डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

कृष्णाच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरांनी गोपगोपी-गौळणीच नव्हे तर गायीही कशा मोहून जात असतील याची प्रचिती त्या रात्री मी घेतली.

1958 सालची गोष्ट. काही वर्षांपासून गुरुवर्य मास्तर कृष्णराव यांच्याकडे संगीताची नियमित तालीम मी घेत होतो. त्या वेळी मी इंटरच्या वर्षाला होतो आणि विद्यापीठाची परीक्षा जवळ येऊन ठेपली होती. एरवी कधी शिकवणी बुडवली तर गुरुजींच्याकडून कानउघाडणी व्हायची, पण परीक्षेसाठी एक महिन्याची सवलत गुरुजींकडून मिळाली होती. अभ्यास करतानासुद्धा सतत काही हरवल्यासारखं, चुकल्यासारखं वाटायचं. तशातच बातमी मिळाली. डॉ. पाबळकरांच्या कन्येच्या विवाहानिमित्त गुरुजींच गाणं जयंत मंगल कार्यालयात होणार होतं. अभ्यासाचा थोडाफार शीण कमी होऊन पुन्हा अभ्यास करायला जोम येईल अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन एखादा ख्याल ऐकून यावं असं ठरवलं.

मंगल कार्यालयात पोहोचताच गुरुवर्यांनी हटकलं. पण केवळ थोड्या वेळासाठीच मी कार्यक्रमास बसणार आहे असं सांगून गुरुजींची समजूत घातली. डॉ. पाबळकर म्हणजे मास्तरांचे निकटतम भक्त. त्यामुळे घरगुती वातावरणात मैफिलीला बहार येणार हे उघडच होतं. आधीच मास्तर म्हणजे मैफिलींचा बादशहा. स्वर लावून चीजेची सुरुवात करताच त्यांच्या आणि प्रेक्षक यांच्यामधील अंतर नाहीसं होत असे. आणि ही तर घरचीच अनौपचारिक बैठक. सुरुवातच दरबारी कानडातल्या 'जैसे मोरा जी' या झुमऱ्यातील ख्यालाने झाली.

एरवीपेक्षा कमी वेळच पूर्वागामध्ये रागविस्तार करून तारषड्जावरती 'पाछली प्रीत या अंतऱ्यावरती ते पोहोचले. त्यानंतर मध्यसप्तकातल्या पंचमापासून तारसप्तकातील गंधारमध्यमापर्यंत स्वरांच्या साहाय्याने त्यांनी प्रकट केलेलं दरबारीचं स्वरूप अगदी असाभान्य असंच होतं. आत्तापर्यंत-पुत्रवत् वाढवलेली मुलगी चांगल्या घरी जात असल्याचा सुखद आनंद आणि 'अयोऽहि कन्या परकीय एव म्हणून तिला निरोप देताना येणारा गहिवर याचं अविस्मरणीय मिश्रण मास्तरांच्या अंतऱ्यातील सुरांच्या एकेका उपजेमधून प्रकट होत होतं. ख्याल संपवून त्रितालातली जलद चीज मास्तरांनी सुरू केली.

'सबक मिलके बंधनवाँ बांधो रे। महम्मदशौं प्यारी के घर काज है। सदारंगीली ताननसो बंधवा गाओ रे माई। सब सखियन को काज है||

चीजेचे शब्द, अर्थ आणि भाव जितके प्रसंगाला अनुरूप त्याहूनही स्वरांच्या माध्यमातून निर्माण केलेलं शब्दचित्र अनुपम, या धुंदीमध्ये एक तास रंगलेला दरबारी कानडा जेव्हा संपला तेव्हा एका विलक्षण स्वरसमाधीतून जागृत झाल्याचा भास सर्वांनी अनुभवला.

श्रोत्यांच्या मनावर आलेला भावनिक ताण ओळखून मास्तरांनी ‘ऐसी ना मारो पिचकारी' या मिश्र खमाज मांडमधील ठुमरीने सर्वांची मनं काही क्षणांतच हलकी केली. त्यानंतर 'सखे किती सांगू तुला' ही सुभद्रेची आर्त अवस्था व्यक्त करणारं सौभद्रातील पद त्यांनी इतक्या बहारीने रंगवलं की सर्व श्रोते आनंदरसात न्हाऊन निघाले. यानंतर मध्यंतर झालं. एकच ख्याल ऐकून अभ्यासाला परत जाण्याच्या वचनाचा माझ्याकडून भंग झाला हे आम्हां दोघांनाही जाणवलं. त्या वेळी ‘ताबडतोब तू घरी जा आणि अभ्यास कर' अशी गुरुजींनी आज्ञा दिली. आता इलाजच नव्हता. त्यामुळे मंडपाच्या बाहेर जाऊन जरा वेळ उभा राहिलो. परत तर जायचंच होतं, कारण अभ्यासाचं दडपण होतंच. पण तरीही मध्यंतरानंतर कोणत्या रागाने सुरुवात करतात तेवढे पाहून, खरं म्हणजे ऐकून लगेचच निघावं अशी तडजोड मनानं केली.

मास्तरांनी आपल्या खास शैलीमध्ये तार षड्ज लावून 'जोवन मद भर आयी' या सोहनीतील बंदिशीने सुरुवात केली. दहाएक मिनिटं त्याचा अंदाज घेऊन घराच्या दिशेने माझी पावलं फरफटत निघाली- फाशीची शिक्षा दिलेल्या कैद्यानं ज्या गतीने सुळाकडे जावं त्या गतीने. जयंत मंगल कार्यालयाकडून माझ्या घराकडे जाणारा रस्ता स्काऊट ग्राऊंड- ज्याच्यासमोर आताचं उद्यान मंगल कार्यालय आहे- तिथून भिकारदास मारुतीवरून नातूबागेकडे जाणारा असा होता. सोहनीचे अवीट सूर आणि मास्तरांच्या गळ्यातून त्या रागाचा होणारा विलक्षण आविष्कार अस्पष्ट होत होता. 

मी पावलं टाकत होतो. आताच्या उद्यान मंगल कार्यालयाच्या समोर अशी एक रेषा आली की एक पाऊल पलीकडे टाकलं तर गाण्याचे स्वर ऐकू येत नाहीत आणि एक पाऊल अलीकडे आलं तर अस्पष्ट का होईना ते गाणं श्रवणातून काळजाला भिडत होतं. मला आठवत नाही पण कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटं तरी मी एक पाऊल पुढे तर एक पाऊल मागे टाकत होतो. मनामध्ये प्रचंड संघर्ष होता- जणू सांगीतिक आणि शैक्षणिक करिअरमधला. मनाची उन्मनी अवस्था इतकी शिगेला पोचली की माझं मन म्हणे की तुला आत्ताच निर्णय घ्यायला हवा. अस्पष्ट परंतु माझ्या अंतर्मनात स्पष्टपणे ऐकू येणाऱ्या त्या स्वरांचा मोह अनावर झाला.

इंटरची परीक्षा पुन्हा देता येईल पण हे अलौकिक आणि स्वर्गीय गाणं पुन्हापुन्हा ऐकावला मिळण्याचे भाग्य लाभणार नाही, असा निर्णय त्या वेळी अंतर्मनाने घेतला आणि पडल्या फळाची आज्ञा घेऊन मी तातडीनं झपझप पावले टाकत जयंत मंगल कार्यालयाच्या दिशेनं जवळजवळ धावतच गेलो. त्यानंतर 'वद जाऊ कुणाला शरण ग, ' 'परब्रह्म निष्काम तो हा’ या पदानंतर त्यांची रंगलेली आणि मैफिलीचा परमोच्च बिंदू साधणारी भैरवी 'चुरिया करके गैया' मी मंडपाच्या बाहेर बसून चोरून ऐकली. ती संपली तेव्हा पहाटेचे साडेपाच वाजून गेले होते. मनाची तयारी असूनही इंटरची परीक्षा पुन्हा देण्याचा योग माझ्या नशिबी आला नाही. पण कृष्णाच्या बासरीच्या स्वर्गीय स्वरांनी गोप-गोपी, गवळणीच नव्हे तर गायीही कशा मोहून जात असतील याची प्रचिती त्या रात्री मी घेतली.

Tags: विद्यापीठ डॉ. पाबळकर मास्तर कृष्णराव सुधाकर जोशी University Dr. Pabalkar Mastar Krushnarao Sudhakar Joshi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके