डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

यशवंतराव : लोकजीवनाकडून एकाकीपणाकडे

राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, जातिव्यवस्था या साऱ्यांच्या तपशीलवार अध्ययना-एवढाच साहित्य, संस्कृती, इतिहास आणि राजकीय विचारसरणी यांचा त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या या तयारीची साक्ष पटविणारा आहे. तेवढ्यावर न थांबता जगाचे राजकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींची तपशीलवार जाण तर त्यांनी ठेवलीच शिवाय युद्धशास्त्र व लष्करी हालचालींचे तपशीलही आपल्या अध्ययनशील स्वभावाने त्यांनी आत्मसात केले... त्यांना कुसुाग्रज कळत होते आणि सुरेश भटही मुखोद्‌गत होता. संतांची अवतरणे देतानाच आपल्या भाषणात ते इंग्रजी ग्रंथांचे दाखले देत. सॉक्रेटिस किंवा ॲरिस्टॉटल, मिल्‌ किंवा बेन्थाम, टॉलस्टॉय किंवा लास्की यांची साधी ओळखही न ठेवणाऱ्या आजच्या पुढाऱ्यांना यशवंतरावांची त्यांच्याशी असलेली सलगी भोवळ आणण्याएवढी भीती घालणारी होती...

यशवंतरावांच्या हाती महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे 1960 मध्ये आली तेव्हा महाराष्ट्र एकसंध नव्हता. द्विभाषिक मुंबई राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर 1956 मध्ये त्यांची निवड झाली तेव्हा त्यांना आपले नेतृत्व बहाल करणारा काँग्रेस पक्षही एकसंध नव्हता. भाषावार प्रांतरचनेचे सूत्र स्वीकारल्यानंतर निर्माण झालेले द्विभाषिक मुंबई राज्य मुळातच अनैसर्गिक होते व कोणत्याही कृत्रिम उभारणीत रहावी तेवढी अस्वस्थता त्यात होती. संयुक्त महाराष्ट्राची पहिली मागणी बेळगावच्या मराठी साहित्य संमेलनात ग.त्र्यं.माडखोलकरांनी अध्यक्षपदावरून केली तेव्हापासून तिची तीव्रता वाढत जाऊन प्रथम शंकरराव देवांची सौम्य संयुक्त महाराष्ट्र परिषद व पुढे डांगे-अत्रे-एसे यांची उग्र संयुक्त महाराष्ट्र समिती यांच्या लढाऊ आंदोलनात तिचे पर्यवसान झाले होते. मुंबईत माणसे मरत होती आणि राज्याचे सरकार जनाधार हरवल्यासारखे बंदुकांच्या बळावर तरंगताना दिसत होते. तिकडे गुजरातेत इंदुलाल याज्ञिकांच्या नेतृत्वातील महागुजरात राज्य परिषदेने काँग्रेसला मुळापासून हलविल्याचे व उखडल्याचे चित्र दिसत होते. विदर्भाच्या नेत्यांना द्विभाषिक जेवढे नकोसे तेवढाच संयुक्त महाराष्ट्रही नकोसा होता. स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर तिकडचे आमदार आपापले राजीनामे हातात घेऊन कन्नमवारांच्या मागे उभे होते. आंदोलन, अशांतता, अस्वस्थता आणि आपण कृत्रिमरीत्या एका राज्याच्या जोखडात अडकलो असल्याची सार्वत्रिक भावना. झालेच तर काँग्रेस पक्षात भाऊसाहेब हिरे या बलाढ्य व लोकप्रिय मराठा नेत्याच्या विरोधात मोरारजी देसाईंच्या अप्रिय पाठिंब्याच्या जोरावर नेतृत्व व मुख्यमंत्रिपद मिळविल्यामुळे महाराष्ट्रातील मराठ्यांचा संघटित वर्ग संशयाने पाहणारा... यशवंतरावांच्या हाती आलेला महाराष्ट्र असा होता आणि त्यात एकसंध व नैसर्गिक राज्यव्यवस्था निर्माण करणे हे त्यांच्या नेतृत्वापुढचे आव्हान होते.

हे आव्हान पेलायला लागणारी व्यक्तिगत पातळीवरची त्यांची तयारी मात्र पूर्ण होती. घरातले सत्यशोधकी संस्कार, ब्राह्मणेतर चळवळीतील त्यांच्या बंधूंचा, गणपतरावांचा, प्रत्यक्ष सहभाग आणि जवळकरादिकांचा टोकाचा ब्राह्मणद्वेष या गोष्टी त्यांनी जवळून पाहिल्या होत्या. त्यांतल्या ग्राह्य-अग्राह्य बाबींविषयीचा त्यांचा निर्णय कधीच झाला होता. सत्यशोधन मान्य, ब्राह्मणेतरांचे येऊ घातलेले सत्ताकारण मान्य पण जवळकरादिकांनी चालविलेला टिळकांसारख्या राष्ट्रनेत्याचा द्वेष आणि उपमर्द अमान्य या भूमिकेवर ते फार पूर्वी आले होते. टिळकांचे राष्ट्रीय नेतृत्व व त्याग यावरची त्यांची निष्ठा त्यांच्या फुल्यांच्या पुरोगामित्वावरील श्रद्धेएवढीच अढळ होती. महाराष्ट्रात एकेकाळी चाललेला ‘आधी राजकीय की सामाजिक’ हा वाद गांधीजींच्या उदयानंतर संपला होता. गांधीजींनी त्या दोन्ही प्रवाहांना एकत्र आणून स्वातंत्र्य लढ्याच्या अग्रभागी उभे केल्याने यशवंतरावांसारख्या अभ्यासू कार्यकर्त्याच्या मनातले त्याविषयीचे द्वंद्व संपले होते. ‘मी स्वतःला गांधीजींचा अनुयायी समजतो. त्यांच्या विचारांचा पूर्ण स्वीकार मला करता आला नाही ही माझी खंत आहे’ हे त्यांचे विधान त्यांच्या या सर्वसमावेशक चिंतनशीलतेएवढेच त्यांच्या घडणीची साक्ष ठरावे असे आहे.

स्वातंत्र्य लढ्यातील सहभाग आणि त्या काळात घडलेल्या तुरुंगवासात समाजवादी नेत्यांशी आलेला अभ्यासपूर्ण संबंध यातून समाजवादाविषयीची आस्था व उपयुक्तता त्यांना पटत गेली. समाजाच्या खऱ्या मजबुतीसाठी दुबळ्या वर्गांच्या बाजूने उभे राहण्याची व केंद्राच्या डावीकडे असण्याची त्यांची मानसिकता त्यातून तयार झाली. पुढे मानवेंद्रनाथ रॉय यांच्या कृतिशील व काहीशा आक्रमक डाव्या मानवतावादाने त्यांना आपल्या जुन्या समाजवादी निष्ठा तपासून पाहायला भाग पाडले. रॉय यांचा जागतिक साम्यवादी चळवळीतील सहभाग, जगातल्या कम्युनिस्ट नेत्यांशी त्यांचा असलेला संबंध आणि त्यांच्या अध्ययनातील शिस्त यातून समाजवाद्यांचे पुस्तकी बंदिस्तपण त्यांच्या लक्षात आले असणार. शिवाय शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या राज्यांची भाषा बोलणारे समाजवादी प्रत्यक्षात शेतकऱ्यांपासून व कामगारांपासूनही दूर आहेत हे ढळढळीत सत्य त्यांना दिसतच असणार. मात्र त्याहून मोठी बाब शेतकऱ्यांचे व कामगारांचे खरे वर्ग स्वतःला शेतकरी कामगार पक्ष म्हणविणाऱ्या शेकापएवढेच समाजवाद्यांपासून आणि साम्यवाद्यांपासूनच नव्हे तर रॉयवाद्यां-पासून दूर राहत आले आणि त्या खऱ्या गरिबांना या डाव्या मंडळींहून गांधी जवळचा वाटतो हे जगाला दिसणारे वास्तव त्यांनाही समजलेच असणार... यशवंतरावांची वैचारिक घडण अशी, समाजवाद-रॉयवाद व पुढे गांधीजींचा सर्वसमावेशक मनुष्यधर्म अशी झाली आहे. (खुद्द मानवेंद्रनाथ रॉय यांनाही त्यांचे गांधीजींविषयीचे आकलन बऱ्याच अंशी चुकल्याचे फार उशीरा लक्षात आले. गांधी जेव्हा धर्म म्हणतात तेव्हा त्यांना नीती म्हणायचे असते, कोणत्याही एका संघटित धर्माच्या शिकवणीचा आग्रह ते धरीत नाहीत ही बाब त्यांना अखेरच्या काळात नोंदवावी लागली. नीती हा साऱ्या मनुष्यमात्राला कवेत घेणारा धर्म आहे ही रॉयांच्या लक्षात आलेली गांधीजींची भूमिका अनेकांच्या अजूनही लक्षात येत नाही हेही येथे नोंदविण्याजोगे) गांधीजींच्या पश्चात यशवंतरावांचा प्रवास नेहरूप्रणीत (अनेकांच्या मते) काहीशा सर्वसमावेशक तर (काहींच्या मते) दिशाहीन समाजवादाच्या वाटेने सुरू झाला व त्याच वाटेवरून ते पुढे चालत राहिले.

सर्व बाजूंनी होत असलेल्या या वैचारिक संस्कारांसोबत प्रवास करतानाच यशवंतरावांनी आणखीही एक खबरदारी कमालीच्या डोळसपणे बाळगली होती. 1967 च्या निवडणुकांनी भारतीय (व मराठी) लोकशाहीचे येऊ घातलेले चित्र सगळ्या डोळस कार्यकर्त्यांसमोर उघड केले होते. प्रौढ सार्वत्रिक मतदानावर उभी होणारी येती लोकशाही समाजातील मूठभर उच्च मध्यमवर्गीयांना राजकारणातून बाद करणार हे त्या निवडणुकीने साऱ्यांच्या लक्षात आणून दिले होते. राजकारण व त्याची चर्चा यांची शिष्टवर्तुळातील बंदिस्तता संपणार आणि ते सारे बहुजनांच्या स्वाधीन होणार याच्या खुणा तेव्हाच उघड झाल्या. (1952 च्या लोकसभेत वकील आणि कायदेपंडितांचा भरणा होता तर 1957 मध्ये निवडली गेलेली लोकसभा ग्रामीण नेत्यांच्या बहुसंख्येची होती. हा बदल केवळ राजकीय नव्हता. तो एक महत्त्वाचे सत्ताविषयक स्थित्यंतर घडविणाराही होता.) त्यामुळे यापुढची सत्ता आपली आहे आणि आपणच खरे सत्ताधारी होणार आहोत याची जाणीव यशवंतरावांसारख्या अभ्यासू व डोळस कार्यकर्त्याला नक्कीच झाली असणार. मात्र सत्ताधारी व्हायला आणि सत्तेची सूत्रे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांएवढीच किंबहुना त्याहून चांगली हाताळायची तर एका व्यक्तिगत तयारीची गरजही त्यांना जाणवली असणार... बहुजन समाजातून येणाऱ्या अनेक नेत्यांनी जी संधी गमावली ती यशवंतरावांनी साधली व तिचे त्यांनी सोने केले हे त्या काळातील व नंतरच्याही त्यांच्या वाटचालीने कोणाच्याही लक्षात आणून द्यावे. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, जातिव्यवस्था या साऱ्यांच्या तपशीलवार अध्ययनाएवढाच साहित्य, संस्कृती, इतिहास आणि राजकीय विचारसरणी यांचा त्यांनी केलेला अभ्यास त्यांच्या या तयारीची साक्ष पटविणारा आहे.

नेतृत्व करणाऱ्याला साऱ्याहून चांगले लिहिता व बोलता यायला हवे, त्याच्या बोलाचा परिणाम साऱ्यांवर व्हायला हवा म्हणून मराठीएवढीच इंग्रजी भाषेची (व पुढे हिंदीची) त्यांनी केलेली उपासना आजच्या होतकरूच नव्हे तर प्रस्थापित पुढाऱ्यांनीही लक्षात घ्यावी अशी आहे. तेवढ्यावर न थांबता जगाचे राजकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींची तपशीलवार जाण तर त्यांनी ठेवलीच शिवाय युद्धशास्त्र व लष्करी हालचालींचे तपशीलही आपल्या अध्ययनशील स्वभावाने त्यांनी आत्मसात केले... त्यांना कुसुाग्रज कळत होते आणि सुरेश भटही मुखोद्‌गत होता. संतांची अवतरणे देतानाच आपल्या भाषणात ते इंग्रजी ग्रंथांचे दाखले देत. सॉक्रेटिस किंवा ॲरिस्टॉटल, मिल्‌ किंवा बेन्थाम, टॉलस्टॉय किंवा लास्की यांची साधी ओळखही न ठेवणाऱ्या आजच्या पुढाऱ्यांना यशवंतरावांची त्यांच्याशी असलेली सलगी भोवळ आणण्याएवढी भीती घालणारी होती... साहित्य संमेलनातील त्यांची उद्‌घाटनाची भाषणे प्रत्यक्ष अध्यक्षांच्या भाषणाहून अधिक चांगली होत हा प्रस्तुत लेखकाला आलेला अनुभव अनेकांच्या पदरी आहे... सत्ता येताना दिसत असली तरी तिला सामोरे जायला स्वतःला सर्वशक्तिनिशी सज्ज करणे ज्या थोड्या कार्यकर्त्यांना तेव्हा जमले त्यांत यशवंतराव असे पुढे होते. ज्यांनी एवढ्या तयारीनिशी ते केले नाही ते त्यांचे समकालीन त्यांच्या जातिविशेषांचे, मर्यादित प्रदेशांचे किंवा जातिद्वेषावर उभ्या होणाऱ्या तात्कालिक लाटांचेच प्रतिनिधी, प्रवक्ते वा पुढारी बनले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर बहुजन समाजातून येऊन यशवंतरावांएवढी उंची गाठणारे त्याचमुळे तेव्हा फारसे कोणी दिसले नाही. पद मिळवणारे, सत्तेत टिकणारे, प्रसंगी लोकप्रियता मिळवणारे अनेकजण मोठे झाले हे खरे असले तरी यशवंतरावांनी गाठलेले महानपण त्यांच्यापासून दूरच राहिले.

द्विभाषिक राज्याचे अनैसर्गिक व अल्पजीवी असणे यशवंतरावांना ठाऊक होते. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांना तसे स्पष्टपणे म्हणता येत नसले तरी जे साऱ्या सामान्यांना कळते ते त्यांना कळत नव्हते असे म्हणणे हा त्यांच्यावरचा जेवढा अन्याय तेवढेच तसे समजणाऱ्याचे ते अज्ञान म्हणावे लागेल. ‘महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे’ असे एक वाक्य त्या काळी चव्हाणांचे म्हणून फार वाजविले व गाजविले गेले. मात्र नेहरू या नावाचा उच्चार राष्ट्रीय नेतृत्वाचे प्रतीक म्हणून त्यांनी केला. नेहरूंचे मोठेपण हे त्यांच्या लेखी देशाचे व काँग्रेस या राष्ट्रीय पक्षाचे मोठेपण होते हे समजून घ्यायलाही फारशा मोठ्या मनाची वा बुद्धीची आज गरज नाही. ज्यांना पक्ष सांभाळायचा असतो, नेतृत्व राजी राखायचे असते आणि एक ना एक दिवस राजकारणाची अपरिहार्यता आपल्या वरिष्ठांच्या गळी उतरून देण्याची वाट पाहायची असते त्यांच्या मौनाला दुबळेपण मानणे हाच खरेतर उथळपणा आहे. शेजाऱ्यांना दिसणारी गृहछिद्रे घर चालविणाऱ्या कर्त्या माणसालाही ठाऊकच असतात. पण आपल्या तशा उणिवांवर पांघरूण घालणे हे त्याचे कर्तव्य असते. त्याच्या त्या प्रयत्नांवर दुबळेपणाचा शिक्का उमटवणे हेच मग असमंजसपण ठरते. अशा दुबळेपणाचा शिक्का आमच्या अनेक विचारवंतांनी, टीकाकार माध्यमांनी आणि उथळ विरोधकांनी गांधी-नेहरूंवर टीका करतानाही उमटविला आहे. ती राष्ट्रीय माणसे अशा उथळ चिखलफेकीतून सुटली नसतील आणि तिची झळ यशवंतरावांनाही लागली असेल तर ती करणाऱ्यांना घरच्या कर्त्या माणसाची कोंडी समजली नाही वा समजूनही त्यांनी ती दुर्लगित करण्याचे राजकारण केले असेच म्हटले पाहिजे.

1956 ते 1960 या चार वर्षांत द्विभाषिक राज्याचे अनैसर्गिक असणे व त्याच्या अनिष्ट राजकीय परिणामांचे स्वरुप नेहरूंसकट सगळ्या पक्षश्रेष्ठींना पटविणे यशवंतरावांना जमल्याचेही महाराष्ट्राने नंतरच्या काळात पाहिले. त्यांच्यावर ‘सूर्याजी पिसाळ’ किंवा ‘महाराष्ट्रद्रोही’ अशी शेलकी व निंद्य विशेषणे उधळणाऱ्यांची तात्कालिक लोकप्रियता व राजकारणात अल्पकाळ टिकण्याची क्षमताही त्याने पाहिली. चार वर्षे मुंबईसह पुण्यातील विद्वानांचे, प्रचारकांचे आणि स्वतःला यशवंतरावांहून जास्तीचे महाराष्ट्रभक्त म्हणविणाऱ्यांचे शिव्याशाप सहन करीत त्यांनी राज्य राखले आणि 1960 च्या 1 मे या दिवशी ते मोडून संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलशही त्यांनीच मुंबईत आणला. तो आणत असताना एसेमसारख्या सभ्य विरोधकाला त्यांनी सोबत घेतले आणि नव्या महाराष्ट्राची मुहूर्तेमेढ रोवायला तोवर त्याला विरोध करणाऱ्या नेहरूंनाच त्यांनी महाराष्ट्राच्या राजधानीत आणले... म्हटले तर हा एका श्रेष्ठ महाकाव्याचा विषय आहे. पण मराठी प्रतिभेने मराठी पराक्रमाला फारसा न्याय कधी न दिल्याने तेव्हा तो एका साध्या बातमीचाच विषय तेवढा बनला.

यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वातले सुसंस्कृतपण व संवेदनशीलता सांगणारा एक प्रसंग येथे नमूद करण्याजोगा आहे. त्यांच्या कुटुंबात मूल जन्माला आले नाही. त्यांची ती दुबळी बाजू हेरून अत्र्यांनी त्यांच्यावर एकदा कमालीचा क्रूर हल्ला चढविला. त्यांच्या मौनाची आणि नेहरूनिष्ठेची टवाळी करण्याच्या नादात यशवंतरावांच्या शारीरिक अभावावरच त्यांनी नको तसे बोट ठेवले... त्या हल्ल्याला उत्तर देताना यशवंतराव म्हणाले, ‘आचार्य हे महाराष्ट्राचे थोर लेखक आहेत. त्यांचे साहित्य वाचतच मी लहानाचा मोठा झालो. त्यांच्या आताच्या टीकेने मी संतापलो नाही. माझे दुःख वेणूतार्इंविषयीचे आहे. त्या गरोदर असताना आम्ही दोघेही स्वातंत्र्याच्या लढ्यात होतो. एका सोजिराने पोटावर लाथ घातल्याने वेणूताई अत्यवस्थ झाल्या आणि जन्माला येणारे मूल जन्म घेऊ शकले नाही. ते दुःख आम्ही मुकाटपणे गिळले. अत्र्यांनी केलेल्या टीकेमुळे वेणूतार्इंना ज्या वेदना झाल्या त्यामुळे मी कळवळलो आहे’.... पुढे अत्र्यांनी यशवंतरावांची क्षमा मागितली. पण घडू नये तसा प्रमाद प्रल्हादरावांच्या हातून घडून गेला होता... असाच एक प्रसंग प्रतापगडावर शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाला नेहरू आले तेव्हाचा. गडाच्या वाटेवर एका बाजूला काँग्रेसचे कार्यकर्ते नेहरूंच्या स्वागताचे फलक घेऊन तर दुसऱ्या बाजूला संयुक्त महाराष्ट्र समितीचे कार्यकर्ते त्यांच्या निषेधाच्या घोषणा करीत उभे होते. घोषणांचा गजर वाढला तेव्हा यशवंतरावांनी आपली बाजू सोडली आणि सहजपणे फिरत पुढे जावे तसे ते समितीच्या नेत्यांजवळ पोहोचले आणि काहीएक न बोलता त्यांनी अत्र्यांच्या बुशकोटाचे खुले राहिलेले वरचे बटन लावून दिले. सारा जमाव अवाक्‌ झाला असताना यशवंतराव जसे गेले तसेच परत आपल्या जागी आले होते.

स्वभावातील ही ऋजुता, सहसा न आढळणारे सत्ताधाऱ्यांचे विनम्रपण, मोठा ज्ञानाधिकार, प्रश्न समजावून घेण्याची क्षमता, विरोधकांना नकळत नामोहरम करण्याचे कसब, मिठास वक्तृत्व आणि वागण्याबोलण्यातले सहजसाधे आपलेपण या बळावर कराडच्या यशवंतरावांनी प्रथम महाराष्ट्र व मराठवाडा मग मुंबई आणि पुढे विदर्भही आपलासा करून घेतला. त्यांच्या एका वक्तव्यावर संतापलेले कोल्हापूरही असेच ‘ते आले, त्यांनी पाहिले आणि ते जिंकले’ अशाच थाटात त्यांनी जिंकून घेतले... पण माणसे जिंकणे आणि जोडणे हे नेतृत्वाचे कसब असले तरी मुख्यमंत्री म्हणून यशस्वी व्हायचे तर त्याला प्रशासकीय तरबेजपणाची गरज असते. यशवंतरावांनी तो गुणही अल्पावधीत आपल्या अंगी बाणला होता. त्यांचे अधिकाऱ्यांशी स्नेहाचे संबंध असले तरी प्रत्येकाच्या मनात त्यांचा धाकही जबर होता. कठोर व लोकोपयोगी निर्णय घेताना त्यांनी प्रशासनाला, तुमच्याहून सरकार मोठे आहे हे त्यांना समजेल तसे समजावले होते. त्यांच्यावर प्रशंसेने लिहिणाऱ्या अनेक बड्या अधिकाऱ्यांची त्यांच्याविषयीची पुस्तके, लेख आणि इतर लिखाण या साऱ्याची साक्ष द्यायला आपल्यासोबत आज आहेत.

प्रथम अकोला व नंतर नागपूर करार करून त्यांनी विदर्भाच्या नेत्यांना वेगळ्या विदर्भाची मागणी मागे ठेवायला राजी केले. ती त्यांची गरज असली तरी त्या गरजेचे उपलब्धीत रूपांतर करण्याची किमया तेव्हा त्यांनी करून दाखविली. 1957 च्या विधानसभेची निवडणूक त्यांच्या नेतृत्वात पार पडली. महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र  समितीने आणि गुजरातेत महागुजरात परिषदेने काँग्रेसचा मोठा पराभव तीत केला. खुद्द यशवंतराव त्यांच्या कऱ्हाड मतदार संघातून अवघ्या 500 मतांनी विजयी होऊ शकले होते. त्या वेळी एकटा विदर्भच काँग्रेसच्या बाजूने उभा राहिला. तो प्रदेश वेगळा झाला असता तर महाराष्ट्र आणि गुजरात हे दोन्ही प्रदेश काँग्रेसच्या हातून जाणार होते. त्यासाठी नेहरूंना मध्ये आणून यशवंतरावांनी कन्नमवारांचा पाठिंबा मिळविला. विदर्भाला झुकते माप देण्याचे मान्य केले. कन्नमवारांना उपमुख्यमंत्रिपद देऊन विदर्भाची मागणी सोडायला लावली. विदर्भाच्या राज्याचे पहिले मुख्यमंत्री होण्याचे भाग्य बाजूला ठेवून कन्नमवारही नेहरू आणि यशवंतरावांच्या बाजूने एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यासारखे त्याला तयार झाले. पुढचे आव्हान एकत्र आलेल्या मराठी प्रदेशाला एकात्म बनविण्याचे होते. यशवंतराव, कन्नमवार आणि पुढे यशवंतरावांचे विश्वासू सहकारी वसंतराव नाईक यांच्या हाती राज्याची धुरा असताना ही एकात्मता फारशी वाढताना दिसली नसली तरी तिला तडा देणारा एकही निर्णय त्यांच्याकडून कधी झाला नाही.

संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेच्या ऐन मुहूर्तावरच ग. त्र्यं. माडखोलकर यांनी ‘हे मराठी राज्य की मराठा राज्य?’ असा जळजळीत पण परखड प्रश्न यशवंतरावांना आपल्या संपादकीयातून विचारला. माडखोलकर संयुक्त महाराष्ट्राचे पुरस्कर्ते होते. त्यांच्या विचारांचा कलही डाव्या राष्ट्रीयत्वाकडे झुकणारा होता. शिवाय यशवंतरावांएवढेच अनेक राजकीय नेत्यांशी त्यांचे जवळिकीचे संबंध होते. त्यांना नागपूरच्या सभेत उत्तर देताना यशवंतरावांनी त्यांच्या लेखणीचा गौरव करीत ‘हे मराठी राज्यच असेल’ अशी ग्वाही त्यांच्यासकट साऱ्या महाराष्ट्राला दिली... दुर्दैवाने लोकशाहीतले राजकारण आकड्यावर उभे होते. त्यामुळे आपला शब्द यशवंतरावांना नेहमीच खरा करता आला नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेळ अशी होती की त्याच्या विधानसभेतील 288 आमदारांपैकी 222 जणांची जात एक तर त्यातल्या 88 जणांचे आडनावही एकच होते. नंतरच्या काळात महाराष्ट्रातील अनेक मराठेतर जातींनी इतर पक्षांच्या झेंड्याखाली जाणे पत्करले याची कारणे या वास्तवात आणि यशवंतराव ते पवार या नेत्यांच्या परंपरेने सर्वसमावेशक राजकारणाकडे कालांतराने केलेल्या दुर्लक्षात शोधावी लागतात. तरीही यशवंतरावांच्या काळात एका जातीचा राजकारणावरील वरचष्मा पुढल्या काळातल्याएवढा बटबटीतपणे कधी पुढे आला नाही... या बाबीला एका चमत्कारिक वास्तवाची असणारी पार्श्वभूमी एवढ्या वर्षांनंतरही आज लक्षात घ्यावी अशी आहे. 1937 च्या निवडणुकांच्या काळात, या पुढे बहुजनांचीच सत्ता येणार असे म्हणत मराठा समाजाचे अनेक मान्यवर नेते काँग्रेसमध्ये आले. मात्र त्या निवडणुकीनंतर बाळासाहेब खेर यांना तेव्हाच्या मुंबई राज्याचे पंतप्रधानपद वल्लभभाईंनी देऊ केले. त्या वेळी ‘काँग्रेस ब्राह्मणांची झाली’ म्हणून हे नेते काँग्रेसबाहेर पडले. पुढे 1956 मध्ये यशवंतराव नव्या मुंबई राज्याचे मुख्यमंत्री झाले तेव्हा ‘काँग्रेस बहुजनांची झाली’ असे म्हणत ते सारे पुन्हा काँग्रेसमध्ये परत आले. राजकीय पक्षांचे जातीकरण आपल्यात फार पूर्वी सुरू झाले असणे आणि नंतरच्या काळात त्याने खऱ्या लोकशाहीवर मात करणे यांचा इतिहास एवढा जुना व एका नेत्याला आवर घालता येण्याजोगा कसा नव्हता ते यातून अभ्यासकांच्या लक्षात यावे.

यशवंतरावांनी आपल्या परीने या इतिहासावर काही काळ मात केल्याचे दिसले. असा यशस्वी नेता एका राज्यात कायमचा राहणे शक्य नव्हते. 1962 च्या 20 नोव्हेंबरला यशवंतराव देशाचे संरक्षण मंत्री झाले. त्या वेळी स्पष्ट झालेली गोष्ट ही की जेव्हा ‘प्रश्न’ उपस्थित होतो वा संकटाचे सावट येते तेव्हा त्याच्या निवारणासाठी देशाला यशवंतराव लागतात. हिमालयाच्या मदतीला सह्याद्री या कवितेचा खरा अर्थ हा आहे. चीनशी झालेल्या युद्धात भारताचा पराभव झाला होता. माओने केलेल्या विश्वासघाताने नेहरू खचले होते. सेनादलाचे मनोबल घसरणीला लागले होते आणि देशही त्या धक्क्यातून सावरला नव्हता. त्या स्थितीत संरक्षणमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तासाभराच्या आत यशवंतरावांनी तिन्ही सेनादलांच्या प्रमुखांची बैठक घेऊन आपली नवी जबाबदारी पुरेशा गंभीरपणे पत्करली होती. त्यांच्या प्रयत्नांना आलेले यश पुढे 1965 च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळविलेल्या पहिल्या विजयात देशाने पाहिले. 71 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव करून त्याचे दोन तुकडे केले तेव्हा तर त्या यशावर प्रशस्तीची मोठी कमान उभी राहिल्याचेच देशाला दिसले. संरक्षण मंत्री या नात्याने त्यांनी केलेले काम केवळ औपचारिक मार्गदर्शनाचे नव्हते. राम प्रधानांनी संपादित केलेली त्या काळातील यशवंतरावांची डायरी नुसती चाळली तरी शस्त्रबळाच्या वाढीपासून सेनेच्या प्रत्यक्ष हालचालींपर्यंत त्यांनी घेतलेले निर्णायकी मार्गदर्शन डोळ्यांत भरते. 65 च्या युद्धात त्यांनी सारे दिवस व रात्रीही सेनेच्या प्रमुखांशी, आघाडीवरील पथकांच्या नेत्यांशी, तोफखाना व हवाईदलाच्या प्रत्यक्ष सैनिकांशी व अधिकाऱ्यांशी सततचा संपर्क कसा राखला होता व त्यातून त्यांना केवढे मोलाचे मार्गदर्शन केले होते याची जाणीव होते. पश्चिम सीमेवर युद्ध सुरू असताना पूर्वेला तेव्हाच्या पाकिस्तानात आघाडी न उघडण्याचा व सारी भारतीय सैन्यशक्ती पश्चिमेकडे एकवटण्याचा निर्णय सेनाप्रमुखांचा नव्हता, यशवंतरावांचा होता.

पाकिस्तान आणि चीन यांच्या भारतविरोधी कारवायांनी संघटित स्वरूप घेतले तेव्हा देशाने यशवंतरावांची नियुक्ती परराष्ट्र खात्याच्या मंत्रिपदावर केली. या काळात रशिया, अमेरिका व जपान इत्यादी देशांना भेटी देऊन द. आशियात उद्‌भवू शकणाऱ्या संकटांविषयी त्यांनी त्या देशांच्या परराष्ट्र विभागांचे केलेले जागरण असेच महत्त्वाचे आहे. पाकिस्तानच्यामागे इतर अरब व मुस्लिम राष्ट्रांनी संघटित होऊ नये याची दक्षता पं.नेहरूंनी मौ.आझादांच्या मदतीने आरंभापासून घेतली. ते धोरण यशवंतरावांनी त्यांच्या परराष्ट्र मंत्रिपदाच्या काळात नेटकेपणाने यशस्वी केले आणि अमेरिका व रशिया यांचा चीनवरील भारतानुकूल दबाव वाढत राहील याची खबरदारीही घेतली. आर्थिक संकटाच्या व मंदीच्या काळात त्यांच्याकडे देशाचे अर्थंत्रिपद दिले गेले तेव्हाच त्या संकटांना सामोरे जावे लागण्याच्या भीतीने ग्रासलेल्या देशाला मोठा दिलासा मिळाल्याचे दिसले. यशवंतरावांनी जी अंदाजपत्रके सादर केली ती आर्थिक तूट कमी करणारी, संतुलित स्वरूपाची व विकासाला गती देणारी होती. त्यातून करदात्यांना मदत झाली आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भावांवरही नियंत्रण राहिले. 1965 मध्ये संघाच्या नेत्यांनी साधूंना समोर करून गोवध बंदीसाठी दिल्लीत एक भव्य पण कमालीचा आक्रमक मोर्चा काढला. त्याने सारी दिल्लीच अस्तव्यस्त व अस्वस्थ केली. जाळपोळ, लुटालूट असे सारे घडले. तेव्हाचे गृहमंत्री गुलजारीलाल नंदा यांनी त्याची जबाबदारी पत्करून राजीनामा दिला. परिणामी ते जोखमीचे पद यशवंतरावांकडे आले. नक्षलवाद ही देशापुढची सर्वांत मोठी व गंभीर समस्या आहे असे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग आज बजावतात. या प्रश्नाविषयी देशाला सावध करण्याचे व नक्षलवाद्यांची लांडगेतोड बंगालमध्येच करण्याचे काम प्रथम यशवंतरावांनीच यशस्वीरीत्या केले. त्या कामगिरीत त्यांना जे यश मिळाले ते नंतरच्या एकाही गृहमंत्र्याला आजतागायत मिळविता आले नाही हेही येथे नमूद करण्याजोगे... धार्मिक दंगली व जातीय तणाव यांना त्यांच्या कारकीर्दीत आळा बसलेला दिसला आणि राजकीय कारणांखातर होणारी हमरीतुरीही मर्यादेत राहिली.

यशवंतरावांची दिल्ली कारकीर्द आरंभीच्या दहा वर्षांत त्यांची लोकप्रियता व देशातील मान्यता वाढविणारी ठरली. या काळात महाराष्ट्राच्या राजकारणावरही त्यांची पकड घट्ट राहिली. राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर कोणीही असले तरी सत्तेची खरी सूत्रे त्यांच्याच हातात असलेली साऱ्यांनी पाहिली. दादासाहेब कन्नमवारांकडे आपले मुख्यमंत्रिपद सोपविणे हा त्यांचा नाइलाज होता. कन्नमवारांनी ते पद विदर्भातील आमदारांच्या पाठिंब्यावर व काँग्रेसमधील तळागाळाच्या कार्यकर्त्यांशी जोडलेल्या व्यक्तिगत संबंधांवर मिळविले होते. शिवाय उपमुख्यमंत्रिपदावरून मुख्यमंत्रिपदावर जाणे हा तेव्हाच्या राजकारणाचा नैसर्गिक क्रमही होताच. त्यामुळे यशवंतरावांना आवडणारे वा नावडणारे असले तरी कन्नमवारांसारख्या स्वतंत्र बुद्धीच्या व स्वातंत्र्यलढ्यात तावूनसुलाखून निघालेल्या नेत्याशी जुळवून घेणे त्यांना भागही होते. 1963 मध्ये कन्नमवारांचा अकस्मात मृत्यू झाला तेव्हा यशवंतरावांनी महाराष्ट्राची धुरा वसंतराव नाईकांकडे सोपविली. नाईक विदर्भातून आलेले बंजारा समाजाचे सुविद्य व सुसंस्कृत नेते होते. राष्ट्रीय चळवळीचा वा सामाजिक कार्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी नव्हता. झालेच तर लोकनेता ही प्रतिमा त्यांना लाभली नव्हती. विदर्भातून आलेल्या कन्नमवारांनंतर राज्याचे मुख्यमंत्रिपद मराठवाड्याकडे जाईल अशी अटकळ अनेकांनी बांधली होती. साताऱ्याचे बाळासाहेब देसाई आपण मुख्यमंत्री असल्याच्या थाटात कधीचेच वावरत होते. मराठा समाजातील इतरांनाही ते पद आपल्या जवळ आल्याचे तेव्हा वाटले होते. त्या साऱ्यांना बाजूला सारून यशवंतरावांनी नाईकांना मुख्यमंत्रिपद दिले तेव्हा दोन गोष्टी स्पष्ट झाल्या. आपल्या मागेही महाराष्ट्र आपल्याच ताब्यात राहील अशी व्यवस्था त्यांना करायची होती ही एक आणि आपल्या सर्वंकष अधिकाराला आव्हान देऊ शकेल असा माणूस त्यांना राज्याच्या मुख्यमंत्रिपदावर बसवायचा नव्हता ही दुसरी. वसंतराव नाईक हे कुशल प्रशासक व मनमिळावू कार्यकर्ते होते. मात्र नेतृत्व मिळविणे, स्वतःचे सामर्थ्य वाढविणे किंवा त्यासाठी कोणाशी स्पर्धा करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. स्वाभाविकपणेच यशवंतराव दिल्लीत बसूनही वसंतरावांमार्फत महाराष्ट्र आपल्या हाती राखू शकले. वसंतरावांना मिळालेली ही बढती प.महाराष्ट्रातील मराठा नेत्यांवर ओरखडे उमटविणारी होती. जातीतल्या माणसावर ‘साहेबां’चा विश्वास नाही अशी भाषा मग हळू आवाजात चर्चेला आली आणि अनेकांना ती फारशी खोटीही वाटली नाही.

याच काळात दिल्लीच्या राजकारणातही बदल होत गेले. इंदिरा गांधींना नमविण्याच्या जुन्या काँग्रेस श्रेष्ठींच्या प्रयत्नातून सिंडिकेट नावाची इंदिरा विरोधी आघाडी उभी राहिली. त्या आघाडीने संजीव रेड्डींना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी दिली. तिला आरंभी इंदिरा गांधींनी पाठिंबा दिला व यशवंतरावही रेड्डींचे समर्थक बनले. पुढे सिंडिकेटला शह द्यायला इंदिरा गांधींनी व्ही.व्ही. गिरी यांची उमेदवारी पुढे रेटून ‘विवेकाचा कौल देईल’ तसे मतदान करण्याचे खुले आवाहनच पक्षाला केले. यशवंतरावांची कोंडी व्हायला येथून सुरुवात झाली. पक्षनिष्ठा म्हणत ज्यांच्यासोबत राहिलो ती माणसे मनाने, विचाराने, प्रकृतीने किंवा राजकीय भूमिकांखातरही आपली नाहीत आणि ज्या इंदिरा गांधींविरुद्ध आपण त्यांच्यात अडकलो त्या दीर्घकाळ राजकारणाचे नेतृत्व करणार आहेत, त्यांची लोकप्रियता वाढताना दिसत आहे आणि दिखावू म्हणून का होईना त्या जास्तीची पुरोगामी धोरणे आक्रमकपणे स्वीकारणार आहेत हे त्यांना दिसत होते. पण तोवर त्यांचा गट निश्चित झाला होता. रेड्डी पडले, गिरी विजयी झाले. सिंडिकेट खचली आणि इंदिरा गांधी समर्थ बनल्या. त्यांनी बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, संस्थांनिकांचे तनखे थांबविले, यशवंतरावांनी या पुरोगामी पावलांचे स्वागत करीत इंदिरा गांधींची बाजू नव्याने उचलून धरली. 71 ची निवडणूक आणि नंतरचा बांगला विजय यांनी इंदिरा गांधींचे रूपांतर देशाच्या एका लढाऊ देवतेत केले. हा प्रकार 74 पर्यंत टिकला. तेव्हा जयप्रकाशांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनाने प्रथम गुजरात मग बिहार व पुढे सारा देश कवेत घ्यायला सुरुवात केली. 5 जून 1975 या दिवशी अलाहाबाद उच्च न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवून त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविता येणार नाही असा निकाल दिला. त्यावर मात करायची तर घटना बाजूला सारणे एवढेच काँग्रेसला जमणारे होते. 25 जूनला सरकारने देशात अंतर्गत आणीबाणी लागू करून नागरिकांचे मूलभूत अधिकार गोठविले आणि लोकशाहीसह सारे विरोधक तुरुंगात डांबले... हा यशवंतरावांच्या परीक्षेचा क्षण होता.

स्वातंत्र्य, समता, न्याय, लोकशाही आणि नीतिधर्म ही सगळी मूल्ये एका बाजूला आणि हुकूमशाही, सत्ता, नागरी अधिकारांचे दमन, घटनेची मोडतोड आणि इंदिरा गांधींचा एकाधिकार ही अनिष्टता दुसऱ्या बाजूला होती. त्यांतली एक बाजू त्यांना निवडायची होती. देशाने आपली बाजू निश्चित केली होती व ती 77 च्या निवडणूक निकालांनी पुढे उघडही केली. विचारवंतांचा, मूल्यांच्या उपासकांचा, लोकशाही आणि नागरी स्वातंत्र्यावर निष्ठा असणाऱ्यांचा वर्ग देशाच्या बाजूने गेला होता. काँग्रेस, कम्युनिस्ट आणि काही किरकोळ पक्ष सत्तेच्या खुर्च्यांजवळ राहण्याच्या आशेने आणीबाणीच्या बाजूला राहिले होते. जयप्रकाशांच्या सोबत जाणाऱ्यांत मोरारजीभाई, जगजीवनराम आणि चंद्रशेखरांपासून धारियांपर्यंतचे काँग्रेसचे नेते होते. जनसंघ, समाजवादी, भाक्रांद आणि स्वतंत्र हे पक्षही त्यांच्यासोबत होते. या साऱ्यांनी आपली बाजू केवळ मूल्यनिष्ठांसाठी निवडली होती असे नाही. त्यांतल्या अनेकांच्या मनात इंदिरा गांधींविषयीचा राग आणि असूया होती. आणीबाणीने घालविलेल्या इंदिरा गांधींच्या लोकप्रियतेचा लाभ आपण मिळवू शकू अशी काहींना आशा होती तर काही राजकीय बेकार राजकीय माहात्म्य टिकवून घेण्यासाठीही त्यात आले होते. तथापि त्या बाजूला जयप्रकाशांसारखी त्यागी आणि तेजस्वी माणसांची एक मोठी फळी होती... यशवंतराव मूल्यनिष्ठेचा आग्रह धरणारे नेते असल्याने ते कोणती बाजू घेतात याकडे साऱ्यांचे डोळे लागले होते. ते जयप्रकाशांच्या बाजूने गेले असते तर आणीबाणीनंतर स्थापन झालेल्या जनता सरकारात त्यांच्याकडे एखादे महत्त्वाचे पद आले असते. शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती त्यागाची आणि मूल्यांची नवी झळाळी उभी राहिली असती. इंदिरा गांधींसोबत राहण्याने त्यांचे मंत्रिपद टिकले असते पण बाकी सारी मूल्यविषयक वजाबाकी त्यांच्या वाट्याला आली असती... यशवंतरावांनी इंदिरा गांधींची बाजू घेतली. तेथे त्यांचा मूल्यांशी असलेला संबंध संपला आणि सत्तेला चिकटून राहणारा (आणि सत्तेच्या आधारानेच परिवर्तन घडवून आणता येते अशी सराईत पोपटपंची करणारा) नेता अशी प्रतिमा त्यांना कायमची चिकटली. यात त्यांनी मिळविले कमी, गमावले फार... नंतरच्या काळात ते सत्तेत राहिले, मोठी पदे त्यांच्या वाट्याला आली, ते देशाचे उपपंतप्रधानही झाले... पण ते पूर्वीचे यशवंतराव राहिले नव्हते. अनुयायांच्या मनात, निष्ठावानांच्या दृष्टीत आणि जनतेच्या डोळ्यांत त्यांची प्रतिमा लहान आणि काहीशी दयनीय झाली होती.

यशवंतरावांना त्यांनी मोजलेल्या या किंमतीचे मोल कळत होते. पण ज्या पक्षात हयात घालविली त्याच्यासोबत निष्ठेने राहण्याचे व्रत त्यांनी मुकाटपणे पार पाडले. तडजोडवादी, पडखाऊ, लाचार असली सगळी विशेषणे त्यांनी या काळात अंगावर घेतली. हा माणूस आपल्याला सोडून जाणार नाही याची खात्री पटल्यानंतर इंदिरा गांधींनी आणि दिल्लीतील इतर पुढाऱ्यांनीही त्यांना गृहीत खात्यात जमा केले. आपले निर्णय त्यांना सांगायचे आणि त्यांची त्या निर्णयांना संमती असणारच असे समजायचे असाच प्रकार पुढे चालू राहिला. या काळात महाराष्ट्राचे राजकारणही त्यांच्या हातून सुटत गेले व ते तसे सुटत राहील अशाच कारवाया दिल्लीकरांनीही चालू ठेवल्या. वसंतराव नाईकांच्या मुख्यमंत्रिपदाच्या दोन कारकीर्दी पूर्ण झाल्यानंतर शंकरराव चव्हाण त्या पदावर आले. त्यांच्या नावाला यशवंतरावांनी फार पूर्वी संमती दिली होती व तसे इंदिरा गांधींना त्यांनी सांगितलेही होते. मात्र दर वेळी ‘आम्ही तयार आहोत पण अगोदर यशवंतरावांची संमती मिळवा’ असे शंकररावांना पंतप्रधानांच्या निवासस्थानी सांगितले गेले. परिणामी यशवंतराव आपल्या विरोधात आहेत असा ग्रह शंकररावांसकट मराठवाड्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात तयार झाला. याविषयीची आपली खंत स्वतः यशवंतरावांनीच त्यांच्या डायरीत लिहून ठेवली आहे... वसंतदादांचे नेतृत्व स्वयंभू होते. मात्र त्यांनाही यशवंतरावांच्या पाठिंब्याहून इंदिरा गांधींचे पाठबळ महत्त्वाचे वाटत होते... पुढे शरद पवारांनी वसंतदादांना सत्तेवरून पायउतार व्हायला लावले आणि जनता पक्षाच्या मदतीने महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हाती घेतली तेव्हा ‘आपण हे साहेबांच्या सल्ल्यानुसारच करीत असल्याचे’ चित्र स्वतः काहीएक न बोलता त्यांनीही उभे केले. यशवंतरावांची अडचण ही की पवारांच्या त्या कॉंग्रेस सोडण्याच्या काळात काँग्रेस पक्षाचे हंगामी राष्ट्रीय अध्यक्षपदच त्यांच्याकडे होते. (स्वर्णसिंगांनी अध्यक्षपद सोडल्यामुळे त्यांच्याकडे त्या पदाची तात्पुरती जबाबदारी तेव्हा सोपविण्यात आली होती) स्वाभाविकच तुम्ही पक्षाध्यक्षपदावर असताना तुम्हीच वाढवून मोठा केलेला कार्यकर्ता पक्षाबाहेर पडतो कसा, असा संशयचिन्हांकित प्रश्न त्यांना विचारला गेला. त्यांच्याजवळ त्याचे खरे उत्तर होते पण त्यावर दिल्लीवाल्यांचा विश्वास बसणार नव्हता आणि ज्यांनी त्यांना न विचारता पक्षामध्ये बंडाचे निशाण उभारले त्यांना कायमचे तोडून दूर करणे त्यांच्या स्वभावात बसणारे नव्हते. परिणामी महाराष्ट्र हातात नाही आणि दिल्लीत विश्वास नाही अशा अधांतरी अवस्थेत त्या थोर नेत्याचे राजकारण जाऊन पोहोचले. विचारवंत, पत्रकार आणि तत्त्वनिष्ठ म्हणविणाऱ्यांनी आणीबाणीच्या काळातच त्यांना आपल्या विचारातून वजा केले होते. सारेच विरोधात वा संशयाने पाहणारे आणि विश्वासाने जोडलेली आणि मोठी केलेली माणसे आपली न राहिलेली अशी एकाकी आणि दयनीय स्थिती त्यांच्या वाट्याला आली होती.

चरणसिंगांच्या मंत्रिमंडळात ते उपपंतप्रधान होते. पण ते पद इंदिरा गांधींनी एक खेळी म्हणून त्यांना घ्यायला लावले होते. चरणसिंग सरकारवर विश्वास दर्शविण्याची वेळ आली तेव्हा इंदिरा गांधींनी त्याला दिलेला पाठिंबा काढून घेतला. त्यात चरणसिंगांच्या औटघटकेच्या पंतप्रधानपदासारखे यशवंतरावांचे उपपंतप्रधानपदही गेले... 1980 च्या निवडणुकीत इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील काँग्रेसला स्वबळावर सत्ता मिळविता आली, परिणामी यशवंतरावांचा त्यांना असलेला उरलासुरला उपयोगही संपला. पुढचा काळ यशवंतरावांनी नुसती वाट पाहण्यात काढला. पंतप्रधानांचे बोलावणे आले तर जायचे, विचारलेला सल्ला द्यायचा आणि परत आपल्या एकांतात गढायचे. या काळात त्यांच्या लाडक्या पुतण्याचे मोटार अपघातात निधन झाल्याने ते व्यथित झाले. ज्या वेणूतार्इंसोबत सारी हयात घालविली त्यांच्या मृत्यूने त्यांचा जवळजवळ निम्मा शेवटच केला. तरीही यशवंतराव आपल्या वैयक्तिक जबाबदाऱ्या विसरले नव्हते. आल्या प्रसंगाला हसत सामोरे जात होते. अपुरे राहिलेले आत्मचरित्र लिहून पूर्ण करीत होते. पुण्यात एसेमच्या 80 व्या वाढदिवसाला हजर रहायचे ठरवीत होते. तशात त्यांना इस्पितळात भरती व्हावे लागले. इस्पितळात अखेरचे दिवस मोजत असताना त्यांना राजीव गांधी भेटायला येत. मात्र महाराष्ट्रातल्या एकाही पुढाऱ्याला या काळात त्यांना जाऊन भेटावे वा पाहावे असे वाटले नाही. तशाच एकाकी अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला... एका महान मराठी माणसाचा असा शेवट ग्रीक शोकांतिकेतील भव्यदिव्य नायकाच्या अखेरीसारखा आहे.

या माणसाने महाराष्ट्राची पायाभरणी केली. त्याच्या वाटचालीची दिशा निश्चित केली. त्याच्या एकात्मतेला खतपाणी घातले. हजारो माणसे जोडली, लाखोंनी चाहते मिळवले, सारा मराठी मुलूख मनाने जिंकला आणि तरीही त्याच्या अखेरच्या काळात त्याच्याजवळ कोणी नव्हते... दूरचे दूर होते आणि जवळचेही जवळ राहिले नव्हते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद चार वेळा राबविलेल्या, केंद्रात चार महत्त्वाची मंत्रिपदे भूषविलेल्या आणि अखेर उपपंतप्रधानासारख्या मोठ्या पदावर राहिलेल्या या माणसाने दिल्लीत स्वतःचे घर बांधले नाही की मुंबईत फ्लॅट घेतला नाही. डझनांनी साखर कारखाने उभारणाऱ्या या नेत्याच्या नावावर महाराष्ट्रात एकही एकर जमीन नाही. मृत्यूनंतर त्यांच्या दिल्लीतील बंगल्यातून त्यांचे व्यक्तिगत सामान हलवायला अधिकारी गेले तेव्हा त्यांच्या कपाटात सापडलेल्या स्टेट बँकेच्या पासबुकात, साऱ्या हयातीत त्यांनी मागे ठेवलेली 36 हजार रुपयांची शिल्लकच तेवढी राहिली असल्याचे त्यांना आढळले.

यशवंतरावांच्या अशा शोकांतिकेची मीमांसा आपण कशी करणार? त्यांची अतिरिक्त पक्षनिष्ठा वा नेतृत्वनिष्ठा त्यांच्या पडझडीला कारण ठरली म्हणणार की हाताशी धरून वाढविलेल्या माणसांनी केलेला विश्वासघात तिचे कारण ठरवणार? या सावध माणसावर ऐन वेळी बेसावध राहिल्याचा शिक्का उमटवणार की तत्त्वनिष्ठा बाजूला सारून तडजोडी स्वीकारण्याचे व दिल्लीकरांच्या कोणत्याही कृतीला साथ देण्याचे राजकारण सांभाळले म्हणून त्याला दोष देणार? कुंपणावर बसणारे नेते म्हणून याच काळात कुचेष्टा झाली व प्रत्येकच अपमानानंतर स्वगृही परतणारा व सुखावणारा पुढारी म्हणून त्यांची गणना गावगन्ना राजकारण्यांत करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला. अशा यशापयशाचे खरे धनी कोण? यशवंतराव स्वतः की त्यांनी आपली म्हणून जवळ केलेली पण त्यांची न झालेली माणसे? त्यांची ही अवस्था कोणी केली? दिल्लीने की मुंबईने?

या साऱ्या प्रश्नांची उत्तरे आपल्यातील प्रत्येकाला आपापल्या परीने देता येतील आणि ती सारखी असणार नाहीत. राजकारण हे खऱ्या अर्थाने सत्ताकारणच असते आणि ते कमालीचे निष्ठुरच नव्हे तर क्रूरही असते. त्यातला कोणीही, मग तो नेता असो वा अनुयायी, दुसऱ्यासाठी राजकारण करीत नाही. नेत्याच्या राजकीय खेळीत जेव्हा एखादा अनुयायी बसतो तेव्हा त्याचे नशीब उघडल्यासारखे दिसते. जेव्हा बसणार नाही तेव्हा त्या नशिबाची झापडे बंद झाल्याचेही आपण पाहतो. हीच गोष्ट त्यातल्या अनुयायांचीही आहे. नेता जोवर किफायतशीर असतो तोवर त्याची पालखी सारे आनंदाने खांद्यावर घेतात. जेव्हा त्याचे फायदेशीर असणे संपते तेव्हा त्यांना ती पालखी जड वाटू लागते... यात नेत्यांना दोषी धरायचे की अनुयायांना अपराधी ठरवायचे?...

दिल्लीकरांनी यशवंतरावांच्या क्षमतेचा वापर आपल्या राजकारणासाठी करून घेतला आणि यशवंतरावांनीही त्यांना तो करू दिला. त्यांच्या अनुयायांनी त्यांचे मोठेपण स्वतःच्या वाढीसाठी जेवढे वापरता येईल तेवढे वापरले आणि यशवंतरावांनीही ते त्यांना वापरू दिले. दिल्लीकरांना त्यांनी नकार दिला नाही आणि अनुयायांनाही थांबा असे ते म्हणाले नाहीत. आपले यश शांतपणे पचविणाऱ्या या माणसाने नंतरचे अपयशही मुकाट्यानेच पचविले असे म्हणून मग थांबावे लागते. यशवंतरावांचा विश्वासघात झाला असे अनेकांनी आजवर लिहिले. त्यांनी केलेल्या तडजोडींवरही अनेकांनी ठपका ठेवला. तत्त्वनिष्ठेला बगल देत राजकारण केल्याचे काही मान्यवर विचारवंतांनी त्यांच्याविषयी लिहून ठेवले... मला अशा न्यायनिवाड्यात रस नाही. राजकारण हे तसेही विश्वासाचे क्षेत्र नाही. अतिरिक्त विश्वास हा तर त्यात अपराध ठरावा असाच प्रकार आहे. राजकारण हे तडजोडीचेही क्षेत्र आहे. प्लेटो आणि ॲरिस्टॉटल राज्यशास्त्रज्ञच तेवढे होऊ शकतात. राजकीय नेतृत्व करणे हे त्यांचे काम नव्हे... लढ्यातले नेतृत्व त्यागावर तर शांततेतले भोगावर उभे असते. या भोगांवर शहाणे पांघरूण घालू शकणारे यशस्वी नेते आपण पाहतो आणि शांत होतो. ज्यांना ते नीटसे घालता येत नाही त्यांच्या नावाने बोटे मोडून आपण मोकळेही होत असतो. शिवाय संत मोजण्याच्या फूटपट्‌ट्यांनी राजकारणी माणसे मोजायची नसतात हे वास्तवही अशा वेळी लक्षात घ्यायचे असते.

ज्याला स्पर्धक नाही आणि ज्याच्याशी कोणाला स्पर्धा करता येणार नाही अशी उंची ज्याला राजकारणात गाठता आली त्या गांधीलाच तत्त्वनिष्ठा आणि तडजोड या दोन्ही गोष्टी एका वेळी जपता आल्या. पण सारेच राजकारणी गांधी कसे असतील? नियतीचा एक संकेतही अशा वेळी लक्षात घ्यायचा. शिखरावर नेहमीच फार थोडी जागा असते. तिथवर एकट्यालाच पोहोचता येते आणि तसे पोहोचत असताना तो क्रमाने एकाकीही होत जातो. यशवंतरावांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या स्मृतींना अभिवादन करताना एक गोष्ट मात्र साऱ्यांनीच कृतज्ञतेने लक्षात घ्यायची आहे. महाराष्ट्राच्या उभारणीची पायाभरणी करणारा आणि आपल्या असामान्य बुद्धिकर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्राला त्याची नवी ओळख करून देणारा लोकमान्यांच्यानंतरचा हा महानेता होता हे महाराष्ट्राला कधीही विसरता येणार नाही.

Tags: डॉ.मनमोहन सिंग राम प्रधान बाळासाहेब खेर संयुक्त महाराष्ट्र स्थापना कन्नमवार वसंतराव नाईक मानवेंद्रनाथ रॉय इंदुलाल याज्ञिक डांगे-अत्रे-एसे समिती ग.त्र्यं.माडखोलकर Dr. Manmohan Singh Ram Pradhan Balasaheb Kher United Maharashtra Establishment Kannamwar Vasantrao Naik Manvendranath Roy Indulal Yagnik Dange-Atre-Ese Samiti G. T. Madkholkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


Comments

  1. Narendra Patwardhan- 13 Mar 2021

    A remarkable article and also an eye opener for those who haven't read about of Yashwantrao.

    save

  1. Dominic Gonsalves- 13 Mar 2021

    मला फारच सावरले व उपयुक्त माहिती मिळाली. लेखकाला धन्यवाद!

    save

प्रतिक्रिया द्या


लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके