डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भाषेपासून दुरावल्या माणसापाशी भाषेस न्यावे

एका कोरोनाने जगण्याचे विषय, जीवनाचे आयाम, विज्ञान, शिक्षण, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकारण साऽरे साऽरे  बदलून गेले आहे. या विषाणूच्या हाहाकाराच्या बातम्या हा उद्याचा दस्तावेज आहे. गावागावातल्या, शहरांच्या इलाख्यातल्या परिस्थितीचे दस्तावेजीकरण वृत्तपत्रांच्या रूपाने झाले आहे, त्याचे आरोग्य आणि वैद्यक परिप्रेक्षाखेरीज मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय असे वेगवेगळे आयाम लक्षात घेऊन संकलन व्हायला हवे.

‘बोली नष्ट झाल्या तर मानवी संकृती नष्ट होईल; वाचन संस्कृती उतरणीला लागली आहे’, आधुनिक युगातील चिन्ह भाषा मानवाला पुन्हा अप्रगत युगात घेऊन जात आहे, हे कालपर्यंत आपले जगण्याचे विषय होते. एका कोरोनाने जगण्याचे विषय, जीवनाचे आयाम, विज्ञान, शिक्षण, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राजकारण साऽरे साऽरे  बदलून गेले आहे.

या विषाणूच्या हाहाकाराच्या बातम्या हा उद्याचा दस्तावेज आहे. गावागावातल्या, शहरांच्या इलाख्यातल्या परिस्थितीचे दस्तावेजीकरण वृत्तपत्रांच्या रूपाने झाले आहे, त्याचे आरोग्य आणि वैद्यक परिप्रेक्षाखेरीज मानसशास्त्रीय, समाजशास्त्रीय, अर्थशास्त्रीय असे वेगवेगळे आयाम लक्षात घेऊन संकलन व्हायला हवे. या शतकातील (1920 ते 2020) वृत्तपत्रे न छापली गेल्याचा हा सर्वात मोठा कालावधी करोनाच्या अघोषित आणीबाणीमुळे आपण पाहिला आहे. माहिती-महाजाल युगाच्या आशीर्वादाने ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध आहे. पुढील काळात गुगलवर उपलब्ध होणारी माहिती सर्वंकष स्वरूपात नसेल, जी असेल ती त्या व्यवस्थेस पुरविण्यात आली तेवढीच!

या पार्श्वभूमीवर एक भाषिक भीती भेडसावतेय; साहित्याचं काय! मानवाच्या अस्तित्वाशी निगडित अनेक बाबी या परिस्थितीत ऐरणीवर आल्या असल्या तरी, मराठी वैचारिक आणि ललित साहित्यात हे मुद्दे किती गांभीर्याने प्रतिबिंबित होतील? समकालीन प्रश्नाबाबत पवित्रा घेऊन ललित लेखन करणाऱ्या साहित्यिकांची मराठीत वानवा नाही. जागतिक पातळीवर पोहोचणारे सकस साहित्य मराठीत निपजले नाही, त्याचे हेही कारण आहे. दस्तावेजीकरणामुळे विषयाचे विविध आयाम विचारात घेता येतात, मूलभूत विचाराला पोषक वैचारिक पृष्ठभूमी तयार होते. ही अनास्था जेथे असते तेथे माणूस आणि भाषा यांच्यात दरी निर्माण होते.    

दस्तावेजीकरण म्हणजे केवळ पुरातत्त्व विभागाकडील कागदपत्रे असे नव्हे. ऐतिहासिक माहिती असणारे ग्रंथ, चरित्रे आणि आत्मचरित्रे हेसुद्धा दस्तावेजच आहेत. सभोवतालचं वास्तव ज्या खुणा बिंदूंच्या रुपात मागे सोडत आहे ते बिंदू सांधून त्याचं कालिक वास्तवदर्शी रेखाटन म्हणजे समकालीन दस्तावेजीकरण. हे दस्तावेजीकरण इतिहास संशोधनास पूरक असते. आजचे वर्तमान (वास्तव) उद्याचा इतिहास आहे, त्यामुळे सद्यकालीन दस्तावेजांना अनन्यसाधारण महत्व आहे. 

दस्तावेजीकरणाबाबत अनास्था, भाषेची उपयोजितता आणि परिश्रमपूर्वक विषयाच्या मुळाशी जाण्याच्या वृत्तीचा मराठी साहित्यिकांतील अभाव हे कळीचे मुद्देही भाषा अभिसरणासाठी विचारात घ्यायला हवेत. सुमारे 200 वर्षांचा इतिहास असलेल्या मुंबई नगरीवर वेगवेगळ्या परिप्रेक्ष्यातून आजवर हजाराहून अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत; विविध काळातील सचित्र दस्तावेज आजही उपलब्ध आहेत. परंतु परवा-परवाच्या मुंबईतील कापड गिरण्याबाबतच्या दस्तावेजांचे काय! गिरण्यांचा इतिहास जतन करणारे वास्तुसंग्रहालय होणे गरजेचे नाही काय? डोळ्यांदेखत वसलेल्या नवी मुंबई शहराच्या प्रारंभीच्या काळातील स्थित्यंतराची कागदपत्रे व छायाचित्रे उपलब्ध नाहीत. ही शोककथा आहे दस्तावेजीकरणाबाबतच्या निरुत्साहाची आणि औदासिन्याची. 

दस्तावेजीकरण भाषेच्या उपयुक्ततेस साह्यभूत ठरते. भाषेला उपयुक्तता असते तशीच उपयोजितताही. मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तिचा वापर वाढेल. एखाद्या वस्तूच्या वापरासाठी उपयुक्ततेबरोबरच तिची उपयोजितताही कारणीभूत ठरत असते. मराठी भाषेची उपयोजितता वाढली तर तिचा वापर वाढू शकेल. भाषेची उपयोजितता वेगवेगळ्या पातळ्यांवर असू शकते. भाषेच्या वापरात तिचं लेखन महत्त्वाचं ठरतं. भाषा शब्दबद्ध करण्यासाठी वापरली जाते ती लिपी. त्या लिपीची उपयोजितता आणि उपयुक्तता सर्वप्रथम वाढवायला हवी. हे कार्य कला करत असतात.

अक्षरं म्हणजे माणसाने जाणतेपणी तयार केलेल्या रेषांची प्रतिकं. या प्रतिकांना स्वतंत्र ओळख मिळाली, नावं मिळाली, अक्षरं जोडली गेली आणि त्यांचे शब्द बनले. मानवी संस्कृतीच्या प्रगत टप्प्यावर हे घडलं. तिसऱ्या ते पाचव्या शतकातला हा काळ. लिपी ते ग्रांथिक भाषा असा सहज प्रवास करूनच प्रत्येक भाषा या प्रवासातल्या अनुभवानं, ज्ञानानं समृद्ध होत आली आहे. मानवी संस्कृती विकसित झाली ती अभिव्यक्तीच्या आणि संरक्षणाच्या गरजेतून. संस्कृती विकास संशोधनाचा एक भाग भाषाविज्ञान तर दुसरा भाग कला.

‘शब्दशिल्प कला’ (कॅलिग्राफी) ही त्यापैकी एक. सुंदर किंवा सुवाच्य लेखन आणि ‘सुलेखन’, (कॅलिग्राफीसाठी प्रचलित झालेला शब्द) यातला फरक स्पष्ट होण्यासाठी; लेखन सौंदर्यानुभूतीला कलात्मन्याय मिळण्यासाठी शब्दशिल्प कला ही संज्ञा इथे वापरली आहे ती कॅलिग्राफिसाठी. मुळाक्षरांच्या वळणातील सौंदर्याभिव्यक्ती म्हणजे शब्दशिल्प कला. विशिष्ट ओळख असणाऱ्या अक्षरातून व्यक्त होतो तो अर्थ. वळणदार अक्षराच्या सौंदर्याला लांबी, रुंदी, जाडी, उंची यांच्या चौकटीची मर्यादा असते. त्या मर्यादांपलीकडला वळणाच्या नाजूकतेतून, भरीवपणातून, रेषांच्या, फर्राट्यांच्या ऊर्जेतून अभिव्यक्त होणारा सौंदर्याचा आशय हाच शब्दशिल्प कलेचा आत्मा आहे.

चित्रलिपी ते शब्दलिपी या प्रवासातच संस्कृती विकसित झाली आणि त्याच्या प्रगत टप्प्यावर विकसित झाली शब्दशिल्प कला. चिनी आणि जपानी भाषक समाजात ही कला खूपच लोकप्रिय आहे. दैनंदिन व्यवहारातील वस्तू, वस्त्र-प्रावरणे यांवर होणाऱ्या वापरातून ती लोकाभिमुखही झाली आहे. शब्दांचे अर्थ समजत नसले तरी त्यातलं सौंदर्य भावल्याने आपल्याकडला युवावर्गही हे टी-शर्टस वापरताना दिसतो.

र.कृ. जोशींनी प्रथम कवितेच्या प्रयोगात्मक लेखनातून ही कला (जन-सामान्यांपर्यंत) रसिकांपर्यंत पोहोचविली. रकृंचे प्रयोग कवितेपुरातेच मर्यादित राहिले, अन्‌ त्यांच्या जाण्याने ते तेथेच थांबले. असेच प्रयोग कालांतराने षांताराम पवार यांनी केले. त्यांना ‘आलोचना’ हे दर्जेदार मासिक लाभले होते. मासिकाचा लौकिक मोठा होता मात्र केवळ समीक्षेला वाहिलेल्या या मासिकाचा ठराविक वाचक वर्ग हीच षांताराम याच्या प्रयोगाची मर्यादा ठरली. त्यांच्या जाण्याने हे प्रयत्नही अपुरे ठरले.

शब्दशिल्प कलेच्या उपयोजिततेच्या सीमा अमर्याद आहेत. रंग-रूप-पोतादिमुळे तिला अनेक आयामही लाभले आहेत. निब किंवा बोरू या पारंपरिक लेखन-साधनांव्यतिरिक्त दाढीच्या ब्रशपासून रंगकामाच्या ब्रशपर्यंत, इंजेक्शन सिरींजपासून स्क्रीन प्रिंटींगच्या स्टॉपरपर्यंत वेगवेगळी साधने, रंग आणि कागदाव्यतिरिक्त कापड, कपडे, छत्री अशा अनेकविध साधनांच्या वापराने ही कला अधिक लोकाभिमुख होत आहे. अनेक तरुण आज त्यात प्रयोग करीत आहेत. अच्युत पालव हे त्यातलं एक आंतरराष्ट्रीय स्तरावरलं नाव. 

भारतीय संस्कृतीची समृद्धी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील वैविध्यात सामावली आहे. हीच बाब भारतीय भाषांच्या संदर्भातही तितकीच सत्य आहे. लिप्यांचं सौंदर्य हाही भारताचा सांस्कृतिक वारसा आहे. लिप्यांच्या सौंदर्याचा शोध घेत त्यांच्या अंतरंगांपर्यंत पोहोचणारे लिपी अभ्यासक अशोक परब असं मानतात की, ‘प्रत्येक भाषेची लिपी, ती बोलणाऱ्या समूहाच्या संस्कृतीचा, स्वभाववैशिष्ट्यांचा आरसा असते.’

ग्रांथिक आणि मौखिक मराठीपुढे आज मोठे आव्हान उभे आहे. ग्रांथिक भाषा बोलीकडे कलू लागली आहे, तर बोली मृतप्राय होऊ लागल्या आहेत. प्रगत युगातील भाषेचे सद्यकालीन अपरिपक्व रूप समजून घेण्यास ‘एक नंबर’ हा प्रचलित वाक्प्रचार पुरेसा आहे. प्रभाकर पाध्ये यांनी रूढ केलेल्या ‘गोची’ या शब्दाचीच गोची होऊन तिचा आज ‘लोचा’ झाला आहे. कदाचित हा शब्दही उद्या समाजात रूढ होईल, कारण बहुसंख्य असलेल्या तरुणांचा तो आज परवलीचा शब्द झाला आहे. कालौघात, लोचा=गोची किंवा कोंडी असा तो शब्दकोशात समाविष्ट होऊ शकेल. कुठलाही शब्द ‘शुद्ध वा ‘अशुद्ध’ नसतो, हा भाषाशास्त्राचा सिद्धांत मान्य केल्यानंतरही कोणता शब्द स्वीकारायचा, एखादा शब्द समाजमान्य कसा ठरवायचा याची विशिष्ट प्रक्रिया, त्याचे मापदंड ठरवावे लागतात. ऑक्सफर्डसारख्या संस्थांनी ते केले असून दर वर्षी अशा नव्या शब्दांचा ते शब्दार्थ संग्रहात समावेश करीत असतात. 

भाषेच्या बाबतीत दस्तावेजीकरण बोलीच्या स्तरापासून होण्याची गरज आहे. बोली, भाषांना समृद्ध करीत असतात आणि भाषा ग्रांथिक झाली की ती दीर्घजीवी होते. भाषेची संवादात्मकता नष्ट होणे म्हणजेच संस्कृती नष्ट होणे हे गणेश देवीचे बोलीविषयक  संशोधन भाषा अभ्यासकांसाठी तर मार्गदर्शक आहेच, सामान्य मराठी भाषिकांसाठीही ते नेत्रांजन आहे. वाचन संस्कृतीचा ऱ्हास सुरू आहे. या सुरातील ‘श्रुती’ ही आहे की माणूस ग्रांथिक भाषेपासून दूर जाऊ लागला आहे. माणसाला भाषेपासून दूर नेणारी परिस्थिती बदलायची असेल तर भाषेलाच माणसाच्या जवळ नेणे ही काळाची गरज ठरते.  

महाराष्ट्रातील काही समाज-संस्कृतींनी मराठीला शब्दांचे महत्त्वाचे योगदान दिले आहे. ‘लाचकन’ हा शब्द महाराष्ट्रातील वैदू या भटक्या समाजाची देणगी आहे. पायात रुतलेला काटा काढण्याचे हे एक छोटे उपकरण बनवणे त्यांच्या उपजीविकेचा पिढीजात भाग होता. आता हा समाज कुठे-कुठे स्थिरावू लागला आहे. त्याच्या जागेवर बसण्याने त्याच्याबरोबर फिरणारे शब्ददेखील बसून गेले आहेत. या समाज संस्कृतीशी निगडित ‘पालं’ हा शब्द कवी प्रा.फ.मु. शिंदे यांनी आपल्या ‘आई’ कवितेत प्रतिमारूपाने अजरामर केला आहे. भटकंती करताना एखाद्या गावातील ओसाड शेतात ते समूहाने डेरा टाकून राहतात. त्यांच्या तंबूस्वरूप घराला ‘पाल’ म्हणतात.         

मराठवाडा आणि विदर्भातील तीन बोली आज झपाट्याने मृत्यूमार्गावर मार्गक्रमण करीत आहेत. युनेस्कोने तसा अहवाल दिला आहे. मराठवाड्यातील बुलढाणा जिल्ह्यातील केवळ पाच गावांतील फक्त तीन हजार लोक आज ‘निहाली’ ही बोली बोलताहेत. या सर्व माणसांचे वयोमान आहे किमान 50 वर्षे. ही पिढी अस्तंगत झाली तर तिच्याबरोबरच त्यांची ही बोली मृत होईल. महाराष्ट्राच्या सीमेवर, आंध्र आणि तेलंगण राज्यांत नायकी समाजाची ‘कोलानी’ ही दुसरी मृत्यूच्या छायेतील बोली. विदर्भातील मेळघाट या डोंगराळ भागातील ‘कोरकू’ बोली बोलणारा समाज ही अशीच नामशेष होऊ घातलेली तिसरी प्रजाती. शासनाने तर त्यांचे स्थलांतर केले आहे, अमाप पैसा देऊन आणि ते संभ्रमित आहेत. जगावं कसं हे मोठं प्रश्नचिन्ह त्यांना वाकोल्या दाखवत आहे. यांच्या बोलीचे दस्तावेजीकरण होणे गरजेचे आहे. देवींचे सहकारी डॉ.श्रीकृष्ण काकडे यांनी चित्रफितीद्वारे या बोलींचे दस्तावेजीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे.

राज्य शासनाने काही बोलींचे शब्दकोश तज्ज्ञांमार्फत बनविले आहेत. परंतु ते अद्याप प्रकाशित झाले नाहीत. कवी विठ्ठल वाघ यांनी केलेला वऱ्हाडी बोलींचा कोश हा त्यातला एक. बलुचिस्थानातून भारतात आलेला बलुची किंवा बंजारा हा भटका-विमुक्त समाज जगभरात पसरला आहे. जिप्सी म्हणून तो सर्वत्र ओळखला जातो. जगभर यांची एकच बोली आहे. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ नेतृत्व करणाऱ्या सुधाकरराव नाईकांचीही तीच मातृभाषा होती. सर्व देशातील शब्दांमुळे ती अधिक समृद्ध असणे स्वाभाविक आहे, अशा बोलीचा शब्दकोश मराठीच्या वृद्धीस पूरक ठरेल.

भाषेला आव्हान देण्याचा अघोषित विडा उचलण्यास जी समूहमाध्यमे पुढे सरसावली आहेत, ती समाजाच्या भल्याचा, स्वास्थ्याचा विचारच करीत नाहीत. समूह-मानसाचे सर्व दोष, वृत्ती, भावना आणि विकार या माध्यमांतून अधोरेखित झाले आहेत. या माध्यमांना ‘समूह’ माध्यम संबोधणेच यथार्थ ठरेल. ‘पोस्ट’चे कोलीत हाती आले की आपले आद्य अन्‌ पवित्र कर्तव्य समजून लंका दहन करीत सुटावे, तसे प्रत्येकजण टेंबा अग्रेषित करत सुटतो.

वरवरचे ‘साहित्य’ वाचनाची सक्ती करणारी ही माध्यमे ग्रांथिक साहित्याला मागे टाकत आहेत. या माध्यमांनी सुरू केलेले स्वैर-शिक्षण साक्षरांचा बुद्धिभेद करीत आहे. लोकच लोकांमार्फत लोकांना पढत-मूर्ख बनवत आहेत. सुजाण, सज्ञान, बुद्धिनिष्ठ, तर्कनिष्ठ आणि विवेकी नागरिकांचे हातसुद्धा मलीन करावे, असा विडा या माध्यमांनी उचलल्याने बुद्धिनिष्ठ आणि तर्कनिष्ठांची जबाबदारी कधी नव्हे तेवढी वाढली आहे.

एका बाजूला विवेकबुद्धीला या माध्यमांनी चूड लावली आहे, तर दुसरीकडे वृत्तपत्रांच्या विश्वासार्हतेवर कुरघोडी करणारी दृक-श्राव्य माध्यमेही कालबाह्य ठरू लागली आहेत. माहिती महाजालाच्या ज्ञान-मंडळाने एका बाजूला ज्ञानाचे नवे दरवाजे धडाधड उघडले आहेत, तर दुसरीकडे स्थापित ऐतिहासिक सत्याची कवाडे बंद करण्यास सुरुवात केली आहे. मानव सर्वांगी उक्रांत होत आहे, ज्ञानी होत आहे असे वाटत असतानाच या ‘ऑक्टोपसी’ तंत्रज्ञानाने आपले बाहुपाश मानवाच्या गळ्याभोवती आवळण्यास, त्याला कळसूत्री बाहुलं बनविण्यास सुरुवात केली आहे. ज्ञान-महाजालाच्या साहित्याने ग्रंथवाचनात धोंड उभी केली आहे.  ग्रांथिक आणि मौखिक भाषाच आजच्या प्रगत युगाच्या संवाद माध्यम आहेत या गृहीतकास ‘इमोजी’च्या भाषेने छेद दिला आहे. प्राचीन काळातली चिन्हभाषाच आज माणूस पुन्हा वापरू लागला आहे.

इंग्रजी भाषा अनेक देशांमध्ये व्यवहार भाषा असल्याने ती ज्ञानभाषाही आहे. मराठी आमची व्यवहार भाषा नाही तर ती ज्ञानभाषा कशी होणार! एका बाजूला महाराष्ट्रातील मराठी भाषक पालकांनी स्वेच्छेने इंग्रजीला झुकते माप दिले आहे, तर अमेरिकास्थित परदेशस्थ मराठी भाषकांमध्ये मागील काही वर्षांत मराठी, महाराष्ट्रीय संस्कृतीचे पुनरुज्जीवन झाले आहे, तथापि महाराष्ट्रातील मराठीच्या पुनरुज्जीवनाला त्याचा फार हातभार लागेल असे नाही. मातेइतकेच मातीचे (मातृभूमीचे) प्रेमही सुप्तावस्थेत अस्तित्वात असतेच, हे यातून अधोरेखित झाले आहे. व्यवहारोपयोगी उपकरणयुगात (गॅजेट एज) कुठल्याही भाषेचा वापर ही नितांतता राहिलेली नाही; एसएमएस्‌ भाषेवरून हे स्पष्ट होते. एखादी वस्तू हवीशी, घ्यावीशी वाटत असल्यास तिची उपयुक्तता आणि नितांतता आपल्या कृतीस उद्युक्त करीत असतात.

मराठी ज्ञानभाषा होण्यासाठी या भाषेतून विविध विषयांवर मौलिक संशोधन होणे गरजेचे आहे. साहित्याच्या सर्व प्रकारांमध्ये संशोधन दुर्मिळ होऊ लागले आहे. वैचारिक संशोधनात भाषिक, विशेषतः मराठी भाषिक संशोधनाबाबत आज परिस्थिती अपरिपक्व आहे. भाषेव्यतिरिक्तही संशोधनयोग्य अनेक विषय आज अस्पर्श राहिले आहेत. याचे कारण म्हणजे अभ्यासग्रंथांची, संदर्भग्रंथाची दुर्लभता. संशोधनपूरक वातावरणाचा अभाव. साहित्याचे बदलते परिप्रेक्ष लक्षात घेता, छापील साहित्याचे भविष्यातील संगणकीय रूप लक्षात घेता लेखक-प्रकाशक-वाचक ही मालिका विस्तारण्यासाठी जाणतेपणी काही प्रयत्न होणे गरजेचे आहे.

घोडा पाणी पिण्यास नदीजवळ जात नसेल, (अनुत्सुक असेल, ठाकला असेल), तर परिस्थितीनुरूप पाण्याला त्याच्याकडे न्यावं लागतं. तद्वतच भाषेपासून दुरावणाऱ्या माणसास भाषेपाशी न्यायला हवे; किंवा साहित्य अधिकाधिक वाचकाभिमुख करण्यास अनुकूल वातावरण निर्माण करायला हवे. लेखक-संशोधक यांना आपल्या निसर्गदत्त गुणांचा गौरव होत असल्याची जाणीव निर्माण होईल असे पर्यावरण निर्माण करायला हवे. त्यासाठी पारंपरिक ग्रंथालयाचे परिप्रेक्ष बदलावे लागतील.

दुर्मिळ ग्रंथ आणि अक्षर वाङ्‌मय येथे सहजप्राप्य होतील, मौलिक संशोधनास पूरक असणारे, मातीचा सहवास, निसर्गाची साथ आणि साहित्याचा आस्वाद यांचा सहज-सुंदर मिलाफ साधणारे वातावरण निर्माण करायला हवे. जिथे जिज्ञासू वाचक, विचारवंत, भाषा संशोधक पाहुणचाराला येतील. विचारवंत/लेखकांनी जीवन व्यवहारात शिस्तीचे दंडक निर्माण केले आहेत, म्हणूनच मानव संस्कृती अधिक प्रगत होत गेली. अशा विचारवंतासाठी सुयोग्य वातावरण निर्माण करणे ही समाजाचीही गरज आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके