डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2022)

सत्तेच्या साठमारीत, ‘कोण काय सांगतो’ या बरोबरच ‘तो तसं का सांगतो’ हे जसं मी तपासू लागले, तसंच जो काहीच बोलत नाही, त्याच्या मूक बोलीचाही कानोसा घ्यायचा प्रयत्न मी करू लागले, ते करताना कितीही वेळा मला अपयश आलं तरी... परिस्थिती माणूस घडवते, त्याचप्रमाणं माणूसही परिस्थितीला आकार देत असतो; या दोन्ही हातांत हात घालून चालणाऱ्या गोष्टी ‘अजय’मधून प्रभावीपणे पुढे येतात. हे द्वंद्व बोजडपणे सामोरं न येता रंजकपणे येत असल्यानं पर्यायी इतिहासाचा नीरस धडा आपण वाचत नसून, नव्या शक्यता सादर करणारं एक पर्यायी परिप्रेक्ष्य आपण पाहत आहोत, ही आनंददायी जाणीव या पुस्तकातून मिळते.

‘अजय’ या पुस्तकाचे लेखक आनंद नीलकांतन यांच्या मनोगतातली वाक्यं थेटच भिडतात. त्यांचं सार असं : ‘केरळमधलं पोरुवझी नावाचं खेडं. तिथल्या मालनडा देवळातल्या ‘देवा’च्या उरुसाला दरवर्षी लाखापेक्षा जास्त गर्दी जमते. हा ‘देव’ कोण? तर ‘दुर्योधन’,  महाभारतातला सगळ्यांत तिरस्कृत न-नायक!

यामागची कथा काय?

तर, अज्ञातवासातल्या पांडवांच्या शोधार्थ दुर्योधन या खेड्यात येतो. थकलेला दुर्योधन एका वृद्धेकडे पाणी मागतो. तिच्याकडे ‘ताडी’ असते. दुर्योधन आनंदानं ती पितो. परंतु हा क्षत्रिय योद्धा आपल्यासारख्या अस्पृश्य ‘कुरथी’च्या हातून ताडी प्यायल्यानं जातीबाहेर फेकला जाईल, हा आपला प्रमाद तिच्या लक्षात येतो. अशा अपराधासाठीची देहान्त प्रायश्चित्ताची शिक्षा माहीत असूनही ती त्याला सत्य सांगते. आश्चर्य म्हणजे, ‘‘माते, तहानेला आणि क्षुधेला धर्म नसतो. स्वतःच्या जिवावर उदार होऊन तहानलेल्याला शांत केल्याबद्दल तू धन्य आहेस,’’ असं म्हणून दुर्योधन तिला अभय तर देतोच, शिवाय त्या पंचक्रोशीसाठी कोणत्याही देवाची मूर्ती नसलेलं मंदिर उभारतो आणि तिच्या नात्यातल्या एका ‘अस्पृश्या’ची पुजारी म्हणून नेमणूक करतो. त्या वृद्धेचे पिढीजात वारसदार आजही तिथे पुजारी आहेत. आणि याच देवळात पूजा केली जाते, ती देवाची नव्हे, तर दुर्योधनाची!

आनंद नीलकांतन, त्या खेडुतांना या परंपरेबद्दल खोदून खोदून विचारतात. ‘‘दुर्योधन खरोखरीच इतका दुष्ट होता, तर भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, बलराम आणि भगवान श्रीकृष्णाची संपूर्ण सेना त्याच्या बाजूनं का लढली?’’ या उरूसकऱ्याच्या प्रश्नावर ते निरुत्तर होतात. आणि मग  ‘दुर्योधना’च्या (एक अर्थ : अपराजयी) म्हणजेच वर्षानुवर्षं खलनायक ठरवल्या गेलेल्या एका उमद्या राजपुत्राची कैफियत ‘अजय’ रूपात जन्माला येते.

हा 'Sabaltern' किंवा वंचितांचा, उपेक्षितांचा, नाकारलेल्यांचा आणि प्रस्थापित जेत्यांच्या प्रहारी प्रचाराच्या बळींचा संयत टाहो आहे. त्यात दुर्योधनानं  सूतपुत्राला राजा करून धर्ममार्तंडांना दिलेलं आव्हान आहे. एकलव्यावरच्या अन्यायाची मनस्वी चीड आहे. आपल्या एके काळच्या प्रियतमेनं - सुभद्रेनं - नाकारूनही तिच्या प्राप्तीसाठी लढण्याला नकार देण्याचा दुर्योधनाचा उमदेपणा आहे. पांडवांचं ‘देवत्व’ नाकारून त्यांना खुल्या मैदानात आमंत्रण देण्याची धमक आहे. आपल्या मित्रांवरचा अढळ विश्वास आहे. त्याच्या वागण्यात पांडवांसारखी - आपल्या प्रत्येक कृत्यामागच्या सचोटीच्या, प्रामाणिकपणाच्या, धर्माचरणाच्या - मुलाम्यांची मखलाशी नाही.

या सगळ्यांतून जो दुर्योधन उभा राहतो, तो अत्यंत प्रामाणिक, आपली तत्त्वं उरी बाळगणारा, मित्रांसाठी प्राण पणाला लावणारा, एक शूर योद्धा!

पण म्हणून किंवा म्हणजे, ‘अजय’ ही कादंबरी एकट्या दुर्योधनाची नाही. गांधारी, कर्ण, कृपी, अश्वत्थामा, एकलव्य, भीष्म, द्रोण, शकुनी, विदुर, कृपाचार्य, परशुराम, दुशा:सन, दुःशला, जरासंध आणि अशा अनेकांच्या अपमानांचं, गैरसमजांचं, मानवी संवेदना जागृत करणारं ते आगळं narrative आहे.

सर्वसाधारणपणे समाजाला सोपी समीकरणं आवडतात, पटतात. त्यांच्या पुढं ती तशीच मांडून मग सत्ताधीश अधिकाधिक निरंकुश होत जातात. मग कधीतरी, कुठंतरी या अन्यायाला वाचा फुटू लागते. सुरुवातीचे दबलेले आवाज मोठे व्हायला लागतात. छोटे छोटे अन्यायग्रस्त एकत्र यायला लागतात आणि महाभारत घडायला लागतं. मग कधीतरी कौरवांचीही ‘कैफियत’ असू शकेल अशी शक्यता निर्माण होते. जागा होऊ लागलेला समाज सत्ताधीशांच्या किंवा जेत्यांच्या प्रचाराला, म्हणण्याला प्रश्न विचारू लागतो.

हे महाभारत नवनव्या रूपात कसं घडत राहणार आहे, त्यातली समीकरणं कशी बदलती राहणार आहेत, याची जाणीव आनंद नीलकांतन ‘अजय’मधून करून देतात.

मी पत्रकार म्हणून काम केलं आहे. ते करताना, ‘सत्य एकसुरी नसतं,’ त्याला अनेकानेक बाजू, पदर असतात हे कायम जाणवत राहिलं. प्रत्येक जण आपापल्या समजुतीअनुसार, आकलनाअनुसार, किंवा पूर्वग्रहाअनुसार त्याला/ तिला  पाहिजे ती बाजू, पाहिजे तो पदर स्वीकारतो, त्याचा पुरस्कार करतो, हेही परत परत उमगत राहिलं.

या पुस्तकातून ती अनुभूती येत असताना आपण, काळ्या-पांढऱ्या पद्धतीनं शिकलेल्या आणि स्वीकारलेल्या गोष्टी केवळ पुराणातल्याच नव्हे, तर प्राचीन, अर्वाचीन इतिहासातल्या आणि अगदी वर्तमानातल्या असू शकतात याची पुन्हा एकदा जाणीव झाली.

परिणामतः कोणतीही गोष्ट समोर आली की ती at face value न स्वीकारता आता मी पूर्वीपेक्षा मोठा pause घेऊ लागले. मला पूर्वीपेक्षा अधिक प्रश्न पडायला लागले. आणि त्याची उत्तरं माझ्या पुरती शोधत असताना 'the truth
involves us all,' याचं माझं भान अधिक नेटकं होऊ लागलं. त्या अर्थानं या पुस्तकानं माझं मानसिक स्वास्थ्य कायमचं हिरावून घेतलं. पण त्याचबरोबर मला अधिक प्रश्नाभिमुख, अधिक शंकेखोर केलं. ही नवी अस्वस्थता मला प्रिय आहे.

इतिहास कथित जेते लिहितात. पण कथित पराभूतसुद्धा त्या संघर्षात लहानमोठे विजय मिळवत असतात, तसंच कथित जेतेसुद्धा लहानमोठ्या अपयशांचे धनी झालेले असतात, हेही मला या पुस्तकामुळे अधिक चांगलं आकळलं. मात्र इतिहासाचे आणि वर्तमानाचे संदर्भ तपासताना पराभूतांचे पराभवही डोळसपणे पाहण्याची दृष्टी आपल्यापाशी हवी. निर्भेळ यश आणि निर्भेळ अपयश असं काही नसतंच. दोन्ही गोष्टी संमिश्रच असतात आणि त्यामागची कारणं काही वेळा व्यक्तिपरत्वे तर काही वेळा परिस्थितीपरत्वे असतात, इतकंच!

सध्याच्या सोशल मीडियाच्या गलबल्यातर multiple narratives आणि counter narratives चा भडिमार होत असताना या पुस्तकाने दिलेले हे धडे मला विशेष मोलाचे वाटतात. सत्तेच्या साठमारीत, ‘कोण काय सांगतो’ या बरोबरच ‘तो तसं का सांगतो’ हे जसं मी तपासू लागले, तसंच जो काहीच बोलत नाही, त्याच्या मूक बोलीचाही कानोसा घ्यायचा प्रयत्न मी करू लागले, ते करताना कितीही वेळा मला अपयश आलं तरी...

परिस्थिती माणूस घडवते, त्याचप्रमाणे माणूसही परिस्थितीला आकार देत असतो; या दोन्ही हातांत हात घालून चालणाऱ्या गोष्टी ‘अजय’मधून प्रभावीपणे पुढे येतात. हे द्वंद्व बोजडपणे सामोरं न येता रंजकपणे येत असल्यानं पर्यायी इतिहासाचा नीरस धडा आपण वाचत नसून, नव्या शक्यता सादर करणारं एक पर्यायी परिप्रेक्ष्य आपण पाहत आहोत, ही आनंददायी जाणीव या पुस्तकातून मिळते. लेखकाचं हे मोठंच कसब आहे.

‘अजय’मधलं प्रत्येक पात्र प्रस्थापित समजाला छेद देणाऱ्या पद्धतीनं मांडण्यात आलं आहे. म्हणजे उदाहरणार्थ, यात कुंतीचं महत्त्वाकांक्षी, आत्मप्रौढी रूप आहे.

ज्येष्ठ माणसांसमोरचा कमालीचा आज्ञाधारक व निरागस युधिष्ठिर, निव्वळ भावंडांच्या समवेत आक्रमक, अन्यायी, ढोंगीही आहे.

काहीसा मंदबुद्धी भीम आपल्या पाशवी बळाच्या ताकदीवर कौरवांना लहानपणापासून छळतो आहे.

तर आपल्या गांधार देशावर भीष्मानं आक्रमण करून, पिता-भावंडांना मारून टाकून, बहिणीला जबरदस्तीनं आंधळ्या सम्राटाच्या गळ्यात मारल्यामुळं शारीरिक-मानसिकदृष्ट्या विद्ध शकुनीची इच्छा, केवळ आणि केवळ हस्तिनापुराच्या साम्राज्याच्या विध्वंसाचा ध्यास का बाळगून आहे, याचा विचार करायला लावणारी आहे.

हस्तिनापुराच्या साम्राज्याची अहोरात्र सेवा करत असलेल्या विद्वान विदुराला दासीपुत्र असल्यामुळं ‘खालच्या’ जातीत मानल्या गेलेल्या आपल्या अपत्यांच्या पोटापाण्याची चिंता आहे.

कृपाचार्य बंडखोर पुरोगामी आहेत, मानवनिर्मित जातिभेदांची त्यांना घृणा आहे.

पुरोचन भ्रष्टाचारी परंतु कार्यक्षम नोकरशहा आहे.

दुर्जय हा हस्तिनापुरातल्या ‘अंडरवर्ल्ड’चा ‘डॉन’ आहे आणि त्याचं शकुनीशी साटंलोटं आहे.

‘देव’साम्राज्य लयाला गेल्यामुळं त्याचा शेवटचा राजा इंद्र परागंदा होऊन वनवासी झाला आहे. कुंतीपासून झालेल्या आपल्या अर्जुनावर आता त्याची सारी भिस्त आहे.

‘नाग’साम्राज्यात बंडाळी होऊन म्हाताऱ्या, आजारी वासुकीला हटवून बंडखोर नागांचं नेतृत्त्व तक्षकाकडे आलंय. नाग-किरात-निषादादी सर्व शूद्र, अस्पृश्य जातिजमाती एकत्र येऊन हा ‘सर्वहारा’ वर्ग सत्तेवर येईल आणि सर्व उच्च वर्णीय त्यांचे गुलाम होतील हे स्वप्न तक्षक बाळगून आहे. आणि मुख्य म्हणजे ही सगळी ‘माणसं’ आहेत.

आज दृकश्राव्य माध्यमातून सहज होणाऱ्या विखारी प्रचाराला बळी न पडता, प्रत्येकानं स्वतःला प्रश्न विचारत उत्तरं शोधण्याची आस या कादंबरीमुळं निर्माण होते. कोणत्याही विचारांचे वेगळे आयाम आज मांडण्याचा प्रयत्न झाला, तर त्याला ‘हे’ विरुद्ध ‘ते’ असं भयानक ‘काळं’ किंवा ‘पांढरं’ स्वरूप येतं. ‘महाभारता’सारख्या जनमानसात रुजलेल्या, भल्या थोरल्या सामाजिक पटाच्या सर्वांगीण वेगळ्या  विश्लेषणाचा हा निराळा दृष्टिकोन - त्यावरून दंगे न होता - समाजात रुजू शकेल, अशी आशा निर्माण करतो.

‘अजय’मधलं ‘जरा’ हे पात्र लेखकाचं अपत्य आहे. सगळ्या प्रकारच्या वंचिततेचा प्रतिनिधी आणि तरीही कादंबरीभर टिकून राहिलेलं पात्र. मानवनिर्मित जातधर्माच्या उतरंडीच्या नीचतम पातळीवरचा हा दरिद्री, अशिक्षित, अस्पृश्य जीव अपमानांच्या लाथाळ्या खात गांजलेल्या ऐंशी टक्के मानवजातीचं प्रतिनिधित्व करतो.

तीच गोष्ट ‘मयसभा’ निर्माण करणाऱ्या स्थापत्यविशारद विश्वकर्म्याची. पैशांबाबत आणि नैतिकतेबाबत धूर्त व्यवहारी असणारा, सत्ताधीशांच्या लांगूलचालनात धन्यता मानणारा हा ‘असुर’, लाक्षागृहात स्वतःच मरून जाऊन अनेक प्रश्न ज्या प्रकारे अनुत्तरीत सोडतो, त्यानं जगातल्या असंख्य राजकीय कटकारस्थानांमागच्या राजकीय कुटिल कोड्यांची आठवण होते.

वास्तविक गांधारीनं आपल्या पुत्रांची नावं सुयोधन, सुशासन अशी आणि मुलीचं नाव सुशला अशी ठेवलेली असताना त्याचं दुर्योधन, दु:शासन, दु:शला अशी संपूर्ण ‘दु’ष्ट का झाली, याचा आपण खरंच विचार केला होता का, या प्रश्नाची पोखरणी कादंबरी मनात सुरू करते. मग केवळ, ‘कौरवांनी केलेले अत्याचार आणि त्याचा परिपाक म्हणून त्यांचं उभं राहणारं काळं स्वरूप’, यापुरता हा विचार मर्यादित राहत नाही. त्याचप्रमाणे ‘पांडवांच्या उच्च वर्तणुकीचा होणारा उदोउदो आणि म्हणून त्यांची असणारी शुभ्रधवल प्रतिमा’ हे आजवर चालत आलेलं महाभारताचं लोकप्रिय narrative नव्हे, हेही हा नवा विचार  बजावतो. समाजातल्या वंचित वर्गांचे प्रश्न अधिक गांभीर्यानं टोचण्याची जाणीव त्यातून पुन्हा पुन्हा निर्माण होत राहते. त्यातूनच, पारधी समाज आजही ब्रिटिशांनी शिक्का मारलेल्या ‘लुटारू’पणाची ओझी कशी वाहतो, याचा जळजळीत ओरखडा ‘अजय’मधल्या एकलव्यामुळे भाजत जातो.

मुळात आनंद नीलकांतन यांनी कादंबरीचा संपूर्ण सांगाडा, प्रसंग आणि पात्रं महर्षी वेदव्यासरचित महाभारतामधली घेतली आहेत. आणि मग त्याला आजच्या भारतामधल्या भौगोलिक वैविध्यामुळं निर्माण होणाऱ्या समस्यांची, जातिधर्माच्या विषमतेतून जन्मलेल्या नक्षलवादी चळवळीसारख्या, किंवा पूर्वांचलमधल्या विविध जमातींच्या वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नांची आठवण करून देणाऱ्या प्रसंगांची भावनाशील, नाट्यमय जोड दिली आहे.

कादंबरीच्या सुरुवातीलाच बलाढ्य हस्तिनापुराचा महापराक्रमी सरसेनापती भीष्म, ‘गांधार’ देशावर विजय मिळवून गांधारीला आंधळ्या धृतराष्ट्राची वधू म्हणून घेऊन जायला आला आहे. (आजही सौदी अरेबियासारख्या देशांत स्त्रियांच्या सौद्याच्या अशा प्रथा राजमान्य आहेत.) आपलं चिमुकलं राज्य हस्तिनापुरासारख्या साम्राज्याच्या आक्रमी तडाख्यातून वाचवण्यासाठी झालेला गांधारवासीयांचा हकनाक रक्तपात वाचत असताना अलीकडच्या काळातही जगाच्या पाठीवर देशादेशांच्या, समूहांच्या आक्रमकतेमधलं साम्य दर्शवणारे शतरंगिणी कंगोरे दृग्गोचर व्हायला लागतात. लावण्यवती गांधारीला पाहून भीष्माची - वडलांच्या वासनेसाठी स्वतःच्या पौरुषाचा दिलेला बळी आठवून पुन्हा एकदा - झालेली पश्चात्तापदग्ध काहिली; आपल्या जखमी धाकट्या भावाच्या - शकुनीच्या - जिवाची तिनं मागितलेली भीक; शत्रुराष्ट्र जिंकून घेतलं, की ‘भविष्यातल्या सुडांच्या शक्यता नष्ट करण्यासाठी सर्व पुरुषांना मारून फक्त स्त्रिया घेऊन जाव्यात’ या ‘क्षात्रधर्मा’ला न अनुसरता गांधारीच्या विनवणीमुळे शकुनीला बरोबर घेऊन जाण्याचा आणि त्याला कुरुवंशीय राजकुमार म्हणून वाढवण्याचा भीष्माचा नाइलाजास्तव निर्णय; इथपासूनच राज्यकर्ते, राजकारण, समाजकारण, सत्ताधीशांची मानसिकता, पराभूतांची अदखलपात्र होत जाणारी फरफट, स्त्रियांना दुय्यम स्थानावर ठेवूनच माणसानं किंवा पुरुषानं रचलेला समाजरचनेचा हजारो वर्षांचा टिकलेला पाया- असा विशाल पट हळूहळू उलगडायला लागतो.

ही कादंबरी वाचल्यानंतर माझा एक मित्र कमालीचा क्रुद्ध झाला होता. ‘‘महाभारत किंवा रामायण ही महाकाव्यं आपल्याला चांगल्या-वाइटातले योग्य-अयोग्य आयाम शिकवत आले आहेत. यातून जी शिकवण मिळते त्यातनं त्यातल्या त्यात आपण सन्मार्गावर चालण्याचा किमान प्रयत्न करतो. यातल्या वाईट माणसांना चांगलं ठरवून एक प्रकारे कुप्रवृत्तीना उत्तेजना अशी पुस्तकं देत नाहीत का?’’ असा त्याचा संतप्त सवाल होता.

परंतु मुळात, ‘कौरव वाईट, पांडव चांगले’ एवढाच मर्यादित पट आपण अभिप्रेत का धरतो? तसं असतं, तर महाभारत हे महाकाव्य इतकं कालातीत राहिलं असतं का? मानवजात जसजशी विकसित होत गेली, तसतसे या महाकाव्यातले हे मानवी नमुने अधिकाधिक अभ्यासपूर्ण विवेचन मागू लागले. ‘इतिहास एकदा लिहून ठेवला म्हणजे तो तसाच होता,’ ही काळ्या दगडावरची रेघ नव्हे. किंबहुना, नव्यानं उपलब्ध होणाऱ्या पुराव्यांच्या आधारे त्यांचे संदर्भ परत परत तपासून, काळाच्या कसोटीवर घासून त्यांची पुनर्मांडणी करावी लागते, हे समाजाच्या प्रवाही-प्रगत राहण्याचं, जिवंतपणाचं लक्षण आहे. रामायण-महाभारतासारख्या महाकाव्यांनासुद्धा तेच मापदंड लागू होतात. त्यामुळंच आता द्रौपदी, सुभद्रा, सीता, उर्मिला, शूर्पणखा, शबरी, अहल्या, लोपामुद्रा, मैत्रेयी यांच्या कथांची आजवर अपरिचित, नव्या दृष्टिकोनातून मांडणी साहित्यात, काव्यांत, नाटकांत दिसून यायला लागली आहे. अशा साहित्यकृतींची आणि ‘अजय’ची जातकुळी एका प्रकारची आहे.

Tags: मराठी साहित्य पुस्तक दिन मराठी पुस्तके साहित्य वाचन influential favourite book marathi books Good books in marathi weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
साधना साप्ताहिकाचे वर्गणीदार व्हा...
वरील QR कोड स्कॅन अथवा UPI आयडीचा वापर करून आपण वर्गणीदार होऊ शकता. वार्षिक, द्वैवार्षिक व त्रैवार्षिक वर्गणी अनुक्रमे 900, 1800, 2700 रुपये आहे. वर्गणीची रक्कम ट्रान्सफर केल्यानंतर आपले नाव, पत्ता, फ़ोन नंबर, इमेल इत्यादी तपशील
020-24451724,7028257757 या क्रमांकावर फोन, SMS किंवा Whatsapp करून कळवणे आवश्यक आहे.
weeklysadhana@gmail.com

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2022

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1978-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके