डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

असे औचित्यभंग स्वागतार्ह आहेत!

अकरा वर्षांपूर्वी हा लेख प्रस्तुत संपादकाने (तेव्हा युवा संपादक) साधनात लिहिला होता. तो वाचल्यावर तेव्हाचे संपादक डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणाले होते, ‘पुरोगाम्यांनी प्रतिगाम्यांच्या व्यासपीठावर जावे का, या विषयावर पूर्वी मी साधनातून वादसंवाद घडवून आणला होता, पण त्या वादसंवादातून जे उत्तर निघाले नाही ते या एका लेखातून पुढे आले आहे.’ त्यानंतरच्या आठवड्यात लोकप्रभा या साप्ताहिकात साधनातील हा लेख पुनर्मुद्रित करताना त्यांच्या संपादकाने लिहिले होते, ‘तर्कशुद्ध युक्तिवाद करणारा हा लेख आहे म्हणून आम्ही येथे देत आहोत.’ आता तो लेख पुनर्भेट म्हणून साधनात देण्याचे कारण, प्रणव मुखर्जी यांनी रा.स्व.संघाच्या कार्यक्रमात लावलेली हजेरी आणि त्यानंतर झालेला वादविवाद हेच आहे. - संपादक  

दि. 20 आणि 21 जानेवारी 2007 रोजी परभणी येथे अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण सभेचे तिसरे महाअधिवेशन पार पडले. व्यासपीठाच्या मागच्या बाजूला लावलेल्या ‘बॅनर’वर विद्येची देवता सरस्वती, संत ज्ञानेश्वर, आर्य चाणक्य, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक हेडगेवार, गोळवलकर गुरुजी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची छायाचित्रे होती. त्याच ‘बॅनर’वर बहुभाषिक ब्राह्मण सभेचे ‘ब्रीदवाक्य’ लिहिलेले होते : ‘फक्त जात नाही, विचार सांगणार!’ म्हणजे आता जात तर सांगणार, पण विचारही सांगणार! महाअधिवेशनाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले कोल्हापूरच्या करवीर पीठाचे शंकराचार्य म्हणाले, ‘‘आपण ‘गुरू’ने दर्शविलेल्या मार्गावरून जात आहोत का, याचा सारासार विचार ब्राह्मणांनी करण्याची गरज आहे!’’ म्हणजे शंकराचार्यांचे मार्गदर्शन घ्यायला विसरू नका! अधिवेशनाचे उद्‌घाटन ज्यांच्या हस्ते झाले, ते उद्योगपती प्रकाश खरवडकर म्हणाले, ‘‘परमेश्वराने विशेष गुण दिले असल्याने त्या आधारे ब्राह्मणांनी आपला विकास साधावा!’’ म्हणजे ब्राह्मणांवर परमेश्वराची खास कृपादृष्टी असते!

अशा या अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेत जात-धर्म-वंश-भाषा-प्रदेश यांच्या पलीकडे गेलेल्या कुमार केतकर यांचे नाव पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पण केतकरांचे व्यक्तिमत्त्व व त्यांची वैचारिक बैठक यांच्याशी बऱ्यापैकी परिचय असणाऱ्यांना त्यात काहीच विशेष वाटले नाही. याचे कारण, त्यांना याची खात्री होती की, ‘कुमार केतकर जातील त्या व्यासपीठावरून आपली भूमिका जराही न संकोचता, जराही न डगमगता मांडतील.’

‘आणीबाणी व नेहरू-इंदिरा-राजीव-सोनिया यांचे नको तितके समर्थन केतकर करतात’, अशी टीका सातत्याने होत आली; पण केतकरांनी त्यांचे समर्थन करणे जराही कमी केले नाही. याउलट ‘समाजवादी-साम्यवादी यांच्यावर ओढून- ताणून आणि संघपरिवारावर कठोरपणे टीका करतात’, असा आक्षेप सतत घेतला जात असूनही त्यांच्याविषयी केतकर सौम्य झालेले नाहीत. किंबहुना, विचारपूर्वक स्वीकारलेल्या भूमिकेवर टीका-टिप्पणी होत असेल तर अधिक जोरदारपणे व पुन: पुन्हा ती भूमिका मांडत राहणे, हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यवच्छेदक लक्षण आहे. याबाबत अधिक स्पष्टीकरण देण्यासाठी एकच उदाहरण पुरेसे आहे... ‘सांस्कृतिक आव्हान’ या लेखात केतकरांनी पसायदानाचा उल्लेख ‘ज्ञानेश्वरांचा मॅनिफेस्टो’ असा केला आहे. पण तिथेच कंसात ते लिहितात, ‘‘येथे, ‘ज्ञानेश्वरांचा मॅनिफेस्टो’ असा शब्दप्रयोग करणेच मराठी शुचिर्भूतांना खटकेल, पण त्यांना तो खटकावा म्हणूनच केला आहे.’’

असे हे केतकर, संपूर्णत: विरोधी विचारसरणींच्या लोकांनी आयोजित केलेल्या ब्राह्मण सभेच्या महाअधिवेशनात जाऊन आपली रोखठोक भूमिका मांडणार; किंबहुना संयोजकांना-उपस्थितांना खटकणारे काही तरी बोलणार, हे उघड होते. आणि झालेही तसेच! त्या अधिवेशनात केलेल्या बीजभाषणात त्यांनी ब्राह्मण आणि ब्राह्मण्य या शब्दांची-संकल्पनांची चिरफाड केली. ‘‘ब्राह्मण ही ‘जात’ आहे, असे म्हणणे हेच अब्राह्मणी आहे; ती जन्माने ठरते असे म्हणणे म्हणजे ‘ज्ञानमार्गी’ वृत्तीचा अपमान करणे आहे.’’ याच विचारसूत्राभोवती त्यांनी विश्लेषणात्मक मांडणी केली. त्याही पुढे जाऊन उपस्थितांना ‘जातीबद्दलचा दुरभिमान सोडा आणि जातिनिर्मूलनासाठी पुढे या’ असे आवाहन केले आणि ‘राष्ट्रीय एकात्मता टिकवायची असेल तर जातिव्यवस्थेचे निर्मूलन करावेच लागेल’, असेही बजावले. याच ठोस प्रतिपादनातून त्यांनी अशा प्रकारची महाअधिवेशने भरवण्यातला फोलपणा व धोकाही सूचित केला. केतकरांच्या भाषणातील अनेक मुद्दे जातीचा वृथा अभिमान बाळगणाऱ्यांना, पुराणातून अद्याप बाहेर पडू न शकलेल्यांना आणि बेताची बौद्धिक कुवत असणाऱ्यांना खटकणे स्वाभाविक होते. त्यांच्या भल्या-बुऱ्या समजुती किंवा मतलबी विचार यांचा पायाच उखडणारे हे भाषण होते. त्यामुळेच ‘त्या’ प्रकारच्या श्रोत्यांनी भाषण बंद पाडण्याचा, सभा उधळून लावण्याचा व केतकरांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी तर त्यांच्या गाडीवर दगडफेकही केली.

हा हल्ला उत्स्फूर्त होता की पूर्वनियोजित, तो केवळ श्रोत्यांनी केला होता की संयोजकांपैकी कोणाचा हात त्यामागे होता, हे अद्याप उघड झालेले नाही. पण तो हल्ला केवळ कुमार केतकर व त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य यांच्यावर नसून, एकूणच सामाजिक न्याय व राष्ट्रीय एकात्मता यांना छेद देणारा आहे. म्हणूनच, त्या हल्ल्याचा तीव्र निषेध करणे भाग आहे! खरे तर केतकरांच्या त्या भाषणातील मुद्दे बिनतोड आहेत, त्यांतली मांडणी सुस्पष्ट आहे आणि भाषा संयत व शेरेबाजीपासून मुक्त आहे. त्यामुळे त्यात दाखवण्यासारखे काही लूप होल्स नाहीत आणि अर्थातच त्याच्या समर्थनार्थ वेगळे भाष्य करण्याचीही आवश्यकता नाही.

पण या निमित्ताने पुन्हा एकदा मुख्य प्रश्न उभा राहतो तो हाच की- जातीच्या आधारावर असे मेळावे, संमेलने, अधिवेशने आयोजित करावीत का; आणि आयोजित केली जात असतील तरी त्या ठिकाणी ‘जात-धर्म’ या जन्मावर आधारित मिथकांतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडलेल्या पुरोगाम्यांनी उपस्थित राहावे का- सहभागी व्हावे का? हा प्रश्न केवळ ब्राह्मण किंवा मराठा जातीपुरताच मर्यादित नसून दलित, आदिवासी, भटके-विमुक्त व ओबीसी जातिसमुहांबाबतही आहे. या प्रश्नांचा वेध घेताना सामाजिक न्यायासाठी व राष्ट्रीय एकात्मता टिकविण्यासाठी जातिव्यवस्था उद्‌ध्वस्त केली पाहिजे, अशी मांडणी सातत्याने केली जाते. पण बहुसंख्य समाज राष्ट्राचे हित किंवा सामाजिक न्याय यांचा फारसा विचारच करीत नसतो; त्यांना स्वत:चे व सभोवतालच्या समूहाचे हितच महत्त्वाचे वाटत असते. अशा सांस्कृतिक उंची न गाठलेल्या समूहाला ‘जातीच्या पर्यावरणातून सुरक्षितता वाटत असते आणि त्यांच्या दृष्टीने त्याला उपयुक्तता मूल्यही असते.’ जातिव्यवस्थेच्या निर्मूलनाबाबतची मांडणी करताना या दुसऱ्या आयामाकडे पुरेसे लक्ष दिले जात नाही आणि त्यातले अर्धसत्य अधोरेखित करण्यावरही फारसा भर दिला जात नाही. म्हणजे जातीच्या पर्यावरणात व्यक्तीला सुरक्षितता वाटत असेल, उपयुक्तता जाणवत असेल; तर त्याचा अर्थ ती व्यक्ती प्रगतीच्या विशिष्ट टप्प्यावरच उभी आहे. तिला प्रगतीचे पुढील टप्पे पार करायचे असतील तर ‘जात’ नावाची चौकट मोडून, त्या पर्यावरणातून बाहेर पडूनच ती करता येईल. ज्यांना अशी प्रगती करायची आहे, त्यांना आपल्या जातिसमूहात अडकून पडण्यात असुरक्षितता व अव्यवहार्यता वाटेल. आजच्या पिढीसमोर, तरुणांसमोर नवनवीन आव्हाने आहेत; त्यांना नवनवीन शिखरे खुणावत आहेत. त्यांच्याशी जातिनिर्मूलनाबाबत संवाद साधताना या दुसऱ्या आयामाकडे अधिक लक्ष वेधले पाहिजे.

जातीच्या आधारावर संमेलने, मेळावे, अधिवेशने भरवणाऱ्यांना आजच्या पिढीची, तरुणाईची मानसिकता ध्यानात आलेली आहे; म्हणूनच तर हे लोक अशा संमेलनांतून ‘सुरक्षितता व उपयुक्तता’ यावर अधिक भर देऊन या पिढीची दिशाभूल करीत आहेत. राजकीय हेतूही त्यामागे दडलेले असतात. त्यांचा हा कावा ओळखूनच जातीच्या संमेलनात पुरोगाम्यांनी (जातीच्या चौकटीतून प्रयत्नपूर्वक बाहेर पडलेल्यांनी) सहभागी व्हावे की होऊ नये, हे तारतम्याने ठरवावे. याबाबतचा एक मतप्रवाह असा आहे की, अशा संमेलनात पुरोगाम्यांनी सहभागी होऊ नये. त्या ठिकाणी जाऊन तिथल्या मेळाव्यांना, संयोजकांना व जातीवर आधारित संघटनांना प्रतिष्ठा बहाल करू नये. ते लोक स्वत:ला अधिमान्यता मिळवून देण्यासाठी तुमचा उपयोग करून घेतात आणि तुमचे विविध प्रकारे अवमूल्यन करतात. तुमची विरोधाची धार बोथट करणे, असाही एक डावपेचाचा भाग त्यामागे असतो.

ही भूमिका बरोबरच आहे. नव्हे, समर्थनीय आहे; पण या भूमिकेला एक मर्यादाही आहे. प्रतिगामी शक्तींनी आयोजित केलेल्या मेळाव्यांना, संमेलनांना उपस्थित असणाऱ्या मोठ्या जनसमूहात कोणतीही विचारधारा नसलेला, कसलीही कट्टरता नसलेला, विशिष्ट भूमिका नसलेला समाजच बहुसंख्य असतो. तो समाज सीमारेषेवर उभा असतो. प्रतिगामी शक्ती त्यांचा बुद्धिभेद करण्याचे काम सतत करीत असतात. अशा समाजाला आपल्याकडे वळविण्यासाठी, किमान त्यांचा बुद्धिभेद रोखण्यासाठी कोणती यंत्रणा पुरोगाम्यांकडे आहे? हा प्रश्न केवळ विरोधी व्यासपीठावरून विचार मांडण्यापुरताच मर्यादित नाही. म्हणूनच पहिल्या मतप्रवाहाने व्यक्त केलेला धोका लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे संयोजक, संघटना, त्यांचे हेतू याबाबत सारासार विचार करूनच अशा मेळाव्यात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेतला पाहिजे. पण त्याबाबतही तीन मार्गदर्शक तत्त्वे सांगता येतील-

1) विरोधी व्यासपीठावर जाऊन आपली मते, भूमिका मांडताना संकोच वाटणार असेल किंवा औचित्याचा भाग म्हणून आपल्या मतांचा संकोच करावा लागणार असेल, तर त्या व्यासपीठावर जाऊ नये; संमेलनात-मेळाव्यात सहभागी होऊ नये!

2) त्या व्यासपीठावरूनही आपली विरोधी भूमिका व मते ठोसपणे मांडू देण्याची तयारी संयोजकांनी - आमंत्रण देणाऱ्यांनी दाखवली व तसे ठोस आश्वासन मिळाले, तर सहभागी होण्यास हरकत नाही.

3) विरोधी व्यासपीठावरूनही आपली भूमिका न डगमगता, न संकोचता मांडण्याची इच्छाशक्ती व त्यासाठी आवश्यक असलेले धाडस असेल; आणि त्याच्या परिणामांची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी असेल तर मात्र जरूर जावे.

या पार्श्वभूमीवर, अखिल भारतीय बहुभाषिक ब्राह्मण सभेच्या अधिवेशनातील कुमार केतकर यांच्या सहभागाकडे पाहायला हवे. महाराष्ट्र टाइम्स, लोकमत या मोठ्या दैनिकांचे संपादकपद भूषविलेल्या आणि निर्भीड पत्रकारितेचा वारसा सांगणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या संपादकपदावर असणाऱ्या कुमार केतकरांनी अशा अधिवेशनात जायचे नाही, तर मग हे काम करायचे तरी कोणी? त्यांचे भाषण उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्या बाजूने युक्तिवाद करण्यासारखा फार तर एक मुद्दा आहे, तो म्हणजे औचित्यभंग करण्याचा. त्यांच्याच व्यासपीठावर जाऊन त्यांच्याच विरोधात बोलणे हा औचित्यभंग आहे, असे काही लोकांना वाटू शकते. पण भारतीय लोकशाही बळकट करायची असेल, तर असे औचित्यभंग स्वागतार्ह मानायला हवेत!

(पूर्व प्रसिद्धी- साधना : 27 जानेवारी 2007) 

Tags: भारतीय बहुभाषिक ब्राह्मण सभा अधिवेशन लोकमान्य टिळक कुमार केतकर ब्राह्मण सभा डॉ. नरेंद्र दाभोलकर जात शंकराचार्य कोल्हापूर करवीरपीठ गोळवलकर गुरुजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्रवीर सावरकर Bharatiya Bahubhashik Bhrahmin Sabha Adhiveshan Caste Kumar Ketkar Shankaracharya Kolhapur Karaveerpith Kolhapur Karavirpeeth Golwalkar Guruji Brahmin Sabha Brahman Sabha Balasaheb Thakrey Hegadewar Rashtriya Swaymsevak Sangh Swatantravir Savarkar Lokmanya Tilak Dr. Narendra Dabholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके