डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

वॉलस्ट्रीट मधून ‘देणाऱ्याच्या जगात’

पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांची मुलाखत

प्रश्न - तुमच्या पार्श्वभूमीबाबत काय सांगाल?

- मी सांगली येथील एका सामान्य कुटुंबात जन्मलो. वडिलांचा पगार बेताचाच. परंतु मी एसएससीच्या परीक्षेत चौथा आलो. मला वकील व्हायचे होते, पण बाबा म्हणाले, ‘आपण सामान्य माणसं. तुझं तुलाच कमवावं लागणार आहे. वकील झालास तर माशा मारीत बसावं लागेल. त्यापेक्षा तू डॉक्टर किंवा इंजिनिअर हो.’ मलाएकच पर्याय होता. इंजिनिअर होण्याचा, कारण रक्त पाहून मी घाबरतो. शेवटी मी ‘केमिकल इंजिनिअरिंग’ला प्रवेश घेतला. इतरांपेक्षा केमिकल इंजिनिअर्सना 50  रुपये जास्त मिळतात म्हणून. असं माझं करिअरचं प्लॅनिंग!

प्रश्न – तुमचं पदवीचं व पदव्युत्तर शिक्षण कुठे झालं?

- पदवीचं शिक्षण मुंबईच्या युडीसीटीमध्ये झालं. त्यावेळी सारे आयआयटी आणि युडीसीटीमधून बाहेर पडलेले विद्यार्थी भारतातून थेट अमेरिकेत प्रकट होत असत. मीही मास्टर्स डिग्री क्लिवलँड स्टेट युनिव्हर्सिटीमधून घेतली व इंडियाना युनिव्हर्सिटीतून एमबीए झालो. यात काहीच नवल वाटण्याजोगे नाही.

प्रश्न - तुच्या करिअरला कुठून सुरुवात झाली?

- मी प्रथम एक्झॉन ऑईल कंपनीत केमिकल इंजिनिअर म्हणून कामाला सुरुवात केली. इथे मी इतरांपेक्षा दोन वेगळ्या गोष्टी केल्या. पहिली गोष्ट- मी एक्झॉन सोडलं आणि 1977 मध्ये एका विधी महविद्यालयात प्रवेश मिळविला. इथे कायद्याचा अभ्यास करण्यास फार थोडे भारतीय विद्यार्थी असतात. याचं कारण म्हणजे एक तर सफाईदार इंग्रजी बोलता न येणे आणि अमेरिकन लोकांपेक्षा शब्दांचे उच्चार वेगळे असणे. अमेरिकन लोकशाही ही लोकांची, लोकांसाठी व लोकांनी राबवलेली नव्हे तर प्रत्यक्षात ती वकिलांची, वकील मंडळींनी वकिलांसाठी राबवलेली आहे. इथे जीवनाच्या सर्व पैलूंचे नियंत्रण वकिलांच्या हातात असते. मला ज्या टीमची सरशी असेल त्याच टीममधे जाऊन माझं लहानपणीचं वकील होण्याचं स्वप्न पुरं करायचं होतं. वकील झालो. वकील, इंजिनिअर आणि एमबीए पदवी असा संयोग क्वचितच आढळतो. असो.

त्यानंतर मी क्लिवलँडमधील ब्रिटिश पेट्रोलियम या कंपनीच्या अमेरिकेतील मुख्य कार्यालयात ओहाअयो इथे रूजू झालो. अमेरिकेतील 95 टक्के वकील त्यांच्या पदवीच्या अभ्यासक्रमात इंग्रजी अथवा तत्त्वज्ञान शिकलेले असतात. टेक्निकल बॅकग्राऊंडवाले फारच थोडे असतात. आणि तेलाच्या कंपनीमध्ये सर्व टेक्निकल प्रकरणात कायद्याचा भाग असतोच. जो मी चांगला जाणत होतो. म्हणून मला एका ‘फास्ट ट्रॅक इंटर्नल प्रोग्रॅम’मध्ये प्रशिक्षण देऊन तऱ्हेतऱ्हेच्या कामांचा अनुभव देण्यात आला आणि कंपनीचा मोठ्या हुद्याचा भावी ऑफिसर म्हणून तयार करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मला ब्रिटिश पेट्रोलियमचा क्रूड ऑईल विक्रेता म्हणूनही काम करावे लागले. तोपर्यंत खनिज तेलाचा असा व्यापार असतो याची मला कल्पनाही नव्हती. माझ्यासाठी हे आणखी एक नवीनच काम होते, पण त्यात मला रस वाटू लागला. तेलाच्या व्यापारामधे मला गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅन्ले यांच्यासारखे प्रतिस्पर्धी होते. का कोण जाणे, परंतु गोल्डमनच्या लोकांना मी आवडलो आणि त्यांनी मला मुलाखतीसाठी बोलविले. त्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रुबिन यांनी मुलाखत घेतली. (ते पुढे अमेरिकेचे ट्रेझरी सेक्रेटरी झाले.) माझ्यासोबत एक तास बातचीत झाल्यावर त्यांनी मला नाकारता येणारच नाही अशी पोस्ट देऊ केली. त्यावेळेस मी अगदीच नवशिक्या होतो आणि वॉलस्ट्रीट एक अतिगुप्तता राखणारा क्लब होता. माझ्या त्यावेळच्या पगारापेक्षा कितीतरी जास्त पगार त्यांनी देऊ केला होता. तरीही मला खात्री वाटत नव्हती, कारण बीपीमध्ये माझी उत्तरोत्तर प्रगती निश्चित होती. तेव्हा ही खात्रीची जागा सोडून वॉल स्ट्रीटमधली कमोडिटी ट्रेडिंगची देऊ केलेली जागा मी स्वीकारावी का नाही, हे मला ठरविता येईना. शिवाय बोनस म्हणजे काय हे मला माहीतच नव्हते. ते २००  ते २०००  टक्के एवढे मोठे असतात! वॉल स्ट्रीट हे एक वेगळेच जग आहे. तिथे एक हरतो तेव्हा दुसरा जिंकतो. दोघेही जिंकणे अशक्य. तुम्ही जिंकलात तर भरघोस बोनस आणि हरलात तर सहा महिन्यांच्या आत तुम्ही कंपनीच्या बाहेर. ही जोखीम घ्यायचे मी ठरविले. इथे ज्याला ‘लीधो दीधो’ धंदा म्हणतात, त्या कमोडिटी फ्यूचर्स आणि फॉर्वर्ड ट्रेडिंगची जोखीम मी पत्करली. कायद्याचा अभ्यास करण्याचे ठरविले तेव्हा पहिला धोका पत्करला होता आणि आता हा दुसरा धोका वॉल स्ट्रीटमध्ये जाण्याचा. हे सर्व लक्षात घेऊनही मी गोल्ड्‌मनमध्ये रूजू झालो आणि नंतर दोन एक वर्षाने ड्रेफुसमधेही, जेव्हा त्यांच्याकडून तशी विचारणा आली. तोपावेतो बोनस म्हणजे काय असतं याची मला पुरी जाण आली होती. त्यांनी मला भरपूर पगार दिला. लुइ ड्रेफुस एनर्जी ही फार मोठी फ्रेंच-जुइश व्यापारी कंपनी आहे. १४० वर्षे जुनी. तेलाच्या व्यापाराचा मुख्य अधिकारी म्हणून इथे मी आठ वर्षे काम केले. १९९२ साली गल्फ वॉरच्या वेळी या कंपनीने तेलाच्या व्यापारांत खूप फायदा कमावला आणि मला झकास बोनस मिळाला. यावेळी नोकरीतून निवृत्त होऊन सामाजिक कार्याला वाहून घ्यावे असे माझ्या मनात येत होते. परंतु सिटी बँकेमधल्या माझ्या मित्रांनी मला त्यांच्यामार्फत कमोडिटी ट्रेडिंग सुरू करण्याचा सल्ला दिला. सिटी बँकमध्ये मी जागतिक कमोडिटी ट्रेडिंगचा मुख्य होतो. एव्हाना मी ४५ वर्षाचा होतो आणि माझ्या करिअरच्या शिखरावर होतो. अशावेळी नोकरी सोडावी का असा प्रश्न पडला होता.

प्रश्न - हे कोणत्या साली?

- हे घडलं १९९४ मध्ये.

प्रश्न - मग सोडली नोकरी तेव्हा?

- हो. अगदी पूर्णपणे. मी अगदी शाळेत असतानापासून मला समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे असं वाटत होतं. पैशामागे धावण्यापेक्षा बरंच जास्त काही साध्य करायचं असतं. भारतातील लोकांसाठी तसेच अमेरिकन लोकांसाठी काहीतरी चांगलं केलं पाहिजे. अमेरिका ही माझी कर्मभूमी आहे, माझ्या मुलांचा जन्म इथे झालेला आहे. माझ्या सदसद्‌विवेकबुद्धीने मी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि गेली २२ वर्षे मी पूर्णवेळ हे काम करीत आहे. काही एखाददुसरी कन्सल्टिंगची कामे तेवढी केली. वॉल स्ट्रीटमधे पाच वर्षे काम केले तर आयुष्यभराची कमाई होते. तुम्ही फार श्रीमंत होणार नाही, परंतु एक दोन पिढ्या सुखात राहू शकतील. हे स्वातंत्र्य वॉल स्ट्रीटमुळे मिळालं त्यासाठी मी वॉल स्ट्रीटचा ऋणी आहे.

प्रश्न - तुचे जीवनाचे तत्त्वज्ञान काय आहे?

- मनुष्याला एकच आयुष्य मिळतं. ते त्याने चांगलं जगावं. पुनर्जन्म मी मानत नाही. जीवन म्हणजे समतोल राखणं आहे. समाजासाठी काहीतरी चांगलं तर करावंच, पण त्याचबरोबर स्वतःसुद्धा जीवनाचा आनंद घ्यावा. या आनंदाची माझी व्याख्या फार वेगळी नाही. सर्व प्रकारची माल्ट्‌स (मादक पेय) मला आवडतात, तसेच तऱ्हेतऱ्हेचे खाद्य पदार्थ आणि पर्यटन मला आवडतं. परंतु यासोबतच समाजासाठी काही तरी करण्यातही मला आनंद मिळतो. सध्या मी अमेरिकेत पर्यावरणीय समस्यांवर तसेच धर्मनिरपेक्षता आणि ‘चर्च (धर्म) व शासन यामधे पूर्ण फारकत’ यावर काम करीत आहे. सामाजिक न्यायाची आवश्यकता मला तीव्रतेने जाणवते आणि मी स्वतःला जागतिक नागरिक मानतो. मी निरीश्वरवादी आहे आणि  माझी पक्की खात्री आहे की, धर्म आणि ईश्वर या संकल्पना सत्ता हाती असलेल्या वर्गानेच निर्मिल्या आहेत, जेणेकरून त्यांना स्त्रिया व समाजातील सत्ताविहीन वर्गांचे दमन करता येईल.

प्रश्न - आपल्या छंदांबाबत काही सांगाल?

- मला बौद्धिक व कलात्मक गोष्टींची विशेष आवड आहे. गझल ऐकायचा नाद आहे. तसाच मी अंतरिक्ष विज्ञानाचा विद्यार्थी आहे. माझ्यामते अंतरिक्ष विज्ञान हे सर्वांत महत्त्वाचे विज्ञान आहे, ज्याच्यामुळे काही मूलगामी समस्यांची उकल साध्य होते. उदा.विश्वाची निर्मिती व भविष्य.

प्रश्न - आपण कुठे राहता?

- मायामी बीच, फ्लोरिडा. तिथला निळाशार समुद्र व उबदार हवा, उत्तम अन्न व शौकीन लोक, दुसरा स्वर्गच जणू.

प्रश्न - आपल्या पत्नीही काही उद्योग करतात का?

- नाही. माझी पत्नी प्रतिभा मूळची विलेपार्ले येथील मुंबईची आहे. परंतु माझे सासरे डॉ.केशव टिळक टोरांटो, कॅनडा येथे स्थायिक झाले आहेत.

प्रश्न - आपल्याला मुले किती आहेत?

- मला तीन मुले आहेत.

प्रश्न - आपली मुले काय वयाची आहेत?

- गिरीश ४० वर्षांचा आहे. तो क्लिवलँड, ओहायओ येथील ‘स्ट्रॅटेजिक वेल्थ पार्टनर’चा आर्थिक सल्लागार आहे. त्याचे लग्न झाले असून त्याला पाच आणि सात वर्षांच्या अतिशय देखण्या दोन मुली आहेत. मधली मुलगी निशा वकील आहे, ती एका न्यूयॉर्क येथील हेज फंडची मार्केटिंग डायरेक्टर आहे. आणि आमचा सर्वांत लहान मुलगा सुशिल डॉक्टर आहे, नेफ्रॉलॉजी या विषयात तो सध्या वॉशिंग्टन युनिव्हर्सिटीमध्ये फेलोशिप करतो आहे.

प्रश्न - आपण इतक्या तडकाफडकी नोकरी सोडून दिलीत; या निर्णयात आपल्या कुटुंबाचे योगदान किती होते?

- याचं श्रेय प्रतिभाला द्यायला हवं. कारण तिला पैशाची हाव जराही नाही. दागदागिने किंवा इतरही चैनीच्या गोष्टींची हौस नाही. १९९४ साली मी पुरोगामी साहित्य व सामाजिक कार्य या क्षेत्रांतील पारितोषिकांची सुरुवात महाराष्ट्र फाउंडेशनच्या माध्यमातून केली. यासाठी मी दोन करोड रुपये दिले. एवढेच नव्हे तर आणखीही किती तरी पैसे इतर पुरोगामी कामांसाठी देण्यास (जे मी दिले व देत आहे), तेवढ्याच उदार मनोवृत्तीची सहधर्मचारिणी असावी लागते. इतकी समाधानी वृत्ती फार विरळा दिसून येते. काही श्रेय मी माझ्या समाजसेवी प्रवृत्तीलाही देईन, जी मला माझ्या आईकडून व काकांकडून मिळालेली आहे. माझी मनोवृत्ती पुरोगामी आहे. दान दोन प्रकारचे असते. एक कल्याणकारी व दुसरे परिवर्तनवादी. ९९ टक्के कल्याणकारी लोक अन्न, पैसे, कपडे इत्यादी वाटतात ज्यामुळे देणारा व घेणारा दोघेही तृप्त होतात. त्यामुळे लोक थोडे दिवस खुश होतात, पण त्यातून काही बदल घडून येत नाही. समाज घडवण्यासाठी परिवर्तन हा एकमेव उपाय आहे. भ्रष्टाचार, हुंडा, स्त्रियांचे सशक्तीकरण इत्यादींसाठी लढणे हे परिवर्तनाचे उत्तम उपाय आहेत. कारण जुन्या कर्मठ समाजात स्त्रियांना दुय्यम दर्जा देऊन मुठीत ठेवण्यात पुरुषार्थ मानत असत. जोपर्यंत स्त्रियांना शिक्षण मिळत नाही, तोपर्यंत त्या सशक्त होत नाहीत, तोपर्यत त्यांच्यात स्वाभिमान जागृत होणार नाही. त्यासाठी- स्त्रियांना व निम्नवर्गीयांना धाकात ठेवण्यासाठी- भारतामधले पुराणमतवादी लोक देव आणि धर्म यांचा उपयोग करत राहतील. स्त्रियांचे सशक्तीकरण करून त्यांचा स्वभिमान जागविणारे कोणतेही काम महान असते. याच सामाजिक कार्यासाठी मी ही पारितोषिके ठेवली आहेत.

प्रश्न - १९९४ पासून ही पारितोषिके आपण दरवर्षी देत आहात?

 - होय. हे तेविसावे वर्ष आहे. आमचा मोठा फंड आहे, त्यावर मिळणाऱ्या व्याजातून पारितोषिके दिली जातात. दरवर्षी नऊ पारितोषिके देतो. जीवनगौरव पारितोषिकास दोन लाख व वेगवेगळ्या साहित्य- सामाजिक कार्यासाठी एक लाख व पन्नास हजार रुपयांचे पुरस्कार दिले जातात. हा कार्यक्रम पुणे येथे होतो. ज्ञानी, जाणकार लोकांची एक समिती पारितोषिकांसाठी नावे सुचविते आणि त्यातील अंतिम नावे अमेरिकेतील कमिटी निवडते. हे सर्व काम करण्याची पद्धत खूप क्लिष्ट परंतु तितकीच पारदर्शी आहे.

प्रश्न - भारतातील ‘बिझिनेस’ करणाऱ्या वर्गाच्या दानशूरतेबाबत आपले काय मत आहे?

- अमेरिकेतील उद्योजक अगदी वेगळेच असतात. इथे चढाओढ बरीच असली तरी सर्जनशीलता, योग्यता आणि प्रामाणिक मेहनत यांची योग्य ती कदर करण्यात येते. ते कष्ट करतात आणि त्याची परतफेडही उदारपणे करतात. केवळ बिल गेट्‌स, जॉर्ज सोरोस, वॉरन बफेट, हॉवर्ड शुल्ट्‌झ आणि मार्क झुकरबर्ग यांनीच आपली ९९ टक्के मिळकत दान करून टाकली असे नाही. इतर सर्वच म्हणजे ९० टक्के उद्योजक ५० टक्केपेक्षा जास्त मिळकत दान करतात. हे बहुतेक उद्योजक पुरोगामी विचाराचे असतात; उदारमतवादी असतात आणि त्यांचा दृष्टिकोन जागतिक असतो. दानशूरपणा आणि समाजहिताची चाड जणू त्यांच्या डीएनएमधेच असते. याउलट बहुसंख्य भारतीय उद्योजक- अझिम प्रेजी, नारायण मूर्ती व असेच इतर थोडे उद्योजक वगळल्यास- समाजाकडून भरपूर कमावतात, पण परतफेड काहीच करीत नाहीत. मला त्यांची मनोवृत्ती फार संकुचित वाटते. मी मोठेपणा आणि यश हे माणसाच्या कमाईवरून मोजत नाही, तर तो त्यातील किती देऊन टाकतो त्यावरून ठरवितो. त्यानुसार भारतीय उद्योजक फारच खालच्या दर्जाचे ठरतात. बिल गेट्‌स इथे आपल्या देणग्यांबाबत करार करण्यास आले असताना फारच थोडे उद्योजक पुढे आले. काहींनी तर आपला काळा पैसा गुपचूपपणे गुंतवण्याचा प्रयत्न केला. अन्यथा हा पैसा त्यांनी मंदिरे बांधण्यात खर्च केला. हे किती लाजिरवाणे आहे! हे भारतीय उद्योजक त्यामुळे खरोखर समाधानी होतात? मला तर त्यांच्या कुटुंबात पैशावरून कडाक्याची भांडणे होतांना व सत्ताधाऱ्यांसमोर ते लाळघोटेपणा करताना दिसतात. एक अर्थपूर्ण व सफल जीवन जगण्याचा खचितच हा मार्ग नाही.

प्रश्न - आपण आजच्या तरुणांना काय संदेश द्याल?

- आज आपली जीवनपद्धती व्हॉट्‌सॲप, फेसबुक, स्नॅपचॅट इत्यादी ज्या-ज्या गोष्टींनी आमूलाग्र बदलली आहे, त्या सर्व कल्पना अमेरिकेतील २० वर्षांखालील मुलांना सुचल्या आहेत, त्यांना त्यांचे आकलन झालेले आहे आणि त्यांनी त्यांचा शोध लावला आहे. भारतीय तरुण पहिले, दुसरे येतात, सुवर्णपदके मिळवतात आणि ‘स्मार्ट’ दिसतात. पण त्यांनी शोध किती लावले? बुद्धिमत्तेत ते बिलकुल कमी नाहीत; पण त्यांच्यात योग्य तो कल, मनोवृत्ती जोपासली जात नाही. त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन योग्य नाही. अमेरिकन तरुण मोठ्या मनाचे असतात. उदार तसेच पुरोगामी असतात. ते मोकळ्या मनाचे, त्यांची दृष्टी जागतिक असते आणि वृत्ती मानवतावादी असते. असे मोकळ्या मनाचे व स्वीकार करण्यास तयार असलेले लोक सृजनशील, नवीन वस्तू निर्माण करणारे व समाधानी असतात. म्हणूनच सृजनशीलता, उत्पादकता आणि दानशूरता यामध्ये अमेरिका अग्रेसर आहे. समृद्धी ही केवळ ‘बाय प्रॉडक्ट’ आहे- त्यांच्या पुरोगामी मूल्यांची. काही अपवाद सोडता भारतीय तरुण सहसा चटपट पोचणारे- नवीन शोध लावण्याऐवजी कॉपी करण्याचाच मार्ग पसंत करतात; पुराणमतवादी संकुचित मनाचे आणि कडवट वृत्तीचे असतात. जागतिकीकरण याचा अर्थ बंधुभाव आणि उदार मूल्ये असाच असावा. भारतीय तरुणांध्ये परंपरावादी आणि मागासलेपणा या वृत्ती दिसून येतात. महिलांचा सन्मान, बहुविधतेचा स्वीकार आणि औदार्य यां मूल्यांचे फारसे महत्त्व त्यांना नाही. असे लोक कधीच सृजनशील नसतात, त्यांना भव्य स्वप्ने पाहता येत नाहीत, नवीन शोध लावता येत नाहीत, निर्मिती करता येत नाही व समाधानही मिळत नाही. तेव्हा आता योग्य वृत्तीची निवड तुम्हीच करायची आहे.

संवादक : विनिता देशमुख

अनुवाद : सुमन ओक

(‘कॉर्पोरेट सिटिझन’ या मासिकाच्या एप्रिल २०१६ च्या अंकात ही मुलाखत प्रसिद्ध झाली होती.)

Tags: mulakhat interview suman oak Vinita deshmukh sunil deshmukh Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 weekly sadhana 02 February 2019 sadhana saptahik मुलाखत सुमन ओक विनीता देशमुख सुनील देशमुख महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील देशमुख

उद्योजक, प्रवर्तक महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके