डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

भागवतांच्या वक्तव्याविषयीचे भाजपच्या नेत्यांचे मौन कमालीचे बोलके व त्यांचा नाइलाज सांगणारे होते. विशेषतः सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, सुमित्रा महाजन, उमा भारती, स्मृती इराणी आणि त्यांच्यासारख्या संसदेत व विधिमंडळात असणाऱ्या भाजपच्या नेत्या त्या वक्तव्याशी सहमत आहेत काय हे समजणे महत्त्वाचे होते. कारण संघ ही भाजपचे धोरण निर्धारित करणारी व त्याचा पुढचा मार्ग आखून देणारी संघटना आहे. ही संघटना व तिचे नेतृत्व एवढे स्त्रीविरोधी असेल तर देशाच्या राजकारणात साऱ्या समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतलेला हा महिलांचा वर्ग त्याविषयी काय बोलतो वा कसा विचार करतो हे समजून घेणे हा समाजाचा अधिकारही आहेच. जेटली जेठमलानींसारखे कायदेपंडित, जसवंत-यशवंतांसारखे राजकीय पंडित, मोदी-चव्हाणांसारखे प्रशासकीय पंडित आणि गडकरी- जावडेकरांसारखे बालपंडित यांच्याही याविषयीच्या भूमिका कशा व कोणत्या हे समजणेही ज्ञानवर्धक ठरेल. त्यांचे गप्प राहणे हे त्यांच्या नाइलाजाचे चिन्ह ठरणार नाही. तो त्यांच्या भित्रेपणाचा पुरावा असेल.

डॉ.हेडगेवार, गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस या तीन सरसंघचालकांनी त्यांच्या पदाला जी प्रतिष्ठा प्राप्त करून दिली ती नंतरच्या तीन सरसंघचालकांनी धुळीला मिळवली आहे. सरसंघचालकपद हे स्वयंसेवकांच्या भाषेत ‘परमपूज्य’ असते व तसाच त्याचा उल्लेख ते करतात. गोळवलकर नेहरू व पटेलांशी पत्रव्यवहार करीत. देवरसांचा राजीव गांधींशी संवाद होता आणि त्यांच्यात विचारांची देवाणघेवाण होती. मात्र त्यांनी वा त्यांच्या अनुयायांनी त्या संबंधांची वाच्यता कधी केली नाही. त्यांच्या पश्चात सरसंघचालकपदाचे पूज्यपण साध्या पूज्यावर आणण्याचेच काम त्यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी केले. प्रो. राजेंद्रसिंह ऊर्फ रज्जूभैया हे वैचारिक बैठक वा गांभीर्य यासाठी फारसे प्रसिद्ध नव्हते. नागपूरजवळच्या खापरी या खेड्यात भरलेल्या संघाच्या एका महाशिबिरात सोनिया गांधींचा उल्लेख त्यांनी ‘गोऱ्या चमडीची बाई’ असा केला. वर भारतीय माणसांना (इंडियन नाही) गोऱ्या चमडीचे नको तेवढे आकर्षण असल्याचे भाष्य करून ते मोकळे झाले. परिणामी, काही दिवसांत संघातील वरिष्ठांनीच रज्जूभैयांच्या हाती नारळ देऊन त्यांना घरी पाठवले...

त्यानंतर त्या पदावर आलेले के. सुदर्शन त्यांच्या अचाट वक्तव्यांपायी पहिल्याच दिवसापासून वादाचा विषय बनले. ‘प्रत्येक कुटुंबात चार मुले असलीच पाहिजेत’ असा आदेश त्यांनी देशातील हिंदूंना दिला. संघाच्या विजयादशमी उत्सवात भाषण करताना त्यांना केरळातून आलेले एका वृद्ध महिलेचे त्या विषयीचे पत्र त्यांनी वाचून दाखवले. ‘तुमच्या आदेशाचे पालन वय झाल्यामुळे मला करता येत नाही, अन्यथा तो प्रयत्न मी केला असता’ असे त्या महिलेने सुदर्शनजींना कळविले होते. नागपुरातील एका ज्येष्ठ साहित्यिकाकडे जेवायला आले असताना त्यांच्या घरातला स्वयंपाकाचा ओटा पाहून ते म्हणाले, ‘हे ओटे तोडा, बाईने जमिनीवर बसूनच स्वयंपाक केला पाहिजे.’ पुढे जाऊन स्त्रियांनी नऊवारी पातळे नेसणे हेच आपल्या संस्कृतिरक्षणासाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगून टाकले. त्या घरातील स्त्रियाच त्या उपदेशाने संकोचून गेल्या. अशा वक्तव्यांना मिळणारी प्रसिद्धी संघाचा संकोच करू लागली तेव्हा सुदर्शनांनाही संघाने पायउतार व्हायला भाग पाडले. आताचे मोहन भागवत हे अशा पार्श्वभूीवर आलेले सहावे सरसंघचालक आहेत...

पूर्वीच्या तीन सरसंघचालकांनी संघाला राजकारणापासून निदान दर्शनी स्वरूपात दूर ठेवण्याची काळजी घेतली. संघाचा तेव्हाच्या जनसंघाच्या माध्यमातून राजकारणात होत असलेला हस्तक्षेप साऱ्यांना दिसत होता. मात्र राजकारणाविषयीचे कोणतेही भाष्य करण्यापासून सरसंघचालकांनी स्वतःला नेहमीच दूर ठेवले. हे राजकीय तारतम्य देवरसांच्या पश्चात इतिहासजमा झाले. राजेंद्रसिंह आणि के. सुदर्शन यांना संघाला राजकारणात उतरविण्याची घाईच झालेली दिसली. सुदर्शन यांच्या काळात संघातील महत्त्वाकांक्षी माणसांनी वाजपेयींच्या सरकारला विविध खात्यांतील नियुक्त्यांपासून सरकारी धोरणांच्या आखणीपर्यंतचे आदेशच पाठविले. ‘आपण आघाडी सरकारचे नेते असल्याने इतर पक्षांना विश्वासात घेतल्याखेरीज आपल्याला कोणताही निर्णय घेता येत नाही’ ही सबब पुढे करून वाजपेयींनी संघाची ही कुरघोडी टाळण्याचे धोरण अवलंबिले. त्यामुळे संतापलेल्या संघ परिवाराने वाजपेयींचा पाणउतारा करायला सुरुवात केली. गोविंदाचार्य या संघाने एकेकाळी लाडावून ठेवलेल्या इसमाने याच काळात वाजपेयींना संघाचा मुखवटा म्हटले. भारतीय जनता पक्षाच्या एका राष्ट्रीय बैठकीसाठी वाजपेयी नागपुरात आले असताना त्यांनी तेथील मुख्य संघस्थानाला भेट दिली. त्या वेळी त्यांच्या स्वागतासाठी संघाचा एकही मोठा पदाधिकारी उपस्थित राहणार नाही अशी व्यवस्थाच संघाने केली. पंतप्रधानपदावर असलेले वाजपेयी त्या प्रकाराने अस्वस्थ होऊन तडक विमानतळावर गेले व त्यांनी भाजपाची बैठक मागे टाकून थेट दिल्ली गाठली.

राजेंद्र सिंह आणि सुदर्शन यांच्या अशा महत्त्वाकांक्षी धोरणाच्या पार्श्वभूीवर आताच्या भागवतांनी आणखी पुढे जाऊन संघाला संपूर्ण राजकारणी बनविण्याचा ध्यासच आपल्या कार्यकालाच्या आरंभापासून घेतला...भागवतांचा पहिला निशाणा अडवाणी हा होता. संघ व भाजप यांच्या संबंधांचे जैविक स्वरूप लक्षात घेता भागवतांना अडवाणींचा काटा दूर करणे फारसे अवघडही झाले नाही. तेवढ्यावर न थांबता नितीन गडकरी या आपल्या निकटस्थ नागपूरकराला त्या पदावर स्थानापन्न करण्याची व भाजपावर आपली पकड मजबूत करण्याची खेळीही त्यांनी केली. गडकरी यांची पदोन्नती भाजपातील एकाही वरिष्ठ नेत्याला आवडली तरी त्या पक्षावरील संघाच्या वर्चस्वापायी त्यांतल्या एकालाही या कुरघोडीविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत झाली नाही. ज्यांनी ती केली त्या जेठमलानींना कुंपणाबाहेर काढून संघाने बेदखल केले.

आरंभी ते भागवत राजकारणावर बोलत नसत. त्यांच्या वतीने ते काम राम मोहन आणि त्यांचे इतर सहकारी करत. परवा त्यांनी आपले तोंड प्रथमच उघडले आणि त्या पहिल्याच प्रयत्नात त्यांचे अपुरेपण उघड झाले. ‘बलात्कारासारख्या घटना इंडियात (म्हणजे शहरात) होतात, भारतात (म्हणजे खेड्यात) होत नाहीत.’ या त्यांच्या विधानावर वादळ उठणे अपेक्षित होते व तसेच ते झालेही. या वेळी भाजपाच्या प्रवक्त्यांनी त्यांचे वकीलपत्र घेतलेले दिसले. भागवतांच्या इंडियाचा अर्थ अमर्याद तर भारताचा अर्थ मर्यादित असा होतो, असे रविशंकरप्रसाद या भाजपाच्या शहाण्या प्रवक्त्याने सांगितले. त्यांचे हे शहाणपण अर्थातच कोणाच्या पचनी पडले नाही. देशात कार्यरत असलेल्या संघाच्या बहुतेक शाखा भारतात नसून इंडियात आहेत या वास्तवाचेही भान भागवतांना नसावे ही बाब येथे साऱ्यांच्या लक्षात यावी... एवढ्यावर हे थांबत नाही. जुना जनसंघ आणि आताचा भारतीय जनता पक्ष हे पक्षही प्रामुख्याने इंडियन म्हणावे एवढे शहरी आहेत... मर्यादशील व मर्यादेबाहेरचे असे त्या दोन शब्दांचे अर्थ लावले तरी ही मर्यादा नेकी कोणती व ती कोणी आणि केव्हा ठरविली हे प्रश्नही उरतातच.

...भागवत तेवढ्यावर थांबले नाहीत. ‘स्त्रियांनी घराच्या मर्यादेत राहूनच घर सांभाळले पाहिजे. तसे करणे हे त्यांच्यावर लग्न या कराराने लादलेले बंधन आहे. हे बंधन त्या जोवर पाळतात तोवरच त्यांना घरात स्थान आहे’ अशा सुभाषितांची नवी उधळणही त्यांनी इंदुरात केली. गंमत म्हणजे, त्यांचे हे बौध्दिक तेथे जमलेल्या देशभरातील संघनेत्यांनी मुकाट श्रद्धेने ऐकून घेतले. राम माधव या त्यांच्या प्रमुख वाजंत्र्याने सरसंघचालकांचा हा सदुपदेश देशहिताचा आहे असेही साऱ्यांना बजावले. ‘भागवतांच्या वक्तव्याचे मला आश्चर्य वाटले नाही, कारण तीच संघाची मानसिकता आहे’ हा वृंदा करातांचा अभिप्राय त्यांच्या कम्युनिस्ट असण्याशी जुळणारा म्हणून एखादेवेळी दुर्लक्षिता येईल. मात्र भागवतांच्या वक्तव्याविषयीचे भाजपच्या नेत्यांचे मौन कमालीचे बोलके व त्यांचा नाइलाज सांगणारे होते. विशेषतः सुषमा स्वराज, वसुंधरा राजे, सुमित्रा महाजन, उमा भारती, स्मृती इराणी आणि त्यांच्यासारख्या संसदेत व विधिमंडळात असणाऱ्या भाजपच्या नेत्या त्या वक्तव्याशी सहमत आहेत काय हे समजणे महत्त्वाचे होते. कारण संघ ही भाजपचे धोरण निर्धारित करणारी व त्याचा पुढचा मार्ग आखून देणारी संघटना आहे. ही संघटना व तिचे नेतृत्व एवढे स्त्रीविरोधी असेल तर देशाच्या राजकारणात साऱ्या समाजाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी घेतलेला हा महिलांचा वर्ग त्याविषयी काय बोलतो वा कसा विचार करतो हे समजून घेणे हा समाजाचा अधिकारही आहेच. जेटली जेठमलानींसारखे कायदेपंडित, जसवंत-यशवंतांसारखे राजकीय पंडित, मोदी- चव्हाणांसारखे प्रशासकीय पंडित आणि गडकरी-जावडेकरांसारखे बालपंडित यांच्याही याविषयीच्या भूमिका कशा व कोणत्या हे समजणेही ज्ञानवर्धक ठरेल. त्यांचे गप्प राहणे हे त्यांच्या नाइलाजाचे चिन्ह ठरणार नाही. तो त्यांच्या भित्रेपणाचा पुरावा असेल.

महिलांच्या प्रश्नावर एरव्ही आक्रमक होणाऱ्या पुरोगाम्यांच्या संघटना भागवतांच्या महिलाविषयक चिंतनावर फारशी भाष्ये करताना दिसल्या नाहीत. एरव्ही निषेधाचे व धिक्काराचे फलक फडकावणारी ही फळी या वेळी गप्प बसली असेल तर तिची दोनच कारणे असू शकतात. एक, या संघटनांवरही आता संघाची भगवी कळा आली असणे आणि दुसरे, या जुन्या संघटनांना भागवतांचे नवे असणे दखलपात्र वाटले नसणे. लालकृष्ण अडवाणींसारखे ज्येष्ठ राजकीय नेते संघ परिवाराशी संबंधित असले तरी त्यांनीही भागवतांचे समर्थन करणे टाळले आहे. अडवाणींच्या राजकीय अनुभवाचा व समंजसपणाचा तो पुरावा आहे. संघाशी भांडण नको आणि त्याच्या प्रमुखांच्या अशा वक्तव्यांचे समर्थनही नको अशी त्यांची भूमिका आहे. मात्र त्यामुळे त्यांच्याही निर्भयपणासमोर संशयाचे प्रश्नचिन्ह उभे राहिलेच आहे हे दुर्लक्षिण्याचे कारण नाही. समाजमनात नुसताच गोंधळ उभा करायचा आणि तो उभा राहिला की त्यावर आमच्याजवळ उपाय आहेत असे म्हणून नेतृत्वासाठी पुढे यायचे (कन्फ्यूज ॲन्ड रूल) असे हे राजकारण आहे. दुःख याचे की या राजकारणाच्या निशाण्यावर भारतातील स्त्रियांचा वर्ग आहे.

स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशन या महामालिकेच्या ‘अवर ओरिएंटल हेरिटेज’ या पहिल्या ग्रंथात स्त्री-पुरुषांतील नीतिसंबंधांची चर्चा करताना विल ड्यूरान्ट हा जगन्मान्य तत्त्वचिंतक म्हणतो, ‘इतिहासात स्त्रीची अर्थोत्पादनाची क्षमता ज्या काळात संपलेली दिसली तेव्हा कुटुंबेच कोसळली नाहीत, संस्कृती आणि समाजाच्या व्यवस्थाही ढासळलेल्या दिसल्या.’ या अध्ययनशील अभिप्रायाच्या पार्श्वभूीवर व अर्थोत्पादनाच्या क्षेत्रात जगात आणि देशात आज पुढे असलेल्या कोट्यवधी स्त्रियांच्या संदर्भात त्यांना घरी बसवायला निघालेल्या व पुन्हा एकवार ‘न स्त्री स्वातंत्र्यमर्हति’ ही कालबाह्य हाळी देणाऱ्या भागवतांचे वक्तव्य व नेतृत्व देशभरातील सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिला व पुरुष कसे स्वीकारतात हे यापुढे पाहायचे आहे.

Tags: महिला के सुदर्शन राजेंद्र सिंह लालकृष्ण अडवाणी अटलबिहारी वाजपेयी भाजपा सरसंघचालक मोहन भागवत सुरेश द्वादशीवार सेंटर पेज women K Sudarshan Rajendra Singh Lalkrishna Advani Atalbihari Vajpeyi BJP sarsanghsanchalak Mohan Bhagwat Suresh Dwadashiwar Center Page weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके