डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

ही सगळी हकिगत सांगून (ही येथे सांगितलीय त्यापेक्षा किती तरी चांगल्या रीतीने जिमने सांगितली आहे) जिम गोष्टीच्या शेवटाकडे वळतो. तो सांगतो की, त्याच्या माहितीप्रमाणे ही घटना घडली त्या दिवसांत त्या जंगलात पाच वाघ, आठ बिबटे, चार आळशी अस्वलांचे कुटुंब, दोन हिमालयीन काळी अस्वले, अनेक तरस, लांडगे आणि कोल्हे, शिवाय वेगवेगळ्या जातींची रानमांजरे असे जंगली प्राणी राहत होते. शिवाय तिथे दोन अजगर होते, वेगवेगळ्या जातींचे असंख्य साप होते, गरुड होते आणि गिधाडे पण होती. इतर माकडे, हरणं वगैरेही होतेच. पुनवा व पुतळी बहात्तर तास जंगलात हरवले होते. या बहात्तर तासांत एक साधा ओरखडासुद्धा पोरांच्या अंगावर उठला नाही, की कोणीही चावा घेतला नाही.

27 जून 2020 च्या साधना अंकात मागील शतकातील प्रख्यात निसर्गप्रेमी, नरभक्षक वाघांचा कर्दनकाळ आणि वन्य जीवनाचे लेखक जिम कॉर्बेट यांच्याविषयी मनोज बोरगावकर यांचा लेख प्रसिद्ध केला आहे, त्याबद्दल लेखक व संपादकांचेही अभिनंदन.

वाघाबद्दल आणि सगळ्याच जीवनसृष्टीबद्दल अनादर राखणाऱ्या वर्तमानात जिमची आठवण ठेवणे आपल्या मन:स्वाथ्यासाठी जरुरीचे आहे. वाघाच्या छातीचा जिम स्वातंत्र्याच्या उदयकाळी पसरलेल्या विद्वेषाच्या वातावरणाला घाबरला आणि तो व त्याची बहीण केनियामध्ये राहायला गेले. भारत सोडण्यापूर्वी तत्कालीन व्हाइसरॉय वॅव्हेल यांना तो भेटला होता; तेव्हा स्वतंत्र भारतात वाघांचे जगणे अवघड आहे, कारण वाघांना मतांचा अधिकार नाही, अशी त्याने काळजी व्यक्त केल्याचे वॅव्हेल यांनी लिहून ठेवले आहे.

मनोज बोरगावकर यांच्या लेखातील माहितीत थोडी भर घातली तर चालेल का? जिम कॉर्बेटच्या शिकारीच्या गोष्टी खरोखरच चित्तथरारक आहेत. वाचायला सुरुवात केल्यावर शेवटापर्यंत पुस्तक खाली ठेववत नाही. आताच्या भाषेत ते ‘पेज टर्नर’ आहेत. पण या वाघांच्या गोष्टीशिवाय ‘माय इंडिया’, ‘जंगल लोर’ आणि ‘ट्री टॉप’ ही त्यांची पुस्तकेही महत्त्वाची आहेत. त्यामध्ये ‘माय इंडिया’ हे तर माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचे आहे. ‘मॅनइटर्स ऑफ कुमाऊँ’ने जिमला मोठी कीर्ती मिळवून दिली हे खरे, पण त्याचा अंतरात्मा प्रकट झाला तो ‘माय इंडिया’मध्ये!

जिमचा हा भारत मोठमोठ्या महानगरांचा, भव्य-दिव्य महालांचा, भरधाव मोटारींचा नाही. झगमगाटी मॉल आणि चित्रगृहांचा नाही. तो दहा लाखांचा सूट घालणाऱ्या लोकांचा तर नाहीच. त्याचा इंडिया खेड्यांमध्ये, जंगल-पाड्यांमध्ये राहणाऱ्या लाखो गोरगरिबांचा, दलितांचा, आदिवासींचा आहे. त्यांचे आयुष्य कष्टमय आहे. पण ती जिद्दीने आयुष्याला सामोरी जातात. त्यांच्या मनात बरोबरीच्या माणसांविषयी, गुराढोरांविषयी, जंगलामधील पशू-पक्ष्यांविषयी, डोंगरदऱ्या, नाले-ओढे- झाडे-झुडपे- सगळ्यांविषयी आत्मीयतेचे नाते आहे. त्यांच्याशी समरस होऊन ते निर्भय पण समजूतदारपणे जगतात.

जिमने हे जीवन तशाच सोपेपणाने, समजूतदारपणे चितारले आहे. त्याचे मन या इंडियाविषयी करुणेने भरलेले आहे. म्हणूनच त्याने हे पुस्तक या गरिबांनाच अर्पण केले. त्याने लिहिले- माझ्या भारतात- मी ओळखतो त्या भारतात- चाळीस कोटी लोक राहतात, ज्यांपैकी 90 टक्के जीव भोळेभाबडे, प्रामाणिक, शूर, निष्ठावंत, अतिशय कष्टाळू असे आहेत. आणि ज्यांचे देवाकडे आणि जे कुठले सरकार राज्यावर असेल त्याच्याकडे रोज एवढेच विनवणे असते की, आमच्या कष्टाची फळे आम्हाला भोगता यावीत, इतपत आमचे जीवित व वित्त सुरक्षित ठेव. हे लोक जे निःसंशय गरीब आहेत आणि बऱ्याचदा भारताचे भुकेकंगाल तांडे म्हणून ज्यांची बोळवण केली जाते, ज्यांच्यामध्ये मी राहिलो आहे आणि ज्यांच्यावर प्रेम करतो; त्यांच्या गोष्टी या पुस्तकाच्या पानांमधून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. माझ्या या मित्रांना, भारतातील गरिबांना हे पुस्तक मी विनयपूर्वक अर्पण करतो.

बोरगावकर यांनी वर्णिलेला शूर शिकारी या गरीब मित्रांच्या प्राणरक्षणासाठीच नरभक्षक वाघांना मारायला, त्या कामी स्वतःचा जीव धोक्यात घालायला उद्युक्त झाला होता. माणूस आणि जंगल हे वेगवेगळे नव्हेत; त्यांचे भावजीवन एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. किमान पूर्वीच्या भारतात तरी तसे होते. माय इंडियामध्ये ‘लॉ ऑफ जंगल’ ही एक नितांतसुंदर गोष्ट आहे. तिच्याविषयी बोलण्याचा मोह मला आवरत नाही. आपण जंगलचा कायदा हा वाक्प्रचार नेहमी वापरतो तो विपरीत अर्थाने. कारण आपल्या आधुनिक संस्कतीने ‘बळी तो कान पिळी’ हा महामंत्र ठरविला आहे. पण जंगलचा कायदा असा नाही, याचा प्रत्यय ही कथा देते. भूमिहीन हरकवर आणि त्याची बायको कुंती हे कष्टकरी जोडपे मजुरी करायला गेले असताना, तीन वर्षांचा पुनवा व दोन वर्षांची पुतळी ही त्यांची मुले झोपडीच्या अंगणात खेळत-खेळत जंगलात शिरतात आणि रस्ता चुकतात. त्यानंतर तीन दिवस घडणारे नाट्य सांगता-सांगता भारतीय समाजाच्या जीवनाबाबत जिम आपल्याला शहाणे करून सोडतो. कसलेला गायक गाण्यातील नवनव्या जागा हुडकत रचना निर्माण करतो, तशी ही गोष्ट चढत जाते.

हरकवर आणि कुंती या दोघांच्या वयाची बेरीज दोन आकडी होण्यापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते. थोडे मोठे होताच ते मजुरी करून जगायला गावाबाहेर पडले. राणीखेतच्या लष्करी छावणीत बराकी बांधण्याचे काम चालू होते, तिथे ते चार वर्षे घाम गाळत असतानाच पुनवा आणि पुतळी या दोन मुलांचा जन्म झाला. पुढे ते बांधकाम संपले, नवे काम शोधणे भाग पडले.

कालाधुंगीजवळ कालव्याचे काम सुरू असल्याचे ऐकून तिकडे स्थलांतर करण्याचे हरकवरने ठरविले. अव्वल इंग्रजीत रस्ते, कालवे, रेल्वे अशा कामांवर मजुरी करणाऱ्या ‘स्थलांतरित’ मजुरांची जात निर्माण झाली, तिचे जगणे म्हणजे आजही हरकवर व कुंती यांचीच गोष्ट आहे.

त्यांना राणीखेत ते कालाधुंगी हा प्रवास अर्थातच पायी करावा लागला. घरगुती सामनाचा बोजा आणि तीन व दोन वर्षांची लहान मुले यांना आलटून-पालटून खांद्यावर घेत, रात्री एखाद्या झाडाखाली मुक्काम करून आणि दिवसा डोंगर-दऱ्यांमध्ये वाटा तुडवत, थकले-भागले, पायाला फोड आलेले- असे हे कष्टकरी कुटुंब पन्नास मैलांचे अंतर (साधारण ऐंशी किलोमीटर) सहा दिवसांत कापून कामाच्या गावी पोहोचले. मुख्य निवेदनाच्या रचनेत हा तपशील तसा महत्त्वाचा नाही, पण तो वाचताना स्थलांतर करणाऱ्या गरीब मजुरांच्या आयुष्याचे परिमाण आपल्यासमोर येते. जिमच्या माघारी या वास्तवात म्हणावासा काहीच बदल झालेला नाही, या जाणीवेने आपण कासावीस होतो.

या निराधार जोडप्याला घर करायला जागा मिळते ती जंगलाच्या कडेला. तिथे ते जंगलातून फांद्या-झापे तोडून झोपडे उभे करतात. कालव्याच्या कामावर हरकवर जायला लागतो, त्याला आठ आणे रोजगार मिळतो. कुंती दोन रुपये खर्च करून जंगल खात्याचा गवत कापण्याचा परवाना काढते. ओल्या गवताचा ऐंशी पौड म्हणजे साधारण अडतीस किलोंचा बोजा डोंगरदऱ्यांच्या रस्त्याने आठ ते चौदा मैल म्हणजे चौदा ते बावीस किलोमीटर पायपीट करून (आज गवत कुठं कापलं यावर हे अंतर कमी जास्त होत असणार, तरी सरासरी अठरा किलोमीटर भरतील!) ती बाजाराच्या गावी पोहोचेल तेव्हा तिला चार आणे कमाई होत असे. बाजारात गवत विकण्याचा परवाना ज्याच्याकडे होता, त्याला त्यातीलही एक आणा द्यावा लागे!

कामाची वेळ फार मोठी होती आणि विरंगुळा असा वाट्याला येत नव्हता, पण अशा जगण्याची त्यांना लहानपणापासूनच सवय होती की! हरकवरच्या कमाईचे आठ आणे आणि कुंतीचे तीन आणे एवढ्या पैशावर चार जणांचे कुटुंब आता तुलेनेने सुखात जगू शकत होते, कारण अन्न मुबलक उपलब्ध होते अन्‌ स्वस्तही होते.

आता दोघे कामावर जाणार म्हटल्यावर दोन कच्च्या-बच्च्यांचं काय करायचं, त्यांना कोठे ठेवायचं- हा प्रश्न येणारच. थोड्या अंतरावर एक पांगळी दयाळू आजी राहायची. तिनं ‘मी मुलांवर लक्ष ठेवीन’ असं कबूल केलं. ही व्यवस्था दोन महिने ठीक चालली. संध्याकाळी मायबाप परत यायच्या वेळी दोन्ही पोरं काकुळतीनं त्यांची वाट पाहत बसलेली असायची.

एका संध्याकाळी हरकवर आणि थोड्या वेळाने कुंती घरी पोहाचतात तर मुलं दिसली नाहीत. असतील इथंच कुठं खेळत, म्हणून आधी फार काळजी वाटली नाही. मग कोणी तरी म्हणालं- जत्रा भरलीय, तिकडं गेली असतील रहाटपाळण्याच्या नादानं. अंधार पडू लागला. हरकवरनं जाऊन जत्रेत शोध घेतला. हाका मारून-मारून माय थकून गेली. गावातले लोक जमले, तेही इकडे-तिकडे शोधू लागले. त्या दिवसांत अफवा पसरली होती की, कोणी फकीर हिंदू पोरांना पळवून तिकडे सरहद्द प्रांतात विकतात. देशात अनेक ठिकाणी लोकांनी फकिरांना धरून मारझोड केली, पोलिसांच्या मदतीमुळे ते वाचले- अशा बातम्यासुद्धा वर्तमानपत्रात छापून आल्या होत्या. (प्राचीन हिंदुस्तानात किती तरी गोष्टी पुन:पुन्हा घडत असतात!) पोरधऱ्यांची शंका आल्यावर जत्रेत शोधायला गेलेला हरकवर आणि त्याच्या मदतीला जमलेले लोक मिळून गावाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या पोलीस चौकीत जातात. म्हातारा कनवाळू हवालदार आणि दोन शिपाई असा फौजफाटा बाळगणारी ही पोलीस चौकी. तरीही हवालदाराने नीट चौकशी करून डायरीत तक्रार लिहिली. म्हणाला की, उद्या पंचक्रोशीतील पंधरा खेड्यांत माणूस पाठवून दवंडी द्यायला लावतो. मुख्य ठाण्याला निरोप्याबरोबर पत्र पाठवून सगळ्या रेल्वेमार्गावरील गावांना तारा पाठवायला सांगतो, असेही तो मान्य करतो. हवालदाराची एक सूचना असते की, दवंडी पिटताना, माहिती आणणाऱ्याला पन्नास रुपयांचे बक्षीस दिले जाईल, असेही जाहीर केले तर जास्त उपयोग होऊ शकेल. हरकवरने तर आयुष्यात पन्नास रुपये पाहिलेले नसतात. तो कुठून बक्षीस लावणार? पण दुसऱ्या दिवशी हाकारा दवंडी देताना बक्षिसाचा पुकारा करत जातो. कारण कालाधुंगीतल्या एका भल्या माणसाने पोलीस चौकीत घडलेली हकिगत ऐकून तेवढे पैसे देऊ केले होते.

दुसऱ्या दिवशी दोघे नवरा-बायको दोन वेगवेगळ्या दिशांना चालायला लागून शोध घेतात. तीस-चाळीस मैलांपर्यंत जाऊनही थांगपत्ता लागत नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी वेगळ्या दिशांनी तशीच पायपीट करूनही पोरं सापडली नाहीत. आता मात्र माय-बाप रडकुंडीला आले. दोन दिवसांपासून चूल पेटवली नव्हती. थकून गेले होते आता. त्यांना वाटलं- नक्कीच फकिरानं मुलं पळवली. पण आम्ही राणीखेतहून येताना वाटेत जो जो खंडोबा-म्हसोबा दिसला, त्याला नमस्कार केला होता आणि काही ना काही अर्पण केलं होतं. आणि इथं कालाधुंगीत पोहोचल्यावरसुद्धा जेव्हा जेव्हा गावदेवाच्या देवळासमोरून गेलो, तेव्हा तेव्हा त्या देवळात अस्पृश्यांना प्रवेश नसला तरी, बाहेरून हात जोडून मनोभावे नमस्कार केला नाही असं घडलं नव्हतं. तरीही देव आमच्यावर का कोपला असेल बरे?

शुक्रवारी दुपारनंतर कधी तरी बेपत्ता झालेली मुले शनिवार, रविवार गेला तरी सापडली नव्हती. सोमवारी हरकवर व कुंती घरातच दुःख करीत बसले, एवढे निराश झाले होते. त्या संध्याकाळी गोष्टीचा अनपेक्षित सुखद शेवट झाला. एक गरीब राखोळ्या जंगलात चारायला नेलेल्या म्हशी संध्याकाळी गावाकडे हाकत होता. त्याने असे पाहिले की, प्रत्येक म्हैस वाटेवर एका विशिष्ट जागी आली की उजवीकडे तोंड वळवून थांबत होती; मागची म्हैस येऊन टेकेपर्यंत हलत नव्हती. हा काय प्रकार आहे, म्हणून राखोळ्यासुद्धा त्या जागी थांबला आणि त्यानेही उजवीकडे पाहिले. पायवाटेच्या कडेला असलेल्या खळग्यात दोन लहान मुलं पडलेली त्याला अंधुक उजेडात दिसली. आता हा जो राखोळ्या आहे, तो गावात दवंडी पिटली गेली त्या वेळी रानात होता. पण रात्री गावात गप्पांचा विषय तोच होता. त्यामुळे अशी-अशी दोन मुलं गायब आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी पन्नास रुपयांचं बक्षीस पुकारलं आहे इथपर्यंत त्याला खबर होती. ही तीच तर मुलं नसतील? पण या मुलांना येथे आणून मारून टाकायचे काय कारण असेल, त्याला कळेना. तीन दिवस उलटले होते. त्यामुळे मुलांचा नक्कीच खून झाला होता, असं त्याला वाटलं. तरीही तो खळग्यात उतरला आणि जवळ बसून पाहू लागला. मुलांचा श्वास मंदसा चालू होता. म्हणजे मुलं मेली नव्हती तर!

मुलं गाढ झोपली होती. त्याने हळूच मुलांना हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला. त्याने या मुलांना हात लावणे हे त्याच्या जाती-धर्माविरुद्ध पापच होते, कारण मुले दलित होती आणि हा राखोळ्या ब्राह्मण होता. पण अशा संकटावेळी का कोणी जात पाहतो? त्याने म्हशी आपल्या आपण घरी पोहोचतीलच अशा भरवशाने पुढे पिटाळल्या आणि दोन खांद्यांवर दोन मुलं उचलून घेऊन गावाकडे चालायला लागला. हा माणूस काही फार सशक्त नव्हता. शिवाय झोपलेल्या दोन मुलांना घेऊन अरुंद पायवाटेने काटेकुटे, खाचखळगे चुकवत चालणं सोपं नव्हतंच. तरीही मधूनमधून उसंत खात, पुन्हा उठत, असे सहा मैलांचं अंतर त्यानं कापलं आणि मुलांना त्यांच्या आई-बापांच्या पुढ्यात नेऊन ठेवलं! त्या झोपडीत क्षणात जादू व्हावी तसा उजेड पडला. तीन दिवसांच्या तणावाचा शीण ओसरला, उरला तो आनंदी आनंद!

आनंदाश्रूंचा पूर आणि मित्रांचे अभिनंदनाचे बोल सरल्यावर प्रश्न पुढे आला की, त्या राखोळ्याला त्याची बक्षिसी दिली पाहिजे. त्या गरीब माणसासाठी पन्नास रुपये ही छोटी गोष्ट नव्हती. तेवढ्या पैशांत त्याला तीन म्हशी किंवा दहा गाई खरेदी करता आल्या असत्या, तो आयुष्यभरासाठी जमीनदाराच्या बंधनातून मोकळा झाला असता. पण तो म्हणाला, ‘‘तुम्ही मगापासून माझ्या डोक्यावर आशीर्वादांचा वर्षाव केलात, तोच माझ्यासाठी खूप झाला. तुमची पैसुद्धा मला नको!’’

बक्षीस लावणाऱ्या भल्या गावकऱ्याने हरकवर आणि कुंतीला म्हटले, ‘‘आता तुम्ही तरी घ्या हे पन्नास रुपये!’’ पण मुलं परत मिळाली, हेच त्यांना पुरेसे होते. त्यांचे म्हणणे असे की, आत्ता चार दिवसांत मुलं तंदुरुस्त होतील आणि आम्ही पुन्हा मजुरीला जाऊ लागू; मग काय प्रश्न राहिला?

ही सगळी हकिगत सांगून (ही येथे सांगितलीय त्यापेक्षा किती तरी चांगल्या रीतीने जिमने सांगितली आहे) जिम गोष्टीच्या शेवटाकडे वळतो. तो सांगतो की, त्याच्या माहितीप्रमाणे ही घटना घडली त्या दिवसांत त्या जंगलात पाच वाघ, आठ बिबटे, चार आळशी अस्वलांचे कुटुंब, दोन हिमालयीन काळी अस्वले, अनेक तरस, लांडगे आणि कोल्हे, शिवाय वेगवेगळ्या जातींची रानमांजरे असे जंगली प्राणी राहत होते. शिवाय तिथे दोन अजगर होते, वेगवेगळ्या जातींचे असंख्य साप होते, गरुड होते आणि गिधाडे पण होती. इतर माकडे, हरणं वगैरेही होतेच. पुनवा व पुतळी बहात्तर तास जंगलात हरवले होते. या बहात्तर तासांत एक साधा ओरखडासुद्धा पोरांच्या अंगावर उठला नाही, की कोणीही चावा घेतला नाही. एवढ्या काळात एकाही प्राण्यानं, पक्ष्यानं त्यांना पाहिलं नसेल, हुंगलं नसेल- हे शक्य नाही. पण कोणीही त्यांना इजा केली नाही.

जिमचं म्हणणं असं की- मोठ्याने लहानाला, बलदंडानं दुबळ्याला दुखवायचं नाही, सांभाळून घ्यायचं- हाच जंगलचा कायदा आहे. परमेश्वराने जो कायदा जंगलासाठी केला तसाच माणसासाठी केला असता, तर जगात लढाया झाल्या नसत्या; कारण माणसांतील जे बलवान आहेत, त्यांनी जंगलच्या कायद्याला अनुसरून दुबळ्यांची काळजी घेतली असती- नाही का? जिम खरोखर थोर लेखक होता. त्याचा भारताला अभिमान वाटला पाहिजे.

Tags: जीम कॉर्बेट सुभाषचंद्र वाघोलीकर jungle jim corbett subhashchandra wagholikar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Anil Khandekar- 11 Jul 2020

    सुभाषचंद्र वाघोलीकर यांनी रसाळपणे जिम कोर्बेट यांनी लिहिलेली गोष्ट सांगितली आहे. जंगलचा कायदा असा वाक्प्रचार या पुढे विचार करून वापरला पाहिजे . नकारात्मक अर्थाने तर टाळायलाच पाहिजे. खूपच हृद्य गोष्ट आहे /

    save

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात