डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

'मी तुझ्यासारखीच रडले. आकांत केला...पण संस्थेच्या नियमांचा आदर केला..’
'.... पोरींना हे सांगताना जीव जातो बघा.'
महात्म्यांनी तरी कुणाला काय मागावं! 
‘म्हणजे मला भूषण होऊ शकला असता, नाही?’
पुतळ्याच्या नजरेला मावशी नजर देतात. आता त्यांच्या नजरेत श्रद्धा नाही, प्रश्न आहे. मग त्या
माघारी वळतात. 
“तुम्ही इथं यायला नको होतं”, एवढंच म्हणतात.
चटका लावणारी गोष्ट.
 

इथले सगळे त्यांना मावशी म्हणतात. साठीच्या पलीकडे गेलेल्या मावशी स्थूल अन् सावळ्या आहेत. त्यांच्या हालचालीत एक निग्रही संथपणा आणि पहाण्या, बोलण्यात अकृत्रिम जिव्हाळा आहे. अगदी परक्याशी बोलतांनादेखील आपल्या जवळच्या हक्काच्या माणसाशी बोलावं, असा सहजभाव त्यांच्या बोलण्यात आहे, अन् खुप जवळच्या माणसाशी आपण बोलत असल्याची त्यातून येणारी आश्वस्त जाणीव त्या परक्यालाही स्थिरावून टाकणारी आहे. मी इथं आलो अन् पहिल्याच दिवशी त्यांचा झालो.
'इथं राहायचं तर संस्थेचे नियम तुम्ही सांभाळले पाहिजेत. ते जाचक नाहीत, हिताचे आहेत. इथली शिस्त त्यांच्यामुळे आहे.’ असं सांगतांनाचा त्यांचा आवाज संचालिकेचा नव्हता, कुटुंबातल्या हंसऱ्या अन् प्रेमळ आजीचा होता.
“कोणते नियम?” मी विचारतो.

“तुम्ही राहणारच आहात आता इथं, सहवासानं ते कळतीलच चला, मी तुम्हाला तुमची राहण्याची जागा दाखवते.”
“तुम्ही इथं आरंभापासून आहात?”

“होय, तशी या संस्थेच्या आरंभाच्याही अगोदर कित्येक वर्षे मी हे काम करीत होते. या संस्थेला 25 वर्षे झाली. इथं येण्याआधी अन्यत्र मी हेच काम करायची.” 
संथ लयीतल्या सहजशा बोलण्यानं मी विरघळत जातो, माझं नवेपण संपत जातं. महारोग्यांच्या संस्थेत 25 वर्षे काम करणाऱ्या या बाईंनी आपल्या ऐन तारुण्यात हे काम कसे निवडले असेल? न राहवून मी ते त्यांना विचारतो. यापूर्वीही त्यांना हे अनेकांनी विचारले असणार. नेहमीचे उत्तर द्यावे, तशा माझ्याकडे वळून बघत त्या म्हणाल्या, “तुम्ही नाही का आलात, तुम्हीही तर तरुण आहात.”
‘मला उडवून लावणारं झालं हे, मी खऱ्या उतसूकतेपोटी विचारलं होतं.’

“सगळ्या गोष्टी आल्या आल्या अन् उभ्या उभ्याच समजून घेणार का! राहिलात की कळेल सगळ.”
मावशी मला माझी खोली दाखवतात. छोटीशी, स्वच्छ, तीत मच्छरदाणी लावलेली कॉटवर खादीची जाडीभरडी पण स्वच्छ चादर, टेबल-खुर्ची, टेबल लॅम्प एक सीलिंग फॅन अन् खोलीतल्या फरशीवर एक नवीशी सतरंजी. वॉल टू वॉल घातलेली. मला आनंद होतो.
“लांबून आला आहात, जरा विश्रांती घ्या. मग तुमच्या कामाचं बघू.” एवढं म्हणून त्या जातात. मी हात तोंड धुऊन कॉटवर आडवा होतो. तेवढ्यात एक बिन चेहऱ्याचा कुणी संस्थात्मक माणूस चहा आणतो. हळूहळू समजू लागतं. संस्थेविषयी, माझ्या कामाविषयी अन् मावशीविषयी......

मावशी सकाळी आठला स्नान करून स्वच्छ खादीची साडी पेहरून संस्थेच्या आवारातून एक चक्कर टाकतात. भेटलेल्या प्रत्येकाशी बोलतात. कामाचं विचारतात. दुखल्या-खुपल्याची चौकशी करतात. त्यांनाही सगळेजण आस्थेनं सांगतात.
माझ्या खोलीबाहेर थबकून त्या हाक मारतात. मी ओशाळल्यासारखा बाहेर येतो. “अजून माझी आंघोळ व्हायची आहे.”

“स्नान नंतर करा, चला” त्या म्हणतात. मी त्यांच्यासोबत चालू लागतो. संस्थेचा परिसर मोठा आहे. त्याच्या मध्यभागी एक छोटेखानी बाग. तीत गुलाब आहेत. मौसमी फुलांची झुडुपे गणवेशधाऱ्यांच्या शिस्तीनं रांगेत उभी. मावशी त्या फुलांकडे पोरं पहावी तशा पाहतात. बागेच्या मध्यभागी एक छोटा चबुतरा. त्यावर एक संगमरवरी अर्धपुतळा आहे. मावशी त्याला मनोमन नमस्कार करतात.

“यांनी मला इथं आणलं! ही संस्था यांचीच. आणखीही कामं आहेत. पण या संस्थेवर त्यांचं जिवापाड प्रेम. मी पूर्वी कोंडव्याला काम करायची. तिथं हे आले आणि मला त्यांनी इथं बोलवून घेतलं. इथली आरंभापासूनची जबाबदारी माझ्यावर विश्वासानं टाकली. ते होते तोवर त्यांचं मार्गदर्शन होतं. आता त्यांचं स्मरण आहे.” मावशी पुतळ्यापुढे उभ्या राहून स्वगत बोलावं तसं बोलत होत्या.

मी पुतळ्याकडे पाहिलं, स्वच्छ करडी नजर. तीत भेदकता. अन् एक टाकेदार तेजस्वी निर्धार, डोळे सोडले तर पुतळ्यात बाकी फारस काही नव्हतं. डोक्यावर बेंगरूळ फेटा, अन् बसके गाल, या चेहऱ्यानं फार पाहिलं, सोसलं, वागवलं असावं. निभावलंही असावं. पातळ ओठ निर्धारानं मिटलेले. प्रयत्न करूनही मला त्या पुतळ्याविषयी पूज्यभाव कधी वाटला नसता. जरा कुतूहल ठीक आहे. 

“त्यांनी घालून दिलेली चौकट अजून टिकली आहे. त्यांच्या आशीर्वादानं संस्थेनं आपली वाटचाल आधीच्याच गतीनं चालू ठेवली आहे.” मावशी संस्थेच्या माहितीत स्वतःविषयी सांगणं हरवून बोलताहेत. त्यांच्या आवाजात गाढ श्रद्धाभाव आहे. त्या म्हणतात, “तुम्ही यांचं चरित्र वाचलं पाहिजे.” 
 “वाचीन, पण मला तुमच्याविषयीच ऐकायचं आहे.” 

“माझं काय ऐकायचं. मी एक सामान्य स्त्री. या परिसाच्या स्पर्शानं माझं सोनं झालं. कुठल्या खातेऱ्यात राहिले असते मी!” अन् त्या बोलायच्या थांबल्या, वळल्या. पुतळ्यापासून दूर जातांना त्यांची पावलं जड झाल्यासारखी दिसली.

मला माझी कामाची जागा अन् सोबतची माणसं दाखवून मावशी गेल्या. सोबतची ती माणसं समजून घेत अन् स्वत.ला कामांत गुंतवून घेत. मी तो दिवस काढला. सोबतची माणसं मावशीविषयी, आईविषयी सांगावं, तसं प्रेमानं सांगत होती. मावशीनी प्रत्येकाला माया लावली होती. त्या रागावत, जरब देत, पण सारं आईच्या भावातून असे. एका गोष्टीची सगळ्यांना दहशत होती. मावशी बोलणं टाकत, त्याची. मनाविरुद्ध खूपच झालं की, त्या संबंधिताशी बोलणं थांबवत.

मग तो माणूस एकदम अनाथ होऊन जायचा. मावशी संस्थेत आल्या, तेव्हा अविवाहित होत्या. जरा सावळं देखणेपणही असावं. मावशींना रोग होता, पण कोंडव्याला असताना तिथल्या उपचारांनी त्या निगेटिव्ह झाल्या होत्या. त्यांच्यापासून कुणाला रोग होण्याची शक्यता संपली होती. काही काळ कोंडव्यालाच त्या परिचारिकेचं काम करायच्या. इथं आल्या तेव्हा त्यांचेवर नव्यासंस्थेच्या मांडामांडीचीच जबाबदारी आली. त्यांनी सारं जबाबदारीनं, आत्मविश्वासानं केलं, बालकांचा अन् रुग्णांचा विश्वास मिळवला. नव्या संस्थेबाबत मग सगळे निश्चित झाले.
“तुम्हाला कधी इथून बाहेर जावंसं, वेगळं जगावंसं वाटलं नाही...” मी मावशींना एकदा विचारलं.
“वाटलं, खूपदा वाटलं. वाटण्याचं वय होतं तोवर वाटत राहिलं, पण मी कुठं जाणार होते. माझ्या माथ्यावर महारोग कोरला होता.”
“पण तुम्ही निगेटिव्ह होतात. तुमच्या अंगावर कसली खूणसुद्धा नाही.” 

“पण मनात सगळं पॉझिटिव्ह होतं. तुटल्यासारखं वाटत राहिलं, पण मग मी स्वत:च खंबीर झाले. हे आपले जग म्हणून स्वीकारलं. इथल्या कामातच आयुष्याचं प्रयोजन शोधलं. अन् मग माझं इथं लग्नच झालं. माझ्या माणसानं पण मला माझ्या मनानं, माझ्या हिमतीनं वाढू दिलं.”...
संस्थेत रुळायला मला फार दिवस लागले नाहीत. काम आवडीचं होतं. सोबतची माणसं साधी होती. अन् मावशींचं नियंत्रण हळुवार होतं. कधी प्रश्न पडलाच तर म्हणत, “तुम्हाला योग्य वाटतं ते करा. ते वाईट असणार नाही याची खात्री तुम्हाला असली की पुरे.”

“पण संस्थेच्या नियम परंपरांचं तुम्हाला ठाऊक असतं.”

“अहो, हे नियम कामं नीट अन् लवकर व्हावी म्हणून असतात. खोळंब्यासाठी नसतात. अन् मला तुमच्या कामातलं कळायला मी काय तुमच्याएवढी शिकली आहे?” मावशी असं निःशस्त्र करणारं बोलत. कधी सायंकाळच्या भेटल्या की खूप बोलत. संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या आठवणी सांगत. तिथल्या प्रत्येक माणसाशी, इमारतीशी, झाडाशी अन् पाखराशी एवढ्या वर्षाचं नातं असल्यागत बोलत. 

“मी फारसं न शिकलेली. कसलं ज्ञान म्हणून मिळवलं नाही. फक्त निष्ठा होती. हे काम चांगलं आहे. ते करणारं माणूस चांगलं आहे. त्यानं कुणाचं तरी बरं होत आहे. आपण त्यात साधन होत आहोत. चांगल्या कामी आपल्या आयुष्याचा वापर होत आहे याचं समाधान होतं. या समाधानानं जगवलं. अजून जगते .......... अशा वेळी त्यांच्या डोळ्यांना आभाळापल्याडचं दिसू लागत असल्यासारखं वाटे.”

क्वचित कधी त्या भूषण नावाच्या मुलाची आठवण काढत. त्याचं कौतुक सांगत. त्याचे रूप, गुण, खोडया, खेळ अन् त्याच शिक्षण. त्या भूषणविषयी बोलतानाही त्या अशाच हरवल्यासारख्या होत.
“तुम्ही भूषणला पाहिलं नाही. तुमच्या एवढाचं असेल तो खूप हुशार, खूप जिद्दी. काय करू अन् काय नको असं अस्वस्थपण, अन् खुप प्रेमळ पण आहे तो. आठवड्यातला वार चुकेल, पण त्याच पत्र चुकायचं नाही. खूप शिकला. खूप मोठ्या हुद्दयावर काम करतो. पण मला अन् इथल्या कुणाला कधीच विसरला नाही. न चुकता येतो, राहतो, सगळ्यांची विचारपूस, साऱ्यांना मदत करतो.” मावशी भूषणविषयी बोलायला लागल्या की, पुन्हा त्या पुतळ्यासमोर बोलल्या तसं बोलत.
“माझ्या केल्याचं चीज केलं त्यानं. माझं मन कधी मोडलं नाही. न आवडेलसं वागला नाही. अन् तुम्हाला ठाऊक नसेल. भूषण खूप देखणा आहे. तुम्ही फोटो पाहिलात त्याचा?" त्या विचारत.
“नाही” 

“दाखवीन, पण फोटो कशाला. प्रत्यक्षच बघं त्याला आता आला म्हणजे.”

हा भूषण कोण, कुठला, काय करतो मी कधी चौकशी केली नाही. मावशींनाही माझ्या चौकशीची गरज वाटली नाही. मी विचारण्याआधीच ह्या भडभडा सांगू लागत. त्या बोलण्यातला जिव्हाळा चटका लावणारा असे. 
एकदा न राहवून मी विचारलं, “मावशी हा तुमचा भूषण येणार कधी?" 

“या दिवाळीला नक्की येईल तो. तसं पत्रात आहे त्याच्या. तुम्ही जाऊ नका हं! गावाला. नाही तर चुकामूक व्हायची. अन् मग पुन्हा कधी भेट व्हायची ते सांगता यायचं नाही.”

मला या भूषणच कुतूहल होतं. जरासा हेवाही होता. पण तो दिवाळीत आला नाही. आज उद्या करून दिवाळी संपली. मावशी हताश झाल्या. त्या मला टाळताहेतसं वाटलं. साऱ्या दिवाळीत त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओल्या अन् आवाजात कढ राहीला. मीही त्यांना भूषणवरून छेडलं नाही. दिवाळी उलटून आठवडा लोटला तरी मावशींनी भूषणसाठी ठेवलेलं फराळाचं तसचं राहिलं,

असेच दिवस गेले, भूषण आला नाही. मावशीही त्याच्याविषयी बोलल्या नाहीत. गंमत म्हणजे संस्थेतलं दुसरंही कुणी त्याच्याविषयी बोलताना कधी दिसलं नाही. एक दिवस सोबत काम करणाऱ्यांतल्या एका जुन्या कार्यकर्त्याला मी भूषणचं विचारलं, त्यानं माझ्याकडं अविश्वासानं पाहिल्यासारख केलं. 

माझ्यासोबत काम करणाऱ्या एकालाही भूषणची माहिती नव्हती! मी अस्वस्थ झालो.
“हू इज् आफ्रेड ऑफ व्हर्जीनिया वुल्फ”मधली मार्था क्षणभर आठवली, पण छे.  
'मावशी' एका सायंकाळी मी हिम्मत करून विचारलं.
“काय?”

“तुमचा भूषण दिवाळीत आला नाही.” त्या काहीच बोलत नाहीत.
“तुम्ही अजून त्याच दु:ख विसरत नाहीत.”
तरीही त्या बोलत नाहीत.
“मावशी, हा भूषण कोण?” विचारतो. वाट पाहतो.

“मुलगा, माझा मुलगा” खूप खोल अन् संथ होत त्या म्हणतात. आता मी अवाक् होतो. मावशींना एवढा मुलगा आहे. माझ्या एवढा अन् तरीही इथल्या कुणाला तो ठाऊक नाही. असं कसं होईल! कुठंतरी मुळातच काही चूक होतेय. मावशी, भूषण, तो पुतळा आणि संस्थेतली ही माणसं. आता माझा दिवस अस्वस्थ अन् रात्र बैचीनीची होते.
मावशी भूषणच्या आठवणींनी दु:खी असणार अन् मी उगाच इथल्या सोबत्यांजवळ भूषणचं सांगून टाकलं. एक दिवस सोबतच्या साऱ्यांना विश्वासात घेतो. काही स्पष्टीकरणही देत नाही. म्हणतो, “मी त्या भूषणच जे विचारलं ते आणखी कुणाला विचारू नका. कुणाशी त्याविषयी बोलू नका, आपसातही ती चर्चा आता नको.”
त्यांना प्रतिसाच चांगला आहे. पुन्हा दिवस उलटतात.... 
एक दिवस मावशींची सकाळची फेरी जरा लवकरच माझ्या खोलीपुढं थांबते. मी बाहेर येतो.
“तुम्हाला गाडी चालवता येते?” त्या नेहमीच्या जिव्हाळ्यानं विचारतात. 
“होय.”
“माझं एक काम कराल?"

“अहो, मावशी तुम्ही आज्ञा करायची. एवढ्या दिवसांत तुमचा अधिकार मान्य केलाय मी.” 
“तसं नव्हे. पण काम जरा नाजूकसं आहे. अन् त्याची चर्चा व्हायला नको.”
“तुम्ही विश्वासानं सांगू शकता मला.”
त्या सांगतात. “संस्थेत वत्सला नावाची एक मुलगी आहे. तिला रोग आहे. दिसणारा नाही. अन् माझ्या माहितीप्रमाणे ती निगेटिव्ह पण आहे. मावशींनी वत्सलाचं लग्न ठरवलं आहे. तो पोरगा पण माझ्या ओळखीचा आहे. धडधाकड आहे. त्याला कधी काळी रोग असावा, पण आता तो उपचारानं पूर्ण बरा झाला आहे.” मावशी या लग्नाचं सांगतात. तेव्हा मीही आनंदून जातो.
“वा! हे छान केलंत, तुम्ही मावशी.” 
“हो, पण तुम्हाला एक जबाबदारी पार पाडायची आहे यातली.”
“कोणती”

“तुम्ही तयार व्हा अन् या, मग सांगते.” 
मी मावशींना भेटायला जातो, तेव्हा वत्सला अन् तिचा नियोजित वर तिथं आधीच आले आहेत.
"बसा” मावशी म्हणतात. त्यांच्या मनावर जरा ताण आहे. त्यांचा आवाजही अपरिचितसा कोरडा आहे. मी बसतो. मावशी वत्सलेशी अन् तिच्या भावी नवऱ्याशी बोलताहेत.
“आता हे साहेब तुम्हाला शहराला नेतील. तिथं आपल्या डॉक्टरांच्याकडे जायचं अन् ऑपरेशन करून घ्यायच.” मावशीचं बोलणं वत्सलेचा नवरा शुभांसारखं ऐकतो . होकार-नकार काही देत नाही. मी तिथं आल्यानं तो आणखीच बुजला असणार. मी वत्सलेकडे पाहतो. तिच्या डोळ्यांत आकांत आहे. 
“हिला सोबत नेलं पाहिजे का?” वत्सलेचा नवरा मावशींना विचारतो.
“होय, तिची संमती लागते. हे साहेब सोबत आहेत. ते सांगतील सगळ समजावून” मावशी कोरडेपणी सांगतात. पण त्यांची नजर स्थिर नाही.
“पण हे का करायचं, मला करायचे नाही असं.” वत्सलेचा आवाज किंकाळीसारखा येतो, “आम्हाला मूल पाहिजे...” ती म्हणते. 
मला आता असह्य होतं. मावशीचा जीवही कावल्यासारखा. वत्सलेचा नवरा शुंभच आहे.

“तु गप्प रहा” तो वत्सलेलाच दटावतो. 
मावशी समजावणीच्या सुरात बोलू लागतात. “हट्ट करू नकोस. हा संस्थेचा नियम आहे. तुला लग्न करता येईल, पण आई होता येणार नाही.”
“का?” वत्सला जिवाच्या आकांतानं विचारते. 
“हा रोग असणाराचं नशीब आहे ते बेटा.”
“पण मला रोग नाही. तुम्हीच सांगता नं मी निगेटिव्ह झाले आहे म्हणून!”
“पण तो कधीही उद्भवू शकतो.”
“पण म्हणून मी आई का नाही व्हायचं?" 
“तुला होणारं मूल निरोगी असणार नाही म्हणून.”

मला तिथून उठून जावसं वाटतं. माझी चुळबुळ लक्षात येऊन मावशी मला खुणेनंच थांबायला सांगतात.
“आपल्या इथं आजवर जेवढी लग्नं झाली त्या साऱ्यांच्या वेळी आपण हे केलं” मावशी सांगतात. “आपल्या वाट्याला आलं ते पुरेसं नाही का? आपल्या मुलांनाही हे का भोगायला लावायचं? संस्थेनं जे नियम घालून दिले ते याच हेतून आहेत.”
जरा वेळानं त्या पुन्हा बोलू लागतात. या वेळी ते एकट्या वत्सलेसाठी नाही. माझ्यासकट साऱ्यांसाठी आहे. त्यांच्या आवाजात आता मनस्वी माणसानं बोलावं तसा आभाळी आत्मविश्वास आहे. मी थक्क होऊन ऐकतो, एका क्षणी माझं आश्चर्य संपतं आणि त्याची जागा संताप घेऊ लागतो.
“हा रोग असणारांची मुलं निरोगी जन्माला येत नाहीत. हा रोग संपवायचा तर त्याचा आरंभच निःशंकपणे संपवला पाहिजे!”

मला बोलावसं वाटलं. यातलं सत्य सांगावंसं वाटलं. महारोग झालेल्या आई-बापांची मुलं रोग घेऊन जन्माला येत नाहीत! पण हे सत्य मावशींना कसं ठाऊक नाही? इतकी वर्ष त्या हे काम करताहेत. की, त्यांना हे कधी कळलं नाही? सांगितलंच नाही कुणी? की हा संस्थेचाच नियम आहे? मी निग्रहानं उठतो. मला या प्रकारात सामील व्हायचं नाही. पण मावशींना इथल्या साऱ्यांपुढं दुखवायचंही नाही.
एकदा वाटतं या बाईंचा आवाज प्रामाणिक आहे. मन प्रांजळ आहे. सत्य यांना ठाऊक नसणार! संस्थेनं, संस्थेच्या चालकानं घालून दिलेल्या नियमांचा त्या श्रद्धेनं अंमल करताहेत. या बाईचा राग कशाला करायचा? पण इतकी वर्ष झाली, त्यांनी हे समजून घेण्याचा प्रयत्न का नसेल केला? मला तो पुतळा आठवतो. मावशींची मावशींची त्यावरली श्रद्धा आठवते. त्या पुतळ्यानंच हे खोटं मावशींच्या मनात पेरलं असणार. श्रध्दावादी माणसं असतातच अशी. आपल्या देवतांची मतं, त्यांच्याहूनही अधिक विश्वासानं वाहून नेतात. आपलीच म्हणून मिरवतात.  

मावशी पुन्हा वत्सलेशी बोलू लागतात. आता त्यांचा आवाज हलका होतो. “हे बघ, मनावर दगड ठेवावा लागतो. तो आयुष्यभर वागवावा लागतो. कुणाला सांगताही येत नाही अन् वर हसत रहावं लागतं. तुला रडता येत. प्रश्न विचारता येतात. मनात आणलंस तर इथं अन् मागे मला शिव्याही देऊ शकशील तू. पण मी काय करायचं. कुणाला सांगायचं. मी कुणाकुणाच्या दु:खाचा भार वहायचा? आजवर इतक्यांदा झालं हे त्याचं ओझं कमी का आहे! आज तुझ्या दुःखाची आणखी त्यात भर. मी तर अशीच दु:ख वाहत आले तुझ्यासारख्या अनेकींची.”

मला मावशीविषयी आत्मीयता वाटू लागते. संताप ओसरू लागतो. मावशी काहीतरी विलक्षण सांगताहेतसं वाटतं. मी त्यांचं पुढलं बोलणं जीव लावून ऐकतो. त्या म्हणतात, “तुम्हा सगळ्यांच्या दु:खात मी माझं दु:ख गाडून टाकलं इतकं की त्याची आठवणसुद्धा शिल्लक राहिली नाही. इतक्या वर्षात. तुला म्हणून सांगते. माझ्या लग्नाच्या आधी संस्थेनं माझ्याही यजमानांना ऑपरेशन करून घ्यायला लावलं. मी तुझ्यासारखीच रडले. आकांत केला. मला मुलं हवी होती. मीही तुझ्यासारखीच निगेटिव्ह होते. पण संस्थेच्या नियमांचा मी आदर केला. सगळ्या आवडी संपवल्या. बाई होण्याची आवडसुध्दा संपवली.”

“पण मावशी.. भूषण” माझं वाक्य अर्ध्यावरच तुटतं. मावशीचं माझ्या बोलण्याकडे लक्षच नाही. मावशींची मार्था झाली आहे. त्या नाटकातली मार्था. आपल्याला नसलेल्या मुलांची वाट पाहते. नवऱ्यालाही पहायला लावते. पार्टीला आलेले पाहुणेही तशी वाट पाहतात.

मावशींविषयीची तीच करुणा उरात उठते. श्रद्धेपायी या बाईनं केवढं मोल दिलं आणि इतरांनाही ते द्यायला लावलं. अन् मुळात या श्रद्धेला आधार नाही. मला त्या पुतळ्याचा राग येतो. महात्म्यांनीही कुणाला काय मागवं?
विलक्षण अस्वस्थता, जीवघेणी. मला गुदमरल्यासारखं होतं. मी उठून बाहेर येतो. आपल्या खोलीत येऊन कॉटवर पडतो. जरा वेळानं मावशी येतात. पंखा सुरू करून बसतात. त्या खिन्न अन् उदास आहेत. तशाच आवाजात त्या म्हणतात,
“पोरींना हे सांगताना जीव जातो बघा. कशी समजूत काढायची त्यांची?” 
पण मावशी मी न राहवून अविचारानं म्हणतो. “तुम्ही सांगता ते खरं नाही.” 
"काय?” त्या आश्चर्यानं विचारतात.

“हा रोग असणारांची मुलं रोग घेऊन जन्माला येत नाहीत. आई आणि वडील दोघंही रोग असणारे असले तरी सुध्दा.”
“कोण म्हणतं हे” त्या संशयानं विचारतात. 

“शास्त्र म्हणत! संशोधन सांगत आणि गेल्या कित्येक वर्षांपासून साऱ्यांना ठाऊक असलेलं सत्य आहे हे.” त्या काही बोलत नाहीत. दारातून दिसणाऱ्या पुतळ्याकडे एकवार बघतात. जरा वेळ हरवल्यासारख्या होतात. खूप खोल अन् संथ होतात. भूषणविषयी बोलताना एकदा झाल्या होत्या तशा म्हणतात.
“म्हणजे मला भूषण होऊ शकला असता, नाही?”

मला भडभडुन येतं, मावशी उठतात. आपल्या संथ गतीनं बाहेर पडतात. त्यांच्या पावलांत आता निर्धार नाही. विश्वासही नाही. मी त्यांच्या मागून चालू लागतो. मला तशी गरज वाटते. त्या पुतळ्याजवळ येतात. मी त्यांच्या हालचाली पाहतो.
पुतळ्याच्या डोळ्यांतली भेदक धार मला आताही जाणवते, मावशी पुतळ्यापुढं थांबतात. पुतळ्याच्या नजरेला नजर देतात. मावशीच्या नजरेत श्रद्धा नाही. प्रश्न आहे. एकच क्षण त्यांच्या नजरेत उपरोध झळकल्याचा मला भास होतो. अतिशय तीव्र, काही क्षण जातात. मावशी पुतळ्याच्या चेहऱ्यावरल्या सुरकुत्यांत आपल्या प्रश्नाचे उत्तर वाचण्याच्या प्रयत्नात. जरा वेळानं माघारी वळतात. मला पाहून थबकतात.
“तुम्ही इथे यायला नको होतं.” एवढचं म्हणतात. 
“आय अॅम सॉरी, मावशी” मी निरोपाचं बोलतो....
 

Tags: Suresh Dwadshiwar सुरेश द्वादशीवार Respect for the rules of the organization संस्थेच्या नियमांचा आदर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके