड चाइल्ड, बॉडी नेव्हर लाईज, फॉर युवर ओन गुड ही तिची काही लोकप्रिय पुस्तके आहेत. तिच्या ‘फॉऱ युवर ओन गुड’ या पुस्तकाबद्दल लिहावे, असे मी ठरविले आहे.

For Your Own Good- Hidden Cruelty in child rearing and the roots of violence या लांबलचक शीर्षकातूनच पुस्तकातील आशय काय असेल याचा अंदाज आपल्याला येतो. ॲलिसने लाखो नाझींची कत्तल करणारी जर्मनी आणि त्या जर्मनीतील प्रचलित पालकत्वाची पद्धत यांमधला अन्योन्य संबंध उलगडून दाखवला आहे. बालसंगोपनाच्या नावाखाली पालक मुलांशी अतिशय हिंस्रपणे वागत असत आणि त्यातूनच जर्मनीचा नागरिक अतिशय क्रूर व हिंसक बनत गेला, हे सप्रमाण सिद्ध केले आहे. संस्कारांच्या नावाखाली पालक अतिशय लहान वयापासूनच मुलांचे भावविश्व विस्कटून टाकतात. (फ्रान्ससारख्या उदारमतवादी देशातही आया चापट्या मारून रांगणाऱ्या मुलांना ‘सुधरवत’ असत.) या मारहाणीतून मुलांना जर कोणते शिक्षण मिळत असेल, तर ते म्हणजे स्वत:च्या इच्छा-आकांक्षा विसरून जाऊन पालक खूष होतील, अशी वर्तणूक करायची. पालकांना देवाचा दर्जा द्यायचा. आपल्या भल्यासाठीच आपल्याला शिक्षा झालेली आहे, असे गृहीतक तयार करायचे. पण बालवयात शरीराला झालेली इजा मन मोठे झाल्यावरही विसरू शकत नसे. पालक झाल्यानंतर ही मुले त्यांच्या पाल्याशी पुन्हा तशीच हिंस्र वागायची. समाजातील इतर व्यक्तींशीही त्यांचे संबध असेच क्रूर असायचे. जणू एक वर्तुळ पूर्ण व्हायचे. ज्या प्रौढांना मारहाण (शाब्दिक किंवा कायिक) करण्यासाठी मुले नसायची, ते मोठे झाल्यावर आपला राग काढण्याचे घातक मार्ग शोधून काढायचे.

‘फॉर युवर ओन गुड’ या पुस्तकात मुले नसलेल्या तीन माणसांची केस स्टडी आहे. अमली पदार्थाची नशा करणारी ख्रिस्तिन एफ, बालकांचे खून करणारा एक सायको (Jurgen Bartsch) आणि जर्मनीचा लोकप्रिय हुकूमशहा ॲडॉल्फ हिटलर.

ख्रिस्तिन एफ या ड्रग ॲडिक्टची कहाणी आपल्याला अगदीच परिचित वाटेल अशी आहे. ख्रिस्तिनचे वडील कडक शिस्तीच्या नावाखाली तिला कधीही, कसेही कोणत्याही कारणाशिवाय मारायचे. त्यांना मनासारखी नोकरी नव्हती आणि त्यांची बायको त्यांच्या कह्यात राहणारी होती. इतके क्रूर वडील असूनही ख्रिस्तिन आपल्या वडिलांना आदर्श समजायची. घरातील या वातावरणामुळे पुढे ड्रगची सवय लागल्यावर तिला पहिल्यांदा मुक्तीचा अनुभव आला. मादक द्रव्य मिळविण्यासाठी ती वेश्याव्यवसाय करू लागली. ज्याप्रमाणे वडिलांनी ती लहान असताना तिच्या अस्तित्वाचा नाश केला होता, तसाच नाश तिने स्वतःचा करून घेतला.

ख्रिस्तिनचा मार्ग आत्मनाशाचा होता, तर Jurgen Bartsch या सिरियल किलरचा मार्ग परनाशाचा होता. बालपणी दत्तक आई त्याला इतके मारायची की, त्याचे दत्तक वडील ते पाहूही शकायचे नाहीत. या दत्तक वडिलांचे मटणाचे दुकान होते. तेथील चाकूने आईने एकदा या मुलावर हल्ला केला होता. पुढे कॅथॉलिक शाळेतील पाद्रीने त्याचा अमानुष छळ केला. मोठा झाल्यावर त्याने अनेक लहान मुलांचा लैंगिक छळ केला. मटणासारखे त्यांच्या शरीराचे तुकडे करून त्यांना मारून टाकले. अंगावर काटे आणणारी गोष्ट अशी आहे की, त्याला सगळ्यात जास्त किक तेव्हा लागली- जेव्हा त्याने एका मुलाला जिवंत सोलून काढले होते. बार्शने काही मुलांचा जीव घेतला, पण ज्या हिटलरने लाखो ज्यूंना संपवले; त्या हिटलरचे बालपण नेमके कसे होते?

हिटलरची आजी एका ज्यू घरात काम करायची आणि लग्नाआधीच तिला दिवस गेले होते. हिटलरच्या वडिलांना स्वतःचा हा काळा इतिहास माहीत होता. समाजमान्यता मिळविण्यासाठीच त्यांनी मोठे झाल्यावर प्रतिष्ठेची सरकारी नोकरी पकडली. हिटलर कडक शिस्तीच्या वडिलांचा छळ अगदी लहान (चार वर्षे) असल्यापासूनच सहन करत होता. वडील तासन्‌तास त्याला नुसती मारहाणच करायचे नाहीत, तर त्याची घोर निंदाही करायचे. या सततच्या अपमानाला कंटाळून त्याने लहानपणी घरातून पळून जायचा प्रयत्न केला होता. तो अयशस्वी झाल्यानंतरही वडिलांनी त्याला चाबकाने फोडून काढले होते. याच अमानुष वागणुकीचा त्याच्या मनावर घातक परिणाम झाला. त्याला मोठेपणी पॅनिक ॲटॅक येऊ लागले. वडिलांबद्दलचा त्याचा तिरस्कार पुढे ज्यूंचा तिरस्कार करण्यात परावर्तित झाला. नंतर सत्ताधीश झाल्यावर त्याने आजीचे गाव रणगाडा लावून उद्‌ध्वस्त केले होते. लाखो ज्यूंना छळछावणीत, गॅस चेंबरमध्ये बंद करून मारताना त्याला आसुरी आनंद होत होता; कारण लहान असताना वडिलांनी त्याला कित्येकदा असेच कोंडून मारले होते.

ॲलिस मिलरने हे दाखवून दिले आहे की, आपल्या प्रौढत्वात आपल्या बालपणीच्या खुणा सापडतात. आपल्या प्रत्येकात एक लहानगा स्टॅलिन दडलेला आहे, असे तिने लिहिलंय.

हे पुस्तक वाचताना मी खूप अस्वस्थ झाले. माझे बालपण तपासून पाहू लागले. मला प्रश्न पडला की, आयुष्यात मी पहिल्यांदा मार कधी खाल्ला असेन? उत्तर मिळाले- तीन दिवसांची असताना. माझी आई मला सांगायची की, बाळंतपणात तिला खूप भूक लागायची आणि तिने जेवण्यासाठी मला मांडीवरून खाली ठेवले की, मी खूप रडायचे. मग तिने मला चापट मारली. लहानग्या मला तिची समस्या समजली(?) आणि मी गप्प बसले. मग ती पोटभर जेवू शकली. मला दुसरा प्रश्न पडला- माझ्या  आईला तिच्या आईने कधी मारले असेल? आईने सांगितलेली आठवण अशी आहे की- तिला नीट चालता येत नव्हते, ती उभी राहिली की सारखी खाली पडायची. अंघोळ घालताना ती उभी राहत नाही, म्हणून तिची आई तिला मारायची. शेवटी तिच्या आईला कळले की, आपल्या मुलीला पोलिओ झालेला आहे. मी माझ्या मुलाला कधी मारले? तो अडीच वर्षांचा असताना. तर, हे असे वर्तुळ होते. एकापासून सुरू होऊन एकापर्यंतच न थांबणारे.

‘फॉर युवर ओन गुड’मध्ये पामेला नावाची कुणी एक मुलगी तिच्या वडिलांना पत्र लिहिते. त्या पत्राची सुरुवात करते... डॅडी, यू आर अ बुली...

जर या दुष्टचक्रातून बाहेर पडायचे असेन तर आधी सत्य कबूल करावे लागेल की, संस्काराच्या नावाखाली पालकांकडून आपल्याला अयोग्य वागणूक मिळाली आहे. बरं, कित्येकांना असे वाटत असेल की- बरे झाले, आपले आई-वडील मारणारे नव्हते. पण शाब्दिक माराचे काय? कित्येक उच्चवर्णीय, उच्चशिक्षित घरांमध्ये मुलांना टोमणे मारले जातात. त्यांची अवहेलना केली जाते. मनावर शब्दांनी उमटलेले हे ओरखडे संपूर्णपणे विस्मृतीत कधीच जात नाहीत. आपल्या शरीराची एक जैविक स्मरणशक्ती असते. आपल्या पेशींच्या रंध्रारंध्रांत ती साठवलेली असते. या स्मृती आपल्याला बैचेन करतात. संपूर्ण स्वातंत्र्याचा अनुभव घेऊ देत नाहीत. त्यामुळेच तर आपल्याला मानसिक समस्या निर्माण होतात. आपण कोणत्याच गोष्टीचा निर्मळ, निरामय आनंद घेऊ शकत नाही.

‘फॉर युवर ओन गुड’ या पुस्तकाने अशा प्रकारे मला माझ्या दुखऱ्या बालपणाला समजून घेण्याची संधी उपलब्ध करून दिली. भारतात अस्पृश्य जाती जमातीत व्यसन आणि बेरोजगारीचे प्रमाण सर्वाधिक असते. या जमातीतील पालकांच्या आर्थिक वैफल्याचा फटका त्यांच्या कोवळ्या मुलांना नक्कीच बसत असेल. त्यांचे बालपण करपून जात असेल. या पुस्तकाच्या वाचनातून आजच्या भारतालाही मी एका नव्या परिप्रेक्ष्यातून पाहू शकले. ज्या भारतीय कुटुंबव्यवस्थेचा ‘आदर्श जीवनपद्धती’ म्हणून आपण उदोउदो करत असतो, ती खरोखरीच तशी नसते- हे मला कळाले. आजही भारतामध्ये लहान मुले ही पालकांची मालमत्ता असे समजले जाते. संस्कारशिबिरात त्यांना वळण लावले जाते. मुलांच्या प्रश्न विचारण्याच्या प्रवृत्तीला ‘लहान तोंडी मोठा घास’ म्हणून गप्प बसवले जाते. म्हणून जोपर्यंत घरात लोकशाही येत नाही, तोपर्यंत देशात लोकशाही यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या देशात हुकूमशहा निर्माण होण्याचे कारणही नेमके हेच आहे. एखाद्या माणसाला जनता सर्वसाक्षी परमेश्वराचा अवतार समजू लागते. त्याच्या प्रत्येक निर्णयाचा हुजरे होऊन स्वीकार करू लागते. कारण त्या व्यक्तीला आपण आपल्या पालकाच्या, अधिकाराच्या, सत्तेच्या जागी ठेवलेले असते. या सत्तेत आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याला काहीच किंमत नसते. जणू आपल्या भल्यासाठीच अनेक निर्णय वरून घेतले जात आहेत आणि आपण निमूटपणे ते निर्णय कबूल करत राहतो. ... फॉर युवर ओन गुड.

तर, माझे भले नेमके कशात आहे, होते आणि असेल, हे सांगणाऱ्या या पथदर्शी पुस्तकाची ओळख मला संदेश कुलकर्णी या मित्राने करून दिली. (एक चांगला अभिनेता, एक चांगला दिग्दर्शक म्हणून तो महाराष्ट्राला परिचित आहे.) तुमच्यापैकी अनेकांना हे पुस्तक माहीत असेल तर काही जणांना माहीत नसेल. आज या लेखातून मी तुम्हाला या पुस्तकाची ओळख करून दिली आहे. तेव्हा तुम्ही हे पुस्तक जरूर वाचा. त्यावर चिंतन-मनन करा. त्यातून तुम्हाला साक्षात्कार होईल. तुमच्या आत दुखावलेले, दडपलेले एक मूल आहे, हे तुम्हाला जाणवेल. त्या मुलाला जवळ घ्या. त्याच्यावर प्रेम करा. त्याला स्वतःची ओळख करून द्या... त्या मुलाला/मुलीला मुक्त करा. हीच माझी सदिच्छा आहे.

Tags: पुस्तकदिन मानसिक आरोग्य मानसशास्त्र बालसंगोपन शिल्पा कांबळे ॲलिस मिलर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

शिल्पा कांबळे,  मुंबई
shilpasahirpravin@gmail.com

शिल्पा कांबळे यांनी निळ्या डोळ्यांची मुलगी ही कादंबरी, बिर्याणी हे नाटक, नऊचाळीसची लोकल हा कथासंग्रह आणि डॉ.आंबेडकर ही मालिका इत्यादी लेखन केले आहे.


Comments

 1. Vinayak bhandari- 22 Apr 2021

  Marvelous

  save

 1. ashok bhosikar- 22 Apr 2021

  एलिस मिलर यांच्या पुस्तकाचा खूप चांगला परिचय करून दिला आहे...प्रत्येक पालकांनी तर हे पुस्तक वाचायलाच हवं आणि स्वतः तल्या दडलेल्या मुलावर प्रेम करायला सुद्धा...धन्यवाद शिल्पा मॅडम

  save

 1. vivek Pattiwar- 23 Apr 2021

  एका चांगल्या वाचनीय पुस्तकाची आपण ओळख करून दिली. पुस्तक जरूर वाचेन.

  save

 1. Shatrughna jadhav- 24 Apr 2021

  शिल्पा कांबळे मॅडम यांनी करून दिलेली फॉर युवर वोन गुड या एलिस मिलर यांच्या पुस्तकाची ओळख खूप छान आहे.आपल्यातील भूतकाळातल्या बाल व्यक्तिमत्वाची पुनश्च ओळख करून घेतली..आनंद झाला...डॉ.शत्रुघ्न जाधव हिंगोली.

  save

 1. Smita Saindankar- 27 Apr 2021

  शिल्पा मॅडम , आपल्या लेखनामुळे एका वेगळ्या विषयावरील पुस्तकाची आज ओळख झाली,धन्यवाद सौ.स्मिता सैंदानकर smitasaindankar@gmail.com

  save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके