डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

सिनेमा : द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज (इंग्रजी, ब्रिटन)

एके दिवशी मात्र आपल्याच घरात काम करत असलेला श्मूल ब्रूनोला दिसतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. काचेचे नक्षीदार, नाजूक पेले साफ करण्याचं काम श्मूलला दिलेलं असतं. ब्रूनो आनंदाने त्याच्याशी बोलायला जातो. पण एव्हाना ज्यू हे आपले शत्रू आहेत हे सगळ्यांनी त्याच्या मनावर इतकं बिंबवलेलं असतं की, तो श्मूललाही विचारतो, ‘‘आपण खरं तर एकमेकांचे शत्रू असणं अपेक्षित आहे हे तुला माहीत आहे का?’’

शाळेत इतिहासाच्या अभ्यासात पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, शीतयुद्ध अशा महाभयंकर घटनांविषयी आपण वाचलेलं-ऐकलेलं असतं. पण इतिहासाच्या पुस्तकांतली माहिती वाचून आपल्याला या घटनांची भयानकता तितकीशी जाणवतेच असं नाही. देशादेशांमध्ये जेव्हा युद्धं होतात तेव्हा त्या देशांतल्या अर्थव्यवस्था कोलमडतात, राज्यव्यवस्थेत उलथापालथ होते- वगैरे चर्चा आपण आपल्या आईबाबांकडून, शिक्षकांकडून ऐकलेली असते. पण तिथल्या सामान्य माणसांच्या, मुलांच्या, स्त्रियांच्या जगण्यावर त्याचे काय परिणाम होतात, त्यांच्या मानसिकतेत कसे बदल होतात, ते किती खोलवर असतात याची जाणीव करून देण्याची शक्ती साहित्य व सिनेमा यांच्यासारख्या कलामाध्यमांमध्ये असते.

‘द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज’ या सिनेमाला अशीच एक ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. दुसरं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या नेतृत्वाखाली नाझी जर्मनीने आर्यन वंशाचे जर्मन लोक सोडून इतर सगळ्या जर्मन लोकांना नष्ट करायचं ठरवलेलं होतं, तेव्हाचा काळ या सिनेमाच्या पार्श्वभूमीवर आहे. संपूर्ण सिनेमा मात्र ब्रूनो आणि श्मूल या दोन लहान मुलांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या भावविश्वाभोवती गुंफलेला आहे.

2006 मध्ये ‘द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज’ याच नावाची जॉन बॉयीन या आयरिश लेखकाने लिहिलेली कादंबरी प्रकाशित झाली आणि 2008 मध्ये मार्क हरमन यांनी दिग्दर्शित केलेला हा इंग्रजी सिनेमा प्रदर्शित झाला. कादंबरी आणि सिनेमा यांच्यात काही तपशिलांचा फरक असला तरी मूळ कथानक काल्पनिक आहे; म्हणजे ही सत्य घटना नाही. मात्र हिटलरच्या काळातील क्रौर्याच्या कथा माहीत असतील तर ही कथा अतिशोयक्ती करणारीही वाटत नाही. या सिनेमात ऐतिहासिक तथ्यांशी बऱ्याच अंशी फारकत घेतली गेली आहे, अशी टीकाही झाली आहे. पण या सिनेमाला जगभर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.

तर कथानक असे... ब्रूनो नावाचा आठ वर्षांचा एक मुलगा बर्लिन या शहरात त्याच्या कुटुंबासमवेत राहत असतो. बर्लिन हे जर्मनीतलं राजधानीचं ठिकाण. ब्रुनोचे बाबा राल्फ हे तिथल्या नाझी सैन्यात अधिकारी असतात. ते स्वभावाने कडक शिस्तीचे आणि काटेकोर असतात.

एके दिवशी ब्रूनो शाळेतून उड्या मारत, पळत पळत आनंदाने घरी येतो तेव्हा त्याला कळतं की, त्याच्या बाबांना प्रमोशन मिळालं आहे आणि आता आपल्याला बर्लिनमधलं घर सोडून दूर, जर्मनीच्या पोलंड सीमेजवळ राहायला जावं लागणार आहे. आपली शाळा, आपले मित्र यांना सोडून जायच्या कल्पनेने ब्रूनो खट्टू होतो. पण त्याचे बाबा त्याला समजावतात की, देशासाठी काहीही करण्याची गरज असेल तर ते आपण केलं पाहिजे. त्यामुळेच आपण इथून चाललो आहोत. बाबांना प्रमोशन मिळाल्याच्या निमित्ताने घरी जंगी पार्टी होते आणि मग दुसऱ्याच दिवशी ब्रूनो, त्याचे आईबाबा, त्याची मोठी बहीण ग्रेटेल आणि त्यांच्या घरकामात मदत करणारी मारिया हे सगळे नव्या ठिकाणी जातात.

नव्या जागी राहायला गेल्यानंतर तिथल्या प्रचंड व भव्य अशा घराच्या आसपास फारशी वस्ती नाही, गजबज नाही, सगळीकडे अंगावर येणारी शांतता आहे असं ब्रूनोला जाणवतं. त्यांच्या ऐसपैस बंगल्याभोवती मोठी भिंत असते. आपल्या खोलीतल्या एका उंचावरच्या खिडकीतून तो बाहेर पाहतो तर दूरवर त्याला थोडीशी वस्ती आणि पट्ट्यापट्ट्यांचे शर्ट-पायजमा घातलेले लोक दिसतात. हे इथले शेतकरी असतील आणि तिथे आपल्याला आपल्या वयाचं कुणीतरी खेळायला मिळेल असं त्याच्या मनात येतं. हे लोक कोण आहेत हे तो आईला विचारतो. आई त्याला त्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळते. पण तेव्हा ब्रूनोला दिसतं की, घरातली व बागेतली कामं करायला त्या दूरच्या वस्तीतल्या लोकांपैकीच एक जण आपल्या घरातही वावरतो आहे. कैद्यासारखे मळकट पट्टेरी कपडे घातलेला तो वृद्ध माणूस खूप काम करून वाकलेला असतो. त्याचं नाव असतं पॅवेल. पॅवेलच्या चेहऱ्यावरचं भकास-उदासपण ब्रूनोलाही अस्वस्थ करतं राहतं.

लवकरच त्या नव्या ठिकाणच्या सगळ्या विचित्र वातावरणाचा आणि त्या सुनसान जागेचा ब्रुनोला खूप कंटाळा येतो. एकदा नाझी अधिकाऱ्यांशी मीटिंग करून त्याचे बाबा परततात तेव्हा तो त्यांना सांगतो की, आपण इथून परत जाऊ. तेव्हा बाबा पुन्हा त्याला म्हणतात, ‘‘आम्ही सैन्यातले लोक खूप मेहनतीने हे जग सुंदर बनवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत. देशासाठी आणि आपल्यासाठीही ते खूप गरजेचं आहे.’’ आता काहीही करून आपल्याला इथेच राहावं लागणार आहे हे लक्षात आल्यावर ब्रूनो एकटाच काहीतरी खेळत स्वतःचं मन रमवण्याचा प्रयत्न करत राहतो.

एकदा घरासमोरच्या झाडाखाली तंद्रीत आकाशाकडे बघत पडून राहिलेला असताना त्याला वाटतं की, इथे एखादा झोपाळा असायला हवा. त्याच्या बाबांच्या हाताखाली काम करणारा एक तरुण लेफ्टनंट कॉटलर तिथे ग्रेटेलसोबत गप्पा करत गाडी धूत असतो. आपली ही इच्छा ब्रूनो त्याला सांगतो. तेव्हा कॉटलर शेजारी बागकाम करणाऱ्या त्या कैदी गडीमाणसाला इतक्या भयंकर आवाजात ओरडून हुकूम सोडतो की, क्षणभर ब्रूनो दचकून थिजून जातो. तो गडीमाणूस घरामागच्या जागेत जातो आणि तिथल्या अडगळीतून एक मोठा टायर काढून ब्रूनोला त्याचा झोपाळा तयार करून देतो. झोपाळा खेळताना पहिल्याच दिवशी तो पडतो आणि त्याला जखम होते तेव्हा प्रचंड घाबरून गेलेला तो गडीमाणूस त्याच्या जखमेवर मलमपट्टी बांधतो, तेव्हा आपल्याला कळते. पूर्वी डॉक्टर म्हणून काम करणारा तो ज्यू माणूस इथे कैदी आहे.

ब्रूनो त्याच्या पाठोपाठ जातो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की, सगळ्या बंगल्याभोवती उंच कंपाउंड असलं तरी इथे उंचावर एक खिडकी आहे जिथून कंपाउंडच्या पलीकडे जाता येईल. ब्रूनोला नव्या जागा धुंडाळायला मनापासून आवडत असतं. साहसी कथा वाचणं हा तर त्याचा आवडता छंद असतो. त्यामुळे कधीतरी भिंतीपलीकडे जाऊन ते पट्टेरी शर्ट-पायजमा घालून काम करणारे लोक कोण आहेत, त्या जागी नक्की काय आहे हे पाहण्याची ओढ त्याला लागून राहते.

दरम्यान त्याला आणि ग्रेटेलला शिकवायला एक नवे शिक्षक घरी येऊ लागतात. ते साहसी कथा वगैरे वाचायचं सोडून आपल्या ‘महान’ देशाचा इतिहास, सध्या सुरू असलेल्या घडामोडी यांच्याविषयी जाणून घ्यायला त्यांना सांगतात. जर्मनीच्या इतिहासाविषयी माहिती देणारं एक जाडजूड पुस्तक ते ब्रूनोला देतात. ब्रूनो आपल्या झोपाळ्यावर ते पुस्तक घेऊन नाइलाजाने वाचत बसलेला असतो. सहज त्याची नजर समोर जाते आणि त्याला घरामागच्या बागेकडे जाणारं अर्धवट किलकिलं दार दिसतं. तो ते पुस्तक तिथेच टाकून उत्साहाने धावत जातो. पूर्वी पाहून ठेवलेल्या खिडकीतून कंपाउंडपलीकडे उडी टाकतो आणि झाडाझुडपांतून वाट काढत ‘त्या’ जागेपाशी येऊन पोहोचतो.

त्या सगळ्या जागेला खूप उंच तारेचं कुंपण असतं. सहजासहजी कुणी आतून बाहेर येऊ शकणार नाही अशी ती व्यवस्था असते. कुंपणापलीकडे साधारण ब्रूनोच्याच वयाचा एक मुलगा पट्टेरी पोशाखात एकटाच बसून राहिलेला असतो. छोटी हातगाडी चालवत कचरा टाकायला तो तिथे आलेला असतो. ब्रूनो त्याला त्याचं नाव विचारतो. त्याचं नाव असतं श्मूल. दोघांनीही एकमेकांची नावं पूर्वी कधीच ऐकलेली नसतात. पण त्यांना एकमेकांशी गप्पा मारणं आवडू लागतं. आता आपल्याला खेळायला मित्र मिळाला असं वाटून ब्रूनोला आनंद होतो.

एके दिवशी ब्रूनो घरातल्यांची नजर चुकवून मोठा चेंडू घेऊन श्मूलकडे जातो. पण श्मूल त्याच्याशी खेळायला तयार होत नाही. आपल्याला खेळताना कुणी पाहील याची त्याला खूप भीती वाटत असते. ब्रूनोला त्याच्या या वागण्यामागचं कारणच लक्षात येत नाही. तेवढ्यात शिट्टी वाजवल्याचा आवाज येतो आणि श्मूल घाबरून घाईघाईने तिथून निघून जातो. ब्रूनो घरी परत येतो.

दरम्यान ब्रूनोची आई बाहेर गेलेली असते. ती घरी येते तेव्हा ते कैदी राहत असलेल्या ठिकाणाहून धुराचे प्रचंड लोट तिला दिसतात आणि सगळीकडे विचित्र दुर्गंध पसरलेला जाणवतो. त्याविषयी ती लेफ्टनंट कॉटलरशी बोलते तेव्हा तिच्या लक्षात येतं की, तिथे फार भयानक गोष्ट घडते आहे. ब्रूनोला शेत वाटणारी ती जागा म्हणजे नाझी सैनिकांनी ज्यू वंशाच्या जर्मन लोकांना मारण्यासाठी बनवलेली छळछावणी असते. तिथे एका मोठ्या खोलीत कैद्यांना डांबून आत विषारी वायू सोडला जात असतो. हा सगळा अमानुष प्रकार आपल्यापासून इतक्या जवळच्या अंतरावर घडत आहे आणि तो घडवण्याच्या कामगिरीवरच ब्रूनोच्या बाबांची नेमणूक झाली आहे हे लक्षात आल्यावर आई अतिशय अस्वस्थ होते.

एके दिवशी मात्र आपल्याच घरात काम करत असलेला श्मूल ब्रूनोला दिसतो आणि त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. काचेचे नक्षीदार, नाजूक पेले साफ करण्याचं काम श्मूलला दिलेलं असतं. ब्रूनो आनंदाने त्याच्याशी बोलायला जातो. पण एव्हाना ज्यू हे आपले शत्रू आहेत हे सगळ्यांनी त्याच्या मनावर इतकं बिंबवलेलं असतं की, तो श्मूललाही विचारतो, ‘‘आपण खरं तर एकमेकांचे शत्रू असणं अपेक्षित आहे हे तुला माहीत आहे का?’’ पण तिथे ठेवलेला खाऊ उचलून तो श्मूलला देतो तेव्हा अतिशय भुकेलेला श्मूल ते घाईघाईने खाऊ लागतो. अचानक कॉटलर तिथे येतो आणि तो श्मूलला दरडावून विचारतो, "तू हे चोरलं आहेस का?" त्यावर ब्रूनोकडे पाहून श्मूल म्हणतो, ‘हा माझा मित्र आहे आणि त्याने मला हे खायला दिलं आहे.’ तेव्हा कॉटलरचा रुद्रावतार बघून घाबरलेला ब्रूनो ‘‘श्मूलला मी ओळखत नाही,’’ असं सांगतो. मात्र आपल्या खोटं बोलण्यामुळे श्मूलला त्याने न केलेल्या चोरीची शिक्षा मिळणार आहे हे ब्रूनोच्या लक्षात येतं तेव्हा त्याला त्याचा खूप त्रास होतो. 

नंतर श्मूलला भेटायला तो पुन्हा पुन्हा कॅम्पकडे, त्यांच्या नेहमीच्या जागी जात राहतो. पण काही दिवस तिथे श्मूल येत नाही. आपण असे वागलो त्यामुळे आता आपली मैत्री संपली- असंच ब्रूनोला वाटून जातं. पण एक दिवशी मात्र मान खाली घालून बसलेला श्मूल त्याला दिसतो. त्याला दिसतं की, श्मूलला चेहऱ्यावर कुणीतरी मारहाण केल्याच्या जखमा आहेत. ब्रूनोला त्याच्या चेहऱ्याकडे पाहवत नाही. तो श्मूलची माफी मागतो. त्यांची पुन्हा दिलजमाई होते आणि पुन्हा ते एकमेकांशी गप्पा करू लागतात. अधूनमधून भेटू लागतात.

आता ब्रूनोची या ठिकाणाहून निघून जाण्याची इच्छा नाहीशी होते. त्याला इथे राहणंच आवडू लागतं. त्याच्यातला हा बदल त्याच्या बाबांना थोडा संशयास्पदच वाटतो. शिवाय या अशा हिंसक ठिकाणी राहणं, मुलांचं मानसिक आरोग्य बिघडताना पाहणं ब्रूनोच्या आईच्या  सहनशक्तीपलीकडे गेलेलं असतं. शेवटी काही काळ तरी आईने दोन्ही मुलांसह दुसरीकडे राहायला जायचं असं ठरतं.

मधल्या काळात ब्रूनो श्मूलला भेटायला जातो तेव्हा त्याला दिसतं की, श्मूल अतिशय उदास आहे. त्याने विचारपूस केल्यावर श्मूल सांगतो की, त्याला त्याचे बाबा कॅम्पमध्ये कुठेच दिसत नाहीत. ब्रूनो त्याच्या बाबांना शोधण्यासाठी मदत करायचं ठरवतो. त्यासाठी कॅम्पमधलं तारांचं कुंपण ओलांडून पलीकडे जाण्याची आणि श्मूलसारखेच कपडे मिळवण्याची गरज असते. ज्या दिवशी आई व बहिणीसह ब्रुनो दुसरीकडे राहायला जाण्यासाठी बाहेर पडणार असतो नेमके त्याच दिवशी त्याचा आणि श्मूलचा हा प्लॅन ठरलेला असतो. कोणालाही कळणार नाही अशा पद्धतीने ब्रूनो फावडं घेऊन घरातून बाहेर पडतो. श्मूलने ब्रूनोसाठी आधीच स्वतःसारखे कपडे आणून ठेवलेले असतात. फावड्याने कुंपणाखालची माती उकरून ब्रूनो तारांच्या कुंपणाच्या पलीकडे जातो. आपण कोणतं जिवावरचं धाडस करतो आहोत याची जाणीव साताठ वर्षांच्या त्या चिमुरड्या मुलांना नसते.  आईबाबांनी, शिक्षकांनी केलेले द्वेषाचे, शत्रुत्वाचे संस्कार बाजूला ठेवून जे मैत्रीचं मुलभूत नातं ब्रूनो आणि श्मूल यांनी एकमेकांशी जोडलेलं असतं, त्या नात्यातल्या ओढीने हे कृत्य त्यांच्या हातून सहज घडतं. दोघेही श्मूलच्या बाबांना शोधत कॅम्पभर हिंडत राहतात. आणि अगदी अनपेक्षितपणे गॅस चेंबरकडे नेल्या जाणाऱ्या कैद्यांच्या गर्दीत सापडतात.

या सिनेमाच्या कथानकात इथून पुढे जे घडतं ते पाहणं जितकं वेदनादायक आहे, तितकंच त्याच्याविषयी लिहिणंही. इथे काही त्रोटक प्रसंगांतूनच ब्रूनो आणि श्मूलची गोष्ट सांगणं शक्य झालं आहे; मात्र मूळ सिनेमा पाहताना या कथानकातले असंख्य बारकावे आणि सूक्ष्म जागा उलगडत जातात. ब्रूनोच्या भूमिकेत एसा बटरफिल्ड आणि श्मूलच्या भूमिकेत जॅक स्कॅलन या दोन बालकलाकारांनी केलेला अभिनय अद्भुत आहे. ब्रूनोचा बालसुलभ उत्सुकतेने आसमंत टिपणारा, समोरच्या प्रसंगानुरूप क्षणोक्षणी पालटणारा संवेदनशील चेहरा आणि श्मूलच्या वागण्या-बोलण्यातलं असहाय भेदरलेपण हे सर्व सिनेमा प्रत्यक्ष पाहून अनुभवायच्याच गोष्टी आहेत.

सुरुवातीचा काही भाग वगळता संपूर्ण सिनेमा ब्रूनोचं घर आणि छळछावणी या दोनच ठिकाणी चित्रित झाला आहे. गॅस चेंबरची काळा धूर ओकणारी प्रचंड धुरांडी, सतत काही ना काही कामात गढलेले कैदी, सगळी भौतिक संपन्नता असूनही आतून तुटत चाललेली ब्रुनोच्या कुटुबांतली माणसं यांतल्या  प्रत्येक दृश्यात एक प्रकारचं गडद उदासपण भरून राहिलेलं दिसतं. अधूनमधून चपखलपणे वापरलेल्या पार्श्वसंगीताचा प्रवासही सौम्य प्रसन्नतेकडून उदासीनतेकडे आणि शेवटापाशी भीषणतेकडे होत जातो. अनेक हिंसक दृश्यं थेट चित्रित करण्याऐवजी जी कलात्मक सूचकता या सिनेमात सांभाळली आहे, त्यामुळे त्या-त्या प्रसंगांची परिणामकारकता वाढली आहे.

या सिनेमाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कथानकातल्या घटनाक्रमाची दाहकता बालकुमार अंकाला अपेक्षित असलेल्या 10 ते 15 वर्षे वयोगटातल्या मुलांच्या संवेदनशीलतेला पेलवतील का, असाही प्रश्न पडतो. मात्र मुलांनी नाही, तरी त्यांच्या पालकांनी-शिक्षकांनी हा सिनेमा नक्की पाहायला हवा. सध्या तो नेटफ्लिक्सवरही पाहण्यासाठी उपलब्ध आहे.

जर्मनी हा देश ‘महान’ बनवण्यासाठी त्या देशात फक्त आर्यन वंशाचे जर्मन लोकच राहिले पाहिजेत आणि तिथे राहणाऱ्या ज्यू वंशीयांना मारून नष्ट केल्याशिवाय आपला देश महान होणार नाही, हे जग सुखी होणार नाही- अशी अतिरेकी भूमिका नाझी विचारसरणीच्या प्रवर्तकांची होती.  त्यापायी जर्मनीत लाखो निरपराध ज्यू वंशीयांना छळ करून मारण्यात आलं. एखाद्या विशिष्ट धर्माला श्रेष्ठ मानून इतर धर्मीयांविषयी वैरभाव बाळगणं आणि त्यालाच राष्ट्रभक्तीच्या कल्पनेशी जोडणं हे काही केवळ इतिहासात घडलेलं नाही; आजही जगातल्या कित्येक देशांमध्ये, त्यांच्या राष्ट्रप्रमुखांमध्ये  राष्ट्रभक्तीची कल्पना तीच आहे.

अशा काळात, ज्यांच्या मनात जात-धर्म-वंश यांच्या भेदांची जाणीवही अद्याप नीटशी जागी झालेली नाही अशा ब्रुनो व श्मूल या दोन मुलांच्या निखळ मैत्रीची गोष्ट सांगणारा हा सिनेमा कधी नव्हे इतका आज समयोचित ठरणारा आहे. ‘जगाला प्रेम अर्पावे’ हा एकच खरा धर्म आहे या माणसातल्या मूलभूत शहाणपणाच्या जाणिवेला हात घालणारा आहे. बालकुमारांनी त्यांच्या बकेट लिस्टमध्ये हा सिनेमा जरूर ठेवावा हा आग्रह याचसाठी...

----

साधना बालकुमार दिवाळी अंक 2021 मधील सर्व लेख आता ऑडिओबुक स्वरुपात स्टोरीटेलवर ऐकता येतील. त्यातील 'द बॉय इन द स्ट्राइप्ड पजामाज' या इंग्रजी भाषेतील ब्रिटीश चित्रपटावर सुहास पाटील यांनी लिहिलेला लेख ऐका त्यांच्याच आवाजात.    

'साधना बालकुमार दिवाळी अंक 2021'  Storytel वर ऐकण्यासाठी इथे क्लिक करा.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुहास पाटील,  पुणे
suhas.horizon@gmail.com

उपसंपादक, साधना डिजिटल 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके