डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आपल्याकडे शेक्स्पीयरची नाटके ज्या पारंपरिक पद्धतीने सादर केली जातात, त्यापेक्षा पाश्चात्य रंगभूमीवर फार वेगळ्या पद्धतीने ती सादर केली जातात. त्या पद्धतीचा एक नमुना आपल्या रंगभूमीवर पेश करावा असा मनसुबा रचून मी राजमुकुट ला हात घातला होता. पण त्यासाठी साधनांची व तज्ज्ञांची उपलब्धता किती प्रचंड प्रमाणात हवी हे मी ध्यानातच घेतले नव्हते... 'राजमुकुट चा प्रयोग कमालीचा वाईट झाला. माझ्या टीकाकारांनी त्याचे वाभाडेच काढले, पण चाहतेसुद्धा माझ्यावर तुटून पडले. जर दुसरा कच्चा माणूस असता तर रंगभूमी कायमची सोडून पळूनच गेला असता....

पी डी.ए.करता काही तरी नवे नाटक शोधावे आणि ते आपणच दिग्दर्शित करावे असे आता माझ्या मनात फार येऊ लागले होते. एकतर पी.डी.ए.कडे काही नवीन नाटक नव्हते आणि दुसरे म्हणजे एवढी पाश्चात्त्य रंगभूमी आपण पाहून आलो आहोत तर त्याचा काही तरी उजेड इकडे पडावा असे फार वाटत होते! एकदा शेक्स्पीयरचे नाटक करावे असा महत्त्वाकांक्षी विचार मनात येत होता. हॅम्लेट, झुंझारराव, राजमुकुट अशी काही गाजलेली भाषांतरे वाचली होती, पण त्या सर्वांपेक्षा वि. वि. शिरवाडकरांनी भाषांतर केलेले ‘ऑथेल्लो' फार आवडले होते. तेव्हा ते करावे असे पी डी.ए.त सर्वानुमते ठरले. 

ते नाटक छापून तयार होते पण त्याचा प्रयोग अजून कुणीच केला नव्हता. शिरवाडकरांचा चांगला परिचय, त्यांच्या 'दूरचे दिवे’मुळे झालेलाच होता. त्यांच्या सौजन्यपूर्ण, स्नेहशील स्वभावामुळे त्यांची परवानगी नकीच मिळेल याची खात्री होती. लागल्यास वसंतरावांचा वशिला होताच. मोठ्या उत्साहाने शिरवाडकरांची परवानगी मागायला नाशिकला गेलो. त्यांना आम्ही ऑथेल्लो करण्याची कल्पना फारच आवडली, पण म्हणाले, "अडचण एवढीच आहे की ते नाटक मुंबईचा मराठी साहित्य संघ करणार आहे. बरेच दिवसांपासून ते त्यांच्याकडेच आहे. अजून त्यांनी ते केले नाही, त्या अर्थी ते करण्याचा विचार त्यांनी सोडूनही दिला असेल. पण त्यांची परवानगी घ्यावी लागेल. ते नाही म्हणणार नाहीत. चांगली माणसे आहेत. पण तांत्रिकदृष्ट्या त्यांची परवानगी घ्यावी लागेल, त्याशिवाय आपल्याला करता येणार नाही. मी आठ पंधरा दिवसांत तुम्हाला कळवतो.. ज्या उत्साहाने शिरवाडकरांनी माझ्या कल्पनेचे स्वागत केले त्याने मलाही हुरूप आला. मी पुण्याला परतलो.घरी अरुण काकडेचा एक निरोप येऊन पडला होता. अरुण काकडे हा पूर्वी पुण्याला पी.डी.ए.त होता. अतिशय उत्साहाने आणि निरलसपणे पी.डी.ए.च्या व्यवस्थापनाचे कामतो श्रीधर राजगुरुबरोबर करायचा. नाटकात भूमिका मिळाली तर आनंदच, नाही मिळाली तरी चिंता नाही अशी वृत्ती. आता नोकरीच्या निमित्ताने त्याला पुणे सोडून मुंबईला जावे लागले होते. 

मुंबईला तो आता सौ. विजया खोटे यांच्या नाट्यसंस्थेत काम करत होता. त्याचा निरोप होता, 'विजयाबाईंना तुम्हाला एकदा भेटायचं आहे... काही काम आहे. तीन वर्षांपूर्वी, कॅनडाला जाण्याआधी एकदा पुण्यात विजयाबाईंची भेट झाली होती.. त्या वेळी त्या कु. विजया जयवंत होत्या. मुंबईत त्या अतिशय छान नाट्यविषयक काम करताहेत अशी त्यांची ख्याती त्याहीवेळी पुण्यात पोहोचली होती. गो.नी.दांडेकरांचे 'शितू' नाटक घेऊन त्या पुण्याला आल्या होत्या. काशिनाथ घाणेकर, अरविंद देशपांडे, माधव वाटवे वगैरे गुणी तरुण मंडळी त्यांच्याबरोबर त्या वेळी होती. सगळी उत्साहाने सळसळत होती. वेडी नाटकवाली मंडळी होती. 

पहिल्याच भेटीत आमचे सगळ्यांचे सूर जुळले होते. नाटकाचा प्रयोगही मंडळींनी सुरेखच केला. नंतरच्या गप्पाही खूप रंगल्या. पी.डी.ए.च्या जरा कोंदट, पुणेरी वातावरणापेक्षा खूपच मोकळे वातावरण होते. सगळे दिलखुलास चर्चा करत होते . मला तर एकाच भेटीत त्या ग्रुपबद्दल खूप आस्था, आपलेपणा वाटला. विजयाशीही गप्पा झाल्या. वरवर अगदी खेळकर, थिल्लर वाटणारी ही बाई नाटकाच्या बाबतीत चांगली गंभीर आहे हे ध्यानी आले. पण त्या एका भेटीनंतर मी कॅनडाला निघून गेलो. त्यांचे काम, अर्थात, मुंबईत चालूच राहिले. अरुणचा निरोप मिळाल्यावर मी लौकरच विजयाबाईंना भेटलो. 

मुंबईला मलबार हिलवरचा त्यांचा फ्लॅट शोधत तिथे पोचलो. फ्लॅटमध्ये पाऊल टाकताच दचकलो. हे कुणी मध्यमवर्गीय घर नव्हते . चांगलेच श्रींमंती, फॅशनेबल घर होते. विजयाबाई पण तीन वर्षांपूर्वीच्या जयवंत नव्हत्या, मिसेस खोटे होत्या. सुप्रसिद्ध सिनेअभिनेत्री दुर्गा खोटे यांची सून! मी जरा घाबरलोच, मला फॅशनेबल इंग्लिश नाटक करायचे नव्हते. 'शितु’वाल्या विजयाबाईंबरोबर काम करायला मी उत्सुक होतो- पण त्यांचा हा नवा अवतार. ज्या प्रकारचे उच्चभ्रू नाटक सुचवीत होता त्यात मला ओढले जायचे नव्हते. 

मी सावधपणे बसलो. विजयाबाईपण बसल्या. बसल्या त्या एकदम कोचावर वर पाय घेऊन, मांडी ठोकून! मला धीर आला. मग त्या बोलत राहिल्या. तीच वरवर थिल्लर वाटणारी पण अंतर्यामी गंभीर, वाक्यावाक्यात, नाटकाशी जडलेल्या घट्ट आणि सखोल नात्याची ओळख पटवणारी अखंड बडबड! मी मन लावून ऐकत राहिलो. कल्पना अशी होती की त्या स्वतः'रंगायन करता (त्यांच्या नव्या संस्थेचे नाव 'रंगायन' होते. हे नाव पु.शि.रेग्यांनी त्यांना दिलेले होते!) ज्या प्रकारचे नाटक करू पाहत होत्या त्याच प्रकारचे नाटक मीही करू बघतोय याची त्यांना ओळख पटली होती.

माझी काही कामे पाहून आणि माझे काही विचार त्यांच्या कानावर आल्यामुळे तर त्या आणि मी एकत्र काम करू शकू काय? त्या मुंबईत आणि मी पुण्यात ही एक मोठी अडचण होती. पण ती जर सोडवता आली तर माझी या योजनेला मान्यता आहे का? असे त्या मला विचारत होत्या ! त्याकरता मी पी.डी.ए. सोडण्याची गरज नव्हती. माझे पी.डी.ए.चे काम चालू ठेवून जेव्हा जमेल तेव्हा आणि जमेल तसे मी रंगायनबरोबर काम करावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणजे पी.डी.ए.कडून मी तुम्हांला उसने मागतीय! मला कल्पना एकदमच आवडली. तत्त्वतः तरी आवडली; प्रत्यक्षात कशी आणता येईल याबद्दल मात्र मी साशंक होतो. पण प्रयत्न करून पाहायला हवा होता. एकतर भालबांचे आणि माझे मतभेद होते- आणि पी.डी.ए.मधले स्थितिशील वातावरण बदलणे माझ्या एकट्याच्या आवाक्यात आहे असे मला वाटत नव्हते. रंगायनमध्ये काम करून मला खूप नवे शिकायला मिळेल, ज्या प्रकारचे आधुनिक नाटक मला करावेसे वाटते आहे ते करायला मिळेल असे मला वाटले.

1962चा मध्य हा काळाचा असा टप्पा होता की ज्या वेळी आधुनिक नाट्याची (नवनाट्याची!) चळवळ निश्चितपणे मूळ धरणार अशी चिन्हे स्पष्ट दिसत होती. नाटकाकडे पाहण्याचा परंपरागत दृष्टिकोन मागे पडून, नाटकाकडे 'एक गंभीर कलाकृती म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट दिसू लागला होता. वास्तविक पाहता तीस-बत्तीस वर्षांपूर्वीच नाट्यमन्थंतर या संस्थेने 'आंधळ्यांची शाळा’सारखी नाटके करून ह्या दृष्टिकोनाचा पुकारा केला होता. पण त्या वेळी तो अगदी एकाटा प्रयत्न ठरल्याने चळवळीचे रूप धारण करू शकला नाही. पण आता तशी परिस्थिती नव्हती. 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनेक मंडळी या दृष्टिकोनाचा पुरस्कार करत होती. त्यांत शिरवाडकर , माधव मनोहर, यांसारख्या ज्येष्ठांपासून आत्माराम भेंडे, दामू केंकरे, दारव्हेकर, कानेटकर, तेंडुलकर, भालवा केळकर , विजयाबाई, यांसारखी, निरनिराळ्या शहरांत विखरून असलेली, पण एकमेकांच्याही नकळत एकाच दिशेने वाटचाल करणारी, तुलनेने तरुण मंडळीही होती. खरे तर या सगळ्या मंडळींनी एकत्र येऊन काही संयुक्त प्रयत्न करण्याची गरज होती. पण ते शक्य नसले तरी आधुनिक विचाराच्या अधिकाधिक मंडळींनी एकमेकांच्या हातात हात घालून वाटचाल करण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते.
विजयाबाईच्या कल्पनेला मी अगदी मनापासून होकार दिला आणि पुण्याला परतलो. गेल्याबरोबर अर्थातच मी लगेच भालवांना भेटून त्यांना ही कल्पना सांगितली. भालबा नाराज झाले! आपल्या संस्थेतल्या कुणीही बाहेरच्या दुसऱ्या संस्थेत जाऊन काम करणे त्यांना एकदम नामंजूर होते. अहमदनगरला प्रा. मधुकर तोरडमल यांची नाट्यसंस्था स्वतंत्रपणे खूप छान काम करू लागली होती . त्यांनी स्वतः वसवलेल्या *वेड्याचे घर उन्हात चे प्रयोग ते करत होते. एकदा ठरलेल्या प्रयोगाच्या आधी एक-दोनच दिवस, त्यांच्या प्रयोगात बापूंचे काम करणारा नट आजारी पडला. तेव्हा त्यांनी आमच्या प्रयोगात काम करणारा नट, राम खरे, याने त्यांच्या अडलेल्या प्रयोगात काम करावे अशी विनंती भालबांकडे केली. तर भालबानी ती साफ धुडकावून लावली. त्या वेळी भालबांशी जवळजवळ भांडून रामला त्या एका प्रयोगात, 'बाहेरच्या संस्थेत काम करण्याचीपरवानगी मिळवावी लागली होती! 

याही वेळी मी भालबांशी वाद घातला. मी म्हटले, 'भालवा, मराठी रंगभूमी ही एक संस्था आहे असे आपण मानले पाहिजे. सोईकरता आपण निरनिराळ्या शहरात निरनिराळ्या संस्था काढतो- आपापले काम आपापल्या पद्धतीने करतो. पण अशा आपल्यासारख्या चांगले काम करणाऱ्या निरनिराळ्या संस्थांत जर आपल्या संस्थेचा सभासद कामे करू लागला, तर त्याचा अनुभव अधिक समृद्ध होणार नाही का ? नाट्यसंस्था म्हणजे काय राजकीय पक्ष आहे का एकादा बुवाचा मठ आहे ? दुसऱ्या एकाद्या संस्थेतला माणूस तुमच्याकडे आला तर तुम्ही त्याला अगर तिला आनंदाने तुमच्या संस्थेत प्रवेश देता हे कसे चालते? तुमची संस्था ही जगातली सर्वश्रेष्ठ किंवा एकमेवाद्वितीय नाट्यसंस्था आहे' असा तुम्हांला अहंकार आहे असा त्याचा अर्थ होत नाही का?' 

भालवा निरुत्तर झाले म्हणजे जसे नेहमी म्हणत तसे म्हणाले, "तुला काय हवे ते कर. तुला कोण अडवणार! पण वाकी कुणाला मात्र मी परवानगी देणार नाही पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी 'रंगायन कडे पळालो !इकडे थोड्याच दिवसांत शिरवाडकरांकडून निरोप आला की 'साहित्यसंघाची मंडळी 'ऑथेल्लो ची परवानगी द्यायला तयार नाहीत. ते इतक्यात त्या नाटकाचा प्रयोग करणार नाहीत. पण त्यांनी करण्याअगोदर ते दुसऱ्या कुणालाही प्रयोग करायची परवानगी देणार नाहीत.' माझी फार निराशा झाली. आश्चर्य असे वाटले की मुंबई मराठी साहित्य संघ, एवढी ज्येष्ठ संस्था तिची 'नाट्यशास्त्र' तर डॉ. भालेरावांनी भारतभर नावारूपाला आणलेली. 

मराठी रंगभूमीला आलेली भयानक मरगळ दूर करून तिला नवसंजीवन देण्याचा सार्थ अभिमान मिरवणारी संस्था. नाटकाचा धंदा करून पैसे मिळवायला काही ही संस्था बसलेली नाही. तिने आपल्याकडे असलेल्या एका नाटकाचे प्रयोग करण्याची परवानगी एका हौशी नाट्यसंस्थेला देण्याला नकार का द्यावा? एखाद्या धंदेवाईक संस्थेला परवानगी नाकारली असती तर समजण्याजोगे होते! हे कशाचे लक्षण आहे? मालकी हक्काच्या अवाजवी जाणिवेचे का अहंकाराचे? का आत्मविश्वासाच्या अभावाचे ? मला हे कधीच कळू शकलेले नाही. स्वतःला प्रायोगिक म्हणवणाऱ्या संस्थासुद्धा एकाच वेळी दोन किंवा अधिक संस्थांनी, एकाच नाटकाचा प्रयोग करण्याच्या विरुद्ध का असतात? मी करत असलेले नाटक कुणालाही , केव्हाही करण्याची परवानगी दिली पाहिजे. मला धंदा करायचा असेल तर गोष्ट वेगळी. असो.

शेक्स्पीयर करण्याचे वेड डोक्यातून काढून टाकायला मी तयार नव्हतो! त्यामुळे मग पी.डी.ए.त सगळ्यांनी विचार करून, शिरवाडकरांचेच मॅक्वेथ चे भाषांतर राजमुकुट' करायचे ठरवले आणि आम्ही कामाला लागलो विजयाबाईनीसुद्धा सुरुवातीचा प्रयोग म्हणून एकांकिका करून पाहण्याची योजना आखली. तीसुद्धा फक्त दोनच पात्रे असलेली. मी तालमीकरता पुण्याहून मुंबईला येणार.... तोही आठवड्यातून एकादा दिवस , तेव्हा जास्त पात्रे असलेली एकांकिका किंवा नाटक करायचे म्हणजे जमवाजमव करणे जिकिरीचे होणार . मी आणि विजयाबाई दोनच पात्रे असल्याने, मला मुंबईला येणे जमणार नाही त्या वेळी बाई पुण्याला येतील ही सोयीची बाब होती. 

तालमी शक्य तो मुंबईतच करण्याचे ठरले, कारण मुंबईत रंगायनला तालमींकरता जागा उपलब्ध होती ..तेंडुलकरांनी लिहिलेली मादी' ही एकांकिका करायचे ठरले. दर रविवारी सकाळच्या पहिल्या गाडीने मी पुण्याहून मुंबईला जायचो. स्टेशनवरून सरळ वॉर्डन रोडवर च्या रंगायन च्या तालमीच्या जागेवर पोचायचो. मी दिवसभर .... म्हणजे संध्याकाळी साडेसहा-सात वाजेपर्यंत तिथे मी आणि विजयाबाई तालीम करायचो आणि मी रात्रीच्या पॅसेंजरने परतून सोमवारी सकाळी पुण्याला कामावर हजर व्हायचो ! मादी ही जेमतेम अर्ध्याएक तासाची एकांकिका होती त्यामुळे सात-आठ तासांत. गप्पाटप्पा, जेवण खाण, चहापाणी वगैरे वेळ सोडूनसुद्धा पाच सहा वेळा तरी सर्वच एकांकिकेची तालीम व्हायची. रविवार असल्यामुळे रंगायनची इतर मंडळीही तालमीला जमायची. 

माधव वाटवे, अरुण काकडे, अरविंद देशपांडे, वृंदावन दंडवते वगैरे जमले की मस्त गप्पागोष्टी रंगायच्या. कधीकधी टिंगल करायला अशोक शहाणेही यायचे. पण मुख्य म्हणजे या निमित्ताने श्री. पु. भागवतांची ओळख झाली. श्री. पु. हे "रंगायन चे अध्यक्ष होते आणि तेंडुलकर नाटककार तर होतेच पण रंगायनच्या चमूचे आधारस्तंभ असल्याने तेही अनेक वेळा तालमीना यायचे- त्यांच्याशीही गप्पा व्हायच्या. 

विजयाबाई, अर्थात, असायच्याच. या सगळया आनंददायी गप्पाटप्पात तालमीमात्र अगदी सक्त शिस्तीत व्हायच्या. विजयाबाईच्या नेतृत्वाची एक फार मजेशीर पकड रंगायनच्या सगळ्या मंडळींवर होती. कणखर नेतृत्व देणारी 'रंगायन ची अध्वर्यु, रूपवान बुद्धिमान अभिनेत्री नाट्यतंत्रावर घट्ट पकड असलेली समर्थ दिग्दर्शिका, सदैव उचंबळणाच्या व्यक्तिमत्यामुळे वा.ल.कुलकर्णी, भाऊ रानड्यांपासून, श्री.पु. आणि तेंडुलकरांपर्यंत सगळ्या ज्येष्ठांना आणि श्रेष्ठांना जिंकून घेणारी कर्तबगार स्त्री आणि जीवनातल्या लहानसहान गोष्टीतही मुक्त आनंद घेणारी, सतत निरासारखी खळाळणारी आपली अगदी जवळची मैत्रीण', अशा अनेक नात्यांनी विजयाबाईंनी 'रंगायन 'च्या सर्वच मंडळींवर विलक्षण छाप टाकलेली होती. 

मीही लौकरच त्या मंडळींत सामील झालो दीडेक महिना, दर रविवारी आम्ही तालमीकरीत राहिलो. आणि एकांकिका पक्की बसल्यावर मग प्रयोग सुरू झाले. एका छोट्या हॉलमध्ये प्रयोग व्हायचे. रंगमंच असायचाच, हॉलच्या अर्ध्या भागात 25-30 खुर्च्या टाकून प्रेक्षक बसलेले असायचे, आणि उरलेल्या अर्ध्या भागात, एक लोखंडी कॉट, एक टेवल खुर्ची अशा जुजबी नेपथ्यावर आम्ही प्रयोग करायचो. दर्शनी पडदा वगैरे काहीच भानगड नाही. प्रेक्षकांना, आपण नाटकातच असल्याचा भास व्हायचा. निकट-नाटय! आम्हा काम करणारांनाही तो अनुभव नवीन होता आणि प्रेक्षकांनाही नवीन होता. 

एकमेकांचा शेवटचा निरोप घेण्याकरिता एकत्र आलेल्या दोन प्रेमिकांची पिळवटून टाकणारी शोकांतिका तेंडुलकरांनी मादी मध्ये फार प्रभावीपणे रेखाटली आहे. श्वास मुठीत धरून बसलेल्या प्रेक्षकांच्या संगतीत तो अनुभव अधिकच गडद व्हायचा! एकंदरीत विजयाबाईनी योजलेला प्रयोग चांगलाच यशस्वी झाला. छोट्या हॉलमध्येच करण्याची ती एकांकिका होती. छोट्या हॉलमध्ये, मोजक्याच प्रेक्षकांसमोर पण बरेच प्रयोग आम्ही 'मादी चे केले. खूप बोलबाला झाला. खूप लिहिले गेले. खूप बोलले गेले. आम्ही सगळेच सुखावून गेलो. 

एकांकिका करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्यावर विजयाबाईनी पुढची झेप घेतली... सबंध नाटकच का करू नये ? संयुक्त नटसंचात! म्हणजे रंगायनच्या नाटकात मला घेऊन! मी कशाला नाही म्हणू? पण इकडे पी डी ए.करला मी 'राजमुकुट'बसवायला घेत होतो. ते हातावेगळे करणे आवश्यक होते. खरे म्हणजे दिग्दर्शन करण्याचा माझा अनुभच जवळजवळ नगण्यच होता. मी एम.बी.बी एस. होऊन मेडिकल कॉलेजमधून बाहेर पडल्यावर, आमच्या हॉस्पिटलचे नर्सेस कार्टर्स, स.प.कॉलेज, मेडिकल कॉलेज आदी ठिकाणी मी तीनचार वेळ गैदरिंगची नाटके बसवायला गेलो होतो. पण ती बहुतेक सगळी आम्ही पी डी ए मध्ये केलेलीच नाटके असायची. उद्याचा संसार, भ्रमाचा भोपळा वगैरे. त्यामुळे त्यात नवीन करण्याचे काहीच नसायचे. 

भालबांच्या दिग्दर्शनाची ती कार्बन कॉपी असायची आता प्रसंग बाका होता. एकदम शेक्स्पीअरला हात घातला होता. नाटक मी पाहिलेले नव्हते... इंग्रजीत वा मराठीत. वाचले होते फक्त, मराठीत. नाही म्हणायला मी इंग्लंडमध्ये असताना अलेक गीनेस आणि पामेला ब्राऊन यांनी ध्वनिमुद्रित केलेली एक साँग प्लेइंग रेकॉर्ड मला मिळाली होती. सर्ंध 'मॅक्वेय' नाटक संक्षिप्त करून सुमारे पन्नास मिनिटांत बसवले होते. ती ध्वनिमुद्रिका अलेक गीनेसच्या कामाकरता मला विलक्षण आवडली होती. म्हणून मी ती माझ्या टेपरेकॉर्डरवर ध्वनिमुद्रित करून घेतली होती. ती टेप माझ्याजवळ होती. पण ती फारशी उपयोगी पडणारी नव्हती. 
पुण्याच्या ब्रिटिश कौन्सिलच्या वाचनालयाचा मी सभासद होतोच, तिथून 'मॅक्वेय संबंधात जे असेल ते आणून वाचण्याचा मी सपाटा चालवला. पण ती सगळीच वाङ्मयीन समीक्षा असायची. नाट्यप्रयोग बसवण्याच्या दृष्टीने त्यांतून काहीच हाती लागायचे नाही. नाटकाचे भाषांतर शिरवाडकरांनी संपूर्णपणे गद्यात केले होते. ऑथेल्लो चे भाषांतर करताना त्यांनी मुक्तछंद बराच वापरला होता आणि त्यामुळे भाषेला चांगले वजन आले होते. त्याचप्रमाणे *राजमुकुट 'मधली स्वगते तरी त्यांनी मला मुक्तछंदात करून द्यावीत अशी मी त्यांना विनंती केली... आणि त्यांनी ती तत्परतेने मला करून दिलीही. (त्यांच्याच हस्ताक्षरांत लिहिलेली ती स्वगते आज तीस वर्षांनंतरही माझ्याकडे आहेत- आणि फक्त माझ्याचकडे आहेत !) 

शेवटी मी स्वतःच्याच बुद्धीने नाटकबसवायचे ठरविले. स्वतःच नेपथ्य डिझाइन केले, वेशभूषा ठरवली , प्रकाश आणि संगीत योजना मीच केली... सबकुच मीच ! कसून तालमी घेतल्या. पात्रे भरपूर असल्यामुळे तालमी खूप करायला लागल्या. माझा मुलगा आनंद त्यावेळी नऊ वर्षाचा होता. त्यालाही नाटकात काम करायला लावले ! 'लेडी मॅक्येय' श्यामला आगाशे (पुढे वनारसे) यांनी खूप मेहनतीने केली. माझा धाकटा भाऊ विजयही एक काम करून गेला. सगळा प्रयत्न होता तो शक्य तितकी नवी माणसे भरती करण्याचा! कारण भालबांचा विरोध जाणवण्याइतपत वाढत होता, पी.डी .ए.मधल्या त्यांच्या सार्वभौमत्वाला धक्का लागेल अशी त्यांना भीती वाटत होती की काय कोण जाणे !

'राजमुकुट चा आमचा प्रयोग कमालीचा वाईट झाला ! लाज वाटावी इतका वाईट झाला !सगळेच फसले ! 'लेडी मॅक्वेय' (श्यामला) 'पहारेकरी' आणि 'वैद्य' (भालबा) मुलगा (आनंद) आणि 'मॅक्डफची बायको आणि 'दासी' (तारा केळकर) यांशिवाय कुणीच आपापल्या भूमिकेत शोभला नाही. किरकोळ देहयष्टी, तरुण वय आणि चुकीची वेषभूषा ही त्याची कारणे होती. विश्वास मेहेंदळे आणि राजगुरु हे 'डाकिणी' म्हणून छान शोभले पण सतत चिरक्या आवाजात बोलणे त्यांना कठीण गेले. मी स्वतः 'मॅक्येथ' म्हणून फारच वाईट होतो! एक तर दिग्दर्शनाची सगळीच अंगे सांभाळताना माझी इतकी तारांबळ उडाली होती की स्वतःच्या भूमिकेकडे फारसे लक्ष देता आले नव्हते. 

शिवाय किरकोळ अंगयष्टी आणि चुकीची वेषभूषा ही कारणे होतीच. अर्थात कमीपणा माझा होता... दोष कुणालाच देण्यात अर्थ नव्हता, नेपथ्य धड वास्तववादी नाही... धड प्रतीकात्मक नाही असे धेडगुजरी झाले होते. नेपथ्यात काहीही फेरफार न करता, एकापाठोपाठ एक असे वेगाने प्रवेश सादर करायचे होते. पण त्यासाठी योजलेली प्रकाशयोजना इतकी प्राथमिक दर्जाची होती की नाटकाला आवश्यक असलेले काळोखी. भयसूचक वातावरण एकाही प्रवेशात निर्माण होऊ शकले नाही. आम्हांला उपलब्ध असलेले रंगमंचावरचे दिवे आणि टिमर्स अगदीच तुटपुंजे होते पण त्याहीपेक्षा माझे तांत्रिक बाबतीतले आसान फार गाढ होते हेच खरे.

आपल्याकडे ऐतिहासिक किंवा शेक्स्पीयरची नाटके ज्या पारंपरिक पद्धतीने सादर केली जातात त्यापेक्षा पाश्चात्य रंगभूमीवर फार वेगळ्या पद्धतीने ती सादर केली जातात आणि ती फार परिणामकारक होतात हे मी पाहिले होते. तेव्हा त्या पद्धतीचा एक नमुना आपल्या रंगभूमीवर पेश करावा असा मनसुया रचून मी राजमुकुट ला हात घातला होता. पण तशा प्रकारच्या सादरीकरणाला साधनांची उपलब्धता किती प्रचंड प्रमाणात असायला हवी आहे मी ध्यानातच घेतले नव्हते आणि नुस्ती साधनांची उपलब्धता नव्हे तर तज्ज्ञ अशा तंत्रज्ञांचा ताफाही हवा. 

नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा, ध्वनिसंयोजन, नटसंचाची निवड कुठल्याच बाबतीत तडजोड करावी लागता कामा नये. मराठी रंगभूमीवर नजीकच्या भविष्यकाळात तरी हे अशक्य दिसते. अपेक्षेप्रमाणे प्रयोगानंतर टीकाकारांनी त्याचे वाभाडेच काढले. माझे चाहतेसुद्धा माझ्यावर तुटून पडले. 'रायगडाला जेव्हा जाग येते वरच्या माझ्या परीक्षणाने मी अनेक जणांना दुखावले होते ही गोष्ट तशी ताजी होती त्यामुळेच तर माझ्यावरच्या टीकेला भलतीच धार चढली. मी निर्लज, म्हणूनच सगळ्या टीकेला तोंड देत, नाटकात टिकून राहिलो. जर दुसरा कच्चा माणूस असता तर रंगभूमी कायमची सोडून पळूनय गेला असता .(क्रमशः)
 

Tags: रंगायन पी डी.ए. राजमुकुट शेक्स्पीयर डॉ. श्रीराम लागू न पेललेला 'राजमुकुट' जडण-घडण Jadan Ghadan Na Pelalela Rajmukut Dr. Shriram Lagu Rajmukut PDA Rangayan weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके