डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

इराणपासून कांद्याचा इतिहास सुरू होतो. मात्र त्याचा वर्तमान हा आशिया खंडाला मध्यवर्ती ठेवतो. त्यामुळे कांद्याचा अभ्यास करताना चीन असो वा भारत- या देशांना केंद्रस्थानी ठेवावे लागते. भारतातील भाजीपाल्यात कांदा उत्पादनाचे प्रमाण 6 टक्के आहे. आहारापासून राजकारणापर्यंत आणि संतसाहित्यापासून स्वातंत्र्य चळवळीपर्यंत कांद्याचा संदर्भ आला आहे; शेतकरी आणि शेती इतक्या सीमित अर्थाने तो येत नाही, तर व्यापक अर्थाने त्याचा उल्लेख सापडतो. खंड, देश, राज्य आणि जिल्हा अशा चारही टप्प्यांवर कांद्याचा अभ्यास करताना या पिकाला मिळालेले स्थान लक्षात घ्यावे लागते. महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग कांदापीक घेतो, त्यामुळे त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे आणि त्याच दिशेने काही संस्था कामदेखील करत आहेत.  

भारताची अर्थव्यवस्था कृषिक्षेत्रावर अवलंबून आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार आजही भारतातील 52. 7 टक्के नागरिक उपजीविकेसाठी शेती व्यवसाय करतात. औद्योगिक विकास होत असला तरी त्याची गती संथ आहे. त्यामुळे 121 कोटींच्या देशातील जवळपास 60 कोटी जनता शेती या क्षेत्राशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निगडित आहे. शेती हा व्यवसाय करणारा एवढा मोठा जनसमुदाय जगातील अन्य देशात नाही. त्यात भारतातील भौगोलिक विविधता पाहता, एकाच पद्धतीने शेती केली जात नाही. 

पिकांच्या मशागतीपासून बाजारपेठांपर्यंत या संपूर्ण क्षेत्रांत विविधता दिसून येते. म्हणजे उत्तर भारतात जसा गहू पिकवला जातो, तसा दक्षिण भारतात पिकवला जात नाही. अर्थात त्यासाठी त्या-त्या पिकांना पूरक ठरणाऱ्या भौगोलिक परिस्थितीमुळे त्यात विविधता आलेली आहे. त्यामुळेच तर उत्तर भारतात गहू मोठ्या प्रमाणात घेतला जातो, तर दक्षिण भारतात भाताची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच मध्य भारतात ऊस या नगदी पिकाला प्राधान्यक्रम दिला जातो. शेतीक्षेत्राची स्थळ-काळ-सापेक्ष बदलत जाणारी ही वैशिष्ट्ये म्हणता येतील. 

भारतात घेतल्या जाणाऱ्या पिकांमध्ये खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशी तीन हंगाम आहेत. त्यात वेगवेगळी पिके घेतली जातात. या तिन्ही हंगामांत आर्थिकदृष्ट्या नगदी पिके म्हणजे कापूस, ऊस आणि कांदा आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते. भाजीपाल्याचा विचार करता कांदा हे प्रमुख असे पीक आहे. त्याला जसे कृषिक्षेत्रात महत्त्व आहे तसेच राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक स्तरावर विशेष महत्त्व आहे. पण हा कांदा नेमका आहे कुठला, ते या पार्श्वभूमीवर जाणून घेणे गरजेचे आहे. 

‘कांदा-मुळा-भाजी।अवघी विठाबाई माझी।’ असा कांद्याचा उल्लेख संत सावतांच्या भक्तिगीतात सापडतो. तर कधी ‘डोक्यात काय कांदे-बटाटे भरले आहेत का?’ असा वाक्‌प्रचार दैनंदिन आयुष्यात कुठे तरी ऐकायला मिळतो. कांद्याबद्दल महात्मा गांधीजींचे 1936 मधील एक वाक्य लक्षात घ्यावे लागेल. गांधीजी म्हणतात, ‘‘मला माहिती नाही की, या देशामधील गरीब व्यक्ती कांदा-लसणाशिवाय कशी राहू शकेल? कारण कांदा हे गरिबांचे भाकरीबरोबरचे अन्न आहे.’’ यातून कांद्याचे महत्त्व अधोरेखित होते. ‘अमेरिकेत सिव्हिल वॉर’ (1860-1864) चालू असताना संयुक्त फौजांचा प्रमुख असलेला जनरल युलिसिस ग्रँटने युद्धखात्याला तंबी दिली होती की- कांद्याचा पुरवठा त्वरित झाला नाही, तर मी फौजांना आगेकूच करण्याचा आदेश देणार नाही. हे उदाहरण देण्याचे कारण म्हणजे, कांदा किती बहुआयामी आहे, हे यातून सहज समजून येईल. त्याचे कारण कांदा हा एकमेव भाजीपाला आहे, ज्याला स्वयंपाकघरात फारच महत्त्व दिले जाते. कांद्यानेही त्याचे स्वयंपाकघरातले स्थान अबाधित ठेवले आहे, म्हणून खानपानाच्या सवयीत त्याचे वरचे स्थान आहे. 

कांद्याचा प्राचीन संदर्भ 5,000 हजार वर्षांपूर्वी इराणमध्ये आढळतो, असे अभ्यासकांचे मत आहे. भारतात कांद्याचा उल्लेख इसवी सन 300 पासून आढळतो. धर्मग्रंथात, शिलालेखात आणि साहित्यात हा कांद्याचा उल्लेख आढळतो. मात्र याबाबत संशोधकांमध्ये एकवाक्यता नाही. त्याचबरोबर कांदा हा पूर्वेकडील देशांतून पश्चिमेकडे गेला, की पश्चिमेकडून पूर्वेकडे आला- याबाबत निश्चित सांगणे कठीण आहे. त्यामुळे कांद्याचा शोध कधी लागला हेही निश्चित सांगता येत नाही. वेगवेगळ्या भाषांत कांद्याला वेगवेगळी नावे आहेत. कांद्याला इंग्रजीत ‘ओनियन’ (Onion) असे म्हणतात. हिंदीत ‘प्याज’, तर लँटिनमध्ये त्याला ‘उनिओ’ (Unio) असे म्हणतात. आणि ‘Allium Cepa' त्याचे शास्त्रीय नाव आहे. कांद्याचे नाव अशा प्रकारे प्रत्येक भाषेत बदलत जाते. 

कांदा हा भाजीपाला या वर्गात येतो. भाजीपाल्याचे आहारात जसे महत्त्व आहे, तसेच कांद्याचे आहे. कांदा हा दैनंदिन वापरात असलेला पदार्थ असल्यामुळे आहारात त्याला महत्त्व असल्याचे आहारतज्ज्ञ सांगतात. शाकाहारी तसेच मांसाहारी लोकांमध्ये आहारात कांद्याचा वापर दररोज केला जातो. कोशिंबीर, चटणी आणि कांद्यापासून बनवलेला मसाला तसेच के-चप आणि सॉस यामध्ये कांद्याचा वापर केला जातो. कांद्याची पावडर आणि कांद्याचे उभे काप किंवा चकात्या करून त्या वाळवून वर्षभर वापरता येतात. 

कांद्यामध्ये ‘ब’ आणि ‘क’ जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट्‌स, प्रोटिन्स तसेच फॉस्फरस, कॅल्शियम आणि लोह ही खनिजे असतात. कांद्याला येणारी उग्रता व तिखटपणा हा ‘अलिल प्रोपिल डायसल्फाईड’ या हवेत उडून जाणाऱ्या तेलकट पदार्थामुळे येतो. कांद्याला लाल रंग हा ‘अँथोसायनीन’ या रंगामुळे येतो. कांद्याचे औषधी गुणधर्म आहेत. कांदा उत्तेजक, चेतनाद असून त्यात गोड, आंबट, तिखट, कडवट आणि तुरट असे पाच निरनिराळे स्वाद आहेत. 

पित्त आणि वातशामक म्हणून कांद्याचा वापर केला जातो. थकवा, मरगळ, उष्माघात आणि रक्तवाहिन्यांवरील दोष या विकारांवर कांदा अत्यंत गुणकारी आहे. असे अभ्यासक डॉ. वि. सु. बावस्कर म्हणतात. आहारातील महत्त्वामुळे कांद्याला विशेष महत्त्व दिले जाते. कांदा चवीसाठी खाल्ला जातो, तसेच चवीमुळे त्याचा मसाल्यात वापर केला जातो. भारतीय अन्नपदार्थ कांद्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे तिन्ही ऋतूंत भारतीय लोकांच्या आहारात कांद्याला स्थान असल्याचे दिसते. 

मात्र असे असले तरी जैन, मारवाडी, वैष्णव यांसारखे सामाजिक समूह कांद्याला वर्ज्य मानतात. कारण कांदा हा कंद आहे. जमिनीच्या खाली त्याची वाढ होत असते. त्यात सूक्ष्म जीव मोठ्या प्रमाणात असतात. म्हणून जमिनीखालील कंद खाऊ नयेत, कारण त्यातून सूक्ष्म जीव सेवनात येऊ शकतात, असे ह्या समूहातील लोक सांगतात. परिणामी, हे सामाजिक समूह कांद्याला वर्ज्य मानतात. अजिबातच कांदा न खाणाऱ्या लोकांमध्ये ‘ब’ जीवनसत्त्वाची कमतरता अनेकदा दिसून येते, असे डॉ.खान सांगतात. 

कांद्यामध्ये एकूण 23 पोषणमूल्ये आहेत. प्रत्येकी 100 ग्रॅम कांद्यात किती पोषणमूल्य असते, याची आकडेवारी पुढीलप्रमाणे- एका मोठ्या कांद्यामध्ये 86. 6 ग्रॅम इतके आर्द्रतेचे प्रमाण असते, तर लहान कांद्यात हेच प्रमाण 84. 3 ग्रॅम प्रमाण असते. वाळवलेल्या कांद्यात हेच प्रमाण 4.6 ग्रॅम इतके असते. प्रोटिनचे प्रमाण मोठ्यात कांद्यात 1.2 ग्रॅम, लहान कांद्यात 1.8 ग्रॅम. तर वाळवलेल्या कांद्यात 10.6 ग्रॅम इतके असते. कांद्यातला स्निग्धांश लहान आणि मोठ्या आकाराच्या कांद्यात सारखाच म्हणजे 0.1 ग्रॅम इतका असतो. 

वाळवलेल्या कांद्यात त्याचे प्रमाण 0.8 ग्रॅम होते. कार्बोहायड्रेट्‌सचे प्रमाण मोठ्या, लहान आणि वाळवलेल्या कांद्यात अनुक्रमे 11.1 ग्रॅम, 12.6 ग्रॅम आणि 74.1 ग्रॅम इतके असते. कॅल्शियमचे प्रमाण मोठ्या कांद्यात 46.09 मिलिग्रॅम, लहान कांद्यात 40 मिलिग्रॅम तर वाळवलेल्या कांद्यात 300 मिली ग्रॅम आहे. ‘व्हिटामिन सी’ मोठ्या कांद्यात 11 मिलिग्रॅम, लहान कांद्यात 2 मिलिग्रॅम तर वाळवलेल्या कांद्यात 147 मिलिग्रॅम असते. फॉस्फरसचे प्रमाण मोठ्या कांद्यात 50. 60 मिलिग्रॅम, लहान कांद्यात 60 मिलिग्रॅम तर वाळवलेल्या कांद्यात 290 मिलिग्रॅम असते. त्याचबरोबर एनर्जी, मिनरल्स, फायबर, लोह, फॉलिक अँसिड, मॅग्नेशियम, सोडियम, पोटॅशियम, कॉपर आणि झिंक आदी घटकांचे प्रमाण कांद्यामध्ये असते. 100 ग्रॅममध्ये कशाची मात्रा जास्त किंवा कमी आहे, यावरून कांद्याचे आहारातील महत्त्व अधोरेखित होते. 

कांदा हे पीक वर म्हटल्याप्रमाणे कुठून आले ते निश्चित सांगणे कठीण आहे. कांद्याची जगभरात एकूण लागवड 43. 64 लाख हेक्टरवर आहे, तर एकूण उत्पादन 863. 44 लाख टन इतके आहे. या क्षेत्राचा आणि उत्पादनाचा विचार करता, हेक्टरी 19. 79 टन इतका कांदा पिकवला जातो. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणातल्या उत्पादनाच्या जोरावर ही भूक भागवली जाते. सध्या कांदा पिकवणाऱ्या राष्ट्रांत चीन प्रथम क्रमांकावर आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्राची आकडेवारी पाहता असे दिसते की, क्षेत्र कमी पण उत्पन्न जास्त अशी स्थिती चीनची आहे. 

2011-12 च्या ‘एपिडा’ अहवालानुसार चीनमध्ये 930.21 हजार हेक्टरवर कांदा घेतला गेला, तर भारतात 1,064.00 हजार हेक्टरवर घेतला गेला. वास्तविक पाहता, भारताचे लागवडीखालील क्षेत्र चीनपेक्षा जास्त आहे, तरीही चीनमध्ये 20,507.76 टनांचे उत्पादन झाले होते. तर भारतात 15,118.00 टन कांद्याचे उत्पादन झाले होते. चीनची उत्पादनक्षमता भारतापेक्षा अधिक आहे, हे आकडेवारीवरून दिसून येते. 

जगभरात कांदा पिकवणारी चीन, भारत, यूएसए, इजिप्त, इराण, रशिया, टर्की, बांगलादेश, पाकिस्तान आणि नेदरलँड ही दहा राष्ट्रे आहेत. कांद्याच्या क्षेत्राचा उभा- आडवा विस्तार झालेला असला तरी, आशियातील दोन राष्ट्रांमध्ये- म्हणजे चीन आणि भारत या राष्ट्रांत कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या दोन्ही राष्ट्रांत मिळून 47 टक्के कांदा उत्पादित होतो. 

भारतात दर वर्षी तीन प्रमुख हंगामांमध्ये कांदा हे पीक घेतले जाते. खरीप (जुलै-ऑक्टोबर), रांगडा (ऑगस्ट- डिसेंबर) तर रब्बी (डिसेंबर ते एप्रिल) अशा प्रमुख तीन हंगामांत कांद्याचे पीक घेतले जाते. त्यामध्ये 70 टक्के पीक रब्बी हंगामात घेतले जाते. त्यानंतर खरिपात 20 टक्के, तर रांगडा 10 टक्के क्षेत्रावर घेतले जाते. यावरून हे स्पष्ट होते की, भारतातील कांदा उत्पादक शेतकरी तिन्ही हंगामांत कांद्याचे पीक घेतात. परिणामी, देशात मुबलक प्रमाणावर कांद्याचे उत्पादन होते. भारतात एकूण 13 लाख हेक्टरवर कांदा असून त्यातून निघणारे उत्पादन हे प्रतिवर्षी 232 लाख टन इतके आहे. 

उत्पादनाचे आकडे लाखात असले तरी, भारतात 15 ते 17 लाख टन कांदा एका महिन्याची भूक भागवू शकतो. याप्रमाणे जवळपास 180 लाख टन इतका कांदा दर वर्षी भारताला लागतो. त्यापेक्षा जास्त होणारा कांदा बाहेर देशात निर्यात केला जातो. भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश आणि बिहार या राज्यांत प्रामुख्याने कांद्याचे पीक घेतले जाते. ‘राष्ट्रीय बागायती बोर्ड’च्या माहितीनुसार महाराष्ट्र 38 टक्के, मध्य प्रदेश 15 टक्के, कर्नाटक 12. 85 टक्के, बिहार 5. 34 टक्के आणि राजस्थान 4. 29 टक्के इतका वाटा या राज्यांचा आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र त्यात सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य आहे. यामुळे पुढील भागात महाराष्ट्रकेंद्रित कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थितीचा थोडक्यात आढवा घेतला आहे. 

महाराष्ट्र हे शेतीच्या बाबतीत प्रगत राज्य आहे. राज्यातील 5 लाख हेक्टरवर 88 लाख टन कांद्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने नाशिक, सातारा, अहमदनगर, सोलापूर, धुळे, औरंगाबाद आणि जळगाव या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकवर असून भारतात उत्पादित होणाऱ्या एकूण कांद्यापैकी 38 टक्के कांदा महाराष्ट्रात उत्पादित होतो. भारतातील 10 टक्के कांदा नाशिक जिल्ह्यात घेतला जातो, तर राज्यातील एकूण उत्पादनापैकी 55 टक्के एकट्या नाशिक जिल्ह्यात घेतला जातो. 

जिल्ह्यातील लासलगाव, बसवंत पिंपळगाव, सिन्नर, सटाणा, इगतपुरी, चांदवड, येवला, मनमाड आणि उमराणा इत्यादी भागात कांदा घेतला जातो. पूर्व आशियामध्ये नाशिक हे मोठे केंद्र आहे. त्यामुळे नाशिकच्या मालाला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख प्राप्त झालेली आहे. याच्या परिणामी, कांदाक्षेत्राचा उभा-आडवा विस्तार महाराष्ट्रातही झाला आहे. अलीकडच्या काळात खानदेशाबरोबर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भात कांद्याची लागवड होऊ लागली. कांदा हे नगदी पीक तीन महिन्यांत काढणीला येते, त्यामुळे शेतकऱ्यांचा या पिकाकडे ओढा असतो. म्हणजे कांदा हे कमी खर्चात, कमी काळात भरघोस उत्पन्न मिळवून देणारे नगदी पीक आहे, असा समज शेतकऱ्यांमध्ये आहे. 

महाराष्ट्रात कापूस, ऊस, सोयाबीन, ज्वारी आणि हरभरा पिकांबरोबर कांदा घेतला जातो. त्यामुळे साहजिकच कांद्यावर संशोधन करण्यास महाराष्ट्रात सुरुवात झाली. त्यातूनच सन 1960 च्या सुरुवातीला निफाड येथे ‘कांदा प्रजनन कार्यक्रम’ सुरू करण्यात आला. त्याअगोदर एन 2- 4-1, पुसा रेड, एन-53 इत्यादी दर्जेदार वाण होते. मात्र 1960 नंतर त्यात वाढ होत गेली. महाराष्ट्रात आज जवळपास 58 वाण संशोधनातून तयार करण्यात आले आहेत. 

सन 1998 मध्ये पुणे येथील राजगुरूनगर येथे कांदालसूण संशोधन संचालनालयाद्वारे काही वाण विकसित करण्यात आले. या संस्थेने लाल, पांढरा आणि पिवळ्या  रंगाच्या कांद्याचे अधिक उत्पन्न देणारे वाण शोधले आहेत. जमीन, पाणी, पिकाचा कालावधी यांसारख्या बाबी लक्षात घेऊन हे वाण विकसित केले आहेत. त्यात अनुक्रमे ‘भीमा डार्क रेड’, ‘भीमा ेशेता’, तर बंगळुरू येथील ‘भारतीय बागवानी संशोधन संस्था’ यांनी ‘अर्का पीतांबर’ हे वाण विकसित केले आहेत. त्यामुळे कांद्याच्या क्षेत्राचा आणि संशोधनातील प्रगतीचा विचार करता, महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे. 

ज्यामुळे कधी ग्राहकांच्या डोळ्यांत पाणी येते, तर कधी सरकारे कोलमडून पडतात, अशी पार्श्वभूमी असलेला हा कांदा बहुआयामी आहे. 1998 मध्ये अटलबिहारी वाजपेयी सरकार पडले, तेव्हा विरोधी पक्षाने कांद्याचा मुद्दा लावून धरला होता. वाजपेयी सरकार सत्तेत येण्याआधी कांदा 10 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मात्र वाजपेयी सरकारच्या काळात 25 ते 30 रुपये प्रतिकिलोने भाव वाढले होते. परिणामी, केंद्र सरकारविरुद्ध जनमत तयार झाले आणि त्यामुळेच वाजपेयी सरकार पडले, असे म्हटले जाते. कांद्यामुळे आजही राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जनमत तयार होत राहते. सहकारक्षेत्रानंतर राजकारण कुठल्या मुद्यावरून पेटत असेल, तर तो म्हणजे कांदा. आजपर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनांची संख्या पाहिली, तर कांदा हा किती ज्वलंत विषय आहे, हे स्पष्ट दिसून येते. 

राजकीय अनुषंगाने विचार करता, ताजा संदर्भ द्यायचा झाला तर- खा.सुप्रिया सुळे यांनी कांद्याच्या भाववाढीवर संसदेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिले, ‘मी अशा कुटुंबातून आहे, जिथे कांदा खात नाही. त्यामुळे मीही कांदा खात नाही. ’ त्यांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षापासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत अनेकांनी जोरदार टीका केली. 

सामाजिक आयाम बघता, वर उल्लेख केल्याप्रमाणे कांदा हा जैन, मारवाडी, वैष्णव यांसारख्या समाजांत खाल्ला जात नाही. त्यामुळे एका विशिष्ट समूहात कांद्याला फार महत्त्व दिले जात नाही. एकीकडे भाकरीसोबतचे गरिबाचे अन्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याला दुसरीकडे काहीच महत्त्व दिले जात नाही, असा परस्परविरोधाभास कांद्याच्या बाबतीत दिसून येतो. त्यामुळे अर्थातच कांद्याला जसे राजकीय आयाम आहेत तसेच सामाजिक आयामसुद्धा आहेत, असे दिसून येते. 

इराणपासून कांद्याचा इतिहास सुरू होतो. मात्र त्याचा वर्तमान हा आशिया खंडाला मध्यवर्ती ठेवतो. त्यामुळे कांद्याचा अभ्यास करताना चीन असो वा भारत- या देशांना केंद्रस्थानी ठेवावे लागते. भारतातील भाजीपाल्यात कांदा उत्पादनाचे प्रमाण 6 टक्के आहे. आहारापासून राजकारणापर्यंत आणि संतसाहित्यापासून स्वातंत्र्य चळवळीपर्यंत कांद्याचा संदर्भ आला आहे; शेतकरी आणि शेती इतक्या सीमित अर्थाने तो येत नाही, तर व्यापक अर्थाने त्याचा उल्लेख सापडतो. खंड, देश, राज्य आणि जिल्हा अशा चारही टप्प्यांवर कांद्याचा अभ्यास करताना या पिकाला मिळालेले स्थान लक्षात घ्यावे लागते. महाराष्ट्रातील शेतकरीवर्ग कांदापीक घेतो, त्यामुळे त्यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे आणि त्याच दिशेने काही संस्था कामदेखील करत आहेत. त्यातून अधिक उत्पादन कशा पद्धतीने मिळू शकते, यावर राजगुरूनगर येथे मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. 

आतापर्यंत ज्या स्थितीचा आढावा घेतला, त्यातून कांदाचा इतिहास, वाटचाल, संशोधन, लागवडीखालील क्षेत्र, महत्त्व आणि सामाजिक-राजकीय स्थान इत्यादी मुद्यांच्या आधारे पार्श्वभूमी स्पष्ट होते. कांदाक्षेत्राच्या अनुषंगाने सर्वांत महत्त्वाचा घटक शेतकरी आहे. मात्र पहिल्या लेखात कांदा आणि त्याचा भोवताल समजून घेणे आवश्यक वाटल्याने शेतकऱ्यांविषयी फार चर्चा करण्यात आलेली नाही. पुढच्या भागात शेतकऱ्यांची सद्य:स्थिती आणि अपेक्षा यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयाच्या अनुषंगाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या स्थितीचा अचूक अंदाज यायला लागतो. 

(‘कांद्याची कैफियत’ हा पाच भागांतील दीर्घ लेख क्रमश: प्रसिद्ध आहोत. हा लेख ‘रानडे इन्स्टिट्यूट, पुणे’ यांच्या वृत्तपत्रविद्या व संज्ञापन विभागाला सादर केलेल्या अहवालावर आधारित आहे. संपादक)   

Tags: शेती कांदा कांद्याची कैफियत धनंजय सानप कांद्याचा इतिहास महाराष्ट्र कृषी farming Maharashtra and onion agriculture history of onion Dhananjay sanap on kanda onion dhanajay sanap on agriculture Dhananjay sanap Onion weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

धनंजय सानप
dhananjaysanap1@gmail.com


Comments

  1. DIPAKTEMBARE- 24 Mar 2021

    कांदा पिकाला डेंगळे ,नले का येतात

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके