डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

आधुनिक विद्याशाखांशी पुष्कळ संबंध आल्यामुळे कदाचित प्रभाताईंनी रागसंगीताकडे अधिक चिकित्सकपणे पाहिलेले आहे. शास्त्रीय संगीतासारख्या कलेत जी पारलौकिकाची भाषा (दैवी अनुभूती, परमेश्वराचा कृपाप्रसाद, राग माझ्याकडून स्वतः गाववून घेतो, इत्यादी.) सर्रास वापरली जाते, ती (स्वतः धार्मिक असूनही) प्रभाताईंनी क्वचितच कुठे वापरली आहे. संगीतचर्चेमध्ये काटेकोरपणे शास्त्रीय परिभाषेतच (म्हणजे सर्वसामान्य श्रोता-वाचकाला अगम्य भाषेत नव्हे!) लिहायचे- बोलायचे यावर त्यांचा आग्रही कटाक्ष आहे. दुर्दैवाने आपल्या अनेक मोठमोठ्या प्रतिभावान कलावंतांमध्येही या गुणाची वानवा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत करामत आणि कला यांतील फरक कलाकारांनी आणि श्रोत्यांनी लक्षात घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

किराणा घराण्याच्या आजघडीच्या सर्वार्थाने ‘बुजुर्ग’ गायिका डॉ. प्रभा अत्रे नव्वदीत प्रवेश करत्या झाल्या हे संगीतरसिकांचे भाग्य. फिरोज दस्तूर, गंगूबाई हनगल, भीमसेन जोशी या किराण्याच्या तिसऱ्या फळीने दीर्घायुष्य पाहिले, त्यांचे गाणेही शेवटपर्यंत रसरशीत होते. प्रभाताईंनी आताशी नव्वदी गाठली आहे, त्यांच्या बुजुर्ग सहवासाची सावली आपल्याला अजून पुष्कळ काळ अनुभवायची आहे. 

शास्त्रीय संगीत शिकू पाहणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्याची सामान्यतः पहिली वीसेक वर्षे व्याकरणिक गोष्टी समजून घेण्यात आणि गळ्यावर चढण्यात जातात. दरम्यान एखाद्या गायकीचा कानांवर- गळ्यावर संस्कार होऊ लागतो. पुष्कळ गाणे कानांवर पडून त्यातून स्वतःच्या गाण्यातील सौंदर्यविशेषांची ‘निवड’ तयार होण्याची, त्यालाच समांतरपणे स्वतःचा सांगीतिक आशय हाती लागण्याची आणि स्वतः केलेल्या निवडीतून, स्वतःला सापडलेला सांगीतिक आशय अभिव्यक्त करण्याची क्षमता तयार होण्याची, या किंवा अशा असंख्य सर्जनशील प्रक्रिया घडत एकजिनसी सांगीतिक व्यक्तिमत्त्व तयार होण्यात वयाची तिशी-चाळिशी उलटते. तिथून पुढच्या गाण्यात या सांगीतिक आशयाचा विकास गायकाच्या कुवतीअनुरूप घडताना दिसतो. वयाचा असा दीर्घावकाश लाभणे हे संगीतकाराच्या आयुष्यातले भाग्यच. प्रभाताईंना ते लाभले आहे आणि त्याचा पुरेपूर लाभ आपणां श्रोत्यांच्या पदरी पडतो आहे.

घडणीचा सुरुवातीचा काळ सोडला तर प्रभाताईंचा संगीताशी संबंध केवळ स्टेजवर बसून गाणे एवढ्यापुरताच राहिलेला नाही. आपण जे गातो ते संवादाचेच कलात्मक माध्यम आहे आणि त्यातून आपल्याला जो सांगीतिक आशय पोहोचवायचा आहे तो सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचायचा असेल तर श्रोत्यांची संगीत-माध्यमाची साक्षरता केवळ व्याकरण ज्ञानाच्या पलीकडे जायला हवी या जाणिवेतून त्या विविध पातळ्यांवर उपक्रमशील राहिल्या आहेत. प्रत्यक्ष संगीत, संगीतातील स्वतःची निर्मिती, संगीतामागचा तात्त्विक विचार, संगीतविषयक लेखन,  संगीताचे पारंपरिक (गुरू-शिष्य पद्धतीने) आणि अपारंपरिक (महाविद्यालयीन पद्धतीने) अध्यापन, श्रोत्यांच्या अभिरुचीच्या उन्नतीला पूरक कार्यक्रम अशा या पातळ्या सांगता येतील. गेली जवळपास सत्तरेक वर्षे असे भरीव काम प्रभाताई करत आहेत.

प्रभाताईंचा जन्म 13 सप्टेंबर 1932 या दिवशी पुणे इथे झाला. त्यांना संगीताचा कोणताही कौटुंबिक वारसा नाही.  मात्र आई इंदिराबाई व वडील आबासाहेब हे दोघेही शिक्षक असल्याने आपल्या मुलींनी अभ्यासेतर सर्व उपक्रमांत भाग घेतला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. आईचे आजारपण प्रभाताईंच्या संगीत शिक्षणाला कारणीभूत झाले. आईच्या मनाला विरंगुळा म्हणून तिच्यासाठी एका हार्मोनियम शिक्षकाची नेमणूक करण्यात आली. मात्र चार-पाच दिवसांनंतर आईने हार्मोनियमची शिकवणी बंद केली आणि हार्मोनियमऐवजी प्रभाताईंचे गाण्याचे शिक्षण सुरू झाले. संगीताचे प्राथमिक धडे त्यांनी विजय करंदीकर यांच्याकडे गिरवले आणि पुढे किराणा घराण्याचे मान्यवर कलावंत सुरेशबाबू माने यांच्याकडे त्या जवळपास सहा वर्षे शिकल्या. दरम्यान फर्गसन महाविद्यालयातून बीएस्सीचे शिक्षण पूर्ण करून विधी महाविद्यालय, पुणे येथे त्यांचे ‘लॉ’चे शिक्षण सुरू झाले होते. ‘लॉ’च्या शेवटच्या वर्षी सुरेशबाबूंचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने प्रभाताईंच्या संगीतशिक्षणात खंड पडला. सुरेशबाबूंशी त्यांचे नाते इतके जवळचे होते की, दुसऱ्या कुणाकडे गाणे शिकण्यासाठी त्यांचे मन तयार होत नव्हते. मात्र पुढे 1954 ते 1956 या काळात त्यांना संगीताच्या विशेष अध्ययनासाठी केंद्र सरकारची दोन वर्षांसाठीची शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याबरोबरच हिराबाई बडोदेकर यांचे मार्गदर्शन मिळाले. प्रभाताई आज हयात असणाऱ्या अशा दुर्मीळ कलावंतांपैकी आहेत की, ज्यांच्या गळ्यावर पारंपरिक पद्धतीने संपूर्णपणे एकाच गायकीचे संस्कार झालेले आहेत. सुरेशबाबू आणि हिराबाई या दोघांनाही किराणा गायकीचे अध्वर्यू अब्दुल करीम खाँ यांची प्रत्यक्ष तालीम होती. त्यामुळे किराणा घराण्याची मूलभूत वैशिष्ट्ये प्रभाताईंच्या गाण्यात खास दिसतात. किराणा घराण्याचा कितीही लहान/मोठा, ज्येष्ठ/कनिष्ठ कलावंत असला तरी स्वराच्या नेमक्या श्रुतीस्थानी जाण्याचा प्रयत्न करत स्वराची भावात्म शक्ती जागृत करण्याची त्याची क्षमता त्याच्या गाण्यात जाणवल्याशिवाय राहत नाही. स्वर-लयीच्या विभ्रमांनी दिपवण्याऐवजी केवळ स्वरांच्या निखळ अस्तित्वदर्शनाने भारावून सोडण्याची आणि शांतवण्याची सिद्धी या गायकीत आहे. रागातल्या स्वरांचे नेमके - सूक्ष्मातिसूक्ष्म स्थान कोणते आहे याचा शोध घेणे हेच जणू या घराण्याचे संगीत तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे अब्दुल करीम खाँसाहेबांपासून सवाई गंधर्व, रोशनआरा बेगम, हिराबाई, फिरोज दस्तूर, गंगूबाई, भीमसेन, संगमेश्वर गुरव आदी किराण्याचा टिळा लावणाऱ्या प्रत्येक गवयाने स्वतःच्या गाण्यात स्वतःच्या निवडीअनुरूप कितीही बदल केले तरी स्वरांची भावात्म शक्ती जागी करणाऱ्या लगावांची परंपरा कुठेही खंडित झालेली नाही. स्वर या संगीताच्या मूलतत्त्वावर या घराण्याने इतकी हुकूमत मिळवलेली आहे की कुमारगंधर्व, किशोरी अमोणकर, जितेंद्र अभिषेकी या स्वतंत्र प्रतिभेच्या कलावंतांनाही या गायकीच्या संस्काराचे महत्त्व जाणवलेले होते. ‘‘प्रत्येक गवयाने सुरुवातीची काही वर्षे किराण्याची तालीम घेतली पाहिजे,’’ असे उद्गार निवृत्तीबुवा सरनाईकांसारख्या ‘जयपूर’च्या शिस्तीत वाढलेल्या मान्यवर कलावंताने काढले आहेत. (शास्त्रीय संगीत नव्याने ऐकू इच्छिणाऱ्यांसही हा परिपाठ उपयुक्त ठरला आहे.) ‘शिशुर्वेत्ति पशुर्वेत्ति’ अशी ख्याती असणाऱ्या या किराणा गायकीचे संस्कार प्रभाताईंच्या गळ्यावर झाले. तबियतीत चाललेली, किंचित स्वनयुक्त आकाराची तालमुक्त आलापी, बंदिशीचे शब्द गुंफून लयीशी खेळत चालणारी बोलआलापी, भरदार गमकेच्या ताना, तिन्ही सप्तकांत फिरणाऱ्या चपळ ताना अशी किराणा गायकीची पारंपरिक वैशिष्ट्ये प्रभाताईंच्या गाण्यात दिसतात. बंदिशीच्या शब्दांचे स्वच्छ आणि भावनानुकूल उच्चार किराणा घराण्यात हिराबाईंच्या खालोखाल प्रभाताईंचेच आहेत. सरगम हा अब्दुल करीम खाँ यांच्या गाण्यातला एक विशेष किराण्याच्या इतर कलावंतांनी काहीसा उपेक्षिलेला होता, प्रभाताईंनी आपल्या गाण्यात तो पुष्कळ प्रमाणात समाविष्ट केला. मात्र खाँसाहेबांपेक्षा प्रभाताईंची सरगम गाण्याची शैली वेगळी आहे. (सुरेशबाबूंची काही ध्वनिमुद्रणे मुश्किलीने उपलब्ध आहेत. जोगियामधील त्यांचे ध्वनिमुद्रण (हरी का भेद न पायो) ऐकताना आणि त्यात त्यांनी घेतलेली सरगम ऐकताना खाँसाहेबांच्या गाण्याचीच आठवण होते.) प्रभाताईंनी आपल्या गाण्यात अमीरखाँ यांच्या प्रभावाने मेरखंड पद्धतीची सरगम घेतली आहे.

एलएलबी झाल्यानंतर प्रभाताई आकाशवाणीत काम करू लागल्या. 1960 मध्ये नागपूर आकाशवाणीत काम करत असताना अमीर खाँ यांच्या गायकीचे दालन त्यांच्यासमोर खुले झाले. खाँसाहेबांच्या गायकीचा ‘असर’ त्या पिढीतील जवळपास प्रत्येक पुरुष गायकावर झालेला होताच; परंतु महाराष्ट्रात तरी प्रभाताईंखेरीज क्वचितच एखाद्या स्त्री गायिकेने या अनवट गायकीतील एखादे वैशिष्ट्य जाणीवपूर्वक गळ्यावर चढवण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली असेल. पुढे सरगम या विषयाचाच अभ्यास करून त्यांनी त्यात पीएचडीही संपादन केली. आलाप, तान, बोल यांप्रमाणेच सरगमचेही स्वतःचे एक वैशिष्ट्य आहे, स्वतःचा वेगळा परिणाम आहे त्यामुळे ती विचारपूर्वक आणि सौंदर्यपूर्ण तऱ्हेने गायली जायला हवी असे त्यांचे मत आहे. आकाशवाणीत काम करत असतानाच लोकसंगीत, चित्रपट संगीत, सुगम संगीत, कर्नाटक संगीत, पाश्चात्त्य संगीत या इतर संगीतप्रकारांशी दैनंदिन संबंध आला. धाकटी बहीण उषा अत्रे ही मोजकीच भावगीते गाणारी गुणी भावगीत गायिका होती. (उषाताई आज स्मृतिरूप झाल्या असल्या तरी ‘घर दिव्यात मंद तरी’, ‘नवीन आज चंद्रमा’ ही त्यांच्या आवाजातील अवीट चालींची गाणी मागच्या दोन पिढ्यांतील मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या मनातून पुसून टाकणे अशक्य आहे!) प्रभाताईंच्या ग्रहणशील मनावर या सगळ्यांचा संस्कार झाला नसता तरच नवल.

आकाशवाणीत काम करत असतानाच प्रभाताईंनी लंडनच्या ट्रिनिटी कॉलेज ऑफ म्युझिकतर्फे घेतल्या जाणाऱ्या पाश्चात्त्य संगीताच्या परीक्षा दिल्या. आकाशवाणीतून बाहेर पडल्यानंतर मुंबईच्या एसएनडीटी विद्यापीठात जवळपास 13 वर्षे त्यांनी अध्यापन केले. तिथे विद्यार्थांसाठी अभ्यासक्रम तयार करताना एथ्नोम्युझिकॉलॉजी या विषयाचे शिक्षण घेण्यासाठी एका इंडो-अमेरिकन प्रोग्रॅमअंतर्गत लॉस एंजेलिसला गेल्या आणि युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामध्ये त्यांनी त्या विषयाचे प्रशिक्षण घेतले.

स्वतःतल्या सर्जनशीलतेचा शोध लागल्यानंतर प्रभाताईंनी स्वतः संगीतरचना करणे सुरू केले. दुर्दैवाने सुरेशबाबू अकाली गेल्यामुळे त्यांच्याकडून मिळालेल्या बंदिशींचा साठा मर्यादित होता. अशा वेळी नवे राग, नव्या बंदिशी शिकण्यासाठी नव्या गुरूकडे जाण्याऐवजी एकलव्य वृत्तीने ‘उद्धरेदात्मनात्मानं’ हा मार्ग त्यांना अनुकूल वाटला. त्यातूनच स्वतःच्या नव्या गायकीला अनुकूल बंदिशी स्वतः रचण्याची प्रेरणा त्यांना झाली. आज त्यांच्या बहुतेक रचनांना लोकमान्यताही लाभलेली आहे. मारुबिहाग रागाच्या त्यांच्या पहिल्या एलपी रेकॉर्डची चर्चा झाली ती केवळ त्यांनी शुद्ध मध्यमाचा वापर न करता तो राग गायला आहे (मारुबिहाग रागात दोन्ही मध्यम वापरले जातात. मात्र शुद्ध मध्यम वर्ज्य करूनही तो राग त्याचे स्वतंत्रपण कायम राखत प्रभावीपणे गाता येतो असे प्रभाताईंचे मत आहे.) म्हणून नाही तर ‘जागू मैं सारी रैना बलमा’ या त्यांच्या नितांतसुंदर रचनेमुळेही. त्याच एलपीमध्ये त्यांनी गायलेली कलावती रागातली ‘तन मन धन तो पे वारू’ ही मध्यलय एकतालातली बंदिश त्या रागाशी आता कायमची जोडली गेली आहे. गंगूबाईंनीही स्वतः अनेकदा हा राग अतिशय सुंदर गायलेला आहे. त्यामुळे दाक्षिणात्य संगीतातून उत्तर हिंदुस्थानी संगीतात आलेल्या कलावती रागाची श्रोत्यांच्या मनातली प्रतिमा किराणा घराण्यातील या दोन कलावतींनी खऱ्या अर्थाने निश्चित केली आहे असे म्हणता येईल. प्रभाताईंची या दोन्ही रागांची मांडणी अतिशय लालित्यपूर्ण आणि भावगीताला शोभेलशा नजाकतीने बहरलेली आहे.

भैरव, चंद्रकंस, यमन, बागेश्री, मधुवंती, मालकंस असे सर्वत्र प्रचलित असणारे, फार किचकट रागनियम नसणारे, स्वरप्रधानत्वामुळे विलंबित आलापीला ऐसपैस वाव असणारे राग प्रभाताईंनी विशेष आस्थेने गायलेले दिसतात. पास होण्यासाठी सोपा- परंतु वरची श्रेणी मिळवण्यासाठी कठीण असलेल्या प्रश्नपत्रिकेसारखे हे राग असतात. म्हणजे असे राग गाताना गायक व्याकरणात चुकण्याची शक्यता जितकी कमी असते; तितकीच त्यात गायकाला स्वतःची स्वतंत्र छाप उमटवणे अवघड असते. परंतु या बाबत केवळ प्रभाताईच नव्हे तर सबंध किराणा घराण्याचे हे वैशिष्ट्यच म्हटले पाहिजे की, गायकीची मूलतत्त्वे सारखी असूनही आणि रागसंच बव्हंशी सारखा असूनही प्रत्येकाने गायलेला तोच राग सादरीकरणाच्या (presentation) पातळीवर वेगळा असतो. ख्यालसंगीतात गायकाच्या स्वतंत्र अभिव्यक्तीचे (expression) महत्त्व किती आहे, हेच यातून स्पष्ट होते. आणि अशी स्वायत्त अभिव्यक्ती प्रभाताईंपाशी निश्चित आहे. म्हणून त्यांचा यमन, भैरव, बागेश्री वेगळा दिसतो, स्मरणात राहतो. स्वतंत्र बंदिशरचनेबरोबरच स्वतंत्र रागरचनेचेही प्रयत्न प्रभाताईंनी केले आहेत. अपूर्व कल्याण, दरबारीकंस, मधुरकंस, पटदीप मल्हार हे राग त्यांच्या नवनिर्मितीचे द्योतक म्हणून ऐकण्याजोगे आहेत.

ख्यालाव्यतिरिक्त तराना, ठुमरी, दादरा, भजन, गझल असे उपशास्त्रीय संगीतप्रकारही त्यांनी गायलेले आहेत. बडे गुलाम अली खाँ यांच्या ठुमरीचा प्रभाव त्यांच्यावर आहे. रोशनआरा बेगम, बेगम अख्तर, नूरजहाँ यांचे गाणेही त्यांनी लहान वयात पुष्कळ ऐकले आहे. या सगळ्या प्रभावांतून त्यांचे उपशास्त्रीय संगीताचेही स्वतःचे रसायन घडले आहे. याशिवाय त्यांनी स्वतः रचलेल्या काही मराठी गझला त्यांनीच स्वरबद्ध करून गायल्या आहेत. ‘अंतःस्वर’ हा त्यांचा कवितासंग्रह 1997 मध्ये प्रकाशित झाला आहे आणि त्याचा इंग्रजी अनुवादही झालेला आहे. स्वरमयी, सुस्वराली ही संगीतविषयक लेखनाची त्यांची दोन्ही पुस्तकं त्यांचे संगीतविषयक विचार समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. प्रचलित संगीताची अभिव्यक्ती जसजशी बदलते आहे तसतसे त्याचे शास्त्रही विकसित होत गेले पाहिजे, या जाणिवेतून केलेले हे लिखाण आहे. 1989 मध्ये ‘स्वरमयी’ला राज्य पुरस्कार मिळाला आहे. दोन्ही पुस्तकांचे हिंदी अनुवाद मध्य प्रदेश (शासन) हिंदी ग्रंथ अकादमीने प्रकाशित केले आहेत. याशिवाय Enlightening the listener : Contemporary North Indian Classical Vocal Music Performance आणि along the Path of Music (प्रकाशन वर्षे : अनुक्रमे 2000 आणि 2006) ही दोन इंग्रजी पुस्तके अनुक्रमे अटल बिहारी वाजपेयी आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत. देश-विदेशांतील सर्व महत्त्वाच्या संगीत समारोहांतून प्रभाताईंनी आपली कला सादर केली आहे. त्यांच्या बहुतेक सर्व ध्वनिमुद्रिका तसेच ठिकठिकाणच्या मैफलींची ध्वनिमुद्रणे, मुलाखती युट्यूबवर पाहता-ऐकता येतात. 1990 मध्ये पद्मश्री, 1991 मध्ये संगीत नाटक अकादमी, 2002 मध्ये पद्मविभूषण या शासकीय पुरस्कारांसह अनेक लहानमोठे मानसन्मान त्यांना लाभले आहेत.

गेली अनेक वर्षे सुरेशबाबू आणि हिराबाई यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ प्रभाताई मुंबईत राष्ट्रीय पातळीवरच्या संगीत समारोहांचे आयोजन करतात. 2000 मध्ये स्थापन झालेले ‘डॉ. प्रभा अत्रे फाउंडेशन’ आणि 2003 मध्ये स्थापन झालेले ‘स्वरमयी गुरुकुल’ या स्वतःच्या संस्थांसोबतच स्पीकमॅके, संस्कार भारती, गानवर्धन अशा संस्थांशी प्रभाताई सांस्कृतिक कार्यासाठी संलग्न आहेत. समाजातील आर्थिक, सामाजिक मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष राहिलेल्या आहेत. 

आधुनिक विद्याशाखांशी पुष्कळ संबंध आल्यामुळे कदाचित प्रभाताईंनी रागसंगीताकडे अधिक चिकित्सकपणे पाहिलेले आहे. शास्त्रीय संगीतासारख्या कलेत जी पारलौकिकाची भाषा (दैवी अनुभूती, परमेश्वराचा कृपाप्रसाद, राग माझ्याकडून स्वतः गाववून घेतो, इत्यादी.) सर्रास वापरली जाते, ती (स्वतः धार्मिक असूनही) प्रभाताईंनी क्वचितच कुठे वापरली आहे. संगीत चर्चेमध्ये काटेकोरपणे शास्त्रीय परिभाषेतच (म्हणजे सर्वसामान्य श्रोता-वाचकाला अगम्य भाषेत नव्हे!) लिहायचे- बोलायचे यावर त्यांचा आग्रही कटाक्ष आहे. दुर्दैवाने आपल्या अनेक मोठमोठ्या प्रतिभावान कलावंतांमध्येही या गुणाची वानवा आहे. वाढदिवसाच्या निमित्ताने नुकत्याच एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत करामत आणि कला यांतील फरक कलाकारांनी आणि श्रोत्यांनी लक्षात घ्यायला हवा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. थेट तार सप्तकात किंचाळून सूर लावणे, रसवत्तेचा कसलाही विचार न करता  भसाभस ताना घेणे, जलद रूक्ष सरगमचा भपका उभा करणे, असे प्रकार सध्या शास्त्रीय संगीताच्या नावाखाली ‘पॉप्युलर’ होताना दिसतात. या पार्श्वभूमीवर प्रभाताईंनी व्यक्त केलेली अपेक्षा कलाकार आणि श्रोते यांनी जबाबदारी म्हणून स्वीकारायला हवी.

सर्व प्रकारचे संगीतप्रकार आस्थेने ऐकून त्यातील आपल्या गाण्यासाठीच्या अनुकूल गोष्टी स्वीकारण्याचा उदारमतवादी दृष्टिकोन प्रभाताईंकडे आहे. त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांतून त्यांचा हा चिकित्सक आणि उदारमतवादी दृष्टिकोन दिसतो. श्रोत्यांच्या ज्ञानवृद्धीला चालना देणे आणि शास्त्राच्या जाणतेपणाचे अवडंबर माजवणाऱ्यांना अंतर्मुख करायला लावणे अशा दोन्ही दिशांनी त्यांचे विचार चालतात. विस्तारभयास्तव त्यांच्या लेखनातील केवळ दोन मासले इथे दिले आहेत :

1. ‘आजच्या प्रचलित घाटांमध्ये रागाचं अमूर्तपण केवळ ख्यालाच्या माध्यमातूनच जपता येणं शक्य आहे. बंदिशींची शब्दसंख्या कमी केल्याने शब्दांचा भाव स्वरांना चिकटण्याचं प्रमाण कमी होतं, निखळ स्वरांचं प्रमाण रागविस्तारात वाढतं आणि राग आपल्या अमूर्ततेकडे झुकतो. बंदिशीच्या स्थायीची सम वेगवेगळ्या स्वरांवर आढळते. अनेकदा ती तार षड्‌जावरदेखील असते. तेव्हा बंदिशीला अंतऱ्याची गरजच काय? (इथे प्रभाताई आणि किशोरीताई या दोन ‘विचारी’ गायिकांच्या विचारांतले साम्य दिसते. योगायोगाने दोघींचे जन्मवर्षही एकच आहे.) समेवर येताना प्रत्येक वेळेला संपूर्ण बंदिश गायली जात नाही, मग एका आवर्तनाची बंदिश असण्यात वावगं काय?’  (‘सुस्वराली’ पृ. क्र. 47)

2. ‘काही कलाकार रागाचं चलन आणि त्याचे नियम यांपासून खूप स्वातंत्र्य घेतात. अगदी मनमानी करतात. अशा वेळी रागाच्या नावाच्या पाठीमागे ‘मुक्त’ शब्द जोडायला हवा. उदा. मुक्त भूप, मुक्त अल्हैय्या बिलावल इत्यादी. (ठुमरी/ दादरा गाताना रागाच्या नावाच्या मागे ज्याप्रमाणे ‘मिश्र’ हे पद लावल्याने रागबाह्य स्वर वापरण्याचं स्वातंत्र्य मिळते.) बदलत्या काळाचा संदर्भ देऊन एखाद्या सर्जनशील, जबाबदार कलाकाराने राग नियमांच्या चौकटीत नवीन विचार मांडले तर त्याला ते स्वातंत्र्य द्यायला हरकत नसावी. मात्र प्रस्तुतीकरणात सातत्य असलं पाहिजे आणि आपले विचार आत्मविश्वासाने मांडता आले पाहिजेत.’ (‘सुस्वराली’ पृ.क्र. 183)

भारतीय शास्त्रीय संगीताची प्राणतत्त्वे कायम ठेवून अभिव्यक्तीच्या काळास अनुरूप बदलत्या प्रवाहांची दखल घेत, त्यांना सामावून घेत शास्त्राची चौकट विस्तारण्याची, शास्त्राचे पुनर्गठन करण्याची गरज ओळखणाऱ्या आणि त्यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या मोजक्या कलावंतांपैकी प्रभाताई आहेत. याही अर्थाने त्यांची सावली अजून पुष्कळ काळ आपल्याला अनुभवायची आहे. प्रभाताईंचा नव्वदीप्रवेश हा एका प्रगल्भ विचारांनी साकारलेल्या सर्जनविश्वाच्या साफल्याचा मंगल सोहळा आहे!

(शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील प्रख्यात गायिका प्रभा अत्रे यांनी 13 सप्टेंबर रोजी वयाच्या 90 व्या वर्षात प्रवेश केला आहे, त्या निमित्ताने हा लेख प्रसिद्ध करीत आहोत. - संपादक)

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पाटील,  पुणे
suhas.horizon@gmail.com

उपसंपादक, साधना डिजिटल 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके