डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

आणि मग मी राष्ट्र सेवादलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो...

सेवादलातील अनेकांच्या मनात 'नको ते राजकारण' अशी भावना निर्माण होऊन सेवादल हळूहळू अराजकीय होत गेले. अशा पार्श्वभूमीवर भाई वैद्य राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष झाले. त्यांनी पहिल्याच सभेत 'राष्ट्र सेवा दल ही निवडणुका न लढवणारी, परंतु राजकीय संघटना आहे', असे जाहीर केले. राष्ट्र सेवादलाला आता अपेक्षित दिशा आणि गती देणे शक्य आहे, असे मला वाटू लागले आणि मग मी राष्ट्र सेवादलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो...

छात्रभारती विद्यार्थी संघटनेतच माझ्या सार्वजनिक कामाचा आरंभ झाला. राष्ट्र सेवादलाने सुरू केलेल्या या विद्यार्थी संघटनेने सातत्याने शिक्षणातल्या 'नाही रे' वर्गाच्या हितसंबंधांच्या रक्षणाची भूमिका घेतली. सार्वजनिक कामातल्या उमेदवारीचा काळ मी कराडच्या विद्यानगरीतल्या शैक्षणिक संकुलात घालवला. तेथे मी औषधनिर्माणशास्त्राची पदवी (बी.फार्मसी) मिळवली. तेथेच शासकीय औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात डी.फार्मसीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षे शिकवले आणि छात्रभारतीला पूर्णवेळ देता यावा यासाठी नोकरी सोडली. 

ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एस.टी.चे वेळापत्रक अनुकूल करून घेणे, गावाकडून जेवणाचे डबे मागवणाच्या विद्यार्थ्यांच्या डब्यांसाठी बसमध्ये स्वतंत्र सोय करून घेणे, महाविद्यालयांत सायकल स्टँडची सुविधा मिळवणे, ग्रंथालयातून दर्जेदार पुस्तके पुरेशा प्रमाणात सर्वांना मिळावीत, अशा छोट्या-छोट्या संघर्षांपासून ते दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांची फी माफ करून घेणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ करून घेणे, रात्रशाळांचे अनुदान सुरू रहावे, एकशिक्षकी प्राथमिक शाळा दोनशिक्षकी व्हाव्यात, अशा राज्य सरकारशी संबंधित प्रश्नांवरही त्या काळात लढे करावे लागले. त्यातले अनेक यशस्वीही झाले.

ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी अशा प्रकारचे संघर्ष तर आम्ही केलेच; पण 'अवघड विषयांचा अभ्यास कसा करावा?' 'इंग्रजी कसे बोलावे?' असे वर्गही चालवले. परीक्षाकाळात दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठी जेवण व निवासाची सोय करणे असे काही रचनात्मक उपक्रमही आम्ही राबवले.

प्रत्येक मोहिमेच्या, आंदोलनाच्या, मोर्चाच्या प्रचारासाठी भिंती रंगवणे हा कार्यक्रम आम्ही आवर्जून करायचो. मी स्वतः अनेक शहरांमध्ये कार्यकर्त्यांसोबत रात्र-रात्र जागून भिंती रंगवल्या आहेत. त्यामुळेच मी गमतीने कधी-कधी म्हणतो, "रात्री भिंती रंगवताना भेटलेले विविध शहरांतील दारूडे" या विषयावर मी सहजपणे तासभर बोलू शकेन. भिंती रंगवण्याच्या कामी आताचे कार्यकर्ते उत्साह दाखवत नाहीत. जागतिकीकरणाच्या झगमगाटात चळवळींचेही रूप पालटत आहे. पण मला मात्र अजूनही वाटते की आपले मुद्दे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठीसुद्धा अशाच कमी खर्चाच्या माध्यमांचा विचार केला पाहिजे.

छात्रभारतीत काम करताना आम्ही शैक्षणिक उपक्रमांसोबतच अन्य सामाजिक विषयांनाही सतत प्राधान्य दिले. नर्मदा बचाओ आंदोलनाला प्रत्यक्ष मैदानातला सक्रिय सहभाग दिला. छात्रभारतीने गुटखाविरोधी मोहीम राबवली. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना हक्कासोबत कर्तव्याचे भान देणारी "कॉपी करणार नाही, करू देणार नाही" ही मोहीमही राबवली. अंधश्रद्धांच्या विरोधात पथनाट्यापासून ते व्याख्यानापर्यंतच्या अनेक उपक्रमांचे आयोजनही आम्ही कराड परिसरात केले. 

त्याबाबतीत माझा एक गमतीदार अनुभव आहे. दक्षिण महाराष्ट्रातील देवदासी व पोतराज प्रथा सर्वांना माहीत आहेत. लहानपणी अस्वच्छता आणि केसांच्या अपुऱ्या पोषणामुळे केसांचा गुंता होऊन केसांमध्ये बट येते, जी वाढत वाढत जटेचे स्वरूप धारण करते. मुलाच्या केसात बट आली तर त्याला 'पोतराज' म्हणून आणि मुलीच्या केसात बट आली तर तिला 'देवदासी' म्हणून, देवीच्या चरणी वाहण्याची प्रथा आहे. कर्नाटकातून आलेल्या ऊस तोडणी मजुरांची एक वस्ती कराडला होती. त्या वस्तीशी आमचा नियमित संपर्क होता. तिथे पाच-सहा मुलामुलींच्या केसात अशी बट आली होती. अशा मुलामुलींचे जटानिर्मूलन करून त्यांना देवदासी / पोतराज होण्यापासून वाचवायचे असे आम्ही ठरवले. दररोज कॉलेज संपले की आम्ही सायकलवर टांग मारून ती वस्ती गाठायचो आणि त्या मुलामुलींच्या पालकांना जटानिर्मूलनासाठी तयार करायचो. बरेच पालक लगेच तयार झाले, परंतु एका मुलीचे आईवडील काही तयार होईनात. 'आई यल्लम्माचे हे प्रकरण आहे; तिचा कोप होईल', या समजुतीतून ते काही केल्या बाहेर पडेनात. बऱ्याच दिवसांच्या प्रयत्नांनंतर ते एका अटीवर तयार झाले. मी स्वतः यल्लम्मादेवीच्या देवळात येऊन नाक घासून "हे पाप मी करत आहे, मुलीच्या आईवडलांचा यात काही संबंध नाही. 

यल्लम्मा आईचा जो काही कोप असेल तो माझ्यावर होऊ दे", असे म्हणालो तरच ते जटानिर्मूलनाला तयार होते. माझ्या मनात संभ्रम निर्माण झाला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे करणे म्हणजे माझ्या वैचारिक निष्ठेच्या विरुद्ध होते आणि तसे करणे नाकारावे तर मुलीच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न होता. काहीवेळानंतर मी शुद्ध तत्त्वनिष्ठ भूमिका सोडून, वस्तीतल्या लोकांसमवेत देवळात गेलो. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पापाची कबुली देऊन, ते स्वतःच्या डोक्यावर घेतले आणि दुसऱ्या दिवशी इतर मुलामुलींसोबत त्या मुलीचेही जटानिर्मूलन केले. 

जमीनस्तरावर काम करताना कार्यकर्त्यांना अनेकवेळा असे व्यावहारिक मार्ग काढावे लागतात. पुढे काही दिवसांनी त्या जटानिर्मूलन केलेल्या मुलामुलीपैकी एक मुलगा आजारी पडला. तेव्हा त्या मुलाला काही होऊ नये म्हणून आमची धावपळ उडाली; कारण मुलाला काही झाले तर यल्लम्मा आईचा कोप झाला असेच बोलले जाणार होते. म्हणून तो मुलगा बरा होईपर्यंत आम्ही सतत त्याचा पाठपुरावा केला.

किल्लारी भूकंपानंतर मी दोन वर्षे त्याच भागात राहून भूकंपग्रस्तांना मदत व पुनर्वसन कामात मदत केली. विशेषतः 'पूनर्वसन नीती कशी असावी' यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले. नवीन पूनर्वसित गावांमध्ये जातवार वस्त्या असू नयेत, मिश्र वस्त्या असाव्यात असा आग्रह धरला; पण यश आले नाही. 

शासकीय अधिकाऱ्यांनी पुनर्वसन करावयाच्या गावांची यादी तयार करताना - 'ज्या गावात मयत झाली त्या गावांचे पुनर्वसन' असा सोपा निकष लावला होता. त्यामुळे "75% घरे शाबूत, पण एक मयत" अशी गावे पुनर्वसनाच्या यादीत; आणि 75% घरे पडलेली - अनेक लोक जन्माचे जायबंदी, पण एकमेकांच्या मदतीला धावल्याने गावात एकही मयत नाही' अशी अनेक गावे पुनर्वसन यादीत नाहीत; अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली. 'आमच्या गावात त्या रात्री आम्ही एकाला तरी मरू द्यायला पाहिजे होते' असा विकृत विचार करायला लोकांना शासनाने प्रवृत्त केले. आम्ही त्याविरोधात लोहारा (उस्मानाबाद) येथे 'उपेक्षित भूकंपग्रस्त परिषद' घेतली. जागतिक बँकेच्या पदाधिकार्यांसमोर शिष्टमंडळ नेऊन यासंदर्भात मत मांडले. त्यामुळे शासकीय पुनर्वसन धोरण काही प्रमाणात बदलण्यात आम्ही यशस्वी झालो.

नैसर्गिक आपत्तीत सापडलेले लोक सुरुवातीचे दोन-तीन दिवस एकमेकांच्या मदतीला धावतात. आपत्तीमुळे 'समाज मतभेद विसरला' असे चित्र निर्माण होते; परंतु जसजसा बाहेरून मदतीचा ओघ सुरू होतो, तसतसा माणसांच्या नेहमीच्या स्वार्थी प्रवृत्ती जाग्या होतात. परदेशी मदतीमुळे तर अनेक नवे प्रश्न, नव्या विकृती ग्रामीण समाजात निर्माण होतात, हे मी त्या दोन वर्षांत जवळून अनुभवले. 

गावात सर्वांची आर्थिक परिस्थिती समान नाही; त्यामुळे पुनर्वसन करताना मदतीचे प्रमाण "दलित भूमिहीन शेतमजुरांना अधिक, अल्पभूधारक कुणब्यांना मध्यम आणि पाटील-वतनदारांना थोडे कमी" हा फॉर्म्यूला एका गावात मंजूर करून घेण्यासाठी मी एक महिना दररोज रात्री बैठका घेतल्या. रात्री माझ्यासमोर मंजूर झालेले नियम दिवसा मी नसताना नाकारले जायचे. शेवटी वतनदार पाटलांच्या दबावाने दलित भूमिहीन शेतमजुरांनीच माझा फॉर्म्यूला नाकारला. 'तुम्ही घरे बांधून निघून जाल, पण आम्हांला याच गावात रहायचे आहे; तेव्हा जे द्यायचे ते सर्वांना सारखे द्या', अशी गणिती समानता मला त्या गावाने शिकवली. शेवटी त्या गावात घरे न बांधता आम्ही एका खादी ग्रामोद्योग संस्थेत काम करणाऱ्या विधवा, परित्यक्ता आणि गरीब स्त्रियांना घरे बांधून दिली.

जमीनस्तरावर काम करणे आणि तात्त्विक भूमिका घेणे, यात जमीन आसमानाचे अंतर असते; हा अनुभव मी आदिवासी भागातही घेतला आहे. भीमाशंकर आदिवासी भागातील महाराष्ट्र आरोग्य मंडळाच्या विकास प्रकल्पासाठी मी तीन वर्षे काम पाहिले. तेव्हाही मानवी स्वभावांचे, ग्रामीण शहाणपणाचे आणि खोचक वृत्तीचेसुद्धा अनुभव घेतले आहेत. आमच्या विकास प्रकल्पाचा एक नियम होता. 'ज्या गावात एकी नसेल त्या गावात विकास कामे करायची नाहीत.' चाळीस घरांची एक आदिवासी वाडी होती. त्या वाडीत काही कटकटी होत्या, म्हणून आमची संस्था तिथे विकास कामे करत नव्हती. एकदा त्या वाडीतील लोक संस्थेच्या ऑफिसवर येऊन मला भेटले आणि आमचा नियम कसा चुकीचा आहे', हे त्यांनी मला समजावून दिले. त्या वाडीतील चाळीसपैकी पस्तीस कुटुंबे, एकत्रित गुण्यागोविंदाने रहात होती. 'त्यातल्या त्यात बरे' अशा पाच कुटुंबांना मात्र मस्ती होती. 

त्यांच्या बऱ्या परिस्थितीमुळे त्यांना संस्थेच्या विकासकामांची गरज नव्हती. गावातल्या सर्व कटकटींचे मूळ, ही पाच कुटुंबे होती; पण त्यांच्या मस्तीचा फटका उरलेल्या 35 गरजू कुटुंबांना बसत होता. संस्था मात्र 'गावात एकी असली पाहिजे' या तात्त्विक भूमिकेवर ठाम होती. (अराजकीय भूमिकांचा हा परिणाम असतो.) आम्ही नंतर त्या वाडीत पाच मस्तवाल कुटुंबांना टाळून विकास कामे सुरू केली. गावपातळीवर जमीनस्तरावर काम करत असताना मानवी स्वभावाबाबत, त्याच्या कंगोऱ्यांबाबत जे कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण होते, ते फार फार उपयोगी असते.

विद्यार्थी अवस्था संपल्यावर मी राष्ट्र सेवा दलासाठी काम करू लागलो, अनेक उपक्रमात सहभागी झालो. राष्ट्र सेवादलाने अनेक संघटनांना कार्यकर्ते पुरविले. छात्रभारती उभी राहण्यासाठीसुद्धा सेवादलाने गुंतवणूक केली. माझा प्रवास मात्र छात्रभारतीकडून राष्ट्र सेवादलाकडे, एका अर्थाने घटक संघटनेकडून मातृसंघटनेकडे असा झाला आहे. समाजवादी पक्षातील फाटाफुटीचा त्रास सेवादलालाही झालेला असल्यामुळे सेवादलातील अनेकांच्या मनात 'नको ते राजकारण' अशी भावना निर्माण होऊन सेवादल हळूहळू अराजकीय होत गेले. अशा पार्श्वभूमीवर भाई वैद्य राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष झाले. त्यांनी पहिल्याच सभेत 'राष्ट्र सेवा दल ही निवडणूका न लढवणारी, परंतु राजकीय संघटना आहे', असे जाहीर केले. राष्ट्र सेवादलाला आता अपेक्षित दिशा आणि गती देणे शक्य आहे, असे मला वाटू लागले आणि मग मी राष्ट्र सेवा दलाचा पूर्णवेळ कार्यकर्ता झालो. राष्ट्र सेवा दल पत्रिकेच्या संपादनाचे काम काही वर्षे पाहिले. नंतर राष्ट्रीय संघटक म्हणून काम केले. भाई वैद्यांच्या नंतर राष्ट्र सेवादलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारीही माझ्यावर सोपवली होती. आज मी सेवादलाचा कार्यकारी विश्वस्त म्हणून काम पहात आहे.

राष्ट्र सेवा दलाच्या वतीने आम्ही अयोध्या संवाद यात्रा' 2001 साली काढली. तो एक अनोखा अनुभव होता. उत्तरप्रदेशमध्ये भाजप राजवट होती. विश्व हिंदू परिषद जोरात होती. रामजन्मभूमी अभियानाचा बोलबाला होता. अशा काळात आम्ही अयोध्येपासून 70 कि.मी. अंतरावरील परिसरात पदयात्रा करत धार्मिक सलोखा आणि धर्मनिरपेक्षतेची चर्चा लोकांशी करीत होतो. लोकांना समजावून सांगत होतो. पदयात्रेच्या काळात कार्यक्रमाचे, जेवणाचे, निवासाचे कसलेही नियोजन नव्हते. आपणच श्रोते मिळवायचे, आपणच भाषण करायचे आणि अंधार पडला की निवासाची सोय कुठे होते का बघायचे. असे असूनही पाच दिवसांत आम्ही बसअड्डयांवर, रेल्वेस्टेशनवर, चहा टपऱ्यांवर आणि शाळा-कॉलेजांत जाऊन हजारो लोकांशी संपर्क साधू शकलो, चर्चा करू शकलो. आमची मते अनेक लोकांना पटवून देऊ शकलो. आम्हीही लोकांकडून बरेच काही शिकलो. माझ्या टीमसाठी तो अनुभव अविस्मरणीय आहे.

2002 साली आम्ही गुजरातमध्ये जाऊन विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी आणि भाजपच्या विरोधात जाहीर सभा घेऊन प्रचार केला. निवडणुकीत भाजप आणि मोदींना मोठा विजय मिळाला. मात्र काही राजकीय पक्ष वगळता, संघटना म्हणून फक्त राष्ट्र सेवा दलाने थेट भाजपविरोधी प्रचार केला, ही नोंद घेण्यालायक बाब आहे. राष्ट्र सेवादलाच्या वतीने आम्ही 'सावित्रीच्या लेकी आम्ही, मागे आता राहणार नाही असे म्हणत महिला-मेळाव्याची हाक दिली. सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी नायगाव येथे 3 जानेवारी 2002ला किमान 1000 युवती महिला संघटित करायच्या असा संकल्प करून आम्ही कामाला लागलो. ती घोषणा इतकी चपखलपणे महिलांच्या मनाला भिडली की प्रत्यक्षात साडेतीन हजार युवती महिलांनी मेळाव्याला उपस्थिती लावली. सर्व नियोजन कोलमडून पडले; पण नियोजन कोलमडून पडण्यातलाही वेगळाच आनंद आम्ही अनुभवला. 

मागील सहा वर्षांत राष्ट्र सेवादलाने संघटनात्मक आघाडीवर अधिक दमदारपणे वाटचाल सुरू केली आहे. त्याच्या जोडीला संघटनेने जी दिशा ठळकपणे पकडली आहे, ती मला अधिक महत्त्वाची वाटते. आरक्षण हक्क संघर्ष समितीमधील सहभाग, कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमी हक्क संघर्ष समितीच्या कामकाजातील पुढाकार, जातिअंताचा कृतिकार्यक्रम निश्चिती, अशा अनेक उपक्रमांतून राष्ट्र सेवा दल 'नाही रे' वर्गाबरोबरची बांधीलकी अधिक स्पष्ट करत आहे. दुसऱ्या बाजूला, जनआंदोलनात राष्ट्र सेवा दल सैनिकांचा सहभाग वाढतो आहे. 

असंघटित कष्टकऱ्यांसाठी सामाजिक सुरक्षा कायदा झाला पाहिजे, आदिवासी वनाधिकार विधेयक मंजूर झाले पाहिजे, सेझसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेता कामा नयेत, कर्जमाफी ते शेतमालाला रास्त भाव हे शेतकऱ्यांचे कळीचे प्रश्न मार्गी लावून, शेती आणि शेतकरी वाचवले पाहिजेत; या मागण्यांसाठी जी समविचारी जनआंदोलने सुरू आहेत, त्या सर्वांत राष्ट्र सेवादल सैनिक आघाडीवर आहेत. थोडक्यात, स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्र सेवादलाने युवक-युवतींना प्रशिक्षित आणि प्रेरित करून स्वातंत्र्यलढ्यात भाग घ्यायला प्रोत्साहन दिले. आज अजेंडा बदलला आहे. समता प्रस्थापना हा अग्रक्रमाचा विषय झाला आहे. त्यामुळे युवक-युवतींना विषमता निर्मूलनाच्या आघाडीवर कार्यरत होण्यासाठी आणि समविचारी जनआंदोलनांना बळ देण्यासाठी राष्ट्र सेवादलाने आपली सर्व शक्ती एकवटली पाहिजे. ही दिशा राष्ट्र सेवादलाने स्वीकारली त्यात अनेक सहकाऱ्यांसोबत माझाही वाटा आहे, याचा मला अभिमान वाटतो. पण शेवटी एक महत्त्वाचा मुद्दा मांडणे मला आवश्यक वाटते.

1990 पासून मी छात्रभारती व राष्ट्रसेवादलासाठी पूर्ण वेळ काम करीत आहे. यापुढेही सार्वजनिक कार्यात सक्रिय राहण्याचा निर्धार आहे. हे मी करू शकतो याचे कारण माझ्या घरच्यांचा आणि विशेषतः पत्नीचा सक्रिय पाठिंबा हे आहे. मी पूर्ण वेळ कार्यकर्ता झाल्यानंतर तीन वर्षांनी आमचे लग्न झाले. म्हणजे सर्व काही समजून-उमजून पत्नीने मला स्वीकारले आहे. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सार्वजनिक कार्यात आर्थिक लाभाची अपेक्षा नसली तरी त्यातून मिळणारा सन्मान, प्रतिष्ठा, आदर हा वेगळ्या प्रकारचा फायदा असतोच; किंबहुना सार्वजनिक कार्यामागील अनेक प्रेरणांपैकी ती एक प्रबळ प्रेरणा असते. परंतु अशा पद्धतीचा कोणताही लाभ मिळत नसताना काही कार्यकर्त्यांच्या पत्नी त्यांना स्वीकारतात आणि स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा लोप करून घेतात. त्यांचं आमच्या यशातील श्रेय आम्हा कार्यकर्त्यांपेक्षा मोठं असतं, पण ते कधीही प्रकाशात येत नाही, हे नम्रपणे नमूद करतो.

Tags: उपेक्षित भूकंपग्रस्त परिषद' व्यावहारिक मार्ग देवदासी' पोतराज प्रथा छात्रभारती विद्यार्थी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके