डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

व्रणांच्या खाचेतून चमकलेला उजेड

सलमा या तमीळ बंडखोर लेखिकेची ही पहिली कादंबरी. त्यापूर्वी तिचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कवितांमधल्या मोकळ्या-ढाकळ्या शारीर आणि भावनिक उल्लेखांमुळे, योनी व लिंग अशा थेट शब्दवापरामुळे कट्टर असणाऱ्या तिच्या समाजात प्रक्षोभ उसळला. तिच्यासारखीच अभिव्यक्ती असणाऱ्या आणखी काही कवयित्रींसह ‘इंडिया टुडे’च्या तमीळ आवृत्तीत ‘कामाथु पाल’ या नावानं त्यांच्या धीटपणाचं कौतुक करणारा लेख छापून आल्यावर तर दंगाच झाला. त्यांना बलात्काराच्या, जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. ‘आवरा’ नाही तर कुटुंबाला बेदखल करू, अशा गुरकावण्याने कुटुंबीय, नातेवाईक घाबरले. यातून भक्कम उभी राहत सलमा नंतर गावची सरपंच झाली. राज्यशासनाच्या महिला व बालकल्याणविषयक समित्यांमध्ये काम करायला लागली. मासिक पाळी झाल्यावर मुलीचं शिक्षण बंद करून तिचं अपुऱ्या वयात लग्न करून टाकलं जातं याच्या विरोधात खडी राहिली. कवयित्री सलमा चळवळी बनली.

‘इरंधम नामशीन कधाई’ या मूळ तमिळ कादंबरीचा मराठी अनुवाद, ‘मध्यरात्रीनंतरचे तास’. या पाचशेहून जास्त पानांचा कादंबरीचा अनुवाद सोनाली नवांगुळ हिने केलाय. ह्या अनुवादित पुस्तकाला नुकताच ‘साहित्य अकादमी’ पुरस्कार जाहीर झाला, त्यानिमित्ताने सोनालीशी साधलेला संवाद.

प्रश्न - तुझ्या सगळ्या लेखनात एक पारदर्शकता आहे. विषयाबद्दल स्पष्ट विचार आणि ते मांडण्याची सहज संवेदनशील बोलकी भाषा हे तुझ्या लेखनातले विशेष. तुला आवडणारं लेखन कुणाचं? त्याचा काही प्रभाव आहे का?
- मी आधाशी वाचक नव्हेच, पण उत्तमही नव्हे. वाणसामान बांधून आलेल्या कागदावरचंही सगळं वाचून काढणारे लोक मी ऐकले आहेत. त्या धर्तीचं वाचनाचं वेड मला नाही. मात्र मी गप्पिष्ट जरूर आहे. कुठलेतरी अभाव भरून काढताना तुम्ही कुठलीशी किल्ली धरून ठेवता सुटकेसाठी- तसंच बहुतेक. जन्म होऊन दशक ओलांडायच्या आत एका फुटकळ अपघातात अंगावर दर्शनी एक ओरखडाही न उठता थेट पॅराप्लेजिक झाले. नैसर्गिक विधींवरचं नियंत्रण गेलं. अतिशय व्यस्त, थकवणारं, निराश करणारं दवाखान्यांचं चक्र. इतक्या लहानणी त्या वेळी प्रचंडच लांब वाटणाऱ्या मुंबईसारख्या ठिकाणी उपचारांसाठी वर्षभराहून अधिक काळ एकटं राहावं लागलं. त्या वेळी हिंदीबिंदी कुठं बोलायला यायचं? घरच्या कुणीही मला एकटं सोडलं नव्हतं, पण त्या वयात ते समजावून कळलं नसतं. बहुतेक तेव्हापासून मी सगळ्यांशी जमेल तितकं बोलत राहायला लागले. तिथल्या मुख्य असणाऱ्या डॉ. चावलांपासून ते फिजिओथेरपी करणाऱ्या नैना मॅडम, वॉर्डबॉईज, केरळी नर्सेस, मराठी मेट्रन, मुलांना भेटायला येणारे नातेवाईक, नवे पेशंट्‌स सगळ्यांशी बोलत राहायचे.

अभाव भरून काढण्याची ती सुरुवात असेल कदाचित. दवाखान्यातून घरी परतून आल्यावरही मी मुंबईचं जग चमकदार वर्णन करून सांगायचे, असं माझ्या मैत्रिणी सांगतात. ती सवय जडून गेली. भाजीवाले, दूधवाले, म्हशी ओढ्याला नेणारे, संध्याकाळी देवळात रामायण वाचण्यासाठी जाणारे, दुपारी निवांत पायरीवर बसून घरचा साद्यंत वृत्तान्त देणारे - त्यांचं सगळं मी ऐकायचे. बोलायचे. आज कामाची चौकट बदलली असली तरी बैठक मारून गप्पा करण्याचा स्वभाव आहेच. कोल्हापुरात सामाजिक संस्थेत काम करताना तीच गोष्ट मला कामात पुढं नेणारी ठरली. स्वतंत्र राहताना आजूबाजूच्यांना आपल्या स्थितीसहित आपण सरावाचं होणं आणि त्यांना आपण सरावाचं करवून घेणं यासाठी वेगवेगळ्या माणसांशी त्यांचा कल बघून संवाद करत राहाण्यानं तगून राहण्याच्या वाटेतले प्रश्न टोकेरी झाले नाहीत. वाचताना त्या त्या वेळी लेखक कवींची भाषा भुरळ घालतेच, पण शेवटी लिहायची वेळ येते तेव्हा तुमचा पिंड तुमच्याकडून लिहवून घेतो. माझा पिंड गप्पांचा आहे. त्यात भर पडली ती कोल्हापुरात सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्सची. सिनेमे बघताना सगळ्या मर्यादा गळून पडताहेत हा अनुभव मला चेतवणारा होता. इराणी, अझरबैजानी, पोलंड अशा देशांचे सिनेमे बघताना मात्र माझ्यावर परिणाम होत गेला आहे. तशा सोप्या, तरीही मुग्धता राखणाऱ्या भाषेचा मोह पडत गेला आहे. तसं काही असेल.

प्रश्न - तू कोणत्या कामांची स्वप्नं पाहातेस का?
- तपशीलवार अनुभवांसाठी मला प्रवास नि सिनेमा फार जवळचा वाटतो. ते भरपूर करावं वाटतं. दहा-बारा दिवसांच्या युरोप प्रवासामुळं माझी प्रवासाबद्दलची महत्त्वाकांक्षा फार वधारली आहे. मला उदंड फिरायचं आहे. जगभर चित्रं, शिल्पं बघायची आहेत. लहानसहान गावांमधून निरुद्देश भटकायचं आहे. चालता न येण्यामुळे मला बरंच काही मिळालंही आहे. बारीकबारीक आवाज, वास मला सूक्ष्म पातळीवरही जाणवतात. हालचाली वाचता येतात. नाजूक कळांनाही शब्दरूपात आणल्याशिवाय गमत नाही. असं सापडलेलं काही मनात उसळत असतं, ते लिहिण्याचं स्वप्न मी बघते आहे. अपंग माणसांच्या लैंगिकतेबद्दल समाजात फारच कोळिष्टकं आहेत. ती जर स्वच्छ करता आली तर करावीत असं वाटतं. लहान मुलांच्या गोष्टीत मी रमते. मुलांमध्ये रमते. त्यांच्या गोष्टी महामूर लिहायच्या आहेत. मला झेपतील तितके अनुवादही करायचेत. अनुवादातून भाषा सापडण्याची गंमत सुख देते. नट जसा अभिनय करताना दुसऱ्या पात्राचं जग जगतो तसं अनुवादातून मला ती ती माणसं जगायची आहेत. सहकारी मंदासोबत अत्यंत चांगला रुचकर स्वयंपाक शिस्तीनं करून मित्रमैत्रिणींना जेवू-खाऊ घालायचं आहे. माझी हाडं आणखी ठिसूळ होऊ नयेत व माझं कॅथेटर माझ्या शरीराशी आणखी एकरूप होऊन माझी सगळी स्वप्नं पूर्ण करण्यात साथ देवो असंही स्वप्न मी बघते आहे.

प्रश्न - माणसांचं मोठं वर्तुळ तुझ्याभोवती आहे. हा गोतावळा तुझ्या कामामुळे आहे. तुझ्याविषयी असणाऱ्या प्रेमामुळे आहे. आताही सोशल मीडियावर तुझ्याविषयी प्रेम, कौतुक दिसत आहे. ह्याविषयी काही सांगशील?
- थोडं वाचणं, थोडं लिहिणं, बरंचसं आजूबाजूचं दिसेल ते तपशिलात पाहणं व सिनेमे मनमुराद पाहणं, नव्या गोष्टींविषयी अफाट कुतूहल असणं, यातून समोरच्या माणसाशी काही जुळतं. मैत्री होते. त्यांच्या नाटक, सिनेमे, चित्रं, गाणं, लिहिणं, पदार्थ करणं, कपाटं लावणं- अशा गोष्टींविषयी ऐकायला मला आवडतं. ओळख झाल्यावर नवेपणाचा प्रभाव उतरला की दोहो बाजूंनी टीकाटिप्पणी, बारकाव्यांची चर्चा, निराळ्या अनुभवांविषयीचं कुतूहल व त्या कुतूहलापलीकडे स्टिरिओटाइप्सना मोडून काढण्याबद्दल वादावादी असं सगळं होण्यातून मैत्री गोडव्यापल्याड जाते. त्यानंतरही टिकली तर दोहो बाजूंनी बरंच भरभरून देते. आपल्या कामात आपल्याला उभं करते. माझं तसं मैत्र असंख्यांशी जोडलं गेलं आहे. एखाद्या ओळखीच्या माणसाचं मत आवडलं नाही तर त्याला सोशल मीडियावर टॅग करून प्रश्न विचारा, उतरवून ठेवा यापेक्षा थेट मनातल्या हीनत्वासहित बोला व धोका पत्करा, अशी समजूत असणारे काही मित्रमैत्रिणी लाभल्यामुळे त्यांच्याकडून कौतुक व भविष्यातील गंभीर कामाबद्दलचे इशारे, दोन्ही मिळताहेत.

अशा ओळखणाऱ्यांनी व माझ्याविषयी ऐकून असणाऱ्यांनीही माझं भरभरून अभिनंदन केलंय त्याबद्दल मी कृतज्ञच आहे. साहित्य अकादमीची शाबासकी मोठ्ठीच आहे, आणि त्याचं मोल जाणणारे व न जाणणारेही या आनंदात सामील आहेत ही माझ्या दृष्टीने अमोल ठेव आहे. माझ्याकडे चटणी, पापड विकायला येणारे दादा अभिनंदन करायला आले तेव्हा सद्‌गदित झाले होते. किराणा दुकानदार म्हणाले, ‘‘मॅडम, ‘आपल्याला’ पुरस्कार मिळालाय!’’. असे कितीतरी. ज्यांना अपंगत्वासहित राहून न खचता मी ‘काहीतरी’ करत राहते याचं अप्रूप आहे. दुसरी गोष्ट हीसुद्धा की जगण्याने परवड केलेल्या माणसांची गोष्ट ऐकायला आपल्याला आवडते. त्यांचं जिंकणं पाहिल्यावर अंगात जोम संचारतो. त्या नाट्याने अंगावर शहारे येतात, रडू येतं, भारावल्यासारखं होतं, प्रेरणा मिळते. आपण प्रत्येक माणसं अशा प्रेरणेच्या शोधात असतो. पूर्वी मला या गोष्टीचा राग यायचा. आता वाटतं, माणसांना त्या पलीकडे आपण नेऊ शकू; मात्र सगळ्यांनाच नेणं शक्य आहे काय? मग त्यासाठी झोकूनच द्यावं लागेल. ते मला करायचं आहे काय? आणि काही माणसं ज्यांना हे सगळं कळतं, पलीकडे जाता येण्याची कुवत असते तीही जर माझ्या शारीरिक स्थितीबद्दल बोलत राहिली तर त्याचे हेतू व राजकारणही सजग माणूस म्हणून मला पाहता यायला हवं. माणसं असंख्य प्रकृतीची असतात... त्यातला वाच्यार्थ, व्यंग्यार्थ कळावा ही बुद्धी वाचण्याने, सिनेमा पाहाण्याने तरोताजा होत आलीय. अपंगत्वाच्या स्थितीची मी कामात सवलत घेत नसले तरी तिच्यामुळे मी हव्या त्या ठिकाणी हवी तेव्हा असू शकत नाही. ‘सुगम्य भारता’त अपंग माणसांनी कुणाच्याही मदतीचं ओझं न घेता वावरावं अशा पायाभूत सुविधा नाहीत. तेव्हा अडथळ्यांची शर्यत समजून घेत लोक कौतुक करतात त्याची मी चैन करते.

प्रश्न - एक सजग लेखक म्हणून तू भोवतालाकडे कशी बघतेस? त्यातून काय प्रकारचं लेखन तुला करावंसं वाटतं?
- जे मी बघते व जे मला बघायचं आहे त्याबद्दल मी लिहिलं आहे आधीच्या प्रश्नात. मात्र मला कधी कधी मुळीच सजग नि सावध राहायचं नाहीये. हरपून बसायचं आहे. ती उसंत मला माझ्या आयुष्यानं काही प्रमाणात तरी बहाल केली आहे. जगण्याच्या असंख्य छटा मला वेडं करतात. त्यातही मला इथंतिथं असायचं आहे. सतत, दिवसरात्र लेखन करणं हा माझा ध्यास नाही. सतत जगणं हा माझा मार्ग आहे.

प्रश्न - ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या पुस्तकाला अनुवादासाठीचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. त्या अनुवादाविषयी काय सांगशील?
- सलमा या तमीळ बंडखोर लेखिकेची ही पहिली कादंबरी. त्यापूर्वी तिचे दोन काव्यसंग्रह प्रकाशित झाले होते. कवितांमधल्या मोकळ्या-ढाकळ्या शारीर आणि भावनिक उल्लेखांमुळे, योनी व लिंग अशा थेट शब्दवापरामुळे कट्टर असणाऱ्या तिच्या समाजात प्रक्षोभ उसळला. तिच्यासारखीच अभिव्यक्ती असणाऱ्या आणखी काही कवयित्रींसह ‘इंडिया टुडे’च्या तमीळ आवृत्तीत ‘कामाथु पाल’ या नावानं त्यांच्या धीटपणाचं कौतुक करणारा लेख छापून आल्यावर तर दंगाच झाला. त्यांना बलात्काराच्या, जिवे मारण्याच्या धमक्या आल्या. ‘आवरा’ नाही तर कुटुंबाला बेदखल करू, अशा गुरकावण्याने कुटुंबीय, नातेवाईक घाबरले. यातून भक्कम उभी राहत सलमा नंतर गावची सरपंच झाली. राज्यशासनाच्या महिला व बालकल्याणविषयक समित्यांमध्ये काम करायला लागली. मासिक पाळी झाल्यावर मुलीचं शिक्षण बंद करून तिचं अपुऱ्या वयात लग्न करून टाकलं जातं याच्या विरोधात खडी राहिली. कवयित्री सलमा चळवळी बनली. त्याच दरम्यान तिनं धर्म, परंपरा, रूढी यांच्या दबावातून उंबरठ्याआत अडकलेल्या मुली-बायकांचं जे जग अनुभवलं त्याचं चित्र ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ या कादंबरीतून रसरशीतपणे चितारलं. शाळेच्या किलबिल कोलाहलात गढून गेलेल्या छोट्या राबियाला घरी घेऊन जाण्यासाठी गाडी येते, या प्रसंगापासून कादंबरीची सुरुवात होते. बाहेर पाऊस पडत असतो. ड्रायव्हरबरोबर जायचं नाकारून राबिया छत्री ठेवून घेते व कुणाही लहान मुलाला पावसात चिंब व्हावं वाटतं तशी होते. घरी पोहोचताच तिची आई जोहरा तिचा अवतार बघून धास्तावते. वाढत्या वयातल्या मुलीचे कपडे अंगाला चिकटलेत, छातीपाशी तर जास्तच! कुणी बघेल, काय म्हणेल नि तिच्या आईपणावर ताशेरे ओढेल... राबियाला या सगळ्यांची जाणीवही नाही इतकी ती निरागस. मग कादंबरीच्या 561 पानांमधून अशा कितीतरी स्त्रियांच्या गोष्टी येतात.

त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या पुरुषांच्या गोष्टी येतात. साट्यालोट्यातून एकमेकांशी बांधलेलं ते गाव नि आसपासची छोटी छोटी गावं धर्म, रूढी-परंपरांच्या पालनाच्या चाकोरीत भीत जगणारी. स्वत:चं स्वातंत्र्य शोधताना ते मिळत नाहीये म्हणून दुसऱ्या कुणा, छपलेल्या स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ पाहणारीला टोचा मारणारी. जखमी करणारी. माणसं आर्थिक भिन्न स्तरांचं स्तोम माजवणारी व अबोलपणानं गरीब कुटुंबांचा भार वाहणारीही. कर्मठ गावात राहिली तर आपली पोर शिकणार नाही म्हणून आपल्या विधुर वडिलांकडे मुलीला शिक्षणासाठी अंगावेगळं ठेवणारी रहिमा मुलीचं स्वातंत्र्य लग्नानंतर जाणार हे जाणून आहे, पण तिनं आपल्यापुरता बारीक आवाज उठवत निदान तिची काही वर्षं तरी मोकळ्या श्वासासाठी रक्षित केली. ‘‘आपल्या शरीराकडं, लैंगिक अवयवांकडे मुळीसुद्धा बघायचं नाही, बघितलंत तर काळ्याठिक्कर पडाल, मग कोण लग्न करेल तुमच्याशी?’’ असं मुलींना सांगणाऱ्या आया लग्नानंतर तिनं नवऱ्याला सुखी करून टाकावं अशी कुजबुजत पाठवणी करताना सूचना देतात तेव्हा नवीन स्वप्नं रंगवायची सोडून मुलगी भिऊनच जाते नि तिच्या परवडीची सुरुवात होते याचीही विपुल चित्रं इथं उमटतात. सणवार, मुलांचे खेळ, लग्न व मृत्यूचे सोहळे, अपमान, कुचंबणा यांचे तपशिलात वर्णन वाचताना जणू आपण त्या जगात जगायला लागतो! नाना तडजोडी, मैत्री जुळणं, भंगणं, घरं एकत्र येणं, दुभंगणं, वैषयिक इच्छाआकांक्षांबद्दल मुक्त गप्पा नि मनाविरोधात त्यातील दडपणुकीला बळी पडणं, बाहेरच्या देशांमध्ये पैसा कमावण्यासाठी जाऊन वर्षभरात कधीतरी गावाकडं परतल्यावर अधिकच कट्टर झालेले मुलगे, नवरे, दीर. त्यांचे तिथले सोयीचे घरोबे व त्यांच्या अनुपस्थितीत बायकांनी गुपित जगात शोधलेले दैहिक आसरे. अशा पुरुषसत्ताक जगातील खाजगी कोपऱ्यात बायका लहानमोठी बंडाची निशाणी उभारतात. छोटी छोटी खिंडारं पाडतात. कधी सरशी होते, कधी धूळ खावी लागते. मात्र बायकांची आयुष्य धिमेपणानं बदलत राहतात. कादंबरीभर इतकं सांगूनही सलमाचा कसलाही अभिनिवेश नाही. पुरुषांना तिनं खलनायक केलेलं नाही. तेही रूढींचे बळी हे तिला कळतं. धर्म, वर्गभेद, स्त्री-पुरुष भेद आदींबद्दलच्या कुतूहलांच्या विविध पातळ्यांवर सलमा आपल्याला फिरवत राहाते. गुंतवून ठेवते. म्हणूनच या कादंबरीचे मल्याळम, इंग्रजी, गॅलिशियन, जर्मन अशांसारख्या भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. 

प्रश्न - तुझ्या कामातील मोठं आव्हान कोणतं?
- सलमाच्या कादंबरीच्या अनुवादाबद्दल बोलत असू तर तिथली अडचण वेगवेगळ्या पातळ्यांवरची होती. एक तर कविता महाजनसारख्या संपादिकेनं मनोविकास प्रकाशनासोबत करायला घेतलेला हा प्रकल्प अत्यंत वेगळा व वाचकवर्गाची हुकमी खात्री न देणारा होता. तिनंच नंतर सांगितल्यानुसार हे काम तीन अनुवादकांनी अर्धवट सोडलं होतं. पुस्तकाचा आकार पाहाता ते बैठक मारून करावं लागणार होतं. माझी नेहमीची कामं, घर, तब्येत ही स्वत:वरची जबाबदारी सांभाळून व इंग्रजीबद्दलचे न्यूनगंड बाजूला सारून नजर उत्साही करायची होती. स्वत:च्या मर्यादित खुज्या जगात बरीच वर्षं अडकून राहिल्यामुळे राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक फरक नि बारकाव्यांबद्दलची माझी माहिती अत्यंत त्रोटक होती. त्यातले पेच ठाऊक नव्हते. सलमाच्या कट्टर गावातले सण समारंभ, विधवांचं व तलाक दिलेल्या बायकांचं सामाजिक जगणं, तिथली संपन्न खाद्यसंस्कृती, स्त्रियांना भोगवस्तू समजणाऱ्या सत्तास्थानांची विकृती या सगळ्यांचा अनुवाद करताना जाणवणाऱ्या दबावातून नेमके शब्द फुटणं ही उलघालीची वेळ होती. सगळ्यांत महत्त्वाचं, लैंगिक अवयव व कृतींची वर्णनं व त्यावरून झालेली चेष्टामस्करी लिहिताना माझ्या स्वत:चा असणारा भाषिक संकोच मोठा होता. मासिक पाळीविषयीही मोकळी चर्चा न झालेल्या माझ्या शुभंकरोती संस्कारित घरादारातून मला या बाबतीतलं मोकळेपण थोडंफार अनुभवता आलं असतंही, जर मी शारीरिक अक्षम नसते तर. मुस्लिम माणसं हिंदी किंवा उर्दू बोलतातच. असले स्टिरिओटाइप्स बाळगणं बालिश बॉलीवुडपटांतून पक्कं झालेलं होतं. हा मूर्खपणा करण्यापासून मला कविता महाजनने रोखलं. घरगुती गप्पा नि नातेवाईक व सासूच्या तक्रारी यांकडे व मराठी सिनेमा बघून टिपं गाळणाऱ्या बायकांकडं बारीकशा तुच्छतेनं बघायचं वळण मला काही गटांमुळे लागलं होतं, पण या कादंबरीतल्या सूक्ष्म पातळीवर हिंसा सोसून निबर झालेल्या बायकांना हळवं करणारे, हसवणारे हे उंबरठ्याआतले गप्पांचे फड किंचित श्वास घेऊ देतात हे पाहिलं नि माझा ‘वेगळ्या महत्त्वाच्या गप्पां’चा माज उतरला. तो उतरणं हे आव्हानच होतं. आणि तसंही, प्रत्येक नवीन अनुवाद आपली आव्हानं, भाषेला लांघण्याची नवी कोडी घेऊन येतो. स्वत: अनुभवलेलं लिहितानाही तेच घडतं. त्याशिवाय मजा तरी कुठे!

प्रश्न - एक लेखक, अनुवादक म्हणून या समाजाविषयी वाचक, लेखक, साहित्य क्षेत्राविषयी तुझी निरीक्षणं महत्त्वाची आहेत. ती कोणती?
- पुण्यात झालेल्या अखिल भारतीय अपंग साहित्य संमेलनात मी एक वर्ष अध्यक्ष म्हणून निवडली गेले होते. मी केवळ त्याच गटाचं, सोयीचं बोलत नव्हते म्हणून त्यांना मी आपली वाटले नाही आणि सुरुवातीच्या काळात व आताही अपवादात्मक वेळी का असेना, मुख्य प्रवाहातल्या मोजक्यांना वाटतं, ‘‘ही आपल्यात का? अपंग माणसांची आंदोलनं, प्रेरणेची देवळं, पुनर्वसनाचं काम करणाऱ्या संस्था अशी क्षेत्रं असताना ही आमच्यात का घुटमळतेय?’’, ‘‘बरं, तुम्ही बरं काम करा, कौतुक करू, अपंगत्याच्या झगड्याकडे कनवाळूपणानं बघत त्याबद्दल पुरस्कृत करू, पण त्यापलीकडे तुमच्या कामाची चिकित्सा, मानमरातब हे जरा अति होतंय!’’ हे निरोपही आडवळणानं व निनावी मला पोहोचत राहिले आहेत. वेगवेगळ्या लेखक, कवी, समीक्षक, संपादक, कलावंत, कार्यकर्त्यांची भाषणं, चर्चा, परिसंवाद, पुस्तक प्रकाशनं, प्रदर्शनं अशा ठिकाणी मला पायाभूत सुविधांच्या अभावी, खर्चीक वाहतूक व्यवस्थेमुळं आणि शारीरिक स्थितीनं परवानगी नाकारल्यामुळं जाता आलेलं नाही. असा लाभ ज्यांना मिळतो त्यांच्या जगण्यावागण्यात व अभिव्यक्तीत गुणात्मक फरक पडतो. मूल्यनिष्ठा वाढते. राजकीय विधान सापडतं. सामाजिक अभिव्यक्ती खडतर राहत नाही. माझ्या मर्यादांमुळं मला ते गमवावं लागलं, पण मैत्रीच्या धाग्यातून व दोहो बाजूंच्या संवादाच्या भुकेमुळे विविध क्षेत्रांतील समवयस्क व ज्येष्ठ माणसं माझ्या घरी येत राहिली. त्याबद्दल अनेकांना झालेला जळफळाट माझ्यापर्यंत पोहोचला. ‘‘कोल्हापुरात आल्यावर हिच्याकडं गेलं नाही तर काय पाप लागतं काय?’’ पासून काहीही मतप्रदर्शनं झाली. बसल्या जागी मला अशा सवलती मिळतात म्हणून राग केला गेला. चालणाऱ्या माणसांना चालण्याचा म्हणून फायदा मिळतो तसा शारीरिक स्थितीमुळं जागेला खिळलेल्या माणसांना त्या स्थितीमुळे उदार अनुभव वाट्याला आले तर बिघडतं कुठे!

प्रश्न - फेसबुकसारखी समाजमाध्यमं तू कितपत वापरतेस? ह्या आभासी जगात तुला कितपत रमता येतं?
- ही सगळी माध्यमं मी वापरते व त्यातून माझे अनेक मित्रमैत्रिणी मला सापडले आहेत. ही सगळी माध्यमं अत्यंत गतिशील आहेत व त्यातून बदल घडवता येतात. मात्र ती आपल्या कह्यात आहेत की आपण त्यांच्या- या गोष्टींनी फरक पडतो. मी तिथं गुंतून पडण्याचाही एक काळ होता, त्यातून बाहेर पडून मी जरुरीइतकं शेअर करण्यासाठी व वाचण्यासाठी सोशल मीडिया वापरते. तिथं बारक्या बारक्या गोष्टी रंजक पद्धतीनं सांगत राहताना आपली बैठकीची सवय मोडते, खोलातला विचार करण्याची उसंत गमावली जाते, चटकन प्रतिसादाच्या आकर्षणाच्या फेऱ्यात अडकून तर मातीच होते. प्रतिसादाच्या भुकेपायी फुटकळ, थिल्लर सांगत राहणं आपलंसं करताना मग बहुतेकदा एकूणच जगण्यातली खोली जाते की काय असं मला वाटतं. अनेकांचा अनुभव याच्या उलटही असण्याची शक्यता आहे. विवेकानं व जरुरीइतकंच आपलं व्यक्त होण्याचं साधन व माध्यम वापरण्याची व त्याची धार मजबूत ठेवण्याची गरज मला वाटते.

प्रश्न - केलेल्या कामातून अनेक माणसं तुला समजून घेता आली, मग तो ड्रीमरनर ऑस्कर पिस्टोरिअस असो, सलमासारखी लेखिका असो, मेधा पाटकरांसारख्या सामाजिक कार्यात झोकून देणाऱ्या कुणी असो - यातून तुझं जगणं, लिहिणं यात काही फरक पडला असेल का?
- बोरकरांची एक कविता आठवतेय या प्रश्नाचं उत्तर देताना. ‘उठे फुटे जी जी लाट, तिचा अपूर्वच थाट, फुटे मिटे जी जी वाट, तिचा अद्वितीय घाट’ अशा ओळी जगण्यातल्या प्रत्येक लहानमोठ्या माणसांकडून व अनुभवांमधून जी ‘लावण्य यात्रा’ अनुभवली त्याबद्दल बोलतात. अगदी तसंच मला वाटतं. माझ्या प्रत्येक लेखामधून, अनुवादामधून व गोष्टींमधून जी माणसं लिहिण्याच्या निमित्तानं मला सापडली त्यांनी मला प्रत्येक वेळी वैचारिक, भावनिक, राजकीय पातळ्यांवर स्वातंत्र्य समजून घेण्याची व विवेकी कृती करण्याची वाट दाखवलेली आहे. सलमासारखी बंडखोर लेखिकाही जोरकस सर्जनशील कृतीतून हल्ला करून समाज हादरवून टाकू किंवा बदलून टाकू, असा आवेश बाळगत नाही. ती म्हणते, ‘‘मी प्रयत्न करते, त्यातून समजा कदाचित उद्या बदलेल, कदाचित परवा, कदाचित....’’ मात्र जिथून ताकद मिळाली, जीवनाचं उष्ण द्रव्य मिळालं त्याला त्यागून नव्याच जगात राहण्यासाठी ती तयार नाही. थोडी समजूत बाळगत नि थोडे धक्के देत ती मूल्यांशी तडजोड न करता समाजात असू पाहते. अनेकदा ‘उपस्थित राहणं’ हाच उच्चार व कृती असते. संयमानं ती समजून द्यावी व घ्यावी लागते. डॉ. अरुण गांधींच्या पुस्तकांच्या अनुवादातून मी केवळ शब्दाला शब्द दिलेला नाही, आचरणासाठी शक्ती घेत राहिले आहे. या सगळ्यांच्या स्पर्शानं, अगदी माझा राग करणाऱ्यांच्या सहवासातूनही मला काहीतरी प्रेरक मिळत राहिलं आहे.

प्रश्न - एक प्रश्न थोडा नाजूक, त्रासदायक आहे. तरीही, सोनाली, पंखात पुरेसं बळ असतं तर... काही हरवलं आहे असं वाटतं का?
- तुमची वेगळी स्थिती तुम्हांला नव्या शक्यता प्रदान करते. हे कळायला वेळ लागतो. पण शक्यता खुणावतात व सुप्त नि गप्प राहणाऱ्या वेगळ्या स्थितीतल्या माणसांचं प्रतिनिधित्व करत तुम्हांला काही सांगू शकण्याचा अवकाश लाभतो तेव्हा प्रचंड सशक्त वाटायला लागतं. आपल्याकडे अपंग माणसांशी कसं वागावं-बोलावं, त्यांना सहानुभूतीच्या नजरेपलीकडे काय द्यावं व त्यांच्याकडून घ्यावं याची सभ्यता व संस्कृती फारच खुरटी आहे. वेगळ्या शारीरिक स्थितीतली असंख्य माणसं समाजाच्या, नातेवाइकांच्या उपकृततेच्या भावनेत जगण्याची खुंटी सोडून देतात. माझ्यासारख्या माणसांची व्हीलचेअर धरली तर ती मदत ग्लॅमर मिळवून देते, पण माझ्यासारख्यांनी काही बौद्धिक व अन्य मदत केली तर त्याला गणलं जात नाही. हे मी सततच पाहत राहिले आहे. प्रत्येक श्वास कुणीतरी प्रायोजिक केलेला आहे याची आठवण तर प्रत्येक टप्प्यावर मिळतच राहते. अडाणी नव्हे सुशिक्षितांची गर्दी यात जास्त आहे. त्यामुळं अनेकदा कोंडमारा होतो, मात्र आपलं स्वातंत्र्य आपणच मिळवायचं असं मला शहाण्या माणसांनी हलवून सांगितलं आहे. आणि हाही मला अनुभवांच्या कोलाजपैकी मानवी भावभावनांची जाणीव करून देणारा एक महत्त्वाचा भागच नव्हे काय! ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’ नावाच्या एका आगळ्या सिनेमात शेवटची नावं पडण्यापूर्वी दिसलेलं रूमीचं हे वाक्य मला सतत माझ्या स्थितीकडे बघायचं नवं भान व आयाम देतं, ‘‘द वुन्ड इज द प्लेस व्हेअर द लाइट एन्टर्स यू...’’

(जगण्यातल्या तरतमतेचा, अनेक आव्हानांचा सुविहित अनुवाद करते सोनाली. जगण्यातल्या अनेक भावनांना एक विलक्षण संवेदनशीलतेनं सामोरी जाते. तिच्या अनुवादक्षमतेने तर साहित्य अकादमीसारखा मोठा पुरस्कार मिळवला, तिच्यातल्या विचारी, समजूतदार, संवेदनशीलतेला, ऊर्जेला न्याय देणारं निखळ सर्जनशील साहित्य तिने आता लिहावं. आयुष्यातले अनेक अनुभव, अनेक व्यक्ती, संस्थांशी बांधिलकी, विविध प्रकारची कामं यांतून जमलेलं हे संचित तिला लिहिण्यासाठी बळ देणारं आहे हे वेळोवेळी तिच्याशी बोलताना जाणवत आहे. सोनाली आता हे मनावर घ्यायला हवंय तू... बाकी शुभेच्छांचे लाखो बहर तुझ्या मालकीचे आहेतच.)

संवादक : स्नेहा अवसरीकर, पुणे

Tags: सोनाली नवांगुळ मध्यरात्रीनंतरचे तास इरंधम नामशीन कधाई साहित्य अकादमी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके