डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य

एकाने डाव्या हाताने हॅट उचलली. एकाने उजव्या हाताने. पण ते न बोलता उभे राहिले. काका घाईने, गडबडीने बोलू लागले, ‘अरे अरेऽ! काय हे? इथं कशाला आलात?... ते ही एकदम दोघं? जाऽ जा लवकर!... जा म्हणतो ना? पैसे उद्या देईन मी!... जाऽ! इथं येऊ नका, असं बजावलं होतं ना मी?... तरीही आलात? मूर्खांनो!... जाऽ... जा... ताबडतोब!’ त्यांचं ते दबक्या आवाजातलं रागावणं ऐकून  सुनंदाताई बाहेर आली. आणि तिला धक्काच बसला. ती आश्चर्याने पाहत राहिली. ‘अगं बाई! हे काय?... मला तर एकच माणूस पुन्हापुन्हा दिसत होता!... पण हे तर दोघे आहेत! हा काय प्रकार आहे?’ पण आता आश्चर्याने ओरडायची काकांची पाळी होती, कारण अंधारातून आणखी दोन लांब मिशीवाले पुढे आले. तसेच दिसणारे. हॅट घातलेले आणि लांब कोट घातलेले. पण ते घाबरले असावेत. ते सारखा सलाम करीत होते. एक डाव्या हाताने, एक उजव्या हाताने. आणि त्यांच्या मागे कोण होता?...

 1 : समशेर कुलुपघरे!

तुम्ही कधी ‘समशेर कुलुपघरे’बद्दल ऐकलंय? नाही ना? पण ही काही तुमची चूक नाही. मीच त्याच्या कथा आणि कारनामे अजून तुम्हांला सांगितले नाहीत. नाही म्हणायला, ‘भूत बंगला’ नावाची एक लघुकादंबरी लिहिली होती मी तुमच्यासाठी. ‘समशेर’ रहस्याची उकल कशी करतो हे मी त्या लघुकादंबरीत सांगितलंय आणि त्याच्या इतर रोहर्षक कथाही मला अजून सांगायच्या आहेत तुम्हांला. पण थांबा, समशेरबद्दलच सांगायचं राहिलं. हो ना? त्याचं नाव ऐकल्यानंतर तुम्हांला काय आठवतं? शेरलॉक होम्स? बरोबर! समशेर मधला ‘शेर’, लॉक म्हणजे कुलूप, आणि होम्स्‌ म्हणजे ‘घरे’, हो ना? पण समशेरचं, नाव आणि आडनाव अगदी खरंच आहे. आणि त्याचे मित्रं त्याला ‘शेरलॉक होम्स’ असं म्हणतात मधून- मधून, हे देखील खरं आहे. हा आहे मुलांचा गुप्तहेर! अगदी मराठीत सांगायचं तर मुलांचा ‘डिटेक्टिव्ह’! दिसतो कसा म्हणता? सांगतो! तरऽ, समशेर बुद्धिमान आहे. कोडी सोडवण्याचा त्याला नाद आहे. तुमच्याच वयाचा आहे. गणितात हुषार! तर्कशुध्द विचार करतो. चौकटी-चौकटीचा शर्ट घालतो. व्यायाम पण करतो. खूप वाचतो. हां, चष्मा मात्र आहे त्याला. समशेरला रहस्याचं मोठं आकर्षण आहे. साहसात भाग घेणारा त्याच्या मित्रांचा एक गट पण आहे. असा हा तुमचा मित्र, समशेर कुलूपघरे!.. आणि त्याने सोडवलेलं हे आणखी एक प्रकरण!

2 : ‘माझा विेशास आहे तुझ्यावर!’

सुनंदाताई काकुळतीने सांगत होती आणि सगळे तिच्याकडे अविेशासाने पाहत होते. कोणाचाच तिच्यावर विेशास बसत नव्हता. ‘असं कसं होईल, सुनंदा?... तुला नक्कीच भास होत असणार!’ ‘भास वगैरे नाही!... मला खरंच तो लांब मिशीवाला माणूस दिसंत असतो! अगदी रोऽज!... आणि नमस्कार करतो!’ सगळ्यांनी खेदाने मान हालवली. सगळे आता खोलीतून निघून जाऊ लागले. पण काकांनी म्हटलंच, ‘पण आम्हीही तुझ्याबरोबर केला की प्रवास!.. आम्हांला नाही दिसला तुझा तो माणूस?... तुला भास होत असणार, बाळा!’ आणि मग काका हळूहळू निघून गेले, सगळे गेले. आणि रडवेलं होऊन सुनंदाताईने आपल्या लहान भावाकडे आणि पाहुणे म्हणून आलेल्या छोट्या मित्रांकडे पाहून म्हटलं, ‘कोणाचाच विेशास नाही कां, माझ्यावर?’ आणि खुर्चीवर बसून लक्षपूर्वक ऐकणारा तो पाहुणा मुलगा एकदम खणखणीतपणे म्हणाला, ‘माझा विेशास आहे तुझ्यावर!’ मित्रांनो, हा होता आपला समशेर! समशेर कुलुपघरे!

3 : ताईने सांगितलेली हकीकत!

सुनंदाताई सगळ्या मुलांना हकीकत सांगू लागली आणि सगळी मुलं उत्सुकतेने ऐकत राहिली. आणि आपला समशेर तर अगदी स्तब्ध राहून ऐकतोय. सुनंदाताईने सांगितलेली हकीकत थोडक्यात पुढीलप्रमाणे होती... सुनंदा नोकरी करते. ती रोज लोकल रेल्वेने नोकरीच्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवास करते. रोज तिला जाताना एक माणूस दिसतो. लांब मिशीवाला माणूस. लांबूनच तो हॅट उचलून इंग्रजी पध्दतीने अभिवादन करतो, आणि गर्दीत निघून जातो. पण आश्चर्य असं, की हाच माणूस पुन्हा पंधरा-वीस मिनिटांनी दिसतो, पण विरुध्द दिशेने येताना. पुन्हा नमस्कार. कधी हा स्टेशनच्या पुलावर दिसतो, कधी पायऱ्यांवर उभा असतो. कधी हा टॅक्सीत दिसतो. अंतरा-अंतराने आणि पुन्हा पुन्हा हाच माणूस वेगवेगळ्या ठिकाणी दिसणं कसं शक्य आहे? पण हा दिसतो, इतकं मात्र खरं! आणि ताईवर कोणी विेशास ठेवायला तयार नाहीत. म्हणतात कसे, की तुला भास होत असावेत. चल, दवाखान्यात चल! हा काही तरी मानसिक रोग आहे! आता सांगा बरं, मी वेडी वाटते का तुम्हांला?... सुनंदाताईचा प्रश्नं. ‘हा दिसतो कसा?’ समशेरने विचारलं. ‘अंऽ, हॅट घालतो.लांब कोट घालतो. लांब मिशा आहेत!.. मग पुन्हा आणि पुन्हा-पुन्हा दिसतो!’ ‘हं! त्याला कळतं कसं, तू कुठे बसली आहेस, ते?’ ‘माहीत नाही!... पण नेमका दिसतो, हसतो... नमस्कार करतो! त्रास देत नाही, पण मग भिती वाटते!’ ‘बरं! आम्ही बघतो काय करायचं ते!’ ‘म्हणजे?’ ‘कळेलच!’ आणि समशेरने ती चर्चा तिथे थांबवली. काय करणार होता तो?

4 : पाठलाग!

संध्याकाळ! समशेर आणि मित्र खोलीत हळूहळू बोलत बसले होते. ‘तू नक्की काय केलंस शेरलॉक?’ ‘मी पहिल्यांदा तर्कशुध्द विचार केला.’ ‘झालं का तुझं सुरू, तर्कशुद्ध!!’ ‘एऽ तू थांब रे!.. तू पुढे बोल शेरलॉक होम्स.’ ‘तर, मी असा विचार केला की मी जर प्रवास करत असेन, तर दररोज एकच माणूस मला थोड्या थोड्या वेळाने पुन्हा पुन्हा दिसणं शक्य आहे का? त्यातून, वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या  दिशेला?... तर यात काही तरी रहस्य आहे.’ ‘मग?’ ‘मग मी पाठलाग करायचं ठरवलं!’ ‘पाठलाग! ‘कुणाचा!’ ‘सुनंदाताईचा!... मी थोडं वेषांतरसुध्दा केलं! आणि दुर्बिण माझ्याजवळ असतेच, माहीत आहे तुम्हांला!’ ‘होऽ! मग पुढे?’ ‘ताई पाहत होती त्या दिशेने, खिडकीतून मी पाहिलं दुर्बिणीतून!... मला तो दिसला, मिशीवाला माणूस!... त्याने उजव्या हाताने हॅट वर उचलली आणि हसून ताईला अभिवादन केलं!... लगेच गाडी सुरू झाली.’ ‘मग?’ ‘पुढच्या दोन स्टेशननंतर पुन्हा तो दिसला!... तसंच अभिवादन केलं त्यानं, पण डाव्या हाताने!... आणि नंतर तो मला प्रत्येक वेळेस दिसला! ताई स्टेशनवर उतरून बाहेर आली तेव्हाही तो दूर टॅक्सीतून जाताना दिसला!’ ‘म्हणजे?’ ‘म्हणजे अर्थ सरळ आहे!.. ताई खरं बोलते आहे!’ ‘मग आता रे?’ ‘आता काय?... पाठलाग करायचा पुन्हा!’ समशेरने हसून म्हटलं. आणि तो सगळ्या टीमला आपला बेत सांगू लागला!

5 : पुन्हा पाठलाग!

पण पाठलाग सुनंदाताईचा करायचा नव्हता, त्या रहस्यमय मिशीवाल्या माणसाचा करायचा होता, आणि हे काम अवघड होतं. जोखमीचंही होतं. लोकल ट्रेनच्या खिडकीतून दुर्बिणीतून समशेर पाहत राहिला आणि गाडी थांबताच इतरांबरोबर तोही उतरला. त्याचे मित्रही उतरले. हरी आणि ‘शक्तिमान’ अंतराने चालू लागले. ‘दिसला?’ ‘हं!’ ‘लवकर चला!’ ब्रिज चढून घाईने समशेरने त्या माणसाला गाठलं. गाडी सुटली. त्या माणसाने पुन्हा डाव्या हाताने हॅट काढून अभिवादन केलं. थोडं हसत तो चालू लागला सावकाश. आणि मागोाग हे तिघे चालत राहिले, नजर ठेवून. तो माणूस जिना उतरून स्टेशनच्या बाहेर पडला. हळूहळू समोरच्या वखारीच्या गल्लीत गेला आणि एकदम एका वखारीत शिरला. ‘जायचं?’  ‘हो!... सावकाश चला!’ समशेर आणि मित्रं मागोाग आत शिरले. आत लाकडाचे तुकडे, फळ्या आणि भुसा पसरला होता. अंधारही होता. लाकूड कापण्याचे आणि काहीतरी ठोकण्याचे आवाज येत होते सगळीकडे. मुलं थोडं बिचकली, पण समशेर आणि हरी आणि ‘शक्तिमान’ यांनी हळूहळू पुढे जायला सुरुवात केली. ‘त्या खोलीत चाललाय तो!’ ‘कोण असेल हा माणूस, शेरलॉक?’ ‘श्शूऽऽ?’

6 : अरेच्चा!

लांब मिशीवाला माणूस रमतगमतच चालला होता. तो एका खोलीत गेला अणि समशेर घुटमळला. ‘जायचं?’ ‘नाही... या शेजारच्या खोलीतून पाहू, काय दिसतंय का!’ शेजारी एक वखारच होती मोठी. खूप लाकडं, आणि भुसा आणि फळ्या पडलेल्या. अंधारही थोडासा. तिघं त्या वखारीत गेली. तिथं एक छोटी काचेची खिडकी होती. ‘तिथून बघू या!’ तिघांची छाती धडधडू लागली. कुजबुजत त्यांनी काचेला नाक लावलं. ‘काय दिसतंय?’ ‘श्शू!’ ‘आरसा आहे! त्यात बघतोय वाटतं!’ तो माणूस मुलांकडे पाठ करून खुर्चीवर बसला. त्याने स्वत:ला आरशात पाहिलं. मग त्याने त्याची हॅट काढून ठेवली. आणि मग अचानक त्याने त्याची लांब मिशी ओढून काढली. नकलीच होती ती. हरी दचकला. म्हणाला, ‘अरेच्चा!, थोडं मोठ्यानेच. त्या माणसाने कदाचित ऐकलं असावं. अचानक तो ताठ बसला आणि मग घाईने उठूनच गेला. आता?

7 : अडकले!

‘चला, इथून बाहेर पडू!’ समशेरने म्हटलं, आणि तो आणि त्याचे मित्र त्वरेने दाराकडे धावले. पण थांबा! आधीच कोणीतरी होतं बाहेर. कोणीतरी धाडकन दरवाजा लावून बाहेरून कडीसुद्धा घालून टाकली. पाठोपाठ शब्द ऐकू आले, ‘लई हुशारी दाखवता व्हय रेऽऽ?... बसा आता आतच!’ तीनही मुलांना धक्का बसला. ते खिळल्यासारखे झाले. ‘अडकलो आपण!’ समशेरने म्हटलं. ‘हे माझ्यामुळे झालं ना?... मीच ओरडलो अरेच्चा म्हणून!’ हरी रडवेला झाला. ‘नाही!... त्यांनी लक्ष ठेवलं असणार!... पण तो आवाज मला ओळखीचा वाटतोय!’ ‘मग रे, आता शेरलॉक?’ तीनही मुलं आता अडकून पडली त्या अनोळखी वखारीत. समशेर मात्र विचारमग्न झाला. ‘काहीतरी उलगडा होतोय मला! थोडं थोडं समजतंय!’ त्याने म्हटलं. हरी आणि ‘ शक्तिमान’ आजूबाजूला पाहू लागले. घाबरून गेले. मुलं अडकली होती!

8 : सुटका!

‘आपण सुटका करून घेतली पाहिजे लवकर! आपल्याला संशय आलाय हे त्यांना कळलं आहे!’ ‘त्यांना? कोणाला?’ ‘तुमच्याकडे सामान काय काय आहे, दाखवा!’ समशेर हूकुम देऊ लागला भराभर. हरी आणि ‘शक्तिमान’ने खिशातलं सामान दाखवलं. दोरी, छोटा चाकू, चॉकलेट, पेन्सील आणि छोटी डायरी. समशेरने आपली खांद्यावरची पिशवी रिकामी केली. दुर्बीण, मावसभावाकडून हट्टाने मागून घेतलेला हरकाम्या स्वीस चाकू. दोरी. बहीर्गोल भिंग. काही छोटी छोटी हत्यारं. पेन. डायरी. ‘आता काय करायचं?’ ‘वाजले किती!’ ‘बहुतेक साडेअकरा...’ समशेरने आसपास पाहिलं. छतातून प्रखर उन्हाची तिरीप आत आली होती. ‘जुने कागद आणि भुसा एकत्र करा! लवकरऽ!’ आणि ते तिघे रद्दी कागद आणि ढलप्या आणि लाकडी भुसा एकत्र करू लागले. समशेरने बहिर्गोल भिंगातून प्रखर उन्हाची तिरीप त्या कागदावर केंद्रित केली. त्याने म्हटलं, ‘भिंगातून सूर्याची उष्णता एकत्रित करता येते! त्यामुळे कागद जळू लागतो हे आपल्याला माहीत आहेच!... वखारीत आग लागलेली त्यांना परवडणार नाही!’ थोड्याच वेळात धूर होऊ लागला व जुन्या वर्तानपत्राचा कागद भुरभूर जळू लागला. ‘त्यावर भुसा आणि लाकडाच्या ढलप्या टाका.’ हरीने जुनं लाकडी सामानसुद्धा टाकलं. ‘शक्तिमान’ने खुर्चीचा हातच शक्तीने तोडला आणि आगीत टाकला. ‘धूर होऊ द्या!’ धूर दिसायला लागला. त्यांनी एक आगीचा ढीग दाराच्या जवळच केला. आणि मग वरची खिडकीची काच फोडली. त्यांनी ओरडायला सुरुवात केली, ‘आऽग, आऽऽग आऽऽऽग!’ खरंच ज्वाळा वाढत राहिल्या आणि लाकडी तुकडे भरभर जळत राहिले. धुराचा लोट खिडकीतून बाहेर चालला. लगेचच धावाधाव सुरू झाली. खूप पावलांचे आवाज. कोणीतरी घाईघाईने दार उघडलं. पाच सहा जण आगीकडे धावले. धुराच्या लोटाआड तीन मुलांच्या लहान आकृत्या बाहेर धावत निघून गेल्या हे कुणाच्या लक्षात आलं नाही. चलाऽ! सुटका तर झाली!

9 : आश्चर्याचा धक्का!...

दोन, चार की सहा? संध्याकाळ! सुनंदाताई खुर्चीवर बसली होती. समोर काका होते. डॉक्टर होते. आणखी घरातले दोघंतिघं. मुलं मात्र कुठेच दिसत नव्हती. काका म्हणत होते, ‘बाळाऽ!... चल दवाखान्यात!... तुला भास होतायत!... उपचार केले पाहिजेत!’ ‘पण काका!... मला तो लांब मिशीवाला माणूस खरंच दिसतो!... मला भास होत नाहीत!’ त्यावर काका तिला समजावत राहिले आणि डॉक्टर तर तिला जवळजवळ घेऊन जाण्याच्याच तयारीला लागले. तेवढयात पिंकीने येऊन काकांना काहीतरी सांगितलं. ‘कोण आहे! आता मी कामात आहे म्हणावंऽ!’ पण पिंकीने पुन्हा काहीतरी कानात सांगितलं. तसं काका चमकले. घाईघाईने बाहेरच्या दाराजवळ आले. अंधार पडायला लागला होता. नीट दिसत नव्हतं. काकांनी पाहिलं तर, लांब मिशावाली दोन माणसं ! हॅट घातलेली. लांब कोट घातलेली. त्या माणसांनी लगेच काकांना अभिवादन केलं.

एकाने डाव्या हाताने हॅट उचलली. एकाने उजव्या हाताने. पण ते न बोलता उभे राहिले. काका घाईने, गडबडीने बोलू लागले, ‘अरे अरेऽ! काय हे? इथं कशाला आलात?... ते ही एकदम दोघं? जाऽ जा लवकर!... जा म्हणतो ना? पैसे उद्या देईन मी!... जाऽ! इथं येऊ नका, असं बजावलं होतं ना मी?... तरीही आलात? मूर्खांनो!... जाऽ... जा... ताबडतोब!’ त्यांचं ते दबक्या आवाजातलं रागावणं ऐकून  सुनंदाताई बाहेर आली. आणि तिला धक्काच बसला. ती आश्चर्याने पाहत राहिली. ‘अगं बाई! हे काय?... मला तर एकच माणूस पुन्हापुन्हा दिसत होता!... पण हे तर दोघे आहेत! हा काय प्रकार आहे?’ पण आता आश्चर्याने ओरडायची काकांची पाळी होती, कारण अंधारातून आणखी दोन लांब मिशीवाले पुढे आले. तसेच दिसणारे. हॅट घातलेले आणि लांब कोट घातलेले. पण ते घाबरले असावेत. ते सारखा सलाम करीत होते. एक डाव्या हाताने, एक उजव्या हाताने. आणि त्यांच्या मागे कोण होता?... होऽ, त्यांच्या मागे आपला शेरलॉक होम्स म्हणजे समशेर उभा होता, हसत. आणि हरी पण होता. शक्तिमान पण होता आणि दोन पोलीस पण होते. त्या सगळ्यांनी हॅट घातल्या होत्या. लांब कोट घातले होते आणि खोट्या लांब मिशापण लावल्या होत्या. किती झाले एकूण? दोन, चार की सहा? ‘हे... हे... कोण आता?... आणि तुम्ही कोण?’ काकांनी विचारलं. त्यावर आधीच्या दोघांनी मिशा काढून टाकल्या. ‘मी शेरलॉक होम्स ऊर्फ समशेर कुलुपघरेचा मावसभाऊ सबइन्स्पेक्टर नंदकुमार!’ दुसऱ्याने पोलीसी थाटात सॅल्यूट केला, म्हटलं, ‘हेडकॉन्स्टेबल जाधव रिपोर्टींग सर!’ समशेर आता एकदम पुढे आला आणि नाटकी  आविर्भावाने एखाद्या जादुगाराने बोट दाखवावं तशा पद्धतीने म्हणाला, ‘मी आता या मिशा काढून टाकतो! आणि इकडे पहा. हे तुमचे ड्रायव्हर रामलाल! आणि हा तुमच्या वखारीतला नोकर बबन! त्यांनी सगळं कबूल केलं आहे! चांगली अफलातून भन्नाट आयडिया होती तुमची काका!... पण जऽरा गडबड झाली.’

सबइन्स्पेक्टर नंदकुमारने त्या दोन लांब मिशीवाल्या माणसांना घरात ढकललं आणि अधिकारवाणीने कडक शब्दांत म्हटलं, ‘चलाऽ काकासाहेब! बोलू आपण आतमध्ये!... बराच खुलासा तुमच्याकडून हवा आहे.’ नंतर नंदकुमारने काकासाहेबांनासुद्धा घरामध्ये ढकललं. आता, त्या मोठ्यांच्या जगात कायकाय चर्चा सुरू झाली, याची माहिती आपण कशाला घ्यायची? नाही तरी त्यात आपल्याला काही रस नाही. जाऊ द्याऽ प्रॅापर्टी, मृत्यूपत्र, सुनंदाताईला वेडं ठरविल्याने काकांना मिळणारा प्रॉपर्टीचा हिस्सा, हव्यास आणि लोभ, एक ना दोन! असंख्य वेडेपणाच्या गोष्टी या मोठ्यांच्या जगात खच्चून भरलेल्या असतात. त्यापेक्षा आपण सुनंदाताईच्या खोलीत जाऊ या, कारण समशेर तिथं आपली हकीकत सांगतो आहे, मुलं आणि सुनंदाताई एकाग्रतेने ऐकताहेत. आपणही ऐकू या, चलाऽ.

10 : खुलासा!

‘तर मी तर्कशुद्ध विचार केला!’ ‘झालं का सुरू तुझं तर्कशुद्ध’ ‘श्शू! गप्प रे, त्याला सांगू दे! तू सांग शेरलॉक...’ शेरलॉक, म्हणजे आपला समशेर सांगत राहिला. ‘एकच माणूस वेगवेगळ्या ठिकाणी थोड्याच वेळेच्या अंतराने पुन्हापुन्हा कसा दिसेल? मला शंका होतीच.’ समशेरने नंतर पहिल्या पाठलागाची हकीकत सविस्तर सांगितली आणि मग म्हटलं, ‘दोन चित्रांतला’फरक शोधतो ना आपण कोड्यातल्या? तसंच होतं हे! दुर्बिणीतून पाहिलं तर दुसऱ्याचा कोट पहिल्यापेक्षा वेगळ्या रंगाचा होता... झालंच तर हॅटवर वेगळं चिन्ह होतं आणि एक माणूस डावखोरा होता तर दुसरा उजोरा! तेव्हा लक्षात आलं की ही दोन वेगवेगळी माणसं आहेत.’ ‘आगं बाई! मग?’ समशेरने दुसऱ्या पाठलागाबाबत पुन्हा सविस्तर सांगितलं. ‘तर त्या वखारीतून सुटका झाली आणि आम्ही धूम ठोकली. लगेचच नंदू भैयाला फोन केला... आम्हाला कोंडणारा माणूस ड्रायव्हर रामलालच होता!.. त्याचा आवाज नंतर मी ओळखला!’ ‘मग?’ ‘पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं. आणि नंदूने थोडी वेषांतराची गंमत केली. आम्हांला पण बनवलं लांब मिशीवाला माणूस! काकांची किती भंबेरी उडाली पाहिलंस ना त्यामुळे?’ सुनंदाताईला खूप आनंद झाला. तिने कृतज्ञतेने समशेरचा हात दाबला. मुलं भोवताली उभी राहून आनंदाने आणि भारावून, थरारून ऐकताहेत. लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य उलगडलं आहे आणि ते उलगडलं आहे आपल्या समशेरने. मित्रांनो! समशेर कुलुपघरेची ही साहसकथा मी संक्षेपाने ऐकवली तुम्हांला!... आता त्याला नेहमी भेटायला आवडेल, हो ना? त्याचा पत्ता? पाववाली गल्ली, काय म्हणता? बेकर स्ट्रीट? मला माहीत नाही!

Tags: bal katha katha bharat sasane Lamb mishivalya mansanchi rahasya बालकथा कथा भारत सासणे लांब मिशीवाल्या माणसाचं रहस्य weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भारत सासणे,  पुणे
bjsasane@yahoo.co.in

मागील चार दशके भारत सासणे हे मराठीतील आघाडीचे साहित्यिक मानले जात असून, त्यात कथा, दीर्घकथा, कादंबरी, नाटक, बालसाहित्य, अनुवाद इत्यादी प्रकारचे लेखन आहे.


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके