Diwali_4 रणवीरसिंग यांचे शोचनीय देहावसान
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

दोनशे किलोमीटर चालत जाण्याची कल्पना अचाटच मानली पाहिजे. वाट सोपी नव्हती. कधी काय प्रसंग येईल, सांगता येत नव्हते. रणवीर आणि त्याचे दोन मित्र शुक्रवारी सूर्य उगवण्यापूर्वीच वाटेला लागले. त्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग नऊवर त्यांच्यासारख्या निर्वासितांची तुफान गर्दी उसळली होती. तरुण आणि म्हातारे, बायका-पोरं-सगळेच गावी परत चालले होते. थोड्याच वेळात सूर्य उंचावला आणि या यात्रेकरूंना पोळून काढू लागला. त्यांची सत्त्वपरीक्षाच घेतली जात होती. अन्न नाही, पाणी नाही उत्तर प्रदेशचे पोलीस दरडावून मागे रेटत होते की, आमच्या राज्यात शिरायचं नाही. गुंडांच्या टोळ्या मात्र बेमुर्वतरणे लूटमार, मारहाण करीत होत्या.

आज हा लेख मी श्री. रणवीरसिंग यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लिहीत आहे. श्री. रणवीरसिंग यांचे वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी नुकतेच निधन झाले. त्यांच्यावर श्रद्धांजलीपर लेख लिहावा, असे ते कोणी मातब्बर असामी नव्हते. बऱ्याच वाचकांपर्यंत ही दु:खद वार्ता पोहोचली असावी; परंतु अनेक जण लवकरच त्यांना विसरून जातील अशीही शक्यता आहे.

तरीही मला वाटते की, रणवीरसिंग आणि त्यांच्यासारख्या ज्या 76 स्थलांतरित गोरगरिबांनी भारतात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आपल्या गावाकडे परतण्यासाठी धडपडताना प्राण गमावले, त्यांच्याविषयी माझी सहवेदना नोंदविणे जरूर आहे. त्यांची परवड भविष्यकाळासाठी नोंदवून ठेवली पाहिजे, या आशेने की- कधी तरी कुठे तरी आपले नात-ूपणतू हे वाचतील आणि आमच्या हृदयशून्य आयुष्याबद्दल अश्रू ढाळतील. ते आपल्याला माफ करतील काय? माहीत नाही. तरीसुद्धा त्यांना ही हकिगत सांगितली पाहिज; हो ना?

रणवीरसिंग हे मूळचे बडफ़रा गावचे रहिवासी होते. जेमतेम बाराशे उंबऱ्यांचे हे छोटेसे खेडे मध्य प्रदेशात चंबळ खोऱ्याच्या वैराणीत दडले आहे. इथला एकमेव धंदा कुण-बीकीचा. पण जमीनधारणा म्हटली, तर घरटी सरासरी दोन हेक्टरच्याही खालीच येईल. गावात पोटापाण्याचा दुसरा धंदा नाही. गावात शाळेचं वारं शिरलं नाही. सरकारच्या दुसऱ्या बऱ्याच योजना असतात, त्यांचाही लोकांना कितपत फायदा मिळतो, हे कळत नाही. उदाहरणादाखल- जिचे ढोल नेहमीच वाजत असतात. ती महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी म्हणजे आपली मनरेगाच घ्या ना. कधीही बघायला जा, मंत्रालयाच्या संकेतस्थळावर नोंदी लिहिण्याचे काम चालू आहे’ अशीच नोंद कायम दिसेल. रणवीरसिंगसारख्या लोकांना भाकरीच्या शोधात शेकडो किलोमीटर दूर असलेल्या शहरांकडे पायपीट करावी लागते- ती का, हे यावरून उमगावे. रणवीरसिंग काही एकटे नव्हेत, त्यांच्या गावातील असे वीस तरुण वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन पोटासाठी काही तरी बिकसबी कष्टाचे काम करतात. वाघसुद्धा एवढ्या दूरच्या मजला मारत नाही.

आपला हीरो नवी दिल्लीतील तुघलकाबाद भागातील एका रेस्टारंटमध्ये डिलिव्हरी मॅन म्हणून काम करीत होता. दिल्ली ही देशाची राजधानी असून आपल्या देशातली सगळी खाशी मंडळी या शहरातच राहतात. तेथील ते भव्य प्रासाद, आखीव-रेखीव सुशोभित रस्ते, चकाकणारे उड्डाणपूल, विस्तीर्ण मॉल आणि झकाक हॉटेले, तेथे आलिशान मोटारींमधून उतरणारे बड़े मेहमान आणि त्यांच्या सजल्याधजल्या बायका.... पण रणवीरचा त्याच्याशी काही संबंध असू शकणार नाही. तो तर एक फालतू नोकर होता, खाद्यान्नाची पार्सले मागणीप्रमाणे पोहाचवून देणारा फूड डिलिव्हरी मॅन. दिल्लीकर समाजाच्या पिरॅमिडमध्ये पार तळाशी दबलेला लोकांच्या नजरेबाहेर, जवळजवळ अस्तित्वहीन म्हणूनच! कामाच्या वेळा संपायच्या नाहीत आणि हवामान माणसाला पिळून काढणारे होते. पण मेहरबानी म्हणजे,  कामाच्या हॉटेलातच दोन वेळची भाकरी मिळत होती आणि रात्री तिथेच पथारी टाकता येत होती. त्यामुळे तो थोडफ़ार पैसे गावाकडे घरी धाडू शकत होता. अशी तीन वर्षं उलटली. दिवस खडतर होते, पण थोडक्यात गुजारा करीत आशेवर तो आयुष्याचा गाडा ओढत होता. होता. आज नाही, पण पुढे मुलाबाळांना चांगले दिवस पाहायला मिळतील अशावेर.

मग एके दिवशी अचानक कोराना 19 येऊन धडकला. हा कोराना म्हणे काटेरी मुकुट मिरवणारा दानवराजाच होता. त्याने सारे जग फाडून काढले. सगळ्यात मोठा तडाखा बसला तो गरिबांनाच.

हा समंध अधिकृतपणे भारतात शिरला तो म्हणे 30 जानेवारी 2020 या दिवशी. तो मोठमोठ्या ढांगा टाकत पसरला आणि मार्चच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत त्याने पाचशेवर माणसांचा गळा धरला होता. त्याला अडवायचे तर माणसांनी माणसांपासून चार हात दूर राहायचे, हाच एकमेव उपाय आहे म्हणे. आता आर्थिक गरज आणि आपल्या मंडळींचं मोकळढाकळं वागणं, यात माणसानं माणसाला टाळायचं, हे व्हावं कसं? लोक आपण होऊन तर मानणार नाहीत; मग सरकार पुढे आलं आणि त्यानं पूर्ण देशाला कुलूप ठोकलं.

दि. 23 मार्चच्या रात्री 8 वाजता आपल्या पंतप्रधानांनी टीव्हीवरील भाषणात भारत बंदची घोषणा केली : आता कोणी घरामधून बाहेर पडायचं नाही. रस्त्यांवर वाहनांची वाहतूक बंद. रेल्वे बंद. विमाने बंद. दुकाने, कारखाने, शाळा-कॉलेजे, सगळ्या कचेऱ्या बंद. जीवनावश्यक सेवा सोडल्या, तर सगळे सगळे बंद. पंतप्रधानांनी हुकूम केला, मध्यरात्रीपासून म्हणजे चार तासांनी बंद सुरू होईल आणि 21 दिवस चालेल.

दुकानांमध्ये, गॅरेजांमध्ये, हॉटेलांमध्ये, घरांमध्ये काम करणारे, रिक्षा-टॅक्सी चालविणारे, फळेभाज्या विकणारे, साफसफाई करणारे, इतरही अनेक उद्योगांमध्ये राबणारे आणि भारताची महानगरे धावती ठेवणारे लाखो रोजंदारी मजूर त्या एका क्षणात नोकरीतून बेदखल झाले. महानगरांच्या कडेवर जेमतेम पाय टेकवून लटकणाऱ्या या लोकांचा तेवढा आधारसुद्धा तुटला. निर्दय घरमालकांनी त्यांना ‘आत्ताच्या आत्ता’ घर सोडायला सांगितले. रणवीर रेस्टारंटमध्ये झोपत असे. पण ते रेस्टारंटच बंद झाले, त्याबरोबर त्याला तेथे जे दोन घास मिळायचे तेसुद्धा बंद झाले. एवढ्या मोठ्या शहरात त्याला कोणाचाच आसरा राहिला नाही. तो अगदी हतबल झाला. लॉकडाऊनच्या धसक्यातून सावरून सगळ्या परिस्थितीचा अर्थ समजण्यात दोन दिवस गेले. सगळे सांगायला लागले, ‘तू आपल्या घरी परत जा बरा!’ पण जाणार तर कसा?

आगगाड्या बंद केल्या होत्या. बसगाड्या बंद होत्या. हताश रणवीरने शेवटी ठरवलं, पायीच बडफराला परत जायचं. दोनशे किलोमीटर चालावं लागणार होतं. पण त्याला जावं तर लागणारच होतं.

दोनशे किलोमीटर चालत जाण्याची कल्पना अचाटच मानली पाहिजे. वाट सोपी नव्हती. कधी काय प्रसंग येईल, सांगता येत नव्हते. रणवीर आणि त्याचे दोन मित्र शुक्रवारी सूर्य उगवण्यापूर्वीच वाटेला लागले. त्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग नऊवर त्यांच्यासारख्या निर्वासितांची तुफान गर्दी उसळली होती. तरुण आणि म्हातारे, बायका-पोरं-सगळेच गावी परत चालले होते. थोड्याच वेळात सूर्य उंचावला आणि या यात्रेकरूंना पोळून काढू लागला. त्यांची सत्त्वपरीक्षाच घेतली जात होती. अन्न नाही, पाणी नाही उत्तर प्रदेशचे पोलीस दरडावून मागे रेटत होते की, आमच्या राज्यात शिरायचं नाही. गुंडांच्या टोळ्या मात्र बेमुर्वतरणे लूटमार, मारहाण करीत होत्या.

त्या चौफेर अंधाधुंदीमधून कसाबसा स्वतःचा बचाव करीत, अधून-मधून एखाददुसरा टेम्पा दिसला तर त्याला थोडा वेळ लटकत ते दिवसभर आणि रात्रभर पायपीट करीत चालले.

दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत ते आग्रयाला पोहोचले. तोपर्यंत रणवीरचे त्राण संपले होते. त्याचे डोके दुखायला लागले. तरीही तो पाय ओढत राहिला. त्याला घेरी आल्यासारखं वाटलं. त्याचे साथीदार पुढे निघून गेले होते.


समय ओ धीरे चल

बुझ गयी राहसे छाँव

दूर हे दूर है पियाका गाव

धीरे चल धीरे चल...

आग्रयाच्या कैलास मोडवर रणवीर एकाएकी कोसळला. 

केवळ 80 किलोमीटर अंतरावर वाट पाहात असताना त्यानं जीव सोडला.

समोरचा दुकानदार धावून आला. रणवीरला पाणी, चहा पाजायचा प्रयत्न केला. रणवीरने मेव्हण्याला फोन लावून काय झालंय ते सांगण्याचा प्रयत्न केला. ‘‘हो सके तो आके मुझे ले जाव’’, हे शेवटचे शब्द कसेबसे त्याच्या थकलेल्या ओठांमधून निघाले. डॉक्टरांनी मृत्यूचं निदान केलं- ‘मायक्रोकार्डियल इन्क्रक्शन’. सोप्या शब्दांत बोलायचं तर, तो हृदयाला धक्का बसून मेला. ही एक अपवादात्मक घटना नव्हती; लॉकडाऊनच्या कोंडीत गावाकडे परतीच्या वाटेवर असलेल्या अशा सत्याहत्तर तरी स्थलातरितांना मृत्यूनं गाठलं. त्यातील बहुतेक जण भूक आणि थकव्यानंच मेले. आणखी काही जणांना हायवेवर धावणाऱ्या एखाद्या वाहनानं चिरडलं. आणखी काही जण दुबळ्या शरीराने साथ सोडली म्हणून मेले. आणि आता आणखी कित्येक लाख लोक त्यांच्या घरांपासून दूर, घाईघाईनं उभारलेल्या तात्पुरत्या शिबिरांमध्ये कोंबले आहेत. त्यांचा वनवास कधी संपणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही.

रविवारी रात्री 9 वाजता तुमच्याप्रमाणेच मीही अंगणात पणती पेटवली ती केवळ साथीच्या विरोधातील लढाईत एकजूट दाखविण्यापुरती नव्हे; तर कोरोना असो की नसो रात्रंदिन आयुष्याशी झुंजत असलेल्या गरीब भारतीयांविषयी आदर व्यक्त करण्यासाठी! 

लॉकडाऊनमध्ये स्थलांतरितांना अडचणी भोगाव्या लागल्या म्हणून आपल्या पंतप्रधानांनी अलीकडेच माफी मागितली आहे. लॉकडाऊनमध्ये हाल झाले, एवढ्यापुरताच हा प्रश्न नाही. खरा प्रश्न हा आहे की, या लोकांना मुळात आपले गाव सोडून, घरदार सोडून महानगरांमध्ये स्थलांतर करावे लागते; ते का? माझे नम्र मत आहे की- नुसत्या पंतप्रधानांनीच का सगळ्या देशानेच त्यांना गाव सोडावा लागल्याबद्दल माफ़ी मागितली पाहिजे. नाही का?

Tags: स्थलांतरित कोरोना लॉकडाऊन रणवीरसिंग covid 19 corona lockdown subhashchandra wagholikar ranvirsingh weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात