डिजिटल अर्काईव्ह (2009-2020)

जनता केंद्र,  ताडदेव इथे जीजींचा 95 वा  वाढदिवस अनौपचारिकपणे साजरा करण्यात  आला. मधू मोहिते, विजया चौहान,  सोनल  यांनी या कामी पुढाकार घेतला. या प्रसंगी  जीजींनी केलेलं केलेलं प्रकट चिंतन पुढीलप्रमाणे- गांधीजींच्या पूर्वीची काँग्रेस आणि  देश मी पाहिला होता. त्या वेळी विधवा- विवाहाची चर्चा घरामध्ये होत नसे,  अस्पृश्यता- निर्मूलनाची चर्चाही घरात होत नसे. गांधीजींमुळे  आम्ही हे विचार आत्मसात केले. बाबासाहेब  आंबेडकर घटना समितीत होते;  परंतु घटना  परिषदेत ज्यावर मतैक्य झालं, त्यानुसारच  राज्यघटना बनली. आंबेडकरांनाही काही आग्रह  सोडावे लागले. आम्ही मार्क्सवादी होतो; परंतु डॉ. राममनोहर लोहिया आणि जयप्रकाश नारायण  यांनी आम्हाला शिकवणूक दिली की,  युरोपातला समाजवाद आणि भारतातला समाजवाद वेगळा  आहे. वेगळा असायला हवा. मार्क्सवादी  विचारानुसार समाजव्यवस्था चारित्र्य घडवते.  गांधीजी आणि समाजवादी नेत्यांनी आम्हाला  सांगितलं की,  आपण समाजवादी चारित्र्य  घडवायचं असतं.  

समाजवादी आंदोलनातील सर्व मोहरे काळाच्या  पडद्याआड गेले आहेत,  मात्र वयाच्या 95 व्या वर्षीही जीजींनी मैदान सोडलेलं नाही. फोन,  आयपॅड,  ई-मेल,  भेटीगाठी यांव्दारे नव्या-जुन्या सहकाऱ्यांशी विचारविनिमय  करतात. बैठका,  उपोषणं,  धरणं,  मोर्चे यांना आवर्जून हजेरी  लावतात. चौकार वा षटकार ठोकता येत नाहीत,  मात्र 1942 ते 2020 एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी एक बाजू लावून  धरली आहे. चौफेर फटकेबाजी करण्याची जबाबदारी  असणाऱ्या नव्या पिढीला सध्याच्या कठीण काळात  जीजींचा आधार वाटतो. काँग्रेसच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या  आंदोलनात कामगार आणि शेतकरी वर्गाने संघटितरीत्या  सहभाग घ्यायला हवा,  जेणेकरून समाजवादी क्रांतीचा मार्ग  सुकर होईल- या धारणेतून जयप्रकाश नारायण,  डॉ. राममनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव,  एस. एम. जोशी,  ना. ग. गोरे,  युसुफ मेहेरअली,  अरुणा असफअली आदींनी  1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना केली. फेबियन समाजवादी,  फ्रेंच समाजवादी,  मार्क्सच्या  विचारधारेला प्राधान्य देणारे आणि गांधीवादी असे विविध विचारप्रवाह काँग्रेस समाजवादी पक्षात होते. जवाहरलाल  नेहरूंना काँग्रेसमधील या गटाबद्दल विशेष आत्मीयता  होती. डॉ.लोहिया,  जयप्रकाश नारायण आणि आचार्य नरेंद्र  देव हे गांधींजींच्याही निकट होते- मतभेद व मतभिन्नतेसह.  दि. 8 ऑगस्ट 1942 रोजी  मुंबईतील ऐतिहासिक  काँग्रेस अधिवेशनाला हजर राहण्यासाठी गांधीजी वर्ध्याहून  आले. व्हीटी स्टेशनवर त्यांचं स्वागत केलं मुंबईचे महापौर  युसुफ मेहेरअली यांनी. ब्रिटिश सरकारला निर्वाणीचा इशारा  देणाऱ्या चपखल घोषणेचा मी विचार करतो आहे,  असं  गांधीजी युसुफ मेहेरअलींना म्हणाले. क्षणाचाही विलंब न  लावता मेहेरअली उत्तरले- ‘क्विट इंडिया’ (भारत छोडो)! गांधींजीना ही घोषणा पसंत पडली. 

दिनांक 8 ऑगस्टच्या  अधिवेशनात काँग्रेसने ‘छोडो भारत’ ठराव पारित केला. या  वेळी केलेल्या भाषणात गांधीजींनी ‘करा व मरा’ हा मंत्र  देशवासीयांना दिला. ब्रिटिश सरकारला या ठरावाची  कुणकुण लागली होतीच,  त्यामुळे सर्व काँग्रेस नेत्यांना  त्याच दिवशी अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी दि. 9 ऑगस्ट रोजी, काँग्रेस अधिवेशनात एकही वरिष्ठ नेता  नव्हता. त्या वेळी अरुणा असफअली यांनी तिरंगा ध्वज फडकवला आणि ऑगस्ट क्रांतीची ठिणगी पडली. पोलिसांनी लाठीमार, गोळीबार केला. परंतु अरुणा असफअली विद्युतवेगाने नाहीशा झाल्या. काँग्रेस  समाजवादी पक्षाचे सदस्य असलेले जीजी त्या ऐतिहासिक  क्षणाचे साक्षीदार होते. स्वातंत्र्य आंदोलनात जीजींनीही  कारावास घडला. सन 1942 ते 2019 प्रत्येक ऑगस्ट  क्रांतिदिनी ऑगस्ट क्रांती मैदानावर हुतात्म्यांना श्रध्दांजली  वाहण्यासाठी जीजी जातात. सुधारित नागरिकत्व कायदा, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी आणि नागरिकत्व नोंदणी  यांच्याविरोधात दि. 9 डिसेंबर 2019 रोजी ऑगस्ट क्रांती  मैदानावर झालेल्या ऐतिहासिक निदर्शनांमध्येही जीजी  सहभागी झाले होते. 

1942 च्या क्रांतिदिनालाही  लोकशक्तीचं एवढं विराट दर्शन घडलं नाही,  असं ते  म्हणाले. गुणवंत गुणीलाल पारीख ऊर्फ जीजी यांचा जन्म  1924 चा. मुंबईच्या जी. एस. वैद्यकीय महाविद्यालयातून  ते एमबीबीएस झाले. मुंबईतच त्यांनी प्रॅक्टीस सुरू केली.  सकाळ-संध्याकाळ दवाखाना आणि उरलेल्या वेळात  समाजवादी चळवळीत राजकीय-सामाजिक कार्य असा  त्यांचा दिनक्रम होता. सामाजिक कार्यकर्ते,  त्यांचे कुटुंबीय यांच्यावर मोफत उपचार,  इतर रुग्णांना माफक शुल्कामध्ये  आरोग्यसेवा हा त्यांचा बाणा राहिला. हजारो सामाजिक  कार्यकर्त्यांना हस्ते-परहस्ते आर्थिक साह्य केलं. वैद्यकीय  क्षेत्रातील त्यांच्या संबंधांतून हजारो कार्यकर्त्यांना  आरोग्यविषयक सेवा मोफत पुरवल्या. त्याशिवाय कामगार  चळवळीतील कार्यकर्त्यांचे अभ्यासवर्ग,  अन्य राजकीय  कार्यांत ते बुडून गेलेले असायचे. सहा फूट उंची. मितभाषी.  पेशंट असो की राजकीय  कार्यकर्ता- कुणाचंही बोलणं  अतिशय लक्षपूर्वक ऐकणं,  त्यातही टीका शांतपणे ऐकणं हे  जीजींचं वैशिष्ट्य. ते शांत आणि दृढपणे बोलायचे.  कोणतीही टीका,  सूचना,  कार्यक्रम वा कृती वा निर्णय- मग  तो त्यांचा असो वा संघटना वा अन्य कुणाचा- त्याचा  समाजवादी मूल्यांशी वा चारित्र्याशी असलेला संबंध काय  आहे,  याची उकल करून सांगणं हे त्यांचं वैशिष्ट्य. 

एखादी  व्यक्ती पाच टक्के समाजवादी असेल तर ती दहा टक्के  समाजवादी बनावी,  यासाठी कोणत्या ना कोणत्या कार्यात  गुंतवा. दहा टक्के समाजवादी असलेली व्यक्ती वीस टक्के  समाजवादी कशी होईल, यासाठी कार्यात गुंतवा.  कोणत्याही व्यक्तीला वर्गशत्रू-हितशत्रू म्हणून जाहीर करू  नका,  अशी जीजींची कार्यशैली आहे. त्यामुळे सुखवस्तू  समाजाशी असलेली नाळ त्यांनी कधीही तोडली नाही.  जीजींनी गॉसिप वा कुचाळक्या चुकूनही केल्याचं मला  स्मरत नाही. मंगलाबेन या त्यांच्या पत्नी. त्या  शांतिनिकेतनच्या विद्यार्थी. त्याही त्यांना जीजी असंच  संबोधत. मंगलाबेनमुळे त्यांच्या घराला सौंदर्याचा साज  चढला होता. त्या संयुक्त महाराष्ट्रच्या आंदोलनात होत्या.  समाजवादी पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सहभाग  होता. जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्र विधान  परिषदेवर त्यांची निवड करण्यात आली. जीजींची मुलगी  सोनल. भारतातील समाजवादी आंदोलन हा तिचा  अभ्यासाचा विषय. युसुफ मेहेरअली सेंटरच्या कार्यातही  तिचा सहभाग आहे. 30 जानेवारी 2019 रोजी जीजींनी  वयाची 95 वर्षं पूर्ण केली. 

वयोमानानुसार दृष्टी मंदावली  आहे. कानाला यंत्र लावल्याशिवाय ऐकू येत नाही.  चालताना काठीचा आधार घ्यावा लागतो. मात्र समाजवादी  क्रांतीच्या प्रतिज्ञेवर हा भीष्माचार्य आजही अविचल आहे.  जीजी मूळचे कच्छचे. कच्छ आणि मुंबईचं नातं प्राचीन  आहे. बहुतेक कच्छी लोक नशीब काढायला मुंबईत येतात.  मुंबई हीच कच्छी लोकांची राजधानी मानली जाते.  त्यामुळेच जीजींना मराठी भाषा व महाराष्ट्र परका नाही.  मुंबई हीच जीजींची कार्यभूमी. मात्र जीजींच्या कार्याचा पैस  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राहिला. काश्मीरपासून कन्याकुमारी  आणि गुवाहाटीपासून कच्छपर्यंतच्या विविध प्रवाहांमध्ये व  घटकांमध्ये काम करणाऱ्या समाजवादी कार्यकर्त्यांशी त्यांचे  आजही संबंध आहेत. ‘जनता वीकली’ हे इंग्रजी साप्ताहिक काँग्रेस समाजवादी  पक्षाचं मुखपत्र होतं. अच्युतराव पटवर्धन यांनी ते 1946 मध्ये सुरू केलं. आचार्य नरेंद्र देव, जयप्रकाश नारायण,  राममनोहर लोहिया,  युसुफ मेहेरअली,  अशोक मेहता  यांच्या मार्गदर्शनाखाली या साप्ताहिकाचं कार्य सुरू झालं.  अरुणा असफअली,  पुरुषोत्तम त्रिकमदास,  रोहित दवे, नानासाहेब गोरे,  ह. कृ. परांजपे,  जे.डी. सेठी,  प्रेम भसीन,  मधू दंडवते,  सुरेंद्र मोहन यांनी या साप्ताहिकाची संपादकीय  धुरा सांभाळली होती. हे साप्ताहिक पूर्वी नवी दिल्लीतून निघत  असे. अच्युतराव पटवर्धन या साप्ताहिकाचे 1949 मध्ये  संपादक झाल्यावर या साप्ताहिकाचं कार्यालय मुंबईला  आलं. अपोलो बंदर येथील नॅशनल हाऊस इमारतीतील एक  गाळा अच्युतरावांनी मिळवला आणि तिथून या  साप्ताहिकाचा कारभार सुरू झाला. जहांगीर आर्ट  सोसायटीसमोर वे साईड इन नावाचं रेस्टॉरंट होतं. मी,  युसुफ मेहेरअली,  जयप्रकाश नारायण,  राममनोहर लोहिया  जनता वीकलीच्या कार्यालयातून कॉफी प्यायला या  रेस्टॉरंटमध्ये जायचो, असं अच्युतराव पटवर्धनांनी मला 1992 मध्ये सांगितल्याचं स्मरतं. पुढे या साप्ताहिकाचा  कारभार प्रजा समाजवादी पक्षाकडे गेला. पक्षाच्या राष्ट्रीय  कार्यकारिणीने या साप्ताहिकाची जबाबदारी जीजींवर  सोपवली. ती जबाबदारी आजही जीजी निभावत आहेत. 

ऑगस्ट क्रांतीला 1992 मध्ये 50 वर्षं पूर्ण झाली. त्या  वेळी छोडो भारत आंदोलनात सहभागी झालेल्या श्रीलंकेतील समाजवादी नेत्यांना जीजींनी ‘जनता  वीकली’च्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावलं होतं. श्रीलंकेतील विविध प्रश्न,  तमिळींची समस्या,  भारतश्रीलंका संबंध,  समाजवादी भूमिका इत्यादी विषयांवर या  नेत्यांनी आपले विचार मांडले. हे समाजवादी नेते  श्रीलंकेच्या राजकारणात सक्रिय होते. श्रीलंका, म्यानमार  आणि भारतातील समाजवाद्यांनी एशियन सोशॅलिस्ट  कॉन्फरन्स स्थापन केली होती. या संघटनेच्या कार्यासाठी  मधू लिमये काही काळ रंगूनमध्ये होते. आँग सान या  म्यानमारच्या स्वातंत्र्यलढ्याच्या नेत्याने ही परिषद स्थापन  करण्यात पुढाकार घेतला होता. आँग सान सू की ही त्यांची मुलगी. असो. सांगायचा मुद्दा असा की,  भारत सरकारच्या  लुक ईस्ट या आजच्या धोरणाची वा सार्कची पायाभरणीची  दिशा भारतीय समाजवाद्यांनी खूप पूर्वी दाखवली होती. हा  इतिहास केवळ जतनच नाही तर जिवंत करण्याची धडपड  जीजी आजही करत असतात.

काश्मीर प्रश्नावरील  समाजवाद्यांची भूमिका आणि कार्य या विषयावरील  दस्तावेज त्यांनी मला नुकतेच वाचायला दिले.  युसुफ मेहेरअली अभ्यास केंद्राची स्थापना जीजींनी 1961 मध्ये केली. त्याचं रूपांतर पुढे युसुफ मेहेरअली  केंद्रामध्ये झालं. भारतात समाजवादी क्रांती यशस्वी  होण्यासाठी ग्रामीण भागात आमूलाग्र परिवर्तन गरजेचं  आहे,  या धारणेनुसार जीजींनी पनवेलजवळ असणाऱ्या  ‘तारा’ या गावामध्ये युसुफ मेहरअल्ली सेंटरमार्फत वैद्यकीय  सेवेचं केंद्र सुरू केलं. मुंबईतील अनेक डॉक्टर्स या  कामामध्ये जोडले गेले. वैद्यकीय सेवेसोबतच सौर ऊर्जा,  शालेय शिक्षण, शेतीचे प्रयोग यांची भर पडत गेली.  त्यासाठी जीजी व त्यांचे सहकारी देशातील आणि  राज्यातील विविध भागांत गेले. विविध प्रयोगांची माहिती  घेतली. विविध तज्ज्ञांना युसुफ मेहेरअली सेंटरमध्ये  निमंत्रित केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प  सुरू केले. सुस्मृत श्रीपाद दाभोलकर यांच्या  मार्गदर्शनाखाली शेतीचे प्रयोगही युसुफ मेहेरअली केंद्राने  सुरू केले. समाजवादी पक्ष, कामगार चळवळ यांच्याशी जीजींचा  निकटचा संबंध होता. त्यांची पत्नी मंगलाबेन संयुक्त  महाराष्ट्राच्या आंदोलनातही सहभागी झाली होती. गोवा मुक्ती आंदोलनातही जीजींचा अप्रत्यक्ष संबंध होता.

आणीबाणीच्या काळात जीजींना बडोदा डायनामाइट  केसमध्ये गोवण्यात आलं. वस्तुतः जीजींचा त्या प्रकरणाशी  दूरान्वयानेही संबंध नव्हता,  हे पन्नालाल सुराणा यांनी एका  लेखात नोंदवलं आहे. मात्र जीजींनी यासंबंधात जाहीर  भाष्य कधीही केलं नाही.  जनता केंद्र,  ताडदेव इथे जीजींचा 95 वा वाढदिवस अनौपचारिकपणे साजरा करण्यात आला. मधू मोहिते,  विजया चौहान,  सोनल यांनी या कामी पुढाकार घेतला. या  प्रसंगी जीजींनी केलेलं केलेलं प्रकट चिंतन पुढीलप्रमाणे- गांधीजींच्या पूर्वीची काँग्रेस आणि देश मी पाहिला होता.  त्या वेळी विधवाविवाहाची चर्चा घरामध्ये होत नसे,  अस्पृश्यता निर्मूलनाची चर्चाही होत नसे. गांधीजींमुळे  आम्ही हे विचार आत्मसात केले.  बाबासाहेब आंबेडकर घटना समितीत होते; परंतु घटना परिषदेत ज्यावर मतैक्य झालं,  त्यानुसारच राज्यघटना  बनली. आंबेडकरांनाही काही आग्रह सोडावे लागले. आम्ही मार्क्सवादी होतो;  परंतु डॉ. राममनोहर लोहिया  आणि जयप्रकाश नारायण यांनी आम्हाला शिकवणूक दिली  की,  युरोपातला आणि भारतातला समाजवाद वेगळा आहे.  वेगळा असायला हवा. 

मार्क्सवादी विचारानुसार  समाजव्यवस्था चारित्र्य घडवते. गांधीजी आणि समाजवादी  नेत्यांनी आम्हाला सांगितलं की,  आपण समाजवादी  चारित्र्य घडवायचं असतं. ‘आपण माणूस आहोत म्हणून  संपूर्ण मानवजातीशी आपण जोडलेले आहोत. देश, वंश, धर्म, जात ही आपली ओळख नाही’, असं नाथ पै खासगी चर्चेतही वारंवार सांगत. ही शिकवण आम्हाला लोहिया  आणि जेपी यांनी दिली.  आम्ही पाहिलेलं स्वतंत्र भारताचं स्वप्न वेगळं होतं, ते  आज भंग पावलं आहे. त्याचे तुकडे-तुकडे झाले आहेत. हे  आम्ही का रोखू शकलो नाही,  याचा मी विचार करतोय.  मला वाटतं,  आम्ही निवडणुकीच्या राजकारणात नको तेवढे गुंतलो. समाजवादी चारित्र्य त्यामुळे  झाकोळलं गेलं. पहिल्या निवडणुकांमध्ये (1952-55) भ्रष्टाचार हा मुद्दा  नव्हता; पण त्यानंतर निवडणुकीसाठी पैसे गोळा करणं,  म्हणजे काळा पैसा आणणं ही बाब सामान्य बनली.  निवडणुकीसाठी धर्म, जात यांचा उपयोग करणंही गरजेचं  झालं. समाजवादी काही काळ याविरोधात होते,  परंतु  यथावकाश तेही धारेला लागले. मी निवडणुकांच्या  राजकारणाच्या विरोधात नाही, परंतु केवळ निवडणुकांच्या  राजकारणातून समाजवादी चारित्र्य निर्माण होत नाही. सत्ता  उच्चवर्णीयांच्या हाती आहे,  अन्य मागासवर्गीय आणि  दलितांच्या हाती ती जायला हवी,  यासाठी आपण  लढायला हवं- अशी लोहिया व जयप्रकाश यांची शिकवण  होती,  परंतु लोहियांनी केवळ निवडणुकीच्या राजकारणाची  कास धरली.

सुधारित नागरिकत्वाचा कायदा,  लोकसंख्यानोंदणी,  नागरिकत्व नोंदणी हे विषय आज ऐरणीवर आले आहेत.  त्यामुळे राज्यघटनाच धोक्यात आली आहे. हा विषय  केवळ मुसलमानांचा नाही,  सर्व भारतीयांचा आहे. त्यामध्ये  हिंदू,  मुस्लिम,  शीख,  ख्रिश्चन,  दलित,  भटके-विमुक्त आणि  आदिवासीही भरडले जाणार आहेत.  भारतातील बेरोजगारी आणि दारिद्य्राची समस्या, विशेषतः ग्रामीण भागातील; आजही सुमारे 50 टक्के लोकसंख्येची उपजीविका शेतीवर आहे- औद्योगिकीकरण  सोडवू शकत नाही. एक छोटा वर्ग कॉप्युटर सायन्स शिकून  नोकऱ्या मिळवू शकतो, परंतु औद्योगिकीकरणाला मर्यादा  आहेत. त्यामुळे गांधीजींचा, समाजवाद्यांचा सामाजिक व  आर्थिक कार्यक्रम आजही रिलेव्हंट आहे. जागतिक  भांडवलशाहीमुळे आज ग्लोबल वार्मिंग आणि तदनुषंगिक  अशा समस्या निर्माण झाल्या आहेत की,  मानवाचं अस्तित्व 2040 वा 2050 मध्ये राहील की नाही,  असा प्रश्न निर्माण  झाला आहे. मेधा पाटकर आणि अनेक साथी पर्यायी विकासनीतीचा विचार मांडत असतात,  त्यासाठी संघर्षही  करत असतात. तेच समाजवादी विचारांचं भविष्य आहेत.

Tags: नाबाद ९५ अभिष्टचिंतन सुनील तांबे जयप्रकाश नारायण पन्नालाल सुराणा समाजवादी पन्नालाल सुराना भारत लोहीया जय प्रकाश नारायन काँग्रेस samajvadi pannalal surana bhatrat lohiya jay prakash narayn Congress weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनील तांबे,  मुंबई
suniltambe07@gmail.com

सुनील तांबे हे राजकीय विश्लेषक व ज्येष्ठ पत्रकार आहेत. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात