Diwali_4 दुर्योधन-दु:शासनाला लाजवेल अशी विटंबना
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

दुर्योधन-दु:शासनाला लाजवेल अशी विटंबना

वसई विरारमहानगरपालिकेतून हरितपट्‌ट्यातील 53 गावे वगळण्यासाठी वसई जनआंदोलन समितीच्या नेतृत्वाखाली मागीलवर्ष भरापासून वसईत आंदोलन सुरू आहे. 2मार्च रोजी जनआंदोलनाचे नेते आमदार विवेक पंडित याच प्रश्नासाठी वसई तहसिलदार कचेरीसमोर आमरण उपोषणाला बसलेले होते. दि. 5 मार्च रोजी जनतेचे अहिंसक आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी पाशवी लाठीमार केला, त्याचा हा वृत्तांत...

स्थळ : वसई तहसीलदार कचेरी समोरचा उपोषणाचा मांडव.

5 मार्च 2010, सकाळी 9 वाजता.

विषय : महानगरपालिकेतून गावं वगळण्यासाठी जन आंदोलन.

उपोषणाच्या मांडवाजवळ दोन-अडीचशे कार्यकर्ते होते. त्यात 80 टक्के महिला होत्या.पोलिसांच्या मदतीला एसआरपीवाले होते. पोलिसांनी त्यांना चौफेर घेरले. एकीकडून पाण्याचा जोरदार फवारा तर दुसरीकडून सर्व शक्ती एकवटून पोलिसांनी कार्यकर्त्यांना मोडून-तोडून टाकलं. लाठीमार ह्यापूर्वी अनेकदा पाहिला होता, पण त्या सकाळी पोलिसांच्या अंगात हैवान संचारला होता.

सुनिता नवसू भावर हिला बेदम मारहाण केल्यानंतरही त्यांचं समाधान झालं नाही. तिला रस्त्यावर आणून तिची साडी फेडण्यात आली, पोलीस तिच्या पोटावर नाचले. तिला वाचवण्यासाठी फ्रान्सिस लेमॉस हा कार्यकर्ता धावून आला तेव्हा त्याला पोलिस तब्बल दहा मिनिटे तुडवत होते. लाठीने समाधान झालं नाही तेव्हा लाथांनी तुडवलं. चार पोलिसांनी त्याला उचललं आणि पुन्हा जमिनीवर आपटलं.

नीळकंठ जनार्दन पाटील, मु. जुचंद्र हे व्यासपीठावर होते, त्यांचं वय 75 आहे. त्यांना दहाफूट उंच असलेल्या व्यासपीठावरून खाली फेकलं व फरफटत नेलं. साठ वर्षांपासून आंदोलनात असलेले नीळकंठ पाटील म्हणतात, वसईत असं कधीच घडलं नव्हतं. मथुरा कृष्णा भोईर हिची प्रकृती तोळामासा आहे. दोन पुरुष पोलिसांनी तिला धरून ठेवलं. अन्य दोघांनी तिचे हातपाय तोडले. रश्मी विश्वनाथ राव, कॅथॉलिक बँकेच्या अध्यक्षा डॉमणिका डाबरे, ब्रिजदीन डिकुन्हा, वेरोणिका रिबेलो, वेणूताई मेघवाले, विमल परेड, जया पारधी, पार्वती पवार, मालती वंजारा,सुंदरा बापशी, संजीवनी सुकदा, केशव नानकर, बाळासाहेब भोईर, विजय जाधव, अमोल नामजोशी, विजय मच्याडो, मिलिंद खानोलकर, अमोल राऊत, जोसेफ गोन्सालविस ह्यांची मारून मारून दुर्दशा केली.

रश्मी राव म्हणते, आम्ही सरकारचा निषेध मुंडण करून केला होता.हाती दगड घेऊन नाही. वसई, होळी येथे राहणारा जोसेफ गोन्सालविस ह्याचे पाय तोडण्यात आले. एवढ्याने समाधान झाले नाही तेव्हा 5 तारखेच्या संध्याकाळी पोलीस अटक करण्यासाठी त्याला घरी शोधत आले. पोलीस भयाण आरोळ्या ठोकून सैरावैरा धावत होते. दिसेल त्याच्यावर तुटून पडत होते. प्रत्यक्ष घटना घडून गेल्यानंतरही पोलिसांची इतकी दहशत होती की,जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात आजूबाजूच्या घरात लपून बसलेल्या कार्यकर्त्यांना चार तास वैद्यकीय सेवा मिळू शकली नाही.

सर्व आंदोलक पांगल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनीच आंदोलकांच्या गाड्यांचा चक्काचूर केला. ह्या सगळ्या तासाभराच्या अवधीत उपोषणाच्या ठिकाणी एकही दगड कुणी भिरकावला नाही. त्याच दिवशी दुपारी वाघोली, मर्देस येथे जे काही घडले त्यातली काही क्षणचित्रे वाहिन्यांच्या वृत्तांतात दाखविली, पण त्याहीपेक्षा भयानक. ह्या विभागात घडलं आहे. पोलिसांनी केवळ घरात घुसून लाठीमारच केला नाही, तर घरांचे दरवाजे तोडले,खिडक्या फोडल्या, सामानाची नासधूस केली. काहींच्या घरातले मोबाइल, फोन पळवले.लोक प्रचंड भेदरलेले होते, जे काही घडलं होतं त्यावर कुणाचाही विश्वास बसत नव्हता.मारणारे नक्की पोलीसच होते ना, असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता. तेथे उपस्थित असलेल्या उपअधिक्षक दीपक देवराज यांना प्रश्न विचारला, हे असं निर्दयी असंस्कृत कृत्य कसं घडलं? ह्यावर ते म्हणाले, मला ठाऊक नाही. तर नालासोपारा पोलीस स्टेशनचे इन्स्पेक्टर एका कार्यकर्त्याला छद्मीपणे हसून विचारीत होते, काय रे, हे कोणी केलं?

पोलीस पाटलाच्या घरावर दरोडा

गणपत दादा पाटील ह्यांचं वय 85 वर्षं आहे. मागील पंधरा दिवसांपासून ते फक्त पाण्यावर जगत आहेत. खाटेला खिळलेला त्यांचा देह. पोलीस त्यांच्या घराचा दरवाजा तोडून घरात घुसले आणि खाटेशी एकजीव झालेल्या वृद्धाच्या पायावर प्रहार केले.त्यांचा मुलगा म्हणतो, ते पोलीस नव्हते, राक्षस होते. आयुष नरेश पाटील हा त्यांचा पणतू अवघा दीड वर्षाचा आहे. हे बाळ प्रचंड भेदरलेलं आहे, दोनचार जणांचा जमाव घरात येताना पाहिला की बाळ भेदरून रडायला लागते.

ग्रेसी मायकल फर्नाडिस हिचं घर मर्देस इथे मुख्य रस्त्यापासून दूर आहे. तिच्या वाडीत काम करीत असताना तिला झोडपत नाक्यापर्यंत आणलं. तेथे तिच्या केसाला धरून तिला जमिनीवर पाडलं. तिची विटंबना पाहून शेजारचीच वेरोणिका तिला सोडवायला आली. तिच्या वेंगेत लहान बाळ होतं. तरीही तिला क्रूरपणे झोडपून अटक केलं. तिच्या डोक्यावर जखम झालीय.अंबालाल चव्हाण ह्यांचं वाघेश्वरी हेअर कटिंग सलून वाघोलीच्या नाक्यावर आहे. दुपारच्या वेळी ते घरी आराम करीत होते, इमारतीच्या पहिल्या माळ्यावरून ढकलत त्यांना मुख्य रस्त्यावर आणलं आणि गुरासारखं मारलं. हे दृश्य वाहिन्यांनी देशभर पोहोचवलं आहे.

निर्मळ, सोपारा रस्त्यावर मर्देस क्रॉसजवळ फिलीप फर्नांडिस ह्यांचं ‘स्माईल हाऊस’ नावाचं घर आहे. फिलिफ यांचं वय 82 वर्षंआहे. त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा फोडला, घराचे सर्व दरवाजे व खिडक्यांचा चक्काचूर केला आणि घरातल्या सर्वांनाच बेदम मारहाण केली. त्यांचा नातू ब्लेज वय आठ वर्षं व नात इव्हेट सात वर्षांची आहे. रात्री ते घरात झोपूच शकत नाहीत. झोपेतून भेदरून आरोळी ठोकत उठतात आणि रडायला सुरुवात करतात.

‘शिजू स्मृती’ ह्या घरात एकाच वेळी पंधरावीस पोलीस शिवीगाळ करीत घुसले. ‘चार महिन्यांपूर्वी नाक्यावर काय केलं होतं? आता बघून घेतो’ असं म्हणत त्यांनी घराची नासधूस केलीच, पण सायमन रॉड्रिग्ज ह्याला बेदम मारहाण करून त्याला पोलीस स्टेशनला नेलं. ‘स्वीकार’ नावाचं घर जॉन मस्कारन्हे सह्यांचं आहे. त्यांच्या घराचा मागचा दरवाजा तोडला. आविया ही त्यांची मुलगी नऊ वर्षांची आहे, तिचे दोन दात काढलेले होते,तिला झालेल्या मारहाणीने दाढेतून पुन्हा रक्तस्राव सुरू झाला.तेरेजा फर्नांडिसच्या घरात मोजून वीस जण घुसले. हॉस्पिटलमधून तिला काही दिवसांपूर्वीच घरी आणलं होतं. ती खाटेवर पडलेली होती. तिला खेचून तिच्या कमरेवर लाथ घातली. तिचा मुलगा नॉर्मन येताच ह्या टोळीने त्याला घेरलं आणि एकाच वेळी सर्वांनी हल्ला केला. ह्याच अवधीत तो जवळच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी ठरला म्हणून वाचला.कल्पना अंतोन फर्नांडिस, वाकोला, मुंबई येथे शिक्षिका आहे.पावणे तीनच्या दरम्यान कामावरून ती घरी येत होती. तिला रस्त्यातच गाठून झोडपलं. तिच्या केसाला धरून फरफटत पोलीस स्टेशनला नेलं, तर सुनिता फर्नांडिस हिला घरातून उचलून नेलं. पोलिसांची भाषा काय होती? एक पोलीस म्हणतो,

‘हिचे ..... फोडा, हिचा माज उतरून जाईल.’ शोभा फर्नांडिसचं सगळं अंग काळंनिळं पडलं आहे. तिला धड उभं राहता येत नाही, तर चार्ल्स फर्नांडिसला निर्घृण मारहाण झाली.

पांडुरंग मुकुंद वझे, वय 62 वर्षं. ते शेती करतात तर,भालचंद्र हा त्यांचा मुलगा नोकरी करतो. मुलीची दहावीची परीक्षा म्हणून तो घरी होता. त्यांच्या घराच्या काचा फोडल्या आणि दोघांनाही बेदम मारहाण केली. घरात त्याची मुलगी बाळंत होती, तिला त्यांनी अर्वाच्य शिवीगाळ केली. ब्रायन रॉबर्ट कजार हा अकरावीत शिकरणारा विद्यार्थी. त्याचा हातच मोडून टाकला. विल्यम लोपीस, वाघोली नाक्यावरच त्यांचं घर.मागच्या प्रकरणात पोलिसांनी त्याच्या घराचा चौकी म्हणून वापर केलेला. पोलीस त्याच्या घरी जेवत असत. ज्याने आसरा दिला त्याचाच पाय तोडून टाकला. अमेय नाईक, जगदीश नाईक,कल्पेश नाईक ह्यांना वाघोली नाक्यावरून येताना पकडलं आणि झोडपलं. ह्या मारहाणीत अशोक म्हात्रेला जबर जखमी केलं,त्याच्या हाताचा खुर्दा केला.

ह्या काही मोजक्या कथा आहेत. त्या दिवशी जे काही घडलं आहे ते शब्दांत व्यक्त करणं शक्य नाही. अंगावरच्या जखमा भरून निघतील, पण मनं घायाळ झाली आहेत. केवळ मारहाण नाही, तर दुर्योधन-दु:शासनाला लाजवील अशी स्त्रियांची विटंबना करण्यात आली आहे. तरुण अस्वस्थ आहेत, त्यांच्या मनात राग धुमसतो आहे आणि पोलीस लाठ्याकाठ्यांनी वसईचा प्रश्न सोडवू पाहताहेत. ‘आम्ही फोडून काढणार.आम्ही आत टाकणार. आम्ही केसेसमध्ये गोवणार,’ ह्याशिवाय पोलिसांना काहीच सुचत नाही.

पंचवीस वर्षांचं दुखणं वसई अंगावर वागवत आहे. अनेकांचे आक्रोश त्यात दडपलेले आहेत. काळजाचा तुकडा असलेली हक्काची जमीन बळकावली गेली आहे. अनेकांना बेवारस केलं गेलंय. डोळ्यांदेखत घरं उद्‌ध्वस्त झाली आहेत. आत्म्याचा आवाज, भीती आणि दहशतीच्या टाचेखाली सर्वकाळ दडपून ठेवता येत नाही. वसईकरांच्या मनात राग, संताप खदखदतच आहे.

पोलिसांचं कृत्य पाहून कुणाच्याही मनात शंका येऊ शकते. माफिया गँग पूर्वी स्वत: अत्याचार करायच्या. आता पोलिसांचा हत्यार म्हणून वापर केला जात आहे, असा लोकांचा समज झालेला आहे. आपण महासत्ता होण्याच्या गप्पा मारत आहोत, पण त्याचवेळी सुसंस्कृत, सुशिक्षित शहरात स्त्रियांची खुलेआम विटंबना केली जात आहे. ‘वरून आदेश होते’ असं उत्तर मिळतं. ‘वरून’म्हणजे नक्की कुठून? महाराष्ट्र राज्य सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे, त्याच वर्षात बाईची वस्त्रं फेडून भर रस्त्यावर तिच्या पोटावर नाचण्याचे आदेश पोलिसांना राज्याच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी दिले होते काय? नसतील, तर खरं काय?

Tags: विवेक पंडित वसई जनआंदोलन समिती सायमन मार्टिन आंदोलन उपोषण वसई तहसीलदार कचेरी लाठीमार hunger strike police protest vasai tahsildar office simon martin weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात