डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

........जरा मोकळं मैदान. त्यावर उंच गवत वाढलं आहे. त्या गवतात काही गुरं चरताहेत. मैदानापलीकडे पुन्हा झुडुपं. ते मैदान म्हणजेच सीमा. चरणाऱ्या गुरांपैकी काही भारतातलं गवत खात होती, काही ब्रह्मदेशातलं. गाईगुरांना कुठं असतो देश?.... खरं तर सीमा नसतेच. नाहीच. गाईगुरांना नाही. पाखरांना नाही. प्रेम करणाऱ्यांना नाही. निष्प्रेम माणसांना तेवढी ती आहे....
सीमेच्या अलीकडे ‘तो’ भारतात. पलीकडे ‘ती’ ब्रह्मदेशात. मिलन कसं होणार?... समजा तुम्ही आणि तुमची जिवलग व्यक्ती यांच्या गावांमधून सीमारेषा काढली अन् तुम्हाला कुणी म्हटलं, ‘तिकडे जाऊ  नका’... तर?  
 

मणिपुरातले सोगोलमोंग हे खेडे इम्फाळहून साठएक किलोमीटरवर असावे- म्हणजे होते. मी तिथं गेलो तेव्हा त्या खेड्याची नुकतीच राख झाली होती. तीही फार नव्हती. सगळी एका ट्रकमध्ये भरता आली असती.
झोपड्यांच्या तीन-चार रांगा होत्या. त्या जशा जळल्या तशाच राख होऊन जमिनीवर पडल्या होत्या. कुठं कुठं ती राख अजून उसासत होती. काही निखारे अजून निवले नव्हते.

राखेच्या आसपास कोणी नव्हतं. दूर झाडाखाली माणसं होती- शुन्य नजरेनं आपल्या घरांचा धूर बघत. काही बायका, त्या तेवढ्या पुटपुटत, रडत, डोळे पुसत होत्या.

सोगोलमोंग ही जेमतेम दोनशे लोकांची वस्ती. त्यांतले बहुसंख्य नेपाळी गुरखे. पन्नासेक वर्षांपासून तिथे वस्तीला आलेले. तिथंच थोडीशी भातशेती करणारे. त्या गावची तरुण मुलं लष्करात होती. एक म्हातारा बोलका झाला. म्हणाला, ‘आम्ही आणि आमची मुलं लष्करात होतो, आहोत. तुमच्या रक्षणासाठी आम्ही लढतो, मरतो. बघा, तुम्ही आमची कशी गत केली. आम्ही कुठं जायचं?’

दुसरा म्हणाला, ‘पन्नास वर्षे झाली आम्हास इथं. आम्ही इथलेच झालो. मागले सगळे पाश तुटले. इथंच जगणार. इथंच मरणार. माझा मुलगा मेला 62 च्या लढाईत.  नेफात.  सरकारनं त्याला मेल्यानंतर एक बक्षीस दिलं. पण इथली माणसं म्हणताहेत, आम्ही परके आहोत. ‘मायांग’ आहोत. कोण घेईल आम्हाला? आम्हाला घर नाही, गाव नाही, देश नाही.’

मणिपुरात मैती तरुणांच्या भूमिगत संघटना आहेत. मैती वैष्णव आहेत. राज्यात त्यांची लोकसंख्या 60 टक्क्यांएवढी. इतिहासात कधीतरी शंकरदेवाच्या उपदेशाने मैती जमातीचे लोक हिंदू झाले. त्यांनी वैष्णव पंथ स्वीकारला. मणिपुरातले नागा अन् मिझो ख्रिश्चन झाले. सरकारनं जमातीसाठी सवलती देताना नागा अन् मिझोंना, ते ख्रिश्चन झाले तरी दिल्या. मैतींना ते हिंदू झाले म्हणून नाकारल्या.

रिशांग केशिंग तेव्हा मणिपूरचे उपमुख्यमंत्री होते. ते नागा आहेत. ते मला म्हणाले, ‘मैतींवर अन्याय होतो. आम्ही केंद्राला वारंवार हे सांगतो. या प्रश्नावर मंत्रीपद सोडुन आंदोलन करण्याची माझी तयारी आहे, पण दिल्लीवाले ऐकत नाहीत. मणिपूरातल्या हिंदूंना सवलत दिली तर साऱ्या देशात ती द्यावी लागेल असे त्यांना वाटते!’

या साऱ्या गोंधळात मैतींनी लढाऊ संघटना उभारली. बंडाचा झेंडा फडकावला, अन् मैतींखेरीज इतर सगळ्यांना बाहेर घालवण्याची घोषणा केली. त्यांचा राग साऱ्यांवर आहे. पण नेपाळातून कधीतरी येऊन स्थायिक झालेले गुरखे हे त्यांचे पहिले लक्ष. सोगोलमोंगची राख त्यातून झाली.

‘काळचिंग’चेही सोगोलमोंग झाल्याचे ऐकले होते. इम्फालमध्ये असताना गावठाणे लुटल्याच्या, जाळल्याच्या  बातम्या ऐकत होतो. खुद्द इम्फालही  सुरक्षित नव्हते. अर्ध्या शहरात, अर्ध्या आठवड्याचा कर्फ्यु होता. रस्त्यात सशस्त्र सैनिक होते. विमानतळाभोवती त्यांचा गराडा अन् तिथून शहरापर्यंत दुतर्फा लष्कराचेच लोक होते.

माझ्या देशाचं हे नवं दर्शन होतं. ज्या हॉटेलात थांबलो, त्याच्या मालकानं संध्याकाळ पडण्याआधी परत या असे बजावले होते. तो म्हणाला, ‘फार तर सातपर्यंत वाट पाहू. मग दरवाजा बंद होईल. आम्ही पोलिसात वर्दी देऊ. त्यांना तुमची काय माहिती द्यायची तेवढे सांगा!’

दुसऱ्या दिवशी सकाळी केशिंगांनी केलेल्या व्यवस्थेप्रमाणे एका जीपमधून प्रवासाला निघालो. गाडीत दोन लष्करी माणसं होती. हाती कार्बाइन्स घेऊन. ‘आप क्या देखना चाहते हो?’ त्यातल्या एकानं विचारलं.
‘सोगोलमोंग’ मी म्हणालो.
‘वहॉं बचा ही क्या जो आप देखेंगे!’
‘वही, जो नहीं बचा है.’

मग गाडी मार्गाला लागली. दुतर्फा जंगल. एकेरी रस्ता. अधूनमधून छोटी छोटी गावठाणं लागत. झोपड्या. एखादं झोपडीतलं हॉटेल. पुढ्यात काही माणसं बसलेली. त्यांतल्या एका-दोघांनी जीप थांबवून लिफ्ट मागितली. त्यांना लष्करी जवानांनी गाडीत घेतलं. माझ्या मनातला प्रश्न त्यांनी वाचला असावा. म्हणाले, ‘भूमिगतांच्या कारवायांनी सगळी वाहतूक बंद आहे. आम्हीच नेतो अशी अडचणीतली माणसं.’

मी मनात उजळणी करतो- भारत माझा देश आहे. या देशातली सगळी माणसं माझी.....

खरोखरीच सोगोलमोंगमध्ये पाहायला काही बाकी नव्हतं. माणसं हळू आवाजात आपली दुःखं सांगत होती. बायका ऊर बडवून अत्याचाराची कथा सांगत होत्या. मध्यम वयाची जरा गबदूल अंगाची एक बाई म्हणाली, ‘रात्री दहाच्या सुमारास हल्लेखोर आले. आम्हाला दरडावून घरात जायला सांगू लागले. आम्ही घरात जाताना त्यांनी घराचा दरवाजा बाहेरून बंद केला. काही क्षणांतच वरच्या गवताच्या छप्पराने धडाडून पेट घेतला.’ त्या बाईच्या नवऱ्यानं कुडाची भिंत तोडून सगळ्यांना त्या पेटत्या घरातून वाचवलं होतं.

आपल्याच देशात निर्वासित असलेल्या अशा तनामनानं जखमी झालेल्यांच्या छावण्या मी पाहिल्या होत्या. मग अशी पेटती गावं पाहत जीप निघाली. आठ-दहा जागचे राखेचे ढिगारे पाहून झाल्यावर जाणवलं- माणुसकीसारखे, अत्याचारांतही साधर्म्य असते. माणुसकीची जशी एक तऱ्हा तशीच अत्याचारांचीही असते. माणसांना मारझोड, बायकांची छेड, घरं पेटवणं. माणुसकीची पट्टी कुठं वरची, कुठं खालची. तसा अत्याचाराचा स्वर कुठं तीव्र, कुठं मंद, एवढंच.
जीपमधला जवान म्हणाला, ‘इथून मागं लोटू या.’
‘का?’ मी.
‘ती दिसते ना. ती आपल्या देशाची बॉर्डर लाईन आहे. त्याच्यापुढे ब्रह्मदेश.’
‘कुठं आहे लाईन.’- मी
‘नाही, ती दिसत नाही. कारण ती आखली नाही. आम्हाला ती सांगितली आहे. म्हणून माहित आहे.’

‘पण माझ्यासारख्याला कसं कळणार ते?’
‘तुम्हाला त्याची गरज काय?’
त्याचा प्रश्न खरा होता. मला या सीमेची खरोखरीच गरज काय!
-किती जणांना त्याची गरज असते?
‘पण इथल्या सामान्य लोकांना तरी सीमा कशी कळायची?’- मी विचारतो.
‘आमची माणसं असतात नं सांगायला.’

‘पण आता तर आपल्यावाचून इथं कुणी नाही. आपण इथून गेल्यावर कुणी तिकडं गेलं- आलं म्हणजे काय होतं?’
‘काय होणार, जातातच. अन् येतातही, अशी काही माणसं जाण्या-येण्यानं काय होतं....’
माझा देश. माझी माणसं. चार-दोन तिकडे गेले काय- आले काय! सत्तर कोटींच्या देशाचं काय व्हायचं आहे?
सीमा सुरक्षा दलाच्या चौक्या आठ-आठ, दहा-दहा किलोमीटर्सवर असणार. त्यांची गस्त टाळली की सारंच चालतं. इम्फालच्या सरकारी अतिथीगृहात, ब्रह्मी बायका परक्या वस्तू विकायला आणताना मी पाहिल्या होत्या.

आम्ही परत फिरलो. फिरण्याआधी मी माझ्या देशाची नसलेली सीमा पाहतो. एका जागी झुडपं संपली. मग जरा मोकळं मैदान. त्यावर उंच गवत वाढलं आहे. त्या गवतात काही गुरे चरताहेत. मैदानापलीकडे पुन्हा झुडुपं. ते मैदान म्हणजेच सीमा. चरणाऱ्या गुरांपैकी  काही भारतातलं गवत खात होती, काही ब्रम्हदेशातलं. गाईगुरांना कुठं असतो देश?

माझ्या मनातली भारतातली सीमा नकाशाने ठसवली आहे. नागपूर-विदर्भाचा प्रदेश सीमेपासून दूर सुरक्षित. कदाचित म्हणूनही मला ही सीमा दूरची अन पवित्र असावी. नकाशात पुन्हा ती जाड रेषेनं दाखवलेली. इथं प्रत्यक्षात काहीच नव्हतं! घरांनाही कुंपणं असतात. देशाला कुंपण नाही. असावं का ते, की नसावं? कुंपणांनी सुरक्षितता येते म्हणतात. खरोखरी येते का, की नुसती भांडणं येतात?

परतीच्या प्रवासात मनात प्रश्नांची गर्दी होती. गवताच्या मैदानात माझा देश संपत होता. पण पलीकडलं मैदान माझ्या देशातल्यासारखंच होतं. तसंच गवत, तशीच झाडं, तेच रंग. आणि हो, पक्षी होते ते तिकडून उडून इकडे यायचे. अन् इकडच्यांनाही पासपोर्ट, व्हिसा लागत नव्हता. माझा देश- त्यांचा देश....

जोरात ब्रेक लागून गाडी थांबली. समोरच्या काचेवर डोकं आपटलं. जवानांना ते नेहमीच असावं. माझं डोकं चेचल्याची कुणाला दखल नव्हती. दोघांनी उड्या घेतल्या अन् ते जंगलात दिसेनासे झाले.
मी ड्रायव्हरला विचारलं, ‘काय झालं?’
‘कुछ नही. कोई आदमी है.’
‘ब्रह्मी की भारतीय?’ माझं आपलं ते चाललं होतं.
‘कोई आदमी है, अभी पता चलेगा.’

जरा वेळात ते दोन्ही जवान परतले. आता त्यांच्यासोबत एक लांब केसांचा तरुण होता. लांब चेहऱ्याचा. केसांची रांग अर्ध्या कपाळापर्यंत असलेला, निमगोरा, अंगात विसविशीत कपड्याचा सदरा. त्याच्या   बाह्या  ढोपरापर्यंत ओढलेल्या. खाली जीन्स्, पायात बूट आहेत, मोजे नाहीत. मी प्रश्न घेऊन पाहतो.

सोबतच्या जवानांवर काही तणाव नाही. ते नुसतं स्मित करत आहेत. तो तरुण मागल्या सीटवर बसतो. जवान आपली जागा घेतात अन् जीप चालू लागते. जरा वेळ सगळे गप्प. अन् मग ते बोलू लागतात. मी मन लावून ऐकतो.
‘केव्हा आलास इकडे’ लष्कराचा माणूस विचारतो.
‘सकाळीच’ तो तरुण उत्तर देतो.
‘इथवर कसा आलास?’
‘सायकलनं. सायकल सोगोलमोंगजवळ ठेवली आहे. तिथून पायी.’
‘झाली का  भेट तिची?’

‘होय’ मी मागं पाहतो.- त्या तरुणाच्या चेहऱ्यावर स्मित आहे. त्याची या जवानांशी ओळख असावी. मी निरखून पाहतो. त्याच्या प्रसन्न चेहर्यावर तिच्या खुणा आहेत.
‘सालं प्रेमात माणसं फार पागल होतात.  कुठं कुठं दौलत जातात.’ तो जवान म्हणतो.
‘तुम्ही केलं का प्रेम कधी मुंन्शीजी?’ तो तरुण विचारतो.

‘अरे यार, आमचं कसलं प्रेम. लहानपणी बापाने सांगितलं तिच्याशी लग्न केलं आम्ही अन् तिच्यावरच प्रेम करतो अजून.’ त्यावर सगळे हसले. मीही त्यात सामील झालो.
मग मी त्या तरुणाला विचारलं, ‘तुझं नाव?’
‘दोरेन्द्रसिंग. मला दोरेन म्हणतात.’
‘तू सीमेपलीकडे गेला होतास ना?’

‘हो, जवळच एक खेडं आहे, हाकेच्या अंतरावर. तिथं माझी मैत्रीण राहते. सोबतचा लष्करचा माणूस म्हणाला, ‘अरे साहेब, या पोराची दोस्त तिकडे राहते, ब्रह्मदेशात आणि हा तिला भेटायला नेहमी जातो तिकडं सीमा ओलांडून. त्याला आम्ही बचावलंय. अरे, आम्ही ओळखीचे म्हणून  बचावतोस. दुसऱ्या एखाद्यानं पकडून पोलिसात दिलं असतं. गोळीसुद्धा घातली असती आम्ही, नाहीतर  बर्मी लष्करातल्या एखाद्यानं’

‘तिकडची माणसंही माझ्या ओळखीची झालीत आता.’ तो म्हणतो. माझ्या मनातल्या चक्राला पुन्हा गती येते. आता त्याला कुतूहलाची जोड आहे.
‘नेहमी येतोस का असा?’ मी.
‘खुपदा’ तो.

आणि तो सांगू लागला,’ सीमेलगत काकचिंग नावाचं एक खेडं आहे. ब्रह्मदेशाच्या बाजूनं. सीमेवरून हाकेच्या अंतरावर बोरेनच्या गावाजवळ एक छोटेखानी डोंगर आहे. त्या डोंगरावरून ते काकचिंग दिसतंदेखील! दोरेनचं कुटुंबही मूळचं या काकचिंगचं. 47 पूर्वी कधीतरी त्याचे वडील इकडे चार-एक मैल आले. अन् भारतीय झाले. त्याचे इतर भाऊ काकचिंगला राहिल्याने ते ब्रह्मदेशी झाले.

दोरेनच्या वडिलांचे एक बालमित्र काकचींगच्या शाळेत शिक्षक आहेत. त्यांची मुलगी अन् दोरेन लहानपणापासून एकमेकांना बघत-भेटत आले. अन् कधीतरी एकमेकांवर प्रेम करू लागले. त्यांच्या लग्नाच्या आणाभाका झाल्या आहेत. त्यांच्या घरचा विरोध नाही. तिच्याही घरचा नाही. अडचण सीमेची आहे. दोन्ही बाजूंनी आपापल्या सरकारांकडे अर्ज-विनंत्या केल्या आहेत. पण लाल फितीत त्यांचं मिलन अडकून पडलं आहे.

दोरेन असाच सकाळी निघतो. सीमेवर येतो. तीही तिथे येते. तिथं सीमा संपलेली असते. खरं तर सीमा नसतेच, नाहीच! गाईगुरांना नाही, पाखरांना नाही, प्रेम करणाऱ्यांना नाही. माणसांना तेवढी ती आहे. पण निष्प्रेम माणसांना तेवढी ती आहे. पण निष्प्रेम माणसं कायदे घडवतात.

दोरेन सांगत होता, ‘तुम्ही देशाच्या मध्यभागी राहता. तुम्हाला सीमेचं अप्रूप आहे. अन् अप्रूप आहे म्हणून पावित्र आहे. माझ्या अन् तिच्या गावातली सीमा खरी नाही. नॅचरलही नाही. अनैसर्गिक आहे.
मला परत जाणं तरीही पटत नाही. मग तो मलाच विचारतो-
‘तुमचं गाव कुठलं?’
मी गावाचं नाव सांगतो.
‘तुमचे मित्र- मैत्रिणी असतील ना?’
मी मान हलवतो.

‘तुमच्या अन् त्यांच्या गावातून एखादी सीमारेषा काढली, अन् तुम्हाला कोणी म्हटलं, ‘तिकडे जाऊ नका’ तर?’
‘पण प्रश्न देशाचा आला की उत्तर बदलतात.’
‘प्रश्न देशाचा नाही. माणसांचा आहे. देशाने माणसे घडवली नाहीत. माणसांनं देश बनवले आहेत.’
‘पण तुमच्या लग्नातले अडसर होतीलच नं दुर.’
‘पण ते असावेतच का?’
माझ्याजवळ त्याच्या प्रश्नांना उत्तर नाही. 

त्याच्या गावाच्या वाटेवर गाडी थांबली, तशी त्यानं जीपमधून उडी मारली. लष्करी मंडळींना त्यानं एक स्मार्ट सॅल्यूट ठोकला. माझ्याशी हस्तांदोलन केलं. एव्हाना मी त्याच्यावर प्रेम करू लागलो होतो.
‘तुझ्या मैत्रिणीला मी तिचं अभिनंदन केल्याचं सांग. एवढा उमदा नवरा गाठल्याबद्दल.’
‘तुम्ही तिला पाहिलं नाहीत. तुम्ही माझं अभिनंदन केलं  असतंत!’

आमची जीप दिसेनाशी होईपर्यंत तो तिथेच उभा होता. मग धुळीच्या धुराळ्यात अन् झुडपांच्या आड दिसेनासा झाला. रात्री खूप उशिरा आम्ही इम्फालला पोहोचलो.

सकाळी मी सरळ केशिंगांना भेटलो. त्यांना दौऱ्याची हकिकत सांगितली. अन् न राहवून त्या दोरेनची व्यथाही ऐकवली.
उपमुख्यमंत्री गंभीर झाले. वर मान वळवत म्हणाले,
‘ओव्ह- लव्ह. वेडं प्रेम.’
‘होय. वेडं- पण खरं.’
‘नाही साहेब, वेडं- आणि खरं!’ 
 

Tags: Love Revolt Naga Mizo Tribe Hindu Border Burma मैतीं काकचिंग नागा रिशांग केशिंग मिझोरामने सोगोलमोंग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके