आजही तुम्ही महाराष्ट्राला असं विचारलं की, तर्कतीर्थांनी काय लिहिलं ? तर दोन पुस्तकांशिवाय तिसरं पुस्तक सांगता येत नाही. एक 'वैदिक संस्कृतीचा विकास', त्याला साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार मिळाला आहे आणि ते अनेक भाषांमध्ये - इंग्रजी, हिंदी आणि संस्कृतमध्ये भाषांतरित झालंय. दुसरं, 'हिंदुधर्माची समीक्षा.' ही दोन्ही पुस्तकं 'आधुनिकता आणि प्राचीनता' यांच्या समन्वयाचं काम करणारी आहेत. 'हिंदुधर्माची समीक्षा' या 1941 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांची 1940 ची भाषणे आहेत. तो त्यांचा मार्क्सवादी होण्याचा काळ होता. एक सनातनी संस्कृत पंडित मार्क्सवादी होतो. हीसुद्धा आश्चर्यकारक गोष्ट आहे.
सुनीलकुमार लवटे मागील 50 वर्षे सार्वजनिक जीवनात आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला किती आयाम आहेत, ही संख्या बरीच सांगता येईल. तरीही त्यातले सहा-सात आयाम मला महत्त्वाचे वाटतात. ते शिक्षक, प्राध्यापक होते, हा एक भाग. त्यांनी स्वतंत्र लेखन विपुल प्रमाणात केलंय. मोठ्या प्रमाणात अनुवाद केलेले आहेत. सामाजिक कार्यकर्ते तर ते आहेतच. बरीच ग्रंथ संपादनं त्यांच्या नावावर आहेत. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने संग्रहालये (Museum) उभारली आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची ओळख एक संयोजक म्हणून विशेष वाटते. 'योजकत्व दुर्लभस्य' असं एक संस्कृत सुभाषित सांगितलं जातं, ते मला प्रकर्षाने आठवतं. मी त्यांना मागची किमान 10-15 वर्षं जवळून ओळखत आहे. त्यांचं काम जवळून पाहत आहे.
अगदी अलीकडच्या दोन दशकभरातील महत्त्वाचं म्हणजे वि. सं. खांडेकर यांचं असंग्रहित आणि अप्रकाशित लेखन यांविषयीच्या संपादनाचा प्रकल्प. आणि दुसरं, डॉ. नरेंद्र दाभोलकरांची डझनभर पुस्तकं मराठीमधून हिंदीमध्ये अनुवादित करण्याच्या प्रकल्पाचं संपादन आणि संयोजन त्यांनी केलं आहे. त्यांचं एक विशेष महत्त्वाचं पुस्तक आत्मकथन 'खाली जमीन वर आकाश.' या कशाबद्दलही त्यांना प्रश्न विचारणार नाही. एका अतिशय महत्त्वाच्या प्रकल्पाचं संपादन मागची पाच वर्षे ते करत आले आहेत. ते म्हणजे 'तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचं समग्र वाङ्गय'. तब्बल 18 खंड, साडेदहा हजार पानं आणि अकरा हजारांपेक्षा अधिक युनिट्स असा हा एकूण प्रकल्प आहे. आजची मुलाखत याविषयी असणार आहे.
प्रश्न : लवटे सर आपण समग्र तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी या प्रकल्पाकडे नंतर वळूच, परंतु लक्ष्मणशास्त्री जोशी यांना तुम्ही कधी पाहिलंत, कधी ऐकलंत? त्यांचा जो थोडा-फार सहवास तुम्हाला लाभला असेल, त्यातून तुमचं आकलन नेमकं कसं आकाराला आलं?
- तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना माझ्या तरुणपणापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत ऐकत, पाहत, वाचत आलेलो आहे. साधारणपणे मला समज आली 1970-71 ला. त्या काळात माझी वैचारिक घडण होत होती. राष्ट्र सेवा दल, साधना, आंतरभारती अशा विचार प्रवाहांत साने गुरुजी, वि.स. खांडेकर, एस.एम. जोशी, ना.ग. गोरे, यदुनाथ थत्ते या सर्वांना मी वाचत, ऐकत, मोठा झालो. मी पदवीधर झालो आणि शिक्षक झालो, पण तर्कतीर्थांना मी पहिल्यांदा ऐकलं ते प्राध्यापक झाल्यावरच. त्या काळात महाराष्ट्रातल्या सांस्कृतिक जीवनाचा कोणताही मोठा समारंभ तर्कतीर्थांच्या उपस्थितीशिवाय आणि त्यांच्या व्याख्यानाशिवाय समृद्ध झाला असं महाराष्ट्राला वाटायचं नाही. त्यांना ऐकणं म्हणजे स्वतःला विस्तारित करणं, नव्या समजाकडे नेणं, नवी दृष्टी आणि विचार घेणं असं होतं. माझं वाचन त्या काळात कमी होतं. पण त्यांना ऐकताना आपण काहीतरी दिव्य-भव्य ऐकत आहोत असं वाटण्याचा माझ्या जीवनातला तो काळ होता.
लक्ष्मणशास्त्री जोशी हे 'तर्कतीर्थ' या एकाच नावाने महाराष्ट्रात ओळखले जायचे. खरं म्हणजे ती त्यांची पदवी होती, पण तीच त्यांची ओळख झाली होती. तर तर्कतीर्थ म्हटलं की, खरं तर त्या काळात भारतात आणि महाराष्ट्रात अनेक तर्कतीर्थ होते. पण तर्कतीर्थ म्हटलं की, एक सूत्रवाक्य यायचं ते म्हणजे, लक्ष्मणशास्त्री जोशी ! हे सूत्रवाक्य त्यांनी भारताला आणि महाराष्ट्राला आपल्या विद्वतप्रचुर लेखनाने, व्याख्यानांनी आणि प्रबोधनाने दिले अशी माझी धारणा आहे.
प्रश्न : अशा या तर्कतीर्थांचा जन्म 1901 मधील आणि मृत्यू आहे 1994 चा. 93 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलं. वयाच्या 23 व्या वर्षी त्यांना तर्कतीर्थ ही पदवी मिळाली. पुढची 70 वर्षे हा माणूस महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये अगदी 'केंद्रभागी' म्हणावा अशा स्वरूपात कार्यरत राहिला. त्यांची ओळख 'प्राचीन आणि आधुनिक' या दोन्हींच्या संगमावर उभा असलेला आणि प्राचीन व आधुनिक यांना जोडणारा दुवा अशी सातत्याने करून दिली जाते. आता हा सगळा प्रकल्प तुम्ही पूर्ण केलाय याबद्दल आपण बोलणारच आहोत. परंतु तुमच्या मनात या तर्कतीर्थांची आता या क्षणी काय प्रतिमा आहे?
- वर्तमानात आपण सगळे ज्या एका अरिष्टातून जात आहोत, त्याला आपण व्यापक अर्थाने सांस्कृतिक अरिष्ट (खरं म्हणजे ते धार्मिक अरिष्ट आहे.) म्हणू. असंच अरिष्ट गेल्या शतकामध्ये, विशेषतः टिळकांच्या मृत्यूनंतर गांधी पर्व सुरू झालं, त्या काळातदेखील या देशामध्ये होतं. तो काळ म्हणजे साधारणपणे 1923-25 ते 1950. भारत आणि महाराष्ट्र यांच्या जडणघडणीमध्ये 'धर्म आणि समाज सुधारणांचा तो काळ' होता. त्याची बैठक महात्मा फुले, आगरकर, टिळक इत्यादींनी त्या पूर्वीच्या शतकामध्ये सुरू केलेली होती. पण तर्कतीर्थ तेव्हा उदयोन्मुख होत होते, त्या काळामध्ये त्यांचं जे आकलन होतं ते अशा कोणत्याही पूर्वसुरींच्या प्रभावामुळे नव्हतं. वाचनातून जी उपजत प्रज्ञा त्यांच्यामध्ये विकसित झाली, दृष्टी विकसित झाली; त्यातून ते पुरोगामी, विवेकवादी आणि बुद्धिवादी बनले.
त्यांचे गुरू नारायणशास्त्री मराठे तथा स्वामी केवलानंद सरस्वती, वाईला प्राज्ञपाठशाळा नावाची संस्कृत पाठशाळा चालवायचे. ती त्या काळातली राष्ट्रवादी शिक्षण देणारी शाळा होती. विद्यार्थी हा देशाचं स्वातंत्र्य पेलणारा, देशाला स्वातंत्र्य देणारा असला पाहिजे, अशा धारणेने तिथे शिक्षण दिलं जायचं. उदाहरण म्हणजे वि. गो. विजापूरकर नावाचे कोल्हापूरचे गृहस्थ तिथल्या राजाराम महाविद्यालयात प्राध्यापक होते. आगरकर, टिळक यांच्या प्रभावातून त्यांनी 'समर्थ विद्यालय' नावाची राष्ट्रीय शिक्षण देणारी शाळा कोल्हापूरला सुरू केली होती. त्यांना असं वाटायचं की, आपले विद्यार्थी या देशाला स्वातंत्र्य मिळवून देतील. तशा प्रकारची शिकवण ते द्यायचे. त्यांचं सगळं काम पाहून ब्रिटिशांना मिरच्या झोंबायच्या. म्हणून ब्रिटिशांनी कोल्हापूर संस्थानला कळवलं की, तुमच्या संस्थानात ही शाळा चालता कामा नये. मग त्यांनी कोल्हापूर संस्थानातील शाळेचा बाड-बिस्तारा गुंडाळला, ते मिरज संस्थानात आले. मिरज संस्थानाला पण ब्रिटिशांनी नामोहरम करून सोडलं. मग ते तळेगावला आले. तिथे त्यांच्यावर शस्त्र बाळगणे, षडयंत्र रचणे, अशी कलमं लावून ती शाळा बंद करण्यात आली. प्रा. विजापूरकरांच्या पुढे प्रश्न असा होता, की मी ज्या प्रकारचा ध्येयवाद शिक्षणातून निर्माण करू इच्छितो; ते शिक्षणच जर दिलं जाणार नसेल, तर ती शाळा चालवायची कशाला? म्हणून त्यांनी अशा प्रकारची शाळा असलेल्या 'प्राज्ञ' पाठशाळेमध्ये आपले सगळे विद्यार्थी आणि शिक्षक आणले. समर्थ विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थी प्राज्ञ पाठशाळेत आल्यामुळे एक संस्कृत पाठशाळा 'राष्ट्रीय पाठशाळा' झाली. म्हणजे तर्कतीर्थांचा कायाकल्प कुणी केला, तर मी असं म्हणेन, समर्थ विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी. मला तो रोमांचकारी काळ वाटतो.
एकीकडे गांधीवादाचा विकास होत होता, दुसरीकडे समाजवादाचा विकास होत होता. पहिलं महायुद्ध ते दुसरं महायुद्ध असा तो काळ महाराष्ट्राच्या जागृतीचा होता. सामाजिक जागृती असेल, धार्मिक जागृती असेल, सांस्कृतिक जागृती असेल, विवेकवादी जागृती असेल, अनेक आघाड्यांवर लोक काम करायचे. तर्कतीर्थांना त्या काळात असं वाटायचं की, 'धर्म परिवर्तन' हे 'समाज परिवर्तनाचं' साधन आहे. म्हणून ते आणि त्यांचे गुरुजी छोटे छोटे प्रयत्न करायचे. उदा. वाईतली 1923 ची घटना अशी आहे की, वाईत एक छोटी ब्राम्हण सभा होते. सभेपुढचा विषय हा की ज्ञातीत विवाह करावा का? म्हणजे काय तर कऱ्हाडे ब्राम्हणांनी चित्पावन ब्राम्हणांशी विवाह करावा का? हा त्या वेळचा ऐरणीवरचा प्रश्न. आज अशा प्रश्नांचं आपल्याला हसू येतं, पण तो काळ किती कर्मठ होता, याचं ते उदाहरण आहे. अशा सभांमध्ये तर्कतीर्थ आणि केवलानंद सरस्वती जायचे आणि सांगायचे की, 'अहो तुम्ही चित्पावन, कऱ्हाडे, देशस्थ, कोकणस्थ असे फरक काय घेऊन बसलात? सगळ्यांचं रक्त एकच आहे, सगळ्यांचा वर्ण एकच आहे, सगळ्यांची संस्कृती एकच आहे. तर मग मिश्र विवाह झाले म्हणून काय बिघडलं?'
तर्कतीर्थांनी असं लिहिलंय की, 'मी 1923 ते 1930 ही सात वर्षे अनेक ब्राम्हण सभांमध्ये गेलो.' सोनगीरला धुळ्याच्या जवळ, गुजरातच्या बॉर्डरवर अशीच एक मोठी धर्मसभा झाली. या सभेला तर शंकराचार्य उपस्थित होते. त्या सभेत पण तर्कतीर्थांनी असं सांगितलं की, 'प्रायश्चित्ताचा विचार आपण अत्यंत उदारमतवादाने केला पाहिजे.' त्या काळामध्ये अनैतिक संबंधांतून जन्माला आलेली मुलं, ज्यांनी मिश्र विवाह केले अशांची अपत्ये ही पाप समजली जायची. पापातून मुक्ती मिळवण्यासाठी आई-वडिलांना तर प्रायश्चित्त घ्यावंच लागायचंच, पण त्या अपत्यांनाही पापी मानलं जायचं. तेव्हा तर्कतीर्थ असं म्हणायचे की, 'तुम्ही यांना धर्मामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करता, पण ते प्रयत्न म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर. तुम्ही सांगता ती प्रायश्चित्त परवडणारी नाहीत, तर तुम्ही उदारमतवादाने प्रायश्चित्तात सवलत का देत नाही?' तर त्या काळचा पुरोहित समाज प्रायश्चित्तात सवलत द्यायलाही तयार नव्हता. त्यामुळे 1930 च्या दरम्यान तर्कतीर्थांना असं वाटायला लागलं की, आपण ज्या सनातनी समाजवर्गाला जागं करू पाहतो, त्यांना शब्दप्रामाण्याशिवाय धर्म मंजूर नाही. मग त्यांनी असं ठरवलं की, आपण दगडावर डोकं आपटण्यापेक्षा आपला मार्ग बदलावा. आणि मग ते धर्म आणि समाज चळवळीकडून राष्ट्रीय चळवळीकडे आले.
प्रश्न : त्यांची प्रकांड पंडित म्हणून असलेली ओळख आणि त्यांनी केलेलं प्रचंड काम महाराष्ट्राला माहिती आहे. मात्र तरीही हा माणूस प्रकांड पंडित आहे म्हणजे नेमका कसा? आणि प्रचंड काम आहे म्हणजे नेमकं किती? याचा परिचय महाराष्ट्रातल्या भल्याभल्या लोकांना नव्हता आणि आजही नाही. अशा या तर्कतीर्थांचं समग्र वाङ्गय करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये पहिल्यांदा कधी आला? तर असं दिसतं की, डिसेंबर 2018 मध्ये तुम्ही हा प्रस्ताव साहित्य संस्कृती मंडळाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळून ते काम तुमच्याकडे 2019 जानेवारीला आलं. 2019 ते 2023 ही पाच वर्षे तुम्ही त्यावर काम केलंत. तर 'समग्र तर्कतीर्थ' करण्याची गरज आहे असं तुम्हाला का वाटलं ?
- 2018-19 च्या काळात एका निमित्ताने, लॉकडाऊनपूर्वी मी 'तर्कतीर्थ' वाचायला घेतला होता. त्याचं कारण असं होतं की, त्या काळामध्ये वर्तमान शासनाचा उदो उदो होत होता. नवं येणारं सरकार सनातनी विचारांचंच असेल अशी चिन्हं दिसत होती. म्हणून '100 वर्षांपूर्वी अशा विचारांबद्दल समाज काय विचार करत होता?' असा प्रश्न मनात आला. मग या निमित्ताने 'तर्कतीर्थ' वाचायला घेतले. विशेषतः त्यांची दोन पुस्तकं. आजही तुम्ही महाराष्ट्राला असं विचारलं की, तर्कतीर्थांनी काय लिहिलं ? तर दोन पुस्तकांशिवाय तिसरं पुस्तक सांगता येत नाही. एक 'वैदिक संस्कृतीचा विकास', त्याला साहित्य अकादमीचा पहिला पुरस्कार मिळाला आहे आणि ते अनेक भाषांमध्ये - इंग्रजी, हिंदी आणि संस्कृतमध्ये भाषांतरित झालंय. दुसरं, 'हिंदुधर्माची समीक्षा.' ही दोन्ही पुस्तकं 'आधुनिकता आणि प्राचीनता' यांच्या समन्वयाचं काम करणारी आहेत. 'हिंदुधर्माची समीक्षा' या 1941 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकात त्यांची 1940 ची भाषणे आहेत. तो त्यांचा मार्क्सवादी होण्याचा काळ होता. एक सनातनी संस्कृत पंडित मार्क्सवादी होतो. हीसुद्धा आश्चर्यकारक गोष्ट आहे.
मघाशी मी ज्या राष्ट्रीय चळवळीचा उल्लेख केला, त्यात तर्कतीर्थांनी क्रांतिकारी काम केलं. संगमनेर, नगर या परिसरांमध्ये तरुण कार्यकर्त्यांची शिबिरं घेतली, त्यांना राष्ट्रीय चळवळ समजावून सांगितली. कळवण, बागलाण, नामपूर, मांगी-तुंगी हा धुळे-नाशिक जिल्ह्यातला परिसर आहे. त्या जिल्ह्यांमध्ये तर्कतीर्थांनी पन्नास हजार आदिवासींचा मोर्चा 'जंगल सत्याग्रह' म्हणून काढलेला आहे. त्या परिसरातील दीडशे पोलीस पाटलांचे राजीनामे लिहून घेऊन ते ब्रिटिशांना सादर केले. असा हा मनुष्य! त्यांनी बागलाणला बार्डोली पद्धतीचा सत्याग्रह केला. या अभ्यासाच्या निमित्ताने मी ब्रिटिश इंटेलिजंस रिपोर्ट वाचत होतो. त्यात असं लिहिलेलं आहे की, 'This can be treated as Mini Bardoli.' त्या रिपोर्टमध्ये तर्कतीर्थांचं वर्णन असं आहे, 'Renowned Sanskrit Scholar be- coming revolutionary in India.' हा माणूस त्या काळामध्ये शस्त्र बाळगायचा, शस्त्र पुरवठा करायचा.
हे सगळं त्यांच्यात आलं कुठून? ते धुळ्याच्या तुरुंगात असताना द्वा. भ. कर्णिक यांच्याशी त्यांचा संपर्क आला. कर्णिक हे पुढे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक झाले. तत्पूर्वी 'संग्राम' दैनिकांचे संपादक होते. स्वतंत्र महाराष्ट्राची वैचारिक घडण ज्या दैनिकाने केली आणि महाराष्ट्र टाइम्सचा पाया ज्यांनी घातला असे ते संपादक. ते पूर्वीच्या त्या काळात दिल्लीमध्ये केसरीचे प्रतिनिधी म्हणूनही राहायचे. त्यांचा संपर्क कम्युनिझमशी आला. कम्युनिस्ट छोटी पत्रकं काढायचे आणि ती सर्वसामान्यांपर्यंत वितरित करायचे; अशी त्यांची पद्धत होती. कोणताही विचार जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही, तोपर्यंत क्रांती होत नाही अशी त्यांची धारणा होती. ही पत्रकं चोरून धुळ्याच्या तुरुंगात यायची. द्वा.भ. कर्णिक ती आणायचे. त्यांचे बंधू वसंतराव कर्णिक (हे पुढे रॉयवादी झाले.) यांच्यामार्फत ही पत्रकं आली आणि ती तर्कतीर्थांनी वाचली. तेव्हा तर्कतीर्थांना साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, 'मी रॉयवादी का झालो?' त्यात त्यांनी लिहिलंय, 'कोणताही नवा विचार मला प्रक्षुब्ध करतो.' मी मार्क्सवाद वाचला आणि प्रक्षुब्ध झालो. म्हणजे 'माझ्या जुन्या जाणिवा एकदम अणुविभाजनासारख्या भौमितिकरीत्या विभाजित झाल्या आणि मी नव्या विचाराकडे आकर्षित झालो.' सहा महिन्यांच्या तुरुंगवासामध्ये त्यांनी मार्क्सवाद वाचला, कम्युनिस्ट मॅनिफेस्टो वाचला, 'दास कॅपिटल' वाचला. तेव्हा त्यांची अशी धारणा झाली की, या देशात परिवर्तन केवळ गांधी मार्गाने होणार नाही; ते झालं तर शस्त्रानेच होऊ शकेल, ते झालं तर जनतेच्या समित्यांनीच होऊ शकेल. म्हणजे एकीकडे विनोबा धुळ्याच्या जेलमध्ये गीतेची प्रवचनं सांगायचे आणि साने गुरुजी ते लिहून काढत होते, त्याच काळात तर्कतीर्थ त्याच तुरुंगात लोकांना मार्क्सवाद समजावून सांगायचे.
साधारणपणे नोव्हेंबर 1932 ला जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की, हा विचार आपण पसरवला पाहिजे. त्या काळामध्ये कर्णिक बंधूंच्या माध्यमातून ते मानवेंद्र रॉय यांच्या संपर्कात आले. मानवेंद्र रॉय भारतात आले, त्यापूर्वी त्यांनी आठ कम्युनिस्ट देशांमध्ये क्रांती केलेली होती. त्यामध्ये मेक्सिको, रशिया, जर्मनी होते. 13 वर्षांचा तरुण क्रांतीसाठी भारतातून विदेशात पळून जातो; आंतरराष्ट्रीय मार्क्सवादाच्या संस्थापकांपैकी एक बनतो आणि भारतात वेश, नाव बदलून डॉ. महमूद बनून येतो. त्यावेळी भारतावर राष्ट्रीय काँग्रेसचा प्रभाव प्रचंड होता. त्यांनी काँग्रेसचं सदस्यत्व स्वीकारलं. साने गुरुजींनी यशस्वी केलं, त्या फैजपूर काँग्रेस अधिवेशनामध्ये (1937) रॉय यांचं अत्यंत प्रभावी भाषण झालं होतं.
भारतात समाजवादाचा उगम कुठे झाला हे तुम्ही शोधायला लागला, तर असं लक्षात येईल की भारतातील समाजवादाची ज्योत फैजपूर काँग्रेसमध्ये पेटली. त्याचं कारण, मानवेंद्र रॉय ! त्यांनी काँग्रेसच्या त्या अधिवेशनात असं मांडलं, की 'केवळ अहिंसेने भारताला स्वराज्य मिळेल, याबद्दल मी साशंक आहे. जगातल्या ज्या ज्या देशांमध्ये क्रांती झाली, ती शस्त्रांनीच झालेली आहे. भारतामध्ये सत्तेचा पराभव होईल, तर तो शस्त्रांनीच होईल, शास्त्राने होणार नाही.' त्यावेळी नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण ही सगळी मंडळी रॉय यांच्या विचारांची होती. तेव्हा नेहरू, पटेल आणि गांधींनी रॉय यांना बोलावून असं सांगितलं की, 'आप में और हम में दृष्टिकोन का बुनियादी फरक है। काँग्रेस के मंच पर हम क्रांति की बात कभी नहीं करेंगे। हम परिवर्तन की ही बात करेंगे।' या सगळ्या समाजवादी मंडळींना हे लक्षात आल्यानंतर, त्यांनी काँग्रेसमधून फुटून समाजवादी पक्ष निर्माण केला, तसंच रॉय यांनी 'रॅडिकल डेमोक्रॅटिक पक्षा'ची स्थापना केली. या पक्षाची अशी धारणा होती की, जनतेच्या समित्या तयार झाल्या पाहिजेत, जनतेने उठाव करून क्रांती केली पाहिजे. हा काळ 1936-40 चा आहे. 
तेव्हा रॉय यांना असं वाटायचं की, लोकसमित्या व्हायला पाहिजेत. 1975 दरम्यान जयप्रकाश नारायण समग्र क्रांतीमध्येही लोकसमित्यांबद्दल बोलायचे. आज आपण देशाकडे पाहतो, तेव्हा असं लक्षात येईल की, परत एकदा तिसऱ्यांदा लोकसमित्यांकडे गेल्याशिवाय परिवर्तन होणार नाही. या पार्श्वभूमीवर माझ्या मनात समग्र लक्ष्मणशास्त्री करण्याचा विचार आला.
प्रश्न : तुम्ही तर्कतीर्थांच्या ज्या दोन पुस्तकांचा सुरुवातीला उल्लेख केला, त्यामुळे प्रभावित होणं, देशाचं नवं सरकार - त्यातली एकूण परिस्थिती आणि त्याच पार्श्वभूमीवर तर्कतीर्थाच्या एकूण आयुष्याची वाटचाल, त्यांचं चरित्र, त्यांच्या आयुष्यातली इतकी नाट्यमय (dramatic) वळणं हे सगळं कुठंतरी तुमच्या मनामध्ये घोळत होतं. परिणामी या माणसाचं समग्र वाङ्गय आपण संपादित करावं असं वाटलं आणि तुम्ही हा प्रस्ताव 'साहित्य संस्कृती मंडळा'कडे दिला. त्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष सुरुवात कशी केली ? साधनं जमवण्यासाठी, लोकांशी संपर्क करण्यासाठी आणि हे संपादन आकाराला येण्यासाठीची प्रक्रिया काय होती?
- खरं म्हणजे हा प्रकल्प इतका मोठा होईल, अशी मला अजिबात कल्पना नव्हती. 'अंधारात गोळ्या मारणे', अशी म्हण आपल्याकडे आहे. खरं आहे ते. अंधारात गोळ्या मारल्याशिवाय संशोधन निर्माण होत नाही. हा प्रकल्प करायचा म्हणून मी प्राज्ञ पाठशाळेमध्ये गेलो, तेव्हा मला असं सांगण्यात आलं की, 'त्यांची ही दोन-तीन पुस्तकं आहेत आणि दोन-तीन छोट्या संस्कृत पुस्तिका आहेत.' त्या त्यांनी मला दिल्या. ते वाचल्यानंतर शोध घ्यायला लागलो. 'अस्पृश्यता मीमांसा' नावाचा 17-18 पानांचा संस्कृत प्रबंध मिळाला. अकरावीला माझं संस्कृत असल्यामुळे मला संस्कृत कळतं. ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं, तर्कतीर्थांनी हे महात्मा गांधींसाठी लिहिलं. 1932 ला महात्मा गांधी तुरुंगात होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर निवडणुकीमध्ये स्वतंत्र मतदारसंघांचा आग्रह करत होते. महात्मा गांधी त्याविरोधात होते, 'राखीव मतदार संघ घ्या', असं म्हणत होते. त्यातून 'पुणे करार' निर्माण झाला, हा इतिहास सर्वांना माहीत आहे. लोक असं स्थूल मानाने म्हणतात की, पुणे करारात गांधी पराभूत झाले आणि आंबेडकर जिंकले. मी या दोन्ही नेत्यांच्या समग्र साहित्याचा अभ्यास करून तुम्हाला असं सांगेन की, हे दोन्हीही महान नेते एकमेकांमुळे अधिक प्रगल्भ झालेले आहेत.
थोडं विषयांतर होईल, पण 'गांधीजींचं उपोषण कसं सुटलं' याचं एक स्वतंत्र डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे. '24 तासांत उपोषण सुटलं नाही, तर We will loose Gandhi' असे डॉक्टरांचे म्हणणे होते. गांधीजींना कोण सांगणार असा प्रश्न होता. त्या काळात भारतामध्ये एकच माणूस त्यांना हे सांगू शकत होता, ते होते 'रवींद्रनाथ टागोर'. लोकांनी त्यांना गळ घातली, 'तुम्ही महात्मा गांधींना समजवा.' त्यांनी गांधींना तार पाठवली. त्या तारेतून ते गांधींना सांगतात, 'तुम्ही अलीकडे ऊठसूट उपोषण करता. वारंवार उपोषण करून तुमच्यात नैतिक अहंकार आलेला आहे. हा बरा नव्हे. व्यक्ती देशापेक्षा मोठी नसते. देशाची भावना लक्षात घेऊन तुम्ही उपोषण सोडावं.' मग महात्मा गांधी उपोषण सोडायला तयार होतात. या उपोषणाने, त्या तारेने आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आग्रहाने गांधीजींचं हृदय परिवर्तन झालं. या उपोषणानंतर त्यांनी राजकीय संन्यास घेण्याचे ठरवले. त्यांनी 'जमनालाल बजाज' यांना सांगितलं की, 'तुमच्या वर्ध्याला असे गाव शोधा, ज्या गावाला जायला रस्ता नसेल, ज्या गावात वीज नसेल, ज्या गावात पाण्याचा नळ नसेल आणि त्या गावात सर्व वस्ती हरिजनांची असेल.'
'सेगाव' नावाचं गाव, ज्याला आज आपण 'सेवाग्राम' म्हणतो, ते गाव निवडून बजाज यांनी गांधींजींना कळवलं. गांधीजी म्हणाले, 'मी प्रत्यक्ष गाव पाहणार, मग ठरवणार.' गांधीजी वर्ध्याहून टांग्याने सेगावला येऊन खात्री करून घेतात आणि मीरा म्हणजे मिस स्लेडना शंभर रुपये देऊन म्हणतात, 'इथून पुढे आयुष्यभर आपण इथे राहायचं आहे. शंभर रुपयांत कुटी बांध.' आज ज्याला आपण 'बापूची कुटी' म्हणतो, ती त्या वेळची शंभर रुपयांतली झोपडी आहे. गांधीजींच्या अटी आहेत की, 'झोपडीचं बांधकाम साहित्य याच भागातलं असलं पाहिजे. मजूर इथलेच असले पाहिजेत आणि इतक्याच पैशांत ती झोपडी बांधली पाहिजे.' गांधीजींना समजून घ्यायचं म्हणून किती छोट्या छोट्या गोष्टी लोकांनी लिहिल्या आहेत! तर गांधींना समजून घेतल्याशिवाय आंबेडकर समजत नाहीत! तर्कतीर्थ तर अजिबात समजत नाहीत, अशी माझी धारणा आहे.
प्राज्ञ पाठशाळेमध्ये 'अस्पृश्यत्व मीमांसा' नावाचं छोटं संस्कृत पुस्तक मी पाहिलं, त्याचीच ही पार्श्वभूमी आहे. पुणे करारानंतर महात्मा गांधी इथे आले आणि त्यांनी ठरवलं की, मी केवळ आणि केवळ सामाजिक काम करणार. त्याची सुरुवात अस्पृश्यता निर्मूलनाने करणार.
1932-35 मध्ये गांधीजी अत्यंत कर्मठ, सनातनी होते. त्यांनी दोन प्रकारच्या धर्मपंडितांना येरवड्याच्या जेलमध्ये बोलवलं. अत्यंत सनातनी धर्मपंडित आणि अत्यंत पुरोगामी धर्मपंडित. ते सनातन्यांना विचारायचे की, 'आपल्या धर्मामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाला वाव आहे का? आणि त्याची काही प्रमाणं आहेत का?' पुरोगाम्यांना विचारायचे की, 'मला असा पुरावा द्या, जेणेकरून मी अस्पृश्यता निर्मूलन करू शकेल.' त्या दोघांचं ऐकल्यानंतर गांधीजी या निर्णयाला आले की, आपले सगळे पाणवठे जात-धर्म मुक्त झाले पाहिजेत. आपली सगळी मंदिरं जात-धर्म मुक्त झाली पाहिजेत आणि हे अस्पृश्यता निर्मूलनाशिवाय शक्य नाही. आणि त्याला धर्माचा आधार आहे, याची खात्री झाल्यावर 'हरिजन'चा पहिला अंक 11 फेब्रुवारी 1933 ला (माझं स्मरण बरोबर असेल तर) निघाला. तो पहिला अंक तर फारच क्रांतिकारी आहे, एकीकडे बाबासाहेब आंबेडकरांवर लेख आहे. दुसरीकडे पुरोगामी धर्मपंडितांचं 'Pandit's opinion on untouchabil- ity' आहे. त्यात बा.न. राजहंसांचा एक लेख आहे. तो पहिला अंक अस्पृश्यता निर्मूलनाच्या मूलभूत मांडणीचा आहे. त्यात सगळ्या पुरोगामी धर्म पंडितांनी असं सांगितलंय की, 'आपले पाणवठे, आपल्या शिक्षण संस्था, आपला समाज आणि मंदिरं ही सर्वांसाठी खुली झाली पाहिजेत. अस्पृश्यता निर्मूलनासाठी धार्मिक आधार घेऊन काम केलं, तर ते होईल.' त्याचं प्रमाण म्हणजे हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींचा प्रबंध 'अस्पृश्यत्व मीमांसा' (1934) आहे. या प्रबंधामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाच्या धार्मिक आधारांची चर्चा आहे. आपण समग्र तर्कतीर्थमध्ये नुसता हा संस्कृत निबंध देऊन थांबलो नाही, त्याचं मराठी भाषांतर दिले आहे. सर्व सामान्य माणसाला कळालं पाहिजे की, गांधीजींचा आग्रह काय होता.
प्रश्न : तुम्ही समग्र तर्कतीर्थ करायचं ठरवल्यावर त्यासाठी साधनं गोळा करणं, लोकांच्या भेटी गाठी करणं ही प्रक्रिया काय होती?
- ही प्रक्रिया 'सुतावरून स्वर्ग गाठणे' अशी होती. आपल्या महाराष्ट्रीय आणि भारतीय समाजामध्ये जतन साक्षरता नाही आणि संशोधनाची शिस्तही नाही. मी कितीतरी लेखक आणि राजकीय नेत्यांबद्दल असं सांगेन की, त्यांच्या साहित्याची समग्र सूची आपल्याकडे नाही; तर्कतीर्थांचीही नाही. त्यांची प्राथमिक चरित्रे होती, तसेच समकालीन लोकांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये छोटे छोटे नर्मबिंदू होते की, इथे व्याख्यान झालं. मग तो काळ- त्या काळातली वर्तमानपत्रे शोधायची आणि ते भाषण शोधून काढण्याचा प्रयत्न करायचा. असं करत मी सगळे लेख, मुलाखती, भाषणं, प्रबंध, त्यांनी केलेले पोथ्यांचे कॅटलॉग, भारतीय घटनेचं भाषांतर हे सर्व तर मिळवलंच. पण शंभर वर्षांमध्ये तर्कतीर्थांच्या साहित्यावर ज्या ज्या लोकांनी लिहिलं ते मी शोधायला लागलो. सध्या एक वरदान आपल्या सगळ्यांना आहे गुगल, आपण त्याचा नीट वापर करत नाही. अगदी कालचीच गोष्ट सांगतो. काल मी गुगलवर शोधत होतो, डॉ. पा. वा. काणे आणि तर्कतीर्थ. तर माझ्या लक्षात आलं की, 'वैदिक संस्कृतीच्या विकासा'चं संस्कृत भाषांतर आहे. असे सगळे शॉक, ज्याला मी सोशल शॉक म्हणतो किंवा रिसर्च शॉक म्हणू, हे बसत गेले.
तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये जगभर भाषणं केलेली आहेत. ती आपल्याकडे कुठेच नाहीत. विदेशी लोकांनी जो तर्कतीर्थ जपलेला आहे, तसा आपण जपू शकलो नाही. एक उदाहरण सांगतो. साधारणपणे 1972 मध्ये तर्कतीर्थांनी पॅरिसच्या प्राच्य विद्या परिषदेमध्ये एक निबंध लिहिलेला होता. 'The Cosmic state and collective Kingship of Vedic Gods' त्यात सांगितलं होतं की, 'लौकिक जगामध्ये जशी राजाची सत्ता असते, तसा देव सृष्टीमध्येही एक राजा असतो आणि त्याची सत्ता असते.' त्याचा शोध लावून त्यांनी तो निबंध लिहिलेला होता. मी फ्रान्सच्या नॅशनल लायब्ररीला एक मेल लिहिला होता. त्याच दिवशी त्यांचं उत्तर आलं. 'If you are interested, we will serve the essay, speech he has read in oriental congress.' मी दुसऱ्या दिवशी त्यांना 'येस' म्हटलं. तिसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की, 'Do you want it free or with cost?' मी म्हटलं, 'With cost'. त्यावर ते म्हणाले, 'We will take a min- imum cost as you are scholar.' त्यांनी अत्यंत अल्पदरात, झेरॉक्सच्या पैशांमध्ये तो निबंध पाठवला. आपल्याकडे मात्र मी डॉलर्सच्या किंमतीनी संदर्भ मिळवले आहेत. आपल्याकडे संदर्भाकडे 'वारसा' म्हणून पाहिलं जातं, तिथे 'ओपन सोर्स', 'पब्लिक डोमेन' म्हणून पाहिलं जातं. महाराष्ट्राने आणि भारतीय समाजाने केव्हा तरी ज्ञानाकडे 'सामाजिक संपत्ती' अशा उदारमतवादाने बघायला हवं. अशा उदारमतवादामुळे हे साहित्य मी मिळवू शकलो. मी नम्रपणे असं सांगेन, की लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळ्या ग्रंथालयांनी मला हवी ती साधनं पाठवली, पुरवली. मी त्या सर्वांचा ऋणी आहे.
प्रश्न : सगळ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या कुठल्या ग्रंथालयांनी ?
- शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालय, कोल्हापूरचं करवीर नगर वाचन मंदिर, मुंबईचं मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, पुण्याचं नगर वाचन मंदिर, राज्य मराठी ग्रंथालय, बदलापूरचं ग्रंथसखा या सगळ्या ग्रंथालयांनी मला कोरोना काळामध्ये मेलवर साधनं पाठवली आहेत. मी असे मित्र शोधून काढले, ज्यांना माझ्यासारखं वेड आहे. 'रवींद्र घोडराज' नावाचे एक मित्र विश्वकोशात आहेत, त्यांना सांगायचा अवकाश की ते शोधून द्यायचे. बदलापूरला ग्रंथसखा असलेले 'श्याम जोशी' आहेत किंवा ग्रंथालय संचालक 'दत्ता क्षीरसागर', ज्यांना मी नुसतं वर्तमानपत्र सांगावं आणि त्यांनी शोधून द्यावं. हे श्रेय माझं एकट्याचं नसून अशा हजार हातांचं आहे. खरं म्हणजे हा संयुक्त सहयोग प्रकल्प आहे.
प्रश्न : तर्कतीर्थांना जाऊन आता तीन दशके झाली आहेत. त्यांचं सार्वजनिक आयुष्य सत्तर वर्षांचं होतं. त्यांच्या हयातीमध्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतरही हा सगळा ऐवज विखुरलेल्या स्वरूपात गोडाऊनमध्ये पडलेला, वापरात नसलेला असा आहे. हा सगळा जेव्हा वर येत होता, तुम्ही तो नजरेखालून घालत होता, वाचत होता, जुळवणी करत होता; तेव्हा तुम्हाला कितीतरी नवीन शोध लागले असतील, उदा. हे आजच्या काळाशी जास्तच संबंधित आहे. हे सगळं पाहत, वाचत असताना आपला महाराष्ट्र तर्कतीर्थांच्या बाबतीत जरा कृतघ्न आहे, असं काही तुम्हाला वाटलं का ?
- कृतघ्न आहे असं मी म्हणणार नाही, पण समकाल हा नेहमी सनातनी असतो. मी तुम्हाला दोन छोटी उदाहरणं देतो. बाबरी मशीद पाडली गेली, त्या वेळची तर्कतीर्थांची एक मुलाखत आहे. त्यात ते म्हणतात, 'रामजन्मभूमीला आधार नाही.' आत्ता जे रामाचं मंदिर आहे, तिथेच राम जन्माला आला, याला ऐतिहासिक आधार नाही. त्याच दरम्यान मंडल आयोगाबद्दल त्यांचं असं म्हणणं होतं की, 'मंडल आयोग जातीय जाणिवा उदार करत नाही, तर कर्मठ करतो आहे.' इतक्या वर्षांनी पाहतो की, आज आपण धार्मिक व जातीय, जाणिवांच्या कडेलोटावर आपण उभे आहोत, (व्यक्तिगत सांगायचं झालं तर मला जात नाही, धर्म नाही. पण लोक माझीही जात शोधतात याला काय करू या?) म्हणून मला वाटतं तर्कतीर्थांचं समग्र वाङ्गय वर्तमान महाराष्ट्राला आणि भारताला परत एकदा प्रबोधनकाळाकडे (Renais- sance) नेईन. 
प्रश्न : ठीक आहे, तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र कृतघ्न नाही, पण त्यांच्या हयातीतही आणि त्यांच्या मृत्यूनंतर तीस वर्षांनीही ते सर्व विखुरलेल्या स्वरुपात ठेवलंय. मला स्वतःला असं वाटतं की, त्यांचे जे इतर चाहते असतील, त्यांचे अनुयायी असतील किंवा संपादन करणारे महाराष्ट्रातले अन्य विद्वान असतील, संस्था असतील, त्यांनी ते जर केलं असतं; तर याचा अधिक उपयोग झाला असता. दुसरं, मला असंही वाटतं की, ज्या माणसाने विश्वकोश केले, धर्मकोश केले, साहित्य संस्कृती मंडळाच्या मार्फत अनेक महत्त्वाची पुस्तकं आणली, त्या माणसाने स्वतःचं लेखन विखुरलेलं ठेवलं आहे. त्यांनीही स्वतःवर अन्याय केला, हेळसांड केली आणि महाराष्ट्रानेही कृतघ्नपणा दाखवला.
- तर्कतीर्थांच्या अगोदर मी खांडेकरांचा प्रकल्प पूर्ण केला आहे. मला असं लक्षात येतं की, अशा प्रकारची मोठी माणसं स्वतःच्या लेखनाबद्दल निरिच्छ असतात. आज आपण वर्तमानाला 'डॉक्युमेंटेशन एज' म्हणतो.
त्या काळामध्ये अशी प्रगल्भता नव्हती, की आपली कुंडली आपणच तयार करायची, आपलं प्रोफाईल आपणच तयार करायचं, आपलं चरित्र आपणच लिहायचं. आत्मचरित्र लिहिण्याला 'आत्मश्लाघा' हा शब्द आहे. आत्मश्लाघा, आत्मप्रशंसा ही अत्यंत खालच्या दर्जाची गोष्ट आहे, असं मानण्याचा तो काळ होता. त्यामुळे विचारी माणसं स्वतःबद्दल निरिच्छच होती. खांडेकरांची 36 पुस्तकं मी संपादित केली. ही स्थिती केवळ त्यांच्या निरिच्छतेमुळे जशी होती, तशीच त्या काळामध्ये असलेल्या साधनांच्या कमतरतेमुळेही होती. त्यानंतर अनेक ध्येयवादी वर्तमानपत्रं आणि नियतकालिकं अल्पावधीत म्हणजे ज्याला आपण सामाजिक गर्भपात म्हणू, अशी गेली. कितीतरी अंक म्हणजे तर्कतीर्थांनी ज्या ज्या वर्तमानपत्रांमध्ये, साप्ताहिकांमध्ये लिहिलं 'संग्राम', 'प्रमोद', 'चित्रा', 'युगांतर' यांचा एकही अंक मिळत नाही. आपल्याकडे जतन साक्षरता नाही; जी ब्रिटिशांमध्ये, फ्रेंचांमध्ये मला दिसते.
प्रश्न : ही साक्षरता आपल्याकडे सर्वात जास्त जपली, महात्मा गांधींनी. त्यांनी बारीकसारीक चिटोऱ्या, त्याच्यातली माहिती, पत्रं, सर्व जतन केलंय. महात्मा गांधींचा आदर्श त्यांच्यासमोर होताच की. महात्मा गांधींचे शंभर खंड आहेत. त्यात पन्नास हजार पानं आहेत. महात्मा गांधींइतके फोटोग्राफ्सही जगातील एकाही नेत्याचे नसतील. तर्कतीर्थांचे तर स्वतःचे साधे फोटोग्राफ्सही मिळत नाहीयेत.
- आपल्याकडे जतन साक्षरता नाही, हा एक भाग आहे. दुसरं, तर्कतीर्थांच्या बुद्धिमत्तेची एक दहशत महाराष्ट्राने सतत वागवलेली आहे. छोटी छोटी उदाहरण सांगतो. नरहर कुरुंदकरांची, तर्कतीर्थांची, आगरकरांची समीक्षा फार कमी लोकांनी केली. बुद्धिजीवी आणि बुद्धिवादी किंवा बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी लोकांबाबत समीक्षा पुरेशी झाली नाही. म्हणजे आपल्याकडे वैचारिकतेचंच वावडं असल्याचा प्रघात आहे; त्या काळातही आणि आत्ताही. 'ललित म्हणजे साहित्य' अशी जी धारणा आहे, त्यातून हे सांस्कृतिक वैयर्थ निर्माण झालेलं असावं, असं मला वाटतं.
प्रश्न : कुरुंदकरांनी तर असं म्हटलेलंच आहे की, 'माझ्यावर टीका टिप्पणी करायची असेल, माझ्या साहित्याची वा विचारांची समीक्षा करायची असेल, तर तुम्हाला मी ज्या विषयांवर लेखन केलंय, बोललोय, त्यामध्ये अधिक खोलात जावं लागेल.' मग तर्कतीर्थांबाबत, त्यांनी हाताळलेल्या विषयांबाबत, अधिक खोलात जाणारी माणसं महाराष्ट्रात नव्हती. म्हणून ती चिकित्सा झाली नाही, असं म्हणायचं आहे का?
- खोलात गेली नाहीत, याची कारणं अशी की, पन्नास वर्षांपूर्वीचा काळ हा एका अर्थाने प्रखर व्यक्तिपूजेचा काळ होता. आज वर्तमानात आपण कोणावरही टीका करतो. त्या काळामध्ये प्रगल्भ व्यक्तींबद्दल आदराचा एक भाग होता. त्या संकोचापोटी, संस्कारापोटी लोकांनी टीका केली नाही. टीका आहे, पण त्या अत्यंत माफक स्वरूपाच्या आहेत. कठोर टीका तर्कतीर्थांच्या वाट्याला आली असं मला दिसत नाही.
प्रश्न : समग्र वाङ्मय प्रकल्पातील एक खंड 'तर्कतीर्थांची साहित्य समीक्षा' यावर आहे, त्याबद्दल आपण उत्तरार्धात बोलूच. पण पूर्वार्धातील जे शेवटचे काही प्रश्न आहेत, त्यात तर्कतीर्थांनी धर्मकोशाचं, साहित्य संस्कृती मंडळाचं आणि विश्वकोशाचं केलेलं काम, यांची वैशिष्ट्यं तुम्हाला जाणवली?
- तर्कतीर्थांच्या कोश वाङ्ख्याचा प्रारंभ हा प्राज्ञ पाठशाळेमध्ये झाला. तिथे धर्मचिकित्सेच्या संदर्भामध्ये विचार केला गेला. त्या काळामध्ये पां. वा. काणे यांनी जे धर्मशास्त्र लिहिलं इंग्रजीमध्ये आणि नंतर मराठीमध्ये त्याचे दोन खंड आले. धर्मशास्त्रामध्ये असं एक परिमाण आहे की, 'कोणत्याही धर्माचा अभ्यास हा कालानुक्रमे केल्याशिवाय धर्म परिवर्तनाचा अभ्यास करता येत नाही.' त्यामुळे केवलानंद सरस्वतींना असं वाटलं की, धर्मामध्ये 'व्यर्थ आणि ग्राह्य' अशी विभागणी आपल्याला करता आली पाहिजे. जे ग्राह्य आहे आणि पुढच्या काळामध्ये ज्याचं मार्गदर्शन होऊ शकतं, त्याची कालानुक्रमे मांडणी करता आली पाहिजे. धर्मकोश दुसरं-तिसरं काही नसून वैदिक वाङ्गयातील वर्तमानाला उपयुक्त सामग्रीचा कालगत इतिहास आहे. तर्कतीर्थांच्या काळात साधारण वीस भाग तयार झाले, पण त्यामध्ये 'व्यवहार कांड' नावाचा जो खंड आहे; (याचे एकूण तीन भाग आहेत.) त्यामध्ये राज्यशास्त्र, रीतिशास्त्र, रूढीशास्त्र, परंपराशास्त्र यांबद्दल विस्ताराने लिहिलेलं आहे. त्या लोकांची अशी धारणा होती की, हे आपलं प्राचीन वैभव आहे. वैदिक साहित्य म्हणजे 'बीत गई, बात गई' असं नाही.
एक उदाहरण सांगतो, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. त्यावेळी तर्कतीर्थ महाडला उपस्थित होते. मनुस्मृती जाळल्यानंतर तर्कतीर्थांनी मनुस्मृतीची राख एका पुडीमध्ये बांधून घेतली.
प्रश्न : याचा संदर्भ कुठल्या खंडात आहे?
- याचा संदर्भ पत्रसंग्रह खंडातील 'मान्यवरांशी पत्रव्यवहार' या भागात आहे. ते काही दिवसांनी मुंबईला बाबासाहेब आंबेडकरांना वेळ ठरवून भेटायला गेले. हे पत्रव्यवहारामध्ये लिहिलेलंही आहे. ते म्हणाले की, 'तुम्ही मनुस्मृती जाळली, त्याच्याशी मी सहमत आहे. पण मनुस्मृती वाचून व अभ्यासून जाळली असती, तर मी समजू शकलो असतो. कोणत्याही धर्मग्रंथामध्ये सगळंच टाकाऊ आणि निकामी असत नाही. मी सध्या धर्मकोशाचा अभ्यास करत आहे. त्यामुळे मी तुम्हाला असं अधिकाराने सांगेन की, कोणतंही वाङ्गय हे पूर्णपणे टाकाऊ असत नाही. मी ही राख आणलेली आहे.
तुमच्या कपाळाला लावतो.' डॉ. बाबासाहेब आंबेडकर इतके उदारमतवादी होते की, ते म्हणाले 'लावा आणि मला समजावून सांगा.' तर्कतीर्थांनी मनुस्मृतीमध्ये काय ग्राह्य आहे, काय अग्राह्य आहे हे सांगितलं आणि ते त्यांना आवडलं.
प्रश्न : धर्मशास्त्र किंवा धर्मकोश याबद्दलचं कुतूहल निर्माण होण्यासाठी किंवा अधिक वाढण्यासाठी तुम्ही सांगितलेलं आत्ताचं एक उदाहरण पुरेसं आहे. आता आपण विश्वकोशाकडे वळू या. तर्कतीर्थांच्या काळात 15 खंड आलेले आहेत. ते तुम्ही नजरेखालून घातले आहेत, तर 15 खंडांचं जे काम झाले आहे, ते कसं आहे?
- महाराष्ट्र राज्य 1960 मध्ये स्थापन झालं. त्या वेळचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना एका पत्रकाराने मंत्रीमंडळ रचना बघून असा प्रश्न विचारला होता की, 'हे राज्य मराठ्यांचे की मराठीचे?' चव्हाण साहेबांनी एका क्षणाचाही विलंब न लावता सांगितलं, 'हे राज्य मराठीचे आहे!' त्यांनी घोषणा केली की, 'मराठीच्या विकासासाठी हे राज्य सरकार स्वतंत्र भाषा संचालनालय सुरू करेल. भविष्यकाळात मराठी ज्ञानभाषा व्हावी म्हणून प्रयत्न करेन. मराठ्यांचा इतिहास म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास, इतिहासाची साधनं गोळा करून विधिवत पद्धतीने लिहिला जावा, असा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करेल.' या तीनही गोष्टी त्यांनी नंतर केल्या. 'महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळा'ची स्थापना 19 नोव्हेंबर 1960 ला त्यांनी केली आणि त्याची जबाबदारी तर्कतीर्थांवर सोपवली. तर्कतीर्थांनी 1960-62 ला महाराष्ट्राच्या ज्ञानरचनेचा एक आराखडा तयार केला. त्या आराखड्यामध्ये त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या.
मराठी भाषा आणि साहित्य समृद्ध व्हायचं तर आज आपण मराठी 'अभिजात' व्हावी याचा आग्रह धरतो आणि पाठपुरावाही करत आहोत, ही चांगली गोष्ट आहे. पण मराठी अभिजात तेव्हा होते, जेव्हा सगळ्या ज्ञानभाषांचे प्रवाह मराठीमध्ये येतात. तर्कतीर्थांनी त्यासाठी त्यावेळी जे इंग्रजी लिहिणारे स्कॉलर्स होते आणि जे मूळ मराठी भाषिक होते, अशांना सांगितलं की, 'तुम्ही इंग्रजी लिहिता ही चांगली गोष्ट आहे. पण तुम्ही मराठी मातृभाषी आहात, तर तुम्ही ते मराठीत का लिहित नाहीत?' असं म्हणून तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये सगळ्या ज्ञान-विज्ञानाची शास्त्रं मराठीत आणली. त्यामध्ये आयुर्वेद, प्लास्टिक, सिमेंट, भौतिकशास्त्र, संगीतशास्त्र अशी कितीतरी शास्त्रं आहेत. जगातले अभिजात आणि नोबेल मिळालेले ग्रंथ मराठीत आणण्याचा प्रयत्न केला. त्यांची अशी धारणा होती की, मराठी भाषा अभिजात आणि समृद्ध तेव्हाच होईल, जेव्हा विविध ज्ञान-विज्ञानाच्या शाखा मराठीत येतील. 
नंतर 1962 मध्ये त्यांनी मराठी विश्वकोशाचा संकल्प सोडला. त्यांच्यापुढे Encyclopedia of Britannica होता. Britannica च्या दर्जाचा मराठी विश्वकोश तयार झाला पाहिजे. (साधनानेच माझं 'भारतीय भाषा आणि साहित्य' नावाचं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. त्याचा अभ्यास करून मी तुम्हाला सांगेन की, मराठीमध्ये सर्व भाषांचे प्रवाह अजूनही आलेले नाहीत. सर्व भाषांतील श्रेष्ठ रचना आजही आलेल्या नाहीत.) तर्कतीर्थांनी त्या काळामध्ये असं पाहिलं की, मराठीमध्ये संज्ञापन शाखा विकसित झाली पाहिजे. म्हणजे प्रत्येक गोष्टीची व्याख्या झाली पाहिजे आणि त्या व्याख्यांचा विस्तार झाला पाहिजे. म्हणून विश्वकोशामध्ये कोणत्या ज्ञान शाखेला किती पानं द्यायची हे त्यांनी अभ्यास करून लिहिलेलं आहे. Britannica मध्ये ज्या शास्त्रांचा उल्लेखही नाही, अशी अनेक शास्त्रं मराठी विश्वकोशात दिसतात. त्यानंतर त्यांनी असं पाहिलं की, ज्ञान-विज्ञान ही शाखा तंत्रज्ञानापर्यंत आली पाहिजे. माझ्या मते, मराठी विश्वकोश हा वेद ते वेब (Web) असा पट मांडणारा आहे.
मी सांगत होतो की, ज्ञानाकडे आपण किती निरिच्छ पद्धतीने पाहायचो. तर्कतीर्थांनी पदनाम कोश तयार केला. त्या वेळचे मराठीतील आघाडीचे नेते आचार्य प्र. के. अत्रे यांनी एका साहित्य संमेलनामध्ये 'हा पदनाम कोश नसून हा बदनाम कोश आहे' असं सांगितलं.
त्याला तर्कतीर्थांनी तिथेच उत्तर दिलेलं आहे.' पण त्या काळामध्ये वाद-विवाद व्हायचे; वितंडवाद व्हायचे नाहीत. आज आपण वितंडाकडे गेलो आहोत. विचारप्रवाहांच्या ज्या शैली वेदांतामध्ये सांगितल्या आहेत, त्यामध्ये वितंड ही एक वादाची शैली आहे. तर मतभिन्नतेचा स्वीकार करून 'वादे वादे जायते तत्त्वबोधः' ही जी परंपरा आहे, ही तर्कतीर्थांनी विश्वकोशाच्या माध्यमातून विकसित केलेली दिसली.
प्रश्न : आपण धर्मकोशाबद्दल बोललो. विश्वकोशाचे 15 खंड तर्कतीर्थांच्या काळात संपादित झाले आहेत...
- याशिवाय 'मीमांसा कोश'चे 7 खंड आहेत. त्याचे संपादन त्यांचे गुरू स्वामी केवलानंद सरस्वती यांनी सुरू केले होते, पण त्याची निर्मिती तर्कतीर्थांनी केली. मूलभूत ज्ञानशाखेचा विकास, मराठी भाषा आणि साहित्य यांचा ज्ञानमाध्यम म्हणून पाया कुणी घातला असेल तर तो तर्कतीर्थांनी. श्री. व्यं. केतकरांनी, वि.का.राजवाडेंनी त्याची पायाभरणी केली, हे मला मान्य आहे, पण त्याचा विकास मात्र तर्कतीर्थांनीच केलेला आहे.
प्रश्न : ज्ञानाचं संवर्धन असो किंवा विकास असो, त्यासाठी कोश वाङ्गय हे अगदी पायाभूत मानलं जातं. हे सर्व चालू असतानाच साहित्य संस्कृती मंडळाचे ते वीस वर्षं अध्यक्ष होते. (1960-80) या काळात जवळपास 200 पुस्तकं प्रकाशित झाली. त्या पुस्तकांचे विषय त्यांचे लेखक किंवा त्याचे अनुवाद, त्यांच्या तर्कतीर्थांनी लिहिलेल्या प्रस्तावना आणि त्यांचा दर्जा पाहिला, तर त्यात तर्कतीर्थांचं योगदान असणार. तर त्या वीस वर्षांच्या त्यांच्या कालखंडाबद्दल तुम्ही काही अभ्यास केला असेल, तो काय स्वरूपाचा होता आणि त्यातून काय कळलं ?
-त्याचं श्रेय केवळ तर्कतीर्थांना देणं बरोबर होणार नाही. त्यांचे काही समकालीन सहकारी होते. तर्कतीर्थांनी वेगवेगळ्या ज्ञानशाखांसाठी समित्या नेमल्या होत्या. उदाहरणार्थ, आपण फ्रेंच लिटरेचर घेऊ, तर त्यांनी फ्रेंच भाषा जाणणारे तज्ज्ञ एकत्र केले. त्यांना सांगितलं की, 'फ्रेंच भाषेत सर्वोत्कृष्ट काय आहे ते सांगा, आपण ते मराठीत आणू. इंग्रजीतील तज्ज्ञांना सांगितलं की, 'इंग्रजी भाषेत सर्वोत्कृष्ट काय आहे, ते मराठीत आणा.' तसेच इंजिनिअरिंगमधील तज्ज्ञांना सांगितलं, 'सर्वोत्कृष्ट काय आहे, ते सांगा.' विश्वकोश लिहिण्याच्या आधी नोंदींचं शास्त्र तर्कतीर्थांनी विकसित केलेलं आहे. 'विश्वकोश परिचय' नावाचा जो ग्रंथ आहे, तो माझ्या दृष्टीने महाराष्ट्रातला 'स्टायलिस्टीक' वर लिहिला गेलेला पहिला ग्रंथ आहे. त्यापूर्वी आपण स्टायलिस्टीकच्या दृष्टीने विचार केला नव्हता. शास्त्रोक्त पद्धतीने संज्ञापन, शास्त्रोक्त पद्धतीने विषयाची मांडणी. त्याबाबत ते किती काटेकोर होते, हे कळतं. एक शब्द आहे अब्रा का डब्रा. 'पाचशे शब्दांत त्याची नोंद लिहिली जावी. अभियांत्रिकी शास्त्र किमान तीनशे पृष्ठांमध्ये त्याची नोंद व्हावी.' म्हणजे व्याप्ती लक्षात घेऊन तर्कतीर्थांनी पृष्ठांची मांडणी केली आहे. हे माझ्या दृष्टीने ज्ञान व्यवस्थेचं काम आहे. त्याला फार चांगला शब्द आहे इंग्रजीत 'ब्ल्यू प्रिंट', त्याला रा.ग. जाधवांनी 'रचनाकल्प' असा शब्द मराठीत आणलेला आहे. तर्कतीर्थांनी महाराष्ट्राला कितीतरी मराठी शब्द दिले. 'महाराष्ट्राला विश्वकोशाची देणगी कोणती' असं विचाराल, तर 'मराठीला प्रातिभाषिक समृद्धी विश्वकोशाने आणि विश्वकोशाच्या सहकाऱ्यांनी दिली', अशी माझी धारणा आहे.
प्रश्न : साहित्य संस्कृती मंडळाचं जर हे काम पाहिलं, तर योग्य सहकारी निवडणं, त्यांच्यासाठी एक फ्रेम तयार करून देणं, त्यांना सतत प्रेरित करणं हे सगळं उत्तम योजकत्व असल्याशिवाय शक्य नाही. त्यांचं ते काम खूप महत्त्वाचं आहे.
- त्याला आणखी एक जोड आपण दिली पाहिजे. साहित्य संस्कृती मंडळ आणि विश्वकोशाची स्थापना झाली, तेव्हा यशवंतराव चव्हाण साहेबांनी साहित्य संस्कृती मंडळाच्या नागपूर येथील उद्घाटनाच्या भाषणात असं सांगितलं की, 'साहित्य आणि संस्कृती हा राजकारण्यांचा प्रांत नाही. तो केवळ आणि केवळ साहित्यिक आणि विद्वानांचा प्रांत आहे. राज्य सरकार त्यासाठी साधनं पुरवेल. पण त्यात चुकूनही अनवधानाने हस्तक्षेप करणार नाही.' हे स्वातंत्र्य दिल्यामुळे तर्कतीर्थ आणि त्यांचे सहकारी अशा प्रकारची मांडणी करू शकले.
आज आपण इतक्या वर्षांनी त्या मंडळांकडे, त्यांच्या कामांकडे पाहतो, त्यातून आपणास काय अधोरेखित होताना दिसतं? आज महाराष्ट्राला परत एकदा हस्तक्षेपमुक्त ज्ञान व्यवस्थेची गरज आहे.
प्रश्न : यशवंतराव चव्हाणांचा तर्कतीर्थांवर विश्वास होता. ते दोघेही रॉयवादी होते. मित्र होते. नेहमीच्या बैठकीतले होते. यशवंतरावांचं व्यक्तिमत्त्वही अभ्यासू, सुसंस्कृत होतं आणि त्यांचा खंबीर पाठिंबा मिळाला म्हणून तर्कतीर्थ काम करू शकले ही वस्तुस्थिती आहे.
- हे जे मूलतः, 'लीडर मस्ट बी ए गुड रीडर' सूत्र आहे, किंवा 'लीडर ऑफ रीडिंग कपॅसिटी' आहे ते म्हणजे यशवंतराव चव्हाण साहेब. त्यांच्या अधिकृत विदेश दौऱ्यांमध्ये तीन तास पुस्तकालयासाठी दिले जायचे. ते पुस्तकालयांमध्ये पुस्तकं खरेदी करायचे, वाचायचे. मराठीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला की, त्याचा पहिला वाचक ते असायचे. त्याचं एक उदाहरण मी सांगेन. रणजीत देसाईंना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तेव्हा पुरस्कार घेण्यापूर्वी ते चव्हाण साहेबांना भेटायला गेले. साहेबांनी साहित्य पुरस्कृत रचना काढून त्यांच्या हातात दिली, ती अधोरेखित केलेली होती. तेव्हा रणजीत देसाई म्हणाले, 'ज्या देशाला आणि ज्या प्रांताला असा वाचक मुख्यमंत्री, परराष्ट्रमंत्री, अर्थमंत्री मिळतो, तो देश खरा समृद्ध देश !'
प्रश्न : मी असा एक संदर्भ पूर्वी वाचला होता, तो या खंडांमध्ये आहे का किंवा तो तुम्हाला सापडला आहे का किंवा तो खरा आहे का? 1960 च्या दरम्यान यशवंतरावांनी तर्कतीर्थांच्या समोर असा एक प्रस्ताव ठेवला होता की, 'तुम्ही एक तर राज्यसभेवर तरी या किंवा विश्वकोश व साहित्य मंडळाचं हे काम तरी घ्या.' त्यांनी राज्यसभेच्या ऐवजी हे काम हाती घेतलं. हा संदर्भ बरोबर आहे का?
- बरोबर आहे. खरं म्हणजे त्यांना चॉईसच होता की, तुम्ही राज्यसभेवर जाता का महाराष्ट्रात राहता? ते म्हणाले, 'मी दिल्लीला जाऊन काय करू? माझं नातं मराठीशी आहे.' त्यांना मंत्रीमंडळात येण्याचीही ऑफर होती. 
प्रश्न : ते राज्यपालही होऊ शकले असते, कदाचित राष्ट्रपतीच्या ठिकाणीही जाऊ शकले असते.
- नेहरूंच्या काळात, यशवंतरावांच्या काळात साहित्य अकादमीचे पहिले सचिव 'प्रभाकर माचवे' होते. त्यांची निवड नेहरूंनी तर्कतीर्थांसारखीच केलेली आहे. साहित्य अकादमीची स्थापना ही नोबेल अकॅडमीच्या पद्धतीने व्हावी असं नेहरूंना वाटायचं. म्हणून ते सर्व भारतीय भाषांची जाण असणारी व्यक्ती पाहत होते. त्यांना अनेक लोकांनी सांगितलं की, 'वर्तमानात एक-दोन व्यक्ती सर्व भारतीय भाषांची जाण असणाऱ्या आहेत.' तशी उच्चार आणि व्यक्तक्षमता विनोबांकडे आहे. पण साहित्य आणि समीक्षा क्षमता एकाच व्यक्तीकडे आहे, प्रभाकर माचवे. नेहरूंनी त्यांना विनंती केली, 'मी अशी एक संस्था स्थापतो, त्याचे तुम्ही सचिव व्हाल का?' तर ते म्हणाले, 'व्हाल का, असं विचारता आहात हा माझा गौरव आहे. मी आयुष्यभर हे काम करेन.' आणि आयुष्यभर त्यांनी भारतीय भाषांच्या समन्वयाचं काम केलं. आज तुम्हाला साहित्य अकादमीची जी विश्वासार्हता, साहित्य संस्कृती मंडळाचं जे पावित्र्य आहे, ते पायाभूत कार्य त्या अध्यक्ष आणि सचिवांनी केले. साहित्य संस्कृती मंडळाचे एके काळी सचिव होते - सेतू माधवराव पगडी अशी मोठी माणसं या संस्थांना मिळाली.
प्रश्न : नेहरूंचा सगळा कालखंड आणि पुढची काही वर्षे म्हणजे 1960 ते 1980. त्यात जर तर्कतीर्थांनी विश्वकोश, वाई हे आपलं कार्यक्षेत्र न ठरवता, राज्यसभेवर जायचं ठरवलं असतं तर? त्यावेळी सर्वपल्लींपासून ते झाकीर हुसेनांच्यापर्यंतचे अनेक स्कॉलर्स पाहता - तर्कतीर्थांनी जर राज्यसभा निवडली असती, तर कदाचित लवकरच मंत्रीमंडळ, राज्यपाल, उपराष्ट्रपती, कदाचित राष्ट्रपती या दिशेने त्यांचा प्रवास होऊ शकला असता...
- हो, राजेंद्र प्रसादांचे आणि तर्कतीर्थांचे जवळचे संबंध होते. महात्मा गांधीजींचे आणि त्यांचे इतके जवळचे संबंध होते की, महात्मा गांधीजींच्या मुलाच्या लग्नाचं पौरोहित्य त्यांनी केलंय. इतकं असताना हा मनुष्य राजकारणाकडे साधन म्हणून पाहत नाही. राजकारणाला परिवर्तनाचं माध्यम मानतो. एक गोष्ट आपण दुरुस्त केली पाहिजे की, तर्कतीर्थांनी ज्ञानक्षेत्र निवडलं; पण राजकीय संन्यास नाही घेतला. वेळोवेळी प्रत्येक प्रश्नावर त्यांनी राजकीय मतं व्यक्त केलेली आहेत.
म्हणजे 'Let us come to be differ.' 'मतभिन्नतेसह आपण एकत्र येऊ आणि काम करू,' ही जी वैचारिक प्रगल्भता त्यावेळी राजकारणामध्ये होती, त्याचं पुनरुज्जीवन आज परत होण्याची गरज आहे.
प्रश्न : शेवटच्या प्रश्नाच्या उत्तरातून एक प्रोव्होकेटिव्ह मुद्दा असा पुढे येऊ शकतो की, महाराष्ट्रातील अशा व्यक्ती ज्या राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती झाल्या नाहीत, त्यामध्ये तर्कतीर्थ हे नाव आहे असं जर आपण म्हटलं, तर कुणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. असे हे तर्कतीर्थ, सुरुवातीच्या काळात त्यांचे गुरू होते केवलानंद सरस्वती. त्यानंतर त्यांच्यावरचा प्रभाव एका बाजूला मार्क्स, दुसऱ्या बाजूला गांधी आणि पुढच्या काळामध्ये रॉय. तर या चार व्यक्तींचा असलेला प्रभाव आणि स्वतःचं व्यक्तिमत्त्व, यातून आकाराला आलेले लक्ष्मणशास्त्री जोशी. आता तुम्हाला कसे दिसतात?
- मला असं वाटतं की, तर्कतीर्थांचे सहाध्यायी जसे विनोबा होते, तसे श्री. शं. नवरेही होते. ज्या नवऱ्यांनी अनेक वर्तमानपत्रांचं संपादनही केलं आणि मुंबईला श्रद्धानंद महिलाश्रमाचे ते अनेक वर्षे सचिवही होते. त्या काळची सगळी विद्वान मंडळी ही कर्मशील होती. त्या काळचा कोणताही प्रबोधक हा वाचावीर नव्हता; कृतिवीर होता, असं या सगळ्यांचं चरित्र अभ्यासताना तुमच्या लक्षात येईल. मला स्वतःला तर्कतीर्थांबद्दल असं वाटतं की, ते प्रासंगिक रॉयवादी होते, वेदांती होते, गांधीवादी होते, काँग्रेसी होते, मार्क्सवादी होते; पण सर्व काळात ते स्वतंत्र होते. म्हणजे त्यांचे मार्क्सवादाशी मतभेद होते. गांधीवादाशी मतभेद होते. ते प्रकटपणे आपले मतभेद त्या त्या व्यक्तींसमोर व्यक्त करायचे. म्हणून मी मघाशी म्हटलं की, 'Let us come to- gether to be a differ.' मतभेदासह एकमेकांना स्वीकारणं आणि एकमेकांच्या मताचा आदर करुन नव्या उदारमतवादी विचारांकडे जाणं हा तर्कतीर्थांच्या विचारांचा खरा प्रवाह आहे.
प्रश्न : त्यांनी स्वतःचं वर्णन 'परिवर्तनवादी शास्त्री' असंच केलेलं आहे, ते तुमच्या खंडामध्ये आलेलं आहे. तुमच्या मुलाखतीचा हा जो पूर्वार्ध आहे, त्यात शेवटचा प्रश्न मला असा विचारायचा आहे की, पाच वर्षे तुम्ही तर्कतीर्थांच्या वाङ्गयामध्ये अनेक वेळा बुड्या घेतलेल्या आहेत. अनेकदा तुम्ही चकित भयचकित झाला असाल, थक्क होऊन गेला असाल. तर पाच वर्षांपूर्वीचे सुनीलकुमार लवटे, जे सत्तरीच्या उंबरठ्यावर होते आणि आता पाच वर्षांनंतरचे पंचाहत्तरीतले सुनिलकुमार लवटे यांच्यामध्ये काय बदल झाला?
- या प्रकल्पातील एका खंडाच्या प्रस्तावनेचं शीर्षक आहे, 'भयचकित नमावे तुजला...' मी नगण्य झालो, मला माझ्या अज्ञानाची जाणीव झाली. तर्कतीर्थांनीच एका लेखात लिहून ठेवलेलं आहे की, 'आपण ज्ञानसत्तावादी, ज्ञानतपस्वी वगैरे म्हणतो, पण असे काही असत नाही. मुळात ज्याला तुम्ही ज्ञानसमाज आणि ज्ञानसाम्राज्य म्हणता, ते वास्तव ज्ञानसाम्राज्याचा एक शतांश हिस्साही नाहीत.' त्यासाठी त्यांनी दाखला दिलेला आहे, 'मी जगातले सगळे कोश वाचलेले आहेत. ते वाचत असताना एकदा एक कोश माझ्या हातात आला आणि माझा सगळा अहंकार दूर झाला. त्या कोशाचं नाव होतं, Encyclopedia of igno- rance अज्ञाताचा विश्वकोश.' त्या अज्ञाताच्या विश्वकोशामध्ये जगातल्या पन्नास शास्त्रज्ञांनी पन्नास विद्या शाखांमधील लेख लिहिले आहेत. आपापल्या विद्या शाखेत माणसाला काय काय माहीत नाही याची जंत्री त्यात दिलेली आहे. उदा., झोपेबद्दल त्यात एक निबंध आहे आणि असं सांगितलंय की, मानसशास्त्राला अजून झोपेची उकल झालेली नाही. आणि पुढे असं लिहिलंय, 'मनुष्य ज्ञानाचा जो अहंकार बाळगतो, तो सगळा अहंकार त्याच्या अज्ञानानेच निर्माण झालेला आहे. तो दूर व्हायचा असेल, तर उर्वरित अज्ञानाचं साम्राज्य प्रकाशात आलं पाहिजे.' माझा प्रयत्न हा एका अज्ञानी साम्राज्यात प्रकाश पाडण्याची एक छोटी कृती आहे.'
संवादक : विनोद शिरसाठ
शब्दांकन : प्राजक्ता धुमाळ
—
हा सुनीलकुमार लवटे यांच्या दीर्घ मुलाखतीचा पूर्वार्ध आहे. या मुलाखतीमध्ये तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी कोण होते आणि त्यांच्या समग्र वाङ्ख्याचं संपादन करताना काय अडचणी आल्या, कोणते बोध झाले, कोणते शोध लागले, याबद्दल अगदी हिमनगाचं टोक म्हणावं, इतकंच आलं आहे. प्रत्यक्षात या अठरा खंडांमध्ये काय काय आहे, ते उत्तरार्धात येईल....
या मुलाखतीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक
वर्गणी..
चौकशी
देणगी
अभिप्राय
जाहिरात
प्रतिक्रिया द्या