डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

स्वामीजींच्या या मूक प्रतिक्रियेचा परिणाम मात्र चांगलाच झाला. ते तिघेही सभ्य तरुण चुपचाप उठले आणि त्याच क्षणी आश्रमातून बाहेर पडले. आश्रमवासीयांनी त्यांच्या येण्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. सगळे काही अशा वेगाने आणि गुप्तपणे घडलं होतं की- त्या घडलेल्या प्रकाराचा ना कुणी साक्षीदार होता, ना त्याचे कुठले अवशेष मागे शिल्लक राहिले होते. पण ही शांतता एका वादळाच्या आधीचं आव्हान ठरली. दुसऱ्याच दिवशी गुप्तचर यंत्रणेचे मुख्य अधिकारी आणि चारपाच पोलीस अधिकारी आश्रमात रात्री दहा वाजता हजर झाले. स्वामीजींचं हृदय कुठल्याशा अघटिताच्या शंकेने अस्वस्थ झालं. ‘कुणास ठाऊक, कुठल्या पापकर्माचं हे फळ आहे!’ ते स्वत:शीच पुटपुटले. काही क्षण विचार करून त्यांनी फक्त एकाच अधिकाऱ्याला आत येण्याविषयी अनुमती दिली. त्यातला एक अधिकारी आत प्रवेशला, तेव्हा त्याला पाहताच स्वामीजी उद्वारले, ‘‘अरे राठोडऽ तू?’’  

‘‘एखाद्या खचलेल्या गाड्यासारखा सारा देश जमिनीत गाडून ठेवला आहे या चोरांनी!’’ बदलूरामनं आपल्या हातातली जाड काठी नेहमीप्रमाणे मोठ्यानं जमिनीवर आपटत भरीव आवाजात आपली चीड व्यक्त केली. त्याची ही सवय इतरांना ठाऊक असल्यामुळे त्याचं कुणाला काही वाटलं नाही. पण तो मात्र आपलं म्हणणं पुढं रेटतच गेला- ‘‘ठाऊक आहे? या निवडणुकीसाठी पुरे दीड हजार करोड रुपये खर्च होणार आहेत म्हणतात. ‘‘

या दीड हजार करोडमुळे या आताच्या नालायकांपासून देश सुटणार असेल, तर हे दीड हजार करोड़ गेलेले परवडेल.’’ 
त्यावर रमलून शेपटी जोडली, 
‘‘पण हे पैसे आपल्याकडूनच वसूल करतील नं?’’ 
‘‘सामान्य माणसांकडूनच वसूल करतात बाबा सगळे पैसे. मग निवडणूक असो किंवा नसो.’’ 

आजकाल प्रत्येक गावगाड्याचं सकाळपासून संध्याकाळपर्यंत हेच चित्र दिसून येत होतं. लाउडस्पीकरच्या कर्णकर्कश आवाजाने सारा आसमंत ढवळून निघत होता. व्हिडिओ, सिनेमांचा हैदोस सुरू होता. अख्खा दिवस राजकीय पाटर्यांच्या समर्थनार्थ वाजणाऱ्या भोंग्यासोबतच ‘प्रचंड बहुमताने विजयी करा...’चा कानांवर आदळणारा आवाज काही कमी होत नव्हता. पण सगळ्यात मोठा जमाव असायचा तो पंचायत भवनाच्या कट्ट्यावर. या कट्ट्याच्या चारही बाजूंनी असलेलं, गवत उगवलेलं मैदान एवढं मोठं होतं की, या मैदानात सगळा गाव जरी जमा झाला तरी सहज सामावून जाऊ शकत होता! कुठल्याही जातीचा, धर्माचा, समुदायाचा, विचाराचा माणूस इथं बसून आपलं म्हणणं विनासंकोच, मुक्तपणे मांडू शकत होता. हे ठिकाण गावाच्या संसदेसारखं कधी गंभीर, तर कधी विनोदी बोलाचालीने रंगून जायचं. कधी मोठ्याने भांडण, तर कधी एखाद्याला उघडं पाडण्याचंही काम सहज इथं व्हायचं.  तथापि, इथे कधी कुणी कुणाला अगदीच बेताल होताना पाहिलं नाही. खऱ्या अर्थानं लोकशाहीच्या सगळ्या मर्यादा इथे पाळल्या जायच्या, हेही तेवढंच खरं. 

आजचा वादविवाद निवडणुकीच्या तुलनेने अनेक अर्थाने समर्थनीय होता. बदलून आपलं म्हणणं दुसऱ्यांदा पुन्हा उंच आवाजात रेटलं. ‘‘निवडणुकीचा खर्च देशाचं कंबरडं मोडणारा ठरतो शेवटी. अरे भाऊऽ या चोरांच्या तिजोरीतला काळा पैसा याच दिवसांमध्ये बाहेर येतो नाऽ? तुला ठाऊक आहे नाऽ करोड़ो लोकांना तीन-चार महिने रोजगार तरी मिळेल या दिवसांत. पेंटरपासून प्रिंटरपर्यंत सगळ्यांना या काळात वर्षभराची कमाई करता येते. लाखो गाड्या फिरताहेत. पोस्टर्स, बिल्ले, झेंडे हे सगळे सामान्य कामगाराच तर तयार करतो ना? त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न मिटतो.’’ पन्नासिंग मधे पडत म्हणाला. 

पन्नासिंगच्या बोलण्यावर सगळे अवाक्‌ झाले. त्यावर कुणाला कुठलं उत्तर सुचत नव्हतं. जवळच बसलेला रामदीन त्यावर मोकळा हसला. मग म्हणाला, 

‘‘मला दवंडी पिटण्याचे दोनशे रुपये मिळतात. मी सगळ्या पाटर्यांचा ठेका घेतला आहे.’’ त्याच्या बोलण्यावर बदलू आणि रमलू एकमेकांकडे आ वासून पाहू लागले. 

‘‘आन्‌ आणखी एक गोष्ट सांगतो. पोस्टर चिकटवायचं काम मी चुन्नीलाल भंगी आहे ना, त्याला मिळवून दिलं. काय रे चुन्नी, हो का नाही?’’ 

‘‘पण हा रदलू तर पोस्टर फाडायचे शंभर रुपये घेतो एका रात्रीचे.’’ चुन्नीलालच्या बोलण्यावर सगळे हसायला लागले. हा रहस्यभेद जरा वेगळा होता. पोस्टर्स फाडणे हे काम जरा जोखमीचं होतं. मात्र रदलू अशा कामात तरबेज होता. 

‘‘शहरातली माणसं ही असली गुंडगिरीची कामं स्वतः कधी करत नाहीत. आपल्यासारख्या खेड्यातल्या माणसांच्या हातून करतात. पकडले गेले तर तुम्ही मरा!’’ महसूलदार हुक्क्याचा एक मोठ्ठा दम आतपर्यंत ओढत म्हणाला. 

‘‘काय हो काका, तुम्हाला किती रुपये मिळतात?’’ 
‘‘कशाचे?’’ महसूलदारानं जणू गुरगुरतच विचारलं, 
‘‘पूर्ण जातपंचायतीची मतं मिळवून देण्याचा ठेका घेतल्याचे!’’ 
‘‘चूऽप! झोडपू का तुला?’’ - आणि त्यापाठोपाठ हास्याचा एक ढग फुटला. बराच वेळ तो बरसत राहिला. जणू सगळे चिंब झाले. 

सगळ्यांनाच ठाऊक होतं, महसूलदार आपल्या जातीची एकगठ्ठा मतं मिळवून देण्याचा शब्द नेत्यांना देऊन प्रत्येक पक्षाकडून पैसे उकळत होता. बिचाऱ्या मतदारांना ठाऊकही व्हायचं नाही की, आपल्या नावावर पैसे कुणाला मिळतात ते! 

‘‘पण मी कधी कुणाला मत टाकायला सांगितलं नाही. आणि कुणावर कधी जबरदस्ती केली नाही. आता ते पक्षवालेच मोठ्या आग्रहानं खायला-प्यायला घालतात तर...’’ महसूलदाराची सफाई आणि इमानदारीची भाषा पाहून सगळ्यांना काय कळायचं ते कळलं होतंच. ही अशी इमानदारी करताना पाठीमागे काय करायचं असतं, ते गावातल्या अशा दोन-चार माणसांकडून शिकण्याजोगं होतं. 

‘‘काका, तुम्ही एवढे शिकलेले आहात. अनुभवी आहात. मग सांगा नाऽ हा निवडणुकीचा उंट कोणत्या बाजूने आपली कूस बदलेल ते.’’ ‘‘जिकडे माझी ही काठी वळेल तिकडे!’’ सत्तू पहेलवान मधेच उत्तरला. त्यानं आपल्या हातातली काठी हवेत सरसर फिरवून आपलं काठी चालवण्यातलं कसब दाखविलं. ते पाहून मास्तर रामप्रसाद आश्चर्यचकित झाले. सत्तू मात्र त्यावर खो-खो हसत सुटला, 

‘‘काय मास्तरऽ आता तुम्ही कुणाचाही उंट घेऊन या. मी माझ्या काठीच्या बळावर त्याला जिकडे म्हणाल तिकडे बसवून दाखवतो. आमच्या नेत्याने अद्याप काही सांगितलं नाही म्हणून, नाही तर मी त्यांचाही निकाल सांगितला असता!’’ गाववालेच काय, अख्ख्या मुलुखात त्याचं लफ्फेदार बोलणं ठाऊक होतं. तो खऱ्याचं खोटं आणि खोट्याचे खरं करण्यात पटाईत होता. 

‘‘या वेळी अख्ख्या दुनियेतले पेपरवाले भारतातच येणार आहेत. सगळीकडे कॅमेरे लागणार आहेत. तुम्ही काय काय करता, ते आता सगळ्या दुनियेला कळणार आहे!’’ 

‘‘आता काय सगळ्यांना ठाऊक नाही? काय बिघडवलं कुणी? आम्ही तर अख्खी बुथं ताब्यात घेतो. मागच्या वेळी तो कॅमेरावाला आलाच होता ना? हा दंडा त्याला दाखवताच तो एकदम सरळ झाला. आमचं हे अर्धं काम तर पोलीसवालेच करून घेतात. पण निवडणुकीत मारापिटी?   छीऽछी...पाप आहे हे, महापाप! या वेळी गावात असली जबरदस्ती झाली, तर मी कुणाला सोडणार नाही.’’ 
पहेलवानाच्या बोलण्यावर तिथली डझनभर माणसं तरी त्याच्यावर तुटून पडली. त्याला ठाऊक होतं, हे सगळे त्याला बोलण्यात टिकू देणार नाहीत, त्यामुळे त्याने हळूहळू माघार घ्यायला सुरुवात केली. पण जाता-जाता त्यानं सगळ्यांवर एक नजर फिरवली... कुणाकुणाला प्रसाद द्यायचा आहे ते ठरवायला. 

पहेलवान गेल्यानंतर सगळ्यांनी जणू सुटकेचा नि:श्वास टाकला. आता मास्तराला घेरून ते सगळे अपेक्षेने पाहू लागले. 

‘‘सत्तू वेडा आहे. आपल्या स्वामीजींना तिकीट मिळणार असेल, तर कोण भांडणतंटा करील हो?’’ स्वामीजींना तिकीट? सगळ्यांनी जणू आ वासून त्यांच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. 

‘‘हो. का नाही? सगळे पक्षवाले स्वामीजींचे पाय धरून आहेत. आमच्या पक्षाचे उमेदवार व्हाऽ आम्ही तुम्हाला तिकीट देतो म्हणून. पण ते राजी होत नाहीत ना!’’

मास्तरांच्या बोलण्याने सगळ्यांना गोंधळात टाकलं. 
गावाच्या शिवेबाहेर स्वामी अखंडानंदांचा पिढीजात आश्रम होता. या आश्रमात वर्षानुवर्षे साधू-संन्याशांची वर्दळ होती. पण कुण्या संन्याशाच्या नावाची चर्चा शीव ओलांडून गावात आली नव्हती. भलेही अख्ख्या गावामधले गावकरी तिथे श्रद्धेने पूजे-अर्चेला अवश्य जात होते. स्वामीजींचीही त्या सगळ्या गावात पूजा होत होती. गायी-म्हशींच्या दानापासून मुला-मुलींच्या लग्नाच्या सगळ्या विधींमधून तिथे दान पोहोचण्याची व्यवस्था होती. 

स्वामी अखंडानंदांचा पिढीजात आश्रम कधीपासून इथे स्थापन झाला, ते सहसा कुणालाही ठाऊक नव्हतं. एकामगोमाग एक असा नवा स्वामी तिथल्या गादीवर येत गेला. पण या नव्या स्वामींनी गादीवर विराजमान होताच आश्रमात आमूलाग्र परिवर्तन केल्याचं बोललं जात होतं. गावाच्या शेतीवाडीवर, दानधर्मावर चालणाऱ्या या आश्रमाचीही जबाबदारी आहेच की गावातल्या नागरिकांसाठी, कल्याणासाठी काही करण्याची. स्वामीजींनी दहा वर्षांपूर्वीच ही घोषणा केली होती. मग आश्रमाच्या आसपासच्या अनेक शाळांच्या इमारती बांधल्या गेल्या, मुलींसाठी शिवण क्लासेस सुरू झाले, पाणपोया सुरू करण्यात आल्या. गरीब विधवांना आर्थिक साह्य करण्यात आलं. पण आश्रमाची गावात कधी लुडबूड झाली नाही. पंचायतीच्या माध्यमातून कारभार होत राहिला. स्वामीजींचा प्रभाव एवढा होता की, अनेकांनी आश्रमाच्या नावावर आपली शेतं दान केली होती. आश्रमाच्या सगळ्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा आता या क्षेत्राच्या विकासाचा मुख्य आधार झाला होता. 

पण आता स्वामी अखंडानंद मोठ्या संकटात होते. त्यांनी कधी कल्पनाही केली नसावी की, राजकीय व्यक्ती त्यांना असा आग्रह करून राजकारणात आणण्याचा डाव रचू शकतात. आठवड्यापूर्वी गाड्या भरून राजधानीतल्या काही व्यक्ती त्यांना भेटायला आल्या होत्या. स्वामीजी संध्याकाळनंतर सहसा कुणाला भेटत नसत; पण त्यांचा आदरयुक्त आग्रह पाहून संन्याशांनी त्यांची भेट स्वामीजींशी घडवून दिली. 

‘‘महाराज, आम्ही तर फक्त तुमचा आशीर्वाद घ्यायला आलो होतो. तुम्हाला तर ठाऊकच आहे की, मंदिराचं निर्माण हा आमचा मुख्य मुद्दा आहे. आणि या कार्यात आपल्यासारखे महानुभाव आमच्यासोबत राहिले तर...’’ 
‘‘बोला- तन, मन, धन... कोणत्या प्रकारची मदत आपणास आमच्याकडून अपेक्षित आहे? विनासंकोच सांगा.’’ स्वामीजींनी गदगदत्या स्वरात अभय दिलं. 
‘‘स्वामीजी, तुमच्या कृपेनं तर ते सगळंच आमच्याकडे आहे. बस, आपण आमच्या पक्षाचे उमेदवार होऊन थेट संसदेत जावं, असा आमचा मानस आहे.’’ 

‘‘काय? राजकारण? छेऽऽछे! मला या चिखलात कशाला ओढताय बाबांनो? आम्ही परमेश्वरासाठी काहीही करायला तत्पर आहोत; पण राजकारणात प्रवेश? कदापिही नाही.’’ 
आणि त्यावरील त्यांचं म्हणणं ऐकण्याच्या आधीच स्वामीजी आपल्या आतल्या कक्षात निघून गेले नेत्यांचे शिष्टमंडळ अख्खे चार तास तिथे बसून अयशस्वी प्रयत्न करीत होते. आणि तरीही यश येत नाही, असं दिसताच ते तिथून निघून गेले. 

ही बातमी वर्तमानपत्रापर्यंत कशी पोहोचली, ते कळायला मार्ग नव्हता. दोन-तीन दिवस तरी या आशयाच्या बातम्या प्रकाशित होत होत्या. स्वामीजींनी या बातम्या वाचल्या, तेव्हा त्यांच्या शांत मृदुल चेहऱ्यावर निराशा आणि संताप दिसू लागला. पहिल्यांदाच लोकांनी त्यांना अशा अस्वस्थतेत पाहिलं. जणू या संकटातून  आपली सुटका करून घ्यायला ते स्वत:च्या मनाची तयारी करू लागले होते. 

तीन दिवसांनंतर संध्याकाळच्या सुमारास दहाएक गाड्या धूळ उडवीत आश्रमात पुन्हा येऊन धडकल्या. आश्रमातली शांतता भंगली होती. भौतिक सुखासीनता आणि आध्यात्मिक स्वाभाविकता यांच्यादरम्यान संवाद सुरू होता. पण याही वेळी स्वामीजी पूर्णपणे खंबीर होते. 
‘‘स्वामीजी, आम्ही जे चार महिन्यांत करून दाखविलं, ते त्यांनी गेल्या चाळीस वर्षांत केलं नाही.’’ 
‘‘राहू द्या बाबांनोऽ’’ स्वामीजी उत्तरले, ‘‘ती चाळीस वर्षे राज्य करणाऱ्यांमध्ये तुम्ही नव्हतात का?’’ त्यांनी सगळ्यांचे चेहरे बारकाईनं न्याहळले. 
‘‘आणि राहिली गोष्ट एकता आणि अखंडतेची; त्याला तर काहीही धोका नाही. हा देश अक्षय आहे. शेकडो वर्षांच्या दास्याने याची एकात्मता भंगू शकली नाही, ती आता कोण भंगविणार? अशी अनर्गल भाषा तुमच्या तोंडी शोभत नाही.’’ सगळे नेते त्यांच्याकडे डोळे फाडून-फाडून पाहत होते. ते फक्त महापुरुषाच नव्हते, तर एक जागरूक नागरिकही होते. 

‘‘स्वामीजी, बघा- विचार करा...’’ 

ढुंगणात शेपट्या टाकून पळावं तशा त्या दहाही गाड्या पळाल्यानंतर आश्रमवासीयांनी नि:श्वास टाकला. आश्रमातल्या साधूंना आपल्या गुरूविषयी अभिमान वाटू लागला. पण हे संकट इतक्या सहजपणे टळणारं नव्हतं. हे स्वामीजी चांगलं ओळखून होते. एक दिवस फक्त तीन सभ्य तरुण व्यक्ती पूर्ण श्रद्धा आणि आत्मसमर्पणाच्या भावनेने आश्रमात हजर झाल्या. स्वामीजींनी पुन:पुन्हा विचारूनही त्यांनी आपल्या मनातलं सांगताना- ‘‘फक्त आपलं दर्शन घ्यायचं होतं. दर्शन मिळालं आणि आम्ही कृतार्थ झालो.’’ त्यांच्यातल्या एकानं उत्तर दिलं. मग दुसऱ्याचा परिचय करून देताना त्यांनी सांगितलं, ‘‘हे शर्मासाहेब. वृत्तसंदेशचे मुख्य संपादक आणि हे श्री.पद्मनाभन्‌. सत्तारूढ पक्षाच्या कार्यकारिणीत माझे सहकारी सदस्य आहेत.’’ 

स्वामीजींना पुढचं कळायला वेळ लागला नाही. ते आता अधिक सजग होऊन बसले. 

‘‘आपलं दर्शन मला पहिल्यांदा पौर्णिमा सोहळ्यात झालं होतं. मौनव्रतानंतर त्याच दिवशी आपण प्रवचनसुद्धा केलं होतं. तिथे उपस्थित असलेला प्रचंड जनसमुदाय पाहिल्यानंतर मी एवढा प्रभावित झालो की, वर्तमानपत्रात त्या कार्यक्रमाचे वृत्त छापण्याआधीच मी पक्षप्रमुखांना आपल्या अपार लोकप्रियतेविषयी सांगितलं.’’ पुरता आशय स्वामीजींच्या लक्षात आला होता. 

‘‘आम्ही या आश्रमाच्या विकासासाठी एक मास्टरप्लॅन तयार करून आणला आहे. तो पाहून आपण आपली प्रतिक्रिया द्यावी.’’ 

-आणि पद्मनाभननी एक सुंदर असा नकाशा चटईवर पसरला. स्वामीजींच्या डोळ्यांतून अक्षरशः संताप ओसंडत होता, परंतु योगविद्येनं आत्मसात केलेला संयम अधिक प्रभावी ठरला. ते शांतपणे उठले आणि आपल्या आश्रमाच्या आतल्या कक्षात शिरत त्याचे दार त्यांनी आतून धाड्‌कन लावून घेतलं. 

स्वामीजींच्या या मूक प्रतिक्रियेचा परिणाम मात्र चांगलाच झाला. ते तिघेही सभ्य तरुण चुपचाप उठले आणि त्याच क्षणी आश्रमातून बाहेर पडले. आश्रमवासीयांनी त्यांच्या येण्याला फारसं महत्त्व दिलं नव्हतं. सगळे काही अशा वेगाने आणि गुप्तपणे घडलं होतं की- त्या घडलेल्या प्रकाराचा ना कुणी साक्षीदार होता, ना त्याचे कुठले अवशेष मागे शिल्लक राहिले होते. पण ही शांतता एका वादळाच्या आधीचं आव्हान ठरली. दुसऱ्याच दिवशी गुप्तचर यंत्रणेचे मुख्य अधिकारी आणि चार-पाच पोलीस अधिकारी आश्रमात रात्री दहा वाजता हजर झाले. स्वामीजींचं हृदय कुठल्याशा अघटिताच्या शंकेने अस्वस्थ झालं. ‘कुणास ठाऊक, कुठल्या पापकर्माचं हे फळ आहे!’ ते स्वत:शीच पुटपुटले. काही क्षण विचार करून त्यांनी फक्त एकाच अधिकाऱ्याला आत येण्याविषयी अनुमती दिली. त्यातला एक अधिकारी आत प्रवेशला, तेव्हा त्याला पाहताच स्वामीजी उद्वारले, 
‘‘अरे राठोडऽ तू?’’ 
‘‘होय, महाराज.’’ 

त्या अधिकाऱ्यानं तेवढ्याच नम्रपणे त्यांच्या चरणांना स्पर्श केला. ‘‘मी तुमचा एक असा अनुयायी आहे की, ज्याला कधी आपण एक मोठे पोलीस अधिकारी आहोत, हे सांगायची आवश्यकताही पडली नाही! 

स्वामीजींच्या आश्चर्याला पारावार राहिला नव्हता. कितीदा तरी राठोड या आश्रमात आश्रमाच्या प्रत्येक समारंभासाठी सहभागी व्हायला सहपरिवार आला होता. पण कधी ओळख दाखवायची आवश्यकता पडली नाही. स्वामीजींसाठी तर सगळेच समान होते ना!  
‘‘स्वामीजी, माझ्यासमोर मोठं धर्मसंकट उभं राहिलं आहे.’’ 
‘‘कसलं धर्मसंकट बेटा? तू तुझ्या धर्माचे पालन कर, मी माझ्या धर्माचे पालन करेन.’’ 
‘‘पण माझा तसा कुठला धर्म? माझा नाइलाज समजून मला क्षमा करावी स्वामीजी.’’ 
‘‘स्पष्ट बोल बेटा, घाबरू नकोस.’’ 
‘‘स्वामीजी, मला वरून आदेश मिळाला की, मी तुमच्या या आश्रमाविरुद्ध एक तक्रार तयार करावी म्हणून. संपूर्ण पडताळणी केल्यानंतर मला त्यात नमूद करायचं आहे की, या आश्रमात भ्रष्टाचार होतो आहे. गावकऱ्यांना गंडवलं जातं, त्यांचा बुद्धिभेद केला जातो. नारी निकेतनच्या नावावर...’’ 
‘‘कर रे बाबा... हेऽऽ पुरे कर-’’ स्वामीजींचं हृदय जणू चीत्कारलं, ‘‘मला एक गोष्ट सांग- ही माणसं का माझ्या मागे लागलीत? मी कुणाचं काय घोडं मारलं?’’
‘‘स्वामीजी, या संपूर्ण क्षेत्रात त्यांना स्वच्छ प्रतिमेचा कुठला नेता मिळत नाहीये या निवडणुकीसाठी. सगळ्याच नेत्यांचा मागचा कार्यकाळ काही चांगला नाहीय. यांच्या या भ्रष्ट प्रतिमेमुळे त्यांना इथली मते मिळण्याची शाश्वती उरली नाही. त्यामुळेच तर हे तुमच्यामागे लागले आहेत.’’ 
स्वामीजी विचारात गढून गेले. त्यांना आपला प्रामाणिकपणाही सोडायचा नव्हता आणि आश्रमाला टीकेपासूनही वाचवायचं होतं. 
‘‘स्वामीजी, तुम्ही समजून घ्या. आणि तुम्हाला तर सत्तारूढ पक्षाच्याच तिकिटावर...’’ नेमक्या या क्षणी ‘काय करावं?’ या द्विधेत स्वामीजी हतबुद्धपणे बसून होते. 

अनुवाद : रवींद्र शोभणे

(हिंदीतील नामवंत लेखक माधव कौशिक यांनी प्रामुख्याने कविता व कथालेखन केले आहे. त्यांच्या निवडक कथांचा संग्रह मराठीत आणण्याचे काम मराठीतील नामवंत साहित्यिक रवींद्र शोभणे करीत आहेत. त्यातील काही कथा साधनातून प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)     

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

माधव कौशिक
k.madhav9@gmail.com

हिंदी साहित्यिक, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके