डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गेल ऑम्वेट : दास्याच्या तुरुंगाची किल्ली शोधणारी संशोधक

एक व्यक्ती म्हणून गेल ऑम्वेट अतिशय साध्या होत्या. माणूस म्हणून सहजपणाने मित्र भावाने समोरच्याचे ऐकून घेणे, कार्यकर्त्यांची, वंचितांची दखल घेणे आणि संशोधनातून त्या प्रश्नांची अमूर्त मांडणी करणे त्यांच्या आयुष्याचा अंगभूत भाग होते. ज्या काळी फार कमी विचारवंत आणि अभ्यासक समाजात मिसळून सामान्यांचे प्रश्न ऐकून त्यावर लिहीत असत, त्या काळात गेल यांनी भारतीय समाजातील विषमता आणि शोषण यांचे विश्लेषण जागतिक पातळीवर पोहोचवले.

प्रा. गेल ऑम्वेट यांच्या जाण्याने महाराष्ट्रातील क्रियाशील विचारवंतांच्या उज्ज्वल परंपरेतील एक महत्त्वाची व्यक्ती आपल्यातून निघून गेली आहे. वंश, लिंगभाव, वर्ग, जात आणि वांशिकता यांपैकी कोणत्याही आधारावर लादलेले दास्य झुगारून दिले पाहिजे, हा आग्रह त्यांच्या लिखाणातून सातत्याने प्रतीत होतो. त्यांचा वैचारिक वारसा केवळ जपणेच नव्हे, तर पुढे चालवणे हीच त्यांना अकादमिक अभ्यासक आणि कार्यकर्त्यांनी वाहिलेली श्रद्धांजली ठरेल.

ऐतिहासिक अभ्यासपद्धती वापरून जातीच्या उगमापासून ते गुलामगिरीविरुद्धचे विद्रोह उभे करणाऱ्या आंदोलनांपर्यंतचा जातीच्या अभ्यासाचा परीघ त्यांनी ओलांडला. डॉ. श्री. व्यं. केतकर आणि डॉ. आंबेडकरांनी गेल्या शतकात अमेरिकेतील अव्वल दर्जाच्या विद्यापीठात  जातीचा उगम आणि जातिसंस्थेचे स्वरूप याविषयी अत्यंत मूलगामी असे संशोधन करून ते ग्रंथरूपाने प्रसिद्ध केले होते. त्याही पूर्वीपासून महाराष्ट्रातील विचारविश्वात जातिसंस्था आणि त्यातून निर्माण होणारी विषमता याविषयीच्या मंथनाची परंपरा फार मोठी आहे. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी मदत केल्यामुळे, उत्तेजन दिल्यामुळे लिहिले गेलेले अनेक ग्रंथ, तसेच उभ्या राहिलेल्या अनेक संस्था ह्यातून जातिसंस्थेचे स्वरूप, जातीय भेदभावाच्या स्वरूपाविषयीची चर्चाही मोठ्या प्रमाणावर घडत होती. राजर्षी शाहू महाराजांचे अनेक निर्णय, त्यांनी सुरू केलेल्या अनेक योजना यातून जातिभेद कमी करण्यासाठीचे प्रयत्न प्रत्यक्ष व्यवहारात करता येतात, हे दिसून आले. त्यासोबतच विठ्ठल रामजी शिंदे यांचे लिखाण व कार्य मूलगामी स्वरूपाचे होते. असे असले, तरी अकादमिक वर्तुळात मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेपासून जातिसंस्थेचा उगम आणि  स्वरूपाविषयी ज्या प्रकारची चर्चा झाली, त्या चर्चेत महाराष्ट्रातील सामाजिक मंथनाशी फारसा संबंध दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर 1970 च्या दशकात गेल ऑम्वेट यांनी महाराष्ट्रात येऊन ब्राह्मणेतर चळवळीचा अभ्यास गावोगाव हिंडून करण्यास सुरुवात केली, हे नोंदवण्याजोगे आहे. सत्यशोधक समाज आणि त्यानंतरचे इतर जातिसंस्थेविषयीच्या विद्रोहाचे प्रवाह यांचे त्यांनी साकल्याने परीक्षण केले. त्याविषयीची मांडणी त्यांनी परिश्रमपूर्वक संशोधन साहित्याचा विशेषतः गावोगाव विखुरलेल्या ऐतिहासिक साधनांचा बारकाईने अभ्यास करून केली.

एलिनॉर झिलीएट या अमेरिकन विदुषी महाराष्ट्रातील पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांच्या विद्रोहावर सातत्याने संशोधन करत होत्या. त्यांच्याशी गेल ऑम्वेट यांचा संपर्क आल्यानंतर त्यांनीही महाराष्ट्रातील जातदास्याच्या शृंखला तोडणाऱ्या विविध चळवळी आणि विद्रोहाचे प्रवाह यांच्याविषयीचा अभ्यास सुरू केला.

प्राध्यापक गेल ऑम्वेट यांच्या लिखाणावर मार्क्सवादी विचारपद्धती आणि संशोधन पद्धतींचा खोलवर ठसा असला तरी विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील वासाहतिक समाजातील सांस्कृतिक बंड या त्यांच्या अतिशय गाजलेल्या पुस्तकांमध्ये त्यांनी अनेकदा सर्जनशीलपणे नव्या साधनांचा अभ्यास करताना वेगळी परीदृष्टी स्वीकारलेली दिसते. हा अभ्यास करताना 1970 आणि 71 मध्ये ऑम्वेट यांनी महाराष्ट्रातील अनेक खेड्यांना- गावांना-शहरांना भेटी देऊन लहानमोठे कार्यकर्ते, पुढारी, विचारवंत, अभ्यासक, पत्रकार व लेखक यांच्या मुलाखती घेतल्या. जुन्या वृत्तपत्रांच्या फायली, ग्रंथ, इतिवृत्ते, मासिके- विशेषतः मुकुंदराव पाटलांसारख्यांकडे असलेला सत्यशोधक समाजाचा इतिहास, वेगवेगळ्या कार्यकर्त्यांच्या घरी असणारी मूळ कागदपत्रांचा अत्यंत नम्र व गंभीर अभ्यासक म्हणून त्यांनी अभ्यास केला 1973 मध्ये हा पदवीसाठीचा अभ्यास त्यांनी पूर्ण केला. तरीही भारतातील शोषितांचे प्रश्न आणि शोषणमुक्तीचे लढे हा त्यांच्या आजीवन कळकळीचा आणि आस्थेचा महत्त्वाचा विषय राहिला.

त्याचबरोबर अमेरिकेतील विद्यार्थिदशेत त्यांनी ज्या पद्धतीने वंशभेदाविरुद्धच्या व वर्ग विषमतेविरुद्धच्या लढ्यात भाग घेतला होता त्याचा परिणाम म्हणून प्राध्यापक गेल ऑम्वेट या कायमच चळवळीतील, आंदोलनातील वेगवेगळ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या व गावपातळी, तालुका पातळीवरील समाजपरिवर्तनासाठी आयुष्य वेचणारे यांच्या भागीदार राहिल्या. त्या एक पोशाखी विचारवंत, संशोधक म्हणून समाजात मिसळल्या नाहीत; तर त्यांची भूमिका भागीदाराची राहिली. समान भागीदारीची भूमिका घेण्यामध्ये एका पातळीवर अर्थातच त्यांची स्त्रीवादी जाणीव आणि स्त्रीवादी विचारांची असणारी बांधिलकीही होती.

जन्म आणि पार्श्वभूमी

गेल ऑम्वेट यांचा जन्म अमेरिकेतल्या मुरलेल्या भांडवलशाही राज्यांऐवजी कामगारांच्या हक्कांच्या बाजूने असलेल्या राज्यात झाला. त्यांचे आईवडील कामगारांच्या बाजूचे, आर्थिक विषमतेला विरोध करणारे असे होते. त्यामुळे शालेय आणि महाविद्यालयीन काळापासूनच ही वैचारिक पार्श्वभूमी त्यांच्या व्यक्तित्वाची पायाभरणी करणारी ठरली. अमेरिकेतील पुरोगामी, समतावादी कामगार आणि कृष्णवर्णीयांच्या न्याय्य हक्कांचा विचार करणाऱ्या परंपरेचा त्या विद्यार्थिदशेपासून भारतात येण्याआधीच एक भाग झालेल्या होत्या.

दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर टाकलेले अणुबॉम्ब आणि व्हिएतनाम युद्धातील एकतर्फी हिंसा, अमेरिकेची साम्राज्यवादी आणि युद्धखोर, आक्रमक, राष्ट्रवादी मानसिकता याची जगभर चर्चा सुरू होती. व्हिएतनाम संपल्यानंतर खुद्द अमेरिकन तरुणांचे बळी गेल्याने अमेरिकेतही युद्धखोरीविरोधी वातावरण निर्माण झालेले होते. 1960च्या दशकात अमेरिकेची जगभर छी:थू झाली होती. एक खुल्या विचाराचा कामगारवादी समतावादी न्यायाची बाजू घेणारा प्रवाह अधिक प्रभावशाली होता. याच विचारप्रवाहाचे फलित म्हणजे जगभर आज कार्यरत असलेले गेल ऑम्व्हेट यांच्या आणि नंतरच्या पिढीतील विविध अमेरिकन सामाजिक शास्त्रज्ञ.

म्हणूनच 1968-1970 च्या दशकात एकीकडे 1968 च्या विद्यार्थिविद्रोहाची पार्श्वभूमी होती; तर दुसरीकडे भांडवलशाही समाजातील तरुण श्रीमंत देशांतील विषमतेच्या दरीवर आसूड ओढत होते. महाविद्यालयांवर बहिष्कार टाकत होते. जगभरच सर्व प्रकारच्या विषमताविरोधाचे वातावरण होते. विद्रोही गाणी, मोर्चे, तरुणांचे विविध प्रकारचे बंड फ्रान्स, अमेरिका, कॅनडा गाजवत होते. प्रस्थापित आर्थिक हितसंबंध, जातीय हितसंबंध, वांशिक वर्चस्व ह्याविषयी संताप खदखदत होता. अकादमिक वर्तुळातही ह्या प्रवाहांचे जिवंत तरंग एलिनॉर झिलीएट यांसारख्या विद्वानांच्या कार्यातून, संशोधनातून, अध्यापनातून उमटत होते आणि तेव्हा अमेरिकेने आपल्या साम्राज्यवादी, आक्रमक राष्ट्रवादाच्या कोशातून बाहेर येऊन तिसरे जग पाहिले पाहिजे, हा विचार सतत मांडला जात होता. या विचारांच्या प्रभावामुळे महाविद्यालयीन विद्यार्थी तिसऱ्या जगात अभ्यासाला पाठवायला हवेत, असे प्रागतिक विचारांच्या विचारवंतांचे जसे मत होते, तसेच ते अमेरिकन राजदूत आणि मुत्सद्द्यांचेही होते. अमेरिकेची घसरलेली जागतिक लोकप्रियता पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नांचा एक भाग होता.

अकादमिक विश्व आणि सामाजिक आंदोलनातील सहभाग

स्वत:च्या लष्करी सामर्थ्याच्या दुरभिमानातून अमेरिकेने व्हिएतनाम युद्धाचे दु:साहस केले खरे. परंतु सामान्य शेतकरी जनतेने अमेरिकन सैनिकांना सळे की पळो करून सोडले. व्हिएतनामला जवळजवळ उद्धवस्त करून अमेरिकेने तो देश सोडला, परंतु तरुण अमेरिकन सैनिकांचे बळी देऊनच. त्यामुळेच त्या युद्धानंतर उदारमतवादी आणि मानवतावादी विचारप्रवाहाने अमेरिकेतील अकादमिक जगात आणि विचारवंतांच्या जगात प्रभाव टाकला. युद्धखोरी आणि हिंसकपणाविषयीच्या पश्चात्तापातून अमेरिकन समाजातील विचारवंतांनी, पत्रकारांनी, शिक्षकांनी, संशोधकांनी आपण स्वत:त बदल केले पाहिजेत, ही भूमिका सातत्याने घेतली. यातूनच मग अमेरिकेतील सुप्रसिद्ध विद्यापीठांनी आपले तरुण विद्यार्थी तिसऱ्या जगातील आयुष्य समजून घेण्यासाठी पाठवायला सुरुवात केली.  

1970 च्या या काळात परिवर्तनाच्या विचारांनी भारलेल्या काळात गेल कॉलेजमध्ये शिकत होत्या. या कार्यक्रमांतर्गत गेल महाविद्यालयामार्फत प्रथम 1970 च्या दशकात भारतभेटीवर आल्या. या भेटीतच त्यांची भारतातील मुक्तिदायी परंपरा, सामाजिक विषमतेला विरोध करणाऱ्या व्यक्ती, संघटना, विचारप्रवाह यांच्याशी ओळख झाली आणि त्यानंतर त्या जरी अमेरिकेला परत गेल्या, तरी या प्रवाहाविषयीचे चिंतन, मनन, लेखन यात आजीवन रमून गेल्या. त्यापुढे समाजशास्त्रात एम.ए. केल्यानंतर त्या जेव्हा मुंबई विद्यापीठातील हे काय चर्चासत्रात सहभागी झाल्या. तो त्यांचा निबंध लक्षवेधक आहे. एम.ए. झालेली अत्यंत हुशार अभ्यासक तरुणी तिसऱ्या जगातील खेड्यांविषयी समाजशास्त्रातले सिद्धांत वापरून सजगपणे लिखाण करते, हे नोंद घेण्यासारखे आहे.

1980च्या दशकापासूनच मूलगामी अशा जातीच्या विवेचनापेक्षा अगदी वेगळे आणि काहीसे वरवरचे अभ्यास अकादमिक वर्तुळात अभ्यासले जात असताना गेल यांनी नव्या काळाला अनुसरून मूलभूत स्वरूपाचे प्रश्न विचारले. त्या काळी एक तर जात हे एक केवळ सामाजिक विषमता निर्माण करणारी संरचना म्हणून पाहिली जाई. किंवा ते भारताचे सांस्कृतिक संचित आहे, ती एक सांकेतिक व्यवस्था आहे, असा दुसरा प्रवाह होता. अशा वेळी जात ही भौतिक पातळीवर भेदभाव निर्माण करणारी व्यवस्था आहे, हे जमीनमालकी आणि जातीच्या परस्परसंबंधातून त्यांनी उलगडून दाखवले. त्याचबरोबर स्त्रियांच्या समस्यांचा विचार एक तर सुटा सुटा किंवा व्यवस्थेचे बळी ह्या प्रकारे केला जाई.

खाजगी आणि सार्वजनिक जीवनातील विषमताविरोध

भारतातील आणीबाणीनंतर गेल ऑम्वेट या भारत पाटणकर यांच्याशी विवाहबद्ध होऊन काही वर्षांनी भारतातच स्थायिक झाल्या. सांगली जिल्ह्यातील कासेगाव येथील स्वातंत्र्यलढ्याची पार्श्वभूमी असलेल्या क्रांतिवीर पाटणकरांच्या घराचा एक भाग होऊन राहू लागल्या. भारत पाटणकरांसोबत त्यांनी श्रमिक मुक्ती दलाची स्थापना केली. वर्गीय विषमता, जातीय भेदभाव व लिंगभावावर आधारित विषमतेला विरोध करणारे कार्य उभारले. अनेक तरुण कार्यकर्त्यांची बौद्धिक व वैचारिक जडणघडण केली. शेकडो सत्याग्रह, मोहिमा, आंदोलने यात सहभाग घेतला. फुलेविचार, बहुजन समाजाच्या जगण्याचे ताणेबाणे आणि ब्राह्मणेतर चळवळीच्या वारश्यातून आलेले आगळे, क्रांतिकारी वैचारिक धन त्यांना इंदूताईंच्या रूपाने अनुभवता आले. अशा तऱ्हेने त्यांचे सार्वजनिक जीवन आणि खाजगी जीवनही विषमताविरोधाला वाहिलेले होते.

संशोधन व पुस्तके

जमीनधारणा आणि जातिव्यवस्था यांमध्ये कसा परस्पर संबंध आहे आणि त्यामुळे जातीय विषमता व वर्गीय विषमता एकत्रितपणे कशी काम करते, हे अनेक लेखांतून त्यांनी सप्रमाण दाखवून दिले होते. दलित व्हिजन्स ही त्यांची 1975 मधील पुस्तिका ही एका अर्थाने दलित विचार-व्यवहाराच्या भविष्यकालीन प्रवासाचा मार्ग दाखवते. ‘व्हायलन्स अगेन्स्ट विमेन - न्यू थिअरीज अँड न्यू मूव्हमेंट्‌स इन इंडिया 1991’- 1994 मध्ये प्रसिद्ध झालेले ‘दलित्स ॲंड डेमोक्रॅटिक रेव्होल्युशन’ हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक.  ‘ग्रोइंग अप इन डेमोक्रॅटिक इंडिया - अ दलित ऑटोबायोग्राफी’ या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला होता. भारत पाटणकर यांच्या सोबत तुकोबांच्या अभंगांचा त्यांनी अलीकडे इंग्रजीत अनुवाद केला. त्यासोबतच ‘सीकिंग बेगमपुरा’ हे एक अत्यंत वेगळे, अत्यंत प्रेरणादायी असे पुस्तक त्यांनी 2000 नंतरच्या काळात लिहिले.  2019 पर्यंत विविध चर्चासत्रांमध्ये बीजभाषण किंवा समारोपाचे महत्त्वाचे भाषण त्या करत होत्या.  या सोबतच महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळ सत्यशोधक चळवळ याचा त्या अखेरपर्यंत भाग राहिल्या.

सामाजिक आंदोलनातील भागीदार

एक कार्यकर्ता समर्पण भावनेने समाजपरिवर्तनासाठी निष्ठावंतपणे कसे प्रयत्न करतो आणि काय काय करू शकतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे गेल ऑम्व्हेेट यांचे जीवन, लिखाण आणि चळवळीतील सहभाग. ह्या लांबलचक प्रवासाची सुरुवात अमेरिकेतील प्रसिद्ध विद्यापीठातील पीएच.डी.ची विद्यार्थिनी म्हणून झाली. 1970-71 मध्ये महाराष्ट्रभर फिरून त्यांनी सत्यशोधक चळवळीची साधने अभ्यासली. आनुषंगिक ब्राह्मणेतर चळवळीची अस्सल ऐतिहासिक साधने तपासणे, अभ्यासणे हे अत्यंत कष्टपूर्वक, चिकाटीने आणि तळमळीने त्यांनी केले. समाजाकडून दुर्लक्षित राहिलेल्या महाराष्ट्रातील जातीय विषमता, वर्गीय विषमता आणि स्त्रीपुरुषांतील विषमतेवरील मूलगामी असे फुलेविचार आणि सत्यशोधकी प्रवाहातील साहित्य त्यांनी कष्ट करून प्रकाशात आणले, हे त्यांचे महत्त्वाचे कार्य. ते करताना मुलाखती घेण्याचा भाग असो की साधनांची अस्सलता पटवण्याचा भाग असो, तो त्यांनी अत्यंत सचोटीने, मेहनतीने पूर्णत्वाला नेला. त्या काळात महाराष्ट्रात पूर्वाश्रमीच्या अस्पृश्यांवर अत्याचाराच्या अनेक घटना घडल्या. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या चळवळीत लाँग मार्चनंतरच्या पोलीस गोळीबार आणि नंतर मराठवाड्यात झालेल्या दलित अत्याचारांच्या हत्यांच्या घटना असोत, पेटवून दिलेल्या दलित वस्त्यांचा प्रश्न असो- त्या शोषितांच्या बाजूने उभ्या राहिल्या. तेव्हापासूनच प्रत्यक्ष अत्याचारांना विरोध करणाऱ्या गंभीर अभ्यासक अशी त्यांची दुहेरी भूमिका कायम राहिली. चळवळीतल्या कार्यकर्त्या म्हणून खेड्यापाड्यांतल्या दुर्गम आदिवासी पाड्यातल्या खडकाळ चिखलाने भरलेल्या चढउतारांच्या रस्त्यांवरून त्या मैलोन्‌मैल पायपीट करत जात.  मोर्चे, धरणे यासाठी तर त्या गेल्याच, परंतु मिळेल ते अन्न मिळेल त्या घरात खाऊन मिळेल ते कपडे लेवून त्या त्या ठिकाणी राहिल्या. पुन्हा हे करताना गेल मॅडम यांनी कधीही गरीब भारतीयांवर आपण भूतदया करतोय असा आव आणला नाही. त्या भारतातील वर्गीय विषमता, जातीय विषमता, लैंगिक अत्याचार यांचे बळी असणाऱ्या सर्व वंचितांच्या सच्च्या भागीदार म्हणून कायम वावरल्या.

स्त्रियांविरुद्धचा हिंसाचार याविषयी ऐंशीच्या दशकात स्त्री चळवळीतील विविध कार्यकर्त्यांची अनेक शिबिरे झाली. अनेक प्रशिक्षणे झाली. अनेक मोठे मोर्चे आणि आंदोलने झाली. ह्या मोहिमांमध्ये त्या सगळ्यांसह सहभागी होत असत. गेल मॅडम यांची या विषयावरची ‘स्त्रिया आणि हिंसाचार’ ही पुस्तिका निश्चितच दखल घेण्याजोगी आहे. आजही नव्याने संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पुस्तिका आम्ही आवर्जून देतो. स्त्रियांचे दमन आणि स्त्रियांचे दुय्यमत्व हे एकाच वेळी आर्थिक कारणांनी घडते, सांस्कृतिक पातळीवर त्याची अभिव्यक्ती होते, त्या बेड्या सामाजिक नातेसंबंध आतून अधिकाधिक बळकट होतात ही तीन पातळ्यांवरची मीमांसा त्या अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने करत असत. परित्यक्ता स्त्रियांचे अधिवेशन, नर्मदेवरच्या धरणशृंखले-विरोधातला मोर्चा, बळीराजा धरणाच्या लाभार्थींमध्ये स्त्रियांसाठी आग्रह धरणे या लढ्यात त्या होत्या. एक व्यक्ती म्हणून गेल ऑम्व्हेट अतिशय साध्या होत्या. माणूस म्हणून सहजपणाने मित्रभावाने समोरच्याचे ऐकून घेणे, कार्यकर्त्यांची, वंचितांची दखल घेणे आणि संशोधनातून त्या प्रश्नांची अमूर्त मांडणी करणे त्यांच्या आयुष्याचा अंगभूत भाग होते. ज्या काळी फार कमी विचारवंत आणि अभ्यासक समाजात मिसळून सामान्यांचे प्रश्न ऐकून त्यावर लिहीत असत, त्या काळात गेल यांनी भारतीय समाजातील विषमता आणि शोषण यांचे विश्लेषण जागतिक पातळीवर पोहोचवले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील समाजशास्त्र विभागात गेलमॅडम या जवळजवळ दोन वर्षे प्रपाठक म्हणून कार्यरत होत्या. त्या संपूर्ण कालखंडात आपल्या व्यासंगात बुडालेल्या, आपल्या खोलीत शांतपणे बसून वाचन आणि लिखाण करणाऱ्या, अधूनमधून त्यांना भेटायला आलेल्या कार्यकर्त्यांसोबत गंभीर चर्चा करणाऱ्या- बरेचसे ऐकून घेणाऱ्या अशा गेल ऑम्वेट या डोळ्यांसमोर आजही येतात. त्यांची एकूण वृत्ती ही ऐकून घेण्याची आणि संशोधन करून लिखाण करण्याची असल्यामुळे विद्यापीठातील प्रांगणात त्या विद्यार्थ्यांच्या घोळक्यात गप्पा मारत आहेत किंवा चहापाण्याला ऐसपैस गप्पा करत अनेक लोकांबरोबर बाहेर जात आहेत, हे चित्र मात्र कधीच दिसले नाही. एकांतप्रिय, व्यासंगी, विचारी अशी प्राध्यापक ही गेल ऑम्वेट यांची ती मनाची छबी आम्हा विद्यार्थ्यांच्या मनावर ठसलेली आहे.

गेल यांनी नेहरू मेमोरिअल म्युझियम अँड लायब्ररी येथे सीनियर फेलो म्हणून बराच काळ कार्य केले. त्यांनी अनेक विषयांवर लिखाण केलेले आपल्याला दिसते. त्यात ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘द हिंदू’ या सुप्रसिद्ध वृत्तपत्रांत नियमितपणे लिहिलेले प्रासंगिक लेख, अनेक छोट्या-मोठ्या पुस्तिका आणि अनेक ग्रंथ यांचा समावेश आहे. त्यांची विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या बहुआयामी विद्वत्तेचे प्रतीक आहे. 

प्रेरणा आणि वारसा

गेल ऑम्वेट जातिसंस्थेवर लिहू लागल्या त्या काळात जात भौतिक वास्तव राहिले नसून तो केवळ भारतातील सामाजिक संस्कृती प्रश्न आहे, असे अनेक भारतीय विचारवंत म्हणत असत; परंतु गेलमॅडम यांनी मार्क्सवादातील नवे विचारप्रवाह वापरून जातीचे आर्थिक आणि सामाजिक रूप कसे एकमेकांत गुंतलेले आहे, ते स्पष्ट केले. जातीवर आधारित पूर्वग्रह आणि शोषक मनोवृत्ती यांमुळे होणाऱ्या अत्याचारांवर त्या सातत्याने लिहीत राहिल्या. जात, वर्ग आणि लिंगभाव या तीनही जन्मावर आधारलेल्या ओळखीच्या आधारे माणसामाणसांत जो भेदभाव केला जातो, त्याविषयी त्या कायमच अस्वस्थ होत्या. अलीकडच्या काळात जातिव्यवस्थेविरुद्धच्या विद्रोहाचा त्यांचा अभ्यास त्यांना बौद्ध धम्माच्या महत्त्वापर्यंत घेऊन आला. डॉक्टर आंबेडकरांचा बौद्ध धम्मापर्यंतचा प्रवास त्यांनी पुन्हा पुन्हा अभ्यासला.

विद्रोह आणि शोषितांचे बंड याचे विश्लेषण जसे त्यांना खुणावत राहिले, तसेच मानवी आयुष्याचा स्वप्नलोक कसा असावा हाही त्यांचा ध्यास होता. म्हणूनच आयोथी, कबीर, रैदास अशा सर्वांच्या कल्पनेतला आदर्श लोक, स्वप्नलोक आणि त्यातून हाती येणारे एका नव्या प्रकारच्या विवेकाचे चित्र त्यांनी रेखाटले. म्हणूनच स्त्रीदास्याचा ‘तुरुंग फोडिते’ ह्या सुप्रसिद्ध स्त्रीचळवळीतील गीताच्या ओळीचे शीर्षक असणारे त्यांचे पुस्तक त्यांची खरी ओळख सांगते, असे वाटते. आज जगभरचे विद्यार्थी अतिशय उत्साहाने त्यांची पुस्तके, निबंध, मुलाखतींचे ऑडिओ आंतरजालावरून एकमेकांना पाठवत आहेत. त्यांना वाहिलेल्या श्रद्धांजली संदेशांनी संपूर्ण आंतरजाल जणू भरून गेले आहे. चळवळीतले कार्यकर्ते आणि कार्यकर्त्यांचे कुटुंबीय, गेल मॅडम यांनी आस्थेने केलेली चौकशी किंवा मूकपणाने दिलेला आदर- याची नोंद आवर्जून घेत आहेत. जगभरच्या विद्यापीठातले विद्यार्थी आणि तरुण संशोधक आणि संशोधक आपल्या तरुणपणी गेल यांना सहज भेटून प्रश्न विचारणे शक्य झाले. त्यामुळे संशोधक म्हणून प्रवास कसा सुकर झाला हे नोंदवत आहेत.

एकीकडे जगभर हिंसा-क्रौर्य, लोकानुनयवादी बहुसंख्याक वाद यांचा वरचश्मा दिसत असताना गेल ऑम्वेट यांचे विचार इतके खोलवर अनेक वर्तुळांत पसरले आहेत हे दिलासादायक वाटते. त्यांच्या लेखांची आणि ग्रंथांची मराठीसह अनेक भाषांमध्ये भाषांतरे झालेली आहेत आणि त्यामुळे आज त्यांचे विचार नव्याने चिकित्सा करू लागलेल्या विद्यार्थी-संशोधक-कार्यकर्ते यांना सहज उपलब्ध झाले आहेत. समाजशास्त्रीय दृष्टिकोनाच्या भिंगातून संपूर्ण जगातील विषमतांचा उभा-आडवा आलेख रेखाटण्याची क्षमता असणाऱ्या व्यासंगी अभ्यासक म्हणूनच गेल ऑम्वेट कायम ओळखल्या जातील.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके