डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2025)

10 जून 1949 ते 10 जून 1950 या वर्षभरात साने गुरुजींनी साधना साप्ताहिकातून ‘सुंदर पत्रे’ या सदरात ‘प्रिय सुधा’ असे संबोधून 45 पत्रे लिहिली. या पत्रांमध्ये काय नाही? व्यक्तिगत व कौटुंबिक तपशिल आहेत, सभोवलताची प्राणीसृष्टी आहे, निसर्गाच्या किमयांचे रम्य वर्णन आहे, जीवनविषयक चिंतन आहे... नंतर ती सर्व पत्रे पुस्तकरूपाने आली. मागील सत्तर वर्षांत त्या पत्रांच्या वाचनाने अनेक पिढ्या सुखावल्या आहेत, हळुवार बनल्या आहेत. ती पत्रे वाचणाऱ्यांनी उदात्त ध्येयवादाचे व संवेदनशील जीवनदृष्टीचे धडे गिरवले आहेत. ‘सुंदर पत्रे’ या पुस्तकाची नवी आवृत्ती 11 जून 2019 रोजी साधना प्रकाशनाकडून येत आहे. या पुस्तकात, आता 85 वर्षांच्या असलेल्या सुधाताईंनी साने गुरुजींना लिहिलेले पत्र समाविष्ट केले आहे. ते इथे प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक

प्रिय अण्णा, 

खूप-खूप प्रेमाचा नमस्कार. तुमच्या लाडक्या सुधानं गेल्या 70 वर्षांत तुम्हाला एकही पत्र पाठवलं नाही, म्हणून रागावलात होय? पण अण्णा, तुमच्याशी मी मनातल्या मनात किती किती बोलत असते! आणि तुम्हीसुद्धा पहाटेच्या गारव्यातून, पक्ष्यांच्या किलबिलाटातून, प्राजक्ताच्या सड्यातून, सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांतून, वृक्षांच्या छायेतून, ग्रीष्मात बहरलेल्या गुलमोहरातून, गुलबक्षीच्या फुलांच्या रंगांतून, जाई-जुईच्या सुगंधातून, सूर्यास्ताच्या सौंदर्यातून, रात्रीच्या चमचमणाऱ्या ताऱ्यांतून, ढगांच्या आकारांतून, टपटप पडणाऱ्या पावसाच्या थेंबांतून, खळखळ वाहणाऱ्या ओढ्यांच्या नादातून- थोडक्यात काय, तर ‘सुंदर पत्रांतून’ वर्णन केलेल्या सृष्टीतील विविध रूपांतून तुम्ही बोलतच होतात माझ्याशी. पुस्तकात लिहिलेल्या शब्दांना भावना असतात, पण ध्वनी नसतो ना! 

एरवीही तुम्ही माझ्याशी बोलत असा ते डोळ्यांतून, स्पर्शातून, नि:शब्दपणे; आणि मी तुमच्याशी मनातल्या मनात. पण खरंच, चुकलंच माझं. मनातल्या भाव-भावना कधी शब्दरूपाने कागदावर नाही उतरविल्या. एक बार माफ करो ना! अण्णा, आज तुम्हाला पत्र लिहायला बसले ते साधनाच्या विद्यमान संपादकांमुळेच. साधनाचे भूतपूर्व संपादक आदरणीय डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या पठडीत तयार झालेल्या, साधनाचा वैचारिक वारसा चालविणाऱ्या विनोदभाईंच्या आग्रहामुळे. 

त्यांचा फोन आला- ‘‘साधना प्रकाशन ‘श्यामची पत्रे’ जी साने गुरुजींनी वसंताला व ‘सुंदर पत्रे’ जी तुम्हाला लिहिली आहेत, ती 11 जून 2019 रोजी (साने गुरुजींच्या स्मृतिदिनी) आम्ही प्रकाशित करणार आहोत. तर, आज एवढ्या वर्षांनंतर ‘सुंदर पत्रां’बद्दलच्या तुमच्या भावना काय आहेत, त्या गुरुजींना पत्र लिहून व्यक्त करा ना! आम्हाला ते ‘सुंदर पत्रां’च्या नव्या आवृत्तीत छापायचं आहे.’’ 

‘‘मला जमेल का? मला लेखणी नाही.’’ मी म्हणाले. 

‘‘तुम्हाला जे वाटतं ते लिहा तर खरं!’’- विनोद यांचा आग्रह. 

‘‘प्रयत्न करीन.’’ 

अण्णा, मी असं म्हणाले तर खरी, पण खरं तर मी धास्तावलेच आहे हो. तुमच्या ‘सुंदर पत्रां’नी साहित्यक्षेत्रातील उंच शिखर गाठलं आहे; त्या शिखराच्या पायथ्याशी तरी मला पोहोचता येणार आहे का? कसं लिहू? काय लिहू? ज्या पत्रांनी मला भरभरून दिलंय, मी ते सर्व कसं व्यक्त करू? ना मला लेखणी, ना ज्ञान, ना भाषेवर प्रभुत्व. मी किती शून्यवत्‌ आहे, याची जाणीव होऊन खरंच मी सुन्न झालेय. अण्णा, मी किती हो लहान आहे तुमच्यापुढे! फार अगतिक वाटतंय. अशा वेळी मला मीनाताईंचा (गोखले) आधार वाटतो. मी त्यांच्याशी बोलले. तर त्या म्हणाल्या- ‘‘सारं जमेल. लिहा तर खरं. मी आहे ना, मी बघेन.’’ आम्ही बरेच बोललो. त्यांनी मला धीर दिला. 

मी आश्वस्त झाले. ज्या आठवणींच्या भावना, वेदना मनात प्रयत्नपूर्वक दाबून टाकल्या होत्या, त्यांचा एकेक पापुद्रा सुटू लागला. मी स्वत:लाच धीर दिला आणि माझ्या मनानं 70 वर्षांच्या जीवनप्रवाहात सूर मारला, त्यात मी उलट दिशेनं पोहू लागले. नाका-तोंडात पाणी गेलं हो अण्णा! आधी गुदमरले, घाबरले. प्रवाहाला ओढ होती, तो कापत पोहणं जिकिरीचे होते; थकवणारेही होते. कधी भोवऱ्यांच्या गरकाव्यातून मुश्किलीने बाहेर पडले; तर कधी घोंघावत, खळाळत वेगानं धावणाऱ्या गढूळ प्रवाहात सापडले. कधी थपडा मारणाऱ्या लाटा, तर कधी कुरवाळणाऱ्या. कधी  प्रवाह शांत, सुंदर, पारदर्शक, निळाशार, हवाहवासा वाटणारा- ज्यावर पिसासारखं हलकं होऊन तरंगत राहावंसं वाटावं; तर कधी वेगानं धावणारा, धाप लावणारा, थकवून टाकणारा. मला 70 वर्षांपूर्वीच्या त्या वयात कळू न शकलेल्या, पण स्पष्ट आठवणाऱ्या, आयुष्यभर सलत राहिलेल्या, स्वत:ला दोष देत राहिलेल्या आठवणींच्या एका टप्प्यापर्यंत पोहोचायचंच होतं... 

आणि मी जागवल्या त्या आठवणी. अण्णा, सारी मुलं मोठी होता-होताच त्यांना सारे नातेसंबंध सहज कळू लागतात; पण तुम्हाला मी कशी ओळखू लागले, ते माहीत आहे? दादा सांगत, ‘‘आपला अण्णा देशासाठी तुरुंगात गेला आहे. तिथं त्याला दळावं लागतं, जेवायला चांगलं मिळत नाही; मग आपण दिवाळीत गोड कसं खायचं? आणि फटाके परदेशी असतात, म्हणून नाही आणायचे.’’ आठवणीतली तुमची ओळख अशी झाली अण्णा!

एका दिवाळीत तात्या पालगडला आला होता. तुम्ही जेलमध्ये. आई केव्हाच वारली होती. दादा आजारी. मी सात-आठ वर्षांची. घर उदास होतं. तात्यानं तुम्हाला पत्र लिहिलं, त्यात लिहिलं होतं- ‘घर घर में दिवाली है, मेरे घरमे अंधेरा!’ त्याच्या मनाची उदासी या गीतातून दिसून येते. तात्या पुण्याच्या आयुर्वेद महाविद्यालयातून डॉक्टर झाला होता. बंगालच्या दुष्काळात त्यानं काम केलं होतं. तो कम्युनिस्ट विचारसरणीचा, तर तुम्ही समाजवादी. पण तरीही तुम्हा दोघांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम होतं. अण्णा त्याच्या त्या तरुणवयात त्याची काही ध्येये असतील, स्वप्नं असतील; नाही? पण घरच्या परिस्थितीनं तो किती उदास झाला होता! त्याच्या पत्रासोबत मीही तुम्हाला पहिलं पत्र पाठवलं होतं आणि आमची ती दोन्ही पत्रं तुम्ही जपून ठेवली होतीत. म्हणून तर मला ती अनेक वर्षांनी मिळाली. 

दि.24 डिसेंबर 1944... तुमच्या लाडक्या वसंताचा- तात्याचा टायफॉईडमुळे आकस्मिक मृत्यू झाला. आपल्या कुटुंबावर वज्राघातच होता तो. तुम्हाला नाशिकच्या तुरुंगात हा दु:खद समाचार उशिरा कळला. दादा आजारीच होते, ते या आघातामुळे बिछान्यातून उठलेच नाहीत. त्यांना चौथ्यांदा अर्धांगाचा झटका आला. तुम्ही 15 जानेवारी 1945 रोजी तुरुंगातून पॅरोलवर सुटलात आणि सरळ बोर्डीला आम्हा सर्वांचं सांत्वन करायला, दादांची सेवा करायला आलात. माझ्या आठवणीतील अण्णा, तुमची-माझी ही पहिली भेट. तुमचं बोर्डीला येणं दादांना, अप्पा-ताईंना व मला आधार देणारं, दिलासा देणारं होतं. अप्पांना शाळेची नोकरी आणि बोर्डिंगमधल्या विद्यार्थ्यांची जबाबदारीही होती. ते सारं सांभाळून दादांचं सारं करायला त्यांना वेळही मिळत नसे. ओढाताण होई. ताईही दादांचं खूप करीत असत. पण त्यांना मर्यादा होत्या. अण्णा, तुम्ही आल्यावर दादांचं मलमूत्र साफ करणं, स्पंज करणं, जेवू घालणं, कपडे धुणं, सारं-सारं तुम्ही प्रेमानं करू लागलात. तुम्हाला रात्री जागरणं होत. त्यातून जेव्हा थोडासा वेळ मिळे, तेव्हा दिवसा आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात तुम्ही सतत काही ना काही लिहीत असा. कधी ‘गोष्ट सांगा’ म्हणून मी हट्ट करीत असे. तेव्हा आपण झोपाळ्यावर बसून तुम्ही माझा हट्ट पुरवायचेत. अण्णा, म्हणून का तुम्ही ‘गोड गोष्टीं’च्या पहिल्या भागावर माझा फोटो छापून त्याखाली- ‘गोष्ट-गोष्ट हवी म्हणून पाठीस लागणाऱ्या लाडक्या सुधास...’ असं लिहिलंत? किती लाड करावेत तुम्ही माझे! 

अण्णा, त्या काळात तुमच्या मनाची किती घालमेल होत असावी! एकीकडे आजारी, परावलंबी दादा आणि दुसरीकडे तुमचं सर्वस्व असलेल्या काँग्रेस संघटनेचं काम, भाषणांसाठी सतत येणारी निमंत्रणं. दादांना थोडं बरं वाटतंय, असं बघून तुम्ही दौऱ्यावर गेलात. अधून-मधून एक-दोन दिवस बोर्डीला येत असा. दादा दिवसेंदिवस खंगत चालले होते. त्यांच्या शेवटच्या काळात तुम्ही सारं सोडून आठ-दहा दिवस दादांजवळ राहिलात. त्यांना जरा बरं वाटतंयसं वाटलं म्हणून, तुम्ही दौऱ्यावर गेलात आणि इकडे दादा वारले. तुम्हाला प्रवासात दादांच्या मृत्यूची तार मिळाली. शेवटच्या क्षणी दादांजवळ नसल्याचं तुम्हाला अपार दु:ख झालं. मीही तुमच्या आठवणीनं रडत बसे. 

दादा गेले तेव्हा ताई गरोदर होत्या. थोड्याच महिन्यांनंतर ताईंना मुलगा झाला, पण ते गोंडस बाळ तीन-चार दिवसांनीच वारलं. आपल्या घरावर मृत्यूची अवकळाच पसरली होती जणू. आधी वसंता, मग दादा आणि आता हे बाळ. जवळपास दीड वर्षात तीन मृत्यू! कोण कुणाचं सांत्वन करणार? 

दि.1 मे ते 10 मे 1947... अस्पृश्यांना पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून तुम्ही केलेलं  अग्निदिव्य. सत्त्वपरीक्षाच होती ती तुमची. अप्पा मला पंढरपूरला घेऊन गेले. तुम्हाला का मला भेटायचं होतं? तुम्हाला बघायला-भेटायला येणाऱ्यांची खूप गर्दी असे. मी तुमच्या कृश देहाकडे दुरून भित्र्या सशासारखी बघे. त्या वेळी त्या वयात काही उमगत नव्हते. पण खूप काही घडून राहिलंय, हे जाणवत होतं. उपोषणानंतर काही दिवस आराम करायला तुम्ही बोर्डीला आलात. पण खूप अशक्त झाला होतात. पडून असा. थोडी शक्ती आल्यावर तुमचे दौरे सुरू झाले. 

अण्णा, ऑगस्ट 1947 मध्ये ताईंचं बाळंतपण येणार होतं. ताईंचं पहिलं बाळ जन्मलं आणि कोमेजलं. बोर्डीला हॉस्पिटल नाही. घरात कोणी बाईमाणूसही नाही. काळजीच होती. पण तुम्ही ताईंची आई झालात. पुण्याला भाड्यानं जागा घेतलीत. मदतीला अमळनेरहून कै.इंदूताई केसरी आली. गणपतीची रजा होती म्हणून, मलाही पुण्याला बोलावून घेतलंत. मला सायकल शिकवायला एका शेजारच्या मुलाला सांगितलंत. ती चालवताना मी एकदा पडले. चांगलंच खरचटलं. तुम्ही फुंकर घातलीत, औषध लावलंत. इंदूताईला आणि मला गणपतीच्या कार्यक्रमांना पाठवत असा. किती मज्जेचे दिवस होते ते! तुम्ही माझी आई, दादा, भाऊ- सारं काही झाला होतात. खूप लाड केलेत माझे. ते दिवस कसे विसरू? 

दि.12 ऑगस्ट 1947 रोजी ताईंनी एका गोड मुलीला जन्म दिला. स्वातंत्र्याची प्रभात होत असताना जन्मली म्हणून तुम्ही तिचं नाव ‘अरुणा’ ठेवलंत. तीन दिवसांनी, 15 ऑगस्टला स्वातंत्र्याचा सूर्योदय झाला. चारी बाजूला रोषणाई होती. आनंदोत्सव होता. आपल्या घरातही आनंदी आनंद होता. शेजारच्या चार-पाच बायकांना बोलावून अरुणाचं बारसंही केलंत. बारश्याच्या दिवशी म्हणायला तुम्ही पाळणाही लिहिलात. अरुणा रात्री झोपत नसे, रडे. पण तार्इंना आराम मिळावा म्हणून तुम्ही अरुणाला आंदुळत बसत असा.

अण्णा, अरुणाच्या जन्मानंतर आपलं घर किती आनंदलं होतं. अरुणाचे मोठ्ठे डोळे, कुरळे केस, तिचे बोबडे बोल- सारं-सारं मला खूप आवडे. तिला कडेवर घेऊन अंगणात काऊ-चिऊ दाखवताना, झोपाळ्यावर झोके घेत गाणी-ओव्या म्हणत तिला झोपवताना खूप आवडे. पण माझा हा सगळा आनंद एक दिवस कोमेजला. कधीच कुणाला न सांगितलेलं माझं दु:ख आज या पत्राद्वारे तुम्हाला सांगणार आहे. मनावर एवढी वर्षं असलेलं दडपण दूर करण्यासाठी.

अण्णा, आपल्याकडे एक वयस्क पाहुण्या काही दिवस राहायला आल्या होत्या. का कोण जाणे, त्यांचं-माझं सूत काही जमत नसे. त्या बाई एकदा ताईंना सांगत होत्या, ‘‘ही सुधा, पांढऱ्या पायाची अवलक्षणी कार्टी आहे. आधी आईला मारलंन; मग वसंता, दादा आणि तुझा पहिला मुलगाही गेला. अरुणाला तिच्याजवळ कशाला देतेस?’’ त्यांचं बोलणं मला ऐकू येत होतं, हे त्यांना कळलं नाही. मला खूप रडू आलं. मी अस्वस्थ झाले. माझ्यामुळे का सारी देवाघरी गेली? मी काय केलं? मी मनातून धास्तावले. अरुणाला जवळ घ्यायची भीती वाटू लागली. कशात लक्ष लागेना. ताईंनी सांगितल्याशिवाय मी अरुणाला खेळवत नव्हते. दिवसभराच्या कामात, अरुणाचं करण्यात, माझ्या मनाची अस्वस्थता तार्इंच्या लक्षात आली नसावी. मला तुमची सारखी आठवण येई.

तुम्ही त्याच सुमारास बोर्डीला आलात. माझी अस्वस्थता का तुमच्या मनाला कळली? आपण झोपाळ्यावर बसलो होतो. माझ्या त्या वेळच्या मन:स्थितीत मी तुम्हाला म्हणाले,

‘‘अण्णा, मला तुमच्याबरोबर राहून शिकायचंय. मला मुंबईला न्या ना!’’ 

‘‘का गं? एकदम काय झालं?’’ तुम्ही विचारलंत. 

‘‘काही नाही. मला तुमच्याजवळ राहावंस वाटतंय.’’ मी चाचपडत माझी वेदना लपवत बोलले. 

‘‘अगं, आम्ही सर्व पुरुष एकत्र राहतो. तू कशी तिथं राहू शकशील?’’ तुम्ही माझी समजूत काढू बघू होतात. 

‘‘त्यात काय झालं? मी तुमच्याबरोबर राहीन ना!’’ मी रडवेली होऊन म्हणाले. 

‘‘अगं, तुझी शाळा किती चांगली आहे. एवढी वर्षं तू इथे शिकलीस; आता मॅट्रिकला दोन-अडीच वर्षं तर आहेत. या शाळेतून मॅट्रिक झालीस तर तुझ्या गुरुजींना किती आनंद होईल! आणि तू अशी मधेच दुसरीकडे गेलीस, तर अप्पा-ताईंना वाईट नाही का वाटणार? त्यांनी एवढी वर्षं किती प्रेमानं केलं तुझं! आणि मुंबईला अरुणा कुठं असेल खेळायला?’’ अण्णा समजूत घालत म्हणाले.

‘‘तरी पण...’’ मी अडखळत बोलले.     

‘‘बरं, बघू हं आपण...’’ तुम्ही मला थोपटून म्हणालात. पण एकदम विचारात पडलात. गप्प झालात. समुद्राला ओहोटी लागली की वारा कसा पडतो, सारं वातावरण स्तब्ध होतं; तसे. तुमच्या डोळ्यांत पाणी होतं. तुम्ही माझा हात घट्ट धरला- नि:शब्द होऊन. मी तुमच्याकडे बघितलं. तुमच्या डोळ्यांतलं पाणी बघून मी बेचैन झाले. 

‘‘अण्णा, तुम्ही का रडता?’’ 

‘‘काही नाही गं, कुठे काय?’’ तुम्ही हळूच म्हणालात. 

‘‘सांगा ना अण्णा, काय झालं?’’ मी विचारलं. 

‘‘मोठी झालीस की कळेल, हो बाळ.’’ तुम्ही दु:खी आवाजात पुढे म्हणालात, ‘‘बरं बघू हं, अप्पाला विचारून काय करायचं ते.’’ 

मला खूप वाईट वाटलं, तुम्हाला दु:खी झालेलं बघून. काही दिवस, काही आठवडे गेले आणि ‘साधना’ साप्ताहिकातून तुम्ही मला पत्र लिहायला सुरुवात केलीत. माझ्या नावाने पत्र लिहिलेलं बघून मी ते आधाशासारखं वाचलं. मी आनंदले. माझा हट्ट तुम्ही पुरवू शकत नव्हतात, म्हणून पत्ररूपानं माझ्याजवळ राहून मला आनंदी ठेवण्याचा तुमचा प्रयत्न होता. त्यामागे तुमच्या अगतिक, दु:खी मनातला विषाद तुमच्या दुसऱ्या पत्रातल्या वाक्यातून (मी मोठी झाल्यावर) माझ्या लक्षात आला. तुम्ही त्या पत्रात लिहिलंय, ‘मागचे पत्र तुला आवडले... तुला त्याने आनंद होत असेल, तर लिहीत जाईन. दुसरा काही आनंद नसेल देता येत, तर निदान एवढा तरी द्यावा.’

हे वाक्य वाचल्यावर माझ्या हट्टामुळे तुम्हाला केवढा मानसिक त्रास झाला असेल याची जाणीव, मोठी झाल्यावर मला झाली. एका पत्रात दहा- बारा लोकांच्या गर्दीत, एका खोलीत राहणारा गरीब वसंता मॅट्रिकला पहिला आल्याचा उल्लेख तुम्ही केला आहे. मला प्रेमानं सांभाळणारे अप्पा-ताई तरी होते, सर्व सुखसुि वधा उपलब्ध होत्या; पण तुमच्यासमोर महाराष्ट्रातीलकिंब हुना देशातील लाखो गरीब, अनाथ, पोटासाठी व शिक्षणासाठी आई-बाप व गाव सोडून शहरात आशेने आलेली, उपाशी पोटी स्टेशनच्या बाकावर-फूटपाथवर झोपणारी, ना काम-ना शाळा अशा अवस्थेतील मुलांच्या वेदना होत्या. त्यामुळे तुम्ही किती विव्हळ झाला होतात, ते मला पुढे तुमच्या साहित्यातून जाणवलं; तेव्हा मला माझीच लाज वाटू लागली. मी का एकटीच तुमची होते? तुमच्या विशाल हृदयात देशातील साऱ्या मुलांसाठी प्रेम होतं. त्यांना स्वतंत्र भारतात चांगलं शिक्षण केव्हा मिळेल... पोटभर अन्न, शिक्षण, अंगभर कपडा कसा मिळेल... ती सारी सुखी, आनंदी कशी होतील... ही तुमची चिंता होती. 

या साऱ्या मुलांसाठी मी काय करू शकतो, त्यांना आनंद कसा देऊ शकतो- या विचारातून का ‘सुंदर पत्रांनी’ जन्म घेतला? मी निमित्तमात्र होते. खरं ना? आणि तुम्हाला लेखणीच्या रूपाने साऱ्या महाराष्ट्रातील मुलांशी संवाद साधून त्यांना आनंद देण्याचा, हसत-खेळत गोष्टी सांगत भरभरून ज्ञान देण्याचा मार्ग गवसल्यावर, खळाळत वाहणाऱ्या स्वच्छ प्रवाहासारखे ‘सुंदर पत्रांच्या’ रूपाने झरणीतून वाहत राहिलात- अखंड. अण्णा, एका ‘सुंदर पत्रात’ तुम्ही विमानात बसून ढगांना हात लावण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुमच्यातला ‘श्याम’ जणू जागा झाला. ती तुमची इच्छा कधीच पूर्ण झाली नाही. पण ‘सुंदर पत्रां’तून तुम्ही मुलांना मात्र विश्वदर्शन घडवलंत. ‘सारी सृष्टी म्हणजे महाकाव्य आहे’ असे म्हणून विश्वातील अनेक रूपे मुलांना दाखवलीत. एवढेच नव्हे तर, थोर व्यक्तिमत्त्वांचाही परिचय करून दिलात. निसर्गाचे सौंदर्य लुटायला रानावनात जावे, असे म्हणून कवी वर्डस्वर्थच्या The world is too much with us’ या काव्याची ओळख करून दिलीत. अमेरिकन लेखक इमर्सन, जर्मन कवी गटे, विख्यात शास्त्रज्ञ आइन्स्टाईन आदी परदेशांतील थोरांची तसेच भारतातील जगन्नाथ पंडितांची ‘गंगालहरी’, मोरोपंतांची ‘केकावली’, वामन पंडितांची ‘आर्या’, कन्नड महाकवी बेंद्रे, गुजरातचे शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका, भगिनी निवेदिता, धारवाडच्या कर्मयोगी भागीरथीबाई या सर्वांच्या महानतेची ओळख करून दिलीत. त्याचबरोबर पालगडचे आत्मीय बाळतात्या, रावजीकाका, जानकीकाकू यांच्या स्वभाव-वैशिष्ट्यांच्या आणि नात्यातील सर्वांच्या तसेच माझ्या मैत्रिणींच्या गोड आठवणींनाही उजाळा दिलात. 

सर्व धर्मांची ओळख लहान-लहान गोष्टींतून करून देताना सर्व धर्मांचा आत्मा, तत्त्वं एकच आहेत, हे सांगून, ‘दुसऱ्याचा विचार करायला, भावना ओळखायला, दुसऱ्यांवर प्रेम करायला जो शिकला- त्याच्या जीवनात धर्म आला’ अशी सरळ-सोपी धर्माची व्याख्या शिकवलीत. अण्णा, सुंदर पत्रांद्वारे साऱ्या विश्वातील विविध दालनांचे दरवाजे तुम्ही मुलांसाठी किलकिले करून  जिज्ञासा निर्माण केलीत, त्यांना विचारकर्ते केलंत, मार्ग दाखवलात, आनंद दिलात; पण अंतर्मनात तुम्ही दु:खी व निराश होतात. 

तुम्हाला भारताच्या भविष्याची चिंता होती, कारण अनेक दूषणांनी देश पोखरलेला होता. तुमची व्यथा तुमच्या पत्रांतील खालील उद्‌गारांतून अनेक ठिकाणी डोकावते.

‘स्वातंत्र्य म्हणजे परसत्ता जाणे एवढाच अर्थ नव्हे, सर्वांचे संसार सुखाचे होतील तोवर संपूर्ण स्वातंत्र्य नाही.’ 

‘का नाही हरिजनांना सहकारी तत्त्वांवर गावोगावी पोटापुरती जमीन देत?’ 

‘मंदिरातील संपत्ती, जनतेची हाय-हाय दूर करायला वापरा.’ 

‘देवळे नका बांधू. गावात आरोग्य यावे म्हणून गटारे बांधा. जैनांनी मंदिरे बांधली, पाण्याची सोय का नाही केली?’ 

‘शनिमहात्म्याचे रडके धर्म नष्ट होऊन कर्तृत्वाचा पुरुषार्थशाली धर्म यायला हवा. अंगात येणे, भुताटकी, मूठ मारणे, जादूटोणा, बळी देणे इत्यादी- साऱ्या प्रथा दूर होऊन शुद्ध बुद्धीचा धर्म सर्वत्र यायला हवा. यालाच मी वेदधर्म म्हणजे ज्ञानावर, अनुभवावर, विचारावर आधारलेला धर्म म्हणतो.’ 

‘आजही भारतीय मुलांना धर्मांध व जात्यंध शिकवण देणारे गुरू पाहिले म्हणजे मला ‘हे तो गुरु पापतरू म्हणावे!’ हा कवी वामनांचा चरण आठवतो.’ तुम्ही हे व असे सर्व विचार व्यक्त करून आम्हा मुलांना घडवतही होतात. 

अण्णा, मी भाग्यवानच. मला नुसती निसर्गसौंदर्याने नटलेली शाळा नाही लाभली तर सर्व जाती-धर्माचे, ज्ञानोपासक, विचारवंत, त्यागी, प्रेमळ, राष्ट्रवादी शिक्षक लाभले. आम्ही विद्यार्थी सर्वधर्म समभाव रोजच्या जगण्यातून, अनुभवातून शिकलो.’ अण्णा, तुम्ही व अन्य अनेक स्वातंत्र्यसेनानींनी, काँग्रेसजनांनी स्वातंत्र्यापूर्वी जाहीर सभांतून गरीब व दरिद्री जनतेला, भूमिहीनांना आश्वासने दिली होतीत. त्यांची पूर्ती सरकारी कारभारातून दिसत नव्हती, त्याविषयीची वेदना तुम्ही खालील शब्दांतून व्यक्त केली आहे- ‘सरकारी खाती बघितली तर ती भ्रष्ट, स्थानिक स्वराज्ये पाहिली तर तीही भ्रष्ट... 

या देशाचे कसे व्हायचे? सारी दानतच जर नष्ट झाली असेल, तर हे राष्ट्र टिकणार कसे?’ अशा निराशाजनक वातावरणात तुम्ही अतीव दु:खाने उद्‌गारता, ‘असं वाटतं, कुठे दूर निघून जावं.’ हे का स्वत:चे जीवन संपवून टाकण्याच्या विचारांचे पडसाद होते? कोण जाणे! पण मध्येच निराशेने काळवंडलेल्या मन:स्थितीत तुम्हाला आशेचे किरणही दिसतात. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या, त्याग करणाऱ्या व्यक्तींकडे-तरुणांकडे बघून तुम्ही आशावादी होऊन लिहिता- 

‘ज्या अर्थी आपला समाज चालला आहे, त्या अर्थी विषारी द्रव्याशी झुंजणाऱ्या अमृतमय वस्तूही समाजात असल्याच पाहिजेत, हे निर्विवाद... आणि त्याचीही दर्शने होत असतात.’ आणि आशेने-अपेक्षेने म्हणता, ‘निदान नवी पिढी तरी चारित्र्यसंपन्न होवो.’ तुमचा विश्वास त्या वेळच्या तरुणाईवर होता. असं असूनही देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या दोन वर्षांतच तुम्हाला देशाची, जनतेची चिंता वाटू लागली. शेवटी तुमच्या अतिभावनाशील मनावर निराशेने विजय मिळवला. 

शेवटचं पत्र लिहून ठेवून 11 जून 1950 रोजी तुम्ही जगाचा निरोप घेतलात. तुम्हाला का 70 वर्षांनंतर निर्माण होणारी देशाची परिस्थिती दिसत होती? तुमच्या मृत्युमुळे माझी अवस्था शीड नसलेल्या होडीसारखी झाली. पण तुमची पुण्याई मोठी. या काळात मला बोर्डीच्या सेवाव्रती कै.प्रभावतीबाई मुळे, कै.मृणाल गोरे, कै.आबा करमरकर आणि अर्थातच अप्पा व ताई आदींची मदत झाली, म्हणून मी तगले. त्या सर्वांची मी ऋणी आहे. जणू त्यांच्या रूपाने तुम्ही आधार दिलात अण्णा... 

अण्णा, देश स्वतंत्र झाला त्याला आता 72 वर्षे होतील. स्वतंत्र भारतात तुम्ही तीन वर्षेही मोकळा श्वास घेतला नाहीत आणि आज तर देश बिकट परिस्थितीतून जात आहे. धर्मांधतेचं, जातीयवादाचं विष समाजात भिनलं आहे. भोगवादी वृत्तीला सीमा राहिलेली नाही. सत्तालोलुपतेनं कळस गाठला आहे. बलात्कार दिवसेंदिवस वाढत आहेत. एकीकडे करोडो-अब्जावधी जनतेच्या पैशांची लूट करून, देशाला लाथ मारून, पळून जाऊन अन्य देशांच्या बिळात लपवणारे देशद्रोही आणि दुसरीकडे दुष्काळामुळे बँकेचे कर्ज फेडू शकत नाहीत म्हणून आत्महत्या करणारे हजारो शेतकरी. 

अण्णा, तुम्ही त्यावेळी काठेवाडातील दुष्काळामुळे महाराष्ट्रात तडफडलात आणि आज देशात एकीकडे पाण्यासाठी, अन्नासाठी हाय हाय करणारी जनता असताना विजयाच्या जल्लोषात बेभान झालेले राजकीय पुढारी शाहीभोजन झोडताहेत- खाद्यपदार्थांचं प्रदर्शन मीडियावर करताहेत. सैनिकांच्या शहिदींवर पोळी भाजून घेणारे राजकारणी, लेखणी आणि वाणी स्वातंत्र्याची गळचेपी करीत आहेत. विचारवंतांचे, विरोधकांचे खून होत आहेत. अण्णा, साधना साप्ताहिकाची धुरा पंधरा वर्षे सांभाळणारे आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य पंचवीस वर्षे करणारे डॉ.नरेंद्र दाभोलकर तसेच गोविंद पानसरे, कलबुर्गी व पत्रकार गौरी लंकेश यांसारख्या विचारवंतांचे दिवसाढवळ्या खून करण्यात येतात अन्‌ त्याचा मागही लागत नाही- अशी भयानक, चिंताजनक परिस्थिती देशात झाली आहे. अनिष्टांच्या वाळवीनं देशाला जणू पोखरलंय. आज तुम्ही असतात, तर किती वेळा मृत्यूला कवटाळलं असतंत! 

पण अण्णा, सारंच काही निराशाजनक नाहीय हो. पूज्य महात्मा गांधींनी, तुम्ही आणि देशातील अनेक थोर नेत्यांनी, विचारवंतांनी लोकमानसात रुजवलेले विचार व पेरलेले बीज महाराष्ट्रातच नव्हे तर साऱ्या देशात अनेक ठिकाणी रुजले आहे. स्वतंत्र भारताच्या गेल्या 72 वर्षांत लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठी, अन्यायाचा सामना करण्यासाठी अनेकांनी व्यक्तिगत, संस्थात्मक अथवा संघटनांद्वारे सत्याग्रह, उपोषणं, आंदोलनं केली. तुरुंगवास भोगले आणि प्राणही दिले आहेत. त्यांतील बरेच काळाआड गेले असले, तरी नवे सैनिक उभे राहत आहेत. विशालकाय धरणांमुळे पर्यावरणाला असलेला धोका तसेच विस्थापित व भूमिहीन झालेल्या जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी अनेक अनिष्टांचा सामना करणाऱ्या, आयुष्य याच कामासाठी वेचणाऱ्या मेधाताई पाटकर... डोंगरकपारीत राहणाऱ्या आदिवासींमध्ये काम करणाऱ्या सुरेखा दळवी आणि उल्का महाजन, अनाथांचे नाथ झालेले कैलाश सत्यार्थी, मुलींना शिक्षण मिळावे म्हणून बंदुकीच्या गोळ्या खाणारी मलाला युसुफझाई... मुलींना शिक्षण मिळावे, संरक्षण मिळावे म्हणून आतंकवाद्यांच्या धमक्यांना न घाबरता काश्मिरात जाऊन काम करणारे अधिकभाई... वंचित मुलांचा आधार होऊन प्रश्नचिन्ह आश्रमशाळा चालवणारा मतीन भोसले, नक्षलवाद्यांच्या विळख्यात असलेल्या छत्तीसगडच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये सेवाभावे काम करणारी डॉ.ऐश्वर्या रेवडकर आणि अन्य डॉक्टर्स तसेच तेथील जिल्हाधिकारी अय्याज तांबोळी अशा अनेक लहान-थोर व्यक्ती आज देशात व परदेशात असलेल्या सामाजिक व राजकीय अंधारपटात, गुदमरलेल्या वातावरणात हातात सेवेची व संघर्षाची मशाल घेऊन वाटचाल करीत आहेत. 

अण्णा, वरील सर्वांच्या आणि अन्य अनेक ज्ञातअज्ञात व्यक्तींच्या प्रयत्नांनी तुम्हाला अभिप्रेत असलेला, तुमच्या प्रेरणागीतातील ‘बलशाली’ आणि ‘विश्वात शोभून दिसणारा भारत’ एक दिवस नक्कीच निर्माण होईल. मात्र, तुमच्या माझ्याकडून असलेल्या अपेक्षा मी नाही पूर्ण करू शकले, याचे मला दु:ख आहे, मला क्षमा करा.

तुमची लाडकी, सुधा 

(दादा- साने गुरुजींचे मोठे बंधू, गजानन सदाशिव साने- माझे वडील. वसंता- साने गुरुजींचा पुतण्या. माझा मोठा भाऊ वसंताला मी तात्या म्हणत असे. अप्पा- साने गुरुजींचे लहान भाऊ- पुरुषोत्तम सदाशिव साने- माझे काका. ताई- अप्पांच्या पत्नी- सुशीला पुरुषोत्तम साने- नात्याने माझ्या काकू. अरुणा- साने गुरुजींची पुतणी. अप्पा-ताईंची मुलगी. इंदूताई केसरी- अमळनेरचे शिक्षक दादा केसरींची मुलगी.)

Tags: सुधा बोडे साने Sudha Sane Sudha Bode Sane weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


Comments

  1. Nandkumar Tukaram Sakate- 11 Feb 2022

    हृदयस्पर्शी भावनिक ओलाव्यातून निर्माण झालेली साहित्यनिर्मिती कोठेही खोटेपणाचा आव भपकेपणा आढळून येत नाही तुरंत मनासी संवाद आणि एकरूपता

    save



साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 1300, 2500, 3600 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2025

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1948-2007

सर्व पहा

जाहिरात

देणगी

साधना प्रकाशनाची पुस्तके