डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘कुळागर’हा निसर्गसमृद्ध गोमंतकाचा वैशिष्ट्यपूर्ण भाग. खेडोपाडी वर्षातील बारा महिने कुळागर डवरलेलं असतं. माड, पोफळी, केळ, पानवेल, मिरवेल, निरफणस, जांभूळ, पारिजात अशी वैचित्र्पूर्ण झाडं सदैव बहरलेली असतात. ‘कुळागर’या सदरात सुभाष भेण्डे, ‘साहित्य-संस्कृती’निर्मितीचं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ‘साधना’तून घडविणार आहेत.

नुकतेच कालवश झालेले मराठीतील थोर समीक्षक प्रा. म. वा. धोंड यांच्या समीक्षेची जात फार वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. सूक्ष्म संशोधनदृष्टी आणि संवेदनक्षम सौंदर्यदृष्टी यांचा प्रगल्भ संगम त्यांच्या समीक्षेत आढळून येतो. वाचन अफाट आणि स्मरणशक्ती अचाट. संशोधकाला आवश्यक असते- जिज्ञासावृत्ती आणि कल्पनाशक्ती; तर्कबुद्धी आणि सारासार विवेक. शिवाय एखाद्या विषयाचा पाठपुरावा करण्यासाठी चिकाटीही हवीच.या सर्व घटकांचा समुच्चय प्रा. धोंड यांच्या व्यक्तिमत्वात झालेला होता. एखादा प्रश्न पडल्यावर त्याचे समाधानकारक उत्तर मिळेपर्यंत त्यांना चैन पडत नसे.

विविध विषयांत त्यांना रस होता.नाटके, चित्रपट, संगीत, तमाशा, ललित साहित्य, शेअर मार्केट अशा बहुविध गोष्टींत तळापर्यंत जाण्याची त्यांची वृत्ती होती. प्रचंड व्यासंगाच्या परिणामी त्यांची लेखणी विद्वज्जड झाली नाही. लेखनशैली कधी गंभीर, कधी मिस्कील, कधी उपरोधपूर्ण तर कधी वाह्यात देखील (त्यांच्या वाह्यात लेखनाचे अस्सल नमुने पहावयाचे असतील तर जिज्ञासूंनी ‘स्वामी’आणि ‘रघुनाथाची बखर’या कादंबऱ्यांचा त्यांनी घेतलेला परामर्श एकदा डोळ्यांखालून घालावा!) ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, मर्ढेकरांची कविता यांची नित्य पारायणे चालू असत. पाठांतर जबरदस्त. संतवाङ्मयामधील संदर्भ जिभेच्या टोकावर. एखादा निसटता संदर्भ तर तपासून पाहण्यासाठी ते ग्रंथालयात तासनतास घालवीत. पुस्तकांचा ढीग त्यांच्या भोवती असे. मराठीप्रमाणेच इंग्रजी पुस्तके ते झपाट्याने वाचून काढत. समाधान होईपर्यंत महिनोन् महिने ते धांडोळा घेत. त्याबाबतीत त्यांनी कधी आळस केला नाही.

उदाहरणाने हा मुद्दा स्पष्ट होईल.
‘पै’हींवराची दाट साउली। सञ्जनी जैसी वालिली। 
तैसिं पुण्ये डावलूनी गेलीं। अभक्तांतें॥’

या ज्ञानेश्वरीतील ओवी त्यांना अडवले. ओवीचाउत्तरार्ध सहज कळला, पण पूर्वार्ध नीट उमजेना. हिवराची सावली चांगली दाट असूनही सज्जन ती टाळतात, त्याअर्थी त्यात दुर्जनाकरिता काहीतरी ‘गंमत’ (हा प्रा.धोंडांचाच शब्द) नक्कीच असली पाहिजे. ती कोणती?

धोंडांना चुटपुट लागून राहिली.हिवर पूर्ण अपरिचित, म्हणून शब्दकोश व ज्ञानेश्वरीचे निघंटू पाहिले. शिवाजीराव भावे यांचा ‘ज्ञानेश्वरी कोश’न्याहाळला.समाधान होईना. मग ते वनस्पतिशास्त्राच्या प्राध्यापकांना भेटले.(प्रा.धोंड म्हणतात, ‘ते तर बिचारे माझ्याहूनही निष्पाप! त्यांना हिवराची सावली टाळायची असते, हे तर ठाऊक नव्हतेच, पण हिवरही ठाऊक नव्हता.’) ग्रंथालयांतील संदर्भग्रंथ धुंडाळल्यावर हिवर व बाभूळ एकाच कुळातील झाडे आहेत एवढे ज्ञान झाले. हिवराची सर्व लक्षणे हळूहळू कळू लागली. प्रत्येक झाडाची पाने, फुले, फळे, शेंगा, डहाळ्या, फांद्या, खोड, विस्तार यांकडे लक्षपूर्वक पाहण्याचे वेडच लागले. (या काळात प्रा.धोंड आमच्या ‘साहित्य सहवास’ मध्ये लावलेल्या असंख्य झाडांकडे तासनतास टक लावून पहात उभे असल्याचे दृश्य सर्व रहिवाशांना दिसत असे.) 

पुढे नागपूर विद्यापीठात ते काही कामाकरिता गेले असता १८ वर्षे वयाच्या एका मुलाने हिवराचे झाड त्यांना दाखवले. ‘अकॅशिया ल्यूकोफ्लॉइआ’हे हिवराचे लॅटिन नाव असल्याचे त्यांना समजले. हिवर भेटला, पण त्याच्या सावलीला सज्जन का बसत नाहीत, हे कळले नाही. पुन्हा एकदा ते ग्रंथाला शरण गेले. जॉर्ज वॅटचा ‘डिक्शनरी ऑफ इकॉनॉमिक प्रॉडक्ट्स ऑफ इंडिया’हा बृहद् ग्रंथ पाहत असताना ‘हिवराची साल दारूकरता तयार केलेल्या रसायनात घातली तर ते लवकर फसफसते, त्यातील गाळ खाली बसतो आणि त्याला चांगला स्वाद येतो आणि म्हणून हिवराला ‘शराब की कीकर’असेही नाव आहे’, हेकळून आले. आणि ‘सज्जन’हिवराच्या सावलीला का बसत नाहीत याचा तात्काळ उलगडा आला.

तरीपण एक ‘उडाणटप्पू’प्रश्न विनाकारण सतावू लागला.हे ज्ञानदेवकालीन आणि ज्ञान आजच्या हातभट्टीवाल्यांपर्यंत पोचले असेल का? प्रा.धोंड लिहितात, ‘हातभट्टया कुठे लागत हे पोलिसांखेरीज बहुतेकांना ठाऊक होते. मलाही रात्रीच्या वेळी त्या दिसत असत; पण तिथे जाणे धोक्याचे होते. अनेक वर्षे लोटली आणि एक दिवस लक्ष्मण माने यांचे त्यावेळी नुकतेच प्रकाशित झालेले ‘उपरा’हे आत्मचरित्र वाचनात आले.त्यातील पुढील मजकुराने त्यांचे लक्ष वेधून घेतले. ‘दारू गाळण्याकरिता नवसागर आन हिवराची साल, नासका गुळ येवढंच भांडवल...’हे वाचले आणि प्रा.धोंडांचा हिवराचा शोध संपन्न झाला. कैक शतके चालत आलेली मद्यनिर्मितीप्रक्रिया महाराष्ट्राने ज्ञानदेवोत्तर काळातही  सात शतके टिकवून धरल्याचे त्यांच्या लक्षात आले ! हिवराच्या निमित्ताने झाडांचे निरीक्षण करण्याची त्यांना सवय जडली आणि ‘ज्ञानेश्वरीतील लौकिक सृष्टी’हा ज्ञानेश्वरीच्या वेगळ्या अंगाचे विवेचन करणारा अभिनव ग्रंथ आकाराला आला.ज्ञानदेव आपण घेतलेला गीतेचा अनुभव सर्वांसाठी, सभोवतालच्या लौकिक सृष्टीतल्या प्रतिमांद्वारे व्यक्त करतात. संदर्भसमृद्ध असलेल्या या लौकिक सृष्टीचा नेमका वेध प्रा.धोंड घेतात.

राम गणेश गडकरी यांच्या वाङ्मयाविषयी, विशेषतः त्यांच्या नाट्यलेखनासंबंधी, नवा विचार मांडणारे ‘चंद्र चवथिचा’हे धोंडांचे पुस्तक गडकरी-समीक्षेत मोलाची भर घालते, यात शंका नाही. ‘एकच प्याला’नाटकातील ‘चंद्र चवथिचा’या गीतावर धोंडांनी जे भाष्य केले आहे, ते त्यांच्या अद्भुत संशोधन-पद्धतीवर चांगलाच प्रकाश टाकते.सिंधू दळणाच्या वेळी हे गीत गाते. गीत छोटे आहे :
‘चंद्र चवथिचा। 
रामाच्या ग बागेमधे चाफा नवतीचा।।’

एवढेच. पाळण्यात मूल आहे आणि गर्भश्रीमंताची मुलगी सिंधू नवऱ्याच्या व्यसनामुळे विपन्नावस्था आल्याने उपाशीपोटी, फाटक्या लुगड्यात, मोलाचे दळण दळत आहे. तान्हे बाळ पोटभर दुधालाही महाग झाले आहे. अनेक वर्षे शोध घेतल्यानंतर धोंडांच्या लक्षात आले की हे पारंपरिक लोकगीत नाही. अस्सल लोकगीताचा बाज असलेला हा चरण स्वतः गडकऱ्यांनी रचलेला आहे. ‘चाफा’हे नवऱ्याचे प्रतीक.स्त्रियांच्या भावजीवनात चंद्र आणि चौथ यांना काही वेगळे संदर्भ आहेत. पहिले पंधरा दिवस कलेकलेने वृद्धी पावणारा आणि पुढील पंधरा दिवस कलेकलेने क्षीण होणारा चंद्र आणि मासिक पाळी नियंत्रित होणारा स्त्रियांचा कामविकार यात काही साम्य आहे, असे प्रा.धोंड यांचे म्हणणे. चतुर्थ दिवस स्त्रीच्या बाबतीत विशेष महत्त्वाचा. त्या विशिष्ट दिवशी सिंधूचा जीव मोहरून गेलेला आहे. सुधाकराचे ती चिंतन करते आहे. ‘हा नवतीचा चाफा तिच्या सर्व अतृप्त इच्छा तृप्त करणार असतो- म्हणून तर तिला ‘चंद्र चवथिचा’ हे जुने गीत आठवते, असे प्रा.धोंड नमूद करतात. हा आगळावेगळा संशोधक जाणीवेत जे हाती लागते तेवढे थावर थांबत नाही- अर्धस्फुट नेणीवेत तळापर्यंत जाण्याची त्याची जिद्द असते हेच खरे!

आपले संशोधन हा त्या विषयावरचा अखेरचा शब्द नव्हे, याची त्यांना जाणीव होती. किंबहुना वेळप्रसंगी आपण काढलेल्या निष्कर्षातील त्रुटी प्रा.धोंड स्वतःच शोधून काढत.मर्ढेकरांची ‘पिंपात मेले ओल्या उंदीर’ या गाजलेल्या कवितेचा त्यांनी ऑगस्ट १९६७ साली ‘सत्यकथे’त लेख लिहून अर्थ लावला होता. ‘दंभहारक’मासिकात १८७५ साली ‘उंदरांचा उपद्रव आणि त्यांचा नाश करण्याचा उपाय’हा लेख प्रसिद्ध झाला होता. या लेखातील एका उताऱ्यामुळे मर्ढेकरांच्या प्रस्तुत कवितेतील प्रतिमेचा आशय स्पष्ट होतो, असे प्रा.धोंडांना वाटले. त्यानंतर जवळजवळ २७ वर्षांनी धोंडांनी ‘पुन्हा एकदा पिंपात मेले’हा लेख लिहून आधी केलेले कवितेचे विश्लेषण चुकीचे असल्याचे मोकळेपणाने मान्य केले. उंदीर, ओली पिंपे या केवळ प्रतिमा आहेत हे त्यांनी अधोरेखित केले. कवितेच्या अंतरंगाला भिडण्यासाठी रॉबर्ट बर्न्सची‘टू अ माउस’ही कविता, स्टाइनबेकची ‘ऑफ माउस अॅण्ड मेन’ ही कादंबरी, ‘रॅट-रेस’हा शब्दप्रयोग आणि ‘बॅरल’व ‘वेट’या इंग्रजी शब्दांचे लाक्षणिक अर्थलक्षात घ्यावे लागतात यांवर त्यांनी भर दिला. अन्यसमीक्षकांनी ‘पिंपात मेले ओल्या उंदिर’ कवितेचा अर्थ कसा चुकीचा लावलेला आहे, हे स्पष्ट करायला ते विसरले नाहीत!

गेली काही वर्षे त्यांना तुकाराम आणि मर्ढेकर या दोन महाकवींनी झपाटून टाकले होते. मर्ढेकरांच्या कवितांचा केवळ अन्वयार्थ लावून त्या कळत नाहीत, त्यांच्या कवितांच्या दोन ओळींदरम्यान दडलेला अर्थ शोधून काढावा लागतो, ‘बिटवीन द लाईन्स’काय आहे हे धुंडाळावे लागते. यावर त्यांनी भर दिला. ‘बन बांबूचे पिवळे गाते। आकाशातील अधोरेखिते।’सारख्या कविता. त्या कविता लिहिल्या गेल्या त्यावेळची सामाजिक, आर्थिक, राजकीय परिस्थिती समजून घेतल्याशिवाय कळणार नाहीत, असा त्यांचा दावा होता.राजकीय परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी ते आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही वेध घेत. कवीच्या कौटुंबिक जीवनात काय घडत होते आणि त्या घटनांचे प्रतिबिंब कवितेत पडले आहे काय, याचा ते बारकाईने शोध घेत. मर्ढेकरांसारख्या संवेदनशील कवीच्या वैयक्तिक जीवनात निर्माण झालेल्या वादळाचे पडसाद त्यांच्या कवितेत उमटल्याशिवाय राहणारनाहीत, असे गृहित धरून त्या अनुरोधाने त्यांच्या संशोधनाचा प्रवास चालू राहत असे.

निधनापूर्वी त्यांचे दोन लेख ‘दीपावली’आणि ‘ललित’दिवाळी अंकांत प्रसिद्ध झाले. पहिला लेख ‘तुकोबांचे निर्याण’ या विषयावरचा. वयाच्या अवघ्या बेचाळिसाव्या वर्षी तुकोबांचे निधन झाले. त्यांचे निर्याण कसे झाले, याविषयी संशोधकांत तीव्र मतभेद आहेत. ब्राह्मणेतर चळवळीच्या प्रचारकांनी त्यांचा खून झाला आणि ते नीच कृत्य देहूच्या ब्राह्मणांनी केले असे म्हटले आहे, तर तुकोबांच्या वंशजांनी ते ‘सदेह वैकुंठाला गेल्याचा’दावा केला आहे. (‘प्रभात’ च्या ‘संत तुकाराम’चित्रपटात सदेह वैकुंठगमनाचे मनोरम दृश्य आवर्जून दाखवण्यात आले होते!) प्रा.धोंड यांनी हे दोन्ही निष्कर्ष नाकारून तुकोबा देहूहून पंढरीला गेले आणि माऊलीची अखेरची भेट घेऊन परागंदा झाले, असे मत पुरावे देऊन व्यक्त केले आहे.

‘ललित’मधला लेख“कुठली सीता कुठला राघव! आणि कुठले रामराज्य!”या दीर्घ शीर्षकाचा आहे. मर्ढेकरांच्या ‘खप्पड बसली फिक्कट गाल’या झोपडपट्टीवरच्या कवितेचासंदर्भ घेऊन १९४८ साली म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर वर्षभरात लिहिलेल्या या कवितेचा संबंध धोंडांनी आजच्या काळाशी जोडला आहे. ‘स्वराज्य म्हणजे रामराज्य’ही महात्मा गांधींची घोषणा, आज स्वराज्य मिळून ६० वर्षे झाली. पण जिथे राज्याधिकारी, कारभारी, बिल्डर भ्रष्टाचारास प्रवृत्त होतात तिथे कुठली सीता, कुठला राघव नि कुठले रामराज्य! मर्ढेकरांसारखा कवी द्रष्टा असतो, दिक्कालांतुनि आरपार पाहू शकतो, हे प्रा.धोंड यांनी अधोरेखित केले आहे.

त्यांचे काम अखेरचा श्वास घेईपर्यंत चालू होते.ही चिकित्सक धडपड आणि दुर्मिळ अस्वस्थपणा त्यांच्या जाण्याने संपला...

Tags: स्मृतीलेख समीक्षा मराठी साहित्य म वा धोंड चंद्र चवथिचा सुभाष भेण्डे अलौकिक चिकित्सक kulagar subhash bhende mardhekar b s m v dhond subhash bhende on m v dhond weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुभाष भेण्डे

लेखक, कादंबरीकार, नाटककार


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके