डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

मी सार्वजनिक जीवनात सक्रिय कसा झालो?

प्रयत्नपूर्वक वेगळी वाट चोखाळून यश मिळवता येतं आणि ज्यांना असं यश मिळालंय त सहजासहजी मिळालेलं नाही' ही वस्तुस्थिती तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'व्यासपीठ' हे सदर आम्ही चालवीत आहोत. व्यक्तिगत जडणघडण, जीवनविषयक दृष्टिकोन आणि आजच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य या तीन घटकांच्या अनुषंगाने लेखक, प्रशासक, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना या सदरात तीन लेख लिहिण्यासाठी आमंत्रित केलं जातं. या महिन्यात 'व्यासपीठ 'मध्ये लिहिणार आहेत - सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष वारे.

अहमदनगर जिल्हा आणि मराठवाड्यातील बीड जिल्हा यांच्या सीमेवरच्या जामखेड तालुक्यातील एका खेड्यात मी जन्माला आलो. अहमदनगर जिल्ह्याचा हा भाग स्वातंत्र्यापूर्वी निजाम संस्थानात मोडायचा. त्यामुळे या भागाची सांस्कृतिक-सामाजिक जडणघडण मराठवाड्याशी मिळतीजुळती आहे. जामखेड हा कायम दुष्काळी तालुका. 

सिंचनाच्या सोई नाहीत, पाऊस जेमतेम. जिल्ह्याच्या राजकारणात उत्तरेकडील कोपरगाव, संगमनेर, श्रीरामपूर या तालुक्यांतील राजकारण्यांचा वरचष्मा. त्यामुळे विकासकामांबाबत जामखेड- पाथर्डी-शेवगाव या तालुक्यांकडे कायम दुर्लक्ष. जामखेड-कर्जत विधानसभा मतदासंघ हा राखीव असल्याने, जिल्ह्यातील दिग्गज साखरसम्राटांना या तालुक्याच्या विकासात रस नाही. त्यामुळे मोठ्या शिक्षणसंस्था नाहीत, कारखाने नाहीत. शेती संपूर्णपणे जेमतेम पडणाच्या पावसावर अवलंबून; याचा अपरिहार्य परिणाम आर्थिक विकासावर आणि अर्थातच सांस्कृतिक जीवनावरही.

सामाजिकदृष्ट्या हा भाग मराठवाड्याशी संलग्न. हैदराबादच्या निजामाच्या संस्थानात असल्याने स्वातंत्र्यपूर्व काळात स्टेट काँग्रेसच्या अधिपत्याखाली हा भाग यायचा; पण स्टेट काँग्रेसही या भागात फारशी प्रभावी नव्हती, त्यामुळे लहानपणी स्वातंत्र्य चळवळींबद्दल मला फारसं काही ऐकायला मिळालंच नाही. ऐकायला मिळालं ते गोर्या इंग्रज सैनिकांबद्दल, त्यांच्या रुबाबाबद्दल, त्यांच्याबद्दलच्या भितीबद्दल आणि मनाला येईल तेव्हा शेतामधून ते मनसोक्तपणे नेत असलेल्या हरभरा-हुरङ्याबद्दल. पण त्यांच्या विरोधात कुठे काही हालचाल, बंड झाले नाही. स्वातंत्र्यानंतर निजामसंस्थान भारतात विलीन करण्यासाठी चळवळ झाली. 

निजामाच्या रझाकार सेनेबद्दल आणि त्यांच्या अत्याचारांबद्दल लोकांत असंतोष होताच, तो त्या प्रसंगी उफाळून आला. रझाकाराना आणि पर्यायाने निजामी राजवटीला हाकलून देण्यासाठी चळवळी झाल्या. रझाकारांच्या पुढाऱ्यांची घरे गावातल्या हिंदू पुढाऱ्यांनी लुटली. सर्वसामान्यांच्या कष्टाची संपत्ती एका शोषकाच्या घरातून दुसऱ्या शोषकाच्या घरात गेली. या चळवळीला अपरिहार्यपणे हिंदू-मुसलमान द्वेषाची किनार होती.

या भागातल्या जमीन वाटपात कमालीची विषमता. गावातल्या प्रमुख पंधरा-वीस मराठा (स्वतःला शहाण्णवकुळी समजणाच्या) कुटुंबांकडे जवळपास 60% जमीन आणि उरलेली 40% जमीन ही गरीब मराठा, माळी व अन्य ओ.बी.सी. जातींकडे. यातील गरीब मराठा कुटुंबे खरेतर कुणबीच, परंतु त्यांनाही शहाण्णवकुळी खोट्या अस्मितेचा वास लागलेला. शेतजमीनीचे हे विषम वाटप असूनही माझा अनुभव असा आहे की, 300 एकरवाल्या जमीनदारापेक्षा आणि 52 एकरवाल्या मोठ्या शेतकऱ्यापेक्षा - पाच एकरपर्यंतच्या छोट्या शेतकऱ्यांचं दरएकरी उत्पादन जास्त असायचं. 

गावातील ढोबळमानाने 40% समाज हा दलित भूमीहिन शेतमजूर किंवा बलुतेदार. सत्तरच्या दशकात मी मोठा होत असताना इथली व्यवस्था ही परंपरागत गावगाड्याच्या पद्धतीने, बलुतेदारी प्रथेने सुरु होती. बाबासाहेब आंबेडकरांची दलित अस्मितेची चळवळ गावात पोहोचली होती. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीमुळे निर्माण झालेला दलित सवर्ण संघर्ष आणि विद्वेष इथेही पोहोचला होता; पण दलित चळवळ एकसंध नसणे, दलित पुढारी काँग्रेसच्या या ना त्या नेत्याकडे बांधील असणे या बाबी त्याकाळीही असल्याने, सर्व दलित जाती एकत्रितपणे विकास साधताहेत असे चित्र कधीच दिसले नाही. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जात नसली तरी सवर्ण घरांतून अस्पृश्यतेची मानसिकता आणि व्यवहारही मोठ्या प्रमाणावर होत होता; आजही त्यात फारसा बदल झाला असेल असे वाटत नाही.

एकूणच आमच्या भागातील सामाजिक, सांस्कृतिक जीवन कुंठित- निष्क्रिय असंच वाटायचं. गावातील मोठे जमीनधारक मराठा कुटुंबेही स्वतःच्या स्थितीबद्दल असमाधानी आणि अस्वस्थ असायची. या स्थितीतून बाहेर पडायचे असेल तर परंपरागत संकुचितपणा सोडून विशाल दृष्टिकोन बनवायला हवा. जन्माच्या आधारे माणसामाणसात भेद न करता "मानव तितुका एकच आहे" ही भूमिका घेऊन, विकास आणि आर्थिक प्रगती साधायचा प्रयत्न केला पाहिजे असा विचार कुठेही दिसत नव्हता. 

माझे वडील निवृत्त शिक्षक. शिक्षकांचे पगार आता फारच चांगले आहेत; पण पूर्वी शिक्षकांचे पगार फारच कमी असायचे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ जाहीर झाली की राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनाही ती वाढ आपोआप मिळणार, असा निर्णय शरद पवार यांच्या पुलोद मंत्रीमंडळाने 1978 साली घेतला. शिक्षकांची परिस्थिती त्यानंतर सुधारली. (इतकी सुधारली की आज ग्रामीण भागातील निम्मी खाजगी सावकारी शिक्षकच चालवत असतील.) तीन एकर जिराईत जमीन आमच्यासाठी 'असून नसल्यासारखीच' होती. 

त्यामुळे घरात आर्थिक विवंचना मोठी असायची. 1972च्या दुष्काळात वडील वगळता आमचं सर्व कुटुंब रोजगार हमी योजनेच्या कामावर जायचं. मी लहान होतो. मी प्रत्यक्ष काम केले नाही, परंतु आई आणि मोठ्या भावाबरोबर मी सुद्धा दिवसभर रो.ह.यो.च्या कामावर असायचो. शनिवारी मजुरी वाटपाच्या वेळी मिळणारा 'सुकडी' नावाचा खाऊ म्हणजे आमच्यासाठी पर्वणी असायची. त्यानंतरच्या काळात मोठ्या शेतकऱ्यांच्या शेतावर मिरच्या, भुईमूगाच्या शेंगा तोडण्यासाठी किंवा ज्वारीच्या खळ्यावर आम्ही कामाला जायचो आणि आईला भरपूर मदत करायचो; पण जन्मानं सवर्ण असण्याचा मानसिक आणि सामाजिक लाभ मात्र आम्हांला मिळायचा. जन्माने सवर्ण असणाच्यांची गरिबी आणि जन्माने दलित असणाच्यांची गरिबी यांची तुलनाच होऊ शकत नाही. दलितांची गरिबी ही अत्यंत वाईट आणि अपमानास्पद असते हे मी फार जवळून पाहिलं आहे.

1975च्या आणीबाणीचे, त्यानंतर 1977च्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवाचे आणि जनता पक्षाच्या दिल्लीतील सत्तारोहणाचे पडसाद आमच्याही परिसरात उमटले. मी त्यावेळी 12-14 वर्षांचा होतो. आणीबाणीमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच झाला, याची फार कोणाला चिंता नव्हती. कुटुंब- नियोजनासाठी सक्तीची नसबंदी केली गेली किंवा रांगा लावून एस.टी.त चढायला लावले किंवा तरुणांना शर्टाची वरची बटणे उघडी टाकून, केसांची झुलपे उडवत फिरायला बंदी आली या मुद्यांवर मात्र चर्चा व्हायची. धनदांडग्या आणि जातदांडग्या समाजाला आपली खाजगी सावकारी मोडून काढली गेली याचा राग होता.

जनता पक्षाच्या पुढाऱ्यांच्या भाषणांचे तारुण्याच्या उंबरठ्यावरील आम्हा मुलांना फार आकर्षण वाटायचे. ते पुढारी मुळातच अभ्यासू आणि बोलके. शिवाय कधी नव्हे ते जनतेची साथ त्यांना मिळालेली. त्यामुळे त्यांची भाषणे जबरदस्त फुलायची. ही मंडळी सभेत काँग्रेसच्या प्रस्थापित पुढाऱ्यांची खिल्ली उडवायची, तेव्हा आम्ही खूष होऊन जायचो. राजकारण फारसे समजायचे नाही. आणीबाणी म्हणजे काय, हेही कळायचे नाही. परंतु काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांच्या घराणेशाहीमुळे, भ्रष्टाचारामुळे, उन्मत्तपणामुळे हे लोक वाईट आहेत आणि त्यामुळे त्यांच्या नेत्या असलेल्या इंदिरा गांधीसुद्धा वाईटच असणार असे वाटायचे. 

त्यावेळच्या लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर आमच्या घरात गंमतीशीर प्रसंग घडला. वडील पहाटे नैसर्गिक विधीसाठी बाहेर जाऊन आले, तेव्हा त्यांना काँग्रेसच्या पराभवाची - इंदिरा गांधींच्याही पराभवाची बातमी कळाली. ते घरात येऊन हताशपणे आईला सांगत होते - "अरेरे इंदिरा गांधीसुद्धा हरल्या.” मी पांघरूण घेऊन झोपलो होतो. अर्धवट जागृतावस्थेत मी ती बातमी ऐकल्याबरोबर पांघरूण फेकून ताड्कन उठून मोठ्याने 'हुर्यो म्हणून ओरडलो आणि मित्रांबरोबर आनंद व्यक्त करण्यासाठी घराबाहेर पडलो. पण नंतर दिल्लीतल्या जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी आपापसात भांडून सत्ता घालवली आणि आमच्या मनावर कायमचा ओरखडा ओढला गेला. जनता पक्षाचा स्थानिक नेता, दारूच्या आहारी गेल्याने तर आमचा दुहेरी अपेक्षाभंग झाला.

शाळेच्या अभ्यासात मी हुषार होतो. भाषणे करायचो. शिक्षकही त्या बाबतीत प्रोत्साहन द्यायचे. माझी प्रकृती लहानपणापासूनच ठीक नसायची. वयाच्या सहाव्या महिन्यापासून माझ्या प्रकृतीच्या तक्रारींना सुरुवात झाली. उपचार नीट न होऊ शकल्याने त्याची गंभीरता वाढत गेली. त्यामुळे मैदानी खेळांत मी कधीच पुढाकार घेऊ शकलो नाही. अभ्यासाची, वाचनाची आवड त्यामुळेही कदाचित वाढली असणार आणि भोवतालच्या परिस्थितीकडे पाहून 'हे असे का? ते तसे का?' ही वृत्ती लहानपणापासूनच विकसीत होत गेली असणार. माझी आई वारकरी संप्रदायातली. तिने जाणीवपूर्वक प्रयत्न केले नसले तरी, उदारमतवादाचे संस्कार (तिच्या कळतनकळत) तिच्यामार्फत माझ्यावर झाले. वडील हे आपल्याकडील टिपीकल शिक्षकासारखे. "मी बरा आणि माझे कुटुंब बरे'' किंवा अंथरुण पाहून पाय पसरावेत' या वृत्तीतले. अर्थात 'आपला कोणालाही त्रास नाही झाला पाहिजे किंवा माणसाने फुकटच्या कशाचीही अपेक्षा करू नये' ही शिकवण आग्रहाने देणारे. 

विकास आणि प्रगतीचेही मर्यादित उद्दिष्ट बाळगणारे. त्यामुळे सार्वजनिक कामात सक्रिय होण्याचे संस्कार मला घरातून मिळाले असे नाही. नातेवाईकांकडूनही नाही. शिक्षकांचे प्रोत्साहनसुद्धा वैयक्तिक जीवनातील प्रगतीपुरते किंवा व्यक्तिमत्व विकासाच्या अंगाने असायचे. आमच्या भागात राष्ट्र सेवा दलाचे कार्य नसल्याने राष्ट्र सेवा दलाच्या शाखेवर जाण्याची सुसंधीही मला मिळाली नाही. तरीही सार्वजनिक जीवनात सक्रिय होण्याचे मला कसे काय सुचले? दोन कारणे संभवतात, वडीलांच्याकडे शाळेची लायब्ररी होती. मी पाचवी-सहावीत असतानाच त्या ग्रंथालयातील महत्त्वाची अशी दोन अडीचशे पुस्तके वाचली. वैचारिक साहित्यासोबत ललित साहित्यही वाचले. त्या वाचनाने समाजाकडे पाहण्याची एक दृष्टी मला मिळाली. 

वाचनाची सवय अर्थातच पुढे कायम राहिली, विकसीत झाली. सार्वजनिक जीवनातील सक्रियतेचे हे एक कारण असू शकते. दुसरे अधिक महत्त्वाचे कारण माझ्यामते असे आहे की, एस.एस.सी.ला 76% गुण मिळवून मी अहमदनगरला शिकायला गेलो. घरची गरिबी, प्रकृतीचा त्रास, ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचे बुजरेपण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविद्यालयाचे असंवेदनशील प्रशासन या सर्वांच्या परिणामी मला अकरावीचे शिक्षण अर्धवट सोडून घरी परतावे लागले. त्या वर्षात मी खूप विचार केला. 

शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे समजून घेतले आणि पुन्हा नगरला शिकायला आलो, ते एका निर्धाराने. ग्रामीण भागारील गरीब विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे पुढेच जाता यावे, यासाठी त्या विद्यार्थ्यांची एकी करून त्यांनी परस्परपूरक बनावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवले. त्याच बरोबर महाविद्यालय प्रशासनाला अधिक संवेदनशील आणि ग्रामीण विद्यार्थ्यांप्रती अधिक उत्तरदायी बनवण्यासाठी विद्यार्थी संघटनेमार्फत प्रयत्न करायचे ठरवले.

मला तोपर्यंतही 'समाजवाद म्हणजे काय? हिंदुत्ववाद हा भारतीय समाजात फुट पाडणारा, एकांगी, सवर्ण वर्चस्ववादी विचार आहे' हे कोणी सांगितले नव्हते. ग्रामीण गरीब विद्यार्थ्यांचे दैनंदिन प्रश्न सुटले पाहिजेत, या हेतूने मी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत एक वर्ष सक्रिय झालो. त्या वर्षभरातही अ.भा.वि.प.च्या पर्यायाने आर.एस.एस.च्या घातक विचारांबद्दल समजावून सांगणारे मला कोणी भेटले नाही. परंतु अ.भा.वि.प.च्या नेत्यांच्या वर्षभरातील संपर्कातून, त्यांच्या दैनंदिन वागण्यातून आणि व्यवहारातून "ही माणसे आपली नव्हेत" अशी भावना मनात रुजली; मग मी स्वतःच एक वर्षानंतर अ.भा.वि.प. मधून बाजूला झालो. 

त्याच दरम्यान राष्ट्र सेवा दलाने 'छात्रभारती' या नावाने विद्यार्थी संघटना सुरु केली होती. 'ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्यांचा बुलंद आवाज' आणि 'विज्ञानयुगातील विद्यार्थ्यांची समतावादी संघटना' अशी घोषवाक्ये असलेल्या छात्रभारतीबरोबर माझी नाळ लगेच जुळली. मी छात्रभारतीसाठी काम करू लागलो. ते काम आज वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षातही अप्रत्यक्षपणे सुरूच आहे. 

छात्रभारतीत काम करीत असताना विविध विचारधारांची ओळख झाली. वैचारिक बैठक पक्की होत गेली. आजही छात्रभारतीत दलित विद्यार्थ्यांचा दबदबा आहे. अन्य समाजवादी संघटनांपेक्षा छात्रभारतीचे हे वेगळेपण आहे. छात्रभारतीतच मला 'नाही रे वर्गासाठी उभं राहण्याची प्रेरणा मिळाली. कुठल्याही प्रश्नावर भूमिका घेताना 'बहुजनवादी' लाईन कशी घ्यायची, हे कपिल पाटील आणि आम्ही काही मित्र विचारपूर्वक ठरवायचो. डॉ.ना.य. डोळे सरांमुळे मला 'सोपं कसं बोलावं आणि सोपं कसं लिहावं' हे समजलं. रमेश शिपूरकरांमुळे कठीण प्रसंगातही विचलित व्हायचं नाही, हे लक्षात आलं. डॉ.नरेंद्र दाभोलकरांमळे वैज्ञानिक जाणीवा विकसीत झाल्या. 

छात्रभारतीच्या वतीने आम्ही रात्रशाळा बचाओ आंदोलन, प्राथमिक शिक्षण हक्क लढा, नापास विद्यार्थी हक्क लढा, दुष्काळग्रस्त विद्यार्थी फी माफी आंदोलन असे शिक्षणातल्या 'नाही रे' वर्गाचे लढे लढवले. ग्रामीण कष्टकरी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाचे रचनात्मक उपक्रम केले. छात्रभारतीच्या वतीने नर्मदा बचाओ आंदोलनात सक्रिय सहभाग दिला. किल्लारी भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसन प्रक्रियेत, रचनात्मक आणि संघर्षात्मक अशा दोन्ही मार्गांनी भागीदारी नोंदवली.

Tags: नर्मदा बचाओ आंदोलना छात्रभारती डॉ.नरेंद्र दाभोलकर बहुजनवादी' लाईन विचारधारांची ओळख अहमदनगर जिल्हा weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके