डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

नाना आता आमच्यामध्ये राहिले नाहीत…

श्रीमती शुभा जोशी या नानासाहेबांच्या कन्या अमेरिकेत पिट्सबर्गला असतात. नानासाहेबांच्या आकस्मिक निधनाची वार्ता इतरांप्रमाणे त्यांनाही हादरा देणारीच होती. या दुःखवार्तेबरोबरच इतरही अनेक संकटे त्यांच्यापुढे त्या वेळी खडी होती. त्या काळातल्या आपल्या मनःस्थितीचं आणि नानासाहेबांच्या आठवणींचं चित्रण त्यांनी पुढील मुलाखतीत केलं आहे.
 

"तीस एप्रिलला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास पिट्सबर्गला आमच्या घरी फोन खणखणला . (अमेरिकेतील 30 एप्रिल : भारतात तेव्हा 1 मे ची पहाट होती.) फोनवर नानांच्या आकस्मिक निधनाची वार्ता आली. बाळासाहेबानी (डॉ. जोशी) फोन घेतला, ते स्तब्ध झाले. त्यांच्याबरोबर सायली घरी होती. मी आणि जुई बाहेरून येत असल्याची चाहूल लागताच बाळासाहेब दरवाजात आले. मला सावध करून म्हणाले, 'शुभा, वाईट बातमी आहे. नाना गेल्याचा फोन पुण्याहून आला आहे. राधा फोनवर आहे.' मी फोन उचलला. कसंबसं दाटल्या कंटानं राधा म्हणून हाक मारली. तिने तिथून शुभाताईऽ अशी हाक मारली, आणि अक्षरशः हंबरडा फोडून आम्ही दोघीही रडू लागलो. ओठातून शब्द बाहेर फुटेना म्हणून हातातला फोन ठेवून दिला.आम्ही दोघं आणि दोन्ही मुली अगदी निःशब्दपणे एकमेकांचे हात घट्ट धरून बसून राहिलो. जणू परस्परांकडून आम्ही आधार घेत होतो...ढसाढसा रडत होती. जुई-सायलीचं दुःख बघून मीच हवालदिल झाले होते. बाळासाहेब हरवल्यासारखे घरात वावरत होते...

मनात आलं, बोचरी थंडी आता संपली आहे, गवताचा हिरवागार गालिचा बाहेर उलगडतो आहे.. झाडांची पोपटी पानं हिरवी व्हायला अगली आहेत.ट्युलिपचा बहर सरला असला तरी अझेलियाची वेगवेगळ्या रंगांची उधळण करणारी झुडपं फुलायला सुरुवात झाली आहे...अशा वेळी घराच्या पुढच्या व्हरांड्यात टेबल-खुर्च्या मांडायचा विचार चालू असतो. त्याचबरोबर नानांच्या सहवासाची ओढ लागायलाही सुरुवात झालेली असते. आजच नानांना एक पत्रही गेलेल असतं...आणि पुण्याहून सांगितलं जातं की नाना आपल्यातून निघून गेले... पुन्हा कधीच न येण्यासाठी, न भेटण्यासाठी...

डोळे अश्रूंनी भरून वाहत असतात, नानांची अनेक रूपं मनात आकार घेत राहतात-

माझ्या अगदी लहानपणाच्या नानांबद्दलच्या मला फारश्या आठवणी नाहीत. कारण नाना सदोदित दौऱ्यावर आणि घराबाहेर आई नोकरीवर, त्यामुळे मी बहुतेक वेळ अण्णा व आजीकडेच असायची. त्यांच्याजवळच मी वाढले म्हणायला हरकत नाही. पण एक मात्र आठवण चांगली लक्षात आहे. आई नोकरीवर होती आणि आजी अण्णा कोकणात गेल्यामुळे मला घरी सांभाळायला नाना राहिले होते. अचानक दुपारी नानांच्या अटकेचं वॉरंट घेऊन पोलीस आले. नानांनी ते पाहिलं आणि त्यांना म्हणाले, 'या माझ्या मुलीची आई घरात नाही. तिला रस पाजायचा आहे आणि नंतर तिचं सर्व साहित्य घेऊन तिला तिच्या आईकडे सोडल्याशिवाय मला तुमच्याबरोबर येता यायचं नाही.' पोलिसांनी ते मान्य केलं. मग नानांनी मला रस पाजला आणि माझी बाटली, कपडे एका पिशवीत भरून माझी सर्व तयारी करून नाना निघाले.आम्ही दोघं पोलिसांसकट आईच्या शाळेत गेलो आणि मग मला आईच्या स्वाधीन करून नाना पोलिसांबरोबर गेले.

नाना देशाचं काही काम करतात. चळवळ करतात हे माहीत होतं. पण इतर मुलांप्रमाणे मीही माझे वडील वकील आहेत असे सांगत असे. ते देशभक्त आहेत असं सांगायला मला फारसं आवडत नसे. आमच्या घरावर नानांची बी.ए.एल. एल.बी. पदवीची वकील म्हणून पाटी बरेच दिवस होती. त्यामुळे ते वकील आहेत असं बरोबरीच्या मुलांना सांगू शकत असे. आणि पुढची चौकशी बरोबरीची मुलं करीत नसल्यामुळे मला फारशी अडचण वाटायची नाही. पण इतरांप्रमाणे आपले वडील आपल्याजवळ सतत नसतात अशी खंत मात्र वाटत असे. त्यामुळे मी आईला कायम चिकटलेली असायची.

नानांच्या सार्वजनिक कार्यामुळे आईवर खूप ताण येत असावा असं आज मोठी झाल्यावर जाणवतं. पण तिने त्याबद्दल चुकून अवाक्षरही काढलेलं मी ऐकलं नाही. वास्तविक तिला दम्याचा खूप त्रास होता. नानांनी गोव्याच्या सत्याग्रहाला जाण्याचं ठरवलं तेव्हा ती चांगलीच हादरली होती. त्यानंतर तिच्यामागे ब्लडप्रेशरचा त्रास लागला. आईप्रमाणे आजी व अण्णाही फार कष्टी झाले होते.आजी दररोज नानांबरोबर थोडा वेळ रात्री गप्पा मारत बसायची. शेवटचं पालुपद हेच असायचं. 'कशाला बाबा गोव्याला जातो आहेस? देश स्वतंत्र करायला हवा होता तो तू केलास! आता गोव्यासाठी पण तूच जायला हवं आहे का? एवढासा गोवा. तो तसाच राहिला तर काय बिघडलं?' असं आजी वारंवार विचारी. आता नानू गेला तर आपल्याला यापुढे कधीच तो दिसणार नाही असं आजी आणि अण्णा या दोघांनाही वाटे पण अण्णा मात्र त्यांची खंत बोलून दाखवीत नसत.

गोव्याच्या जेलमध्ये आईबरोबर नानांना भेटायला जेव्हा मी प्रथम गेले तेव्हा नानांना पाहून अगदी कसंसंच झालं . जनावरांना ठेवतात तसं गजांच्या पिंजऱ्यात त्यांना ठेवलेलं होतं. त्यांच्या अंगावर हातावर माराचे वळ आणि जखमा होत्या आणि ते खूप खराब दिसत होते. उघड्या गजातून पावसाचं पाणी आत येऊन सगळं ओलं होई. आणि झोपायला तर राहो, बसायलाही जागा नसे, खटल्याचा तर अजून पत्ताही नव्हता. नानांकडे पाहून त्या वेळी आईला तर काय वाटलं असेल याची कल्पनाही मी आज करू शकत नाही. नंतरच्या भेटीत मात्र त्यांना आग्वाद फोर्टमध्ये शिरुभाऊंबरोबर एका लहानशा खोलीत ठेवलेलं मी पाहिलं होतं, आणि वर्तमानपत्रांखेरीज बाकी बऱ्याचशा गोष्टी त्यांना देण्यात आल्या होत्या.

ॲम्नेस्टीच्या प्रयत्नाने नाना 1957 साली सुटले. त्यांना व शिरुभाऊंना पोर्तुगीज कोर्टाने ठोठावलेली बारा वर्षांची शिक्षा ऐकून आम्ही हादरलोच होतो. तरीही ते दोघे दोन वर्षांत सुटले हा आमच्या लेखी चमत्कार होता. नानाचं स्टेशनवर भव्य स्वागत झाले आणि 1957 च्या निवडणुकांत काकासाहेब गाडगीळांचा पराभव करून ते लोकसभेवर निवडूनही आले. त्यानंतर नानांचं वास्तव्य वर्षातून काही महिने संसदेचं अधिवेशन चालू असताना, दिल्लीला असे; म्हणून मला ते आणखीच दुर्मिळ झाल्यासारखे वाटू लागले. माझ्या मैत्रिणींचे वडील त्यांना शिकवत, अभ्यास घेत. पण हा अनुभव मला मिळाला नाही कारण सहवासाचे क्षणच तसे कमी होते आणि आई शिक्षिका होती. इतर शिकवायचं ते अण्णांनी लहानपणी शिकवलंच होतं.

अगदी खरं सांगायचं तर नानांचा आणि माझा सहवास वाढला तो माझ्या लग्नानंतर नाना अमेरिकेला दरवर्षी येऊ लागले त्यामुळेच. त्याचं श्रेय बाळासाहेबांना दिलंच पाहिजे.मी नानांची एकुलती एक मुलगी इथे परदेशात आणली आहे तेव्हा वर्षातून एखादा महिना तरी तिने भारतात गेले पाहिजे आणि नानांनीही दरवर्षी दोन महिने पिट्सबर्गला येऊन राहिलं पाहिजे हा जणू त्यांनी नियमच केला. त्यामुळेच माझे आणि माझ्या मुलींचे बंध केवळ त्या घराशी व कुटुंबाशीच नव्हेत तर नानांच्या राजकीय क्षेत्रातल्या सहकार्यांशी आणि घराच्या परिसरातल्या लहानसहान व्यक्तीशीही कायम राहिले. अमेरिकेमध्ये स्थायिक झालेल्या अनेक मंडळींच्या मुलांना भारतात 'बोअर' व्हायला होतं आणि त्यांना आल्याआल्याच परत जाण्याचे वेध लागतात. जुई-सायली भारतापासून दूर राहिल्या, शिकल्या तरी भारताबद्दलचा त्यांचा बंध दृढ होण्याचं कारणं दोन, त्यांच्या वडिलांनी दाखविलेला मनाचा मोठेपणा आणि त्या बरोबरच नानांचा त्यांना मिळालेला सहवास आणि शिकवण.

पिट्सबर्गला आल्यानंतर नानांचा दिनक्रम एकूणच वेगळा असायचा. पण त्यांच्या अगदी अखेरच्या ट्रिपपर्यंतही त्यांचा कोणालाच कसला त्रास अगर बंधन नसायचं. काही वर्षापूर्वी ते पिट्सबर्गला येत होते तेव्हा- विशेषतः ते हायकमिशनर असताना त्यांना अमेरिकेतील अनेक विद्यापीठं आणि संस्था यांमध्ये भाषणांची निमंत्रण येत. अमेरिकेमध्ये लिहून आणलेले भाषण वाचून दाखवायची पद्धत आहे. पण हातात कागदही न घेता विषयाच्या पूर्ण तयारीने गेलेले नाना अस्खलित भाषण करत तेव्हा श्रोत्यांना अचंबा वाटे. नानांनी केलेली विषयांची मांडणी आणि त्यामागचा दृष्टिकोन हाही फार वेगळा असायचा. व्याख्यान झाल्यावर प्रश्नोत्तरं व्हायची. त्यांतही नानांचे वेगळेपण उठून दिसायचं. काही वर्षांपूर्वी कॅनडामधील मराठी साहित्य मंडळाच्या अधिवेशनात नाना प्रमुख वक्ते म्हणून गेले त्यांनी तिथे अतिशय प्रभावी भाषण केले. त्याचप्रमाणे पिट्सबर्गच्या एका मुक्कामात कॅलगेरी येथे प्रा. जगन्नाथ वाणी यांच्या आग्रहावरून नानांनी दिलेली दोन व्याख्यान विद्यापीठात फार गाजली.

अमेरिकेमध्ये भारतीयांकडे पाहण्याचा नानांचा दृष्टिकोन किती वेगळा आणि निकोप आहे याचं प्रत्यंतर जुई-सायली आणि त्यांच्या भारतीय मित्र-मैत्रिणी यांनाही एका प्रसंगानं आलं. मुलींनी त्या दिवशी एक पार्टी ठेवली होती-मुख्यतः सर्वांनी नानांशी बोलावं म्हणून, त्या दिवशी नाना जे बोलले त्यामुळे भारतातून येऊन अमेरिकेत कायम राहू पाहणाऱ्या तरुण मुलांमध्ये जी एक अपराधित्वाची भावना आढळते ती निघून गेली. कारण नाना त्यांना म्हणाले, 'भारतातून तुम्ही शिकून येथे आलात आणि चांगल्या नोकऱ्या मिळवून समृद्धीत राहत आहात. तुमची बुद्धिमत्ता, कर्तबगारी यांचा या देशाला फायदा होत आहे. पण तुमच्या मायदेशाचं काय? तुम्ही अमेरिका सोडून मायदेशी परत गेलं पाहिजे असा माझा आग्रह नाही. भारतात आजही बुद्धिमत्तेची उणीव नाही. तेथील परिस्थितीतही संशोधन करणाऱ्या व्यक्ती नवनवीन शोध लावत आहेत. त्यासाठी तुमची गरज नाही. पण तुमच्या शिक्षणासाठी आणि संवर्धनासाठी भारताने पैसा खर्च केला आहे हे विसरू नका. या गरीब देशाने आजच्या तुमच्या समृद्ध जीवनाचा पाया घातला आहे. म्हणून त्याची नाळ तोडू नका. देशाच्या सतत संपर्कात राहा. विविध प्रकारचे कार्यक्रम देशाच्या विकासासाठी चालू आहेत. त्यांत आपल्या कुवतीप्रमाणे सहभागी व्हा. हेही खूप आहे.' नानांच्या या भाषणाने सर्व तरुण मित्र मैत्रिणींना किती दिलासा मिळाला असेल हे काही सांगण्याची गरज आहे काय?

सायलीच्या शाळेमध्येही एका कार्यक्रमासाठी ग्रॅज्युएशनच्या दिवशी नानांना मुख्य पाहुणे म्हणून बोलावलं होतं. थोरामोठ्यांच्या मुलींची ती शाळा. आपले किर्लोस्कर किंवा कल्याणी यांच्यासारख्या तेथील उद्योजकांच्या मुली त्या शाळेत शिकतात. त्या दिवशींचं नानांचे तिथलं भाषण ऐकून ही मोठमोठी मंडळीसुद्धा प्रभावित झाली. नाना भाषणात त्या मुलांना म्हणाले, 'अमेरिकेसारख्या श्रीमंत समाजातील अतिसमृद्ध थरात तुम्ही वाढला आहांत. पण तुमच्या समाजाबाहेर, देशाबाहेर जगात सर्वत्र किमान गरजांनाही वंचित असे मानव समूह आहेत. स्वतःची प्रगती करून घेताना अशा समाजाच्या गरजांचे भान ठेवा. माणूस म्हणून त्यांच्या विषयीही तुमची काही कर्तव्यं आहेत. माणुसकीच्या भावनेने आपण सर्वच जण बाहेरील जगाकडे पाहू लागलो तर जगातली कितीतरी दुःखं आणि कितीतरी संघर्ष कमी होतील.' अशा प्रकारचे विचार आतापर्यंत कोणीही या ठिकाणी मांडले नव्हते आणि आमच्या मुलांना त्यांच्या जबाबदाऱ्यांची जाणीव करून दिली नव्हती असे कितीतरी पालक त्या वेळी बोलले.

नाना पिट्सबर्गला आले की दोन कार्यक्रम कशाही परिस्थितीत नक्की होत. त्यांपैकी एक समुद्रकिनारी जाण्याचा. नानांचं आणि समुद्राचं काहीतरी आंतरिक नातं असावं. कारण एरवी अबोल असणारे नाना समुद्रकिनाऱ्यावर खूप असत. गप्पा मारीत. मुलींबरोबर वेगवेगळे खेळही खेळत. सकाळ-संध्याकाळ वाळूत फेऱ्या मारणं हे तर असेच. खोलीच्या समुद्राभिमुख बाल्कनीत नाना तासन् तास समुद्राकडे पाहत बसत. बरोबर वाचनही चालू असे .

दुसरा कार्यक्रम रात्री जेवण झाल्यावर तासभर वाचनाचा व चर्चेचा. नानांचे वाचन अनेक प्रकारचं. पण पिट्सबर्गला येताना बहुधा ते भारतीय तत्त्वज्ञान-इतिहास विषयक पुस्तकंच बरोबर आणायचे, गीता असायची. मग संस्कृतमधले ते लोक वाचून त्यांचा अर्थ नाना सांगायचे, त्यावर त्यांचं भाष्य व्हायचं. आमचेही प्रश्न असत. चर्चा खूप रंगे.या चर्चांनी जुई-सावलीचं चांगलं शिक्षण केलं. भारतीय वातावरण, इतिहास आणि तत्त्वज्ञान यांची काही प्रमाणात समज त्यांना आली. पहिल्या काही दिवसांनंतर आम्ही हे वाचन आणि चर्चा ध्यनिमुद्रित करून ठेवायचं ठरवले. नानांच्या अशा जवळजवळ 25 टेप्स आता आमच्या संग्रहात आहेत.

नानांची आम्हाला जर सर्वांत मोठी देणगी कोणती असेल तर जुई-सायलीवर त्यांनी केलेल्या संस्कारांची. त्याबद्दल आम्ही त्यांचे आजन्म ॠणी राहू. त्यांच्या संस्कारांमुळेच जुई-सायलींना आजूबाजूला पाहण्याची एक वेगळी दृष्टी लाभली. त्यांच्या मित्रपरिवारात भारतीयांप्रमाणेच काळी, पिवळी, अशी सर्व वर्णांची आणि ज्यू, ख्रिश्चन अशा विविध धर्माची आणि विविध देशांचीही मंडळी असायची. जुई-सायली या दोघींनी आमच्या विवाहाचा पंचविसावा वाढदिवस साजरा केला तेव्हा नाना इथे होते. त्यांनी दिलेल्या पार्टीमध्येही सर्व प्रकारची मंडळी हजर होती. मनसोक्त गप्पा झाल्या. नानाही नेहमीप्रमाणे चिंतनपर थोडेसे बोलले. मुलींचा एकूण मित्रपरिवार त्यांना फारच भावलेला दिसला. या पार्टीचं वर्णन त्यांनी पिट्सबर्ग डायरीमधील एका लेखात केले आहे. 

नानांचं बोलणं मुळात थोडं. पिट्सबर्गला आले, भेटले तरी कधी भरभरून बोलणं नाही. एकटेच अबोलपणे बसत. मग मला वाटे यांना इथे येणं आवडलेलं नाही का? पण नंतर लक्षात आलं की सतत चिंतन हाच त्यांचा स्थायी भाव. आजूबाजूच्या गप्पा त्यांना कायम वर्ज्यच असायच्या. ते बोलायचे ते फक्त कागद आणि लेखणी यांच्या माध्यमातून पुण्यात अनेक प्रकारचे कार्यकर्ते आपले प्रश्न किंवा अनेकविध विषय घेऊन येत. त्यांच्याशी त्यांच्या कामासंबंधीच नानांचे बोलणं असे पण तो विषय संपला की नाना पुन्हा आपल्या व्यवहारात मग्न होत, हेही मी पाहिलं होतं. इथे नानांना तसा विषयच नव्हता तरी तो नानांचा अबोलपणा मला खुपत असे. पण जुई-सायलीसमोर मात्र त्यांचा नाइलाज होई. त्या त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत. जबरदस्तीने त्यांना सगळीकडे फिरवीत. एकदा सायलीने नानांना म्हटलं, 'नाना, भारताचे राजदूत करणसिंग तुमच्या ओळखीचे आहेत ना, मग त्यांना फोन करा ना!' नाना म्हणाले, 'अगं, राजकारणात असते तेवढीच ओळख आमची! मी त्यांच्या पक्षाचाही नाही. शिवाय आता मी कोणीही नाही. उगीच कशाला त्यांना फोन करायचा?'- पण जुई-सायली काही वधल्या नाहीत. निदान तुम्ही इथे पिट्सबर्गला आला आहात असं पत्र तरी टाका त्यांना, असा हट्टच धरून बसल्या. अखेर नानांनी करणसिंगांना पत्र टाकलं.आणि ते मिळाल्यावर लगेच त्यांचा उलट फोन आला. त्यांनी नानांची चौकशी केली आणि आम्हा सर्वांना त्यांना आग्रहाचं निमंत्रण केलं. त्याप्रमाणे मग वॉशिंग्टनला आम्ही त्यांच्याकडे दिवाळीच्या दिवसांत गेलो. करणसिंग आणि नानांनी बराच वेळ एकमेकांबरोबर गप्पा मारल्या- खरं तर विचारांची देवाण-घेवाण केली. देशाच्या आणि जगातल्या प्रश्नांचाही ऊहापोह केला. गायत्रीदेवींनी आमचं चांगलंच आतिथ्य केलं. इतरही पाहुणे मेजवानीसाठी बोलावले. पण या सर्व समारंभातही नानांनी करणसिंगांना काही परखड प्रश्न विचारलेच. 'हे विचारायला हवंच होतं का नाना?' असं मी त्यांना त्या वेळी न राहवून विचारलंही. पण ते काही विसंगत बोलले हे त्यांच्या गावीही नव्हतं. करणसिंगांनी नानांना मुंडकोपनिषदाचा त्यांनी केलेला अनुवाद व विवेचनाचं पुस्तक भेट दिलं. या सर्व प्रकरणात जुई-सायली मात्र भलत्याच खूष झाल्या, कारण त्यांच्याच पुढाकाराने हे सर्व घडून आलं होतं.

पिट्सबर्गच्या मुक्कामात जुई-सायली बरोबर असल्या की नानांची कळी खुले. नातीचे ते लाड करीत आणि स्वतःही त्यांच्याकडून करवून घेत. नानांनी हे पहावं, ते पहावं असा त्यांचा आग्रह सतत चाले आणि नाना नाही नाही म्हणत तो मान्य करीत. अलीकडच्याच एका मुक्कामात नानांचे पाय दुखतात, ते चालू शकणार नाहीत म्हणून त्यांना व्हीलचेअरमध्ये घालून मुली पिट्सबर्गचा नवा सायन्स म्युझियम दाखवायला घेऊन गेल्या. नानांनी सर्व बारकाईने पाहिले, अतिशय खूष झाले आणि घरी आल्यावर साधनेसाठी लेख लिहिला.

नानांच्या अशा या असंख्य आठवणी, असंख्य रूप डोळ्यासमोर आहेत. त्यांची माणसांवर प्रेम करण्याची पद्धती अबोल होती पण त्यांना जपणारी होती. घरातलं कुठलंही काम सवड असेल तर ते करायला नानांनी कधी कमीपणा मानला नाही. नानांचे स्वच्छ परीटघडीचे कपडे अगदी गेल्या काही वर्षापर्यंत त्यांनी स्वतः धुतलेले, इस्त्री केलेले असत. टापटिपीचं आणि सौंदर्याचं विलक्षण वेड त्यांना होतं. आमच्या घरी कोणतीच धार्मिक कार्य होत नसत, पण आई चैत्रगौरीचं डाळपन्हं करुन सर्वांना बोलवी. त्या वेळी गौरीची सजावट करण्यात नानांचा पुढाकार असे आणि दरवर्षी गौरीची आरास वेगवेगळी, कल्पकतापूर्ण असं हे आजही मला आठवतं आहे. घरात कधीही श्रीखंड करायचं झालं तर ते काम नानांकडे असे. अतिशय सुरेख, मऊ, श्रीखंड ते बनवीत असत. बागेशी तर त्यांचं नातं अतूट होतं. बागेतील झाडांची काळजी ते स्वतः घेत. एकदा आपल्या गच्चीवर वरसोव्याहून आणलेली कोळ्याची जाळी टाकून त्यांनी द्राक्षांचे वेलही लावले होते आणि त्यांना आलेली भरघोस द्राक्ष आपल्या सहकाऱ्यांनाही खायला दिली होती.

नाना आता आमच्यातून निघून गेले त्याला किमान वर्ष लोटलं आहे. नाना गेलेल्या दिवसापासून जी संकट आमच्यावर चालून आली त्यांच्याशी तोंड देताना नाना गेल्याचं दुःखही मी पुरतेपणी करू शकले नाही, डोळ्यांसमोरच्या साऱ्याच गोष्टी पुसट होत गेल्या. मग एक महिनाभर आम्ही तिधी अनुभवत होतो ती काळीज कुरतडणारी चिंता- बाळासाहेबांच्या प्रकृतीची. त्यानंतर काही दिवस नागिणीच्या दुखण्याने मीही हैराण- अगदी हॉस्पिटलमध्ये. नाना गेल्यानंतरचे चार महिने मनाला भोवळ आणणारे गेले. जेव्हा त्यातून जाग आली तेव्हा नाना गेले म्हणजे जवळचं काय काय हरवले याचा शोध सुरू झाला. नानांशी मनोमन एकतर्फी संभाषण चालू झालं. आता वारंवार तीव्रतेने एकच जाणीव होते. नाना परत आपल्याला दिसणार नाहीत, भेटणार नाहीत... आहेत सोबतीला फक्त त्यांच्या असंख्य आठवणीनी डोळ्यांत दाटणारे, घळाघळा वाहणारे अश्रू...”

(शब्दांकन - चित्रांगदा)

Tags: पिट्सबर्ग. काकासाहेब गाडगीळ गोवा शुभा जोशी Pittsburgh Kakasaheb Gadgil Goa #Shubha Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके