डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

पुणे विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय संशोधक सजग शोधार्थी अभ्यास गटा'च्या वतीने २४ ऑगस्ट २००८ रोजी सहा विद्यार्थिनी (राजश्री इंगामुरी, पलवी नवगिरे, शरिफा बाले, मुक्ता सोनवणे, पूनम कवडे, आणि स्वाती.) नऊ विद्यार्थी (उद्भव धुमाळे, बसवंत दुमणे, अनिल जायभाये, गणपत धुमाळे, दिपक खिलारे, राजेंद्र भोईवार, अमोल जाधव, प्रकाश हिवराळे, खंडोजी वाघे) आदींनी प्रत्यक्ष शिंदे वासूली, जि.पुणे गावातील जानेवारी महिन्यापासून सुरू असलेल्या डाऊविरोधी आंदोलनाची पाहणी, निरीक्षण, मुलाखती घेतल्या. यावेळी एक विद्यार्थी म्हणून माझ्यासमोर नव्याने आलेले अनुभव आपल्यापुढे मांडत आहे.

२४ ऑगस्ट २००८ रोजी आम्ही भालचंद्र डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शिंदे वासूली या गावी साडेदहा वाजता पोहोचलो. खरं सांगायचं तर या गावी जाण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा मला या गावाबद्दल, तिथे चाललेल्या प्रकल्पाबद्दल काहीच माहिती नव्हते. आदल्या दिवशी संध्याकाळी मला 'ग्रुप'मधल्या सर्वांनी याबद्दल सांगितले आणि मीसुद्धा खूप उत्सुक झाले; गावातील लोकांना भेटण्यासाठी, त्यांचे अनुभव ऐकण्यासाठी आणि तेथील कंपनी घालविण्यासाठी चाललेले प्रयत्न पाहण्यासाठी.

सुरुवातीला आम्ही श्री.पानमंत यांच्या घरी गेलो. सुजाता मानमंत आणि श्री.पानमंत यांनी आम्हाला खूप मदत केली. सुजाता आम्हाला ठाकर वस्तीमध्ये घेऊन गेली. ठाकर वस्तीचे दोन भाग आहेत. आम्ही ज्या ठाकर वस्तीमध्ये गेलो, तिथे पहिल्यांदा मी आणि पूनमने एका घरातील महिलेला सर्व सांगितले. म्हणजे आम्ही कोठून, कशासाठी आलो आहोत? आम्हाला काय माहिती पाहिजे? वगैरे पण ते आम्हाला काहीच सांगण्यास तयार होत नव्हते. मग एक कार्यकर्ता आला आणि त्याने आमच्याविषयी सांगितले. तिथले सर्व लोक त्याला ओळखत असल्यामुळे पुन्हा काही अडचण आली नाही.

तिथल्या लोकांकडून आम्हाला समजले की यापूर्वीही काही व्यक्तींनी अशीच माहिती विचारली, त्यामुळे ते आता कोणालाच काही त्यांना सांगत नाहीत. असाच एक अनुभव म्हणजे एका लहान मुलाचा. त्यामुळे समजले की येथील लोक किती ट्रेन झालेले आहेत. कोणाबरोबर काय बोलायचं, कसं बोलायचं, हे त्यांना चांगलंच माहीत झालेलं आहे. या चौथी पाचवीच्या वयाच्या मुलावरून समजलं त्यांच्या घरातील वातावरण कसे असेल. आम्ही त्या मुलाला विचारलं, तुझं नाव काय? तर म्हणाला टिंकू आणि तुझ्या भावाचं नाव काय? पिंटू. एवढं वेड्यात काढल्यासारखं वागत होती ती मुलं. खरंच! मग आम्ही त्यांना विचारलं, तुम्हाला दाऊ कंपनीबद्दल काही माहीत आहे का? तर त्यांनीच आम्हाला विचारलं, 'तुम्हाला काही माहीत आहे का?' आम्हाला काही त्याचं 'इंटेन्शन' समजलंच नाही, म्हणून आम्ही लगेच 'हो' म्हणालो. मग त्यांनी आम्हाला विचारलं, 'तुम्हाला माहीत आहे तर आम्हाला का विचारताय?' आम्ही सांगितलं, 'तुम्हाला काय वाटतंय या कंपनीबद्दल ते लिहायचंय आम्हाला.' लहान मुलं समजून आम्ही अगदी सहजतेने बोलत होतो त्यांच्याबरोबर. पण त्यांची उत्तरं इतकी विचारपूर्वक होती की वाटलं, यांना एवढं बोलायला कोणी शिकवलं असेल? पूर्ण दिवस तिथे सर्व्हे केल्यानंतर समजलं, परिस्थितीने त्यांना बोलायला

शिकवलं आहे. तिथल्या लोकांना विचारलं, 'तुम्हाला काय वाटतंय या कंपनीबद्दल?' तर ते म्हणाले 'जे तुम्हाला वाटतंय तेच आम्हाला वाटतंय.' म्हणजे ते कंपनीच्या बाजूने आहेत का विरोधात आहेत, ते स्पष्ट सांगत नव्हते. त्यांच्या अनुभवामुळे त्यांना कोणाबरोबर कसं बोलायचं हे अगदी बरोबर समजलं होतं. नंतर सर्वांनीच कंपनीच्या विरोधात त्यांच्या सभांबद्दल, आंदोलनाबद्दल अगदी तारखेसह सांगायला सुरुवात केली. सरकार सामान्य जनतेच्या विरोधात किती मोठा खेळ खेळतंय याच्यावर विश्वास बसत नव्हता. पेपरमध्ये वाचणं, चर्चा करणं आणि स्वतः अनुभवणं यात किती फरक असतो, ते प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यावर समजलं.

तिथल्या लोकांना जेव्हा विचारलं की, 'तुम्हाला कंपनीबद्दल अगोदर काही माहीत होतं का?' तर त्यांनी सांगितलं की, 'दोन महिने जोपर्यंत कंपनीची पाटी लावली नव्हती तोपर्यंत आम्हाला कंपनी कशाची आहे तेच माहीत नव्हतं.' ते पुढे म्हणाले, आम्हाला तर समजलं की टायरची कंपनी आहे. कोणी म्हणाले पाण्याच्या बाटल्या तयार करण्याची कंपनी आहे. तिथल्या लोकांनी त्याच्या बांधकामाच्या वेळेससुद्धा काम केले होते आणि पानमंत ते पाणी (बांधकामासाठी) पुरवण्याचे काम करीत होते. पण त्यांना जेव्हा समजले की ही 'केमिकल ची कंपनी आहे, तेव्हापासून तेथे कामावर कोणीच गेले नाही. त्यांना असं वाटत होतं की आपलं गाव सुधारेल,

मुलं कामाला लागतील, पण त्यांच्या आशांचा नाशच झाला, जेव्हा त्यांना याबद्दल माहीत झालं. एक महिला म्हणाली, 'आम्हाला ही कंपनी इथं आणून आमच्या मुलांना काय मारायचंय काय?' हे लोक एवढा कंपनीला विरोध करतात, पण याच्या दुष्परिणामाबद्दल त्यांना कितपत माहीत आहे हे विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की, केमिकल्समुळे पर्यावरणाला धोका आहे. त्याचबरोबर शेती नापीक होते. आणखी महत्त्वाचे म्हणजे त्या कंपनीच्या लोकांनी बोअरवेल घेतलेली आहे. जमिनीतच दूषित पाणी सोडणार आहेत. त्यामुळे शेती नापीक होईल. त्यांनी पाण्यासाठी घेतलेल्या बोअरवेलमुळे गावातील इतर ठिकाणचे पाणीसुद्धा कमी झाले. त्या ठाकर वस्तीतील महिलेने सांगितले की आम्हाला भोपाळ घटनेबद्दल माहीत आहे. ती म्हणाली हे केमिकलचे पाणी जर आपल्या त्वचेला लागले तर तेथील कातडे निघून जाते आणि स्त्रियांमध्ये रिप्रॉडक्शन कमी होईल आणि जरी मुलं जन्मली तरी मूकबधिर, किंवा अपंग अशी जन्मतील. (ती बऱ्यापैकी शिकलेली असावी असे वाटले) एवढे भयानक दुष्परिणाम ऐकून खूप वाईट वाटत होतं आणि नंतर ती महिला म्हणाली, 'आज आम्ही मरालो तरी उद्या तुम्ही मराल कारण हे पाणीसुद्धा नदीला सोडलं जाईल आणि ही नदी पुढे इंद्रायणीला मिळते.

स्त्रिया पेटून उठल्या होत्या, कंपनीच्या विरोधात घोषणा देत होत्या. सरकारने कंपनीला प्रोटेक्शन दिले आहे. जवळजवळ ३०० पोलीस असतील. पोलिसांना गावात येऊ न देण्यासाठी रस्त्यावर मोठे पाईप आडवे टाकले होते. स्त्रिया रस्त्यामध्ये गाड्या अडवण्यासाठी झोपल्या होत्या. तिथल्या ७० स्त्रियांना पोलिसांनी पकडून नेले होते.त्यांना दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले. काही लोकांना पोलिसांनी जेलमध्ये ठेवले, तेव्हा गावातील महिलांनी पोलिसांनाच गावामध्ये अडवलं आणि सांगितलं, 'तुम्ही आमच्या माणसांना सोडा आम्ही पोलिसांना सोडतो.' ज्या महिला जेलमध्ये गेल्या होत्या त्यांची पोलिसांबद्दलची भीती संपली होती. पण पोलिसांनी गावामध्ये खूपच दहशत माजवली. रात्री पोलीस लोकांच्या घरामध्ये जात असत, तेव्हा बरोबर स्त्री-पोलीस नसत. रात्रीच दरवाजा वाजवल्यामुळे नक्की पोलीस आहेत की चोर, हे लोकांना समजत नसे. तेव्हा पोलीस दारावर लाथा मारत आणि त्यांच्या युनिफॉर्ममध्ये नाही तर साध्या कपड्यात येत असत. घरात फक्त महिला असताना रात्रीच येऊन पुरुष मंडळींना घरात शोधत असतं. तिथल्याच एका मुलाला पोलिसांनी मारले. शारीरिक त्रास तर झालाच, पण मानसिक त्रासही झाला.

दोन विद्यार्थी बारावीच्या पेपरमध्ये नापास झाले. एक व्यक्ती झोपेतच पोलीस पोलीस म्हणून भिऊन उठते. एक देवकर म्हणून आजी आहेत, त्यांनी पोलिसांना सांगितले की घरात कोणी नाही तरी पोलीस आजींना म्हणायचे, 'माळ्यावरती कोणी आहे का ते दाखवा.' त्या आजी एवढ्या वृद्ध आहेत की त्या माळ्यावरती कोणी आहे का ते दाखवा. त्या आजी एवढ्या वृद्ध आहेत की त्या माळ्यावरती चढू शकत नव्हत्या, तरी पोलीस त्यांना दमदाटी करीत होते. आजींनी त्यांना सांगितले की, त्यांना बी.पी.चा त्रास आहे, चक्कर येते. तरीही पोलिसांनी त्यांचे काही ऐकले नाही. पण जेव्हा त्यांना खरंच चक्कर आली आणि त्या खाली पडल्या तेव्हा पोलीस तिथून निघून गेले. त्या आजींची अवस्था आता गंभीर आहे. एवढं असूनसुद्धा सरकार कंपनीला संरक्षण देते आणि पोलिस स्त्रियांशी उद्धट भाषेत बोलत असतात. एका स्त्रीने सांगितले, त्या घोषणा देत, 'या दाऊचं करायचं काय? खाली मुंडी वर पाय' तर ते पोलीस स्त्रियांना म्हणाले, 'कोणाचे खाली मुंडी वर पाय होतात ते तुम्हाला समजेलच.' पोलिसांनी गावात एवढी दहशत निर्माण केलेली असली तरी जे लोक जेलमध्ये जाऊन आलेत त्यांच्या मनातील पोलिसांबद्दलची भिती मेलेली आहे. पण पोलीस कोणालाही पकडून घेऊन जातात. त्यामुळे पुरुष गावातून बाहेर गेले होते. सर्व कामे महिलांनाच करावी लागतात.

पोलिसांनी सांगितले की, आमचं या गाववाल्यांशी किंवा गाववाल्यांचं आमच्याशी काही वाकडं नाही. आम्ही फक्त आमच्या पोटासाठी, फक्त ड्युटी म्हणून काम करतोय. आम्ही पण शेतकरी आहोत. त्यामुळे आम्हाला तरी कुठं वाटतंय की ही कंपनी व्हावी म्हणून. तिथले लोक पोलिसांना पाणीसुद्धा देत नाहीत. पोलिसांनी एका आठ-दहा वर्षांच्या मुलाला पाणी आणायला सांगितले तर तो काही जागचा हलला नाही. आमच्यातल्याच एकाने सांगितले तेव्हा तो पाणी आणायला गेला. पोलिसांनी स्वत: आम्हाला सांगितलं की तुम्ही आहात म्हणून यांनी मला पाणी दिलं, नाहीतर पाणीसुद्धा देत नाहीत. 

त्या मुलाने पाणी आणल्यावर पोलिसाने पहिला प्रश्न विचारला, 'विष तर नाही टाकून आणलंस ना?' हा प्रश्न एवढा सरळ नाही. कारण यावरून समजले की या कंपनीमुळे गावकरी किती चिडलेले आहेत आणि पोलिसांना त्यांच्या रागाचा अंदाज आलेला आहे. लोक माहिती सांगायचे, 'पण ही कंपनीची जी जाळपोळ झाली त्यात आमचा काही हात नाही' कंपनीच्या विरोधात हे आंदोलन करण्यासाठी, त्यांना कोळसे पाटील, कॉ.सोनवणे यांनी मदत केली. त्याचबरोबर ते शिवसेनेचेही नाव सांगत होते. शेवटी आम्ही दलित वस्तीत गेलो. तिथे विचारलेल्या प्रश्नावरून लक्षात आले की तिथल्या लोकांचासुद्धा कंपनीला विरोध आहे. त्यांनी सांगितले, 'कंपनी आम्हाला जवळ आहे, त्याचा आम्हाला त्रास होणार ही जाणीव आहे आम्हाला.' आणि एका महिलेने तर सरळ सांगितले, लोक म्हणतात आमच्या लोकांनी पैसे घेतले आहेत, पण ते पैसे काय आम्हाला आयुष्यभर पुरणार आहेत?' म्हणजे एवढं तर लक्षात येत होतं की येथील लोकांचा कंपनीला पूर्ण विरोध आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके