Diwali_4 सार्वजनिक व्यवहारामधल्या विवेकाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न ...
डिजिटल अर्काईव्ह (2008-2021)

सार्वजनिक व्यवहारामधल्या विवेकाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न ...

तेव्हा श्री.शरद खेडेकर यांना वरकरणी पटणाऱ्या मनसेनेच्या राजकारणात खरेच मराठी माणसाचे काय  हित आहे आणि त्यातून मराठी संस्कृती कशी समृद्ध होणार याचा त्यांनी अवश्य विचार करावा. श्री.प्रदीप तत्सत म्हणतात त्याप्रमाणे ते मराठीचे अतिरेकी अभिमानी नाहीत. पण विविधतेच्या पुरस्काराला ते भोंगळपणा, पुरोगामित्व इत्यादी विशेषणे लावतात. स्थानिक, राष्ट्रीय आणि वैश्विक यांच्यात काही समानधागेदोरे विणण्याला त्यांचा विरोध आहे असेच वाटते. मनसेनेसारख्या प्रचारांमधून जो कडवेपणा येतो त्यातून हा विरोधनिर्माण होतो असे मला वाटते.

सार्वजनिक व्यवहारामधल्या विवेकाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न ...

श्री.शरद खेडेकर (17 व 31 जानेवारी) आणि श्री.प्रदीप तत्सत (7 फेब्रुवारी) यांनी माझ्या मनसेने विषयीच्या लेखाविषयी काही मतभेद नोंदवले आहेत. दोघांनाही असे वाटते की मी मराठी स्वाभिमानाच्या विरुद्ध आहे आणि मराठी हिताविषयी मला स्वारस्य नाही. मुळात माझी लेखमाला मराठी (भाषेचे व माणसाचे) काय करायचे याच्याबद्दल नव्हती. मराठीच्या नावाने केले जाणारे राजकारण मराठी (भाषेच्या व माणसाच्या) हिताचे नाही आणि व्यापक सार्वजनिक हिताचे ही नाही असे माझे प्रतिपादन होते. त्यात श्री.तत्सत म्हणतात तसे इतरांच्या प्रांतवादाला झुकते माप कोठेही दिलेले नाही. उलट मी मनसेनेबद्दल जे म्हणतो आहे त्याच तर्काने फाजील तमिळवादी किंवा कन्नडवाडी भूमिकाही चुकीचीच आहे.

दुकानांच्या नावांच्या पाट्यांचा मुद्दा घेऊ. एखाद्या शहरात जर फक्त तमिळ/कन्नड भाषेत व लिपीत सर्व पाट्या/सूचना असतील तर ते शहर इतर भाषिकांना त्रासदायकच ठरेल. आपण बहुभाषिक देशात (आणि जगात) राहतो याचे भान ठेवायलाच हवे. त्यामुळे तमिळ रिक्षावाला हिंदी बोलत नाही ही गोष्ट मला अजिबात अभिमानास्पद किंवा कौतुकास्पद वाटत नाही. भाषा ही संपर्काची खिडकी आहे. ती ‘प्रवेश बंद’ ची पाटी ठरणे ही गोष्ट दु:खाची आणि कोतेपणाची आहे.

पण म्हणून प्रत्येकवेळी इतर भाषकांचा दु:स्वास करणं हाच भाषाभिमानाचा अर्थ होता कामा नये. आपल्या भाषेवर सतत कोणीतरी अन्याय करते आहे अशी ग्रस्तमनोवृत्ती मला अनावश्यक वाटते आणि आपली भाषा (इतरांमुळे) संकटात आहे अशी आवई उठवण्याचे राजकारण फक्त मतलबाचे राजकारण आहे असे माझे म्हणणे आहे. तसेच भाषावार प्रांतरचना झाली म्हणजे भाषिक सरमिसळ थांबवता येईल किंवा थांबवावी असाही त्याचा अर्थ होत नाही. सारांश, बहुभाषक समाजात भाषाविवेक गरजेचा आहे.

दुसरा मुद्दा मागास राज्यांचा आहे. आपली अशी समजूत आहे की काही राज्यांना मागास राहायलाच आवडते. किंवा ओरिसा-बिहार या राज्यांमध्येच अशी काही अंगभूत कमतरता आहे की त्यामुळे ती मागे राहिली. राज्यांच्या मागासलेपणात अनेक प्रश्न गुंतलेले असतात. पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्योत्तर विकासनीतीमध्ये ज्या मर्यादा होत्या त्यांचा वाटा या मागासलेपणात फार मोठा आहे. कोणत्या राज्याला किती पैसा दिला गेला एवढाच मुद्दा नसतो. 1950 व 1960च्या दशकांमध्ये उद्योगांचा, बाजारपेठांचा, दळणवळणाचा इत्यादी सुविधा व धोरणात्मक बाबींचा विकास कसा झाला यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. नैसर्गिक खनिज संपत्ती असणाऱ्या प्रदेशांना तिचा मोबदला कसा द्यायचा, शेती व उद्योग यांचा समतोल कसा साधायचा इत्यादी संदर्भांचा विकास व मागासलेपणाशी संबंध असतो. नाहीतर मग मराठवाडा मागासलेला का आहे याचे उत्तर काय देणार? अशी कल्पना करूयात की मराठवाडा हे स्वतंत्र राज्य झाले असते तर आज रोजी ते मागासलेले राज्य ठरले असते का? आणि त्याचा दोष तिथले लोक, प्रशासक व राज्यकर्ते एवढ्यांचाच असतो का? आपण महाराष्ट्राच्या अंतर्गतही ‘विभागीय असमतोला’ची चर्चा करताना असेच मान्य करतो ना की, सर्व विभागांचा समतोल विकास न होण्यामागे सध्याची धोरणे कारणीभूत आहेत? तसेच देशातील काही राज्ये देशाच्या धोरणामुळे मागे पडतात.

तिसरा मुद्दा आहे तो मराठीचा सकस, विधायक आग्रह कसा धरायचा आणि तरीही संकुचित सांस्कृतिक विश्व कसे ओलांडायचे हा. मराठी चित्रपट, दूरचित्र वाहिन्या, मराठी साहित्य, यांच्या सांस्कृतिक समृद्धीच्या आड परप्रांतीय कोठे येतात? आत्मभान आणि स्वाभिमान यांना परसंशय व परद्वेषयांचा आधार कशाला लागतो?

तेव्हा श्री.शरद खेडेकर यांना वरकरणी पटणाऱ्या मनसेनेच्या राजकारणात खरेच मराठी माणसाचे काय  हित आहे आणि त्यातून मराठी संस्कृती कशी समृद्ध होणार याचा त्यांनी अवश्य विचार करावा. श्री.प्रदीप तत्सत म्हणतात त्याप्रमाणे ते मराठीचे अतिरेकी अभिमानी नाहीत. पण विविधतेच्या पुरस्काराला ते भोंगळपणा, पुरोगामित्व इत्यादी विशेषणे लावतात. स्थानिक, राष्ट्रीय आणि वैश्विक यांच्यात काही समानधागेदोरे विणण्याला त्यांचा विरोध आहे असेच वाटते. मनसेनेसारख्या प्रचारांमधून जो कडवेपणा येतो त्यातून हा विरोधनिर्माण होतो असे मला वाटते.

त्यामुळे मनसेनेच्या ‘निमित्ता’ने आपल्या सार्वजनिक व्यवहारांमधल्या विवेकाचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न मी त्या लेखमालेतून केला. दोघांच्याही प्रतिक्रियांमधून या मूलभूत विवेकाधिष्ठित देवाणघेवाणीला ते तयार आहेत हे दिसते; आणि ती आनंदाची बाब आहे.

Tags: प्रदीप तत्सत शरद खेडेकर सुहास पळशीकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पळशीकर,  पुणे, महाराष्ट्र
suhaspalshikar@gmail.com

राजकीय विश्लेषक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात