डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

नांदेड ते हार्वर्ड व्हाया इंग्लंड, स्वित्झर्लंड, द. आफ्रिका

आजूबाजूला सगळं कमी दर्जाचं शिक्षण असल्यामुळे शेवटच्या वर्षी मी ठरवलं की,  मेरेको फॉरेन मे जाने का है! आणि बाबासाहेबांकडून मिळणारी एक प्रेरणा असतेच.  पण तोपर्यंत मला बॉलीवुड आणि माझ्या झोपडपट्टीच्या बाहेर काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे लंडन, कोलंबिया, न्यूयॉर्क हे सगळं कुठे आहे- काही ठाऊक नव्हतं. मला हे सगळं एकच वाटायचं. मग मी शेवटच्या वर्षी ठरवलं की, परदेशात जायचं. पण कुठे जायचं? इंग्लंडला. का? कारण बाबासाहेब गेले होते. आणि दुसरं काही नाव माहीतच नव्हतं. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं  म्हणून तो देश माहीत; अफगाण्यांनी केलं असतं तर कदाचित अफगाणला गेलो असतो!

प्रश्न - वर्षभरापूर्वी ‘कास्ट मॅटर्स’ नावाचं पुस्तक पेंग्विन या जागतिक स्तरावरच्या एका मोठ्या प्रकाशन संस्थेकडून इंग्लिशमध्ये आलं. भारतातल्या व भारताबाहेरच्या बुद्धिवंतांनी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या महनीय लोकांनी या पुस्तकाचं व तुझ्या सगळ्या वाटचालीचंही कौतुक केलं. लवकरच ते मराठी आणि अन्य काही भाषांमध्ये प्रसिद्ध होईल. त्यानिमित्ताने केवळ त्या पुस्तकावर तुझी एक मुलाखत आपण करणार आहोतच. पण त्या पुस्तकाआधीच्या- नांदेडमधून निघून इंग्लंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका असा प्रवास करत सध्या अमेरिकेमध्ये असलेल्या- सूरजविषयी आम्हाला कुतूहल आहे. त्या दृष्टीने माझा पहिला प्रश्न असा की, नांदेडमध्ये असताना जेव्हा तुला स्वतःविषयी, कुटुंबाविषयी, सभोवतालाविषयी काही समजू लागलं- प्रश्न पडू लागले; त्या काळाविषयी आम्हाला थोडं सांग.

- पहिल्यांदा मला हे सांगायला हवं की, साधनाच्या डाएटवर आम्ही घरी वाढलो. माझे वडील साधना नियमित वाचत असत. बामसेफ, राजा ढाले, ज.वि. पोवार यांची दलित पॅन्थर अशा चळवळींमध्ये माझे वडील सक्रिय होते. साधना ही साने गुरुजींपासून डॉ.नरेंद्र दाभोलकरांपर्यंत अशाच एका रॅशनल विचारधारेतून, ‘अँटिकास्ट लेन्स’मधून काम करत आलेली आहे. आता माझे वडील हयात नाहीत; पण ते असते तर त्यांना खूप अभिमान वाटला असता की, माझ्या मुलाची मुलाखत साधनात येत आहे. कारण जगातल्या कुठल्याही भाषेत तुम्ही काम करत असलात, तरी शेवटी मायबोली तुमच्या नसानसांत असते. तुमचे दृष्टिकोन, विचार, पोशाख कदाचित बदलतील; पण तुमचा डीएनए बदलत नाही. माझा डीएनए मराठमोळा आहे. त्यामुळे माझी जी काही वैचारिक जडण-घडण आहे, तिच्याविषयी बोलताना आपल्याला महाराष्ट्रातल्या विचारांचा आढावा घ्यावा लागेल, कारण त्यामध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांचे पुरोगामी व प्रगल्भ विचार आहेत; श्रीधरपंत टिळक, सहस्रबुद्धे आहेत. माझा जो जातिनिर्मूलनाचा विचार आहे, तो सर्व जातींचा मिळून आहे आणि त्यातला प्रॅग्मॅटिक दृष्टिकोन या सगळ्यांकडून आलेला आहे.

आणखी एक गोष्ट मी नमूद करू इच्छितो. माझी मराठी ही मराठवाड्यातली, नांदेडची आहे. नामांतर चळवळ असो, दंगल असो किंवा आजही शेतकऱ्यांचं होत असलेलं नुकसान असो; मराठवाड्याकडे कायम दुर्लक्ष झालेलं आहे. मी मराठवाड्यातल्या एका मागासलेल्या भागातून आलेलो आहे. पण मला त्याचा खूप अभिमान आहे. युरोपातील प्रबोधनकाळात इमॅन्युअल कान्टने स्पेस आणि टाइम यांच्याविषयीचे विचार खूप सूक्ष्मपणे मांडले. त्याच्या मते ‘फिजिकल स्पेस’प्रमाणेच ‘मेंटल स्पेस’ किंवा ‘स्पिरिचुअल स्पेस’सुद्धा असते किंवा ‘स्पेस ॲज ॲन इमॅजिनेशन’ असते. माझ्या त्यातल्या कुठल्या तरी एका ‘स्पेस’मध्ये माझी मायभूमी कायम असते. पण तिथे आजही न्याय नाही. आजही मंत्रालयात जाऊन आपल्या अडी-अडचणी मांडण्यासाठी तिथल्या लोकांना 12 तास रात्रीचा प्रवास करावा लागतो. असं तर निजामाच्या काळातही नव्हतं. त्यामुळे आता या मुलाखतीमुळे माझ्या भागातल्या तरुण-तरुणींना काही प्रेरणा मिळत असेल, तर माझ्यासाठी ते खूप आनंदाचं आहे. माझ्या लहानपणाविषयी बोलण्याआधी मी ही सगळी पार्श्वभूमी सांगितली, कारण हे सगळे घटक माझ्या जडण-घडणीला कारणीभूत आहेत.

नांदेडमध्ये एक उस्मानशाही मिल होती. तिथे माझे आजोबा कामगार होते. त्यांचं नाव विश्वनाथ. एका लहान गावातून येऊन ते नांदेडला स्थायिक झाले होते. शहर संपतं, तिथे पूर्वी दलित जाऊन राहत. त्याच पुढे वस्त्या झाल्या. माझी आजी अजूनही सांगते की, आपण जिथे राहतो तिथे पूर्वी ‘ढव’ होता. महार असूनही आजोबांना लिहिता-वाचता यायचं, त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांना कौतुक होतं. या सगळ्या लोकांनी जिवंत राहून आणि स्वाभिमानाने आपली लेकरं जगवूनच व्यवस्थेविरुद्ध लढा दिला, असं मला वाटतं. तोच स्वाभिमान त्यांच्याकडून आमच्या पिढीपर्यंत आला आहे. त्यामुळे मला स्वतःविषयी वाटतं की, I am an extension of my ancestor's unfulfilled desires. मेणबत्तीचा प्रकाश जिथवर गेला आणि संपला, त्याच्यापुढची ऊर्जा मी आहे!

माझं जे मराठी पुस्तक येणार आहे ते मला संत चोखामेळा, फुले, शाहू, आंबेडकर, श्रीधरपंत टिळक, ज.वि. पवार, राजा ढाले अशा समस्त विचारवंतांना अर्पण करायचं होतं. पण काल एकदम माझ्या लक्षात आलं की, हे पुस्तक मी माझ्या आज्यांसाठी लिहितो आहे.  माझी आजी आणि आई माझं पुस्तक वाचू शकेल, म्हणून मी आनंदी आहे. मी जिथे मुलाखत दिली नाही असं आता अमेरिकेचं एकही मीडिया स्टेशन उरलं नसेल. हे पुस्तक तर पेंग्विनने काढलं आणि त्याची प्रशंसा अमर्त्य सेन यांनी केली. काही दिवसांपूर्वीच कर्नाटकी गायक टी.एम.कृष्णा आणि माझी एका फोरमवर चर्चा घडवून आणली होती. तिथे आम्ही ‘कास्ट अँड कल्चर’ या विषयावर बोलत होतो. या सगळ्याचा अभिमान माझी आई व आजीला आहे. पण इंग्रजीत असल्यामुळे त्यांना ते कळत नाही, याची मला सारखी रुखरुख असते. त्यामुळे आता हे पुस्तक मी तीन महिलांना अर्पण करणार आहे- माझ्या वडिलांची आई चंद्रभागाबाई, आईची आई सरुबाई आणि माझी आई रोहिणी. समाज आणि आपलं घर या दोन्हींकडेही लक्ष दिलं पाहिजे, असं मला वाटतं. आपल्याकडे युवक घरच्यांकडे दुर्लक्ष करून समाजाचं काम करण्याचा प्रयत्न करतात, तो खोटेपणा आहे. मला ते प्रामाणिक वाटत नाही आणि हे माझं व्यक्तिगत मत आहे. यावर चर्चा करता येईल.

माझ्या आईचे वडील निवृत्ती पाईकराव हे विदर्भातल्या मागासलेल्या यवतमाळ जिल्ह्यात, पुसद तालुक्यात कॉन्ट्रॅक्टर होते. ते रस्ते बांधायचे. माझी आजी सरुबाई पाचवी-सहावीपर्यंत शिकलेली होती. सहा लेकरं झाली त्यांना. माझी आई भावंडांत तिसरी. पुढे काही आजाराने निवृत्ती वारले. त्यानंतर त्या घराची वेगळीच कहाणी सुरू झाली. माझा मामा मुंबईला पळून गेला आणि मुंबईच्या गँगस्टरसंस्कृतीत त्याचा उदय झाला. मी स्वतः मामाकडे लहानपणी जायचो. तेव्हा रिगल सिनेमाच्या बाहेर फूटपाथवर झोपायचो,  'Rags to riches' अशी आता परिस्थिती बदलली असे काही लोक म्हणू शकतात.

आई आणि वडील यांची पार्श्वभूमी अशी आहे. या दोन न्यूक्लियसमधून माझं बीज तयार झालेलं आहे. माझे वडील नववी पास होते. ते घरात सगळ्यात मोठे. आपल्याकडे थोरला मुलगाच परिवाराची काळजी घेतो आणि आजही आपल्याकडे घरची परिस्थिती हलाखीची असेल, तर मग शिक्षण हे प्रिमियम आहे. पण अल्बर्ट आइन्स्टाईन, लिओ टॉलस्टॉय यांच्यापासून वि.स. खांडेकर, पु.ल.देशपांडे, भालचंद्र नेमाडे, दलित साहित्य, दलित नाट्य, दुर्गा भागवत असे त्यांचं वाचन होते. त्यामुळे मी स्वतः मराठीतलं फारसं साहित्य वाचलेलं नसलं, तरी ती नावं मला परिचित होती. वडील मला ग्रेसची कविता वाचायला द्यायचे. आता तो ग्रेसचा इतका complicated discourse! आजही त्या कवितेतलं मला काही कळलं तर मी स्वतःला बक्षीस देईन, असं वाटतं. रात्री घरात आम्ही झोपलेलो असायचो आणि मधेच वडिलांच्या हसण्याचा आवाज यायचा. उठून पाहिलं तर- वडील ‘कोसला’ वगैरे वाचून एखाद्या प्रसंगावर हसत असायचे. भरपूर वाचणाऱ्या व्यक्तीला स्वतःबद्दल एक आत्मविश्वास असतो, तसा तो वडलांपाशी होता.

नववी शिकल्यानंतर ते एका लॉजवर कामाला लागले. तिथे फरशी पुसायला, गिऱ्हाइकाने बेल वाजवल्यानंतर काय हवं-नको ते बघायला जे लॉजबॉय असतात- तसं त्यांचं काम होतं. ही गोष्ट साधारण सत्तरीच्या दशकातली. तिथे जवळच बॉम्बे मर्कंटाईल नावाची एक बँक होती.  तिथे एक मुसलमान अधिकारी यायचा. माझ्या वडलांचं नाव मिलिंद. या कुमारवयातल्या मिलिंदवर त्या साहेबाची मर्जी बसली. (आज मी 29 देशांमध्ये गेलेलो आहे. 29 देशांच्या पंचतारांकित, सप्ततारांकित हॉटेलांमध्ये राहिलेलो आहे. तिथे मी असा मिलिंद शोधायचा प्रयत्न करतो आणि अशी प्रेरणा असणारी मुलं मला दिसतातही.) साहेबांनी मिलिंदच्या कामावर खूश होऊन त्याला बँकेत चपराशाची नोकरी दिली. बाबासाहेब म्हणायचे ना की- दलिताच्या पोटात जन्मलेलं पोरगं विचार करतं की, आपण नगरपालिकेत चपराशी झालं पाहिजे आणि ब्राह्मणाचं पोरगं विचार करतं की, आपण आय.ए.एस झालं पाहिजे. त्यामुळे आमच्या घरातलेही सगळे खूश झाले, ‘पोरगा चपराशी म्हणून लागला!’ त्यानंतर साधारण बत्तीसेक वर्षं त्यांनी त्या बँकेत चपराशी या पदावर काम केलं. प्यून कम वॉचमन असे त्यांचं पद होतं त्या काळी.

माझी आई शाळेत जायची, त्या वयातच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडील गेल्यानंतर काही महिन्यांतच मुलीचं लग्न करायचं असतं, नाही तर पुढे काही वर्षं थांबावं लागतं, अशी आपल्याकडची स्त्री-विरोधी प्रथा आहे. त्यामुळे चुलत भाऊ आणि काका यांनी माझ्या आईच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न लावून दिलं. तेव्हा ती सातवीला जाणारी 14 वर्षांची पोर होती. सरूबाईच्या मनात होतं की, आपल्या मुलीने शिकलं पाहिजे, कारण तिचं स्वतःचं शिक्षणही याच कारणामुळे झालेलं नव्हतं. पण तिला दम देऊन गप्प करण्यात आलं. आईप्रमाणे माझ्या वडिलांचीही त्या वयात लग्न करायची इच्छा नव्हती. आईने नंतर मला सांगितलं की, ‘पहिल्या भेटीत वडील येऊन तिला म्हणाले की- मला लग्न करायची इच्छा नाही, घरचे मात्र लग्न लावून देत आहेत. तुझी इच्छा नसेल तर माझं तुला समर्थन आहे.’ आता सोयरिकीला आलेल्या मुलानेच असं म्हणणं हे केवढं प्रोग्रेसिव्ह! पण नोकरीवाला पोरगा म्हटल्यावर आपल्याकडे सगळेच खूश. त्यामुळे दोघांचं लग्न झालं. त्यानंतर आम्ही तिघे पैदा झालो. (या पुस्तकातही मी त्यातलं थोडं लिहिलं आहे.)

लग्नानंतर आपल्याकडे मुलीला नवऱ्याच्या सगळ्या परिवाराची परीक्षा पास करावी लागते. त्यात घर दोन खोल्यांचं. यांना प्रायव्हसी कुठून मिळणार? लग्न करून ती विदर्भातून मराठवाड्यात आलेली होती. तिची बोली वेगळी, जेवणाची चव वेगळी. शंभर किलोमीटर दूर म्हणजे, त्या काळात पाच तास लागायचे. दुसऱ्या देशातूनच आल्यासारखं होतं ते तिला! नवरा कायम नोकरीवर राहायचा. अशात तिचं पहिलं बाळंतपण कमी वयात झालं. एके दिवशी तिची तब्येत अचानक खराब झाली. घरातल्या कुणाला काय करायचं सुचेना. मग तिला सरकारी दवाखान्यात नेलं. तिच्या ज्या प्रसूतीपूर्वीच्या व्यक्तिगत वेदना आहेत, त्यांना एक पुरुष म्हणून मीही जबाबदार आहे, असं मला नेहमी वाटतं. या सगळ्या मेडिकल इमर्जन्सीमधूनही माझी आई जगली आणि तिला पहिला मुलगा झाला. त्यामुळे अर्थातच घरात खुशी झाली. पण सात ते आठ दिवसांतच ते मूल दगावलं. ही 15-16 वर्षांची मुलगी... या सगळ्यावर काय प्रतिक्रिया द्यायची, हेही तिला लक्षात आलं नाही. किती तरी वेळ ती धक्क्यातच होती. त्यामुळे दुसऱ्या प्रेग्नन्सीवेळी वडिलांनी खूपच काळजी घेतली; कदाचित अतिकाळजी घेतली. कारण जन्माला आल्यानंतर मी इतका सुदृढ होतो की, त्या काळात लहान मुलांसाठी ज्या बांबूच्या खुर्च्या यायच्या, त्यात मी मावायचोच नाही. जिल्ह्यातून मला सुदृढ बालक म्हणून पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे पुरस्कारांची परंपरा जन्मल्यापासूनच आहे! 

नांदेडमध्ये आंबेडकरनगरच्या ‘जनता हाउसिंग सोसायटी’मध्ये माझं बालपण गेलं. थोडंफार सुशिक्षित असलेल्या, नोकरी करणाऱ्या दलित समाजातल्या लोकांनी बांधलेली ती हाउसिंग सोसायटी होती. त्यातला एक प्लॉट आजोबांनी घेतला होता. त्यानंतर पुढे दोन पिढ्या आमच्याकडे जमीनच नाही. त्यामुळे जमिनीच्या हक्कासंबंधी मी खूप संवेदनशील आहे. खरं तर तो आंबेडकरनगरचा एक्स्टेंडेड एरिया होता. आंबेडकरनगर हा टिपिकल स्लम एरिया. गरिबीतून आलेलं फ्रस्ट्रेशन, मारामाऱ्या, क्राईम, नशेबाजी, टेरर- असं सगळं तिथे चालायचं. पाकीटमार, दरोडेखोर वगैरे तिथे राहायचे. पूर्वेला आंबेडकरनगर आणि पश्चिमेला जय भीमनगर अशा दोन खूँखार वस्त्या आणि त्यांच्यामध्ये सँडविच्ड अशी आमची सोसायटी. सोसायटी नावालाच, झोपडपट्टीच होती ती! नंतर निदान बाकीच्यांनी तरी सिमेंटची घरं बांधली, पण मी पत्र्याच्या खोलीतच वाढलो. त्यामुळे आजही मी जेव्हा झोपेतून उठतो आणि बघतो की, बाहेर पाऊस झाला आहे; तेव्हा मला वाटतं की, मी एक नवं जीवन जगलो त्या रात्री. कारण पावसाळा सुरू झाला की, त्याची पहिली चाहूल आम्हाला लागायची. मग रात्रभर पाऊस बघत पडून राहायचं. हेच जीवन जगलो मी बाविसाव्या वर्षापर्यंत. 

माझ्या वडिलांनी एक महत्त्वाची गोष्ट केली. नांदेड शहरातल्या सगळ्यात चांगल्या शाळेत त्यांनी मला टाकलं. केरळ-तमिळनाडू येथून आलेल्या ख्रिश्चन मिशनऱ्यांनी ती इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू केली होती. पण त्या शाळेचा एक वेगळाच क्लास होता आणि मी तिथे ब्लॅकशिप होतो. माझ्या मित्रांचे आई-वडील त्यांना सांगायचे की, या मुलाबरोबर वेळ घालवू नकोस. त्यामुळे शाळा सुटल्यानंतर मी पुन्हा आपल्या झोपडपट्टीतल्या पोरांसोबतच राहायचो. वडिलांचा पगार जेमतेम तीन हजार होता. घरात माझ्यापाठचा एक भाऊ आणि बहीण. वडिलांच्या ऑफिसमधले क्लार्क लेव्हलचे अधिकारीदेखील पूर्वी आपल्या मुलांना ‘स्वस्त’ शाळांमध्ये घालायचे, पण माझ्या वडिलांकडे पाहून त्यांनी आपल्या मुलांना चांगल्या शाळांमध्ये घालायला सुरुवात केली. माझी आई सांगते की, लोक त्यांना म्हणायचे- ‘तुझ्या घरावर पत्रे आहेत आणि यांची फी कोण भरंल?’ नव्वदीच्या काळात आपल्याकडे जागतिकीकरणामुळे जो नवउदारमतवाद येत होता, त्यामुळे लोक डिफेन्सिव्ह झाले होते. प्रादेशिक भाषांची लहर वाढली होती. पण माझ्या वडिलांनी सगळ्यात मोठी मेहेरबानी ही केली की, मला इंग्रजी माध्यमात घातलं. निदान मला इंग्रजी वाचता-बोलता यायला लागलं.

प्रश्न - तू हायस्कूलला जाईपर्यंतच्या कालखंडात तुझ्या आवडी-निवडी काय होत्या? तू काही वाचत होतास का? वडील आणि कुटुंबातील लोक यांच्याशिवाय कुणी प्रेरणास्थान होतं का? कोणकोणत्या गोष्टी करत होतास तू या काळात?

- आमच्याकडे एक उन्हाळी शिबिर असायचं. त्यात बऱ्यापैकी सगळे सवर्ण लोक असायचे. दलित कुटुंबातला एकटाच होतो. पण ते सगळे लोक चांगले होते. तिथे खेळ, नाटक वगैरे चालायचं. वडलांनी मला तिथे आवर्जून पाठवलं होतं. त्यासाठी त्यांनी पैसे कुठून मिळवले होते, कुणास ठाऊक! पण त्या काळात आपल्या अंगी काही गुण आहेत, याचं मला भानच नव्हतं. तू चांगलं लिहितोस-बोलतोस, असं म्हणणारंही कुणी नव्हतं. त्यामुळे ते कसं कळणार? तू कशात वाईट आहेस, हे सांगणारे मात्र भरपूर लोक होते. अशा वेळी तुम्हाला स्वतःलाच घासावं लागतं. आणि इतक्या नकारात्मक वातावरणात राहत असताना स्वतःबद्दल सकारात्मक विचार करणं ही क्रांतीच असते!

शाळेत असताना वर्गात क्लार्क अचानक यायचा आणि ज्याने फी भरलेली नाही, त्याला उठवून त्याचा अपमान करायचा. पण तो सोसण्याशिवाय पर्याय काय? मग घरी येऊन रडायचो. वडीलही हतबल. मी दुसरीत असताना वडलांना संधिवात झाला. तेव्हापासून  मृत्यूपर्यंत त्यांना हा आजार होता. त्यामुळे त्यांना मी हमेशा पलंगावरच पाहिलेलं आहे. घरातलं वातावरण विचाराला डिस्प्रेसिव्हच होतं. एका खोलीत आम्ही पाच जण. वडील एका कोपऱ्यात पलंगावर. त्याच्या अंगावर कायम चादर, अंगात स्वेटर, डोक्यावर टोपी. रोज रात्री त्यांना मालिश करून झोपवायची जबाबदारी आईकडे असायची. पलंगसुद्धा एका लोकल नवशिक्या सुताराकडून बनवून घेतला होता. तो सारखा कुरकुरत राहायचा. कधी मोडेल याचा नेमच नाही. समोर बसून आई मेथी खुडतेय किंवा तांदूळ निवडतेय. भाऊ चौदा इंची ब्लॅक अँड व्हाइट टीव्हीवर केबल आणण्याचा प्रयत्न करतोय आणि बहीण चित्रं काढण्यात किंवा कविता लिहिण्यात गुंग आहे- असं आमच्या घरातलं टिपिकल चित्र असायचं.

त्या काळात मी साहित्य आणि लेखनाबाबत मानसिक दृष्ट्या तयारच नव्हतो. बिलकुल आवड नव्हती मला तेव्हा. आणि वडील इतकं जड काही तरी वाचायला द्यायचे की, कशाला आवड वाटेल मुलाला (unless the child is genius)? आपली आवडसुद्धा अवतीभवतीच्या वातावरणाला धरून असते, असं मला वाटतं. आजूबाजूचे मित्र वाचत असतील, तर तुम्ही वाचता. इथे आमचे मित्रगण मारामाऱ्या आणि पाकीटमारीत! Your environment very much shapes you. आणि हे ओळखून वडिलांनी बाजूच्या कॉलनीत दोन खोल्या भाड्याने घेतल्या, तिथे आम्ही काही काळ राहिलोदेखील, पण ते आजारी पडल्यामुळे पैसे जमवणं कठीण झालं आणि आम्ही परत जनता कॉलनीमध्ये आलो. त्या काळात मला चाचा चौधरीसारख्या डायमंड कॉमिक्स खूप आवडायच्या. कॉमिक्समुळेच मला त्यातल्या त्यात वाचण्याची सवय लागली. पण कॉमिक्सचा जॉन्र एवढा समृध्द आहे, हे मात्र मला परदेशात आल्यानंतर कळलं. वडिलांनी तर मला डिप्राईव्हच केलं या आवडीपासून. ते म्हणायचे- तू वि.स.खांडेकर वाच, आंबेडकरांचं चरित्र वाच, फुल्यांचं साहित्य वाच. त्या काळात ‘मटा’मध्ये एक पुरवणी यायची. त्यात लडाखमध्ये असलेल्या एका मुलाची कहाणी होती. वडिलांनी ती मला इंग्रजीमध्ये भाषांतरित करायला सांगितली. तो भाषांतराचा माझा पहिला प्रयोग. साहित्याशी या मुलाचं नातं राहिलं पाहिजे, असा वडिलांचा उद्देश होता या सगळ्यामागे. कधी ते त्यांनी प्रलोभन किंवा आमिष दाखवून केलं. पण मुलांचं आणि वडिलांचं नातंच असं असतं की, त्यांनी काही सांगितलं आणि मुलांनी त्यांचं ऐकलं तर जादूच झाली म्हणायला पाहिजे! ते सांगायचे आणि मी अजिबात वाचायचो नाही. त्यामुळे दहावीपर्यंत माझं वाचन फक्त शिक्षणापुरतं होतं. त्यामुळे मला आज असं प्रकर्षाने वाटतं की, आपली शिक्षणव्यवस्था सुधारली पाहिजे. आपल्याकडे सीबीएससीमध्ये काही प्रमाणात तसं आहे कदाचित. अभ्यासक्रमामध्ये कादंबरी वगैरे वाचायला देतात. अमेरिकेमध्ये असाइनमेंटला पुस्तकंच देतात. (आता इथे माझीच पुस्तकं असाइनमेंटला विद्यार्थ्यांना वाचायला दिलेली आहेत.) मी कविता करायचो त्या काळात आणि वाचायचोही. माझ्या वडिलांनी पुस्तकांसाठी दोन कपाटं घेतली होती. त्यावर आई खूप चिडलेली होती; कारण तिला वाटलं होतं की, ती कपाटं कपडे ठेवायला असतील. (अजूनही आमच्याकडे आहेत ती.) कृष्णवर्णीयांच्या कामाबाबत वडील खूप संवेदनशील होते. कोफी अन्नान हे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस झाले, तेव्हा त्याची बातमी दूरदर्शनवर सकाळच्या बातम्यांमध्ये दाखवली होती. वडिलांनी ते मला आवर्जून दाखवलं होतं. या सगळ्याचं बीज कुठे तरी माझ्यात रुजत गेलं. पण शाळेबाहेर मला फारसे मित्र नव्हते. शाळेमध्ये मी जे पाच-सहा तास घालवायचो, तो माझा बेस्ट टाइम असायचा. त्यामुळे शाळेतली माझी उपस्थिती 96-97 टक्के होती. घरी मी थांबायचोच नाही. घरी थांबून करणार काय?

प्रश्न - तुमच्याकडे वर्तमानपत्रं कुठली यायची? तुझं एकूण मराठी वाचन वगैरे होतं का? कारण इंग्लिश माध्यमाच्या मुलांना हल्ली मराठी वाचता येत नाही...

- माझी संस्कृतीच मराठी होती, त्यामुळे मी इंग्लिश शाळेत गेलो तरी माझं इंग्लिश काही फार चांगलं नव्हतं. इंग्लंडला जाऊन जेव्हा मी माझा पहिला निबंध लिहिला, तेव्हा माझ्या प्राध्यापकाने माझा जवळपास अपमानच केला. कारण मी ज्या इंग्लिश शाळेत शिकलो होतो, तिचा दर्जा फारच कमी होता. शाळेत मला मराठी आणि हिंदीमध्ये हमेशा चांगले मार्क मिळायचे. आमच्या घरी नऊ वर्तमानपत्रं यायची आणि जवळपास चार साप्ताहिकं, मासिकं. दिवाळी अंक तर बहुतेक सगळेच. रोज तीन लोकल वर्तमानपत्रं यायची : प्रजावाणी, गोदातीर आणि लोकपत्र. त्याशिवाय काही प्रादेशिक असायची. त्यातही ‘मटा’ वडिलांचा सगळ्यात आवडता. तो एक दिवस लेट यायचा आणि मटा वाचतात म्हणून पेपर टाकणारा माणूस वडिलांचा आदर करायचा. अलीकडच्या काळात लोकमत, पुढारी आणि पुण्यनगरी येत होते. आणखीही एक-दोन होते. आमच्या खोलीत सकाळचं चित्र असं राहायचं की, घरातले पाच लोक आणि त्याशिवाय चुलत्यांच्या घरातलं कुणी तरी असे सात-आठ लोक पेपर वाचत आहेत. परदेशात आल्यानंतर जी गोष्ट मी सगळ्यात जास्त मिस केली, ती म्हणजे- एवढे पेपर वाचणे! आई ओरडायची की, ठेवा ते पेपर आणि आता सकाळच्या कामाला लागा. पण नंतर ती स्वतःच सगळे पेपर घेऊन बसायची.

वडिलांना नोकरी नव्हती, त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी मला पेपर विकायला लावलं होतं. दोन वर्षं मी रस्त्यावर पेपर विकायचो. सकाळी पाचला उठून पेपर घेऊन जायला लागायचं. पण पेपर पूर्ण विकले गेले तरी तीन-चार लोकांचं कमिशन वजा जाऊन मला त्यातून सात-आठ रुपयेच मिळायचे. त्यामुळे वडील सोडून आम्ही बाकीचे अनपढ लोक विचार करायचो की, किराणा मालाचं एखादं दुकान सुरू करावं, म्हणजे झटपट पैसे मिळतील. त्यासाठी आम्ही वडिलांचा खूप मानसिक छळ केला, पण त्यांनी काही ऐकलं नाही. आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रमांच्या ठिकाणी बाहेर पुस्तकं विक्रीसाठी ठेवतो, तसा मी वडिलांसोबत ताडपत्री टाकून पुस्तकं विकत बसायचो.

प्रश्न - सामान्यतः ज्याच्यातून घर चालवण्यासाठी जास्त पैसे मिळतील, असं काम करायला लोक प्राधान्य देतात. पण इथे असं दिसतं की- त्यांना स्वतःची बौद्धिक, सांस्कृतिक भूक महत्त्वाची वाटत होती आणि त्याला रिलेट होईल असं पैसे मिळवण्याचं साधन किंवा व्यवसाय ते करत होते.

- त्यांनी हा संस्कारच दिला की, तुला व्यवसाय करायचाच असेल तर तो ह्या क्षेत्रात कर. सलून चालवून, दुकान चालवून, तेल-साखर विकून काय होणार आहे? आमचं सगळं घर माझे चुलते आणि मामा यांनी चालवलं. आई तिच्या भावाकडे जाऊन पैसे मागायची. भाऊ बिचारा काबाडकष्ट करून पैसे द्यायचा, काका द्यायचे. पण या सगळ्यात पिचत होती ती माझी आई. कारण आपल्याकडे बाईलाच सगळा तोल सांभाळावा लागतो. पुरुष एखाद वेळेस अपमान विसरून जातो, पण बाईच्या मनाला ते लागून राहतं.

पण मला इतरांपेक्षा माझ्या बाबतीत हा फरक वाटतो की- माझे वडील साहित्य, संस्कृती, कला या क्षेत्रांपासून स्वतः कधीही दूर राहिले नाहीत. आमच्यामध्येही काही प्रमाणात तरी ते येईल, याची खबरदारी त्यांनी घेतली. पुस्तकविक्रीचा व्यवसाय करणं हे आजही किती अवघड आहे. तेव्हा तर पुस्तक किंवा पेपर विकून दहा-बारा रुपयेच मिळायचे. मी निराश व्हायचो, अपमानकारक वाटायचं. (आणि आज मी स्वतःच पुस्तकं लिहितो. जगभरात मला पुस्तकावरच बोलायला बोलवतात.)

मराठीत मला सगळ्यात आवडलेलं पुस्तक म्हणजे विश्वास पाटलांचं ‘महानायक’. ते वाचल्यानंतर वाटलं, ‘क्या बात है! शब्दांमध्ये इतकी ताकद असते?’ त्यानंतर विश्वास पाटील माझे फेव्हरिट झाले. लायब्ररीत बसून मी ते वाचलं होतं. माझ्या वडिलांनी नांदेड नगरपालिकेच्या त्या शासकीय ग्रंथलयाचं सभासदत्व कधीही बंद पडू दिलं नाही. त्यासाठी महिन्याला दीड-दोनशे रुपये लागायचे. पण पगारच नसेल, तर एवढेही पैसे जास्त होतात. तरीही लोकांकडून मागून ते पैसे भरायचे आणि मला तिथे पाठवायचे. दहावी-अकरावीत असताना तिथे मी आउटलुक, टाइमपासून फोटोग्राफीच्या नियतकालिकांपर्यंत सगळं वाचायचो.

प्रश्न - तू सुरुवातीला म्हणालास की, तुझं वाचन कमी होतं. वडील गंभीर पुस्तकं वाचायला देत होते. पण तुमच्या घरी इतकी वर्तमानपत्रं इतक्या नियमितपणे येत होती. त्यामुळे प्रादेशिक, राष्ट्रीय, काही प्रमाणात आंतरराष्ट्रीय स्तरावरचं तुझं ओरिएंटेशन तयार झालं असणार. त्याशिवाय काही निवडक पुस्तकं, ग्रंथालयातली नियतकालिकं तू वाचत होतास. म्हणजे तू समजतोस तेवढं तुझं दहावीपर्यंतचं वाचन कमी नव्हतं. बेस तर चांगलाच तयार झाला होता. शिवाय पुस्तकविक्रीच्या निमित्ताने वेगवेगळी पुस्तकं हाताळली जात असणार.

- मी कादंबऱ्या वगैरे वाचत नव्हतो. पण वडील मला जी पुस्तकं देत होते, ती त्यात पूर्ण लक्ष घालून वाचावी लागत होती. ती चेतन भगत टाईप पुस्तकं थोडीच होती! पण माझा आवडता जॉन्र कॉमिक्स होता आणि वडील ते वाचू देत नव्हते. मी वैचारिक पुस्तकं वाचावीत, अशी बहुतेक त्यांची इच्छा होती.

प्रश्न - त्यांना स्वाभाविकपणे घाई झालेली असणार! ते भरपूर वाचन करत होते आणि त्यात तू मोठा मुलगा. त्यामुळे तू तेव्हापासूनच गंभीर जागतिक वाङ्‌मय  वाचावंस, असं त्यांना वाटत असणार आणि तेव्हा तुझं ते वय नव्हतं. पण तू औरस-चौरस पुस्तकांच्या वातावरणात होतास.

- आमच्याकडे भिंतीच पुस्तकांच्या होत्या. त्यामुळे थंडी, वारा, उन, पाऊस सगळे पुस्तकांना स्पर्श करूनच यायचे!

प्रश्न - आता नांदेडमधला तुझा पुढचा तीन ते पाच वर्षांचा कालखंड- तू परदेशी जायचं ठरवलंस तोपर्यंतचा.

- दहावीला मला 66 (की 68?) टक्के होते. माझ्या धाकट्या चुलत्यांनी दोन-तीन किलोमीटर सायकलवर जाऊन चांगल्या मारवाड्याच्या दुकानातून पेढे आणले होते, कारण बापजन्मात आमच्या घरी कुणी मॅट्रिक झालेलं नव्हतं! मी इंग्रजी माध्यमात जात असल्यामुळे माझा अभिमान घरातल्या प्रत्येकाला होता. बोलणाऱ्या पाळीव पोपटाला करतात तसं मला करायचे सगळे. आई म्हणायची, तू ह्याला इंग्रजीत विचार ना ह्याचं नाव काय? मी म्हणायचो, what is your name? त्यावर ती म्हणायची- बघ बाई, कसा घडघड बोलतो. दहावीनंतर तर माझं खूपच कौतुक झालं. माझ्याबरोबरचा प्रत्येक विद्यार्थी सायन्स आणि कॉमर्सला ॲडमिशन घेत होता. भारतात अजूनही कुणी आटर्‌सला जायला उत्सुक नसतं. (पण इथे हार्वर्डमध्ये तो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. भारतापेक्षा पूर्ण वेगळं चित्र आहे इथे.) म्हणून भारतात मानवता नसलेली संस्कृती आपण तयार करत आहोत. नंबर्स आणि रोबोट्‌सनी मानवता थोडीच तयार होते? पण दहावीनंतर सगळे मित्र चालले होते, म्हणून मीही सायन्सला गेलो. नुकताच वयात येत होतो. खोडकर होतो. त्यामुळे गुंडागर्दी करायचो. छोटी गँग होती माझी. पण मी कधीही कुठलंही शस्त्र वापरलं नाही. बाकीची मुलं वापरायची. आपण फिजिकल फाईटवर भरोसा ठेवायचो!  मार खायचोही आणि द्यायचोही.

नांदेडच्या सायन्स कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. आणि बारावीला 46 टक्के घेऊन कसाबसा पास झालो. हे सगळं मी उगाच करायचं म्हणून केलं. फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या विषयांची मला अजिबात आवड नव्हती. त्यामुळे वर्गात शिक्षक उर्दू किंवा अरबी शिकवत आहेत, असंच वाटायचं. आवड मारामारीची होती, तर मी क्रिमिनॉलॉजी किंवा सोशल सायन्स शिकायला हवं होतं. कारण अनुभव त्याचाच होता. प्रयोग वगैरे करण्याचं तर कल्चरच नाही. माझे जवळचे दोन्ही मित्र नापास झाले. पण दोघांचे वडील चांगल्या पदांवर. त्यामुळे त्यांनी पैसे देऊन पुढे प्रवेश घेतला. मला 46 टक्क्यांना कुठे प्रवेश मिळणार? अर्थात एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला प्रवेश देत होते. पण नंतर सायन्स कॉलेजला मायक्रोबायोलॉजीला प्रवेश मिळाला. पण दरम्यान आमच्याकडे यशवंत कॉलेजला चंदनशिवे नावाचे इंग्रजीचे एक सिनिअर प्राध्यापक होते. ते कांशीरामसोबत काम केलेले, बामसेफचे सिनिअर सहकारी होते. वडील म्हणाले, तू त्यांना भेटून ये. त्यांनी स्वतः लॉ केलेलं होतं. ते मला म्हणाले, तू काय करतो सायन्स करून? तुला तर त्याची आवड नाही. वडिलांचा मित्र म्हणजे वडिलांसारखाच. आणि मी तेव्हा 17-18 वयाचा. त्यामुळे मी त्यांचं ऐकून घेतलं. पण त्या काळात मला डॉनगिरी करत फिरण्यात इंटरेस्ट होता. दुसरं काही करून दाखवायला नव्हतंच ना! कविता करायचो लहानपणापासून. पण त्या वाचून दाखवल्या तर कोण कौतुक करणार? तसं वर्तुळच नव्हतं आजूबाजूला. शेवटी वडील म्हणाले, तू लॉसाठी प्रयत्न कर. मी म्हटलं, लॉ? कारण आमच्याकडचे वकील शंभर रुपये घेऊन केस लढवतात. त्यामुळे लॉबद्दलचा दृष्टिकोन नकारात्मकच होता. पण लॉ हे एवढं महत्त्वाचं क्षेत्र आहे; जेठमलानींसारखे वकील असतात;  कपिल सिब्बल, मनु सिंघवी असे वकील कॅबिनेटमध्ये होते. तेव्हा हे सगळं कुठे माहीत होतं?

मग पुन्हा वडिलांनी आमिष दाखवलं! ते म्हणाले, तुला शिक्षणासाठी लागतील तेवढे पैसे देतो. गाडी घेऊन देतो. खरं सांगायचं तर त्यासाठीच मी लॉला प्रवेश घेतला. वडिलांनी आमिष दाखवून माझी जिंदगी बनवली! पण तेव्हा लॉची फी किती होती? दीडशे रुपये फक्त. आणि मी घरी दहा हजार रुपये सांगितली. वडिलांशी खोटं बोललो. पण त्यांना सगळं माहीत होतं आणि हेही माहिती होतं की, मी ठेवून-ठेवून पैसे शेवटी घरातच ठेवणार. वडिलांनी आईलाही सांगितलं होतं की, तू त्याला काही बोलू नकोस. त्याला लॉ करू दे. नंतर तिने मला हे सांगितलं. पण त्यानंतर माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आयुष्य थोडं सकारात्मक व्हायला लागलं. हे क्षेत्र माझ्याशी थोडं तरी संबंधित होतं. लॉ इंग्रजीत होतं आणि ती भाषा आवडीची होती. त्यामुळे वर्गात मी कॉम्पिटीटेव्ह झालो.

प्रश्न - इंग्रजी माध्यम असल्यामुळे तुला लॉ करणं अवघड गेलं नसणार.

- हो. तो फायदा झाला. माझ्याबरोबरचे विद्यार्थी ग्रामीण भागातले होते. त्यातले खूप कमी जण इंग्रजीत बोलू शकायचे. वडिलांनी इंग्रजीची जी इन्व्हेस्टमेंट लहानपणी केली होती, तिचा फायदा मला लॉला आल्यावर मिळाला. मग मी वर्गात नेहमी पहिल्या-दुसऱ्या क्रमांकावरच राहायचो. नंतर मी विद्यार्थी चळवळीत सक्रिय झालो. राजकारणाचा किडा अगोदरपासूनच होता. कॉलेजचा जनरल सेक्रेटरी म्हणून बिनविरोध निवडून आलो. पाच हजार रुपये मला खर्च करावे लागले. त्या वेळी मला निवडणुकीत पैसे कसे खर्च करतात, त्याचा छोटासा अनुभव आला. कारण आमचं कॉलेज अशोक चव्हाणांचं. तिथे मराठा समाजाची लॉबी मोठी होती. त्यामुळे त्यांना हमेशा मराठा किंवा निदान नॉन-दलित उमेदवार हवा असायचा. पण जे माझ्या विरोधात होते, त्यांना मी मित्र बनवलं. त्यांच्या कॅम्पमध्ये गेलो. त्यांच्या सपोर्ट बेसवर निवडून आलो. मी ‘स्टुडंट कौन्सिल’वर सलग तीन वर्षं निवडून गेलो. त्यातली दोन वर्षं माझं अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. कारण नेतृत्व करताना तुम्ही इतक्या रोमांचक गोष्टी करत असता की, करिअरकडे लक्षच राहत नाही. पण शेवटच्या वर्षी मी पुन्हा अभ्यासाकडे वळलो आणि विद्यापीठात तिसरा आलो. पण व्हायव्हामध्ये मला 92 मार्क दिले होते आणि पहिल्या दोन नंबरच्या मुलींना 95 पेक्षा जास्त मार्क होते. सरासरीमध्ये दुसऱ्या क्रमांकावरच्या मुलीला माझ्यापेक्षा केवळ एकच मार्क जास्त होता. आमच्या प्राध्यापकांनी तेव्हा असा जातीयवाद केला नसता, तर मलाही दुसरी रँक मिळाली असती. तेव्हा मला त्याचं खूप दुःख झालं होतं. 

पण त्या काळात मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय निबंध स्पर्धांत भाग घ्यायचो. ही गोष्ट 2006-07 च्या काळातली आहे. तेव्हा इंटरनेट कॅफे मोजक्या ठिकाणीच असायचे. तिथे जाऊन आणि  कॉलेजमध्ये ज्या लॉच्या मॅगझिन्स यायच्या, त्यावरून मी कुठे कुठे स्पर्धा आहेत त्यांची माहिती काढायचो. राष्ट्रीय स्तरावरच्या निबंध स्पर्धेमध्ये मी 10-20 हजार शब्दांचा निबंध पाठवायचो. पण यातलं माझ्या प्राध्यापकांना काहीच माहीत नसायचं. स्पर्धेसाठी एखादा कॉन्स्टिट्युशनल विषय असायचा. मला इंग्रजी लिहिता-बोलता येत असलं, तरी शेवटी ॲकॅडेमिक लिहिण्यात फरक पडतो. आणि माझं प्रूफ तपासायलाही कुणी नव्हतं. स्वतः लिहायचं आणि तपासून पाठवायचं. त्यासाठी मी कॉलेजच्या लायब्ररीतला एकमेव कॉम्प्युटर वापरायचो.

मला मूट कोर्ट (moot court) साठीही जायची इच्छा असायची. पण तिथे दोन बाजू लागतात. माझ्यासोबत यायला कुणीच इच्छुक नसायचं. मग मी पोरापोरींना तयार करायचो आणि त्यांची बाजूही मीच लिहून द्यायचो. असे दोन-तीन मूट कोटर्‌स आम्ही केले. तिथे त्या काळातला परभणीचा डिस्ट्रिक्ट जज्‌ होता. तो स्वतः येऊन मला म्हणाला होता, तू हे फिल्ड सोडू नकोस. तुझ्यामध्ये जी आग आहे, ती महत्त्वाची आहे. तिथून मग वादविवाद स्पर्धांमध्ये मी सक्रिय झालो. राष्ट्रीय स्तरावर वादविवाद स्पर्धांमध्ये मी एकट्यानेच तीन वेळा गेलो. खूप वेळा बक्षिसं मिळवून आणली, खूपदा मिळालीही नाहीत. पुढे मुंबई विद्यापीठात एलएलएम करताना एकदा मुंबईचा प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. ‘नॅशनल को-ऑपरेटिव्ह डिबेट’ ही विद्यापीठीय स्तरावरच्या नामांकित स्पर्धांपैकी एक असते. तिथे मला ‘बेस्ट डिबेटर’चा पुरस्कार मिळाला 2010 मध्ये. उत्तर प्रदेशमध्ये लखनौला ही स्पर्धा झाली होती. आणि त्यांनी बक्षीस कॅशमध्ये दिलं होतं. त्याचा उपयोग मी कसा केला? मुंबई ते लखनौ जाताना मी पॅसेंजरमधून गेलो होतो. आणि जानेवारी महिन्यात त्या डब्यातून जाताना हाल-हाल होतात. थंडी तुमच्या हाडांपर्यंत पोहोचते. येताना मी ठरवलं- कुछ भी हो जाये, एसीच्या डब्यातूनच जायचं. तिथे थोडी गर्मी असते. That was the best travel sleep I ever had!

प्रश्न - हा कालखंड रोमांचक होता. कारण या कालखंडामध्ये तुला तुझी दिशा सापडली. आता सांग, आपण परदेशात जावं, हे तुझ्या मनात कधी सुरू झालं? कुठे जावं, कशासाठी जावं, काय करावं, असं तुला वाटलं?

- मी लॉच्या शेवटच्या वर्षाला होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की- माझ्या बुद्धिमत्तेला, बौद्धिक भुकेला इथलं स्टडी कल्चर पुरेसं नाही. मला लॉला इतके मार्क्स का मिळाले? लॉला त्या वेळी पाच प्रश्न विचारले जायचे आणि माझ्या उत्तरांमध्ये मी पुस्तकांचे संदर्भ दिले होते. अमुक पुस्तकातल्या अमुक पानावरून मी हे घेतलेलं आहे, असं. मला नाही वाटत की, त्या काळात इतर कुणी असं केलं असेल. माझ्याबरोबरची पोरं तर घोकंपट्टीच करून जायची. काही माजी विद्यार्थी आमच्याकडे ट्युशन चालवायचे. त्यांनी नोट्‌स बनवल्या होत्या, त्या ते झेरॉक्स करून विकायचे. त्यांचाही मी उपयोग केला, पण पुस्तकंही वाचली होती. I left no stone unturn. पण आजूबाजूला सगळं कमी दर्जाचं शिक्षण असल्यामुळे शेवटच्या वर्षी मी ठरवलं की, मेरेको फॉरेन मे जाने का है! आणि बाबासाहेबांकडून मिळणारी एक प्रेरणा असतेच. पण तोपर्यंत मला बॉलीवुड आणि माझ्या झोपडपट्टीच्या बाहेर काहीच माहीत नव्हतं. त्यामुळे लंडन, कोलंबिया, न्यूयॉर्क हे सगळं कुठे आहे- काही ठाऊक नव्हतं. मला हे सगळं एकच वाटायचं. (पाश्चात्त्य संस्कृतीचा अनुभव मला पाश्चात्त्य देशांमध्ये गेल्यावरच आला. मी लहान असताना इतर मुलं ज्या अमेरिकन सिरीज वगैरे पाहात असतील, त्या 10 वर्षांपूर्वीच्या सिरीज मी आत्ता पाहायला सुरू केल्या आहेत. ‘स्पेस’ आणि ‘कल्चर’चा फरक इतका असतो. ते असो.)

मग मी शेवटच्या वर्षी ठरवलं की, परदेशात जायचं. पण कुठे जायचं? इंग्लंडला. का? कारण बाबासाहेब गेले होते. आणि दुसरं काही नाव माहीतच नव्हतं. इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं म्हणून तो देश माहीत; अफगाण्यांनी केलं असतं तर कदाचित अफगाणला गेलो असतो! आपल्याकडे काही परदेशी शिक्षणाच्या कन्सल्टन्सीज्‌ आहेत. त्या परदेशांतील निवडक विद्यापीठांमध्ये तुम्हाला पाठवतात आणि इथेही अशी काही विद्यापीठं आहेत, ज्यांना परदेशातले विद्यार्थी हवे असतात, कारण त्यांच्याकडे पैसा असतो. खूप विद्यार्थी परदेशातील विद्यापीठांचे रेव्हेन्यू चालवतात. मग बारा तासांचा प्रवास करून मी नांदेडहून पुण्याला गेलो, त्याशिवाय मुंबई आणि हैदराबादलाही गेलो. तिथे जेवढ्या कन्सल्टन्सीज्‌ असतील, त्यांच्यामध्ये चौकशी केली. त्यासाठी रात्री देवगिरी एक्स्प्रेसच्या जनरल डब्यात रिझर्व्हेशन केलेलं असायचं. तिथली दुसरी सीट पकडायचो आणि सीटखाली पेपर अंथरून त्यावर झोपायचो. कारण त्याचं तिकीट दीडशे रुपये असायचं आणि माझ्याकडे खर्चायला तीन-साडेतीनशे रुपयेच असायचे. सकाळी पोचलो की, बॅग घ्यायची आणि अंघोळ करायला एखादा मित्र-नातेवाईक कुणी आहे का बघायचं. मुंबईत मामा असायचा. तो सकाळी गेल्यावर आणखी शंभर-दीडशे रुपये हातात द्यायचा. मग सगळ्या कन्सल्टसीज्‌ फिरायचं. कन्सल्टन्सीवाले फाडफाड इंग्रजीमध्ये बोलायचे. त्या काळामध्ये त्याचं अप्रूप वाटायचं. असं बऱ्याच ठिकाणी फिरल्यानंतर कुणी तरी विचारायचं, तुला कुठे जायचंय? मी सांगायचो, मला ऑक्सफर्डला जायचंय. त्यावर ते म्हणायचे की, ऑक्सफर्डला आम्ही तुम्हाला नेऊ शकत नाही. तुम्ही दुसरं विद्यापीठ निवडा. माझ्याकडे रँकिंग असायची. मग ती बघून ते सांगायचे की- इथं होणार नाही, तिथं होणार नाही. एकाने मला सांगितलं की, तू आधी इंग्रजीची परीक्षा देऊन ये, मग त्यावरून पाहू. त्याप्रमाणे आयएलटीएस नावाची परीक्षा दिली. त्याच्यात मला साडेसहा मार्क मिळाले. सात किंवा आठ मार्कांना चांगलं विद्यापीठ मिळतं. तिथे कमी मार्क मिळाल्यामुळे मला ॲव्हरेज विद्यापीठ मिळालं. आणि मी बर्मिंगहॅममध्ये गेलो. पण मला फायदा असा झाला की, त्या विद्यापीठाचं लॉ डिपार्टमेंट चांगलं होतं. अर्थात ते खूप प्रोफेशनल होतं. but I'll not again say that university can claim success in me. जगभरातून काही लॉयर तिथे त्यांनी निवडलेले होते आणि कॉलेज आठवड्यातून एक दिवस असायचं.

प्रश्न - परदेशात जाण्यासाठी निवड होण्याआधी तू काही महिने एलएलएम करण्यासाठी मुंबईत होता, तिथला अनुभव थोडक्यात सांगतोस?

- परदेशात जायला मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आहे, असं मला त्या काळात लक्षात आलं होतं. त्यासंबंधी चौकशीसाठी मी नांदेडहून पुण्याला गेलो. पुण्यात मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे प्राचार्य नितेश नवसागरे हे नांदेडचे होते. त्यांनी तरुण वयातच पीएच.डी. मिळवलेली होती. त्यांचे वडील बामसेफचे सहकारी होते. त्यामुळे माझ्या वडिलांची-त्यांची ओळख होती. मी त्यांना फोन केला आणि भेटायला गेलो. त्यांनी मला विहारात भेटायला बोलवलं. मी विहाराचा पत्ता शोधत गेलो. समाजकल्याण विभागाचे एक जॉइंट डायरेक्टर पंजाबराव वानखेडे यांच्याशी त्यांनी माझी तिथे ओळख करून दिली. वानखेडेसाहेबांची आणि माझी मीटिंग फक्त दहा मिनिटांची झाली. पण तेवढ्याकरता मी 12 तास प्रवास करून आलो होतो. परतीची गाडी रात्री 10 वाजता होती. मग दिवसभर एका बगीच्यात जाऊन वडा-पाव वगैरे खाणं, मी बाहेरगावचा आहे असं वाटून कुणी लुटू नये, म्हणून पुणेरी एक्सेंट बोलणं- असे प्रकार केले. त्यादरम्यानच मला मुंबई विद्यापीठामध्ये लॉ फॅकल्टीमध्ये एलएलएम करायला मेरिटवर प्रवेश मिळाला. (त्याच काळात मी संयुक्त राष्ट्रांमध्येही अर्ज करायचो.) मुंबई विद्यापीठात सुरेश माने नावाचे सर होते. त्यांना भेटून मी सांगितलं की, मला असं करायचं आहे. ते मला रेकमेंडेशन लेटर लिहून द्यायचे. ते मुंबई विद्यापीठात डीन होते. एखाद्या व्हाईसरॉयसारखं ऑफिस होतं त्यांचं. त्या काळात ते ‘बसप’चे जनरल सेक्रेटरी होते.

एलएलएमला मुंबई विद्यापीठामध्ये स्पेशलायझेशन असतं, त्यात मी पर्यावरण हा विषय घेतला. सगळ्यात कमी मार्क असणारी मुलं तो विषय घेतात. पण मला पर्यावरणाबद्दल आस्था असल्यामुळे मी तो विषय निवडला. ग्रीनपीस वगैरे उपक्रमांमध्ये मी स्वयंसेवक वगैरेही असायचो. कॉलेजमध्ये पुण्याचे एक टिळक नावाचे प्राध्यापक होते. बहुतेक ते बाळ गंगाधर टिळकांच्या वंशजांपैकी होते. मेरिटमध्ये असूनही मी पर्यावरण विषय घेतल्यामुळे ते आणि मानेसर नेहमी माझं कौतुक करायचे. मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर मी माझ्या मित्रांसोबत एक अनऑफिशियल ग्रुप बनवला, जो वेगवेगळ्या कंपन्यांच्या विरोधात पीआयएल (जनहित याचिका) टाकेल. कारण आपल्या संविधानात पर्यावरण हा मानवाधिकार आहे. आणि एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला होता की, पर्यावरण हा ‘राईट टू लाईफ’ आहे. मी वर्गातली दहा-बारा मुलं निवडली होती आणि वेगवेगळ्या हायकोर्टांमध्ये आम्ही याचिका दाखल करायचं ठरवलं. पण त्या काळात कोणीही उठून याचिका दाखल करेल, म्हणून सुप्रीम कोर्टाने त्यावर निर्बंध आणले होते. तुमची याचिका आम्हाला योग्य वाटली नाही तर 50 हजार रुपयांचा दंड. त्यावर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की, प्रत्येकाकडून पाच हजार रुपये गोळा करायचे आणि कुठे असा दंड झालाच, तर ते वापरायचे.

त्यादरम्यान मुंबई विद्यापीठात एक सर्क्युलर लावलं होतं. मुंबई विद्यापीठाच्या उत्कृष्ट विद्यार्थ्याला ते ‘प्रेसिडेंट गोल्ड मेडल ॲवॉर्ड’ देतात. ही 2010 ची गोष्ट. मला त्यासाठी अर्ज करायचा होता. मग त्यासाठी लागणारी सगळी सर्टिफिकेट्‌स गोळा केली आणि आमच्या डिपार्टमेंटकडून माझी निवड झाली. तेव्हा होस्टेलचं भाडं द्यायला पैसे नव्हते, म्हणून फुकटच राहायचो. त्यांना म्हणायचो, मी गरीब आणि मागासवर्गीय आहे. छोट्या गावातून आलेलो आहे. तुम्ही कशी अपेक्षा करता मी पैसे देईन? मग ते म्हणायचे, ठीक आहे, पुढच्या सेमिस्टरला दे. दोन-तीन महिन्यांनंतर आमच्या डेप्युटी रजिस्ट्रारचा मेल आला. त्यात असं लिहिलं होतं की, ‘शेवटच्या फेरीसाठी माझी निवड झाली होती आणि त्यासाठी त्यांनी मला मुलाखतीला बोलवलं होतं.’ मी मुलाखतीला गेलो. तिथे तीन पॅनलिस्ट होते. त्यात एक न्यायालयाचे भूतपूर्व न्यायाधीश होते, एक प्राचार्य होते आणि एक प्राध्यापिका होती. तिथे माझ्याबरोबरच एकच मुलगी होती. ती बऱ्यापैकी सुस्थितीत होती. त्या काळात तिच्याकडे ‘ब्लॅकबेरी’ फोन होता. माझ्याकडे साधा ‘नोकिया’ होता. पहिल्यांदा मला बोलावण्यात आलं. मी आतमध्ये गेलो. पहिलाच प्रश्न मला विचारला, ‘तू विद्यापीठात किती वर्षांपासून आहेस?’ मी सांगितलं, ‘हे माझं पहिलंच सेमिस्टर आहे.’ तेव्हा त्या न्यायाधीशांनी माझ्या हातात नियमावली दिली. त्यातल्या एक नियम असा होता की, या पुरस्कारासाठी विद्यार्थ्याने किमान एक वर्ष विद्यापीठात असलं पाहिजे. ते म्हणाले, ‘तुझी प्रोफाइल चांगली आहे, तुझी सर्टिफिकेट्‌स आम्ही पाहिली. तू पात्र असूनही या अटीमुळे तुला आम्ही पुरस्कार देऊ शकत नाही.’ मला धक्का बसला. विनामुलाखत तो पुरस्कार त्या मुलीला मिळाला. तिथून बाहेर पडताना माझ्या मनात विचार आला की, ‘केवढी मोठी संधी आपल्या हातून गेली!’ तिथे मी विरोध केला असता; पण तुमच्याकडे नेटवर्क नसेल, कल्चरल कॅपिटल नसेल तर झालेला अन्याय तुम्ही चुपचाप सोसता- तसंच माझ्याबाबत झालं. याच्यात अन्याय काय होता? मी शेवटच्या फेरीत जाईपर्यंत तुम्हाला हे दिसलं नाही की, मी पहिल्या वर्षाला आहे? डिपार्टमेंटनेही सगळे नियम पाळून माझी निवड केली होती. तेव्हा तो पुरस्कार मिळाला असता तर आमच्या दलित समाजाला, मराठवाडा मित्र मंडळ कॉलेजचे काही सहकारी माझ्या होस्टेलमध्ये होते त्यांना, नांदेडसारख्या छोट्या गावातून जी दलित समाजाची मुलं मुंबईसारख्या मोठ्या शहरात येतात त्यांना- किती आनंद झाला असता! ते नियम खरोखरच होते की नाही, हेही मला माहीत नाही. पण कधी तरी मला त्याचा तपास करायचा आहे.

त्यानंतर मी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी चळवळीत सक्रिय झालो. निवडणूक लढवली आणि मुंबई विद्यार्थी संघटनेच्या जनरल सेक्रेटरी पदासाठी नॉमिनेट झालो. मग माझ्याशी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या लोकांनी संपर्क केला आणि सांगितलं, तू आमच्या तिकिटावर लढ. तुला राजसाहेबांना भेटवतो. शिवसेना आणि मनसेची तिथे खुन्नस होती. माझा प्रतिस्पर्धी म्हणाला, आता एक तर तू आहे किंवा मी आहे. मग मी म्हटलं की, मी माघार घेतो. तो जनरल सेक्रेटरी झाला. तेवढ्यात मला स्कॉलरशिप मिळाली आणि 31 जानेवारी 2010 रोजी मी इंग्लंडला निघून आलो.

प्रश्न - इंग्लंडला तू जवळपास 17 महिने होतास, मग तिथून जिनिव्हा आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत गेलास. त्या सगळ्या प्रवासाबद्दल आता सांग.

- This is time travel for me! बाबासाहेब जे म्हणाले होते ना की, परदेशात मला एकदाही अस्पृश्य असण्याचा अनुभव आला नाही; तशी ती माझी पाच वर्षं होती. नांदेडच्या आंबेडकरनगरच्या जनता कॉलनीमधून थेट इंग्लडच्या एवढ्या मोठ्या विद्यापीठात मी गेलो. एखाद्याला किरकोळ वाटेल- पण तिथलं जेवण कसं असतं, हेही मला तेव्हा माहीत नव्हतं. तिथे येणाऱ्या मुंबईच्या, पुण्याच्या किंवा दिल्लीच्या मुलांना ही सगळी पार्श्वभूमी माहीत असायची. येताना माझ्याकडे फक्त 270 पौंड होते. पुढचे पैसे महिनाभराने येणार होते. तेवढ्यात मला महिना काढायचा होता. सुरुवातीला मी पास्ता मागितला, कारण नाव ऐकून माहीत होतं. पण त्याची चव मला अजिबात आवडली नाही. मग मी फिंगर चिप्स खायचो. बर्गरला तिथे पाच-सहा पौंड लागायचे. मग मी महिनाभराचा हिशोब केला आणि सकाळ-संध्याकाळ बर्गर खायला सुरुवात केली.

परदेशात गेल्यानंतर तुम्ही जास्तच देशभक्त होता. जातानाही मला सगळ्यांनी ‘देशाचं नाव मोठं कर’, वगैरे काय काय सांगून पाठवलं होतं. जणू काही देशाची सगळी जबाबदारी माझ्याच खांद्यावर! त्यामुळे मी तिथे जाऊन सुरुवातीला त्यांचं कल्चरच नाकारलं आणि भारतीय विद्यार्थी शोधू लागलो. मी ज्या होस्टेलवर राहिलो होतो, तिथे माझ्या रूममध्ये इटली आणि सायप्रस इथले दोन विद्यार्थी होते. पण त्याच होस्टेलवर मला दोन भारतीय वंशाचे विद्यार्थी भेटले. मी उत्साहाने त्यांना भेटायला गेलो. त्यात एक उल्हासनगरचा सिंधी होता आणि शर्मा नावाचा एक जण होता. सिंधी थोडा लिबरल होता. सुरुवातीला तो मला म्हणाला, ‘देख, मैं यहाँ इंडियन लोगो को मिलने नहीं आया. मेरेको बाकी लोगो को मिलना हैं.’ मात्र पहिल्या एक-दोन महिन्यांमध्ये त्याने मला तिथे आर्थिक तोल कसा सांभाळायचा ते शिकवलं. आम्ही एकत्र जेवण करायचो. माझा उद्देश असा होता की, माझ्याकडचे पैसे संपले तर ते मला मदत करतील. पण मला स्कॉलरशिप मिळते म्हणून नंतर त्यांच्या पोटात दुखायला लागलं.

इंग्लंडमध्ये असतानाही माझ्या डोक्यात हे पक्कं होतं की, आपल्याला संयुक्त राष्ट्रांमध्ये काम करायचं आहे. मे महिन्यापासून आम्हाला तिथे सुट्टी असते आणि त्या काळात आम्हाला फिल्ड वर्क किंवा संशोधन करावं लागतं. संशोधनापेक्षा मला फिल्ड वर्कमध्ये रस होता. मग मी त्यासाठी संयुक्त राष्ट्रांमध्ये अर्ज केला आणि माझी निवड झाली. मुलाखतीसाठी मेल आला. मला आनंदाचा धक्का बसला. मी ताबडतोब त्यांना फोन नंबर पाठवला आणि त्यांचा फोन आला. फोनवर मुलाखत झाली आणि मग त्यांनी मला सांगितलं की, ‘तुझी निवड झालेली आहे. तू कधीही येऊ शकतोस.’ त्यांनी फक्त सहा लोक निवडले होते. विद्यापीठातून माझी एकट्याचीच निवड झाली होती. तिथे माझ्यासोबत दोन अमेरिकन, एक इटालियन आणि एक फ्रेंच असे लोक होते. संयुक्त राष्ट्रांमध्ये दर वर्षी मानवाधिकाराची जागतिक परिषद भरते. तिथे आम्हा सहा जणांची ‘सेक्रेटरिएट इंटर्न’ पदावर निवड झाली. या सहा जणांमध्ये एक अर्थतज्ज्ञ होती, तीन वकील होते आणि दोन समाजशास्त्रज्ञ होते. संयुक्त राष्ट्रांशी संबंधित असल्यामुळे मला व्हिसा लगेच मिळाला. मग मी स्वित्झर्लंडला गेलो. स्वित्झर्लंडला जाणं हा माझ्या जीवनातला सगळ्यात सुखद अनुभव होता. चार महिने तिथे होतो मी. तिथे मी आणखी वर्षभर राहावं, अशी तिथल्या लोकांचीही इच्छा होती. पण माझ्या कॉलेजची अट होती, म्हणून मी परत आलो. पण तिथे मला खूप मित्र मिळाले. सगळ्यांनी तिथे मला आदर दिला. विद्यार्थी म्हणून न वागवता सहकारी म्हणून वागवलं. माझी कौशल्यं आणि माझ्या मर्यादा या दोन्हींची दखल त्यांनी घेतली. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या देशातलं जीवन किमान दोनेक महिने तरी अनुभवायला हवं. स्वित्झर्लंडला जगातला स्वर्ग म्हणतात. मी तर त्या स्वर्गातल्या मंत्रालयात होतो. तिथे मला संयुक्त राष्ट्रांतल्या तज्ज्ञांसोबत, प्रतिवेदकांसोबत (rapporteurs) आणि जगभरातल्या मानवाधिकार कायद्यांसंबंधांत निर्णय घेणाऱ्या लोकांसोबत काम करायला मिळालं. माझा सगळ्यात जवळचा मित्र डेव्हिड चॅप्लिन मला तिथेच भेटला. (‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये मी नुकतंच त्याच्यावर लिहिलं आहे.) मानवाधिकाराचे पैलू, गुंतागुंत, राजकारण, मर्यादा या सगळ्याचा मला अतिशय जवळून अनुभव मिळाला. आम्ही तिथे उत्कटतेने भरपूर काम करायचो. समानता काय आहे, ते मला तिथे कळलं. दर दोन दिवसांनी तिथे बैठक असायची. एशिया, ईस्ट एशिया, साऊथ एशिया, आफ्रिका, सब सहारन आफ्रिका असे अनेक विभाग तिथे आहेत. सगळ्यांचे प्रतिनिधी मिळून चाळीस ते पन्नास लोक तिथे यायचे. एखाद्या राजवाड्यासारखं ते ऑफिस आहे. ज्यांची नावंही माहीत नव्हती, अशा देशांचे लोक मला तिथे भेटले. 192 राष्ट्रांचे प्रतिनिधी होते तिथे. लिबिया त्या काळात गद्दाफीच्या ताब्यात होता. गद्दाफीवर मानवाधिकाराच्या उल्लंघनाचे आरोप करण्यात आले होते. मी गद्दाफीच्या विशेष प्रतिनिधीची काळजी घेणाऱ्या संयुक्त राष्ट्रांतील गटामध्ये होतो. ते काम अतिशय संवेदनशील होतं, कारण जग गद्दाफीच्या विरोधात होतं. तेव्हाची माझी अपरिपक्वताही लोकांनी स्वीकारली आणि मला शिकवलं, याबद्दल मी आजही खूप कृतज्ञ आहे.

त्या काळात तिथल्या मुख्य वस्तीत राहणं अवघड होतं. त्यामुळे मी दीड तासाच्या अंतरावरील एका छोट्या गावात राहायचो. आपण सिनेमात पाहतो तसं तिथं वातावरण असायचं. मावळतीचा सूर्य जणू चित्रकारासाठी थांबला आहे, असं वाटायचं. तिथे खूप गोष्टी शिकून इंग्लंडला परत आलो. डिग्री पूर्ण केली. तिथे माझ्यासोबतचे जे इतर भारतीय होते, त्यातला एकही पहिल्या झटक्यात पास झाला नाही. त्यामुळे मी ‘यूके’च्या व्हिसासाठी पात्र ठरलो. पण संयुक्त राष्ट्रांत गेल्यापासून माझी आफ्रिकेविषयी ओढ वाढली होती. त्या काळात दक्षिण आफ्रिकेत जाण्याचा विचार करणारं फारसं कुणी नव्हतं. मग मी एका ग्लोबल स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. त्यातून माझी एकट्याचीच निवड झाली. घरखर्च, विमानप्रवास, संशोधनाचा खर्च, स्टायपेंड हे सगळं त्यात होतं. मला आफ्रिकेतली चळवळ समजून घ्यायची होती आणि त्यांना आपली चळवळ समजून सांगायची होती. वंचित (oppressed) समाजांची एकजूट होऊ शकली; तर तिथे कुणी आश्रयदाते नसतील, सगळे समान असतील, असं मला वाटतं. साडेतीन-चार वर्षं मी तिथे राहिलो. आफ्रिकेतली कामगार चळवळ, जमिनीसाठीची चळवळ मी पाहिली. तिथले काळे लोक जमिनीसाठी लढतात, ती गोष्ट मी आपल्याकडच्या दलित लोकांमध्ये जाणली. जिथे नेल्सन मंडेला शिकले, त्या विट्‌स (Wit's) विद्यापीठाच्या सिनेटवर मी निवडून गेलो. एक वर्ष त्या सिनेटमध्ये राहिलो. विद्यार्थी चळवळीत सक्रिय होतो. दलित आणि ब्लॅक स्टुडंटसाठी ‘ब्रिक्स’मध्ये (BRICS) काही करता येईल का, यासाठी प्रयत्न केले. पीएच.डी. विक्रमी वेगात संपवली. माझे तिथले सुपरवायझर दिलीप मेनन यांनी मला खूप प्रोत्साहित केलं. त्यांना माहीत होतं की, मी कुठल्या परिस्थितीतून आलेलो आहे. त्यांनी माझ्यासाठी विशेष वेळ खर्च केला. माझी इंग्रजी सुधारणं आणि प्रूफ पाहणं यासाठी मदत केली. ते म्हणायचे, तुझे बाकी गुण चांगलेच आहेत. मी फक्त तुझं इंग्रजी आणि आर्ग्युमेंट तपासतो. त्यांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. प्रबंध पूर्ण झाला. तीन ॲकॅडेमिक लेखही प्रसिध्द झाले. पुढे कधी तरी मी त्याच्यावर पुस्तकही लिहीन कदाचित. तिथे मला अनेक लोक भेटले. अनेक मित्र मिळाले.

मग नंतर मला वाटलं, माझ्या बौद्धिक चौकसपणामध्ये मला आणखी भर घालायची आहे. त्यासाठी कदाचित आणखी एखाद्या विद्यापीठात जावं लागेल. त्यामुळे मी थेट जॉन कॉमरऑफ यांना मेल लिहिला. आताच्या जगातले ते आफ्रिकेतल्या सर्वांत महत्त्वाच्या विद्वानांपैकी एक आहेत. ते ‘हार्वर्ड’मध्ये होते. आणि थॉमस हॅन्सन नावाचे एक प्राध्यापक ‘स्टॅनफर्ड’मध्ये होते. त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर पुस्तक लिहिलं आहे. दोघांनीही भेटायला बोलवलं. आता या दोन ऑफर्समधली कुठली निवडायची? मी हार्वर्ड निवडलं. तिथे मी गेली पाच वर्षं होतो. पहिल्या वर्षी ‘व्हिजिटिंग पीएच डी स्टुडंट’,  दुसऱ्या वर्षी ‘नॉन-रेसिडंट फेलो’ आणि पुढे तीन वर्षं ‘फेलो’, ‘पोस्ट-डॉक्टरल फेलो’ आणि आता सिनियर फेलो आहे.

दलित पँथर, बामसेफ यांचं प्रॉडक्ट तर मी होतोच. त्यांचा सक्रिय प्रतिनिधी इथे कुणी नव्हता. ब्लॅक आणि दलित यांच्याकरता आणखी काय करता येईल, याचा मी अभ्यास केला. त्याबद्दल माझ्या प्राध्यापकांशी चर्चा केली. कॉर्नेल वेस्ट आणि हेन्री लुईस गेस्ट ज्युनिअर हे माझे प्राध्यापक म्हणजे जागतिक ख्यातीच्या आणि अतिशय व्यग्र असणाऱ्या व्यक्ती आहेत. जगभरच्या टेलिव्हिजनवर त्यांच्या मुलाखती सुरू असतात. त्यांची स्वतःची वीसेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. प्राध्यापकाचं मूल्य काय असतं, ते मला इथे आल्यावर कळालं. तो खरंच सुपरस्टार असतो! बाबासाहेब जे जॉन डुवीबद्दल किंवा त्यांच्या इतर प्राध्यापकांबद्दल म्हणायचे, ते मला हार्वर्डला आल्यावर समजलं.  अमेरिका इतकी सुसंस्कृत आहे, कारण इथला प्राध्यापक देशाच्या पॉलिसीला गाईड करत असतो. भारतातही आता हे सुरू झालं आहे, काही प्रमाणात. पण अजूनही आपल्याकडे बाबूलोकच सांगतात, देश कसा चालवायचा! दोनेक वर्षं मी या प्राध्यापकांचा पिच्छा पुरवल्यानंतर त्यांनी मला वेळ दिला. मला त्याचं सोनं करायचं होतं. पण कधी तरी मी त्यांना वेळ मागायचो तेव्हा ते म्हणायचे, सध्या माझ्याकडे अमुक एवढ्या गोष्टींसाठीच वेळ आहे. आणि आपण या विषयावर आधीही बोललेलो आहोत. पुन्हा बोलायची आवश्यकता नाही. त्या वेळी वाईट वाटायचं की, हा प्राध्यापक माझ्याशी एवढा चांगला वागायचा आणि आता एकदम असं कसं म्हणाला? काय झालं असेल? पण संध्याकाळी टीव्ही लावला की दिसायचं- ते कुठल्या तरी जागतिक प्रश्नावर आपली मतं मांडत आहेत. अशा प्राध्यापकांचा वेळ न मिळणं आणि त्यामुळे नाराज होणं यातही एक प्रिव्हिलेज आहे ना? निदान त्याच्याशी संपर्क साधता येईल आणि त्यांचं उत्तर आलं आपल्याला. हे तर मी स्वप्नातही पाहिलं नव्हतं.

आज माझं हार्वर्डमध्ये आलिशान ऑफिस आहे. तिथे बाबासाहेब, माल्कम एक्स, डब्ल्यूईबी डूबॉईस, अँजिला डेव्हिस, कांशीराम यांचे फोटो आहेत आणि खूप पुस्तकं आहेत. आता तर वाचावीच लागतात पुस्तकं. पण आता आपल्या पेशाशी संबंधित पुस्तकं जास्त वाचली जातात. अनेक पुस्तक प्रकाशकांसाठी मी रिव्ह्यू देत असतो. आज असा एकही आठवडा जात नाही की, जगभरात किमान दोन ठिकाणी माझ्यावर कुणी लिहिलं नाही किंवा माझी मुलाखत घेतली नाही. पण याचा अर्थ एवढाच की, हा विषय खूप मोठा आहे. स्वतःप्रमाणे दुसरी व्यक्तीही स्वतंत्रपणे जगली पाहिजे, त्याच्या जीवनाची गुणवत्ताही चांगली असली पाहिजे; त्यांचे सामाजिक, मानसिक अधिकार हिरावले जाता कामा नयेत, यासाठीच मी प्रयत्न करतो आहे.

प्रश्न - या सगळ्या प्रवासात बाबासाहेब तुझ्यासोबतच असणार, हे तर गृहीत आहे. पण आत्ता या टप्प्यावर तुझ्या मनात त्यांच्याविषयीच्या भावना काय आहेत?

- बाबासाहेब, त्यांचं आयुष्य, त्यांचं काम हे सगळं माझ्यासाठी सतत एखाद्या अदृश्य सावलीसारखं सोबत आहे. आता माझा रस्ता कसा होता? मी सुरुवातीला एन्व्हॉयर्न्मेन्ट लॉ केलं आणि नंतर ह्युमन राईट्‌स लॉ  केलं. त्यानंतर मी माझा वेळ आणि माझी ऊर्जा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आणि कायदा यांच्यासाठी खर्च केली. आफ्रिकेमध्ये मानववंशशास्त्रात मी माझी पीएच.डी. केली. त्यामुळे तसं म्हणायला यात बाबासाहेबांच्या क्षेत्राशी माझा थेट संबंध आला नव्हता. पण मी आफ्रिकेत असताना ईपीडब्ल्यूसाठी एक लेख लिहिला, 'Caste amongst Indians in Africa'. या विषयावर पूर्वी कुणीच लिहिलं नव्हतं. मला वाटतं की, बाबासाहेबांसारखा आदर्श प्रत्येकाला मिळायला हवा, कारण तो तुम्हाला स्वस्थ बसू देत नाही. मी स्वतः एकच पुस्तक लिहिलंय, त्यामुळे मी समाधानी नाही. कारण बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेली मोठी पुस्तकं सात-आठ आहेत आणि त्याशिवाय काही लहान सात-आठ आहेत. आपल्याला एक डिग्री घेऊन चालणार नाही, त्यांच्याइतक्या पीएच.डी. असायला हव्यात- अशी त्यांची सावली सतत माझ्यासोबत असते. बाबासाहेबांनी समाजावर प्रेम करणं कधी सोडलं नाही. आयुष्यभर असं प्रेम करणं कठीण आहे. माझा अनुभव सांगतो. लोकांना दिसतं की, हा एवढ्या मोठ्या लोकांसोबत काम करतो, उठबस असते. पण त्यांना हे माहीत नाही की, महिनोन्‌महिने थांबावं लागतं, एखाद्याचं लक्ष वेधून घ्यायला. दहा लोकांशी आधी बोलावं लागतं. अपुरी माहिती असणारे लेखक आपल्याकडे कमी नाहीत. ते मग काही तरी लिहितात. मला असा प्रश्न पडतो की, त्यांच्या स्तरावर जाऊन मी त्यांना दुरुस्त करू की त्यांच्याकडे दुर्लक्ष करू? अशा वेळी मनात येतं, बाबासाहेबांना तर एवढ्या लोकांनी विरोध केला, ते इतक्या हाल-अपेष्टांमध्ये राहिले. सुखामध्ये किंवा दु:खामध्येही त्यांचे विचार आणि त्यांचं चरित्र प्रिव्हेलंट आहे. असा माणूस मला आदर्श म्हणून फुकट मिळाला. या बाबतीत मी प्रिव्हिलेज्ड आहे! माझ्या जागतिक कीर्तीच्या प्राध्यापकांशी मी अवांतर वेळात चर्चा करतो, तेव्हा ती बाबासाहेबांविषयी अथवा सामाजिक अन्याय यावर असते. आता मी त्यांचं इंग्रजी चरित्र लिहितोय. आणि ते बाबासाहेबांचं पहिलं दलितलिखित इंग्रजी चरित्र असेल. 

प्रश्न - अमर्त्य सेन यांच्याशी तुझी भेट कशी झाली?

- मी हार्वर्डला अमर्त्य सेन यांचा क्लास निवडला होता. त्याला आम्ही नोबेल क्लास म्हणायचो. कारण दोन नोबेल पुरस्कारविजेते तो क्लास शिकवायचे. हार्वर्डचं प्रिव्हिलेज बघा. अमर्त्य सेन आणि एरिक स्टार्क मॅस्किन हे दोघे नोबेलविजेते आणि बेरी माझुर नावाचा एक गणितज्ञ होता. हे तिघे ‘ॲक्झॉमॅटिक रीझनिंग’ (Axiomatic Reasoning) नावाचा क्लास शिकवायचे. तत्त्वज्ञानाला ते गणिती सूत्रांमध्ये मांडायचे. प्रोफेसर सेन तिथे व्याकरणकार पाणिनी शिकवायचे. मी 2018 मध्ये त्यांच्या वर्गात एक सेमिस्टर बसलो. तिथे त्यांच्याशी ओळख करून घेतली. आम्ही बाबासाहेबांविषयी बोलत होतो तेव्हा ते म्हणाले, ‘त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला, ही त्यांची निवड अतिशय रॅशनल होती.’ ते स्वतः बुद्धिस्ट आहेत, असं त्यांनी मला सांगितलं. खूप वेळा आमच्या भेटी व्हायच्या. पण मी त्यांना माझ्या पुस्तकाविषयी काहीच सांगितलं नव्हतं. एके दिवशी अगदी फॉर्मल भाषेत त्यांचा मेल आला. अमर्त्य सेनसारख्या महान भारतीय विद्वानाने स्वतःहून माझ्या पुस्तकाची नोंद घेऊन मला मेल लिहिणं, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. खरं तर हार्वर्ड निवडण्याचं एक कारण अमर्त्य सेन तिथे प्राध्यापक असणं हेही होतं. इंग्लंडमध्ये असताना एके दिवशी मी इंटरनेटवर अमर्त्य सेन यांची प्रोफाईल पाहत होतो. तेव्हा माझी परिस्थिती वाईट होती. पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा फक्त हार्वर्ड म्हणजे काय असेल, कसं असेल- असा विचार करत होतो आणि सात वर्षांनी मी प्रत्यक्ष त्यांच्यासोबत बसून त्यांच्याशी जागतिक पातळीवरच्या चर्चा करत होतो.

प्रश्न - शेवटचा गमतीचा प्रश्न. तुझ्या हेयरस्टाईलकडे बघून तू महाराष्ट्रातील आहेस, असं लोकांना वाटत नाही- त्यामागचं लॉजिक सांग...?

- त्यामागे दोन प्रेरणा होत्या. एक अल्बर्ट आइन्स्टाईन. आणि इथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ मिनेसोटा’ला एक गांधीवादी प्राध्यापक अजय स्कारिया आहेत. साऊथ आफ्रिकेमध्ये एका कॉन्फरन्ससाठी ते आले होते. आणि बोलता-बोलता ते आपल्या केसांशी खेळत होते. त्यांचे केसही छानपैकी ग्रे रंगाचे झाले होते वयामुळे. मला ते आवडलं. मग मीही केस वाढवायला सुरुवात केली. माझे केस नैसर्गिकपणे कोरडे, कुरळे आहेत आफ्रिकनांसारखे. माझ्या आईचे आणि तिच्या वडिलांचेही केस तसेच होते. भारतात त्या कुरळ्या केसांमुळे मला कुरूप म्हणायचे. पण आफ्रिकेत गेल्यावर मी केस वाढवले तर लोक मला म्हणायचे, किती छान आहेत तुझे केस! आफ्रिकेत पहिली दोन वर्षं तर मी केस वाढूच दिले नव्हते. पण आता हे माझ्याकरता ‘सेल्फ-ॲप्रिसिएशन’ आहे. त्यामधून मला सांगायचं आहे, I love myself, I love how I look, I love how my hair, I love the way I am. त्यासाठी मला इतरांच्या प्रशस्तीची गरज नाही. आणि मला वाटतं, प्रत्येक युवकानं स्वतःच्या स्टँडर्डनी जगायला हवं.

(मुलाखत : विनोद शिरसाठ)

शब्दांकन : सुहास पाटील

Tags: मराठवाडा बाबासाहेब आंबेडकर दलित चळवळ सुहास पाटील विनोद शिरसाठ मुलाखत सुरज येंगडे suraj yengade marathi interview suraj yengade in america suraj yengade dalit suraj yengade childhood suraj yengade in sadhana suraj yengade vinod shirsath weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सूरज येंगडे
suraj.yengde@gmail.com

‘कास्ट मॅटर्स’ या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक. हार्वर्ड केनेडी स्कूलमधील ‘इनिशिएटिव्ह फॉर इन्स्टिट्युशनल अँटि-रेसिझम अँड अकाउन्टेबिलिटी’मध्ये पहिलेच पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून कार्यरत. 


Comments

  1. Vandana Karambelkar- 19 Nov 2020

    आजच्या तरुणाईला प्रोत्साहित करणारी अगदी योग्य ,वेगळ्या व्यक्तीची मुलाखत वाचणं हा आनंददायी आणि समृद्ध करणारा अनुभव होता. दरवर्षीच युवा साधना वाचणं हा माणूस म्हणून स्वतःला विकसित करणारा अनुभव असतो.

    save

  1. Vandana Karambelkar- 19 Nov 2020

    सुरज यांचा इमेल अड्रेस मिळाला तर आवडेल.

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके