डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

कॉम्रेड पानसरेंनी चळवळीत केलेले प्रबोधन भाषणांपेक्षा अधिक प्रभावी राहिले ते त्यांच्या कृतिशील वस्तुपाठामुळे. साधी राहणी, साधे खाणे, साधे बोलणे हे सारे त्यांच्या बहुजनकेंद्री संस्कृतीचे अपत्य म्हणावे लागेल. चारचौघांची बैठकसभांमधून मुठी मारत ते ज्या मुष्टियुद्धाचे धडे द्यायचे, ते नामी-गिरामी वस्तादाचे अपराजित डाव असत. त्यामुळे रणनीतीसाठी त्यांना कधी मोहरे जमवावे लागले नाहीत. त्यांच्या बुद्धिबळाचा पट २४ X ७ अंथरलेला असायचा. पटावर गरजेनुरूप प्यादी असत. हातचा ठेवून पत्त्याचा डाव त्यांनी खेळला नाही.

कॉम्रेड गोविंद पानसरे आणि माझ्या संबंधांची सुरुवातच मुळी चळवळीतील शत्रू-मित्र विवेक रणनीतीतून झाली. हा काळ साधारणपणे सन १९८४-८५ चा असावा. तेव्हा मी कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाच्या कामात स्वत:स झोकून दिले होते. अनाथ, निराधार मुले, मुली आणि महिलांचे संगोपन, शिक्षण, संस्कार व पुनर्वसनकार्य विस्ताराची धामधूम होती. ‘अनिकेत निकेतन’ हे अनाथ विद्यार्थिगृह नुकतेच सुरू झाले होते. जे करायचं ते आदर्श, असा ध्यास होता.

पानसरेंप्रमाणेच मलाही गैर खपायचं नाही. एका दिवाळीच्या वेळी अनिकेत निकेतनमधील एका मुलाचा फटाके उडवताना डोळा गेला. हलगर्जीपणाचा ठपका ठेवून काळजीवाहक महिलेला आम्ही कामावरून कमी केले. त्याचवेळी दुसऱ्या एका संस्थेतील आचारी बाई अन्न चोरून नेताना सापडल्या. त्यांनाही कामावरून कमी केले. दोन्ही हंगामी सेवेत होत्या. त्या दोघी ॲड्‌.पानसरेंकडे गेल्या. लेबर कोर्टात प्रकरण चालले. संस्थेच्या वतीने ॲड.अभय नेवगींनी बाजू मांडली. निकाल संस्थेच्या बाजूने लागला. तोवर मी नि पानसरे मतभेदाच्या अंगाने शत्रू होतो.

पुढे संस्थेचे कर्मचारी ॲड. पानसरेंकडे गेले, युनियन करायची म्हणून. पानसरेंनी कर्मचाऱ्यांना समजावले... ‘‘तुमची संस्था वंचितांचे काम करते. कार्यकर्ते ध्येयाने काम करतात. ती संस्था मला गिरणी, कारखाना करायची नाही. तुम्ही मुलांची सेवा करा; संस्था काही तुम्हाला कमी पडू देणार नाही.’’ मला त्यांच्या या भूमिकेचे आश्चर्य वाटले नसले, तरी अप्रूप नक्कीच वाटले. आम्ही मित्र झालो. पुढे कुणाला काढायचा प्रसंग आला नाही. शासनदरबारी मीच कर्मचारी प्रतिनिधी झालो.

राजकारण काय नि समाजकारण काय, दोन्ही खरे तर समाजहिताच्या चळवळी असतात. चळवळींचे स्वत:चे असे ध्येय, उद्दिष्ट असते; स्वत:ची अशी रणनीती असते. ती जाणून घेऊन शत्रू-मित्रविवेक जपावा लागतो. राजकारणात काय नि समाजकारणात काय, कोणीच कायमचा शत्रू अथवा मित्र असत नाही. दोघांची धडपड जर समाजहितार्थ असेल, तत्त्व व मार्ग भिन्न असतील; तर एकमेकाला शह देत आपापल्या उद्दिष्टास यश येईल, असे पाहिले पाहिजे. कुणाला, केव्हा, किती बरोबर घ्यायचे याचा विवेकी निर्णय करणे, हे ॲड. पानसरे यांच्यातील अनुभवी नेत्याला बरोबर माहीत होते. मतभेद म्हणजे मनभेद नाही, यावर त्यांचा विश्वास होता. म्हणून त्यांच्या प्रत्येक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक चळवळीचे भागीदार वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष, कार्यकर्ते होते याची आपण सजगपणे नोंद घ्यायला हवी.  

पुढे मी कॉम्रेड पानसरे यांच्याबरोबर अनेक चळवळींत सक्रिय राहिलो. विशेषत: सांस्कृतिक चळवळीच्या परिघात काम करायचे, हे मी ठरवून टाकले होते. पानसरेंना पण त्याची कल्पना होती. त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या व्यासपीठावर मी कधी गेलो नाही; त्यांनीही कधी बोलावले नाही. त्यांना या गोष्टीची कल्पना होती की, मी माझी पीएच.डी. कम्युनिस्ट मतप्रणालीवर आधारित साहित्यावर केलेली होती. राजकीय विचारसरणी म्हणून मी डावा नक्कीच होतो. समाजवादी विचारसरणीच्या शाळेत मी घडलो. शिक्षक संघटनेत आणीबाणीच्या काळात नि नंतर सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांना घेऊन बांधलेली व प्रभावी केलेली संघटना त्यांना माहीत होती. पण व्यक्तीचे मतस्वातंत्र्य अबाधित ठेवून त्या व्यक्तीला आपले इष्ट कार्य, चळवळीत सहभागी करून घेण्याचा विवेक पानसरे नेहमी वापरीत.

ते नेहमी म्हणत, ‘‘तुमच्या मोजपट्टीचा माणूस जन्माला घालता येत नाही. हाती आलेल्या माणसाच्या चांगुलपणाचा चळवळीला विधायक उपयोग कसा करता येईल, हे पाहिले पाहिजे. माणूस परिपूर्ण नसतो, तसा पक्षही. तुम्हाला सर्वपक्षीय गोफ गुंफतच समाजवीण विणावी लागते. प्रतिगाम्यांशी सोयरिक करायची नाही, हे नक्की; पण समविचाराच्या सीमेवर तुम्हाला शत्रू- मित्रविवेक करता यायला हवा.’ माणूस म्हणून मैत्री वेगळी व विचार म्हणून विरोध वेगळा; ते तारतम्य ॲड.पानसरेंनी नेहमी जपले. सन १९८५ ते २०१५ हा त्यांच्या नि माझ्या मैत्रीचा काळ असला, तरी आम्ही खांद्याला खांदा लावून काम केले ते या शतकातल्या १२-१५ वर्षांतच.

कोल्हापूरला शंकराचार्य मठ आहे. तेथील गादीवर नवे शंकराचार्य नियुक्त झाले होते. निवृत्त झालेल्या शंकराचार्यांनी चातुर्वर्ण्याचा पुरस्कार करणारे विधान केले होते. त्यांना घटना अपुरी वाटत होती. राज्यघटनेचा पुनर्विचार व्हावा, असे मत शंकराचार्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या मतामुळे सामाजिक न्यायाच्या घड्याळाचे काटे उलटे फिरवण्याचा मनसुबा पुरोगामी विचारसरणीच्या वर्तमानकाळात कुणालाही पटणे शक्य नव्हते. तेव्हा कोल्हापुरात सर्वपक्षीय सभा झाली. एकजूट झाली. दलित संघटना आक्रमक होणे स्वाभाविक होते.

मी त्या वेळी राष्ट्रीय मानव अधिकाराचा जिल्हा प्रतिनिधी होतो. मी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सक्रिय झालो, ते वंचितांच्या अधिकारावर आक्रमण होते म्हणून. प्रतिगामी संघटनांनी माझ्या समर्थनाचा निषेध केला. पुढे शंकराचार्यांचा निषेध करणारा मोर्चा इतका मोठा होता की, आमची मागणी व विचार कालसंगत होते, हे वेगळे सिद्ध करायची गरज उरली नाही. या आंदोलनात ॲड.पानसरे यांनी सर्व दलित संघटनांना त्यांच्यातील छोटे-मोठे मतभेद विसरून एका झेंड्याखाली कसे आणले, त्याचा मी जवळचा साक्षीदार आहे. ते सर्व दलित संघटकांना कौरवपांडवांचा दाखला देत होते. आपसात आपण एकमेकांविरुद्ध असू; पण आपल्या मुळावर कोणी घाव घालील, तर शंभर विरुद्ध पाच न राहता ‘आम्ही एकशेपाच’ म्हणून एक राहण्यात शहाणपण आहे.

चळवळीचे म्हणून एकूण एक शहाणपण असते. डावपेच असतात. चढाई केव्हा करायची व तह केव्हा करायचा, याची त्यांची रणनीती ठरलेली असायची. अशा चळवळीतील ॲड.पानसरेंची भाषणे प्रभावी असत. भाषणातील युक्तिवाद बिनतोड असायचा. इथे त्यांची वकिली कामी यायची. ते कधीच शिवराळ भाषेस थारा देत नसत, पण भाषण करारी असायचे.

सन २००८ ची गोष्ट असेल. उत्तर प्रदेशमधील एका संस्थेने कोल्हापूरला महायज्ञ करायचा घाट घातला होता. यज्ञसंस्कृती ही अंधश्रद्धेवर आधारित होती. शिवाय यज्ञातील होम-हवनात मोठ्या प्रमाणात धन, धान्य, तूप  यांची नासाडी होणार होती. पुरोगामी चळवळीतील अनेक संस्था, संघटना यात सक्रिय झाल्या होत्या. महायज्ञविरोधी चळवळीत एकीकडे रयत शिक्षण संस्था सक्रिय, तर दुसरीकडून संभाजी ब्रिगेड सहभागी. एकीकडे खासदार सदाशिवराव मंडलिक संघटक तर दुसरीकडून छत्रपती शाहूमहाराज समर्थक. आवळ्या-भोपळ्याची मोट बांधावी ती ॲड.पानसरे यांनीच. सर्व संस्था, संघटनांनी कोल्हापूर पंधरा दिवस ढवळून काढले. रोज मोर्चे, कोपरा सभा, प्रकाशने, जाहीर सभा यातून अशी लोकजागृती झाली की, महायज्ञाकडे फारसे कुणी फिरकले नाही. संयोजक तोट्यात होते.

ॲड्‌.पानसरे यांच्यामध्ये विचारांचा पारदर्शीपणा असायचा. कोणत्याही चळवळीपूर्वी ते गृहपाठ करत. यज्ञ, यज्ञविधी, त्याचे परिणाम, वैयर्थ्य सारे त्यांनी वाचलेले असायचे. विरोधासाठी विरोध ते कधीच करीत नसत. स्वत:चे विचार तर्कशुद्ध, वैज्ञानिक ठेवण्यावर त्यांचा भर असायचा. मोर्चा, आंदोलन, चळवळीत बाष्कळपणा, बालिशपणा, कमीपणा येणार नाही; विरोधकांचा उपमर्द होणार नाही, याची ते काळजी घेत. एखाद्या कार्यकर्त्याचे भाषण चळवळीस मारक ठरते आहे असे वाटले की, ते त्याचा अवमान होऊ न देता हस्तक्षेप करत. त्यांनी चळवळीची कधी हानी होऊ दिली नाही आणि दुसरीकडे यशाचा डांगोराही कधी पिटला नाही.

अपेक्षित प्रभावकेंद्री चढाई ही त्यांच्या चळवळीची रणनीती असायची. चळवळीचा लगाम ते नवंगत वर्गाकडे कधी सोपवत नसत. ज्याच्यावर सोपवत, त्याच्या कासऱ्याला ढील देण्याची उदारता त्यांच्यात होती. चुकेल त्याचे खासगीत कान टोचायचे त्यांचे कसब सोनाराला लाजवणारे होते. कान तर टोचायचे, पण रक्त येऊ द्यायचे नाही. हिंदीत ज्याला ‘काँटो तो खून नहीं’ अशी ती बिनटाक्याची सामाजिक शस्त्रक्रिया क्लोरोफॉर्मशिवाय पण वेदनामुक्त व्हायची. त्यांच्या नेतृत्वाखालील अनेक चळवळी-आंदोलनात प्रा.एन.डी. पाटील, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांतिअग्रणी जी.डी.बाबू लाड असे रथी-महारथी उतरत. साऱ्यांशी त्यांचे संबंध वैचारिक मैत्र जपणारे असायचे. साऱ्यांचा सवतासुभा सुरक्षित ठेवून चळवळीचे वैचारिक बळ, एकजूट वाढवण्यावर ॲड.पासनरेंचा भर असायचा. विशेष म्हणजे, या विश्वासावर सर्वांचा भरोसाही असायचा.

ॲड.पानसरे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य चालायचे. या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याने दोन-तीन महत्त्वाचे कार्यक्रम महाराष्ट्राला दिले. शिक्षणाधिकारी म्हणून निवृत्त झालेले के. डी. खुर्द, श्री. चौगुले, इचलकरंजीचे टी. आर. शिंदे ऊर्फ आबा नकातेमामा, बापू होगाडे ही सारी मंडळी वर्षानुवर्षे कार्य करत होती. मी त्यांचा समर्थक असलो, तरी सक्रिय कार्य शकलो ते सन २०१० मध्ये प्राचार्य म्हणून निवृत्त झाल्यावर. पण लुटूपुटू कार्य नित्याचेच. मला आठवते की, ‘गणपती व निर्माल्यदान’ चळवळ आम्ही सतत १०-१५ वर्षे चालवली, मग तिला लोकमान्यता मिळाली.

प्रारंभीचा काळ दगड नि शिव्या खाण्याचाच होता. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक असत. पोलिसांची भूमिका बघ्याची असली तरी सामिलीकीचीच होती. नाही म्हणायला, महानगरपालिकेचं सक्रिय साह्य होतं. पाचपन्नास गणपतींवरून पंधरा हजार गणपती दान मिळवेपर्यंतचा प्रवास विचारांवरील अढळ श्रद्धेचाच विजय म्हणायचा. ॲड.पानसरे पाचव्या दिवशी गौरी-गणपती विसर्जनाला आवर्जून उपस्थित राहत. त्यामुळे कार्यकर्त्यांचं बळ वाढायचं नि प्रतिपक्ष नाउमेद व्हायचा. ॲड.पानसरेंची उपस्थिती चळवळीसाठी ‘बुलेटप्रूफ’ जॅकेट होती. रबरी. पण ते जॅकेट त्यांनी स्वत:साठी कधी न वापरल्यामुळे ते बळी गेले. मात्र त्यांच्या नि डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या बलिदानामुळे कायद्याने महाराष्ट्र पुरोगामी झाला. आज मी पाहतो की नदीकाठी आम्ही उभे राहत नाही, हिंदुत्ववादी संघटनाच ‘गणपती निर्माल्य’दान स्वीकारत उभ्या असतात.

विचारांची लढाई भविष्यलक्ष्यी हवी, ती वस्तुनिष्ठही असायला हवी. काळ विचारांची पण अग्निपरीक्षा घेत असतो. तुम्ही विचारबांधील, प्रतिबद्ध किती असता, हे महत्त्वाचे. पानसरे काय नि दाभोलकर काय, दोघांनी विवेकवादी विचारांचा विजय नम्रपणे स्वीकारण्याचा संस्कार कार्यकर्त्यांना दिला. त्यामुळे त्यांचे विचार न्यायालयाला स्वीकारणे भाग पडले. गणेशाची मूर्ती प्लॅस्टर ऑफ पॅरिसची न करता शाडूची असायला हवी, ही बाजू न्यायालयात मांडायची असो वा दारूबंदी आंदोलनात ‘बाटली आडवी’ करताना गाव, गावठाण, गावकूस म्हणजे काय, त्याचे सामाजिक महत्त्व न्यायालयात मांडण्यापूर्वी आम्ही जो गृहपाठ करत असू; तो दीर्घ पल्ल्याची समाजस्वास्थ्य व सुधारणेची चळवळ करत आहोत याचे भान देणारा. ॲड.पानसरे यांचं मार्गदर्शन प्रतिपक्षावर केवळ  कुरघोडी करणारे नसायचे. खरे तर येशूख्रिस्ताचा तो क्षमाशील संयम संस्कारच असायचा. ‘लेकरू अज्ञानी आहे. त्याला माहीत नाही की, ते चुकीची गोष्ट करतं. त्याला क्षमा करा!’ असे म्हणण्याच्या त्यांच्या वृत्तीत ‘फर्गिव्ह अँड फर्गेट’ची उदारता असायची.

चळवळीतील शत्रू-मित्रविवेकाची ॲड.पानसरेंची लवचिकता कम्युनिस्टांच्या पारंपरिक कर्मठतेस शोभणारी नसायची. ते रूढ अर्थाने कम्युनिस्ट नव्हतेच. ‘बाबा वाक्यं प्रमाणम्‌’ हे त्यांना मान्य नव्हते. तत्त्व व विचारांना वर्तमानाची जोड देण्यातील प्रस्तुतता कळावी ती पानसरेंनाच. म्हणून त्यांचे प्रत्येक आंदोलन, चळवळी, मोर्चे, निवेदने यांना यश आले; कारण त्यांची रणनीती शिवाजीला लाजवणारी असायची. सामाजिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक अशा अनेक प्रकारच्या चळवळींचे नेतृत्व ॲड. गोविंद पानसरे यांनी केले. पण कोणत्याही चळवळीत ते भावनेने वा भावनेवर स्वार झालेत, असे कधी मला आढळले नाही. त्या अर्थाने ते प्रखर बुद्धिवादी होते. विचार, तर्क, पारदर्शिता, न्याय इत्यादी मूल्यांना त्यांनी चळवळीत महत्त्व दिले. ‘समोर घर जळतंय नि मला काय त्याचं’ अशी मध्यमवर्गीय तटस्थता कॉम्रेड पानसरे यांना कधी शिवली नाही. ‘मित्र’ या नात्याने ते नित्य कॉम्रेडच होते.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.द.ना. धनागरे यांनी पदभार सांभाळला. त्यांनी आपल्या विवेकी प्रशासनकार्यास प्रारंभ केला. काहींचे हितसंबंध दुखावले. हितसंबंधींची एकी स्वार्थापोटी होती. त्यात विद्यापीठासारख्या संस्थेचा बळी जातो, हे पानसरेंनी पाहिले नि कुणाचाही मुलाहिजा न ठेवता शिक्षक संघटनांना कामगार संघटनांची रसद पुरवून शिक्षणक्षेत्राचे पावित्र्य राखले. हा लढा एका अर्थाने ‘युनियन विरुद्ध युनियन’ असाच होता. पण त्यात कोणती युनियन ‘त्या’ क्षणी ‘शत्रू’ नि ‘मित्र’ हे ठरवावेच लागते. तो विवेक बाळगावाच लागतो. जी युनियन हितसंबंध रक्षणासाठी विरोध करते, ती आपली शत्रू नसली; तरी विरोध हे शिक्कामोर्तब करण्याचे धाडस पानसरेंनी दाखवले. ‘सुटा’ ह्या प्राध्यापक संघटनेस घेऊन त्यांनी कुलगुरू प्रा.धनागरे यांना अभय दिले. ‘सुटा’ जेव्हा आपसात भांडू लागली, तेव्हा ‘प्रस्थापित विरुद्ध नवे रक्त’ असा वाद उफाळला. दोन्ही पक्ष निवाड्यासाठी सुटाचा ‘मित्र’ म्हणून स्वीकार करणारे ॲड्‌.पानसरेंकडे गेले. त्रिपक्षीय समिती नेमली गेली. मी अध्यक्ष होतो. समितीच्या निर्णयामागे ठामपणे उभे राहून पानसरेंनी संघटनांतर्गत संघर्षात ‘दूध का दूध, पानी का पानी’ भूमिका घेऊन अवलंबलेल्या शत्रू- मित्रविवेकाचा मी जवळचा साक्षीदार आहे.

प्रसंगी दोन्ही पक्षाशी दूर राहून ते आपलं मत व्यक्त करत. अशा प्रसंगीचे त्यांचे मौन फारच बोलके असायचे. सन १९७७-७८ च्या दरम्यान कोल्हापूरच्या गोखले कॉलेजविरुद्ध जनआंदोलन सुरू होते. मी हायस्कूलशिक्षक होतो. एम.ए. झालेलो. कॉलेजमध्ये प्राध्यापक होण्याच्या धडपडीत मला गोखले कॉलेजमध्ये अर्धवेळ अधिव्याख्यात्याची नोकरी मिळालेली. आणीबाणीचे वातावरण होते. मी जिल्हा शिक्षक संघटनेचे नेतृत्व करीत होतो. मी प्राध्यापक व्हायला नि गोखले कॉलेजचे आंदोलन सुरू व्हायला एकच मुहूर्त मिळालेला. कावळा बसायला नि फांदी तुटायला एकच गाठ. बाहेर संघटनेतील सहकारी घोषणा द्यायचे नि आत मी तास घेत असायचो. माझे मलाच विसंगत वाटत होते. मी गरज असूनही तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ तिथे राहू शकलो नाही, हे केवळ चळवळीतील शत्रू-मित्रविवेकाच्या घालमेलीमुळे. तुम्ही ज्या वृक्षाच्या सावलीत उभे असता; तो वृक्ष तुम्हाला केवळ छत्र देत नसतो, तर छत्राबरोबर जीवनशैलीचा मंत्रही तो समजावत असतो. तो जीवनमंत्र मला कॉम्रेड पानसरे, ॲड.एम.एम. गळदगे, प्रा.संभाजीराव जाधव या सहकारी संघटकांच्या निकट सहवासातून मिळाला. या सर्वांत कॉम्रेड पानसरेंचे स्थान महामेरूचे राहिले आहे.

कॉम्रेड पानसरेंनी चळवळीत केलेले प्रबोधन भाषणांपेक्षा अधिक प्रभावी राहिले ते त्यांच्या कृतिशील वस्तुपाठामुळे. साधी राहणी, साधे खाणे, साधे बोलणे हे सारे त्यांच्या बहुजनकेंद्री संस्कृतीचे अपत्य म्हणावे लागेल. चारचौघांची बैठकसभा, असली की टेबलावर शेरभर चुरमुरे पसरायचे, त्यावर कोळवंभर शेंगदाणे टाकायचे. आणि मग मुठी मारत ते ज्या मुष्टियुद्धाचे धडे द्यायचे, ते नामी-गिरामी वस्तादाचे अपराजित डाव असत. त्यामुळे रणनीतीसाठी त्यांना कधी मोहरे जमवावे लागले नाहीत. त्यांच्या बुद्धिबळाचा पट २४ X ७ अंथरलेला असायचा. पटावर गरजेनुरूप प्यादी असत. हातचा ठेवून पत्त्याचा डाव त्यांनी खेळला नाही. अर्जुनाप्रमाणे मत्स्यभेद... प्रतिमागी शक्तीशी मुकाबला, हे त्यांच्या लढाईचे अटळ व अटल गृहीत होते.

Tags: सुनीलकुमार लवटे कॉम्रेड गोविंद पानसरे मृत्युलेख कम्युनिस्ट कोल्हापूर Obitury Sunilkumar Lavate Communist Kolhapur Comrade Govind Pansare weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुनीलकुमार लवटे,  कोल्हापूर, महाराष्ट्र

माजी प्राध्यापक, प्राचार्य, लेखक, हिंदी भाषा प्रचारक, समाजसेवक 


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके