डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

कार्ल मार्क्स आणि आपला काळ

अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, ईस्टर डफ्लो, थॉमस पिकेटी, टोनी ॲटकिन्सन यापैकी कुणीही मार्क्सवादी वा समाजवादी नाहीत. विषमता आणि गरिबी यामुळे समाज नासून जातो, त्यामुळे विषमता अधिकाधिक कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्रज्ञ उपाययोजना सुचवत आहेत. कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक महामारी आणि पर्यावरणाचं संकट यामुळे भविष्यात या समस्या आपला पिच्छा पुरवणार आहेत. अर्थव्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. रोजगार, आरोग्य आणि शिक्षण हे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, असं या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना आता आकार घेऊ लागली आहे.

कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेल्या जागतिक महामारीच्या काळात कार्ल मार्क्सच्या विचारधनाबद्दल संपूर्ण जगात कुतूहल आणि जिज्ञासा निर्माण झाली आहे. कारण औद्योगिक दृष्ट्या प्रगत देशांमध्ये सर्वाधिक गरिबी आहे, संपत्तीचं केंद्रीकरण मूठभरांच्या हाती झालं आहे- हे अनेक अभ्यासकांनी दाखवून दिलं आहे. गरिबीचं निर्मूलन कसं करता येईल आणि आर्थिक सामाजिक विषमता कमी कशी करता येईल, हा एकविसाव्या शतकातील जागतिक प्रश्न बनला आहे.

अभिजीत बॅनर्जी आणि ईस्टर डफ्लो यांना नोबेल पुरस्कार जाहीर होण्याच्या आधीपासून अनेक अर्थशास्त्रज्ञ या विषयाकडे लक्ष वेधत आहेत. ‘कॅपिटल इन द ट्वेंटीएथ सेंच्युरी’ या गाजलेल्या ग्रंथात थॉमस पिकेटी या फ्रेंच अर्थतज्ज्ञाने गेल्या अडीचशे वर्षांतील संपत्तीच्या केंद्रीकरणाचा आणि विषम वाटपाचा लेखाजोखा मांडला.  हा ग्रंथ 2013 मध्ये प्रसिद्ध झाला. औद्योगिक दृष्ट्या विकसित देशांमधील भांडवलाचा परतावा त्या देशांमधील आर्थिक विकासापेक्षा सातत्याने अधिक राहिला आहे. त्यामुळे भविष्यात पराकोटीची आर्थिक विषमता निर्माण होईल, असा दावा या अर्थतज्ज्ञाने आपल्या ग्रंथात केला. संपत्तीवर जागतिक कर लावून न्याय्य वाटप करण्याचा उपाय त्याने सुचवला. थॉमस पिकेटीचा दुसरा ग्रंथ ‘कॅपिटल अँण्ड आयडिऑलॉजी’ 2020 मध्ये प्रकाशित झाला. विविध समाजांतील आर्थिक विषमतेचा ऐतिहासिक आढावा या ग्रंथात घेण्यात आला आहे.

अँथनी बार्न्स वा टोनी ॲटिक्सन ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञाने गरिबी आणि विषमता या विषयावर सुमारे चार दशकं संशोधन केलं. जागतिक बँकेच्या कमिशन ऑन ग्लोबल पॉवर्टीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 2013 ते 2016 या काळात कार्य केलं. या कमिशनवर अमर्त्य सेन यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. गरिबीचं मोजमाप कसं करायचं आणि दारिद्र्यनिर्मूलनासाठी कोणती उपाययोजना करावी, या संबंधातील आंतरराष्ट्रीय संस्थांना शिफारसी  करण्यासाठी या कमिशनची स्थापना झाली होती. ‘मेझरिंग पॉवर्टी अराऊंड द वर्ल्ड’ हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या निधनानंतर मे 2019 मध्ये प्रकाशित झाला.

अमर्त्य सेन, अभिजीत बॅनर्जी, ईस्टर डफ्लो, थॉमस पिकेटी, टोनी ॲटकिन्सन यापैकी कुणीही मार्क्सवादी वा समाजवादी नाहीत. विषमता आणि गरिबी यामुळे समाज नासून जातो, त्यामुळे विषमता अधिकाधिक कमी करण्यासाठी हे अर्थशास्त्रज्ञ उपाययोजना सुचवत आहेत. कोव्हिड 19 या विषाणूमुळे निर्माण झालेली जागतिक महामारी आणि पर्यावरणाचं संकट यामुळे भविष्यात या समस्या आपला पिच्छा पुरवणार आहेत. अर्थव्यवस्थेचा नव्याने विचार करावा लागणार आहे. रोजगार, आरोग्य आणि शिक्षण हे प्राधान्यक्रम ठरवावे लागतील, असं या अर्थशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या अर्थशास्त्रज्ञांच्या प्रभावामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कम ही संकल्पना आता आकार घेऊ लागली आहे.

या संदर्भात कार्ल मार्क्सच्या विचारधनाचा आढावा आपण घेणार आहोत. कारण भांडवलशाही अर्थव्यवस्थेचं मूलगामी विश्लेषण मार्क्सने केलं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. भांडवलशाही अर्थव्यवस्था केवळ एका देशात नसते, तर ती जागतिक असते आणि त्यावरचं उत्तरही जागतिकच आहे, याकडे सर्वप्रथम मार्क्सने लक्ष वेधलं होतं, तेही 19 व्या शतकात. ‘जगातील कामगारांनो -एक व्हा’ अशी घोषणा कम्युनिस्ट मॅनिफेस्टोने दिली होती.

जर्मनीतील ट्रियर या शहरात 1818 मध्ये कार्ल मार्क्सचा जन्म झाला. त्याचे वडील वकील होते, परंतु ज्यू धर्मीयांना वकिली करण्यास मनाई असल्यने मार्क्सच्या जन्मानंतर त्याच्या वडिलांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.

व्यवसायाच्या निवडीविषयी एका तरुणाचे हृद्‌गत (रिफ्लेक्शन्स ऑफ अ यंग मॅन ऑन चूझिंग अ प्रोफेशन) या शीर्षकाचा निबंध कार्ल मार्क्सने वयाच्या 17 व्या वर्षी (1835) लिहिला. त्यात तो म्हणतो- व्यवसाय निवडताना आपण इतरांच्या हाताखालचा एक सांगकाम्या होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या पसंतीच्या क्षेत्रात राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवाय ज्यात लोकसेवा करता येईल, असे क्षेत्र मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. कवी वा विद्वान म्हणून एखाद्याला कितीही कीर्ती मिळो, लोकसेवेविना तो कधीही थोर ठरणार नाही. आपल्या बांधवांच्या सुखाकरता आपण झटलो नाही, तर आपले जीवन सार्थकी लागले असे होत नाही.

वयाच्या 17 व्या वर्षी लिहिलेल्या निबंधातील प्रत्येक शब्दाशी मार्क्स पुढील आयुष्यात प्रामाणिक राहिला.

त्याने बॉन विद्यापीठात 1835 मध्ये प्रवेश घेतला. तिथे तो वर्षभरच होता. या काळात दारू पिऊन दंगामस्ती केली. भरपूर कर्ज केलं. द्वंद्वयुद्धात डोळ्याजवळ जखम करून घेतली. वडिलांनी त्याला बर्लिन विद्यापीठात दाखल केलं.

सागराच्या तळाशी बुडी मारून सुंदर व चमकदार मोती सूर्यप्रकाशात आणावेत, अशी महत्त्वाकांक्षा मी बाळगली आहे- असं त्याने वडिलांना लिहिलेल्या पत्रात (नोव्हेंबर 1837) म्हटलं. या काळात कम्युनिस्ट विचारधारेकडे मार्क्स ओढला गेला होता. जर्मनीत एका वर्तमानपत्राचा संपादक म्हणून त्याने काम केलं. परंतु त्याच्या विद्रोही पत्रकारितेमुळे त्याला जर्मनीचा त्याग करून फ्रान्समध्ये आश्रय घ्यावा लागला. तिथेही त्याने एक वर्तमानपत्र सुरू केलं, मात्र तिथूनही स्थलांतर करणं त्याला भाग पडलं. त्याने इंग्लडला आश्रय घेतला.

त्याने आणि फ्रेडरिक एंगल्सने कम्युनिस्ट जाहीरनामा 1848 मध्ये प्रसिद्ध केला. त्यानंतर जगाचे दोन भाग झाले- मार्क्सवादी आणि मार्क्सविरोधी. 1867 ते 1883 या काळात ‘दास कॅपिटल- क्रिटिक ऑफ पोलिटिकल इकॉनॉमी’ हा ग्रंथ टप्प्याटप्प्याने प्रसिद्ध झाला.तारुण्याचा काळ सोडला, तर विवाहानंतर कार्ल मार्क्सचं आयुष्य दारिद्र्यांत परंतु अखंड अभ्यासात गेलं.

औद्योगिक क्रांती ही एक प्रक्रिया होती. अठराव्या शतकातील ब्रिटनमध्ये ती परमोत्कर्षाला पोचली. जेम्स हारग्रीव्हजने  1764 मध्य स्पिनिंग जेनी बनवली, त्यामुळे पूर्वीपेक्षा आठपट सूत निघू लागलं. 1773 मध्ये उडत्या धोट्याचा शोध लावण्यात आला, तर 1785 मध्ये यंत्रमाग बनवण्यात आला.  कापसातील सरकी काढणारं कॉटन जीन हे यंत्र 1793 मध्ये बनवण्यात आलं. अन्य उद्योगांतही याच काळात नवनवीन शोध लावण्यात आले. बर्मिंगहॅममध्ये कारागिरांनी धातुवस्तूंच्या निर्मितीचा उत्पादन खर्च कमी केला. लोखंड गाळण्याच्या कामी लाकडाऐवजी दगडी कोळशाचा उपयोग करण्यात येऊ लागला. परिणामी, पोलाद स्वस्त झालं आणि पोलाद कारखान्यांची कार्यक्षमता वाढली. बाष्पशक्तीने औद्योगिक क्रांतीस चालना दिली. त्यापूर्वी पाणी व वारा यांच्या शक्तीवर बहुतेक यंत्रे  चालत होती. बाष्पशक्तीवरील विविध स्वयंचलित यंत्रं विकसित करण्यात आली. कच्च्या आणि पक्क्या मालाची वेगाने वाहतूक करण्यासाठी रेल्वे आणि आगबोटी सुरू झाल्या. बाष्पशक्ती ही औद्योगिक क्रांतीचं प्रतीक बनली.

उत्पादनतंत्रात आमूलाग्र परिवर्तन झालं. साधी अवजारं, स्नायुशक्ती आणि मानवी कौशल्य यांच्या योगे घरोघर होणारं उत्पादन ही मध्ययुगीन पद्धत होती. आता कारखान्यांमध्ये आणि कापडगिरण्यांत केंद्रीय पद्धतीने उत्पादन  होऊ लागलं. त्यासाठी मजुरांची गरज होती. ती गरज पूर्ण करण्यासाठी जमीनदारीचे कायदे रद्द करावे लागले. त्यामुळे शेतीवर काम करणारे भूदास कारखान्यांमध्ये मजूर म्हणून काम करू लागले. इंग्लडमधील औद्योगिक क्रांतीचे लोण अल्पावधीत जर्मनी, फ्रान्स, अमेरिका, जपान या देशांमध्ये पसरले. युरोपमध्ये शहरीकरणाने गती घेतली. भूदास म्हणजे वेठबिगार - ते भूस्वामींच्या शेतावर राबायचे. त्यांच्या वेतनाबाबत कोणताही करार नव्हता. ही सरंजामशाही व्यवस्था कोलमडून पडली. कामगार आणि कारखान्यांचे मालक यांच्यामध्ये मजुरी वा वेतनाबाबत करार व्हायचा. कामगार अल्प उत्पन्नावर राबायचे. बालकामगार मोठ्या प्रमाणावर होते. औद्योगिक क्रांतीनंतर संपत्तीच्या निर्मितीत अभूतपूर्व वाढ झाली, तिच्या निर्मितीचा वेगही वाढला. विषमता आणि दारिद्र्यातही पराकोटीची वाढ झाली. कामगारांच्या वस्त्या बकाल होत्या. त्यांचे कामाचे तास निश्चित नव्हते. त्यांना आरोग्यसेवा मिळत नव्हती. ह्याचं चित्रण चार्ल्स डिकन्सच्या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला पाह्यला मिळतं. ‘कंडिशन्स ऑफ वर्किंग क्लास इन ग्रेट ब्रिटन’ या ग्रंथात फ्रेडरिक एंगल्सने त्याचा तपशीलवार आढावा घेतला आहे.

सरंजामशाही कोसळून एक नवा समाज निर्माण होत होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान एका नव्या समाजरचनेला जन्म देत होतं. या नव्या समाजाची व्यवस्था लावण्यासाठी तत्त्वज्ञान, अर्थशास्त्रासह अन्य सामाजिक शास्त्रं पुढे सरसावली. ॲडम स्मिथ या उद्योजकाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेची मांडणी केली. त्यानंतर रिकार्डो आणि अन्य अर्थशास्त्रज्ञांनी त्यामध्ये भर घातली. नफा कुठून होतो, या प्रश्नाचा वैज्ञानिक छडा लावण्याचा प्रयत्न मार्क्सने केला. त्यासाठी ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांच्या योगदानावर त्याने आपला सिद्धांत बेतला.

भांडवलशाहीत पैसा हे केवळ चलन वा विनिमयाचं साधन नसतं. पैशाचा उपयोग भांडवल म्हणून केला जातो, म्हणजे भांडवलाचा उपयोग करून तुम्ही एका वस्तूचं रूपांतर दुसऱ्या वस्तूत करता. ॲडम स्मिथने यासंबंधात दोन घटक निश्चित केले. पहिला घटक होता यूज व्हॅल्यूचा आणि दुसरा घटक होता एक्सचेंज व्हॅल्यूचा. उत्पादित वस्तू ग्राहकाला किती सुख देते वा त्याच्यासाठी किती मूल्य निर्माण करते, याला म्हणायचं यूज व्हॅल्यू. एक्सचेंज व्हॅल्यू म्हणजे सदर वस्तू आपल्या उत्पादनासाठी किती श्रम विकत घेऊ शकते. या दोन घटकांच्या आधारे वस्तूची किंमत ठरते, असं ॲडम स्मिथने मांडलं.

एखाद्या वस्तूचं उत्पादन करायला लागणारे श्रम निश्चित असतील तर वस्तूची किंमत वेगवेगळी का असते, या प्रश्नाचं उत्तर स्मिथच्या सिद्धांतात नव्हतं. वस्तूच्या उत्पादनात इतरही अनेक घटकांचं योगदान असतं. उदाहरणार्थ : जमीन, भांडवल, इत्यादी. या प्रश्नांची उत्तरं देताना रिकार्डोने म्हटलं की, भूतकाळातील श्रमांतूनच भांडवलाची निर्मिती होते. हा धागा पकडून मार्क्सने ठासून मांडलं की, भूतकाळातल्या श्रमांवर म्हणजे श्रमांतून निर्माण झालेल्या भांडवलावर आजचे भांडवलदार मालकी स्थापित करतात. पैसे देऊन तुम्ही कच्चा माल खरेदी करता त्या वेळी पैशाची वा चलनाची भूमिका विनिमयाचं साधन नसून भांडवल ही आहे. भांडवल गुंतवणूक करून कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात केलं जातं. हा पक्का माल अधिक किमतीला विकला जातो. त्या उत्पादित वस्तूवर भांडवलाद्वारे पुन्हा प्रक्रिया करून त्यापेक्षा अधिक किमतीला नवी वस्तू विकता, अशी साखळी तयार होते. इथे मार्क्स दोन प्रश्न उपस्थित करतो. पहिला श्रमशक्ती विकत घेतली जाते, तर कच्च्या मालापेक्षा ती वेगळी का? आणि दुसरा-वस्तूच्या उत्पादनासाठी किती श्रमशक्ती लागली यावर वस्तूची किंमत ठरत असेल, तर उत्पादित वस्तूच्या किमतीपेक्षा श्रमाचं मूल्य कमी का... ?

हे प्रश्न उपस्थित करून मार्क्स सांगतो की, कामगाराचं वेतन निश्चित करताना त्याला जगण्यासाठी जेवढं कमीत कमी वेतन गरजेचं आहे, तेवढंच भांडवलदार त्याला देतो याचा अर्थ असा की- कामगार आठ तास काम करत असेल, तर त्यातल्या चार तासांच्या श्रमांतून तो जगण्यासाठी आवश्यक असणारे पैसे कमावतो. मात्र उरलेल्या चार तासांत तो जे काम करतो, त्यातून निर्माण होणारं मूल्य भांडवलदाराच्या खिशात जातं. याला मार्क्स सरप्लस व्हॅल्यू वा वरकड मूल्य म्हणतो. हाच भांडवलदाराचा नफा असतो. नफा म्हणजे शोषणाचं गोंडस रूप आहे.

चार तास काम करून कामगार जगण्यासाठी आवश्यक पैसे कमवत असेल, तर तो भांडवलदाराकडे का नोकरी करतो...? त्याचं उत्तर देताना मार्क्स सांगतो की- उत्पादन -साधनांद्वारेच चार तास श्रम करून जगण्याएवढे पैसे तो कमवू शकतो आणि उत्पादनसाधनांवर भांडवलदाराची मालकी असते. उत्पादनाची ही साधनं भूतकाळात केलेल्या श्रमांमधून तयार झालेली आहेत, म्हणजे वस्तुतः ती श्रमिकांच्याच मालकीची आहेत, असं स्पष्टीकरण मार्क्स देतो.

साहजिकच भांडवलदाराचा प्रयत्न असा असतो की -उत्पादनसाधनांमध्ये अधिकाधिक सुधारणा कराव्यात आणि उत्पादनाचा वेग व कार्यक्षमता वाढवावी, जेणेकरून कामगारांची संख्या व मजुरी कमी करता येईल. या कारणामुळे भांडवलदारी व्यवस्थेत भांडवलदार अधिक श्रीमंत होतात आणि गरीब अधिक गरीब होतात. त्यामुळे वर्गसंघर्ष अटळ ठरतो. भांडवलदार कितीही दयाळू असला वा कामगार कितीही कनवाळू असले, तरीही हा संघर्ष टाळता येत नाही. कारण भांडवली अर्थव्यवस्थेतील हा अंगभूत विरोध आहे. या वर्गसंघर्षातून भांडवली व्यवस्था कोसळून पडेल आणि उत्पादनसाधनांवर कामगारांची मालकी प्रस्थापित होईल की, असं भाकीत मार्क्सने केलं.

प्रत्यक्षात असं घडलं नाही. अभिजात ब्रिटिश अर्थशास्त्रावर मार्क्सने अतिरिक्त मूल्याचा सिद्धांत रचला, तर मार्क्सच्या सिद्धांताला सामावून घेणारी भांडवलशाहीची मांडणी जॉन मेनार्ड केन्स या अर्थतज्ज्ञाने केली. गरिबांच्या हाती पैसे दिल्याशिवाय बाजारातील वस्तूंचा उठाव होणार नाही, त्यासाठी सरकारने पुढाकार घ्यावा. गरिबांना रोजगार देण्यासाठी कामं काढावीत. सरकारने हा पैसा अर्थातच श्रीमंतांवर कर लावून गोळा करावा, अशी मांडणी केन्सने केली.

मार्क्सला अभिप्रेत असलेलं औद्योगीकरण संपूर्ण जगात झालं नाही. कारण उत्पादन एवढं प्रचंड होतं की आशिया, आफ्रिका, दक्षिण अमेरिका या  खंडांतील अनेक देशांमध्ये अमेरिका वा पश्चिम युरोप वा जपानसारखं औद्योगिकीकरण होण्याची शक्यताच नाही. चीन हा जगाचा कारखाना समजला जातो. चीनलाही नेमका हाच प्रश्न भेडसावतो आहे. मार्क्सच्या काळातील अवजड उद्योगांवर आधारित भांडवलशाही सध्या नाही. मार्क्सच्या भाकिताप्रमाणे भांडवलशाहीचा परमोत्कर्ष झालेल्या देशांत क्रांती झाली नाही. रशिया, चीन यांसारख्या मागास राष्ट्रांमध्ये क्रांत्या झाल्या, कारण मार्क्सच्या समग्र मांडणीचं आवाहन नैतिकतेला आहे. मार्क्सच्या मांडणीतील नैतिकता पुढील कल्पनांमधून स्पष्ट होते.

परात्मभाव

उत्पादक श्रम केवळ माणूसच करतो. या श्रमांमध्ये तो आपलं व्यक्तिमत्त्व ओततो आणि एक वस्तू तयार करतो. उदाहरणार्थ - एखादा कुंभार एक मडकं घडवतो, त्या वेळी तो त्या श्रमात तल्लीन झालेला असतो. सुडौल मडकं घडवल्याबद्दल त्याला मिळणारा मोबदला कितीही कमी वा अधिक असला, तरीही ते मडकं घडवण्याच्या श्रमात त्याला आनंद मिळतो. त्याला स्वतःच्या सामर्थ्याची अनुभूती मिळते. आधुनिक कारखान्यातील श्रम तसे नसतात. हे श्रम तुम्हाला कोणतंही समाधान देत नाहीत. कारण तुमच्या श्रमातून एक संपूर्ण वस्तू निर्माण होत नाही. एका वस्तूचा छोटासा भागच तुम्ही तयार करता वा त्याच्या निर्मितीत तुमचा सहभाग असतो. तुम्ही तुमच्या श्रमापासून दुरावता. म्हणजे तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्त्वापासून- अर्थात स्वतःपासून दुरावता. कारण आधुनिक कारखान्यात होणारं उत्पादन विशेषीकरणातून सिद्ध होतं. ‘मॉडर्न टाइम्स’ या चित्रपटातील दृश्यं आठवतात का...? त्यामध्ये याचं प्रत्ययकारी चित्रण चार्ली चॅप्लिनने केलं आहे.

या दुराव्याला इंग्रजी भाषेतला शब्द आहे एलिनिएशन, तर मार्क्सने वापरलेला जर्मन शब्द आहे एन्फ्रेमडुंग. आपण कोण आहोत आणि कोणतं काम करत आहोत, असा प्रश्न कुंभाराला पडत नाही; पण आधुनिक काळातील कामगाराला हा अस्तित्वाचा प्रश्न सतत छळत असतो.

असुरक्षितता

कुंभाराला पैसे कमी मिळत असतील, त्याचा उदरनिर्वाह कसाबसा होत असेल; पण आपल्याला या समाजात स्थान आहे, ही भावना त्याच्या जगण्याचा आधार असते. आधुनिक श्रमिकाला तो आधार नसतो. समाजाला आपली गरज आहे, ही अनुभूती त्याला मिळू शकत नाही. त्याला कामावरून केव्हाही कमी केलं जाऊ शकतं. नफा कमी झाला, नवं तंत्रज्ञान आलं, बाजारपेठेतली मागणी घटली- अशी कोणतीही कारणं असू शकतात. आपल्यापैकी कुणालाही आपण समाजासाठी काहीही योगदान करत नाही, ही भावना अस्वस्थ करणारी असते. आपण जिथे श्रम करतो, ज्या वस्तूंच्या उत्पादनात सहभागी होतो, ती यंत्रणा आपल्याला कधीही फेकून देऊ शकते; ही भावना आणि अनुभव कोणत्याही व्यक्तीला हादरा देणारा असतो. मुंबईतील गिरणी कामगार असोत की एमटीएनएलमधील कामगार-कर्मचारी-त्यांनी हा विदारक अनुभव घेतला आहे. कोव्हिड 19 या विषाणूच्या महामारीनंतर जाहीर झालेल्या टाळेबंदीत हजारो वा लाखो मजूर आपल्या गावी मिळेल त्या वाहनाने वा उपाशीपोटी हजारो किलोमीटर चालत जाऊ लागतात. ज्या शहराच्या उभारणीमध्ये आपण आपला घाम आणि रक्त गाळलं- त्या शहरात, त्या समाजात आपल्याला स्थान नाही, हा अनुभव त्यांना जिवंतपणे भाजून काढतो.

विषमता

भांडवलशाही व्यवस्थेत कामगारांना अत्यल्प मोबदला मिळतो, तर भांडवलदार अधिक श्रीमंत होतात. कमीत कमी वेतनावर कामगारांना राबवून घेतल्याशिवाय भांडवलदारी अर्थव्यवस्था टिकू शकत नाही, असं मार्क्स सांगतो. अधिकाधिक नफा मिळवण्यासाठी भांडवलदार हे करतात. त्याला उद्देशून मार्क्स प्रिमिटिव्ह एक्युम्युलेशन- प्राथमिक वा मागास संचय ही संज्ञा वापरतो.

अस्थिर भांडवलशाही

भांडवलशाही व्यवस्था अस्थिर असते कारण या व्यवस्थेत प्रचंड उत्पादन होतं. मागणीपेक्षाही प्रचंड उत्पादन होतं आणि त्या उत्पादनाला ग्राहक नाहीत, अशी परिस्थिती ओढवते. यंत्रोत्पादनामुळे ही परिस्थिती निर्माण होते, कारण एवढं प्रचंड उत्पादन करण्यासाठी कमी कामगारांची गरज असते. त्यामुळे बेरोजगारी आणि गरिबी वाढते. वस्तुतः या उत्पादनपद्धतीची क्षमता एवढी प्रचंड आहे की, प्रत्येकाच्या सर्व गरजा, अन्न, वस्त्रं, निवारा, शिक्षण- आणि अन्य सुखंही ती पुरवू शकते. परंतु बेरोजगारी हा शाप समजला जातो, कारण भांडवलशाही व्यवस्थेमुळे संपत्तीचं केंद्रीकरण मूठभरांच्या हाती होतं आणि बहुसंख्य लोक दारिद्र्यात राहतात. वस्तुतः या संपत्तीचं न्याय्य वाटप झालं, तर सर्वांना सर्व वेळ काम करण्याची गरजच नाही. बेरोजगारी म्हणजे स्वातंत्र्य आहे, परंतु हे लोकांच्या अनुभवाला येत नाही; कारण भांडवलशाही समाजव्यवस्थेत संपत्तीचं न्याय्य वितरण होत नाही. संपत्तीचं न्याय्य वितरण झालं तर पृथ्वीवर स्वर्ग अवतरेल, असा मार्क्सचा होरा होता.

भांडवलदारांसाठीही भांडवलशाही अनिष्ट

मार्क्सच्या दृष्टीतून भांडवलदार हे सैतान नाहीत. भांडवलदारी व्यवस्थेत कौटुंबिक संबंधांत तणाव, दडपशाही, चीड वा नाराजी असते. कारण भांडवलशाही व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपले आर्थिक हितसंबंध प्यारे असतात. त्यामुळे विशुद्ध प्रेमाचा अनुभव कुणालाही येत नाही- अगदी भांडवलदारांनाही. कारण घरामध्ये अधिकाधिक वस्तूंचा संचय असावा यामध्येच आपलं सुख आहे, असं प्रत्येकाला वाटतं. या वृत्तीला मार्क्सने वापरलेली संज्ञा कमोडिटी फेटिशिझम. त्यामुळे सखोल संबंधांची जाण माणसांना होत नाही. मार्क्स म्हणतो, भांडवलशाही व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला चिंताक्रांत बनवते. भांडवलशाही व्यवस्थेला अनुरूप बनवते. त्यामुळे लोक राजकीय दृष्ट्या आत्मसंतुष्ट बनतात. आपलं पतन झालेलं आहे, हे त्यांच्या ध्यानी येत नाही, ही मार्क्सची टीका आहे.

मार्क्सप्रणीत कम्युनिझम वा साम्यवाद

1948 मध्ये प्रकाशित झालेल्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोमध्ये मार्क्स आणि एंगल्स यांनी मिळून साम्यवादी समाजाचं चित्रं रेखाटलं आहे. खासगी मालकी आणि वारसाहक्काने मिळालेली संपत्ती यांना कम्युनिझम वा साम्यवादात स्थान नाही, असं ते सांगतात. भांडवलशाही उलथून टाकण्याची क्रांती झाल्यानंतर या ध्येयापर्यंत जाण्याचा टप्पा  येईल. या प्रवासात आयकरात वाढ होईल, बँकिंग-कम्युनिकेशन (दूरसंचार) व वाहतूक यांच्यावर केंद्रीय नियंत्रण असेल, सर्वांना मोफत शिक्षण मिळेल असं चित्र ते रंगवतात. मार्क्सच्या मते, कम्युनिस्ट वा साम्यवादी व्यवस्थेमध्ये प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध गुणांचा विकास करायला संधी मिळेल. मी सकाळी शिकारीला जाईन, तर दुपारी नदीमध्ये गळ टाकून बसेन. संध्याकाळी गार्इंच्या दुधाची धार काढेन, रात्रीच्या जेवणानंतर समीक्षा वा टीका करायला बसेन. त्यासाठी मला शिकारी, मच्छीमार, गवळी वा टीकाकार होण्याची गरज नाही.

मार्क्सचं स्वप्नरंजन वा युटोपिया यांचा आधार त्याच्या मांडणीत आहे. एक क्षेत्र आहे माणसांच्या गरजांचं आणि दुसरं क्षेत्र असतं स्वातंत्र्याचं, असं मार्क्स बजावतो. अन्न, वस्त्र, निवारा या गरजा भागवण्यासाठी माणसंच नाही, तर पशूपक्षी हेही धडपड करतात. निसर्गाशी संघर्ष करून त्यांना आपलं अस्तित्व आणि त्याचं सातत्य राखावं लागतं. ते निसर्गाच्या शक्तींच्या अधीन असतात. त्यामुळे स्वातंत्र्याचं क्षेत्र त्यांच्या अनुभवात नसतं. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत माणसं उत्पादक शक्तींच्या आधीन होतात आणि स्वातंत्र्य गमावून बसतात. उत्पादकशक्ती, उत्पादनाची साधनं आणि त्यातून निर्माण झालेल्या वस्तू माणसावर हुकूमत गाजवू लागतात. त्यामुळे माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसतो. माणसाला दुःखं भोगू द्यातं, पण ती माणसांची दुःखं असावीत. अन्न, वस्त्र, निवारा यांच्या अभावाशी संघर्ष करावा लागणं, ही पशुपातळीवरची दुःख आहेत, असं मार्क्स सांगतो.

उत्पादनाच्या शक्ती, उत्पादनसाधनं आणि उत्पादित वस्तू यांच्या गदारोळात माणूस आपलं स्वातंत्र्य गमावून बसला आहे, याकडे युवाल नोह हरारीही लक्ष वेधतो. कृत्रिम बुद्धिमत्ता, बायोटेक्नॉलॉजी व इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्या मीलनातून शासन आणि उद्योगसमूह वा कॉर्पोरेशन्स यांच्याकडे माणसाला नियंत्रित करण्याची अपार शक्ती केंद्रित झाली आहे, असा इशारा हरारी देतो.

श्रम आणि श्रमिक यांच्यातील परात्मभाव, आधुनिक श्रमांची व श्रमिकांची असुरक्षितता, पराकोटीची विषमता, भांडवलशाही व्यवस्थेमुळे होणारं भांडवलदारांचं नैतिक अधःपतन आणि भांडवलशाही व्यवस्थेची अस्थिरता या मार्क्सने मांडलेल्या बाबी आजही आपल्या अनुभवाला येतात. थॉमस पिकेटी असो की टोनी ॲटकिन्सन वा अमर्त्य सेन वा अभिजीत बॅनर्जी आणि ईस्टर डफ्लो किंवा युवाल नोह हरारी सर्वांच्या मते आपल्या पुढचे प्रश्न जागतिक आहेत आणि त्यावर जागतिक उत्तरंच शोधावी लागतील. अर्थात हे जागतिकीकरण मानवकेंद्रित असायला हवं. वित्तीय भांडवल आणि उद्योगसमूहांना लगाम घालणारं असायला हवं तरच निकोप मानवी समाजाची उभारणी शक्य आहे. मानवजात विनाशाच्या उंबरठ्यावर पोचली आहे, ही बाब कोरोनाची महामारी आणि पर्यावरणीय संकटाने अधोरेखित केली आहे.

Tags: अभिजित बॅनर्जी अमर्त्य सेन कार्ल मार्क्स सुनील तांबे abhijit banarjee amartya sen karl marx sunil tambe weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील तांबे,  मुंबई
suniltambe07@gmail.com

सुनील तांबे हे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात