भाऊचे ऋण स्त्रिया अंशतःसुद्धा फेडू शकणार नाहीत. लोकोद्धाराची, समाजातील उपेक्षिताच्या उद्धाराची अशी त्यांची प्रेरणा आहे व त्याकरता सहानुभूतीने ओथंबलेली अशी निरहंकारी सेवावृत्ती स्वभावतःच त्यांना लाभलेली आहे. अशा या आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभावे या पलीकडे आम्ही काय मागणार!
‘मी आता इतकी वर्षे काम करतो आहे दहा गावातील लोकांना तरी भाऊ रानडे हे नाव माहीत आहे का?” असे भाऊ एकदा म्हणाले होते. भाऊंना मला पुन्हापुन्हा म्हणावेसे वाटते की, “भाऊ, लौकिक अर्थाने भाषणबाजी करणारे पुढारी म्हणून तुमचं नाव माहीत नसेल कदाचित् पण असंख्य तरुण मुला-मुलींच्या हृदयात ते कायमचे कोरले गेले आहे” नामवंत अशा कितीतरी पुढाऱ्यांचे ‘नाव’ हे शोभेच्या वस्तूप्रमाणे आहे! उलट भाऊंची आठवणही सतत धीर व उत्साह देणारी आहे.
अनेक स्थित्यंतरे आली व गेली. काळाच्या ओघाबरोबर भाऊ पुढेपुढेच जात आहेत. आम्हाला आपले वाटते की, आम्ही नवीन रक्ताची, नव्या जोमाची तरुण मंडळी; पण भाऊ आमच्याही पुढे असतात आणि या प्रवाहात गटांगळ्या खाऊन देतो आम्हाला मार्गदर्शन करण्याचे काम करीत असतात. भाऊ आले की खडबडून जाग येते व आळस टाकून झडझडून कामाला लागण्याची जाणीव होते. भाऊ वजा सेवापथक म्हणजे उत्तर शून्य. किंबहुना भाऊ वजा सेवादल उत्तर शून्य अशी अवस्था आज आहे. अशी अवस्था सामान्यपणे हुकुमशाही वृत्तीतून येते. पण येथे मात्र तशी परिस्थिती नाही. भाऊंची कामाची हौसच इतकी दुर्दम्य आहे की, हा सगळा कामाचा रगाडा त्यांच्या जिवावर चालतो.
भाऊ आम्हाला सांगतात की “कामे करावी सरदारीने” पण स्वतः भाऊ मात्र याच्या नेमके उलट वागतात. त्यातून भाऊंची घाई गर्दी विलक्षणच असते.. पोस्टखाते तर जणू भाऊकरताच निर्माण झाले आहे. ‘Express delivery’, ‘Late Fee Paid’, ‘तार’ ‘टेलिफोन’ ‘Reply paid’ पत्रे ही सर्व व्यवस्था भाऊंना कमीच वाटते. रोज 8-10 पत्रे तरी किमान ते लिहितात आणि आम्हालाही त्यांचे सांगणे असते की प्रत्येक पूर्णवेळ सेवकाने रोजी 8 पत्रे लिहावीत. त्याचप्रमाणे दिवसाच्याकाठी अनेक लोकांना ते भेटत असतात. कोणाकडे सेवापथकाला पैसे मागतील, कोणाला साधनेचे वर्गणीदार करतील, कोणाला सेवा पथकात यायला सांगतील, कोणाला कलापथकात बोलावतील. भेटलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून आपल्या संघटनेला काय घेता येईल किंबहुना देशसेवेची संधी प्रत्येकाला कशी मिळवून देता येईल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात काहीतरी ध्येय कसे निर्माण करता येईल हा त्यांना सतत ध्यास.
खरे म्हणजे भाऊ अभिजात शिक्षक आहेत. राजकारणातील इतिहास आणि भूगोल भाऊ सांगू लागले की गहन वाटणारे प्रश्न सोपे होतात. भाऊंचे वाचन अद्ययावत् आहे. नाहीतर प्रत्यक्ष कार्यात मनुष्य गुंतला की, त्याचे वाचन थंडावते. भाऊंची शिक्षण देण्याची पद्धती अभिनव आहे. जाता जाता ते ज्ञान देत असतात. भाऊंच्या सहवासात राहावे, प्रतिक्षण आपण काहीतरी नवीन मिळवत आहोत, समृद्ध होत आहोत याचा प्रत्यय येतो. त्यांचे ज्ञान कडी-कुलपात कधीच नसते. ज्ञान आणि कर्म यांचा सुरेख मेळ त्यांनी घातला आहे. महाराष्ट्रातील अनेक कुटुंबातून कानोसा घेतल्यास याचा अनुभव आपल्याला ऐकू येईल.
नंदुरबारला पार्वतीबाई ठकारांकडे भाऊ उतरले होते. पहाटे उठून संडास साफ करून पाणी भरून स्वारी बाहेर जावयाच्या तयारीत होती. बाह्याला खोच्यांकडे घरातील बाईची तारांबळ बघितली मात्र, तीन लहान मुलींना विहिरीवर नेऊन आंघोळ घालून पुन्हा आपण काही विशेष केलेच नाही अशा भावाने भाऊ घरात आले. अशी एक ना दोन किती उदाहरणे सांगणार? मी भाऊबरोबर किन्हईला गेले होते. दोन दिवसांनी शिबीर सुरू व्हावयाचे होते. मैदानाचा पत्ता नव्हता. “करू हो, होइल हो” या नेहमीच्या वाक्यात राहून गेले होते. लगेच खोरे, फावडे घेऊन संध्याकाळपर्यंत मैदान तयार करत आणलं भाऊंनी.
प्रवासात ‘थुंकू नका,’ असे सांगणे ही खरं म्हणजे सामान्य गोष्ट आहे. पण संकोचाने सांगायचा कोणी धजत नाही. भाऊ अडलेल्या प्रवाशाला जशी मदत करतात तसं त्यांच्या चुका दिसल्या की त्याही त्यांना सांगतात. पुन्हा भाऊंचे ते सांगणे, शिकवणे, मदत करणे, सेवा करणे सर्वच सहजस्फूर्त असते; विशेष काही केले आहे असा अहकार त्यांना वाटत नाही. यामुठेच फणसाप्रमाणे प्रथम खडबडीत वाटणाऱ्या भाऊंबद्दल काही तासांच्या सहवासांतच प्रेम वाटू लागते आणि मग मनुष्य भाऊंना चिकटतो तो कायमचाच. अशी ‘चिकटलेली’ अखंड मंडळी स्त्री-पुरुष-मुले सर्व महाराष्ट्रभर किंबहुना आणखीही इतरत्र पसरलेली आहेत.
आजकाल प्रत्येक कार्यकर्ता जणू राजा असतो, आपल्यांतच मश्गुल असतो. ‘पूर्ण वेळ सेवकत्वा’च्या अहंकारात प्रत्यक्षात काम केले काय न केले काय, वाचन केले काय न कले काय, अशीच बरीचशी वृत्ती असते. कार्यकर्त्यांबद्दल कणव असूनही भाऊ असले फाजील लाड चालू देत नाहीत, जीवनाला शिस्त असली पाहिजे व त्याकरता प्रत्येकाने रोज लेखन, वाचन, मनन, चिंतन, केले पाहिजे, व्यायाम घेतला पाहिजे, अहवाल लिहिला पाहिजे, जमाखर्च ठेवला पाहिजे, वगैरे सर्व गोष्टी भाऊ निग्रहाने सांगतात व त्याची अंमलबजावणी होते आहे की नाही इकडेही त्यांने लक्ष असते. आणि म्हणूनच नानाविध कायकर्त्यांना संघटनेच्या सूत्रात गोवण्यात त्यांना यश आले आहे. आपल्या कामाचे चीज केले जात आहे, आपले गुण ओळखले जात आहेत, आपल्या दोषांबद्दलची सूचना प्रेमळपणाने मिळत आहे, किंबहुना आपल्या विकासाला मदत केली जात आहे, संधी दिली जात आहे ही भावना कार्यकर्त्यांच्या मनात असणे हाच संघटनेचा खरा आधार आहे ना? लोकशाही संघटनेत या व्यतिरिक्त दुसरे Sanction कुठचे असू शकेल? पण दुर्दैव असे की आज या गोष्टींचा जवळपास अभावच सर्वत्र दिसतो. कार्यकर्ते तयार होत नाहीत, तयार करावे लागतात ही गोष्ट विसरली गेली आहे. या पार्श्वभूमीवर भाऊंची कार्यकर्त्यांबद्दलची एकरूपता व सहानुभूती तर अधिकच उठून दिसते. मग कोणी याची ‘कौटुंबिक जिव्हाळा’ म्हणून टिंगलही करो. आपले छोटीमोठी दुःख घेऊन रडत-रडत भाऊंकडे जायचे आणि परतायचे ते हसतमुखाने व शांत मनाने हा अनुभव तर प्रत्येकाचाच आहे. कोणाला असे वाटते की ही अजब करामत भाऊंना त्यांच्या वयामुळे साधली आहे. पण हे सारे खरे नव्हे. कारण असे आहे की, अपरंपार सहानुभूतीमुळे भाऊ दुसऱ्याच्या भावनाशी, अडचणींशी चटकन् समरस होतात. न सांगता त्यांना दुसऱ्याचे मनोगत कळते.
कोणाला वाटते की, मुली भाऊंच्या लाडक्या आहेत. पण हेही म्हणणे बरोबर नाही. मुलीच्या याला अधिक सहानुभूती येते हे खरे आहे.
पण समाजातील उपेक्षिताकडे मोठ्या माणसांच्या सहानुभूतीचा ओघ नैसर्गिक रीत्याच वाहतो. केवळ कल्पनेने भाऊंना स्त्रियांची दु:खे, त्यांच्या अडचणी कशा समजतात याचे आश्चर्य वाटते! आज महाराष्ट्रात ज्या मूठभर स्त्री कार्यकर्त्या सेवा दलात किंवा प्रजासमाजवादी पक्षात आहेत, त्याला कारण भाऊ आहेत असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती होणार नाही. स्त्रियांची दुःखे व अडचणी त्यांच्या त्यांनाच माहीत! सर्वत्र त्यांच्याबद्दल औदासीन्य! सर्व सामान्य माणसाची तर मुळी अशीच समजून असते की स्त्री ही पुरुषनिष्ठ असणे, दुबळी असणे, भीरू असणे स्वाभावक आहे. अशा अनवस्थेत स्त्रियांच्या उद्धाराकरता स्त्रियांनीच झगडले पाहिजे असे जरी नुसते म्हटले तरी प्रत्यक्षात तसे होत नाही तोपर्यंत तरी महात्माजी, फुले, कर्वे वगैरेप्रमाणे पुरुषांचे प्रयत्न व खास दृष्टी या प्रश्नाकरता लागणारच. खरोखर आज स्त्रियांची संघटना भाऊंच्या पांगुळगाड्याला घरून उभी आहे. ध्येय-धोरणातून, भाषणातून, घटनेतून ही स्त्री-पुरुष समतेच्या कितीही घोषणा केल्या तरी ही समानता कागदी राहणार आणि शब्द हवेत विरून जाणार. खास प्रयत्नाशिवाय समाज जीवनात स्त्रिया वर येणे शक्य नाही. लहान बालकाला चालण्याचे स्वातंत्र्य देऊन एकटे सोडले तरी त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होणार? यांच्या बाबतीत नेमके असेच होते. शिबिर घेतलेत तरी मुली आपण होऊन येणार नाहीत किंवा पालकही त्यांना सुखासुखी पाठवणार नाहीत. अशा वेळी भाऊ पालकांना हडसून खडसून बजावतात की घरातील मुलांनी घर सांभाळले पाहिजे व मुलींनी शिबिराला आले पाहिजे. असा खास प्रयत्न दुसरे कोणी करत नाही. समेत मुली आपण होऊन भाषण करायला उठत नाहीत. भाऊ सांगतील की तुम्हाला भाषण केलेच पाहिजे. मुलींनी भाषण केलंच पाहिजे असा दुसऱ्या कोणी कधी धरला आहे आग्रह खेड्यापाड्यांतून सभा होतात. त्या सभेला स्त्रिया आल्याच पाहिजेत असा आग्रहपूर्वक भाऊंचा प्रयत्न असतो.
भाऊचे ऋण स्त्रिया अंशतःसुद्धा फेडू शकणार नाहीत. लोकोद्धाराची, समाजातील उपेक्षिताच्या उद्धाराची अशी त्यांची प्रेरणा आहे व त्याकरता सहानुभूतीने ओथंबलेली अशी निरहंकारी सेवावृत्ती स्वभावतःच त्यांना लाभलेली आहे. अशा या आमच्या भाऊंना उदंड आयुष्य लाभावे या पलीकडे आम्ही काय मागणार!
Tags: Indumati Kelkar Bhausaheb Ranade इंदुमती केळकर भाऊसाहेब रानडे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
प्रतिक्रिया द्या