डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

गुरुवर्य मास्तरांचे पुण्यस्मरण

सन 1960 ते 1974 या कालावधीत सुहास दातार हे मास्तरांचे शिष्यत्व प्राप्त करून त्यांच्या निकट सहवासात राहिले. त्यांच्या कुटुंबातील एक घटकच झाले. जन्मशताब्दीच्या निमित्ताने या सहवासाच्या स्मृती जाग्या झाल्या, त्या कथन केल्याशिवाय चैन पडणे शक्य नाही अशी अवस्था झाली. पुढच्या पिढीला मार्गदर्शन होईल या विश्वासाने श्री. दातार यांनी आपल्या आठवणींना येथे शब्दांकित केले आहे.

संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे अनेक गुणांनी बहरडेले व्यक्तिमत्त्व होते. एक रंगतदार गायक, अभिजात नट, कल्पक संगीत दिग्दर्शक कुशल वक्ता, असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला खुलवीत होते. माझ्या आईचे वडील, माझे आजोबा म्हणजे पं. भास्करबुवा बखले यांचे मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर हे पट्टशिष्य होते. पं.भास्करबुवाचा मुलगा नसल्यामुळे त्यांचा मास्तरांवर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जास्त लोभ होता. माझी आजी सावित्रीबाई ही भास्करबुवांची पत्नी होय. तिला आम्ही ताई म्हणत होतो. तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे 4 एप्रिल 1956 पर्यंत ती आमच्या कुटुंबात राहत होती. तिच्या बोलण्यात मास्तरांचे नाव सतत निघत असे. 

माझ्या मोठ्या मावशीचे यजमान कै.मा.वि.तथा भय्यासाहेब धामणकर यांचा आणि आमचा घरोबा विशेष होता. कै. भय्यासाहेब हे भास्करबुवांचे व मास्तरांचे परमभक्त असल्यामुळे त्यांच्याकडून मास्तरांविषयी बऱ्याच आठवणी मला ऐकण्यास मिळाल्या. सन 1960 ते 19 74 या कालावधीत मास्तरांचा शिष्य या नात्याने मला मास्तरांचा निकटचा सहवास मिळाला. त्यामुळे मी मास्तरांच्या कुटुंबातील एक घटक आणि मास्तर आमच्या कुटुंबातील घटक असा अभूतपूर्व संयोग जमून आला होता. मास्तरांच्या जन्मशताब्दिवर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम होत आहेत. त्यांच्याविषयीचे लेख प्रसिद्ध होत आहेत. 

अशा वेळी मास्तरांविषयीच्या माझ्या आठवणी पुन्हा जार्या होत आहेत. त्या कथन केल्याशिवाय चैन पडणे शक्यच नाही. त्यानिमित्ताने पुढच्या पिढीला काहीतरी मार्गदर्शन व्हावे ही अपेक्षा नि विश्वास वाटत आहे. मला मास्तरांचे पहिले दर्शन झाले ती आठवण अजूनही ताजीच वाटते. तो दिवस 1946 च्या भाऊबीजेचा होता. या दिवशी भारत गायन समाजाच्या सभागृहात सकाळी मास्तरांची मैफल झाली होती. मी त्या वेळी फारच लहान म्हणजे सहा वर्षांचा होतो त्या वेळी मला गाण्यातले काही कळत नव्हते. पण माझ्या मनःपटलावर हॉल तुडुंब भरलेला, श्रोते प्रत्येक सभेला वाहवा देत आहेत, मास्तर विनम्रपणे दाद स्वीकारीत श्रोत्यांना अभिवादन करीत आहेत. असे दृश्य कोरलेले आहे.

आज 50 वर्षांनंतरही ते दृश्य मला जसेच्या तसे आठवते. ती मैफल फार अप्रतिम झाली होती. त्या वेळी मास्तर 'भटियार', सामंत सारंग' हे राग फारच सुरेख गायले होते, असे मला मास्तरांचे पट्टशिष्य कै. पं. रामभाऊ मराठे यांच्याकडून पुढे समजले. याच मैफलीत मास्तरांनी भैरवीत बारा स्वरांची आरोही अवरोही तान घेतली होती असे कै.पं.रामभाऊ मराठे आवर्जून सांगत असत. मास्तरांच्या घरी एक हरीण पाळलेले होते. ते हरीण पाहण्याकरिता मास्तरांच्या पत्नी राधाबाई यांनी मला त्यांच्या घरी बोलाविले होते. मास्तरांच्या पत्नी राधाबाई यांना सर्वजण वहिनी म्हणत असत. 

कै.गोविंदराव देशमुख मला सायकलवर डबलसीट घेऊन मास्तरांच्या घरी गेले होते, मास्तरांच्या घरी हा माझा पहिला प्रवेश होता. ते वर्ष 1946 किंवा 1947 असावे असे मला वाटते. निरनिराळ्या कारणांनी मास्तर भारत गायन समाजात येत असत. आम्ही याच इमारतीत तळमजल्यावर राहत होतो. त्यामुळे मास्तरांना पाहण्याचा योग मला अनेक वेळा येत असे. मास्तर आमच्या घरी देवदर्शनासाठी, कै.पं.भास्करबुवांच्या फोटोला आणि माझ्या आजीला नमस्कार करण्यासाठी आवर्जून येत असत. माझी आई, कै. प्रमिलाबाई  दातार, ही मास्तरांची गुरुभगिनी होती. म्हणून मास्तर पुण्यात असले की भाऊबीजेच्या दिवशी आमच्या घरी येत असत. 

आमच्या घरी मास्तर आले की तास-दोन तास कसे निघून जात ते समजतच नसे. पुढे वयोमानानुसार त्यांचे दौरे कमी झाल्यानंतर तर दरवर्षी ते भाऊबीजेच्या दिवशी न चुकता येत असत. मी भारत गायन समाजात श्री. बापूराव अष्टेकर यांच्याकडे गाणे शिकत होतो. 1959 साली एक दिवस मी सकाळी गात असताना मास्तर सपत्नीक आमच्याकडे आले होते. त्या वेळी त्यांनी गाणे कोणाकडे शिकतोस?', 'तंबोरा वाजविता येतो का?' इत्यादी चौकशी केली. ते मला म्हणाले, "मी घरीच सकाळी गायला बसतो. त्या वेळी तू येत जा." अशी संधी पुन्हा येणार नाही, असा विचार करून मी मास्तरांकडे रोज जाऊ लागलो. माझ्याबरोबर  त्यांचा पुतण्या नारायण फुलंब्रीकर हा सुद्धा नियमितपणे येत असे. आणखी काही त्यांचे शिष्य त्यांच्या सवडीनुसार येत असत. प्रथम एखाद्या रागाची अस्ताई-अंतरा तालात बसवून घेणे, नंतर गायकी ऐकविणे असे त्यांच्या शिकवणुकीचे स्वरूप होते.

पहिल्या महाराष्ट्रदिनी मास्तरांचे मालेगाव येथे गायन होते. त्या वेळी मला मास्तरांच्या साथीस तंबोऱ्याला बसण्याची पहिली संधी मिळाली. त्यानंतर मास्तरांच्या बऱ्याच बैठकी मला ऐकण्यास मिळाल्या. त्यातील काही बैठकी अविस्मरणीय झाल्या. त्यांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. भारत गायन समाजाचे तत्कालीन कार्याध्यक्ष श्रीमान रावसाहेब केळकर यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त मास्तरांचे गाणे होते. तो नरसिंह जयंतीचा दिवस होता. अगदी मोजके श्रोते असल्याने मास्तरांनी ठेवणीतील खास राग व चिजा त्या बैठकीत सादर केल्या. 

दरबारी कानडा (जैसे मोराजी), तिलक केदार (मंगल गाये), वसंत केदार (मधुवा पी वन लागी), वसंत बहार (जोगी वही), भैरवी (बोला अमृत बोला) या क्रमाने त्यांनी राग सादर केले. पं.लालजी गोखले तबल्याच्या साधीस होते. रावसाहेबांनी मध्यंतरानंतर सर्व कलाकारांचे आभार मानून मास्तरांना जरीचा फेटा देऊन त्यांचा गौरव केला. मास्तरांनी स्टेजवर बसूनच तो फेटा बांधला. त्यानंतर त्यांनी वसंत केदार हा राग सादर केला. ती मैफल पहाटे चारपर्यंत रंगली होती. दुसरी अविस्मरणीय बैठक मुंबईच्या ट्रिनिटी क्लबमध्ये झाली. ती बैठक सकाळी झाली. मास्तरांच्या मागे मी तंबोऱ्याच्या साथीस होतो. त्या वेळी मास्तर कृष्णराव प्रभात भैरव, कोमल रिषभ आसावरी हे राग गायले होते. 

त्यांनी एक नाट्यगीत व भैरवी गाऊन या कार्यक्रमाची सांगता केली. कै.ह.रा.महाजनी हे उपस्थित होते. बालगंधर्वांनी मास्तरांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार केला. हे दृश्य मी पाहिले. बालगंधर्व मास्टर कृष्णरावांना गुरुस्थानी मानीत असत. कारण गंधर्व कंपनीच्या नाटकांतील पदांना चाली देण्याच्या निमित्ताने मास्तरांनी त्यांना अनेक पदे शिकविली होती. मास्तरांच्या आयुष्यातील अखेरचे गाणे भारत गायन समाजात 17 ऑक्टोबर 1969 या दिवशी कै. पं.भास्करबुवा बखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त झाले. त्या वेळी मास्तर फार थकले होते. 

ते पंधरा-वीस मिनिटे मारवा रागातील 'आज मधमाती' व 'शाम पिहरवा भोर भविलवा' या चिजा गायले. वृद्धापकाळामुळे त्यांचे पाय कापत होते, परंतु स्वर मात्र कापत नव्हता. सुप्रसिद्ध गायक कै. पं.राम मराठे हे मास्तरांचे पट्टशिष्य होते. बऱ्याच वर्षानंतर कै. पं. रामभाऊ व मास्तर या शिष्य व गुरूंमध्ये दिलजमाई झाली. त्यानंतर मास्तर रामभाऊंना अनवट रागातील चिजा शिकवू लागले. मी व माझा भाऊ सुधीर असे दोघेजण रामभाऊंबरोबर तालमीच्या वेळी तंबोऱ्याच्या साधीस व तबल्यावर ठेका धरण्यास जात होतो. त्या वेळी आम्हांला हिंडोलबहार, मंगल तोडी, जीवनकली. तिलक केदार, वसंत केदार, पंचम मालकंस, अजद हिंडोल यांसारख्या रागांमधील चिजा ऐकण्यास मिळाल्या, शिकण्यास मिळाल्या. 

याच सुमारास पं. रामभाऊ मराठे यांची एक मैफल भावे स्कूलच्या सभागृहात झालीय उस्ताद थिरकवा तबल्याच्या साथीस बसणार होते. मास्तर त्या वेळी थकलेले असतानाही उपस्थित होते. रामभाऊंनी त्या बैठकीत अडाणा, सोहोनी, देस हे मास्तरांचे आवडते व गळ्यावर चढलेले राग मोठ्या जिद्दीने सादर करून मास्तरांच्या गायकीची श्रोत्यांना आठवण करून दिली. "रामने मला माझ्या जुन्या जागा आज पुन्हा ऐकविल्या." अशा उद्गारांनी मास्तरांनी आपल्या आवडत्या शिष्याचे कौतुक केले.

मी मास्तरांच्या गाण्यामुळे त्यांच्याकडे आकर्षिला गेलो. तसेच त्यांचा हजरजबाबीपणा, कोटिवाज बोलणे, कोणालाही टाकून न बोलणे, बोलका स्वभाव, चेहऱ्याची विशिष्ट हसतमुख ठेवण या त्यांच्या ठायीच्या गुणसमुचयामुळे मी त्यांच्याकडे आकर्षित झालो, वडीलधाऱ्या मंडळींचा व गुणजनांचा मान राखण्याची त्यांची वृत्ती अनुकरणीय होती. आपल्या घरातील सर्वच शुभकार्याची अक्षत आपल्या गुरुंच्या घरी ठेवण्यासाठी मास्तर सहकुटुंब आमच्याकडे येत असत. ते माझ्या आजीला आदराने, न विसरता नमस्कार करीत असत. आमच्याकडील शुभकार्यांना ते सपत्नीक उपस्थित राहात असत. 

माझ्या बारशानिमित्त, मुंजीनिमित्त, आणि विवाहानिमित्त मास्तरांनी मला चांदीची झारी, चांदीचा पेला, चांदीची अत्तरदाणी या वस्तू भेट म्हणून दिल्या आहेत. त्या सर्वच वस्तू मी मास्तरांची आठवण म्हणून जतन करून ठेवलेल्या आहेत. ग्वाल्हेर घराण्याचे सुप्रसिद्ध गायक कै. कृष्णराव शंकर पंडित हे मास्तरांपेक्षा वयाने वडील होते. ते आकाशवाणीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यात आल्याचे मास्तरांना समजले. ते कोठे उतरले आहेत. त्यांचा मुक्काम किती आहे इत्यादी माहिती मिळवून त्यांना आपल्या घरी येण्याचे निमंत्रण देण्यासाठी मास्तर गेले होते. कै. कृष्णराव पंडित सिटीपोस्टासमोरील समाधान लॉज मध्ये उतरले होते. निमंत्रण देण्यासाठी मीही मास्तरांवरोबर गेलो होतो. मास्तरांनी आपल्या घरी कै. कृष्णराव पंडित यांचा आदरसत्कार केला होता. 

शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या हॉलमध्ये कै. कुष्णराव पंडित यांची बैठक झाली होती. त्या बैठकीला मास्तर मलाही घेऊन गेले होते 1968 च्या 19 ऑक्टोबरला मुंबई येथे ब्राह्मण सभेमध्ये मास्तरांचा सत्कार व गाणे होते. सूरश्री केसरबाई, अजमत हुसेन खाँ, खादिम हुसेन इत्यादी कलाकार या सत्काराला आले होते. हे सर्व नामांकित कलाकार आपल्या गुरुघराण्यातील म्हणून मास्तरांनी या सर्वांची मोठया आदराने चौकशी केली. वडील गुरुभगिनी म्हणून त्यांनी केसरबाईना वाकून नमस्कार केला. सन 1961 नंतर मधुमेह, रक्तदाब, वाढते वय इत्यादी व्याधीमुळे मास्तरांची प्रकृती वारंवार बिघडू लागली.

फेशिअल पॅरॅलिसिसचा अ‍ॅटॅक यांमुळे त्यांचे बाहेरगावी जाणे, गाण्याचे कार्यक्रम बंद झाले. याही अवस्येत मास्तरांनी भारत गायन समाजाच्या अभ्यासक्रमानुसार रागसंग्रह भाग 4 ते 7 यांचे लेखन करून ही पुस्तके प्रसिद्ध केली. 23 ऑक्टोबर 1968 रोजी भाऊबीजेच्या दिवशी रात्री 8 च्या सुमारास मास्तरांच्या पत्नी राधाबाई यांचे हृदयविकाराने अचानक निधन झाले. हा मास्तरांवर फारच मोठा आघात होता. या प्रचंड आघाताने मास्तर मनाने खचून गेले 1 ऑक्टोबर 1968 रोजी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सुप्रसिद्ध गायिका किशोरी आमोणकर यांनी मास्तरांचा गंडा बांधला. 

इंटरनॅशनल बुक स्टॉलचे मालक कै. विठ्ठ्लराव दीक्षित यांच्या मध्यस्थीने हा योग जुळून आला होता. 'महादेव की बानी सुनत आनंद भयोरी' या ‘अजद हिंडोल' रागातील चीजेची तालीम देण्यास सुरुवात झाली. परंतु ऐन दिवाळीत पत्नीचे अचानकपणे झालेले निधन, मानसिक धक्का यांमुळे मास्तरांची प्रकृती बिघडली. त्यांची मानसिक अवस्था गाण्यास योग्य नव्हती. त्यामुळे किशोरी आमोणकरांची संगीताची तालीम बंद झाली. अन्यथा आणखी काही अनवट रागांमधील चीजा मास्तरांच्या खजिन्यातून बाहेर पडल्या असत्या.

17 मे 1969 रोजी मुंबई येथे मास्टर मनहरजी बरवे यांच्या संगीत विद्यालयात मास्तरांची सार्वकालीन रागांची मैफल झाली. त्या वेळी मी आणि पं.राम मराठे असे दोघेजण तंबोऱ्याच्या साथीस होतो. हीच त्यांची मुंबईतील अखेरची बैठक होती. त्या वेळी मास्तर मारवा. दोन मध्यमांचा श्री, देवसाख शिवकल्याण, हे राग गायले. भारत सरकारतर्फ पद्मभूषण हा किताब, संगीत नाटक अकादमी (दिल्ली) यांचे रत्नसदस्यत्व (फेलोशिप) इत्यादी सन्मान मास्तरांना त्यांच्या अखेरच्या आयुष्यात बहाल करण्यात आले. परंतु शरीर थकत चालल्यामुळे त्यांचा फारसा आनंद मास्तरांना उपभोगता आला नाही. मास्तरांच्या अखेरच्या काळात भोजन, औषधोपचार, विश्रांती, आल्यागेल्याशी गप्पागोष्टी करणे, थोडे गाणे, रेडिओ ऐकणे असा त्यांचा दिवसाचा कार्यक्रम असे. परंतु मनात मात्र स्वर, ताल, राग सतत घोळत असत. ते अनेक चीजा गुणगुणून दाखवीत असत तेव्हा याचे प्रत्यंतर येत असे. 

मोरे प्यारे किसन कन्हाई (गुर्जरी तोडी), एमा बादल आये (मिया मल्हार), जागो उठो, जागो भगवान (विभास), ए मधमाती आयी (सारंग) या चीजा मास्तरांनी अखेरच्या काळातच बांधल्या. याच काळात त्या मलाही शिकविल्या. शारीरिक थकवा हीच त्यांची मोठी व्याधी होती. परंतु त्यांची स्मरणशक्ती जागृत होती. त्यांच्या अखेरच्या दिवशी सकाळी श्री. शरद सरदेसाई त्यांना भेटण्यासाठी आले होते. मास्तरांनी त्यांच्याशी गप्पा मारल्या, "आता थोडा वेळ पड़तो." असे ते म्हणाले. मास्तर झोपले आणि झोपेतच ब्रेनहॅमरेज होऊन 20 ऑक्टोबर 1974 रोजी ललिता पंचमी या दिवशी रामप्रहरी मास्तरांनी आपली पृथ्वीवरील मैफल संपविली. जणू काही परमेश्वराच्या दरबारात मैफल सादर करण्यासाठी मास्तर निघून गेले. मास्तर गेले, परंतु जाताना अनेक आठवणींचा सुगंध त्यांनी ठायी ठायी पसरविला. तो सुगंध अजूनही ताजा, दरवळणारा, सर्वांनाच सुखविणारा आहे. मास्तरांना अमर करणारा आहे.

Tags: विठ्ठ्लराव दीक्षित कृष्णराव शंकर पंडित किशोरी आमोणकर दिल्ली संगीत नाटक अकादमी  पद्मभूषण भास्करबुवा बखले कृष्णराव फुलंब्रीकर सुहास दातार Vitthalrao Dikshit Krunrao Shankar Pandit kishori Amonkar Delhi Sangit Natak Akadami Bhaskarrao bakhale Padmbhushan Krushnrao Funbrikar Suhas Datar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके