डिजिटल अर्काईव्ह (2008 - 2021)

‘सेंटर पेज’ हे या मध्यममार्गाच्या जवळचे उग्र पेज राहिले आहे. त्यात काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी, बसप, राष्ट्रवादी आणि तशा एकूणच सगळ्या पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर अनुकूल आणि प्रतिकूल असे सारेच लिखाण आले. या पक्षांनी घेतलेल्या मध्यवर्ती भूमिका त्यात अधोरेखित झाल्या, त्यांचे खरेखोटे असणे आणि त्याचवेळी त्यांचे टोकावर असणेही स्पष्टपणे सांगितले गेले. त्याचमुळे हा स्तंभ कोणाला गृहित धरता आला नाही. त्याच्यावरच्या रागलोभाचे एक कारण हेही आहे. एक गोष्ट मात्र येथे नोंदवण्याजोगी. पक्ष वा नेता केवढाही मोठा आणि थोर असला, एखादे आंदोलन केवढेही डफावरचे आणि लोकप्रिय असले वा एखादी घटना केवढीही भावणारी वा संतापाला कारण ठरणारी असली तरी त्या साऱ्यांची शहानिशा मूल्यांच्या कसोटीवरच करण्याचा प्रयत्न या स्तंभात झाला. त्यात आकस नव्हता, विरोधाची वा द्वेषाची भावना नव्हती.

‘सेंटर पेज’ हा ‘साधना’तील स्तंभ आता एक वर्षाचा झाला. त्याआधीच्या ‘मन्वंतर’ आणि ‘तारांगण’ या स्तंभांना वाचकांनी जेवढा भरभरून प्रतिसाद दिला तेवढाच याही स्तंभाला दिला. फरक एवढाच की अगोदरचा प्रतिसाद एकतर्फी कौतुकाचा तर आताचा संमिश्र म्हणावा असा रागलोभाचा होता. तसे होणे त्यातील राजकीय व सामाजिक भाष्यामुळे स्वाभाविकही होते. ‘हे लिखाण कठोर म्हणावे एवढे परखड आहे’ इथपासून ‘हे आमच्या मनातले आहे’ इथपर्यंतच्या प्रतिक्रिया या स्तंभाच्या वाट्याला आल्या. आपली माणसे राजकारणाएवढ्याच समाजकारणातल्याही भूमिका घेणारी आहेत. सामान्यपणे अशा माणसांचा लोभ जेवढा अनावर तेवढाच त्यांचा रोषही टोकाचा असतो. तो रागलोभ लिखाणाच्या गुणवत्तेविषयीचा वा दुर्गुणवत्तेविषयीचा नसतो. त्यांच्या भूमिकांचे त्याच्याशी असलेले जुळलेपण व वेगळेपण यावर बेतलेला असतो. त्याचमुळे त्यावर आलेल्या प्रशंसापर वा टीकापर पत्रांना उत्तरे देण्याचे आजवर टाळले आहे.

वास्तवाची, सत्याची आणि मूल्याची खरी जागा कोणत्याही विषयाबाबतच्या दोन परस्परविरोधी टोके असलेल्या भूमिकांच्या मध्यभागी असते. ही मध्यवर्ती बाब हाच साऱ्या विचारांचा सुवर्णमध्य असतो, असे ॲरिस्टॉटल म्हणाला. आपला बुद्ध जेव्हा ‘मध्यममार्ग’ म्हणतो तेव्हा त्यालाही हेच म्हणायचे असते. समाजही सामान्यपणे मध्यममार्गीच (सेंटरिस्ट) असतो. आपला देश व समाज यांची प्रकृतीही तीच आहे. क्वचित कधी एखाद्या घटनेमुळे वा घटनाक्रमामुळे समाज एखाद्या टोकाकडे वळताना वा झुकताना दिसत असला तरी सारे स्थिरस्थावर होते तेव्हा तो पुन्हा त्याच्या मूळ मध्यममार्गावरच येत असतो. समाजाची ही प्रकृती लक्षात न घेणारी टोकदार माणसे त्याची ओढाताणच तेवढी करीत असतात. आपल्या मागे त्याला ओढून नेण्याची त्यांची शिकस्त असते. त्याच्यासोबत चालणे त्यांच्या वेगात बसणारे नसते (वा नसावे). ही माणसे आणि त्यांच्या भूमिका समाजाला दुरून भावतात. जवळून आवडत नाहीत... अशावेळी समाजावर मागासलेपणाचे, थंडपणाचे आणि संवेदनशून्यतेचे दूषण लावून ही माणसे समाधान मानतात आणि आपल्या टोकांवर आनंदात राहतात.

भारतात डाव्या आणि उजव्या टोकांवर उभी असलेली आपली माणसे आपल्याला ठाऊक आहेत. त्यांची दरारेवजा दहशतही आपल्या मनात आहे. आणि तरीही ती कधीमधी आपल्या मनात प्रसंगी उद्‌भवणाऱ्या टोकाच्या प्रतिक्रिया मांडणारी म्हणून आपलीही वाटणारी आहेत. आपण ज्या मध्यममार्गावर वा त्याच्या आसपास आहोत तो मार्ग अतिपरिचयामुळे आपणच अवज्ञेच्या पातळीवर आणलेला असतो. त्याला नावे ठेवत, कधीमधी शिव्या घालत आणि एखादेवेळी प्रेमानेही त्याच्यावरून वा त्याच्या कडेने चालण्यात आपण एक आश्वस्तपण अनुभवत असतो. आपले राजकारण, समाजकारण आणि लढ्यांचे पवित्रे या तीन भूमिकांत नीट बसवता येतील असे आहेत.

‘सेंटर पेज’ हे या मध्यममार्गाच्या जवळचे उग्र पेज राहिले आहे. त्यात काँग्रेस, भाजप, कम्युनिस्ट, समाजवादी, बसप, राष्ट्रवादी आणि तशा एकूणच सगळ्या पक्षांवर व त्यांच्या नेत्यांवर अनुकूल आणि प्रतिकूल असे सारेच लिखाण आले. या पक्षांनी घेतलेल्या मध्यवर्ती भूमिका त्यात अधोरेखित झाल्या, त्यांचे खरेखोटे असणे आणि त्याचवेळी त्यांचे टोकावर असणेही स्पष्टपणे सांगितले गेले. त्याचमुळे हा स्तंभ कोणाला गृहित धरता आला नाही. त्याच्यावरच्या रागलोभाचे एक कारण हेही आहे. एक गोष्ट मात्र येथे नोंदवण्याजोगी. पक्ष वा नेता केवढाही मोठा आणि थोर असला, एखादे आंदोलन केवढेही डफावरचे आणि लोकप्रिय असले वा एखादी घटना केवढीही भावणारी वा  संतापाला कारण ठरणारी असली तरी त्या साऱ्यांची शहानिशा मूल्यांच्या कसोटीवरच करण्याचा प्रयत्न या स्तंभात झाला. त्यात आकस नव्हता, विरोधाची वा द्वेषाची भावना नव्हती. मोठी माणसेही अखेरीस माणसेच असतात. आपल्यात उद्‌भवणारे विचार व विकार त्यांच्यातही असतात. खूपदा चांगल्या दिसणाऱ्या व्यवहारांच्या तळाशीही काही काळेबेरे वा जळते असते आणि खलनायकांच्या मनातही कधीकधी ममत्वाचा झरा प्रगटताना दिसतो. माणसांच्या आयुष्याला जसे अनेक रंग असतात तसे ते समाजाच्या व्यवहाराला आणि जीवनालाही असतात. ते पाहता येणे आणि त्यातले बरेवाईट जोखता येणे ही परीक्षा आहे. हा स्तंभ त्या परीक्षेत कितपत उतरला हा खरा व महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्याचे उत्तर वाचकांनी शोधायचे आहे. एका लेखावर संतापलेले अनेकजण दुसऱ्या लेखाने सुखावलेले पाहता आल्याने या शोधाचे उत्तरदायित्व त्यांच्यावर असे सोपवायचे.

तुमचा पक्ष कोणता, तुमचा वाद कोणता आणि तुमच्या राजकीय भूमिका कोणत्या असे प्रश्न या स्तंभाच्या प्रकाशनाच्या काळात अनेकांनी विचारले. कम्युनिस्टांची चिकित्सा आली तेव्हा लेखक भाजपचा ठरवला गेला आणि भाजपची शहानिशा आली तेव्हा काँग्रेसचा. आणीबाणीतल्या तुरूंगवासाचा दीर्घ अनुभव गाठीशी असल्याने यातला कोणताही शिक्का त्याच्यावर उमटला मात्र नाही... आपण लोकशाही स्वीकारली आहे आणि ती स्थिर राखण्यासाठी घटनेची एक चौकट काही मूल्यांसह मान्य केली आहे. आपले राजकारण (आणि समाजकारणही) या चौकटीचा व तिच्या मूल्यांचा सन्मान नेहमी वाढविणारेच राहिले असा दावा आपले नेतेही करू शकणार नाहीत. जनआंदोलनाच्या नावावर सुरू असलेले अनेक लढे या मूल्यांना तडे देणारे व घटनेची चौकट मोडित काढायला निघाले असल्याचेच अनेकदा आढळले. लोकशाहीची मूल्ये, विकासाच्या योजना, शासनाचे स्थैर्य आणि देशाची एकात्मता यांच्या विरोधात जाणारी वा जाऊ शकणारी किती आंदोलने गेल्या तीन दशकात आपण पाहिली? अशावेळी आपण नेमके कोणाच्या बाजूने व कुठे उभे व्हायचे असते? सामान्य व साध्या माणसांच्या जवळ की टोकाशी उभे राहून या व्यवस्थेची ओढाताण करणाऱ्यांच्या बाजूने? पाहता पाहता देश खाणाऱ्या माणसांच्या मागे की त्यांचे भक्ष्य बनत असलेल्या नागरी जीवनाच्या जवळ? या प्रयत्नात पुन्हा मिळवायचे काय, तर काही नाही. ‘घोड्याच्या पाठीवर बसलेल्या आणि त्याला चावे घेत सतत सावध ठेवणाऱ्या गोमाशीला काय साधायचे असते’ हा प्रश्न एका प्रज्ञावंताने अनेक शतकांपूर्वी जगाला विचारला. तो तसा विचारण्याएवढी प्राज्ञा आज कुणाही जवळ नाही. मात्र त्या प्रश्नाचे आयुष्य सनातन म्हणावे एवढे मोठे आणि तो प्रत्येकच माणसाला पडावा एवढा सार्वत्रिकही आहे... ‘सेंटर पेज’ हा त्या प्रश्नाचा छोटा अविष्कार आहे.

जसे दिसले तसे मांडले असेच या लिखाणाचे स्वरुप राहिले. हे पाहणेही कोणत्या भूमिकाग्रस्ताचे, प्रचारवंताचे वा विचारवंताचे नव्हते. ते एका सामान्य व साध्या विद्यार्थ्याचे होते. समाजात साधी दिसणारी माणसे प्रसंगी कमालीच्या बोलक्या आणि जाणकारांनाही अंतर्मुख करणाऱ्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. खेड्यातल्या माणसांत असे साधे पण समर्थ शहाणपण खूपदा अनुभवता येते. ‘सेंटरपेज’ मध्ये प्रकाशित झालेल्या लेखांची मांडणी, भाषा व त्यामागची दृष्टी अशी होती. तीत साधेपण असेल तर ते साऱ्यांचे, शहाणपण असेल तर ते त्या ग्रामीणांच्या अंतर्मुख करणाऱ्या दृष्टीचे आणि यातले काहीच ज्यात नसेल ते लेखकाचे. या लेखमालेने खूप चाहते आणि मित्र जोडले. त्यांनी केलेले कौतुक हेच तिचे बळही ठरले. अनेकांच्या रोषाला सामोरे जाण्याची व तो मनावर न घेण्याची मानसिकताही त्यातून उभी राहिली. आपण लिहितो ते वाचणाऱ्यांचा वर्ग ‘साधना’चा आहे, तो जाणत्यांचा, चर्चा करणाऱ्यांचा आणि प्रतिक्रिया देणाऱ्यांचा आहे याची जाणीव आरंभापासून होती. मात्र त्याचवेळी आपण अनेकांच्या मनात ठसठसत असलेली वेदना व्यक्त करतो असेही मनात येत होते. ‘तुम्ही जे लिहिता ते आमच्याही मनात होतेच, मात्र एवढे खरे कशासाठी लिहायचे’ ही अनेक वाचकांची एक विशेष आणि वेगळी प्रतिक्रिया होती आणि ती सातत्याने प्रगट होत होती. अशी प्रतिक्रिया आली की आपण वाचकापर्यंत पोहचलो अशी हरखून टाकणारी जाणीव मनात यायची. त्याचवेळी एवढे खरे अनेकांना भावत नाही याची खंतही जागी व्हायची. सामाजिक व राजकीय वास्तव सूर्यप्रकाशाएवढे लखलखीत दिसत असताना आणि त्यातले बरेवाईट प्रकार अंगावर येत असताना त्याविषयी बोलता न येणे हा एक गंभीर सामाजिक निर्बंध (सोशल सेन्सॉरशिप) आहे. ‘ज्यांच्याविषयी लिहिता ते सत्तासंपन्न, धनसंपन्न आणि झालेच तर शक्तीसंपन्नही आहेत त्यामुळे जरा सांभाळून असा’ हा सावधगिरीचा सल्लाही अनेकांनी या काळात दिला. या साऱ्या वाचकांचे व सुहृदांचे मनापासून आभार. हा स्तंभ नियमितपणे प्रकाशित करणाऱ्या साधना साप्ताहिकाचे संपादक नरेंद्र दाभोलकर, कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्याविषयीची कृतज्ञता. तो साकारण्यात सहकार्य करणाऱ्या वर्षा बाशू यांचीही येथे आठवण. लेखमालेला सातत्याने चविष्ट विषय पुरवणाऱ्या राजकारणी, समाजकारणी व आंदोलनकर्त्या थोरामोठ्यांचेही आभार.

जाता जाता एक गोष्ट आणखीही नम्रपणे नोंदवण्याजोगी. ही लेखमाला लिहिताना प्रस्तुत लेखकाच्या मनात आपण न्यायाधीश असल्याचा आव नव्हता. तसे निर्णयही त्याने कुठे नोंदविले नाहीत. हे मला दिसले आणि तुम्हाला सांगावेसे वाटले असा साधा वार्ताहराचा व स्तंभलेखकाचा हा प्रयत्न आहे. टीकेत तिरस्कार नसावा आणि कौतुकात दैवतीकरण नसावे, ज्यांच्याविषयी सांगायचे ती माणसे आहेत, ज्या संघटनांविषयी लिहायचे त्याही माणसांच्याच संघटना आहेत आणि सारी माणसे इथून-तिथून सारखीच गुणदोषप्रधान आहेत ही या स्तंभाची भूमिका आहे. आपले गुणदोष आपणच अभ्यासावे असा हा प्रयत्न आहे.

Tags: स्तंभ लेखमाला सेंटर पेज सुरेश द्वादशीवार समाज मुल्य उजवे डावे भाजप कॉंग्रेस Smajakaran Rajkaran Samaj Muly Right Left BJP Congress Stambh Lekhamala Centre Page Suresh Dwadashiwar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सुरेश द्वादशीवार,  नागपूर
sdwadashiwar@gmail.com

ज्येष्ठ पत्रकार, संपादक, लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख 2008-2021

सर्व पहा

लोकप्रिय लेख 1996-2007

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके