डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

अध्यक्षपदी विराजमान झालेले लाला हरद्वारी लाल आपल्या चेहऱ्यावर स्मित ओढून सर्वत्र नजर टाकत होते. सभामंडप खच्चून भरला होता. अशात कुठून कुणास ठाऊक, पण एम.डी. तिथं एखाद्या सैतानासारखा उगवला. सभामंडपाच्या मधोमध हातातली काठी वर-खाली हलवीत त्यानं तिथंच भाषण द्यायला प्रारंभ केला. त्याच्या भाषणानं एकच हलकल्लोळ मजला. वीस-पंचवीस तरुणांच्या मस्तकात संताप खदखदू लागला. ‘‘साल्या या एम.डी.च्या बच्च्याचं डोकं ठिकाणावर आणलं नाही तर बघाच आता...’’ म्हणत आपल्या अस्तिनी वर करीत ते सगळे सभामंडपाबाहेर आले. त्यांना उद्देशून तो म्हणाला, ‘‘किती मूर्ख आहात तुम्ही सगळेऽ तुमचंच रक्त पिऊन हा लाला तुम्हाला आता पाणपोईतलं पाणी पाजणार आहे तर. तुमचे डोळे उघडा साल्यांनोऽ डोळे उघडा. तुमच्या हिश्शाचं अन्नधान्य, कपडे लुबाडून गरिबांना दुलया वाटत फिरतो, आणि तुम्ही मात्र-’’

अलीकडे उमेशला त्याच्या गावाची आठवण अधिक तीव्रतेने येऊ लागली होती. त्याआधी दहा-पंधरा वर्षांत अशीच कधी आठवण यायची, तेव्हा त्याच्या डोळ्यात त्या आठवणींनी आसवं तराळून यायची. पण आता घरात येणारं वर्तमानपत्र उघडलं की मोलाड दासचा आवाज जणू त्याच्या कानांत घुमत असायचा... ‘खा प्या ऽऽ मजा करा... खा प्याऽऽ मजा करा...’ आणि त्यापाठोपाठ त्याचा हसरा चेहरा तासन्‌तास उमेशच्या डोळ्यांसमोर नाचत असायचा.

आपल्या गावाचे बारा दरवाजे, दहा तलाव, आठ विहिरी, अठरा धर्मशाळा आणि चाळीस देवळे या सगळ्यांपेक्षाही अधिक लोभसवाणी होती ती मोलाड दास ऊर्फ एम.डी. ही वर्ली. नीटनेटका पांढरा स्वच्छ पायजमा-कुर्ता, डोक्यावर फेल्ट हॅट, हातात लांब सडसडीत अशी काठी, पायांत नव्या पध्दतीचे बालुजा बूट आणि बोटात सतत जळती सिगारेट- असा वेश केवळ त्यालाच शोभत होता. उन्हां-पावसात, थंडी-वाऱ्यात, रात्री-अपरात्री अख्खा दिवस दिवस तो रस्त्याने भटकत असायचा. चौकाचौकात त्याला अशा वेशात भाषणबाजी करताना पाहून रस्त्याने जाणारे-येणारे त्याला वेडा ठरवून आपल्या रस्त्याने निघून जायचे. पण मोलाड दास ऊर्फ एम.डी.ला त्यांच्याशी काही देणं-घेणं नसायचं. अशा गोष्टींचा त्याच्यावर कुठलाही परिणाम कधी होत नव्हता. तो एका चौकातून दुसऱ्या चौकापर्यंत चालत जाताना ‘खा प्याऽऽ मजा करा... खा प्याऽऽ मजा करा...’ हे आपलं एक घोषवाक्य मोठमोठ्या आवाजात ओरडत बेफिकीरपणे उच्चारात जायचा.

आज दररोज शेकडो माणसं मारली जात आहेत. धार्मिक उन्माद सर्वत्र उसळला आहे. प्रत्येक दिवस जात, धर्म, भाऊबंदकी, भाषा, प्रांत या सगळ्यांना मूठमाती देणारा, त्यांना तडे देणारा असा उजाडत आहे. प्रत्येकाच्या मनात परस्परांविषयीची वैमनस्याची, घृणेची, तिरस्काराची भावना उफाळून वर येत आहे... हे तर त्यानं खूप आधीच सांगून ठेवलं होतं.

...उमेश तेव्हा कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असावा. शाळेत जातानापासून त्यानं मोलाड दासला असं भटकताना पाहिलं होतं. तेव्हा त्यानंही त्याला वेडा म्हणून इतरांसारखं छळलं होतं. तेव्हा तो त्याला खरंच ओळखू शकला नव्हता. कॉलेजसमोरच सार्वजनिक उद्यान होतं. तिथं मुलं दिवसभर पडलेली असायची. तिथे जवळपासच भेळपुरीवाले, चहा, पान, सिगारेट, कचोरी, भजी, सामोसे असं सगळं मिळायचं. त्यामुळं हवं तेव्हा हवं ते खाऊन-पिऊन तिथल्याच सिमेंटच्या बाकड्यांवर बसून गप्पा मारत अनेक मुलं आपला दिवस घालवायची. उद्यानाच्या मधोमध महात्मा गांधींचा पुतळा होता. कधी तरी कुठे तरी जाताना या ठिकाणी महात्मा गांधींनी पाच मिनिटं आपली पाठ टेकवली होती. तेव्हा त्यांची ती अविस्मरणीय आठवण म्हणून इथल्या मंडळींनी या उद्यानात त्यांचा पुतळा बसवला होता. त्या पुतळ्याच्या बाजूलाच एक सार्वजनिक वाचनालयही होतं.

मोलाड दास ऊर्फ एम.डी. सकाळी-सकाळी आपल्या समाजकार्यासाठी घराबाहेर पडलेला असायचा. मुख्य बाजारातल्या चौकाचौकात आपली भाषणबाजी करीत साडेबारा ते एक यादरम्यान उद्यानात पोहोचायचा. उद्यानात त्याला बापूंच्या पुतळ्याशिवाय अन्यत्र कुठे बसलेला कधीही कुणी पाहिलं नसावं. तो तिथल्या बापूंच्या चरणांजवळ आडवा होत असे. आपली फेल्ट हॅट तोंडावर ठेवून अर्धा-पाऊण तास छान विश्रांती घ्यायचा. इथं मात्र त्याची अधिक बडदास्त ठेवली जायची. उद्यानात आलेली मुलं त्याच्या अवतीभवती बसून त्याच्यासाठी चहा मागवायची. एम.डी. कुणाला काही मागत नसायचा. मात्र त्याचे शागीर्द बनून सगळे त्यांची सेवा करायचे.
त्यांच्यातल्याच एका मुलाने त्याची खोड काढण्याच्या इराद्याने विचारलं,

‘‘एम.डी., लोक तुम्हाला वेडा का समजतात?’’ त्यावर सिगारेटचा धूर हवेत सोडत त्यानं सांगितलं, ‘‘फूल्स ऑफ टूडे आर दि वाईज मॅन टुमॉरो.’’

त्याचं उत्तर ऐकून आम्ही सगळी मुलं अवाक्‌ झालो. तो इंग्रजीही छान बोलत होता.

तो हे तेव्हा असं अंतिम सत्य सांगत होता. त्यानं तेव्हा सांगितलेलं ते शहाणपण आज खरं ठरलं होतं. त्याचा अनुभव आज येत होता.

‘‘मुलांनो ऐका-’’ त्यानं आपली फेल्ट हॅट डोक्यावर चढवली. हातातली काठी जमिनीवर तोलून धरली. एक हात मागे नेत त्याने आपल्या कमरेला झटका दिला, भाषण सुरू करायच्या आधीच्या या त्याच्या लकबी होत्या. मग तो बोलायला लागला, ‘‘तुमचं हे जे शिकणं बिकणं आहे नाऽ ते अगदीच कचरा आहे कचरा. ही असली पदवी घेऊन बाहेर पडलात ना, तर कुणी दोन पैशांचीही किंमत देणार नाही. सगळीकडे वशिले चालतात, घुसखोरी चालते. साले जेवढे चांगले हलवाई होते ते साहेब झाले आणि साहेब होण्याची लायकी असणारे हलवाई बनले. साले हरामखोर आहेत सगळेच!’’

आता त्याच्या शिव्या देणं सुरू झालं होतं. तो असा शिव्या द्यायला लागला की कुठल्या थराला जाईल, ते सांगता येत नव्हतंच. त्याचं असं शिवराळ बोलणं सोडलं तर तो अधिक सभ्य आणि विचारी माणूस वाटत होता.

‘‘पुढं-पुढं तर सर्वत्र असा रक्तपात होईल, सगळंच विपरीत घडेल. बापाच्या खांद्यावर मुलगा स्मशानात जाईल, भाऊ भावाच्या जीवावर उठेल. सासरा जावयाचा खून करील. एवढंच नाही, तुमच्या या कॉलेजात बॉम्बस्फोट होईल. पोलिसांचा लाठीमार होईल. पोरं मास्तरला ठोकून काढतील आणि मास्तरही तुमच्या मायला... सालं, तुम्हाला हे कळतंच नाही कधी... तुम्ही म्हणजे...’’ त्याच्या या बोलण्यावर आम्ही पोट धरून हसायचो. आम्हाला ते सगळं बकवास वाटायचं. पण कधी तरी कॉलेजच्या भिंतींनी त्याचं हे बोलणं ऐकलं होतं. आणि मधल्या काळात कॉलेजात अशाच अनेक घटना घडल्या होत्या.

मी कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होतो, तेव्हा उडत-उडत कानांवर आलं- सरकारनं या उद्यानाच्या जागेवर एक सुसज्ज हॉटेल उभारायचा निर्णय घेतला होता. तिथल्या जागेची पाहणी, मोजमापही झालं होतं. आता फक्त उद्यान साफ करून तिथं बांधकाम करायचंच शिल्लक होतं.

एक दिवस मी एम.डी.ला विचारलं, ‘‘एम.डी. इथलं हे उद्यान हटवलं, हा पुतळा हटवला, तर तू कुठे बसशील?’’

‘‘का? हे सगळं जमिनीच्या पोटात गडप होईल की काय?’’

‘‘तसं नाही. सरकार इथं मोठं, सुसज्ज हॉटेल उभं करणार आहे म्हणे.’’

‘‘हॉटेल? सुसज्ज हॉटेल?’’ आणि त्यावर स्फोट व्हावा असा तो मोठ्याने हसला. त्याचं असं हसणं पाहून क्षणभर आम्ही सगळे त्याच्याकडे अचंब्याने पाहू लागलो आणि मग त्याच्या हसण्यात सामील झालो. तो खदाखदा हसल्यानंतर म्हणाला, ‘‘तुमचे सरकार म्हणजे डुकराची औलाद आहे. माणसं कुठे राहतात, ते त्यांना ठाऊक नाही का? माणसं हॉटेलात नाही राहत; तर ती रस्त्यावर राहतात, झोपड्यांत राहतात, तुटक्या-पडक्या घरात राहतात. येणारी-जाणारी-माणसं मंदिरात, धर्मशाळेत झोपतात.’’ बोलता-बोलता त्याचे डोळे अचानक लालेलाल झाले. नाकपुड्या मोठ्या झाल्या. मग आम्हाला उद्देशून तो म्हणाला, ‘‘हरामखोरांनोऽऽ तुम्ही स्वत:ला तरुण समजताय ना? मग या गुंडगिरीला तुम्हाला रोखता येत नाही? जनतेला पैसा घेऊन खायच्या बदमाशा आहेत या सगळ्या. आपल्या चैनीसाठी हे सगळे करायचं आहे त्या चोरांना. काही कराऽ ओरडाऽ नारे द्याऽऽ’’ आणि मग तो जणू शांत होत संथ स्वरात बोलू लागला.

त्याचं खालच्या पट्टीतलंही बोलणं आता स्पष्ट ऐकू येत होतं : ‘‘अरेऽ तुम्ही तरी काय करणार? तुमच्या बापजाद्यांनीसुध्दा काहीच केलं नाही. मी त्यांनाही सगळे सांगत होतो. तेसुध्दा हां-हूं हां-हूं करीत शेवटी मरून गेले, तुम्हीही असेच मराल भडव्यांनो. निघा इथून... अरे, निघा इथून, ऐकायला येत नाही का...? हिजड्यांची औलाद सालीऽऽ’’
एम.डी. मुलांवर रागावल्याचा हा पहिला आणि कदाचित शेवटचा प्रसंग असावा; पण त्यानंतर मात्र त्याची दिनचर्याच पार बदलून गेली. त्यानं बाजारात बोलणं, भाषणबाजी करणं कायमचं बंद केलं. सकाळपासून तो बापूंच्या मूर्तीच्या पायथ्याशी बसून दिवसभर दूर कुठे तरी शून्यात पाहत असायचा. मुलं त्याच्या अवतीभवती असायची. पण तो त्यांच्याशीही काही बोलत नसायचा.

कधी कधी मुलं त्याला अधिकच छळू लागली की, तो तिथून उठून वाचनालयात जाऊन बसायचा.

आणि एक दिवस ठेकेदारानं उद्यानाच्या जागेचा ताबा घेतला, चारी बाजूंच्या भिंती भुईसपाट केल्या आणि वाचनालयाची इमारत पाडण्याच्या इराद्याने त्याने त्या भिंतीवर पहिला हातोडा मारला तेव्हा एम.डी. बेंबीच्या देठापासून चीत्कारला- ‘‘थांबाऽऽ अरे, पाडायचंच आहे तर देऊळ पाडा, मशीद पाडा. या गावातली ही एवढीच तर जागा आहे, इथं माणूस माणसासारखं वागायचं शिकतो. हे वाचनालयच इथे राहिलं नाही तर सगळेच गाढव राहतील, बिनशेपटीचे पशू... थांबाऽऽ’’ 

पण त्याचा आवाज भिंतीवर आदळणाऱ्या अवजारांच्या माऱ्याच्या आवाजात कुठल्या कुठे विरून गेला. मग दुसऱ्या दिवशी बापूंचा पुतळा तिथून हटवायला लागले तेव्हा कुणास ठाऊक कसा, पण एम.डी. तीरासारखा धावत तिथं आला आणि बापूंच्या पुतळ्याला कवटाळून बडबडू लागला,

‘‘नाहीऽ मी आता मेलो तरी इथून बाजूला हटणार नाही. तुम्ही निघा इथून हरामखोरांनो... तुमचा सत्यानाश होईल. मरतेवेळी तुमच्या तोंडात पाणी टाकायलाही कुणी मागे राहणार नाही.’’

तो बापूंच्या पुतळ्याला घट्ट बिलगून रडत होता, मजूर तसेच हातात आपली अवजारं घेऊन जागेवरच उभे होते. ठेकेदार ओरडला, ‘‘त्याला उचलून फेका तिथून, वेडा आहे तो सालाऽ’’

‘‘नाही मालक,’’ त्यातला एक मजूर म्हणाला,  ‘‘मोलाड शाप देतो. त्याने असा शाप दिला, तर सगळं जाळून भस्म होईल. आपण सगळे मुलं-बाळंवाले आहोत.’’

त्यावर ठेकेदारही घामाघूम झाला. त्यानेही मोलाडच्या शापवाणीविषयी ऐकलं होतं. 

‘‘आता काय करायचं मग?’’ ठेकेदाराचीही मोठी पंचाईत झाली होती.

‘‘मालक, तुम्हाला जसं वाटतं तसं करा. आम्ही तर याला हात लावू शकत नाही. तुम्ही पोलिसांना बोलवा. तोच एक इलाज आहे यावर.’’

ठेकेदारालाही त्यांचं बोलणं पटलं असावं.

- आणि मग अख्खा पोलिसांचा ताफा आला. दोन पोलीस इन्स्पेक्टर आणि डझनभर पोलिसांनी तिथून एम.डी.ला ओढत बाजूला केलं आणि त्याचे केस हिसडत चांगली पिटाई केली. रक्तबंबाळ झालेला एम.डी. पोलिसांवर उसळला, तेव्हा त्याला नाइलाजाने ट्रकमध्ये टाकावं लागलं. तरीही तो ओरडतच होता. शिव्याशाप देत होता... ‘‘तुमच्या तोंडात मरतेवेळी पाणी टाकणारं कोणी उरणार नाही... तुमच्या मायची... तुमच्या बहिणीची...’’

अशा रीतीने वाचनालय, उद्यान आणि गांधीजींचा पुतळा या सगळ्या गोष्टी जमीनदोस्त झाल्या. यादरम्यान बरेच दिवस एम.डी. कुणाच्याही दृष्टीस पडला नाही. आता तर आमचीही भेटण्याची जागा नामशेष झाली होती, उद्यानाच्या चहूभोवती उभारलेल्या भिंतींवर काटेरी तारेचं कुंपण टाकण्याचे काम वेगानं सुरू होतं. कधी चुकूनमाकून एम.डी. एखाद्या रस्त्यावरून कुणाला फिरताना दिसायचा. आपल्या तोंडचं तेच पालुपद म्हणत- ‘‘मारून जाल एक दिवस. खा प्या... खा प्या...’’

त्या दिवशी सेवासमितीचा वार्षिक महोत्सव होता. ही संस्था गावातली सगळ्यात जुनी अशी संस्था होती. सगळे व्यापारी, दुकानदार या संस्थेचे सदस्य होते. लग्नसमारंभात भांडीकुंडी, पडदे वाटण्यापासून तर थंडीच्या दिवसांत गोरगरिबांना शाली-ब्लँकेट्‌सचे वाटप करण्याचे सेवाभावी काम ही संस्था करायची. त्या दिवसांमध्ये एका नव्या पाणपोईचं उद्‌घाटन आणि लग्नांमध्ये हुंडाविरोधी संकल्प यासंबंधीचे कार्यक्रम घ्यायचे होते. गावातली सगळीच नामवंत मंडळी यासाठी कार्यक्रमस्थळी उपस्थित होती. उमेशसारखे शेकडो महाविद्यालयीन तरुणसुद्धा हजर होते. अध्यक्षपदी विराजमान झालेले लाला हरद्वारी लाल आपल्या चेहऱ्यावर स्मित ओढून सर्वत्र नजर टाकत होते. सभामंडप खच्चून भरला होता. अशात कुठून कुणास ठाऊक, पण एम.डी. तिथं एखाद्या सैतानासारखा उगवला. सभामंडपाच्या मधोमध हातातली काठी वर-खाली हलवीत त्यानं तिथंच भाषण द्यायला प्रारंभ केला. त्याच्या भाषणानं एकच हलकल्लोळ मजला. वीस-पंचवीस तरुणांच्या मस्तकात संताप खदखदू लागला. ‘‘साल्या या एम.डी.च्या बच्च्याचं डोकं ठिकाणावर आणलं नाही तर बघाच आता...’’ म्हणत आपल्या अस्तिनी वर करीत ते सगळे सभामंडपाबाहेर आले. त्यांना उद्देशून तो म्हणाला,

‘‘किती मूर्ख आहात तुम्ही सगळेऽ तुमचंच रक्त पिऊन हा लाला तुम्हाला आता पाणपोईतलं पाणी पाजणार आहे तर! तुमचे डोळे उघडा साल्यांनोऽ डोळे उघडा. तुमच्या हिश्शाचं अन्नधान्य, कपडे लुबाडून गरिबांना दुलया वाटत फिरतो, आणि तुम्ही मात्र-’’

आणि त्याच्याकडे पाहून एम.डी. छद्मीपणे हसला. त्याच्या या बोलण्याने मात्र सगळ्यांच्या मुठी रागाने आवळल्या गेल्या होत्या. मात्र त्याची तमा न बाळगता तो पुढे बोलू लागला 

‘‘-आणि हा पंसारीचा बच्चाऽ या टारगटांना हुंडा न घेण्याची शपथ द्यायला निघाला. तुम्हाला ठाऊक नाही, मागच्या वर्षी त्याच्या सुनेनं विहिरीत उडी मारून जीव दिला. ठाऊक आहे का?’’

त्यावर तिथं जमलेल्यांनी माना हलविल्या.

‘‘तिला मेलेल्या अवस्थेत मीच विहिरीतून बाहेर काढलं होतं ना? शहरातल्या अशा सगळ्या प्रेतांना बाहेर काढण्याचा ठेका फक्त मोलाड दासनेच घेतला आहे नाऽ अरे, तुम्हाला ठाऊक आहे काऽ? त्या बिचारीनं जीव देण्याआधी लिहिलेली चिट्ठी प्लॅस्टिकच्या लिफाप्यात घालून ती कपड्यांमध्ये दडवून ठेवली होती. पाच दिवस पाण्यात राहिल्यामुळे तिचं शरीर सडून, झाडून गेलं होतं. तिच्या अंगावरचे कपडेही मीच बदलले होते नाऽ ती चिट्ठी दिसताच त्याने ती माझ्या हातून झेपावून हिसकावून घेतली. मी पोलिसाला सांगितलं. पण माझे ऐकतं कोण? सगळ्यांच्या तोंडावर चांदीचा जोडा असा काही ठेवला होता की, सगळे चूप आणि आता हाच पंसारी तुम्हाला हुंडा घेऊ नका, म्हणून शपथ देणार? साला ढोंगी... चोर...खुनी..मादर...’’

त्याचे डोळे रागाने लालेलाल झाले होते. पाहता-पाहता सगळा नूरच बदलला. अख्खा सभामंडप काही वेळातच रिकामा झाला. जमलेल्या लोकांनी पाणपोईचं थंड पाणी प्यायचं तर सोडाच, पण त्या पाण्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. सगळे चुपचाप तिथून चालते झाले. एम.डी.सुद्धा शिव्यांची लाखोली वाहत तिथून कुठल्या तरी रस्त्याने निघून बेपत्ता झाला.

त्या दिवशी एम.डी.च्या बोलण्याची वेगळी जादू जनमानसावर प्रभाव टाकून गेल्याचा अनुभव अनेकांनी घेतला होता. समाजाचे कैवारी समजणाऱ्या लबाडांच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यानंतर खूप दिवस एम.डी. कुणाच्या दृष्टीस पडला नाही. कुणी तरी सांगत होतं, या समाजाच्या ठेकेदारांनी त्याची चांगली धुलाई केली. त्यामुळे किती तरी दिवस तो शाहच्या कबरीवर कण्हत पडून होता.

या दिवसांतच उमेशला गाव सोडावं लागलं. मग एक दिवस त्याच्या कानांवर बातमी आली. एम.डी.हे जग सोडून गेला म्हणून. आपल्या रक्ताचं माणूस सोडून जातं त्यापेक्षा एम.डी. गेल्याचं दुःख त्याला किती तरी अधिक झालं होतं, त्यानंतर तो कुणा गरिबाचं शोषण होताना किंवा त्याचा छळ होताना पाहायचा, तेव्हा त्याला हटकून एम.डी.ची आठवण यायची. आपल्या ओढाताणीच्या नाजूक दिवसांत त्याचे... ‘‘खा प्याऽ खा प्याऽ’’ हे शब्द त्याला नवी ऊर्जा, नवी आशा देत होते. पंधरा वर्षांनंतर उमेश गावी आला तेव्हा आपल्या गावाचा बदललेला नूर पाहून तोही अचंबित झाला होता. तेव्हाचं गाव आता बऱ्यापैकी शहरात बदललं होतं. उंच-उंच इमारती, मोठमोठे चकचकीत रस्ते.

‘‘ए बाबा ऐक जरा-’’ रिक्षावाल्याला उद्देशून तो म्हणाला, ‘‘हे बघ, दोन-तीन तास म्हण किंवा जास्त वेळ लागला तरी चालेल. पण मला तू शहरातल्या सगळ्या मुख्य रस्त्यांवरून फिरवून आण, मधे-मधे वाटलं तर चहापाणी घेऊ. तुझे जेवढे पैसे होतील तेवढे देईन, ती काळजी तू करू नकोस.’’

‘‘बरं साहेब-’’ म्हणत रिक्षावाल्यानं रिक्षा सुरू केली, मग विचारलं, ‘‘पहिल्यांदा येताय साहेब इथे?’’

‘‘नाही नाही, जन्माला तर इथेच आलो; पण आता खूप वर्षांनंतर येत आहे नाऽ’’

त्यावर रिक्षावाल्यांनं मगन वळवीत आश्चर्यानं त्याच्याकडे पाहिलं. 

‘‘तू कुठला राहणारा आहेस रे बाबा?’’ त्यानं रिक्षावाल्याला विचारलं.

‘‘बिहार... जिल्हा पाटणा.’’

उमेशचं मन जणू उदासवाणं झालं. आयुष्याचं कोडं त्याला आता अधिकच गुंतागुंतीचं वाटू लागलं. हा रिक्षावाला आपल्या पोटापाण्यासाठी आपलं गाव सोडून इथे आला आणि आपणही आपलं हे गाव सोडून पोटापाण्यासाठी बाहेर पडलो. त्या वरच्याच्या मनात नेमकं आहे तरी काय?... रिक्षा आपल्या वेगाने रस्त्यावरून धावत होती...

रस्त्याने रिक्षा धावताना मध्येच एके ठिकाणी रस्त्यावर बऱ्यापैकी माणसं जमा झाली होती. अंगात पायजमा कुर्ता, पायात बनारसी चपला आणि हातात लांब काठी अशा वेशातला एक मध्यम वयाचा इसम तिथं उभा राहून जोरजोरात काहीबाही बडबडत होता.

उमेशला तो एम.डी.च वाटला.

‘‘अरे बाबा, रिक्षा थांबव जरा-’’

‘‘कशाला वेळ घालवता साहेब? तो वेडपट आहे.’’

‘‘अरेऽ मी रिक्षा थांबव म्हणालो नाऽ’’

रिक्षावाल्यानं रिक्षा थांबवली तसा उमेश खाली उतरून त्या गर्दीत घुसला. त्या इसमाची चेहरेपट्टीच नाही तर बोलण्याची ढबसुद्धा अगदी एम.डी.सारखीच होती. तो सांगत होता- ‘‘या शहरात एवढी घाण झालेली आहे की, ती घाण निपटून काढणं अधिक कठीण झालं आहे. नळाचे पाणी सकाळचं रात्री आणि दिवसाचं अर्ध्या रात्री कधी तरी येतं. साखर, तेल, कणिक सगळंच बाजारातून गायब झालं आहे; पण त्यावर कुणाची बोलायची हिम्मत नाही. सगळे चूप आहेत. पण ते मोर्चे कशासाठी काढत आहेत? तर शहरात टेलिफोन सेंटर का सुरू झालं नाही? शहरात विमानतळ का सुरू होत नाही? साले गाढव आहेत सगळे! इथली घाण, पाणी, चोरी, बनवाबनवी यावर बोला. घोषणा द्या. ओरडा यासाठी. आणि यासाठी तुम्हाला जर कुणी नेता सापडत नसेल, तर तुम्ही मला नेता करा नाऽ’’

त्याच्या त्या बोलण्यावर तिथे जमा झालेले मोठ्याने हसले. उमेश मात्र न हसता त्याच्याकडे गंभीरपणे पाहत होता. मग तो काही न बोलता शांतपणे आपल्या रिक्षात जाऊन बसला.

‘‘तुम्ही तर एकदम शांत झाले साहेब? कुठल्या विचारात आहात साहेब?’’ रिक्षावाल्यानं त्याच्याकडे पाहत विचारलं. 

‘‘काही नाही रे बाबा...’’ मग थोडा वेळ स्तब्ध राहून तो म्हणाला- ‘‘बस, एकच गोष्ट जाणवली- सॉक्रेटिस कधी मरत नसतो.’’ उमेशच्या तोंडून नकळत निघून गेलं.

त्याचं ते वाक्य ऐकून रिक्षावालासुद्धा गंभीर झाला.

अनुवाद : रवींद्र शोभणे, नागपूर

माधव कौशिक हे हिंदीमधील नामवंत साहित्यिक  असून त्यांनी कविता, गझल, कथा व कादंबरी हे साहित्यप्रकार हाताळले आहेत. सध्या ते साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या निवडक 25 कथांचे अनुवाद मराठीतील नामवंत साहित्यिक रवींद्र शोभणे हे करीत असून, त्यातील काही कथा साधनातून पुढील काही महिन्यांत प्रसिद्ध होतील.
- संपादक

 

Tags: माधव कौशिक अनुवाद हिंदी कथा रवींद्र शोभणे मराठी साहित्य katha ravindra shobhane translation story madhav kaushik weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव कौशिक
k.madhav9@gmail.com

हिंदी साहित्यिक, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके